हिवाळी भटकंती: सुधागड, भोरपगड( Sudhagad, Bhorapgad)

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
11 Nov 2017 - 2:36 pm

औरंगजेबाच्या कराल मगरमिठीतून महाराजांची सुटका झाली आणि राजगडावर परतल्यानंतर त्यांनी एकुणच जयसिंगाचे आक्रमण आणि आग्रा भेट याचा सकल विचार करून काही महत्वाचे धोरणात्मक निर्णय घेतले. स्वराज्याची राजधानी राजगडावरून हलवणे हा त्यापैकी एक महत्वाचा निर्णय. राजगड बेलाग तर होताच, पण तो पठारी प्रदेशात वसलेला. मागे शाहिस्तेखानाच्या स्वारीच्या वेळी मोगली फौजानी काही पायथ्याच्या गावात जाळपोळ केलेली. त्यात जसा पुरंदरला वेढा पडला, तसा भविष्यात एखाद्या सरदाराने राजगडाला वेढा घातल्यास, अडचणीचे होईल, हे ओळखून एखाद्या बेलाग आणि शत्रुला सहजासहजी पोहचता येणार नाही अश्या गडावर राजधानी हलवने आवश्यक होते. यासाठी नारो मुकुंदांनी सुचविल्याप्रमाणे महाराजांनी निवड केली, कोकणातील पालीजवळच्या भोरपगडाची. थेट कोसळणारे कडे, पुर्ण पुर्व दिशेला रक्षण करणारी सह्याद्रीची रांग, गडावरची विस्तृत सपाटी अशी वैशिष्ट्य असणार्‍या भोरपगडाची महाराजांनी पहाणी केली, नंतर अर्थातच रायगडाची पहाणी केल्यानंतर बहुधा ९०० मी. उंची आणि राजधानी वसविण्यासाठी आवश्यक असणारे प्रचंड पठार याआधारे रायगडाची निवड केली.
भोरपगडाच्या ईतिहासात एक सोनेरी क्षण येता येता राहिला. मात्र महाराजांनी भोरपगडाचे नाव बद्लून "सुधागड" असे गोड नामकरण केले आणि थोडीफार भरपाई केली.
विशेष म्हणजे राजधानी वसवण्यासाठी निवडलेला सुधागड आणि प्रत्यक्ष राजधानीचा मान मिळालेला रायगड याच्यांत काही विलक्षण साम्य आहे. दोन्ही गडांना दोन वाटा आहेत, पैकी सुधागडाची ठाकूरवाडीकडची अवघड वाट तर रायगडाला वाघ दरवाज्याची अवघड वाट. दोन्ही गडाच्या मुख्या वाटेवर बुलंद असा गोमुखी बांधणीचे महद्वार आहे. दोन्ही गडांना टकमक टोक आहे. दोन्ही गडांना छोट्या उपदुर्गांचा पहारा आहे. रायगडाला लिंगाणा, कोकणदिवा, सोनगड, चांभारगड तर सुधागडाला सरसगड, घनगड, तेलबैल्या. दोन्ही गडांच्या परिसरात प्राचीन लेणी आहेत. रायगडाजवळ गंधारपाले तर सुधागडाजवळ ठाणाळे, खडसांबाळे आणि महत्वाचे म्हणजे दोन्ही गडाजवळुन सह्याद्रीतून बर्याच घाटवाटा खाली उतरतात, रायगडाजवळून मढ्या घाट, उपांड्या नाळ, आगी नाळ, फडताड नाळ, शेवत्या घाट, सिंगापुर नाळ, बोराट्याची नाळ, बोचेघोळ नाळ, कावळ्या घाट ई. तर सुधागडाजवळून सवाष्णी घाट, भोरप्याची नाळ, वाघजाई घाट,नाणदांड घाट , नळीची वाट इत्यादी घाटवाटा खाली उतरतात.
परिसरातील लेण्यांचा विचार करताना सुधागडाचा ईतिहास प्राचीन आहे हे निसंशय. या परिसरात अस्तित्वात असणारी ठाणाळे लेणी ही २२०० वर्षांपूर्वीची आहेत. यावरून असे अनुमान निघते की सुधागड हा देखील तितकाच जुना किल्ला आहे.पुराणात भृगु ऋषींनी येथे वास्तव्य केल्याचे अनेक उल्लेख आढळतात. याच ऋषींनी भोराई देवीची स्थापना या डोंगरावर केली म्हणून या देवीला "भृगुअंबा, भोरांबा, भोराई" अशी नावे आहेत. पुराणकथेनुसार, भृगू ऋषींनी भोरपगडावर दीर्घकाळ तपःसाधना केली. त्‍यांनी गडावर भोराई देवीची स्‍थापना करून गोमाशी गावाकडे प्रयाण केले. श्री भोराई देवीच्या पुरातन मंदिराची भोरच्या पंत सचिवांनी पुनर्बांधणी केली व याच देवीला त्यांनी आपली कुलदैवत म्हणून मानले. पंत सचिवांनी या मंदिराचे सभागृह इ.स. १७५० मध्ये बांधून पूर्ण केले.
एखाद्या मोठ्या सत्तेखाली या गडाची मूळ जडणघडण झाली असुन ह्या किल्ल्याने शिलाहार, यादव, बहमनी, मुघल व नंतर मराठा अशा राजसत्ता पाहिल्या. ई.स. १४३६ मधे बहामनी सुलतानाने सुधागड जिंकल्याचा उल्लेख आढळतो, पण त्यापुर्वीच्या ईतिहासाचा उल्लेख सापडत नाही. इ.स. १६४८ साली हा किल्ला स्वराज्यात सामील झाला. या गडाबाबत्त असा उल्लेख आढळतो की ‘साखरदऱ्यात मालवजी नाईक कारके यांनी माळ लाविली. सरदार मालोजी भोसले यांच्या हाताखाली जाधव आणि सरनाईक हे प्रथम किल्ल्यावर चढले. या धारकऱ्यांना उभे करून त्यांचे पाठीवर हैबतराव चढले. त्यास संभाजीराव पुढे जाऊन माथा गेले. पंचविसाने पुढे जाऊन गस्त मारिली. बोकडसिलेचा पहारा मारला. पुढे भोराईच्या टप्प्यावरी गेले तो सदरेतून किल्लेदार व लोक धावत आले. हाणहाण झाली त्यासमयी किल्लेदार कामास आले. उपरांतिक जाऊन सदर काबीज केली.चिटणीसाच्या बखरीप्रमाणे पुरंदरच्या तहात सरसगड जरी मोगलांना दिला तरी सुधागड मात्र महाराजांनी स्वताकडे ठेउन घेतला.
