शेवटचा दिस....

चॅट्सवूड's picture
चॅट्सवूड in दिवाळी अंक
20 Oct 2017 - 12:00 am

"सर कुठं जायचंय?"
"अरे, त्या पुलावरून घे ना"
मी टॅक्सीच्या ड्रायव्हरला सांगितले. त्याने मान डोलावली. त्याने गाडी पुलाच्या दिशेने वळवली. मी टॅक्सीच्या मागच्या सीटवर एकटाच बसलो होतो. मी बाहेर बघितले. रात्र झाली होती, पावसाने जोर पकडला होता. बाहेर गाड्यांची संख्या तशी कमीच होती. बरे आहे, मी डोळे मिटले. दीर्घ श्वास घेतला. मी वाकून माझे डोके माझ्या दोन पायांमध्ये सरकवले. मी तसाच बसून राहिलो. ड्रायव्हरने माझ्याकडे नाराजीने बघितले. मी कण्हत होतो. मग ड्रायव्हरने न राहवून मला विचारले,
“सर, काय होतंय?”
“अरे, काही नाही रे, पोट खूप दुखतंय." मी माझे पोट उजव्या हाताने पकडत, त्याच्याकडे बघत म्हणालो. मी पोट पकडून आता डाव्या कुशीवर पडलो.
“काय खाल्लं होतं?” ड्रायव्हरने परत विचारले.
“काय माहीत, अचानक दुखू लागलं.” मी म्हणालो.

ड्रायव्हरच्या चेहऱ्यावर चिंता दिसली. मी अगदी अवघडून बसलो होतो. आमची टॅक्सी आता पुलावर आली होती. हा पूल बराच उंच, मोठा होता. अगदी दिमाखात उभा होता. रात्रीची वेळ असल्यामुळे गाड्या जास्त नव्हत्या. या पुलावर गाडी थांबवता येत नसे. मला ओकारी आली. बाहेर काही पडले नाही. माझ्या तोंडातून लाळ खाली ओघळली.

"सर, सर...थांबा थांबा.." ड्रायव्हर घाबरून म्हणाला. त्याला वाटले, मी टॅक्सीमध्येच उलटी करीन, टॅक्सी खराब करीन, सीट घाण होईल, नुकसान होईल. ड्रायव्हरने टॅक्सीचा वेग कमी केला. पुलाच्या डाव्या बाजूला टॅक्सी थांबवली. त्याने माझ्याकडे मागे वळून बघितले, मी त्याच्याकडे बघितले. मी टॅक्सीचा दरवाजा उघडला, सुसाट धावत बाहेर पडलो!!

मी धावत जाऊन पुलाच्या कठड्याजवळ आलो. पाऊस चांगलाच वाढला होता. मी लगेच भिजलो. मी कठड्यावर चढू लागलो. पण माझा पाय घसरला, तोल गेला आणि खाली पडलो. मी लगेच उठलो. परत कठड्यावर चढणार, तेवढ्यात मला मागून, कमरेभोवती कोणीतरी पकडले. मला मागे खेचले. मी प्रतिकार केला, पाय आपटले, कोपराने त्याला मारले, पण त्याची पकड ढिली झाली नाही. त्याने मला खेचून परत त्याच टॅक्सीजवळ आणले. टॅक्सीचा दरवाजा उघडा होता. मी प्रतिकार केला, जोर लावून त्याला मागे ढकलण्याचा प्रयत्न केला, पण जमले नाही. मला त्याने टॅक्सीत ढकलून दिले. माझ्यामागून गाडीचे दार लावले. मला पकडणारा तो माझा ड्रायव्हर होता. तो पुढे जाऊन टॅक्सीमध्ये बसला. त्याने रियर व्ह्यू मिररमध्ये मला बघितले. तो भलताच वैतागला होता.

एका मिनिटामध्ये हा सगळा प्रकार घडला. मी भांबावून गेलो. ड्रायव्हरने पटकन टॅक्सी सुरू केली. दोन-तीन गाड्या थांबल्या. त्या गाड्यांमधली माणसे आमच्याकडे बघत होती, पण तिकडे न बघता ड्रायव्हरने टॅक्सी भरधाव पळवली. टॅक्सीने तो पूल लगेच पार केला. ड्रायव्हर काही म्हणाला नाही. तो शांतपणे टॅक्सी चालवत होता.

मी रडायला लागलो, नेहमीसारखं! मला का याने वाचवले? मला वाचवणारा हा कोण? हा कोण देव आहे का? मला मरायचे होते, जीव द्यायचा होता, सगळे संपवायचे होते!! मी मूकपणे रडू लागलो. राग आला होता, रडूही येत होते.
“थांबव” मी ड्रायव्हरला एका बॉससारखे म्हणालो.
पण त्याने टॅक्सी थांबवली नाही, त्याने काही उत्तर दिले नाही. अरे यार काय झाले? असे का करतोय? याला पैसे पाहिजेत का? मी पाकिटातून दोन हजाराची नोट काढली.
“हे घे” मी नोट देत त्याला म्हणालो.

