पुणे ते लेह (भाग ६ - श्रीनगर (दाल लेक/नगीन लेक) व श्रीनगर ते सोनमर्ग)

अभिजीत अवलिया's picture
अभिजीत अवलिया in भटकंती
16 Dec 2017 - 7:55 pm

३० ऑगस्ट

दाल लेक @६.१५ A.M.

'आप और एक दिन यहा रुकीये. सेम ७८०/- रु. में. फिर आगे जाईये.' हाऊसबोटच्या मालकाने काल रात्रीच गळ घातली होती. पण वेळेअभावी ते शक्य नसल्याने आजच पुढच्या प्रवासास निघायचे ठरवले. निघण्यापूर्वी दाल लेक व नगीन लेक राईड करायची होतीच. ८ वाजता तुम्हाला ब्रेकफास्ट देतो. ब्रेकफास्ट करून तुम्ही लेक राईडला जा. परत येईपर्यंत जेवण तयार ठेवतो असे हाऊसबोटचा मालक बोलला आणि शिकारा घेऊन काहीतरी आणायला घेऊन गेला. मी पण मग इकडचे तिकडचे फोटो काढत बसलो.

'Good Morning Sir, How are you ?' एक खणखणीत आवाज ऐकू आला.

'I am fine, thank you. How are you?'

'I am fine too. I am Imran.'

दाल मधील फुल विक्रेता इम्रान

श्रीनगर मध्ये कॉमर्सच्या दुसऱ्या वर्षात शिकत असलेला विद्यार्थी. सकाळी ६ ते ९ दाल लेक मधे फुले विकणे आणि नंतर कॉलेज हा रोजचा दिनक्रम.

इम्रानकडून एक बुके आणि ३-४ प्रकारचे फुलांचे बीज देखील घेतले. ते इकडे उगवण्याची शक्यता जवळपास नाहीच तरीपण प्रयत्न करून बघावा म्हणून घेतले.

दाल लेक व त्यातल्या हाऊसबोट

७:३० वाजता तारिक नावाची एक व्यक्ती शिकारा घेऊन आली. ह्यांना हाऊसबोटच्या मालकानेच बोलावले होते. पर्यटन हंगामात शिकारा चालवणे आणि इतर वेळी विणकाम करणे हा उपजीविकेचा धंदा. ८ वाजता लेक राईडला निघतच होतो तेवढ्यात एक इमिटेशन ज्वेलरी विक्रेता येऊन टपकला. 'आम्ही १२ पर्यंत परत येतो, त्यावेळी या' असे त्याला सांगून राईडला निघालो. पण आत्ताचे गिऱ्हाईक आत्ताच पटवा हा व्यावहारिक विचार करून हे साहेब दुसरा एक शिकारा घेऊन आमच्या शिकाऱ्याला चिकटून बरोबर आले. मग त्याच्या पेटाऱ्यातून एक एक वस्तू बाहेर निघू लागली. 'दीदी ये अच्छा है. ले लो. ये भी एक ले लो.' गोडीगुलाबीने त्याचे काम चालू होते. अप्रतिम कलेक्शन होते त्याच्याकडे एवढे मात्र नक्की. इथे एक नियम पाळायचा. विक्रेता वस्तूची किंमत १०० रु. बोलला तर तुम्ही ३०-३५ सांगायची. ४० पर्यंत देऊन टाकतात. ह्यात विक्रेत्याचे मार्जिन, त्याचा शिकारा चालवणारा, तुमचा शिकारा चालवणारा सर्वांचे कमिशन असते. ज्या इमिटेशन ज्वेलरी खरेदी केल्या त्यांची एकत्रित किंमत सुरवातीस ५००० रु सांगितली त्याने. पण शेवटी २००० रु. त आनंदाने देऊन गेला. नंतर एक लोखंडी अँटिक सामान विकणारा आणि एक केसर + शिलाजीत विक्रेता आला. पण मी त्यांना दाद दिली नाही. त्यामुळे जेमतेम अर्धा मिनिट प्रयत्न करून ते निघून गेले. उत्तर भारतात कोणत्याही थंड हवेच्या ठिकाणी हे शिलाजीत विक्रेते असतातच. इतके शिलाजीत ह्यांना मिळते तरी कुठे काय माहीत. परत एक आईस्क्रीम विक्रेता आला होता. त्याच्याकडून घेतलेले आईस्क्रीम मात्र मस्त होते.

