एका कथेची गोष्ट

दर्शना१'s picture
दर्शना१ in जनातलं, मनातलं
7 Dec 2017 - 8:39 am

उबदार पांघरुणाखाली पडल्या पडल्या श्रेयसीनं खिडकीतून बाहेर पाहिलं. आभाळ भरून आलेलं. अंधार पडायला सुरुवात झालेली. जरा पडू अजून म्हणता म्हणता संध्याकाळ उलटून गेलेली. घाईघाईनं उठताना खोकल्याची एक उबळ आली. तशी ती एकटीच होती घरी पण तरीही जणू काही ती खोकल्यावर भिंती कुरकुरतील म्हणून तिनं ती आतच दाबून टाकली. तिनं उठून टेबल लॅम्प लावला आणि खुर्चीवरची शाल ओढणीसारखी अंगावर घेत चहा करायला किचनकडे निघाली. पण त्याआधी टेबलवर विखुरलेल्या कागदातून ती लिहीत असलेल्या पुस्तकाचं शेवटचं पान उचलून, एक भिरभिरती नजर टाकून तिनं वाचलं. चहा करता करता तिच्या कथेतल्या पात्रांचा विचार करू लागली. कथेचही चहासारखंच, सगळ्या स्वभावधर्माची माणसं मापात असली की कथा फक्कड जमते असं तिचं मत.

"ए काहीपण, असं अगदी मापात कुणी नसतं जगात!"

विचारांच्या गर्तेत हरवलेल्या श्रेयसीला अगदी काल ऐकल्यासारखा आशूचा आवाज आला.

स्वतःशीच हसत तिनं चहात दूध टाकून तो गाळून घेतला. दिवाणखान्यात येऊन सोफ्यावर बसली. दोन्ही हातानी कप धरून पहिल्यांदा त्याची ऊब हातात मुरवली मग हलकेच कपाळावरून फिरवला. मग गरम गरम वाफेतून येणारा मसाल्याचा वास घेतला. सोफ्यावर मान टेकवून निवांत त्या गरम चहाच्या कपाची ऊब अनुभवत राहिली बराच वेळ. आशू असता तर म्हणाला असता तुझं काय कपाबरोबर अफेयर आहे की काय? असता तर, आशू असता तर, संध्याकाळी एवढा निवांत चहा पिताच आला नसता! केव्हाच गाडी काढून तयार झाला असता चल चल लवकर पावसात भजी खाऊन येऊ टपरीवर. त्याचं सगळंच उत्स्फूर्त. जणूकाही प्रत्येक क्षणाशी त्याची स्पर्धा सुरू आहे. कशासाठी, काय जिंकण्यासाठी काहीही माहित नाही, धावायचं एवढं खरं.

एकदाचा चहा संपवून ती पुन्हा लिहायला बसली. आधी लिहलेल्या पानांवर वारंवार नजर टाकून ती पुढे काहीतरी लिहलचं पाहिजे असं स्वतःलाच म्हणाली. पण काय लिहणार, अजून किती वळणं घेणार या कथेत? साधी सरळ दोन पात्रांची गोष्ट. पण तीसुद्धा किती किचकट करून ठेवलीय आपण. हा सगळा त्या आशूचा परिणाम.

कॉलेजच्या दुसऱ्या वर्षी मोठ्या हौसेनं तिनं वार्षिक मासिकासाठी एक कथा लिहली होती. तशी ती सगळ्याच कार्यक्रमांमध्ये पुढाकार घेऊन काम करायची पहिल्या वर्षापासून. लिहण्याची जरी पहिली वेळ असली तरी आपण चांगलंच लिहिलंय असं तिला वाटत होतं. तिच्या वर्गातल्या मित्र मैत्रिणीना ते आवडलं होतं. म्हणूनच तिची कथा जेव्हा नाकारली तेव्हा तिला धक्काच बसला होता.

"काय माझी कथा नाही घेतली वार्षिक मासिकात? कसं शक्य आहे?"

तणतणत ती कँटीनमध्ये बसलेल्या आशिषच्या ग्रुपकडे गेली. तिला एक वर्ष सिनियर असलेला आशू त्या वर्षी कॉलेजचा गॅदरिंग सेक्रेटरी होता. मूळच्याच बोलक्या आणि अभ्यास सोडून इतर उद्योग करायच्या त्याच्या स्वभावामुळं वार्षिक मासिकाची जबाबदारीही त्यानं आनंदानं स्वीकारली होती.

"काय, काय वाईट आहे या कथेत?" धुसफूसत श्रेयसीन आशूला विचारलं.

"तेच तर, काहीच वाईट नाहीये. इट्स टू गुड."

"म्हणजे कथेत काहीतरी वाईट असलं तरच ती चांगली असते का? मला लोकांना रडवायला नाही आवडत."

"मग असं कर ना, जोकच लिहीत जा ना कथेपेक्षा. चांगलं जमेल तुला."

"ए हॅलो, उगीच बोलबच्चनगिरी करून संपादक होण्यापेक्षा स्वतः दोन ओळी तरी लिहून दाखव ना. कळू दे तरी एवढे सल्ले देणाऱ्याचे पाय किती पाण्यात आहेत ते."

"दोन ओळी कशाला, तुझीच कथा लिहून देतो तुला परत. नाही आवडली तर तूच हो संपादक."

"चॅलेंज?"

"चॅलेंज!"

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी विस्कटलेले केस, तारवटलेले डोळे घेऊन आशू तिच्या होस्टेलबाहेर उभा होता.

श्रेयसी खाली आल्यावर तिच्या हातात गिचमीट अक्षर काढलेली चार पानं कोंबत तो म्हणाला होता,

"अशी लिहितात कथा!"

"वाचता आली तर बघते!" असं म्हणून श्रेयसी परत रूमवर गेली. अधाशासारखी तिनं ती कथा वाचून काढली.

दुपारी कॉलेजवर गेल्यावर तिनं आशूला टाळायचे सगळे प्रयत्न केले, पण शेवटी त्यानं तिला शोधून काढलंच.

"मग घेताय ना संपादकपदाची जबाबदारी?"