त्याने नोट घेतली नाही. माझ्याकडे दुर्लक्ष केले. तो शांतपणे टॅक्सी चालवत होता. “अरे, काहीतरी बोल ना” मला ओरडावेसे वाटत होते, पण काही बोलता येत नव्हते. मला स्वतःचीच लाज वाटत होती. तो टॅक्सी चालवत राहिला. टॅक्सी अंधाऱ्या रस्तावरून जात होती. स्ट्रीट लाईट नव्हते की माणसे नव्हती. मला हा रस्ता माहीत नव्हता. टॅक्सी छोटाशा गल्लीतून जाऊ लागली. “आता मला हा लुटणार..” माझ्या मनात विचार आला, तसा मी घाबरलो. मी पटकन माझे पैशाचे पाकीट हातात घेतले. माझ्याकडे साधारण तीन-चार हजार होते, क्रेडिट कार्ड होते. माझ्या गळ्यात सोन्याची चेनसुद्धा होती. मला लुटले असते, तर बरेच पैसे याला मिळाले असते. मी घाबरलो, आपले आता काही खरे नाही!! टॅक्सीचा वेग कमी झाला, तशी माझ्या डोक्यात कल्पना आली. मी टॅक्सीचे दार उघडून बाहेर उडी मारून पळून जाणार होतो..
पण त्याने अचानक टॅक्सी थांबवली!!

मी आजूबाजूला बघितले. कोणीच नव्हते. अंधार होता. पाऊस गेला होता. पडकी घरे होती, त्यात कोणी राहत नसावे. एक-दोन कुत्री उगीच भुंकत होती. भयाण वातावरण होते. मला काय करावे ते कळेना. या निर्जन जागी याने मला का आणले?
तो माझ्याकडे न बघत म्हणाला.. “पैसे कमावणार?”
मी बुचकळ्यात पडलो. एकतर हा माणूस - माणूस नाही, देवदूत!! मला आत्महत्या करण्यापासून वाचवतो - मी दिलेले पैसेही घेत नाही, मला हा काय जॉब देणार आहे?
“काय?” मी त्रासून विचारले.
“पैसे कमावणार? पैसे?” त्याने मागे माझ्याकडे बघत मला विचारले. उजव्या हाताचा अंगठा, तर्जनी बोटाला घासत तो म्हणाला.
“नाही. आय एम फ्रॉम रिच फॅमिली.” मी ताठ बसत म्हणालो. माझी हनुवटी नकळत वर गेली. मी नजर फिरवली, तसा तो हसायला लागला. हसत तो मला म्हणाला,
“ते दिसलंच, तू किती रिच आहेस ते.’
मी शरमेने मान खाली घातली. त्याचे वाक्य जिव्हारी लागले. त्याने त्याच्या पाकिटामधून एक व्हिजिटिंग कार्ड बाहेर काढले. मला ते कार्ड देत तो म्हणाला, “हे कार्ड घे.”
“का?” असे म्हणत मी ते कार्ड हातात घेतले. कार्ड बघू लागलो.

ते प्लॅस्टिकचे, करड्या रंगाचे कार्ड होते. त्यावर ठळक काळ्या रंगात एक फोन नंबर होता. तो नंबर नीट दिसत नव्हता, म्हणून मोबाइलच्या प्रकाशात मी तो नंबर बघू लागलो. आता नंबर स्पष्ट दिसत होता. नंबरच्या अगदी खाली एक बार कोडसुद्धा होता. कार्डच्या मागच्या बाजूस एक छोटे चिन्ह होते. मी ते चिन्ह नीट बघितले. माझ्या अंगावर काटा आला!!
त्या चिन्हात, एक माणूस गळफास लावून पंख्याला लटकत होता!!

ते कार्ड बघत मी म्हणालो, “तुझं कार्ड आहे का?”
“माझं नाहीये.” ड्रायव्हर म्हणाला, “तुला पैसे हवे असतील, तर या नंबरवर फोन कर.”
“मला पैसे नको...” मी काही बोलणार, तेवढ्यात तो म्हणाला,
“मग जीव कशाला देत होतास?” तो वैतागून म्हणाला, तसा मी दचकलो. माझ्याकडे उत्तर होते, पण मला ते त्याला सांगायचे नव्हते. मला स्वतःचीच घृणा वाटत होती.
“तू नको कमवू, पण तुझ्यामुळे मला तरी मिळतील.” ड्रायव्हर मला म्हणाला.
“नको रे” मी कार्ड त्याच्या दिशेने फेकले. मला मार्केटिंगचा प्रकार वाटला. काहीतरी वस्तू कोणाच्या तरी गळ्यात मारायची... मला असली काही कामे करायची नव्हती.
“अरे” असे म्हणत तो खाली पडलेले कार्ड शोधू लागला. तो कार्ड घेण्यासाठी खाली वाकला. मी दार उघडून टॅक्सीबाहेर पडणार, तेवढयात मला म्हणाला, “ऐक ना, तुला बरेच पैसे मिळतील, पाच लाख वगैरे.”
“नको यार” असे म्हणून मी टॅक्सीबाहेर आलो. पाऊस थांबला होता. बरीच रात्र झाली होती. मला भूक लागली होती. माझ्यामागोमाग ड्रायव्हर टॅक्सीबाहेर आला.
“कार्ड तर ठेव ना” माझ्या खिशात कार्ड कोंबत तो म्हणाला.
“नको रे” मी कार्ड फेकणारच होतो, पण माझे लक्ष परत त्या चिन्हाकडे गेले. तेच ते चिन्ह, एक माणूस गळफास घेऊन पंख्याला लटकत होता!! व्हिजिटिंग कार्डवर असे चिन्ह कोणी का छापेल? याचा काय अर्थ? हा नंबर कोणाचा? कसला हा बार कोड? मी ते कार्ड बघत हा सगळा विचार करत होतो.
“फोन करून काय करू?” मी त्याला विचारले.
“ते लोक सगळं सांगतील.” मी या प्रकारात रस घेतोय हे बघून ड्रायव्हर सुखावला.
मी अजूनही कार्डकडे बघत होतो.
“हां, पण कार्ड घेऊन जा. त्यांना भेटल्यावर कार्ड दे.” एखाद्या लहान मुलाला जसे सांगतात, तसे मला त्याने समजावले.
“कोण भेटेल?” मी कार्डवरून बोटे फिरवत म्हणालो.
“मला माहीत नाही. चारशे सत्तर रुपये.” ड्रायव्हरने माझ्यासमोर हात पुढे केला.
"काय?" माझी तंद्री भंगली.
“चारशे सत्तर रुपये, गाडीचं भाडं” ड्रायव्हर चढ्या आवाजात मला म्हणाला.
“अरे हां” मी खिशातून पाकीट काढले. तीच दोन हजारांची नोट बाहेर काढली, त्याला दिली. दोन्ही हाताने नोट पडकून, मान वर करून तो नोट बघू लागला. नोट खरी आहे याची खातरी करून तो म्हणाला, “सुट्टे नाहीयेत.”
“कीप द चेंज” मी उत्तर दिले, तसा तो परत माझ्याकडे बघून हसला, मला दोन्ही हाताने दंडवत केला, टॅक्सीत बसला, टॅक्सी सुरू केली आणि भुर्रकन निघून गेला. मी त्या जाणाऱ्या टॅक्सीकडे अन मग कार्डकडे बघितले.