दाल लेक व नगीन लेक एकमेकांना जोडलेले आहेत. दोन्हीच्या मधला जो पॅसेज आहे त्याच्या बाजूने दुकाने आणि घरे आहेत. ह्या तलावांच्या कडेने राहणारे लोक प्रवासासाठी तलावात बांधलेल्या लाकडी पुलांचा किंवा छोट्या बोटींचा वापर करतात.

दाल/नगीन लेक मधील लाकडी पूल

तसे रोज ह्या पॅसेजची स्वच्छता केली जाते पण गेले एक महिना हा भाग स्वच्छ ठेवणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा संप चालू होता. त्यामुळे पॅसेज मध्ये खूप घाण होती. पाण्याचा अतिशय उग्र घाण वास येत होता.

पुढे पुढे जात असताना रैनावरी नावाचा शहराचा जुना भाग आला. इथे काश्मिरी पंडितांची काही घरे दिसली. पण बरीचशी बंद होती बहुतेक.

काश्मिरी पंडितांची घरे

'हमने कश्मिरी पंडितों को यहांसे नहीं भगाया सर. हमने उन्हे नहीं भगाया. उनको भगाने वाले तो नेता थे. जगमोहन. जगमोहनने पंडितों के मन में जान बुजकर डर पैदा किया. पंडितोंको यहांसे भागने पर मजबूर कर दिया. फिर नेता लोग उनके घर पे कब्जा करके बेचकर पैसा खा गये. आज भी कश्मीर के कुछ गावों में ५-१० पर्संट पॉप्युलेशन पंडितों की है. मुस्लिम मिलजुलकर रहते है उनके साथ. एक दुसरे की हर मदद करते है हम लोग. में तो चाहता हूं की जितने भी पंडित यहां से गये है सब वापस आ जाये. हमारे भाई है वो. मिलजुलके एक साथ रहेंगे.' - तारिक

जवळपास १० च्या दरम्याने नगीन लेक आला. इथे पण हाऊसबोट आहेत. इथे विदेशी लोक जास्त राहतात असे वाचलेय. इथे फारसे विक्रेते पण येत नाहीत त्यामुळे हा लेख खूपच शांत असतो.

नगीन लेक

ह्या तलावांमध्ये कमळाची तर तलावाच्या काठाने वेगवेगळ्या भाज्या जसे पडवळ, भोपळा, दुधी भोपळा ह्यांची शेती केली जाते. पण मुख्य पीक कमळ. ही कमळ शेती फुलांसाठी नाही तर देठांसाठी केली जाते. कमळाच्या देठाचे (स्थानिक भाषेत कमल ककडी) लोणचे केले जाते. हे देठ जवळपास २५० रु. किलो ह्या भावाने विकले जातात.

कमळ

वॉटर लिली

नगीन लेक पाहून परतीच्या प्रवासाला लागलो. वाटेत एक दुकानातून मध विकत घेतला.

'वो पथ्थरबाजी वगैरा कहा पर होती है?' - मी विचारले.

'लाल चौक और उसके आसपास. इस साईड कुछ नहीं. यहां का माहौल खराब करनें में पत्थर बाजी करनें वाले लोगोंका बहुत हाथ है. गलत काम करते है. जो गलत है वो गलत है. उनके कारण लोग डर गये है और इधर आना ही बंद कर दिया. आपने भी देखा होगा टुरिस्ट ही नहीं है. हमारी आमदनी बहुत कम हुई है.' - तारिक

तारिकचे म्हणणे खरे होते. नगीन लेक मधे पण फक्त एका हाऊसबोटीत एक विदेशी पर्यटक जोडपे बाहेर बसलेले दिसले होते. बाकी सर्व रिकाम्या किंवा बंद दिसत होत्या. जवळपास अशीच परिस्थिती दाल लेक मधे होती. बरेचसे शिकारा तसेच नांगरून ठेवलेले होते. पूर्ण दाल लेक व नगीन लेक राईड करून परत येईपर्यंत आम्हाला दुसरे कुणीही पर्यटक दिसले नाहीत.