"अर्थात, मला वाटलं सांगायची गरज नसावी ते." उगीच उसणा आव आणून श्रेयसी म्हणाली.

"अरे वा, इतकी वाईट होती का कथा?"

"म्हणजे काय! माझ्या कथेचा आत्माच काढून टाकला आहेस. भावनेच्या भरात निर्णय घेणारी नायिका आणि तिचे निर्णय बेदरकारपणे धुडकावून आपल्या मार्गानं निघून गेलेला नायक असं कधी होतं का प्रेमात?"

"ऑफकोर्स! पीपल आर एक्सट्रीम माय डियर."

असं म्हणून तो आल्या पावली निघूनही गेला. वार्षिक मासिकात शेवटी श्रेयसीचीच कथा आली पण तिलाच आता त्याचं काही कौतुक वाटत नव्हतं. आशूनी लिहलेली कथा टोचणारी होती, विचार करायला भाग पाडणारी होती. नकळत का होईना पण ती स्वतःला नायिकेच्या जागी ठेवून पहात होती. तिच्या कथेतली नायिका कुणीतरी लांबून आलेली पाहुणी असल्यासारखी तिला वाटू लागली आणि आशूने लिहलेली अगदी कानगोष्टी करत जीच्यासोबत मोठं झालो अशी जिवाभावाची सख्खी मैत्रीणच. आपलंच प्रतिबिंब आरशात पाहिल्यासारखं. पण मग कथेतली पात्रं अशीच हवीत का? अगदी जिवंत. नकळत त्यांच्यासोबत आपल्याला त्यांच्या जगात घेऊन जाणारी. ज्यांच्याशी स्वतःची तुलना करावी वाटेल, ज्यांची सुख दुःख आपलीशी वाटतील, आणि ज्यांचे चुकीचे निर्णयही त्या पात्राविषयी वाटणाऱ्या आपुलकीमुळे ग्राह्य वाटतील!

विचारांच्या तंद्रीतून बाहेर आली तेव्हा आशूचं तेच वाक्य तिच्या कानात रुंजी घालत होतं.

"पीपल आर एक्सट्रीम माय डियर!"

साध्या कथेवरून झालेल्या भांडणाच पुढं मैत्रीत रूपांतर झालं. त्याच्याशी बोलताना श्रेयसीला कायम वाटायचं हा असा इतका टेन्शन फ्री कसं काय राहू शकतो, कशाचीच पर्वा नाही! असेल घरचं सगळं व्यवस्थित पण तरी माणूस म्हणलं की काहीतरी तर असतं ना जे आत खोलवर सलत असेल. काहीच नाहीतर कॉलेजला येईपर्यंत एखाद दुसरा प्रेमभंग तर झालेलाच असतो.

एक गप्पा आणि पुस्तकं सोडली तर कशाचच व्यसन नाही. त्याला कधी विचारावं, अरे हे तू वाचलंय का? तर नेहमी हो ते ना मी लहान असतानाच वाचलंय हे उत्तर तयार. एक दिवस न राहवून श्रेयसीन त्याला त्याबद्दल छेडलंच.

"काय बाबा स्कॉलर लोक आहेत. बहुतेक लहान असताना लायब्ररीत पडीक होते म्हणून आता पायरी पण चढत नाहीत वाटतं लायब्ररीची!"

"होतोच मी लायब्ररीत पडीक. दर सुट्टीला मॉम डॅडची ठरलेली कारणं या सुट्टीत रहा, नेक्स्ट टाइम नक्की येऊ घ्यायला. कंटाळा आला त्यांच्या नेक्स्ट टाइमचा. शेवटी मी विचारणंचं सोडून दिलं."

"घ्यायला म्हणजे?"

त्यावर मोठ्याने हसून म्हणाला होता,

"मला बोर्डिंग स्कूलला घातलं होतं, चौथीत असताना. मॉम डॅडचं पटत नव्हतं. घरी सतत वाद. मला होस्टेलवर सोडताना डॅड काय म्हणाले होते माहिती, सगळ्यांना आपली लढाई स्वतः लढता आली पाहिजे!"

चौथितल्या मुलाची अशी काय लढाई असणार? ओठांवर आलेले शब्द तसेच मागं सारून श्रेयसी शांत बसली. आज कधी नव्हे तो मन मोकळेपणानं स्वतःविषयी बोलत होता. तिला ते सगळं ऐकायचं होतं. इतके दिवस तिला छळणार एक कोडं हळूहळू सुटत होतं. आशूसुद्धा माणूसच होता, प्रेम, दुरावा, दुःख, आनंद सगळं सगळं अनुभव करू शकणारा!

"मग काही वर्षातच त्यांचा डिव्होर्स झाला. कुणीच भांडलं नाही माझ्यासाठी! मलाच ठरवायला लावलं मी कुणाकडे जायचं...तेव्हापासून जिंदगी म्हणजे काय बकवास टाइमपास वाटते यार!"

आज पहिल्यांदाच श्रेयसीनं आशूला जीवनाविषयी चिडून बोलताना पाहिलं. आजवर दिसलेल्या आशूपेक्षा हा आशू किती वेगळा होता. त्याचं हे प्रत्येक क्षण भरभरून जगणं हा फक्त मुखवटा आहे का? आतमध्ये खोल कुठेतरी झालेली जखम कधी भरूनच निघाली नाही, पण ती दिसली तर आपण कमजोर आहोत असं वाटेल म्हणून हा असा हरफनमौला बनून फिरतो का? वेगळं होण्यामागे आईवडिलांची काही कारणं असतील हे त्याला कळत नसेल का? कळलंही असंलं तरीही त्याने जणू काही ते स्वीकारालंच नाही. आधी तिला वाटायचं आशूचं हे बेपर्वा वागणं फक्त त्याच्या मनमौजी स्वभावामुळे असेल, पण जसा त्याचा भूतकाळ कळू लागला तसं उलट तिला त्याच्या ह्या बेपर्वा वागण्याचं वाईटच वाटू लागलं. हे सगळं वागणं म्हणजे फक्त त्याच्या जवळच्या माणसांना त्रास व्हावा म्हणून आहे की काय अशी तिला शंका येऊ लागली.