मी चालत मेन रोडवर आलो. मी माझ्या आत्महत्येचा विचार दूर सारला. मी या सगळ्याचा विचार करू लागलो. या कार्डचा काय उपयोग?

मी फोन करू का? फोन करून काय करू? काहीतरी बेकायदेशीर काम असेल का? मग त्याचे भरपूर पैसे देतील. मला पैशाची गरज तर नाहीच, पण हे सगळे अजब वाटत होते!! मी थोडा विचार करून फोन केला. रिंग वाजत होती, काही उत्तर आले नाही. मी फोन कट करणार, तेवढ्यात तिकडून आवाज आला, “हॅलो?”
“तुमचा नंबर... मला त्या टॅक्सी ड्रायव्हरने दिला.” मी गडबडलो. काय बोलावे ते कळेना. जे मनात आले, ते बोलून गेलो. त्या टॅक्सी ड्रायव्हरचे नावही मला माहीत नव्हते. समोरून काही आवाज आला नाही. माझा आवाज ऐकू जातोय की नाही? परत बोलू का? मी शांतपणे उत्तराची वाट बघत होतो.

मी काही बोलणार, तेवढ्यात -
“मी तुम्हाला पत्ता एसेमेस केला आहे. उद्या रात्री दहा वाजता या.” एवढे बोलून समोरच्या माणसाने कॉल कट केला. मला काही बोलायची संधी दिली नाही. मी फोन चेक केला. त्याच नंबरवरून एक एसेमेस आला होता. मी पत्ता वाचला. शहराच्या बाहेरचे ठिकाण होते. मी विचार करू लागलो, हे तर काहीतरी भयानक आहे. आता काय करायचेग? जायचे का उद्या? माझा काही घातपात केला तर? पण मला मारून कोणाला काय मिळणार? मला वाटतेय काहीतरी बेकायदेशीर काम देतील, ते ऐकून घेऊ, सरळ नाही म्हणून परत येऊ. जर बेकायदेशीर काम असेल, आपण नाही म्हटले आणि त्यांनी चिडून आपल्याला मारले, तर? आत्महत्या म्हणूनही दाखवतील? नाहीतरी आपण जीव देणार होतो. कोणाला संशयसुद्धा येणार नाही. जर आपण ते कामं केलं आणि मग यांनी आपला खात्मा केला, तर? माझ्या डोक्यात गदारोळ माजला होता.

मी दुसरी टॅक्सी करून घरी आलो. घर दुमजली होते. मी वरच्या मजल्यावर पेइंग गेस्ट म्हणून राहत असे. खालच्या मजल्यावर घराचे मालक राहत होते. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जिना बाहेरूनच होता. तीस वगैरे पायऱ्या चढून जाव्या लागत असत. या पायऱ्या पावसाने निसरड्या झाल्या होत्या. मला पायऱ्या चढायचा नेहमी कंटाळा येत असे.

मी घरात आलो. माझे डोके दुखत होते. भिजलो होतो, थंडी वाजत होती. दोन-तीन वेळा सडकून शिंकलो. खूप दमलो होतो. पटकन मॅग्गी केली. तेच माझे जेवण होते. मग झोपलो. मी चांगला दहा तास तरी झोपलो असेन. उठल्यावर लगेच फोन चेक केला. कोणाचा फोन आला नव्हता.

मी सकाळी उठलो, नाश्ता करायला बाहेर आलो, पण डोक्यात हा घोळ सुरूच होता. मी पुन्हा ते कार्ड बघितले. ते चिन्ह काही माझ्या डोक्यातून जाईना. पंख्यावर गळफास घेऊन लटकणारा माणूस !!!