नारो मुकुंद यांनी १६८० मध्ये मोगलांकडून हा किल्ला जिंकून स्वराज्यात आणला. या लढाईच्या वेळी अवघ्या ७०० जणांनी गवताच्या भार्‍यातून तलवारी लपवून नेउन अचानक हल्ला करुन अवघे मोगल कापून काढले. अवघ्या सहा तासात हि लढाई संपली. गडाच्या पायथ्याशी असलेल्या ‘पाच्छापूर’ गावातच संभाजी व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा यांची भेट झाली होती. पाच्छापूर हे पातशाहपूर या नावाचा अपभ्रंश आहे.महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात असलेल्यांपैकी अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस – त्याचा मुलगा आवजी बल्लाळ आणि हिरोजी फर्जंद या सर्वांना भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी संभाजीने सुधागड परिसरात असणाऱ्या परळी गावात हत्तीच्या पायी दिले. पंत सचिव हे पद मूळ सुरनीस म्हणून ओळखले जायचे. सुरनीस हा शब्द फारसी असून त्याचा अर्थ छत्रपतींनी दिलेल्या सनदा, वराती, हुकुमनामे यावर 'सुर सुद बार' असे शेरे मारणारा. राज्यव्यवस्थेत या कामाच्या प्रमुखालाच सुरनीस असे म्हणू लागले. राज्यभिषेकावेळी पंत सचिव असे नाव देऊन त्या पदावर अण्णाजी दत्तो यांची नेमणूक केली. पंत सचिवांना वर्षाल पाच हजार होन असा पगार असे. छत्रपती संभाजी महाराजांनी गादीवर आल्यावर त्यांच्या विरुद्ध कट कारस्थाने केली म्हणून अण्णाजींचे सचिवपद काढून कैदेत ठेवले व नंतर मुक्त करून त्यांची पुन्हा सचिवपदी नेमणूक झाली. त्यानंतर रामचंद्र नीलकंठ हे पंतसचिव झाले. छत्रपती राजाराम महाराजांनी भोरप्या गडावरील सबनीस नारोमुकुंद यांच्या मुलाला शंकरजी नारायण याला पंतसचिव केले. शिवाजीराजांनंतर औरंगजेब स्वराज्यावर चालून आला. त्यावेळी सुधागडावर घनघोर लढाई झाली. शंकरजी नारायण याने पुढील काळात अतुलनीय पराक्रम करून मोगली सैन्यापासून राज्याचा बचाव केला. राजाराम महाराजांनी त्यांचा गौरव केला आणि 1698 मध्ये भोर संस्थानाचे सचिवपद दिले. इ.स. १७१४ च्या सुमारास छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना सचिवपद वंशपरंपरेने दिले. त्यानंतर त्यांचे वंशज परंपरेने त्या पदावर बसत होते. पुढे १८१८ मध्ये इंग्रजांनी स्वराज्य खालसा केल्यावर त्यांनी भोर संस्थान निर्माण करून भोरकरांकडे रोहिडा, राजगड, तोरणा, मौनमावळ व कोकणातील एकमेव सुधागड ताब्यात दिला. ते सारे गड भोर संस्थानात असेपर्यंत उत्तम स्थितीत होते. आजही भोर मध्ये पंत सचिवांचे घराणे चालू आहे.
सुधागड हा ह्या भागातला चांगल्या स्थितीत असलेला किल्ला म्हणावा लागेल. अगदी स्वातंत्र्यापर्यंत भोर संस्थानाकडे असल्यामुळे त्याची देखरेख नीट झाली होती. त्यापुढे हे ही म्हणावे लागेल की आज जी काही दुरावस्था दिसते ती स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची आहे. शिवकालीन पत्र सार संग्रह - खंड २---पत्र क्र. १४५९---शके १५९३---इ.स. १६७१-७२---तह “प्रतीपाश्चंद्रलेखेव”जाबिता तह इमारती करणे. सन इसन्नेकारणे इमारती करावयाचा तह केला असें की, गबाळ हुन्नरवंद लावून पैका पावत नाही. हुन्नरवंद गवगवा करिता काम करीत नाहीत. याबद्दल तह केला की, नेमास्तच इमारती करावी - होन. १,७५००० म||| एक लाख पंचाहत्तर हजार होन रास. ५०,००० रायगड, ३५,००० दि|| घरे, २०,००० तळी २ प्रत्येकी १०,०००, गच्ची ५,०००; - किल्ले, १५,०००; तट १०,००० प्रत्येकी - सिंहगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, प्रतापगड,पुरंधर, राजगड. ५००० प्रत्येकी प्रचंडगड=तोरणा, प्रसिद्धगड, विशालगड, महिमतगड, सुधागड, लोहगड,सबळगड, श्रीवर्धनगड व मनरंजन. ३००० कोरीगड, २००० सारसगड व महीधरगड, १००० मनोहरगड, ७००० किरकोळ. एकूण १,७५०००. येणेप्रमाणे एक लाख पंचाहत्तर हजार होन खर्च करणे. मोर्तब सूद. दस्तुर राजेश्री पंत म्हणून संग्रह केला. (मर्यादेय विराजते.).
sudhagad 1
सुधागड परिसराचा नकाशा