त्यानं लिहावं असं श्रेयसीला मनोमन वाटायचं. आतल्या आत खदखदत राहण्यापेक्षा त्याचे विचार, भावना व्यक्त झाल्या तर तो बदलेल असं वाटायचं. तसा त्याचा लोकसंग्रहसुद्धा मोठा. बडबड्या स्वभावामुळं अनेक स्वभाव वैशिष्टयांची माणसं जोडून ठेवलेली. लिहायला त्याच्याकडे एकाहून एक भारी किस्से. पण त्याच्याकडून काही करून घेणं म्हणजे महाकठीण काम.

आशू पास आउट झाला तरी श्रेयसीच कॉलेज संपेपर्यंत कँटीनमध्ये येतच राहिला. इतर मुलांना एकतर नोकरी लागली होती किंवा ते प्रयत्न तरी करत होते. पण हा मात्र अगदी निवांत. एक दिवस स्वारी जरा तणतणतच कँटीनमध्ये आली. श्रेयसीन ओळखलं हा नक्कीच त्याच्या आई किंवा वडिलांना भेटून आला असणार. बराच वेळ टेबलवर ठेवलेल्या केचपच्या बाटलीशी खेळून झाल्यावर तो शेवटी म्हणाला,

"तुला मी कसा वाटतो?"

आशूच्या प्रश्नाचा रोख नक्की कुठे आहे ते न कळल्यान श्रेयसी गडबडली. ती काही बोलत नाही हे पाहून आशूच पुन्हा म्हणाला,

"अगं माणूस म्हणून कसा आहे?चांगला, वाईट, बरा?"

"वाईट, अतिशय वाईट." हसत हसत श्रेयसी म्हणाली.

"चल मग लग्न करूया."

"काय?"

"अरे काय सांगू तुला... डॅडनी आज एका बाहुलीचा फोटो आणला होता. ह्यांव इस्टेट अन त्यांव इस्टेट आहे म्हणे, हिच्याशी लग्न कर. अरे काय जोक आहे का?"

"मग?"

"मग काय करा म्हणलं तुम्हीच."

"वेडाच आहेस. असं कशाला बोललास, वाईट वाटलं असेल त्यांना."

"वाटू दे वाटलं तर. काय कमी आहे रे यांच्याकडे तरी सारखे पैसा पैसा करत बसतात. तू सांग जगायला काय लागतं माणसाला?काहीही लागत नाही. "

"बरंच काही लागतं, तुला कधी कुठल्या गोष्टीची ददात पडली नाही, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी कष्ट करावे नाही लागले ना म्हणून तुला सगळ्यांचंच आयुष्य सोपं असतं असं वाटतं. पण असं नसतं आशू."

श्रेयसीच्या स्पष्ट बोलण्याने आशू दुखावला. उगीच आपण असं बोललो असं वाटून शेवटी श्रेयसी म्हणाली,

"सॉरी रे, तुला दुखवायचं नाहीये पण हीच तर रियालिटी आहे ना आयुष्याची."

"कॅन्सल, आपलं लग्न कॅन्सल."

"ए हॅलो, मी हो कुठे म्हणलंय?"

"नको म्हणूस आता तू मागे लागली तरी मी तुझ्याशी लग्न करणार नाही."

हसत हसत श्रेयसी म्हणाली,

"मग कुणाशी करणार?"

"करेन करेन अशा मुलीशी करेन जिला फक्त प्रेम हवंय, प्रेम. तुझ्यासारखी नाही आयुष्याची रियालिटी टाईप."

"बरं झालं, एक प्रश्न निकालात निघाला."

"कसला?"

"मला वाटलं तू सिरीयसलीच विचारतोय. म्हणलं प्रेमाबिमात पडला का काय हा!"

तिच्याकडे पहात हसत हसत आशू म्हणाला,

"ह्या! वाट बघ वाट."

चेष्टामस्करीमध्ये असाच वेळ निघून गेला. बघता बघता श्रेयसीचही शेवटचं वर्ष संपलं. तिची प्लेसमेंटही झाली होती. नवीन आकाश आता तिला खुणावत होतं पण तरीही मागे काहीतरी राहतंय असंही वाटत होतं. इतक्या वर्षांचा आशूचा सहवास, आता एकदा जॉब सुरु झाला की असं सहज भेटता येईल आपल्याला? नाही म्हणलं तरी तिलाही त्याच्या बडबडीची, चेष्टामस्करीची सवय लागलेली. पण हल्ली तोही थोडा दूर दूर राहू लागला होता. क्वचित कधीतरी कॉलेजवर यायचा. आला तरी आधीसारखा श्रेयसीला शोधत फिरायचा नाही. एक दिवस आला ते लग्नाची पत्रिका द्यायलाच.

आश्चर्याने जवळ जवळ उडी मारत श्रेयसी म्हणाली,

"तू लग्न करतोयस? कुणाशी? कोण भेटली तुला?"

थोडासा ओशाळल्यासारखा होऊन आशू म्हणाला,

"बाहुलीच."

"काय? पण तू तर या सगळ्याच्या अगेन्स्ट होता ना? असं कसं बदललं तू तुझं मत?"

"अरे एज अ पर्सन म्हणून बरी वाटली मला, म्हणून बदललं मत. आता काय चौकशी समिती बसवते का?"

"चल तू मार्गी लागलास हेच खूप आहे. कधी भेटवतोस मला तिच्याशी?"

"भेटवु की, मी आहे इथेच."