जाऊ की नको? असा विचार करत संध्याकाळ झाली. मी एका भारी हॉटेलमध्ये जाऊन मस्त जेवलो. मला तसे काहीच काम नव्हते. 'मरू दे, जे होणार ते होईल' असा विचार करत, मी मोबाइल अॅपवरून टॅक्सी मागवली, निघालो!! टॅक्सीत असताना हृदय धडधडत होते. घाबरलो होतो. मरायला न घाबरणारा माझ्यासारखा माणूस आता का घाबरतोय? पण माझ्या मनात कमालीची उत्सुकता होती. मला काय बरे काम देतील? त्या पत्त्यापर्यंत पोहोचायला टॅक्सीला साधारण एक तास लागला. मला वाटले नव्हते एवढा वेळ लागेल. दिलेल्या पत्त्यावर शेवटी पोहोचलो.

टॅक्सीतून बाहेर आलो. समोर बघितले. अर्धवट काम झालेली उंच, दहा मजली एक इमारत होती, बांधकाम अजून सुरू होते. बाहेर सिमेंट, विटांचे ढिगारे पडले होते. मी गेटपर्यंत आलो. गेटवर एक वॉचमन उभा होता. मला वाटले, तो हटकेल. मी त्याला बघून थांबलो, तर त्याने टेरेसकडे बघितले. टेरेसवर एक माणूस उभा होता. त्या माणसाने हातानेच मला “वर ये” म्हणून खुणावले.

या बिल्डिंगला लिफ्ट नव्हती. परत पायऱ्या!! परत या पायऱ्या चढा... मला अगदी 'वीट' आला होता या पायऱ्यांचा!! पण नाखुशीने मी पायऱ्या चढलो. कसातरी टेरेसवर आलो. पुरता थकलो. घाम आला. घाम पुसत टेरेस बघू लागलो. टेरेस भव्य होते. अजून काम सुरूच होते. बांधकामाचे सामान पडले होते. विटा, सिमेंट, रंगाचे डबे, इत्यादी. मी जरा आजूबाजूला बघितले. या परिसरात हीच सर्वात उंच इमारत होती. बाकीचा भाग विकसित झाला नव्हता. आजूबाजूला अगदीच तुरळक घरे होती. मी गच्चीवरून आजूबाजूचा परिसर बघत असताना माझ्याकडे एक माणूस टक लावून बघत होता. अगदी लहान मुलगाच होता. वीस-बावीस वर्षांचा असेल. त्याने जीन्स, टी शर्ट घातला होता. त्याचा चेहरा अगदी निर्विकार होता. तो माझ्याकडे टक लावून बघत असताना मी त्याच्याकडे गेलो. त्याला “हॅलो” म्हणालो. “व्हिजिंटिंग कार्ड?” त्याने मला विचारले.
मी त्याला लगेच कार्ड दिले. त्याने त्याचा मोबाइल खिशातून काढला. त्या व्हिजिटिंग कार्डवरचा बार कोड स्कॅन केला. त्याने मला मोबाइलवर एक फोटो दाखवला आणि विचारले, “याने कार्ड दिलं का?”
मी फोटो बघितला. कालच्या टॅक्सी ड्रायव्हरचा फोटो होता. मी मान हलवून “हो” म्हणालो.
“बाकीचे लोक थोड्या वेळात येतील. तुम्ही बसून घ्या.” असे म्हणून त्याने मला खुर्ची दाखवली.

मी निमूटपणे प्लास्टिकच्या खुर्चीत जाऊन बसलो. त्याने कोणालातरी फोन केला. तो फोनवर बोलू लागला. मी टेरेसच्या दरवाजासमोर बसलो होतो. त्या दरवाजाच्या शेजारील भिंतीवर हॅलोजनचा दिवा लावला होता. त्या दिव्याचा प्रकाश सरळ माझ्या डोळ्यात जात होता. मी खुर्ची थोडी सरकवली, नजर खाली वळवली. माझ्यासमोर प्लास्टिकच्या दोन खुर्च्या होत्या. मी मोबाइल काढून वेळ बघितली. साडेदहा वाजत होते. मी तसाच बसून राहिलो. हा मुलगा माझ्यापासून दूर होता. माझ्याशी काहीच बोलत नव्हता. मला कंटाळा येऊ लागला.
थोड्या वेळात दोन माणसे एकत्र आली आणि माझ्यासमोर येऊन बसली. दोघे वयाने चाळिशीचे दिसत होते. एक जण अंगाखांद्याने मजबूत होता, मेहनत करून कमावलेले शरीर होते, तर दुसरा स्थूल होता, खुर्चीत आरामात पहुडला होता. दोघेही माझ्याकडे टक लावून बघत होते, माझा अंदाज घेत होते. मी साहजिकच नजर खाली वळवली. त्या दोघांना बघून हा तरुण मुलगा आमच्याजवळ आला. त्यांचे "हाय, हॅलो, काय कसा आहेस?" हवापाण्याच्या गप्पा झाल्या. मग त्या तरुण मुलाने माझ्याकडे मोर्चा वळवला त्याने माझ्याकडे बघितले मग या
दोघांकडे बघत तो म्हणाला,
“कितीची बेट लावणार?”
त्यावर तो मजबूत अंगकाठी असलेला मनुष्य म्हणाला,
“अरे, आधी नियम तर सांग, मी नियम विसरलो.”
स्थूल माणसाने होकारार्थी मान हलवली. काय चाललेय ते मला कळेना. मी त्या छोट्या खुर्चीत अवघडलो होतो.
“ओ के, मी नियम सांगतो.”
माझ्याकडे बघत तो तरुण म्हणाला. त्याने मला स्वतःचे नाव सांगितले नव्हते, म्हणून माझ्या मनात मी त्याचे नाव ‘तरुण’ असेच ठेवले. ‘तरुण’ माझ्याकडे बघत नियम सांगू लागला,
१) तुम्ही जगणार का मरणार यावर पैज लागेल.
२) तुम्ही मरणार म्हणून एक जण पैज लावेल, तर तुम्ही जगणार म्हणून दुसरा पैज लावेल.
३) पैजेचा कालावधी सात दिवस असेल. आठव्या दिवशी पैजेचा निकाल लागेल.