गडावर जाण्यासाठी तीन प्रमुख वाटा आहेत.
१.पालीहून नाडसूर/धोंडसे गावी पोहचून आपल्याला येथून दगडी पायऱ्यांच्या मार्गाने गडावर पोचता येते.
sudhagad 2
इथली वाट झाडीतून असल्यामुळे सुखद आहे, पण येथून चढण्यास अंदाजे २.५ ते ३ तास लागतात.
पाली ते नाडसूर/धोंडसे बस ७.१५., ९.४५(ठाणे -खोपोली- पाली -नाडसूर -ठाणाळे)११.००,३.३०,६.००
sudhagad 4
सुधागडावरचे सुळके किंवा कावडीचा डोंगर
sudhagad 3
तैलबैल्याच्या वाटेवरुन दिसणारा सुधागड
२.तेलबैला जवळून उतरणारा सवाष्णीचा घाट हा आपल्याला याच मार्गावर घेऊन येतो. येथून आपण गडाच्या गोमुखी पद्धतीच्या महादरवाजातून प्रवेश करत थेट भोराई देवीच्या मंदिरात पोचतो.
३.पालीपासून भिरा कडे जाणाऱ्या हमरस्त्यावर ८ किमी वर पाच्छापूर गाव आहे. येथून पुढे ठाकूरवाडी अथवा दर्यागाव वसलेले आहे. येथून एका सोप्या पायवाटेने गडावर २ तासात आपण पोचतो. सर्वसाधारण गडमित्रांना गडावर जाण्यास हा योग्य मार्ग आहे.
पाली ते पाच्छापूर-ठाकूरवाडी बस ६.४५, ८.४५,१०.४५,१२.४५,३.०,५.४५, ८.३०(मु)
ठाकुरवाडी ते पाच्छापुर- ५.४५,९.३०,११.३०,१.३०,३.३०,६.३०
अर्थात या बसची चौकशी जाण्याआधी पाली डेपोला करावी. पाली डेपो चौकशी (०२१४२) २४२२३३. पालीवरुन सहा आसनी रिक्षा नाडसूर, धोंडसे या मार्गावरुन धावतात. मात्र तुलनेने ठाकुरवाडी, पाच्छापुर रस्त्यावर फारश्या सहा आसनी रिक्षा नाहीत. स्पेशल रिक्षा ठरवून जावे लागते.
sudhagad 5
सुधागडाचा नकाशा