आशू असं म्हणाला खरा पण लग्न ठरल्यावर त्याच कॉलेजमध्ये टाईमपास करायला येणं जवळ जवळ बंदच झालं. दिवसेंदिवस श्रेयसीही नवीन जॉबमध्ये व्यस्त होत गेली. पण त्याच्या लग्नाला आवर्जून त्यांचा कॉलेजमधला सगळा ग्रुप गेला होता. खूप खुश होता आशू आणि त्याची बायको तर किती सुंदर होती. श्रेयसीला वाटलं हा तिच्या रूपावर तर भाळला नाही ना? पण फोटो तर त्याने आधीच पाहिला होता. भाळलाच असता तर वडिलांशी भांडून आलाच नसता त्यादिवशी. खरोखर तिला भेटल्यावर आशूला काहीतरी वेगळं वाटलं असेल. एवढा मोठा निर्णय तो काही केवळ ती सुंदर आहे म्हणून घेणार नाही. सगळे आपल्याच मनाचे खेळ आहेत असा विचार करून श्रेयसी पुन्हा मैत्रिणींबरोबर गप्पा मारण्यात गुंग झाली.

एकाच शहरात राहूनही आशू आणि श्रेयसीचं आयुष्य समांतर रेशांप्रमाणे चालू होतं. लग्नाच्या आधीच आशू थोडा थोडा दूर गेला होता, लग्नानंतर तर तो पूर्णच दुरावला. नाही म्हणायला काही दिवस फोन सुरु होते पण हळूहळू तेही कमी होत गेलं. नव्या जबाबदाऱ्या पार पाडत श्रेयसी तिच्या बरोबरीच्या मुलामुलींपेक्षा कितीतरी पुढे गेली. लग्नाच्या बाबतीत मात्र या ना त्या कारणाने येणाऱया स्थळाना नकार देत गेली. तिच्यापुरत तिनं स्वतःच वेगळं जग तयार केलं होतं. ती एकटी होती, पण स्वतःमध्ये परिपूर्ण होती. स्वतंत्र होती. घड्याळाच्या धावणाऱ्या काट्यानी तिची ऑफिसमध्ये चुळबुळ होत नव्हती, कारण घरी वाट पहाणार कुणी नव्हतं. कधीही कुठल्याही असाईनमेंटला तिला "मला हे जमणार नाही" असं सांगावं लागलं नव्हतं. आशुची आठवण अधूनमधून डोकं वर काढायची पण तिनं आपल्या मित्राचं संसारात हरवणं आनंदान स्वीकारलं होतं. त्या आठवणींचा त्रास होण्याऐवजी "काय वेडे दिवस होते ते!" असं म्हणून ती खुश व्हायची.

एव्हाना बाहेर पावसाची रिप रिप वाढली होती. आता उद्या अजिबात मन भरकटू द्यायचं नाही, कथा पूर्ण करायचीच असं श्रेयसीन मनाशीच ठरवलं. उठून वरणभाताचा कुकर तरी लावावा असं वाटून ती उठली खरी पण तिला इच्छाच झाली नाही. हल्ली आपण कंटाळा करतोय, जेवणाकडे दुर्लक्ष होतंय हे तिच्या लक्षात आलं होतं. रोज रोज स्वतःच बनवायचं आणि स्वतःच खायचं तिच्या आता जीवावर येऊ लागलं होतं. बाहेर जावं तर पावसाचा जोर काही कमी होत नव्हता. आशू आणि श्रेयसीच दोन वेगळ्या दिशाना चाललेलं आयुष्य अशाच एका पावसाने पुन्हा एकत्र आणलं होतं. काही माणसं तुमच्या आयुष्यातून कायमची जाऊच शकत नाहीत. कितीही दूर गेले तरी तुमच्या मनावरचा त्यांचा ठसा तितकाच स्पष्ट राहिलेला असतो. मग या ना त्या कारणाने ते तुमच्या आयुष्यात परत येत राहतात. हातातून निसटून गेलेले क्षण पुन्हा आगंतुकासारखे तुमच्यासमोर उभे राहतात, काही त्यांना स्वीकारतात काही झिडकारतात आणि काहींना काय करायचं हेच कळत नाही. हेच, हेच असंच लिहायचं आहे मला कथेत असं म्हणून श्रेयसी उठता उठता थांबली. तिच्या कथेतला नायक तिला द्विधा मनस्थितीत असलेला दाखवायचा होता, पण आशू तर कधीच द्विधा मनःस्थितीत नव्हता. त्याला कायम माहीत होत त्याला आयुष्याकडून काय हवंय. आणि मी? मलाही माहीत होतंच की, चांगल करियर, उत्तम पगाराची नोकरी, कधी कुणावर अवलंबून राहावं लागु नये, कुणी आपल्यावर अवलंबुन असू नये असं स्वातंत्र्य हेच हवं होतं ना मला? मग त्यादिवशी अचानक आशू भेटला तेव्हा मनात एक वेगळं द्वंद्व का सुरु झालं?

अशाच एका पावसाळ्या रात्री ऑफिसमधलं काम संपवून श्रेयसी बाहेर पडली. बिल्डिंगच्या बाहेर आली आणि समोर एका शेडखाली आशू येरझाऱ्या घालत उभा दिसला. आश्चर्याचा धक्काच बसला तिला. आशू आशू अशी जोरात हाक मारून तिनं त्याच लक्ष वेधून घेतलं. तोही तिच्याकडे पाहताच पावसाची पर्वा न करता पळत पळत ती उभी होती तिथे आला.

"काय मॅडम, इकडे कुठे काय?"

"अरे हा प्रश्न मी तुला विचारायला हवा. तू इकडे कसा?आणि तेही या वेळेला?"

"अगं, म्हणजे तू ऑफिसमधून बाहेर पण पडते असं विचारायचं होतं. मी तुलाच भेटायला आलो होतो. आणि तू ऑफिसमध्येच होतीस तर फोन का उचलला नाही चक्रम?"

आशूने असं म्हणताच श्रेयसीन पर्समधून फोन काढून पाहिला. अरे हो खरंच की यानं फोन केलाय.

"अरे पण तू कसा काय आलास मला भेटायला अचानक? सॉरी रे मी मीटिंगमध्ये होते, आणि मिटिंग संपल्यावर तशीच निघाले. पण तू इतका वेळ का थांबलास वाट पहात? आपण उद्या पण भेटलो असतो ठरवून."

"छ्या, त्यात काय मजा मग? आता मला बघून तू कशी हायपर झाली, तशी थोडीच झाली असतीस उद्या?"