मला ऐकून धक्काच बसला, जीवन-मरणावर पैज? माणसे आहेत का राक्षस? हा कसला खेळ? माझ्या मनात गोंधळ उडाला. मी स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत होतो. माझी चुळबुळ सुरू झाली. मी अस्वस्थ झालो. तिघे जण शांतपणे माझ्याकडे बघत होते. मला काही सुचत नव्हते. मी का अडकू या भानगडीत?
“मी मरणार नाहीये, मी तो विचार कालच सोडून दिला.” मी एकदम निश्चयाने म्हणालो.
स्थूल माणूस बोलायला लागला. “हे बघ,” तो माणूस मला समजावू लागला.
“तुला मरायचं होतं. तुझ्या डोक्यात तो विचार चालू आहेत. तू जगणार की मरणार यावर आम्ही पैज लावणार.”
“मला आता नाही मरायचं.” मी परत मोठ्याने म्हणालो.
“हे तू आता म्हणत आहेस. उद्या सकाळी उठल्यावर तुला मरावंसं वाटेल. तुला वाटतं का, पुढच्या आठवड्यात तू जिवंत असशील?” अंगकाठीने मजबूत माणूस म्हणाला.
त्याचा मुद्दा बरोबर होता. माझा स्वतःवर विश्वास नव्हता. काल रात्रीपर्यंत मला जगायचे नव्हते. कदाचित इथून निघून गेल्यावर मला परत जीव द्यावासा वाटेल. मी काही बोललो नाही. काय बोलावे ते कळत नव्हते. मी 'तरुण'कडे बघितले.
'तरुण' मला म्हणाला, “मी ओळख करून देतो.”
“हे आहेत ‘मिस्टर ए,” तो स्थूल माणसाकडे हात करत म्हणाला, “आणि हे आहेत ‘मिस्टर बी” अंगकाठीने मजबूत माणसाकडे हात करत तो म्हणाला.
"नावं राहतील ना लक्षात?” मिस्टर बी हसत, माझ्याकडे बघत म्हणाला.
मी हसलो नाही की उत्तर दिले नाही. हा सगळा प्रकार इतका अजब होता की मी वेड्यासारखा दोघांकडे बघत होतो, अशा प्रकारामध्ये ते त्यांची खरी ओळख कधीच उघड करणार नव्हते, त्यांची खरी नावे मला कधी कळणार नव्हती. त्यांच्या दृष्टीने हे सोयीचे होते.
"सर, तुम्ही किती रक्कम लावणार?" ‘तरुण’ने ‘मिस्टर ए’ला विचारले.
"स्थूल माणूस म्हणजे मिस्टर ए" मी माझ्या मनात परत एकदा नोंद करून ठेवली.
"माझी रक्कम तर ठरलेली आहे, दहा लाख. पण कशावर लावू, हे कळत नाहीये" मिस्टर ए माझ्याकडे बघत म्हणाले.
बाप रे! दहा लाख!! अशा पैजेसाठी? माझ्या मरणावरच लावा, मी काही फार काळ जिवंत राहणार नाही, माझ्या अगदी तोंडावर आले होते, पण मी काही बोललो नाही.
"मी याच्या मरणावर लावतो.... दहा लाख" मिस्टर बी लगेच म्हणाला.
"थांब ना" मिस्टर ए त्याला म्हणाला.
'मिस्टर ए'लाही माझ्या मरणावर पैसे लावायचे होते. मी थोड्याच दिवसात जीव देईन असे त्याला वाटत होते. मला काय वाटते आहे हे कोणीच विचारत नव्हते. मी पुढे काय करणार ते मलासुद्धा माहीत नव्हते!! मी चाललेला प्रकार काही न बोलता बघत होतो.
"ये तो कुछ दिनो का मेहमान है, काय रे!" मिस्टर बी माझ्याकडे बघत म्हणाला. मी काहीतरी बोलावे अशी त्याची अपेक्षा होती. मी अगदी नम्रतेने म्हणालो,
"सर, हा सगळा प्रकार चुकीचा आहे, हे असं..."
"तू काल जीव देत होता, ते बरोबर होतं का? आम्ही थोडी बेटिंग केली की तुला लगेच राग आला." मिस्टर बी लगेच म्हणाला. मी हे ऐकून मान खाली घातली. मला चूक, बरोबर ठरवायचा काहीच अधिकार नव्हता. ते त्यांच्या मजेसाठी हा खेळ खेळत होते. मला काही इजा करणार नव्हते. मला फक्त जगायचे होते, नाहीतर मरायचे होते!!
मी तसाच खाली बघून विचार करू लागलो. माझ्या डोक्यात एक शंका आली.
"मी जिवंत राहिलो - म्हणजे मी पैज जिंकलो, तर माझा काय फायदा?"
"तुला पैसे..." तो मिस्टर ए, स्थूल माणूस बोलू लागला.
"पैसे नको आहेत" मी ठामपणे म्हणालो.
"मग तू जीव का देत होतास?" मिस्टर बीने प्रश्न विचारला. तोच प्रश्न काल मला टॅक्सी डायव्हरने विचारला होता. मी त्याला उत्तर देऊ शकलो नाही आणि आजही उत्तर देणार नव्हतो.
“माझ्या आधी तुम्ही अशा किती वेळा पैजा लावल्या आहेत?”
मी परत प्रश्न केला. त्यावर कोणीच काही म्हणाले नाही. मग मिस्टर ए म्हणाला,
“आधी चार वेळा पैज लावली आहे.”
“हो” असे म्हणून 'तरुण'ने मान डोलावली.
“आपला स्कोर इक्वल आहे. दोन-दोन! मी दोन वेळा जिंकलोय, हे दोन वेळा जिंकलेत.” मिस्टर बी म्हणाले.
“पण मी हा खेळ का खेळू? माझा काय फायदा?” मी बोलून गेलो, वैतागलो होतो.
पण तेवढ्याच शांतपणे मिस्टर ए म्हणाला,
“हा प्रश्न तू स्वतःला विचार, आम्हाला नाही. तुला पाहिजे तर तू आता निघून जाऊ शकतोस. तू जिवंत राहिलास किंवा मेलास काय, आठव्या दिवशी पैजेचा निकाल लागेल, कोणीतरी एक पैज जिंकेल.”
“म्हणजे शेवटी मीच ठरवणार की जगायचं का मरायचं...” मी खुर्चीतून उठत म्हणालो.
"हो....आम्ही फक्त बघणार, शेवटी निर्णय सर्वस्वी तुझाच आहे." मिस्टर बी मला म्हणाला.