या गडावर दोनदा जाणे झाले. एकदा धोंडसेमार्गे गेलो होतो. नाडसूर बस वैतागवाडी फाट्यावर सोडते. साधारण १.५ कि.मी. चालून धोंडसे गावात पोहचता येते. गावकर्‍यांच्या म्हणण्याप्रमाणे इथून गडावर दोन तासात जाता येते, तरी हि वेळ कानामागे टाकायची. कोकणातले दमट हवा आणि वाटेत लागणाते ओढे विचारात घेता, तीन ते साडे तीन तास गृहित धरेलेले चांगले, म्हणजे वाटेतील विश्रांती, मारूती मंदिर, तानाजी टाके, महाद्वार हे व्यवस्थित पहाता येते.
sudhagad 6
वाटेत तीन वेळा ओढा ओलांडावा लागतो. मुळात हा ओढा म्हणजे सह्याद्रीत उगम पावणारी "दातपाडी नदी" आहे. पावसाळ्यात ती दुथडी भरून वहात असते. काळजी घेतली नाही तर नदीचे नाव आपल्या बाबतीत खरे होण्याचा धोका असतो.
sudhagad 8
गडाच्या दिशेने निघाल्यावर सर्वप्रथम मारुतीचे पडके मंदिर लागते. ह्याला "कासारपेठ मारुती" म्हणतात. थोडे अंतर चढुन गेल्यानंतर पडके शिवमंदिर आणि एक खडकात कोरलेले पाण्याचे टाके लागते.
sudhagad 3
या टाक्याशेजारी एक ढाल तलवार घेतलेली योध्याची मुर्ती आहे. म्हणून याला तानाजी टाके म्हणतात. हे पाणी पिण्यायोग्य आहे. मात्र हि मुर्ती तानाजीची याला कसलाही आधार नाही. तानाजीचा या किल्ल्याशी असा काही संबध आल्याचे आढळत नाही.
sudhagad 10
याचबरोबर अजुन एक सातवाहनकालीन टाके लागते, हे आहे, "हनुमान टाके".
sudhagad 9

यानंतर चढल्यावर आपण पोहचतो, एका भव्य दरवाज्यासमोर. हा दरवाजा म्हणजे रायगडाच्या दरवाज्याची जणु प्रतिकृतीच.
sudhagad 1

sudhagad 3

sudhagad 9
या दरवाज्यावर दोन्हीकडे शरभ शिल्प आहेत. द्वाराची रचना गोमुखी बांधणीची आहे. त्‍यावर नक्षीकाम आढळते. दोन भीमकाय बुरुजांमध्ये लपल्यामुळे त्‍या द्वारास मोठे संरक्षण लाभले आहे. दरवाजामध्‍ये बंदुकीसाठी जंग्‍या आहेत. दरवाजात दोन देवड्या असून चौकटीखालून पाणी वाहून जाण्‍यासाठी जागा आहे.हा दरवाजा अर्ध्याहून अधिक मातीखाली गेला होता. १९८७ च्या आसपास निसर्गमित्र संस्थेने येथे ३ वर्ष काम करून येथी बहुतांश माती काढली. पण पुन्हा ती साचल्यामुळे ट्रेकक्षितीज संस्थेने दुर्गामित्र, पालीवाला कॉलेज चे विद्यार्थी, निसर्गमित्र तसेच गिरीमित्र प्रतिष्ठान या संस्थांबरोबर २००३ ते २००८ या काळात हे माती पूर्णतः साफ केली. आज हा दरवाजा पूर्ण मोकळा झाला आहे.
sudhagad 4
या दरवाज्याला कोरा दरवाजाही म्हणतात.
sudhagad 12
हा दरवाजा गोमुखी बांधणीचा आहे.
sudhagad 13
तो ओलांडून वर चढल्यानंतर वाटेत दोन दरवाजे लागतात, मात्र दोन्ही दरवाजे उध्वस्त अवस्थेत आहेत. यानंतर आपण माथ्यावर येउन पोहचतो. सुधागडाचे पठाराचे तीन विभाग होतात. पहिला विभाग म्हणजे वाड्यासमोरील पश्चिमेकडील पठार. या परिसरात मोठ्या प्रमाणात वास्तूंचे अवशेष दिसतात कारण जमीन समतोल असून येथेच तलाव आणि मोठी टाकी आहेत. दुसरा विभाग म्हणजे भोराई देवीचे मंदिर आणि टकमक टोकापर्यंत असलेला परिसर. हा निमुळता असून येथे ४ विशाल कोठारांचे अवशेष आहेत. तर तिसरा भाग म्हणजे पूर्वेकडील परिसर. इकडे एक विशाल बुरुज असून वाढलेल्या जंगलात काही अवशेष आढळून येतात.
सुधागड किल्ल्याला आजही पंचक्रोशीत भोराईचा डोंगर म्हणूनच ओळखतात.
sudhagad 16