"ए तू अजून तसाच आहेस, कधी मोठा होणार तू?"

"तू चांगली शंभर वर्षांची म्हातारी होशील ना तेव्हा कुठे मी ऐन जवानीत येईन."

"हम्म, मग काही फार वेळ लागणार नाही. बरं चल आता, पावसात किती वेळ बोलत उभा राहणार? माझ्या घरी येतोस? जवळच आहे इथून. तुला वेळ आहे ना?"

"वेळ काढूनच आलोय. चल, तुला मस्त चहा करून देतो मी."

"अरे वा! आयता चहा मिळण्यासारखं सुख ते काय!"

श्रेयसीनं गाडी पार्किंगमधून काढली. आशू तिच्या शेजारच्या सीटवर बसला. श्रेयसीला कधीच गाडी चालवताना गाणी ऐकायची सवय नव्हती. गाडीत बसल्या क्षणी आशून रेडियो चालू केला. श्रेयसीची शिस्
गाडी चालू केल्या केल्या श्रेयसीन सर्वात आधी त्याच्या बायकोची चौकशी केली.

"मग काय म्हणते बाहुली?"

त्यावर खळखळून हसून आशू म्हणाला

"अजून लक्षात आहे तुझ्या!"

"मग अशी कशी विसरेन! एवढा सख्खा मित्र तू माझा"

त्यावर पुन्हा खळखळून हसून आशू शांत झाला. त्याला विचारलं त्या प्रश्नाच उत्तर दिलंच नाही त्यानं. आपल्याच धुंदीत असल्याप्रमाणे रेडियोवर लागलेलं गाणं तो गुणगुणत राहिला. श्रेयसीनही मग त्याची धुंदी मोडली नाही.. बऱ्याच वर्षांनी दोघे असे एकत्र होते..त्याहून महत्वाचं त्यांच्यासाठी काहीच नव्हतं.

घरी पोचल्या पोचल्या श्रेयसीन त्याला किचनमध्ये जाऊन चहाच सामान काढून दिलं आणि स्वतः फ्रेश व्हायला गेली.

ती परत येईपर्यंत आशून दोघांचा चहा गाळून घेतला होता. हॉलमध्ये बसून काहीसा विचारात रमून गेला होता. श्रेयसीसाठी हे नवीनच होतं, त्याला असं इतकं शांत विचार करत बसलेलं पाहून तिला उगीच नको त्या शंका कुशंका येऊ लागल्या..

कुठूनतरी बोलायला सुरुवात करायची म्हणून श्रेयसीन एक एक करून ग्रुपमधल्या कुणाचं काय चालू आहे ते सांगायला सुरुवात केली. आशू फक्त हं हो का करीत राहिला. बराच वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्यावर श्रेयसीची काहीशी चिडचीड होऊ लागली. हा असाच ठोंब्यासारखा बसून राहतोय की काय आता असं वाटून शेवटी तिनं पुन्हा एकदा गप्पांचा रोख त्याच्याकडे वळवला..

"तू स्वतःबद्दल जरा काही सांगशील का आता? कसा चालू आहे संसार? सध्या काय करतोयस? इथल्या इथे राहून आपली भेट नाही इतक्या वर्षात आणि आज अचानक कसा काय वाट चुकलास?"

इतका वेळ शांत राहून जणू काही शब्द गोळा करीत असलेला आशू तिच्या प्रश्नाला तेवढंच रोख उत्तर देऊ लागला..

"माझं विचारशील तर आधी होतो तसाच आहे अजून. उजाड माळरानासारखा. आपलं कुणीतरी हवं म्हणून कुणाला जवळ केलं की त्या प्रत्येकानं दूर केलेला."

श्रेयसीच्या चेहऱ्यावरचं भलंमोठं प्रश्नचिन्ह बघून तो पुढे म्हणाला..

"घाबरू नकोस...वर्षांपूर्वी होतो त्याहून आता जरा बराच आहे म्हणायचं. निदान उठून तुझ्याकडे यावं हे तरी सुचलं."

"तू मला नीट सांगशील का काय झालय नक्की. असं कोड्यात नको बोलू ना. मला फार भीती वाटते."

यावर आशु पुन्हा त्याच बेफिकीरपणे हसला. हसता हसता त्याच्या डोळ्याच्या कडा ओलावलेल्या. दोन्ही हातांची ओंजळ करून त्याने आधी ते चेहऱ्यावरून मग तसेच मागे केसातून फिरवले.

"काही नाही ग. शेवटी भ्रमाचा भोपळा फुटला. माझा डिवोर्स झाला वर्षांपूर्वी..तू म्हणाली होतीस ना जगात फक्त प्रेम कुणालाच नको असतं! तेच खरं आहे. खिशात पैसे असले की जग हां जी हां जी करेल पण हेच पैसा नसेल तर रस्त्यावरच्या कुत्र्याची पण किंमत देणार नाहीत. मला डॅडबरोबर त्यांचा बिजनेस करायचा नव्हता. नोकरी वगैरे जमणार नव्हती कधीच. हे करून बघू ते करून बघू असं म्हणून भरपूर हातपाय मारले. पण साल नशीबानी कधीच साथ नाही दिली. डोक्यावर कर्जाचा डोंगर. शेवटी बायकोला तोंड तरी काय दाखवायचं म्हणून डॅडकडे गेलो. त्यांनी हळूहळू ऑफिसची कामं माझ्यावर सोपवायला सुरवात केली पण सतत उपकार करत असल्याची जाणीव करून द्यायचे. कंटाळा आला. बायकोला म्हणलं मला नाही जमणार. आयुष्यभर मला अस्तित्व नसल्यासारखं वागवलं त्यांनी. तुझ्यासाठी, आपल्या घरासाठी मी तरीही प्रयत्न केला पण हे असं आयुष्यभर जगणं नाही जमणार मला. फक्त थोडा वेळ दे मला.. मला कळेल मी कुठे चुकतोय, काय करायला हवं.. मी सगळं व्यवस्थित करेन. हे जे मी काही करतोय हे खूप धूसर असं काहीतरी आहे.. मला असं नाही जगत राहायचं. थोडा वेळ दे मला विचार करायला.."