खेळ सुरू झाला. पैज सुरू झाली. मी या खेळात ओढला गेलो. मी जसा खुर्चीतून उठलो, तसे हे दोघेही उठले. मी दूर जाऊन उभा राहिलो. गच्चीवरून आसपासचा परिसर बघू लागलो. माझ्या मागे ‘मिस्टर ए’ आला. मी त्याच्याकडे बघितले.
मिस्टर एने माझ्याकडे न बघत प्रश्न केला, “तू अजून कारण नाही सांगितलंस?” मला त्याचा प्रश्न कळला. मी कारण लपवून ठेवले होते. मी मागे बघितले. मिस्टर बी आणि ‘तरुण’ एकमेकांशी बोलत होते. मला काय बोलावे ते कळेना. सांगू की नको?
“ठीक आहे, नको सांगूस. मी समजू शकतो.” मिस्टर ए म्हणाला. मी कसनुसा हसण्याचा प्रयत्न केला.
“क्या गुफ्तगू हो रही हैं, हमे भी बतायें” असे म्हणत मिस्टर बी आमच्याकडे आला. त्याने माझ्या खांद्यावर हात टाकला. मी काही बोललो नाही. या सगळ्याचा विचार करत होतो. माझ्या डोक्यात आणखी एक शंका आली. मी परत विचारले,
“जर मी आठव्या दिवशी इथे आलोच नाही, तर? मी पळून गेलो तर?”
“पळून जरी गेलास, तरी तू जिवंतच राहणार ना? मग मिस्टर ए जिंकले.”
“पण तुम्हाला कसं कळणार मी जिवंत आहे ते?” मी प्रतिप्रश्न केला.
“तुझं प्रेत जेव्हा सापडेल, तेव्हा मी जिंकेन” मिस्टर बी अगदी सहज म्हणाले. 'प्रेत' शब्द ऐकून माझ्या अंगावर काटा आला. मी शहारलो.
“चला, निघू या” असे म्हणून मिस्टर बी निघाला. “सी यू” माझ्याकडे बघत तो म्हणाला, मिस्टर बी नुसताच हसला. त्याला नक्कीच वाटत होते की या दोनच दिवसात मी जीव देऊन मोकळा होईन. त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.
ते दोघे निघून गेले. थोड्या वेळाने मी आणि ‘तरुण’ दोघे निघालो. मी मोबाइल अॅपवरून परत एक टॅक्सी मागवली. आम्ही दोघे जिने खाली उतरत होतो, तेव्हा मी 'तरुण' ला विचारले,
“मागच्या पैजेच्या वेळी काय झालं होतं?”
‘तरुण’ने सुस्कारा सोडला. त्याला सांगायचे नव्हते. त्याने थोडा वेळ घेतला आणि सांगू लागाला,
“मागच्या वेळी एक जण गावाकडून आला होता. त्याला बरेच दिवस नोकरी मिळाली नाही. त्याची उधारी थकली होती, कर्ज झालं होतं. इथे आल्यावर बराच रडला. पैज लागली. आतासारखी स्थिती होती. मिस्टर एने त्याच्या जगण्यावर पैसे लावले आणि बीने मरण्यावर. सहा दिवस व्यवस्थित होता, पण सातव्या दिवशी.." एवढं बोलून ‘तरुण’ गप्प झाला.
“त्याने जीव दिला?” मी तरुणचे वाक्य पूर्ण केले. तरुणने फक्त “हो” म्हणून मान डोलावली.
“मिस्टर ए त्याला पैशाची मदत करणार होते. नोकरी लावून देण्याचं आश्वासन दिलं होतं, पण त्याचा विश्वास बसला नाही. त्याने घाई केली.” तरुण म्हणाला. तो गेल्याचे तरुणलासुद्धा वाईट वाटले. त्याच्या चेहऱ्यावर ते दिसले.
आम्ही दोघे त्या पायऱ्या उतरू लागलो. या पायऱ्या!! संपत का नाहीत?
"हे कार्ड त्या टॅक्सी ड्रायव्हरकडे कसं आलं?" मी तरुणला पायऱ्या उतरताना विचारले.
“या शहरात, अशी बरीच कार्डस बऱ्याच लोकांकडे आहेत. जेव्हा त्यांना वाटतं की कोणी व्यक्ती निराश आहे, आत्महत्येच्या प्रयत्न करत आहे, तेव्हा हे लोक त्यांना हे कार्ड देतात आणि आमच्याकडे पाठवतात. त्या टॅक्सी ड्रायव्हरचा मोबदला मी मघाशीच पाठवून दिला.” तरुणने मला सविस्तर सांगितले.
आम्ही खाली आलो. मी त्याचा निरोप घेऊन माझ्यासाठी आलेल्या टॅक्सीकडे गेलो. टॅक्सीत बसलो. या सगळ्या प्रकारची उजळणी करू लागलो.
मी बराच शांत झालो होतो, पण माझी जगायची भावना अजूनही मंदच होती. मला खरेच जगण्यामध्ये स्वारस्य नव्हते, मिस्टर ए जिंकला काय किंवा मिस्टर बी जिंकला काय, मला काही फरक पडणार नव्हता. मी आज मेलो काय किंवा आठव्या दिवशी मेलो काय, कोणीतरी एक जिंकणार होता, कोणीतरी एक हरणार होता.
ही कंटाळलेली श्रीमंत माणसे जगण्यातला रोमांच शोधात होती. अशा पैजा लावून स्वतःचे मनोरंजन करत होती तेवढाच त्यांना टाईमपास!! मी त्यांच्यासाठी तात्पुरते एक प्यादे होतो!! एकच बरी गोष्ट होती की हा निर्णय घेण्यासाठी त्यांनी माझ्यावर दबाव टाकला नाही. माझा जगण्याचा किंवा मरण्याचा निर्णय सर्वस्वी माझा असणार होता.
“मी जगू का?” माझ्यासमोर हा यक्षप्रश्न अजूनही अनुत्तरित होता.
मी घरी आलो. दमलो होतो. लगेच जाऊन झोपलो. अगदी 'मेल्यासारखा' झोपलो. सकाळी उठलो, तेव्हा मला छान वाटतं होते. माझ्यावरचा ताण बराच कमी झाला होता. माझ्याकडे करण्यासारखे काहीच नव्हते. मी घरी फोन केला, घरच्यांशी बोललो. त्यांनाही बरे वाटले. मलाही बरे वाटले.
मी मोबाइल बघितला. तरुणकडून काही फोन आला नव्हता. मी जिवंत आहे का हे बघण्यासाठी तरी याने मला फोन करावा, पण असे फोन त्याने जर केले असते, तर माझी चिडचिड झाली असती.