sudhagad 4

sudhagad 3

sudhagad 15
वाड्यापासून झाडीतून जाणाऱ्या वाटेने आपण भोराईच्या देवळापाशी येतो. यामध्ये २५ जणांची राहण्याची सोय होते. मंदिरातभली मोठी घंटा आहे. या भोराई मंदिरात चिनी मातीचा एका जुना रांजण होता. एका पावसाळ्यात झाड पडल्याने देवळाची भिंत पडली. त्यात रांजण फुटून त्याचे तुकडे झाले. काही तुकडे गावकर्यांनी आठवण म्हणून घरात ठेवले. हा रांजण ईथे कोणी आणला त्याचा पत्ता लागत नाही. मंदिराच्या आवारात एक दीपमाळ असून त्यावर एक हत्ती कोरला आहे, जणू त्याने आपल्या पाठीवर ती दीपमाळ धरून ठेवली आहे. भोराई देवी ही तत्कालिन औंध संस्‍थानाचे पंत सचिव यांचे कुलदैवत. नवरात्राच्‍या काळात गडावर भाविकांची गर्दी होते.
sudhagad 4

sudhagad 3

sudhagad 3

sudhagad 4

sudhagad 8
मंदिराच्या आवारात जवळ जवळ ३५ वीरगळी आहेत.
sudhagad 3

sudhagad 4

sudhagad 3
वाड्याच्या मागील बाजूस एक शिवमंदिर आहे. येथे आपल्याला अनेक देवतांच्या मूर्ती दिसतात. या मंदिराच्या आसपास जंगलात काही अवशेष आढळून येतात.
sudhagad 4

तसेच मंदिराच्या आणि वाड्याच्या मध्ये एक चौकोनी आकाराची विहीर आहे.
sudhagad 4

sudhagad 5
भोराई मंदिराकडून टकमक टोकाकडे जाताना चार विशाल कोठारे दिसतात. चारही कोठारे समान आकाराची असून त्यांच्यातले अंतरही सारखे आहे. अंदाजे ५ मी रुंद आणि २३ मी लांब अशी ही कोठारे सर्व बाजूने बंद आहेत, फक्त एका बाजूने द्वार आहे. तर बाहेरील चौथरा १२ मी रुंद आणि ४० मी लांब आहे. दोन कोठारांमधील अंतर अंदाजे ७ मी आहे. सुधागड दर्यागावातून चढताना उजव्या बाजूस एक कड्याचे टोक दिसते.
sudhagad 3

sudhagad 4
हे रायगडाच्या टकमक टोकासारखे दिसते म्हणून यास टकमक असे नाव आहे. यांच्यामधील घळीत प्रतिध्वनी येतो म्हणून याला बोलते कडे असेही म्हणतात. येथे भन्नाट वारा वाहतो. भोराई मंदिरावरून टकमक कडे जाताना वास्तूंचे अवशेष आढळतात. येथून डावीकडे खाली एक पायवाट उतरते जी थेट आपल्याला एका मोठ्या टाक्याकडे घेऊन जाते.
sudhagad 4

sudhagad 9

sudhagad 5
इथे आपल्याला एक गोमुख आढळते. पाच्छापूर दरवाजातून आल्यावर दोन मोठे बुरुज दिसतात एक पाच्छापूर कडे तोंड करणारा आणि दुसरा ठाकूरवाडी कडे नजर ठेवणारा. दोन्ही चिलखती बुरुज असून आजही चांगल्या अवस्थेत आहेत. ठाकूरवाडी कडे तोंड करणाऱ्या बुरुजावरून आपण तो परिसर व्यवस्थित पाहू शकतो. भोराई मंदिरावरून महादरवाजाकडे जाताना उजवीकडे जंगलात एक छोटीशी पायवाट जाते.
काळजीपूर्वक या वाटेचा मागोवा घेत आपण एका टेकाडापाशी पोचतो. हि पूर्वेकडील बाजू असून येथे पुढे चालत आलो की गडावरील सर्वात मोठा बुरुज आपल्याला आढळतो. हा बुरुज घनगड कडे तोंड करून उभा आहे, आणि थोड्या खालच्या टप्प्यावर आहे. काळजी घेतली तर येथे उतरून हा बुरुज नीट पाहता येतो. पंत सचिवांच्या वाड्यातून भोराई मंदिराकडे जाताना डावीकडे वळल्यास आपण एका पायवाटेने उतरतो. पायवाट उतरून डावीकडे गेलो की बुरुजातून छोट्या दरवाजातून वाकून खाली जाता येते. तसेच उजवीकडे वळल्यास आपण काही पायऱ्या उतरून सलग तटबंदीवरून चालत अगदी टोकापाशी पोचतो. गडाचा विस्तीर्ण परिसरात अनेक ठिकाणी आपल्याला बांधीव टाकी दिसतात. यापैकी वाड्याच्या जवळ तीन मोठी टाकी असून ती मुख्य पाण्याचा स्त्रोत आहेत.
sudhagad 5