मान खाली घालून दोन्ही हातानी डोकं धरून आशू बराच वेळ पुन्हा शांत बसला. जणू काही भूतकाळ तो पुन्हा त्या काही क्षणांमध्ये जगत होता. त्याच्या मनातील विचारांचा गोंधळ, जखम उघडी पडल्यावर होणाऱ्या वेदना सगळं सगळं त्याच्या चेहऱयावर दिसत होतं. तो ताण असह्य झाला श्रेयसीला. खुर्चीवरून उठून ती आशूच्या शेजारी जाऊन बसली. काही न बोलता तिनं त्याचा हात हातात घेतला. एखाद लहान मूल जसं ओळखीच्या, प्रेमाच्या स्पर्शाला आसुसलेलं असतं अगदी तसंच आशूला वाटत होत. श्रेयसीन त्याचा हात हातात घेताच त्याचा बांध फुटला. कोण जाणे किती वर्षांपासून त्याला असं कुणीतरी हवं होतं जे शांतपणे त्याचं ऐकून घेईल, अगदी त्याला रडावसं वाटलं तरी मनमोकळेपणे रडू देईल. काही वेळाने सावरल्यावर तो पुन्हा बोलू लागला...

"पण नाही थांबली ती. खूप उशीर झालाय म्हणाली. खूप वाट पाहिली. आता नाही मी अशी सतत अनिश्चिततेच्या भोवऱ्यात राहू शकत. मग काय बरेच दिवस प्रयत्न करूनही तिला समजून घ्यायचं नाही म्हणल्यावर दिला डिवोर्स."

श्रेयसीला खरंतर खूप राग आला होता. तिच्या इतक्या जवळच्या मित्राच्या आयुष्यात इतकी उलथापालथ होत असताना त्यानं एकदाही तिच्याशि बोलायचा प्रयत्न करू नये? पण त्याची अवस्था बघून ती शांत बसली. चूक तिचीही होतीच. तिनेही गृहीत धरलं होतं की एकदा संसाराला लागल्यावर सगळं व्यवस्थितच होईल. इतर मित्र मैत्रिणी या ना त्या कारणाने संपर्कात राहिले पण आशूचं असं अलिप्त राहणं आपल्याला तेव्हाच का खुपलं नाही? का नाही आपणचं स्वतः त्याची विचारपूस केली?

बाहेर धो धो पाऊस कोसळत होता. आशूची अवस्था पाहून श्रेयसीन शेवटी घरीच खिचडी केली. आशू खायच्या मूडमध्ये नव्हताच पण तसेच जबरदस्ती त्याला दोन घास खायला लावून श्रेयसीन त्याला तिथेच झोपायला लावलं. त्याची झोप लागेपर्यंत ती खुर्चीतून बाहेरचा पाऊस बघत बसून राहिली. पहाटे कधीतरी तिचा डोळा लागला तेव्हा ती उठून तिच्या रूममध्ये जाऊन झोपली.

दुसऱ्या दिवशी तिला उठायला उशीर झाला. उठून बाहेर आली तर सोफ्यावर आशू नव्हता. बाथरूमचा दरवाजाही उघडाच होता. श्रेयसीन त्याला फोन केला पण फोन स्विच ऑफ होता. असा कसा गेला हा? कुठे गेला असेल? जिवाचं काही बरंवाईट तर करून घेणार नाही हा?श्रेयसी भांबावून गेली. बरं इतर कुणाला फोन करावा तर त्यांच्या हजार प्रष्णांची उत्तरं द्यायला लागणार. काही कळेनासं होऊन ती मटकन सोफयावर बसली. तेवढ्यात दाराजवळ हालचाल जाणवली म्हणून श्रेयसीन गडबडीनं अक्षरशः पळत जाऊनच दार उघडलं. तर दारात आशू उभा!

"अरे वा उठलीस! चल ब्रेकफास्ट करून घेऊया. सकाळी सकाळी असला वास येत होता खालच्या टपरीवरून इडलीचा! पोटात कावळे ओरडायला लागले!"

असं म्हणत आशून डायनिंग टेबलजवळ पोचलासुद्धा! श्रेयसी तिथेच दारात अवाक होऊन उभी राहिली. काही क्षणापुर्वी आपण अक्षरश: रडकुंडीला आलो होतो याच्या काळजीनं आणि हा असा कसा इतका निवांत? रागानं धुसफुसतच श्रेयसी डायनिंग टेबलजवळ गेली. पाठमोऱ्या आशूला जवळ जवळ ओढतचं तिनं पुन्हा हॉलमध्ये आणलं.

"काही सांगून जायची पद्धत? मी किती घाबरले होते. यापुढे जर मला न सांगता कुठे गेलास तर बघच!" तिच्या अशा त्राग्याने घाबरण्याऐवजी आशूला उलट हसू आलं.

"अगं खूप भूक लागलेली आणि तू कुंभकर्ण. किती हाका मारल्या तरी उठली नाहीस.. शेवटी गेलो तसाच. "

"आणि फोन? फोन का बंद केलाय?"

"बॅटरी. बॅटरी डेड. तुझा पण चार्जेर दिसला नाही इथे कुठे.."

त्याच्या उत्तरांनी श्रेयसी निरुत्तर झाली. दोघांनी ब्रेकफास्ट केला आणि श्रेयसी ऑफिसच्या तयारीला लागली. ती तयार होताच आशूही उठून उभा राहिला.

"चल मला सोड रस्त्यात.."

"कुठेही जात नाहीयेस तू"

"श्रेयसी अगं काळ एकवेळ ठीक होतं. सारखं सारखं असं राहून कसं चालेल?तुला राहायचंय पुढे या सोसायटीत."

"ते मी बघून घेईन. तुला कुठे बाहेर जायचं असेल तर तुला सोडायला मी तयार आहे फक्त एका अटीवर ती म्हणजे संध्याकाळी परत घरी यायचं.."

"नाही म्हणालो तर बाहेरून कुलूप लावून जाणारेस का.."

"ऍक्च्युली नॉट बॅड आयडीया.."