'एक बार दिसंबर की अंत में या जनवरी में आईए. सब पत्ते गिर जाते है पेडोसे. ये लेक बर्फ होकर जम जाते है. तब चलते हुए घुम सकते है इस पर.'

'जरूर आयेंगे... जब बर्फ होती है तो खाने पिने के सामान का क्या करते है आप?'

'देढ दो महिने का स्टॉक करके रखते है घर में. करना ही पडता है. यहां कभी भी कुछ भी हो सकता है. बर्फ होती है. बार बार कर्फ्यू होता है.'

जवळपास ५ तासांची लेक राईड आटोपून परत आलो तेव्हा एक वाजला होता. चिकन, रोटी, डाळ, पालकची भाजी असे चवदार जेवण जेवून हाऊसबोट मधून १:३० वाजता चेक आऊट केले. पुन्हा पार्किंग परत सोडायला तारिकच आले होते शिकारा घेऊन. त्यांना बोट राईडचे २००० आणि वर बक्षिसी देऊन २:१५ वाजता श्रीनगर मधून सोनमर्गकडे निघालो. शहरातून बाहेर पडत असताना थोडे श्रीनगर पाहायला मिळाले. गाडीच्या इन्शुरन्सची फोटोकॉपी करायची राहून गेली होती. ती एका ठिकाणी थांबून केली. नंतर पुढे जात असताना एका ठिकाणी भिंतीवर एक घोषणा लिहिलेली ओझरती नजरेस पडली. वेगात असल्याने मी थोडा पुढे निघून गेलो होतो. यू टर्न घेऊन परत मागे आलो. घोषणा होती 'Stand With Zakir Mussa'. एक फोटो काढून पुढे निघालो. नंतर पुढे वेगवेगळ्या भारत विरोधी, पाकिस्तान/तालिबानच्या समर्थनाच्या, स्वातंत्र्य मागणाऱ्या, भारताने इथून निघून जावे असे सांगणाऱ्या घोषणा भिंतींवर लिहिलेल्या दिसल्या. श्रीनगर मधून बाहेर पडेपर्यंत हे सगळे असेच होते. खूपच भारत विरोधी वातावरण वाटले श्रीनगरचे.

शहरातून बाहेर पडल्यावर पुन्हा भात शेती दिसायला लागली. गंदरबल पर्यंत रस्ता फारच अरुंद होता. तिथे पोचेपर्यंतच ३:३० वाजले. गंदरबल पासून पुढे रस्ता चांगला होता. आमच्या पुढे एक मिलिटरीचा ट्रक चालला होता आणि ४ सैनिक ट्रकमध्ये उभे होते. त्यातल्या एकाने मागे पाहून आमच्या गाडीच्या नंबर प्लेट कडे बोट दाखवले आणि हात हलवला. बहुतेक महाराष्ट्रातील असावा. मी पण हात हलवून राम राम केला. 'वायुल' पासून पुढच्या प्रवासात सिंद नदीची सोबत होती. एके ठिकाणी फोटो काढण्यास गेल्यावर कॅमेऱ्याचे मेमरी कार्ड फुल झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे एका ठिकाणी थांबून सगळे फोटो लॅपटॉपवर घेतले. श्रीनगर ते सोनमर्ग हा ८० किमीचा रस्ता म्हणजे निसर्गाची मुक्त हस्ते उधळण आहे. श्रीनगर सोनमर्ग प्रवासातील ही अजून काही छायाचित्रे.