sudhagad 5

sudhagad 5
एक टाके ३५ x २५ फूट आहे तर दोन जोडलेली टाकी १५ x २५ फुटाची आहेत. यातील सर्वात मोठ्या टाक्यात उतरण्यास सोय आहे. उन्हाळ्यात मधल्या टाक्यातले पाणी पिणे सोयीस्कर. या तीन टाक्यांच्या समोर टकमक टोकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अजून २ ते ३ टाकी आहेत, जी सुकलेली आहेत. तसेच आपल्याला गुप्त दरवाजा परिसरात २-३ टाकी आढळतात. गडावर पाण्याचे अनेक तलाव आढळतात. येथे जंगलही बऱ्यापैकी आहे. आजुबाजूच्या जंगलाच्या परिसरात अनेक प्रकारची औषधी वनस्पती आढळतात.सुधागडाच्या जंगलात आढळणारे वैशिष्ठ्यपुर्ण झाड म्हणजे "पांढरीची काठी".
sudhagad 3

sudhagad 5

sudhagad 3

sudhagad 5
सुधागडावरून समोरच उभा असणारा सरसगड, घनगड, कोरीगड, तैलबैला तसेच अंबानदी व नदीच्या आजुबाजूची गावे हा परिसर दिसतो. भोरपगड समुद्रसपाटीपासून २०३० फूट उंच आहे. गडाचा तळाकडील घेर पंधरा किलोमीटर आकाराचा आहे.
sudhagad 4

sudhagad 4

sudhagad 4

sudhagad 3
सुधागड किल्ल्यावर असणारा पंत सचिवांचा सरकारवाडा हा इ.स. १७०५ साली बांधलेला आहे. चौसोपी आकाराच्या या मजबूत व भव्य वाड्याची अर्धीच बाजू राहिली होती तथापि श्री भोराई देवस्थान विश्वस्त मंडळाने याची पुनर्बांधणी केली. वाड्याला दोन दरवाजे असून ऐसपैस व्हरांडा आहे. दोन बंद खोल्या आणि एक माडी आहे. या वाड्यात ५० जणांची राहण्याची सोय होते. वाड्याच्या बाजूस एका छोट्या घरात रहाणारी वयस्कर मामी पूर्ण वाड्यात शेण सारवण्याचे आणि वाडा स्वच्छ ठेवण्याचे काम करते. या वाड्यासमोर नव्याने बांधलेली एक धर्मशाळा आहे. पाच्छापूर कडून वाड्याकडे जाताना डाव्या बाजूचा परिसरात मोठ्या प्रमाणात वास्तूंचे अवशेष आणि जोती दिसतात. वाड्याच्या आवारातून बाहेर पडून सरळ चालत गेलो कि टोकावरून आपल्याला सरसगड आणि वातावरण स्वच्छ असेल तर कर्नाळा दिसतो. या पठारावर मोठा तलाव आहे. या तसेच टोकावरून फिरत आपण पाच्छापूर कडे उतरणाऱ्या वाटेकडे गेलो की दगडी पायऱ्या दिसतात.
sudhagad 5

sudhagad 5

sudhagad 5

sudhagad 4
पंत सचिवांच्या वाड्यातून भोराई मंदिराकडे जाताना डावीकडे वळल्यास आपण एका पायवाटेने उतरतो. पायवाट उतरून डावीकडे गेलो की बुरुजातून छोट्या दरवाजातून वाकून खाली जाता येते. ट्रेकक्षितीज संस्थेने काही काळ श्रमदान करून येथील पायऱ्या साफ केल्या.
हे सगळे एकट्यानेच आधीच्या भेटीत निवांतपणे पाहिले होते.हल्ली मात्र धोंडसे गावाकडून येणारी वाट पडझड झाल्याने कोणी वापरत नाही असे कळाले. अगदी धोंडसे गावातील लोकसुध्दा ठाकुरवाडीमार्गे येतात. तेव्हा खात्री झाल्याशिवाय धोंडसेकडून जाउ नये.
पुन्हा एकदा मित्रांच्या आग्रहाखातर या सुधागडाचा योग आला. ह्यावेळी ठाकुरवाडीकडून पाच्छापुर दरवाज्याने जाण्याचे ठरले. १५ ऑगस्ट २०१६ ची प्रसन्न सकाळ. पालीत बल्लाळेश्वराचे दर्शन घेउन स्टँडवर आलो, तर ठाकुरवाडीला लवकर बस नाही असे समजले. उपलब्ध वेळेत बसच्या उशीराचे गणित जमण्यासारखे नव्हते. नाईलाजाने सिक्स सिटरवाल्याला शरण गेलो .
sudhagad 3

sudhagad 4
पाली ओलांडले आणि सरसगड विवीध कोनातून दर्शन देउ लागला. सिध्देश्वर फाटा ओलांडून आमचा प्रवास पाच्छापुरच्या दिशेने चालु झाला. आजुबाजुला बहरलेला भन्नाट निसर्ग आणि पुर्वेकडे एखाद्या कातळ भिंतीसारखा दिसणारा सुधागड.
sudhagad 1