श्रेयसीन ठरवलं तर ती खरोखर आपल्याला बंद करून जाईल याची खात्री होती म्हणून आशू तसाच गडबडीत सॉरी सॉरी म्हणत तिच्या मागे आला..

संध्याकाळी पुन्हा दोघे घरी एकत्र होते. पण कालच्या निराश वातावरणाचा पत्ता नव्हता. कॉलेजच्या कितीतरी आठवणी काढत दोघे गप्पा मारत बसले होते. मध्ये जणूकाही काही घडलंच नव्हतं.

अशाच एका निवांत संध्याकाळी श्रेयसी तिचं कपाट आवरत बसली होती. आशूची आत किचनमध्ये काहीतरी खटपट सुरु होती. आवरता आवरता एका बॉक्समधून जणू काही खजिनाच सापडला अशा आंनदाने श्रेयसी नाचत बाहेर आली..

"आशू आशू हे बघ मला काय सापडलंय.."

"थांब जरा बघतो नंतर.."

"आशू बघ ना प्लीज.."

काहीस वैतागूनच आशून श्रेयसीकडे पाहिलं. तिच्या हातात असलेले कागद तर ओळखीचे होते.. किचन टॉवेलला हात पुसत त्यानं ते पाहिले आणि मोठमोठ्याने हसू लागला...

"चक्रम तू अजून ठेवलं आहेस हे?"

"मग काय.. माझ्या कथेचा आत्मा तू काढून टाकलास..पण तुझी कथा मात्र मी माझ्या हृदयात जपून ठेवली.." आपण खूप काहीतरी भारी साहित्यिक वगैरे बोललो म्हणून श्रेयसीन स्वतःच स्वतःची पाठ थोपटली. आशू मात्र वेड्यासारखा हसत राहिला.

त्यानंतर बरेच दिवस ते कागद हॉलमध्येच इकडून तिकडे फिरत होते. प्रत्येकवेळेस आशूची ती कथा पाहून दोघांनाही हसू येत होतं...एक दिवस मात्र आशू संध्याकाळी अगदी शांत ती कथा वाचत बसला होता..श्रेयसी ऑफिसचं काम करीत होती. बऱ्याच वेळानं आशून एक वही शोधून लिहायला सुरुवात केली. रात्री झोपायला जाताना श्रेयसीला आशूचं काहीतरी वेगळं सुरु आहे हे जाणवलं पण तिनं त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळी श्रेयसी बाहेर आली तरी हा पठ्ठ्या तिथेच बसून खरडत होता. न राहवून श्रेयसीन त्याला विचारलंच,

"आशु अरे झोपल्यास की नाही रात्री?"

तिच्याकडे पाहून आश्चर्याचा धक्का बसल्यासारखा आशु म्हणाला.

"माय गॉड सकाळ झाली?"

"मग काय तुझ्यासाठी काय चंदामामा एक्स्ट्रा ड्युटी करणार आहेत का?पण तू एवढं काय करतोय, बघू मला" असं म्हणून श्रेयसीन आशूच्या हातातून वही ओढूनच घेतली.. आत उघडून पाहिलं तर जवळ जवळ निम्मी वही भरून आशून काहीतरी लिहिलं होत.

"आशु काय आहे? काय लिहितोयस?"

"माहीत नाही ग.. काल ती कथा वाचल्यावर उगीच हात शिवशिवायला लागले आणि लिहायला लागलो तर थांबताच येईना.. अजून पूर्ण नाही झालंय पण... पूर्ण झाल्यावर वाच.."

श्रेयसीन तशीच वही आशूला परत दिली. दिवसभर ती याच गोष्टीचा विचार करीत राहिली.. आशूला लिहायला आवडत.. त्यान लिहिलं पाहिजे, भरभरून लिहिलं पाहिजे.. त्यासाठी त्याला लागेल ती मदत आपण करू पण हा जो काही सूर त्याला सापडलाय तो आता हरवायला नको..

संध्याकाळी घरी परत आली तेव्हा आशु घरात नव्हता. पण त्याचं काही सामान तसंच होतं. डायनिंग टेबलवर एक वही आणि वहीवर एक गुलाब ठेवला होता.. लिहिताना बहुतेक आपल्याकडून इतकं लिहलं जाईल याची खात्री नसल्यामुळे पहिल्या पानावर काही चित्र काढली होती.. लिहून झाल्यावर बहुदा पहिल्या पानावर एक रिकामा कोपरा शोधून त्यावर "त्या माझ्या मैत्रीणीस.." असं लिहिलं होतं. कितीतरी वेळ श्रेयसी त्या अक्षरांवरुन हात फिरवत राहिली.

तिचं वाचून झालं तोपर्यंत आशु परत आला होता. तो आल्या आल्या श्रेयसीन त्याला घट्ट मिठी मारली आणि "थँक यु!" म्हणलं.

त्या दिवसापासून आशु बदललाच. त्याचं त्यालाच कळलं होतं आपल्याला काय करायचंय.. काय केलं पाहिजे.. स्वतःला शोधणारा, अपयशाच्या गटांगळ्या खाल्लेला आशु आणि हा श्रेयसी समोर असलेला आशू अगदी वेगळे होते.. तेव्हापासून आशू लिहायचा आणि श्रेयसी त्याच्यासमोर बसून राहायची.. त्याच्या कल्पना ऐकत,त्याच्या कथांमधल्या पात्रांच्या भावविश्वात सगळ्यात आधी श्रेयसीचं जाणं व्हायचं..तिचा जॉब सांभाळत श्रेयसीन हे सगळं जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोचेल हे बघितलं. अनेक मासिकं, साप्ताहिकं, त्याचा ब्लॉग असं सगळं करून त्याच लिखाण जास्तीत जास्त कस प्रसिद्ध होईल हे ती आनंदाने करीत राहिली.. आणि जे उत्तम असतं ते फार काळ लपून राहू नाही शकत.. अनेक ठिकाणी त्याच्या कथावाचनाचे कार्यक्रम होऊ लागले.. लोक मुलाखती घेऊ लागले. यश, प्रसिद्धी आणि पुरेसा पैसा तिन्ही गोष्टी हातात हात घालूनच आशुकडे आल्या..