सफरचंदे मोजा

६:३० ला सोनमर्ग मध्ये पोचलो. गावाच्या थोडे अगोदर एका ठिकाणी प्रवेश कर भरावा लागतो. प्रवेश कर घेणाऱ्या व्यक्तीने 'वाणी' ह्या हॉटेलचे नाव सुचवले होते. तिथेच गेलो. ६०० रु.त रूम मिळाली. म्हणजे काय झाले. रूम दाखवून 'किती द्याल ?' असे उलट हॉटेल मालकानेच मला विचारले. '६०० देऊ का?' असे विचारल्यावर तो आनंदाने तयार झाला.
सोनमर्ग मध्ये कल्पनातीत थंडी होती. लहानपणी 'घाटी में कडाके की ठंड से जनजीवन अस्तव्यस्त.' ही एक ठरलेली बातमी, आणि अंगात पायघोळ झगा व हातात धुमसत्या कोळशाने भरलेले भांडे घेतलेले लोक हे एक ठरलेले दृश्य दूरदर्शनवरच्या बातम्यांमध्ये बघायला मिळे. ते इथे प्रत्यक्षात बघायला मिळाले. एका दुकानदाराने मला त्याचे कोळशाने भरलेले भांडे दिले. खूपच उबदार वाटते ते भांडे पोटाजवळ धरल्यावर. रात्री हॉटेलच्या कूकने बनवलेले अत्यंत चवदार नॉन व्हेज जेवून स्थानिक बाजारातून मुलासाठी लोकरीचे हॅन्डग्लोव्ज घेतले. पाऊस आल्यास फोटो काढणे शक्य होत न्हवते म्हणून एक छत्री पण घेतली. आज खूपच कमी म्हणजे अवघा ८० किमी प्रवास झाला. पण हिमालयात प्रवास करताना तुम्ही किती अंतर कापता ह्यापेक्षा किती ऊंचीवर जाताय हे जास्त महत्वाचे आहे. आणि ही ऊंचीतील वाढ हळू हळू असणे उत्तम. त्यामुळे आपले शरीर विरळ हवेला सरावत जाते. श्रीनगर - लेह महामार्गाचा विचार केल्यास श्रीनगर समुद्र सपाटीपासून १५८५ मी ऊंचीवर आहे तर सोनमर्ग जवळपास २८०० मी. म्हणजे अवघ्या ८० किमी प्रवासात तब्बल १२१५ मी. ने ऊंची वाढते. पुढे येणारे द्रास ३२८० मी., कारगिल पुन्हा खाली म्हणजे २६७६ मी., निम्मू ३१४० मी. आणि लेह ३५०५ मी. ऊंचीवर आहे. हेच तत्व मनाली ते लेह महामार्गाने प्रवास केल्यास पाळावे लागते. मनाली ते लेह अंतर ४७५ किमी आहे. त्यामुळे मनाली पासून २२२ किमीवर असलेले सर्चू किंवा ३०० किमीवर असलेले पांग इथे पहिला मुक्काम करणे अंतराच्या दृष्टीने योग्य वाटत असले तरी ऊंचीच्या दृष्टीने ते चुकीचे आहे. कारण मनाली २०५० मी ऊंचीवर आहे. तर सर्चू ४२५३ मी. व पांग ४६३० मी. त्यामुळे पहिला मुक्काम कधीही सर्चू किंवा पांग इथे करू नये तर मनाली पासून ११५ किमीवर असलेले क्येलॉन्ग (३३४९ मी) किंवा १३६ किमीवर असलेले जिस्पा (३१४२ मी) अथवा १५० किमीवर असलेले दारचा (३४०० मी) इथे करावा. त्यातही जिस्पा उत्तम. तसेच मनालीवरून लेह ला जाताना त्सो मोरिरी (४५२२ मी) किंवा पॅंगॉन्गला (४३५० मी) लेहच्या अगोदरच एक फाटा लागतो जायला. पण हे दोन तलाव फारच ऊंचीवर असल्याने अगोदर हे तलाव बघू आणि मग लेहला जाऊ असे शक्यतो करू नये. कारण त्यामुळे विरळ हवेचा त्रास होण्याचे प्रमाण खूप वाढते. मनाली लेह प्रवासात सतत फारच ऊंचीवर प्रवास करावा लागतो. तुलनेत श्रीनगर लेह मार्गावरचा प्रवास सोपा असल्याने श्रीनगर मार्गे जाणे आणि मनाली मार्गे परत येणे हे कधीही योग्य.

एकंदरीत आजचा दिवस देखील उत्तम गेला. उद्या ह्या प्रवासातील पहिला मोठा आणि अत्यंत कुप्रसिद्ध पास झोजिला पास खुणावत होता.

प्रतिक्रिया

शलभ's picture

16 Dec 2017 - 8:32 pm | शलभ

मस्त सफर चाललीय..