sudhagad 3

sudhagad 4
त्याचा बुरुज आणि लोखंडी जिना खालूनही स्पष्ट दिसत होता. वाटेत पाच्छापुर ओलांडले. पाच्छापुरलाच संभाजी राजे आणि औरंगजेबाचा मुलगा अकबर यांची भेट झाली. एतिहासिक साधनात झेंड्याचा माळ, बादशहाचा माळ, झेंडाकाठी असे उल्लेख असले तरी आज एक दगडांचा ढीग हाच या भेटीचा पुरावा म्हणून दाखविला जातो. इथे संभाजी राजांनी अकबराला वाडा बांधून दिला होता, मात्र कोकणातील हवा न मानवल्याने त्याला पुढे पवनमावळातील तिकोना किल्ल्यावर हलवले. इथला ईतिहास सोबत्यांना सांगे पर्यंत रिक्षा घाट चढून ठाकुरवाडीला पोहचली देखील.
sudhagad 1
हिरव्या गालीच्या प्रमाणे पसरलेल्या भातशेतीने आमचे स्वागत केले. बरेच पब्लिक सुट्टीच्या निमीत्ताने आले होते. आम्ही फार वेळ नसल्याने गडाकडे कुच केले.
sudhagad 3

sudhagad 4

sudhagad 3
वाट सोपी आणि अधूनमधून पावसाची सर याने एकच थांबा घेउन लोखंडी जिना गाठला सुध्दा.
sudhagad 3
हा हल्लीच बसविला आहे.
sudhagad 5
यापुर्वी मुळवाट मोडल्याने शिडी बसवलेली आहे. डाव्या हाताला मुळ वाट आणि शिडी पहायला मिळते. नुकतीच महाडला पुलाची दुर्घटना झालेली होती, आता ईथे हा जिना पडला तर काय ? असा प्रश्न पडला. वार्‍याने शिडी हलत होती.
sudhagad 5
इथून चढले कि थोड्यावेळात प्रशस्त पायर्या लागतात. वाट पुर्ण १८० अंशात वळून पायर्‍या चढुन उध्वस्त दरवज्यातून माथ्यावर जाते.
sudhagad 4

sudhagad 4

sudhagad 3
हा बुरुज चिलखती बुरुज या प्रकारचा आहे. बाहेरच्या तटबंदीत उतरता यावे यासाठी जिनाही केलेला आहे.
sudhagad 5

sudhagad 5

sudhagad 9

sudhagad 10
थोडा वेळ देउन ह्या अर्ध्या कोरीव आणि अर्ध्या बांधीव बुरुजाची रचना आवर्जून पहावी. याला चिकटून पाच्छापुरकडून येणार्या वाटेवर नजर ठेवलेला दुसरा बुरुज आहे. इथून वीस-पंचवीस मिनीटातच आम्ही माथ्यावर पोहचलो. पुर्ण गवताळ पसरलेला माथा आणि भर्राट वारा. अक्षरशः स्वर्गसुख.
sudhagad 4
गडावर ट्रेकर्सची हि जत्रा भरली होती.
sudhagad 5
पठाराच्या डावीकडे सिद्धेश्वराचे मंदिर आणि थोडकी तटबंदी आहे. निवांत तटबंदीवर पाय सोडून मित्रांबरोबर सुखदुखाच्या गप्पा झाल्या. हल्ली व्हॉटसअ‍ॅप आणि फेसबुकच्या काळातही अश्या निवांत आणि मनापासून झालेल्या गप्पांना वेळ कुठ उरलाय? पण गड पहायचा असल्याने अखेरीस नाईलाजाने उठून सरकारवाड्याच्या दिशेने निघालो. वाटेत धान्य कोठार, भांड्यांचे टाके, हवालदार तळे, हत्तीमाळ लागले. लांबवर टकमक टोक खुणावत होते.
सरकारवाड्याशेजारीच एक नवीन पर्यटक निवास बांधला आहे.
sudhagad 4
सरकारवाड्याच्या प्रवेशद्वाराकडे निघाल्यावर, वाड्याच्या भिंतीवर हे महाराज दिसले, " चापडा उर्फ हरानाग उर्फ बांबु पिट व्हायपर". नाव काहीही घ्या, पण आहे जहरी. याला पाहून मला मायबोलीवरचा सुधागडावरील विषारी थरार हा धागा आठवला. वाड्यात आत बर्याच ट्रेकर्सनी मुक्काम केला होता, पण बाहेर साक्षात मृत्यु वावरतोय याची किती जणांना कल्पना असेल? कहर म्हणजे जेव्हा वाड्यात स्वयंपाक करणार्‍या स्थानिक लोकांना त्या सापाविषयी सांगितले, तेव्हा त्यांनी "तो हरणटोळ आहे, काही करत नाही" असे सांगितले. मि.पा.कर जॅक डॅनियल्य यांची लेखमाला अजून बर्याच ठिकाणी पोहचणे गरजेचे आहे याची खात्री पटली. तरी चापडा हा साप तुलनेने शांत असावा असा माझा अंदाज. त्याने चावा घेतलेल्या केसेस फारश्या एकिवात नाहित. टकमका टोकाच्या वाटेवर मोठ्या संख्येने साप दिसतात अशी माहिती समजली. सरकारवाड्यात संतोष खंडागळे यांचे कुटुंब येणार्‍या जाणार्‍यांची नाष्टा, जेवणाची सोय करतात. धोंडसे गावातील संतोष गोपाळ खंडागळे (सुधागडावरच्या भोराई देवळाचे गुरव) जेवणाची ,वस्तीची व्यवस्था करतात फोन (०२१४२)६८०९६६ ,आणि ९२७३३६९२१७. यांना फोन करून गेल्यास एनवेळी गैरसोय होणार नाही. यानंतर शेजारच्या शिवमंदिराला भेट दिली.
sudhagad 4