माझा निर्णय अजून होत नव्हता. जगावे का? मी स्वतःला विचारत होतो, पण अजून उत्तर मिळत नव्हते. पण एक बदल नक्की झाला होता. जगावे का? या प्रश्नाला उत्तर मिळाले नाही की आधी खूप त्रास होत असे, हा त्रास खूप कमी झाला होता.
या सगळ्याचा विचार करत असताना, सात दिवस कधी उलटून गेले कळले नाही. मी सात दिवस तरी जिवंत राहिलो. मला छोटा का होईना, स्वतःबद्दल अभिमान वाटू लागला. तरुणचा मेसेज आला. त्याने त्याच ठिकाणी, रात्री दहा वाजता बोलावले होते. पठ्ठ्याने फोनसुद्धा केला नाही, मेसेज पाठवला. पण मी ठरवले होते, मी जाणार होतो. या लोकांना शेवटचे भेटणार होतो. निरोप घेऊन परत येणार होतो, पुन्हा असल्या भानगडीत पडणार नव्हतो.

मी घरातले दिवे मालवले, बाहेर पडलो. दारावर कुलूप चढवले. बाहेर पाऊस पडत होता. मी वैतागलो, मी परत कुलूप उघडून आत गेलो आणि रेनकोट घालून बाहेर आलो. तो रेनकोट फार ढगळा होता. मी कुलूप लावले. किल्ली हातात फिरवत पायऱ्या उतरू लागलो. पण किल्ली हातातून खाली पडली. किल्ली पकडण्यासाठी मी पुढे झेपावलो, पण पायऱ्यांचा अंदाज आला नाही. पावसामुळे त्या निसरड्या झाल्या होत्या. माझा पाय घसरला. आधार घेऊ शकलो नाही. मी सरळ पाठीवर कोसळलो. माझे डोके पायऱ्यांवर आदळले. वेदनेची सणक डोक्यात जाणवली. धडपडत खालच्या पायरीपर्यंत कोसळलो, मी डोळे मिटले.....