आशु आणि श्रेयसीच्या मैत्रीची वीण घट्ट होत गेली. सगळ्या जगासाठी ते एक 'कपल' होते पण आशू आणि श्रेयसी मात्र त्यांच्या नात्यात, एकमेकांवर असलेल्या विश्वासात खुश होते. दोघांनाही त्या पलीकडे जाऊन काहीही मिळवायची किंवा नात्याला कुठलंही नाव द्यायची गरज वाटत नव्हती. पण जसं आशु प्रत्येक कथा लिहताना म्हणायचा "नथिंग इज परफेक्ट! काहीतरी वाईट झालं, कुणीतरी वाईट असल्याशिवाय कथेत मजा येत नाही.." त्याच्या आणि श्रेयसीच्या कथेतही ते झालंच.. असेच एका लॉन्ग ड्रॅइव्ह वरून फिरून येताना गाडीला अपघात झाल्याच निमित्त झालं आणि आशू गेला. श्रेयसीचं सगळं आयुष्य पुन्हा एकदा एका क्षणात बदलून गेलं. आशूच्या असण्याची सवय झालेली श्रेयसी अगदी एकटी पडली.. कुठल्याच गोष्टीत तिला रस वाटेना.. घरी गेलं की तिथल्या प्रत्येक गोष्टीत आशूच्या आठवणी होत्या म्हणून तिनं पुन्हा एकदा स्वतःला कामात झोकून दिलं..पण तरीही आपण अपूर्ण असल्याची जाणीव तिला पोखरून टाकू लागली..शेवटी सहज म्हणून आशू शेवटी लिहीत होता ते पुस्तक ती वाचू लागली आणि हळूहळू त्या कथेत गुंतून गेली.. हे पूर्ण झालं पाहिजे असं तिच्या मनाने ठरवलं. तेव्हापासून तो तिचा छंदच झाला. संध्याकाळी परत आली की ती तासनतास विचार करीत बसायची आशु असता तर हे कसं लिहिलं असतं? त्यानं काय विचार केला असता? कितीतरी महीन्यांनी जेव्हा ती कथा पूर्ण झाली तेव्हा तिला स्वतःलासुद्धा अगदी पूर्ण असल्यासारखं वाटलं.

आताही श्रेयसी कथा पूर्ण करता करता तेच विचार करीत होती.. आशु असता तर काय म्हणला असता? आशू असता तर त्यानं कथेत काय वेगळं लिहिलं असतं? आशू असता तर..? प्रत्येक नवीन कथा पूर्ण करताना श्रेयसी पुन्हा पुन्हा आशूबरोबर जगत होती.. त्यांचीच अपूर्ण राहिलेली कथा पूर्ण करायचा प्रयत्न करीत होती..

कथा

प्रतिक्रिया

खूप छान लिहिलय तुम्ही.. कथेत पूर्ण गुंतवलत..

विजुभाऊ's picture

7 Dec 2017 - 10:35 am | विजुभाऊ

खूप छान कथा आहे. शेवट मात्र असा निराशाजनक का केलाय.
पण कथा खूप मस्त आहे सगळं डोळ्यापुढे उभे रहते

महेश हतोळकर's picture

7 Dec 2017 - 11:04 am | महेश हतोळकर

बर्‍याच दिवसांनी एक सशक्त ललित लेखन वाचायला मिळालं. तिचं भावविश्व सुरेख उभं केलत.

संग्राम's picture

7 Dec 2017 - 11:38 am | संग्राम

कथा आवडली

ज्योति अळवणी's picture

7 Dec 2017 - 11:41 am | ज्योति अळवणी

खूप छान आहे कथा. अगदी खिळवून ठेवलं

एस's picture

7 Dec 2017 - 12:16 pm | एस

कथा आवडली.

अभ्या..'s picture

7 Dec 2017 - 12:33 pm | अभ्या..

प्रेडिक्टेबल वाटली सुरुवातीपासून पण पात्रे आणि प्रसंग अप्रतिम रंगवले आहेत.

शलभ's picture

7 Dec 2017 - 12:52 pm | शलभ

खूपच सुंदर कथा.

रंगीला रतन's picture

7 Dec 2017 - 1:18 pm | रंगीला रतन

मस्त...

मराठी कथालेखक's picture

7 Dec 2017 - 2:09 pm | मराठी कथालेखक

लेखनशैली आवडली.
पण व्यक्तिरेखा आणि त्यातली क्रेमिस्ट्री काहीशी फॉर्म्युलातून आल्याप्रमाणे कृत्रिम वाटली.

दर्शना१'s picture

7 Dec 2017 - 5:01 pm | दर्शना१

सर्वांना धन्यवाद.
@मराठी कथालेखक तुमच्या सूचनेचा विचार करेन.

छान लेखनशैली.. फारच छान रंगवलीये कथा.

अप्रतिम ... ग्रेट ..सुपर्ब ...

सिरुसेरि's picture

8 Dec 2017 - 1:30 pm | सिरुसेरि

छान कथा . शेवट भावपुर्ण .

सुमीत's picture

8 Dec 2017 - 1:54 pm | सुमीत

शेवट थोडा सा अपेक्षीत पण पात्रांचे खुलवने जबरद्स्त.

संजय पाटिल's picture

8 Dec 2017 - 4:23 pm | संजय पाटिल

खूप सुंदर कथा, लेखन शैली पण छानच....

ज्ञानोबाचे पैजार's picture

8 Dec 2017 - 4:26 pm | ज्ञानोबाचे पैजार

सुरेख जमली आहे
वाचायला सुरुवात केली आणि शेवट पर्यंत खिळून राहिलो
पैजारबुवा,

दर्शना१'s picture

11 Dec 2017 - 10:01 am | दर्शना१

सर्व नवीन वाचकांचे आणि प्रतिसाददात्यांचे आभार!

पिशी अबोली's picture

14 Dec 2017 - 10:59 am | पिशी अबोली

खूप सुंदर!