sudhagad 4

sudhagad 4
आतमधे माहिती फलक लावलेले आहेत. अखेरीस वेळ होईल हे लक्षात येताच परत फिरलो. तासाभरात उतरून खाली आलो. अर्ध्या-पाउण तासात एस्,टी. येईलच असा दिलासा गावकर्यानी दिला. वाट पहाण्यापेक्षा एका गावकर्याच्या घरी बिनदुधाचा चहा घेतला. ग्रीन टिचे कौतुक शहरवासीयांना, पण रोजची जगण्याची लढाई असणार्‍या या ठाकरांना, दुधाच्या प्रत्येक थेंबाचा पैसा करावा लागतो. उतरताना एक कुटंब ट्रेकला आलेले होते, केवळ एक वर्षाच्या मुलीला घेउन तिचे वडील हा पावसाने निसरडा झालेला रस्ता उतरले. खरच त्यांच्या जिद्दीला सलाम, पण तरीही हा धोका घ्यायला नको असे कुठेतरी मनात वाटून गेले.
अखेरीस महामंडळाची बस आली. ट्रेकमधे या लालपरीचे दर्शन किती सुखावते म्हणून सांगु. एखाद्या डोंगराच्या गाभ्यातल्या गावात आपण असताना, पुन्हा आपल्या घरी घेउन जाणारा हा दुवाच. मी तरी या बसला कधी लालडबा म्हणून हिणवत नाही. खिडकीतुन सुधागडाचे बेलाग कडे निरोप घेत होते, पण पुन्हा भेटण्याचे आवतानही देत होते.

तुम्ही माझे आत्तापर्यंतचे सर्व लिखाण माझ्या ब्लॉगवर एकत्र वाचु शकता.
ब्लॉगचा पत्ता:
भटकंती गड-कोटांची

संदर्भग्रंथ :-
१ ) रायगड जिल्हा गॅझेटियर
२) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !!- प्र.के.घाणेकर
३ ) डोंगरयात्रा :- आनंद पाळंदे
४ ) सांगाती सह्याद्रीचा:- यंग झिंगारो ट्रेकर्स
५ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट
६ ) www.durgbharari.com हि वेबसाईट

प्रतिक्रिया

कंजूस's picture

11 Nov 2017 - 5:14 pm | कंजूस

सुरेख!
सर्व भाग तैलबैला,ठाणाळे लेणी, सुधागडच्या दोन्ही वाटा गेलो आहे. पुन्हापुन्हा जावेसे वाटते.
फोटो आवडले

सुधागडाला जाऊन खूप वर्षे लोटली आहेत हे जाणवले. :-(

आता एकदा सवाष्ण घाटाने उतरून गड गाठायचा आहे. सुधागड जवळजवळ राजधानी म्हणून मुक्रर झालाच होता, पण जवळच असलेल्या सह्याद्रीच्या पठारावरून तोफांच्या माऱ्यात गड सहज येऊ शकतो हे समजल्याने मग रायगडाचा विचार पुढे आला. बाकी लेख मस्त.

प्रचेतस's picture

13 Nov 2017 - 8:36 am | प्रचेतस

उत्तम लिहिलंय.
१२/१३ वर्षापूर्वी सुधागड केला होता तेव्हा धोडसे गावातून निघालो होतो. पुढे चकवा लागला होता. साताठ पायपीट करुनही गडाची वाट मिळाली नाहीच. तेव्हा पाच्छापूरची वाट वापरात नव्हती. तो एक भन्नाटच अनुभव होता.

पी. के.'s picture

13 Nov 2017 - 12:54 pm | पी. के.

सुरेख!
फोटो आवडले

जागु's picture

13 Nov 2017 - 1:24 pm | जागु

छान माहीती व फोटो.
सुधागड तालुक्यात जाणे झाले आहे एका गावात. तेव्हा लांबूनच किल्ला पाहीला होता.

पाटीलभाऊ's picture

15 Nov 2017 - 10:09 am | पाटीलभाऊ

सुधागड करायचा राहून गेलाय.

दुर्गविहारी's picture

17 Nov 2017 - 11:16 am | दुर्गविहारी

सर्वच प्रतिसादकांचे आणि वाचकांचे आभार.