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Dec 2017 - 9:05 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर वर्णन आणि फोटो ! पुभाप्र.

कपिलमुनी's picture

16 Dec 2017 - 10:31 pm | कपिलमुनी

पुभाप्र

एस's picture

16 Dec 2017 - 11:38 pm | एस

वाचतोय. पुभाप्र.

संजय पाटिल's picture

17 Dec 2017 - 12:26 pm | संजय पाटिल

फोटो आणि वर्णन मस्तच! पु.भा.प्र.

श्रीधर's picture

17 Dec 2017 - 12:39 pm | श्रीधर

सुंदर वर्णन आणि फोटो

टवाळ कार्टा's picture

17 Dec 2017 - 12:47 pm | टवाळ कार्टा

मस्तय

फोटो कसले भारी आलेत! जबर्या! पुढचे लेह लडाख चे फोटो काय असतील ह्याची उत्कंठा आहे आता....

हा प्रवास ह्याच मार्गाने मोटरसायकलवर केला आहे. फोर्ड फिगो ने हा रस्ता कसा tackle केला हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. (माझ्याकड़े पण २०११ ची डिझेल फिगो आहे !)

मराठी कथालेखक's picture

18 Dec 2017 - 11:51 am | मराठी कथालेखक

छान लेख आणि फोटो.

कपिलमुनी's picture

18 Dec 2017 - 1:21 pm | कपिलमुनी

छायाचित्रे मस्त आली आहेत. पहिले कृष्णधवल छायाचित्र तर फ्रेम करावे इतके सुंदर आहे .

सध्याच्या मिपावर प्रतिक्रिया कमी येतील . त्याकडे लक्ष देउ नका :)

अभिजीत अवलिया's picture

20 Dec 2017 - 8:22 am | अभिजीत अवलिया

सर्व वाचकांंचे आभार.

सध्याच्या मिपावर प्रतिक्रिया कमी येतील . त्याकडे लक्ष देउ नका :)

मुनीवर,
मी नाही लक्ष देत प्रतिक्रीयांंच्या संंख्येकडे. आपलंं कीर्तन करत बसतो. लोक आवडलंं/नाही आवडलंं तर सांंगतील नाहीतर राहीलंं. :)

वरुण मोहिते's picture

20 Dec 2017 - 1:50 pm | वरुण मोहिते

फोटो पाहून परत जाण्याचा मूड होतोय ...पु .भा . प्र

यशोधरा's picture

25 Dec 2017 - 7:57 pm | यशोधरा

भारी! फोटोही आणि लिखाणही.

आणि हो, सगळे भाग लिंकवून का घेत नाही?

अभिजीत अवलिया's picture

26 Dec 2017 - 6:58 am | अभिजीत अवलिया

पहिले ५ घेतले. हा राहीलाय तो घेतो लिंंकवून.

कंजूस's picture

26 Dec 2017 - 5:04 am | कंजूस

फार छान वर्णन आणि फोटो.

मनिमौ's picture

26 Dec 2017 - 6:33 am | मनिमौ

फारच छान ओ.

जुइ's picture

27 Dec 2017 - 2:22 am | जुइ

अतिशय मनमोहक छायाचित्रे काढली आहेत.

पैसा's picture

7 Jan 2018 - 9:20 pm | पैसा

सुरेख!

पद्मावति's picture

8 Jan 2018 - 1:53 am | पद्मावति

अतिशय सुरेख फोटो आणि वर्णन सुद्धा मस्तं.
बाकी, कमळासारख्या सुंदर आणि आपल्याकडे आभावानी दिसणार्‍या राजस फुलाची शेती त्याच्या रूपासाठी नव्हे तर त्याचे देठ खाण्यासाठी करण्यात यावी या गोष्टीची गंमत वाटली. एखादया प्रदेशात जी गोष्ट मुबलक प्रमाणात मिळत असेल तर तिथे त्या गोष्टीची फारशी किंमत राहात नाही नं. अवांतर - कमल ककडी चा उल्लेख आला आणि अभिमान मधल्या दुर्गा खोटे आठवल्या, अमिताभसाठी प्रेमाने ' कमल ककडी के बडे' बनविणार्‍या :)