त्याच रात्री, साडेदहा वाजता, टेरेसवर.
“उगीच आलो. हा नाही येणार. मी पैज जिंकलोय.” मिस्टर बी म्हणाला.
मिस्टर ए शांत होता. तो खूप हताश दिसत होता. तरुणने चेहरा निर्विकार ठेवायचा प्रयत्न केला. पण त्याला वाईट वाटत होते, पण तो काही बोलला नाही.
“आपण बॉडी मिळेपर्यंत...पेपरला न्यूज येईपर्यंत वाट बघू.” मिस्टर ए अगदी निराश होऊन म्हणाला. यावर कोणीच काही बोलले नाही.
जन्म मृत्यू हा आपल्या हातात नसतो, तो त्या परमेश्वराच्या हातात आहे. त्याने वेळ ठरवलेली असते. ती वेळ विधिलिखीत आहे,, ती आपण बदलू शकत नाही किंवा बदलण्याचा प्रयत्नसुद्धा करू नये! तुमची वेळ भरली की एका क्षणात तो तुमचा जीवनक्रम संपवेल.
मी डोळे उघडले. प्रकाश माझ्या डोळ्यात गेला. परत डोळे मिटले, हळूहळू उघडले. मी कूस बदलली. एक तीव्र सणक डोक्यात जाणवली...”आई ग” मी कण्हलो....
“सावकाश.....” माझ्यासमोर 'तरुण' उभा होता. मी त्याच्याकडे बघितले. हा इथे काय करतोय?? मी इथे कसा आलो?
“आम्हाला वाटलं तू....” तो एवढे बोलून थांबला.
“तू इथे कसा..” मला नीट बोलता आले नाही.
"मी तुला फोन करणार नव्हतो, पण 'मिस्टर ए' ला खात्री होती की तू जिवंत राहणार. त्यांनीच मला तुला फोन करायला लावला. मी फोन केला, तर तुझ्या घरमालकांनी फोन घेतला. त्यांनी तुला झालेल्या अपघाताबद्दल सांगितलं. मी खात्री करायला आलो. अपघात होता का आणखी काही?” तरुण म्हणाला.
“अपघात होता. मी तुमच्याकडे यायला निघालो होतो....पाय घसरून पडलो.”मी म्हणालो. माझे डोके ठणकत होते.
“घरमालकांनी जेव्हा बघितलं... तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन आले.” तरुण म्हणाला.
'तरुण' पुढे बोलू लागला...
“डॉक्टर म्हणाले, डोक्याला जबर मार लागला, रक्तस्रावसुद्धा झाला, पण तरीही तू वाचलास.” तरुण बोलत होता, पण माझे त्याच्याकडे लक्ष नव्हते. मी इकडे तिकडे बघितले, एका हॉस्पिटलच्या खोलीत, बिछान्यावर झोपलो होतो. मी डोक्याला हात लावला. माझ्या डोक्याला एक पट्टी बांधली होती.
मी 'तरुण'कडे बघितले. त्याने खिशातून तेच व्हिजिटिंग कार्ड काढले आणि माझ्या जवळच्या टेबलवर ठेवले. मी त्या कार्डकडे बघितले.
“मिस्टर बीने भेट म्हणून दिलंय.” तरुण म्हणाला.
“मिस्टर बीने?” मी विचारले. माझा विश्वास बसला नाही.
पण 'तरुण' माझ्याकडे बघून नुसताच हसला, काही बोलला नाही.

“चल, मी जातो” असे म्हणत तो जाऊ लागला. मी त्याला थांबवू शकत नव्हतो, पण जाताना तो मध्येच थांबला, मागे वळला आणि माझ्याकडे बघत म्हणाला,
“मिस्टर एने कारण विचारलं आहे.” कारण या शब्दावर जोर देत 'तरुण' म्हणाला. मला त्याचा प्रश्न कळला. 'मी जीव का देणार होतो?' याचे कारण मी अजूनही सांगितले नव्हते, आता मी हसलो. हसत म्हणालो..."जगण्यासाठी कारण लागतं....मरण्यासाठी नाही"
ते ऐकून, पटकन तरुणने त्याचा मोबाइल बाहेर काढला, काहीतरी टाइप करू लागला.
मी गोंधळून विचारले, “काय करतोयस?”
“क्या डायलॉग है बॉस...व्हॉट्स अॅप स्टेटस ठेवतो” असे म्हणून 'तरुण' हसू लागला. मीही त्याच्या हसण्यात सामील झालो. ‘तरुण’ने निरोप घेतला, तो निघून गेला.
माझे डोके दुखणेणं बरेच कमी झाले होते. मी तसाच पडून राहिलो. मी तरुणने दिलेल्या व्हिजिटिंग कार्डकडे बघितले. माझ्या मनात विचार आला...
“हे कार्ड मी कोणाला देऊ शकतो?”

*समाप्त*

चैतन्य रासकर
chaitanyaras@gmail.com

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

21 Oct 2017 - 2:21 am | पद्मावति

भन्नाट जमलीय कथा. मस्तच!

जव्हेरगंज's picture

21 Oct 2017 - 7:26 am | जव्हेरगंज

जबरी!!!

सस्नेह's picture

21 Oct 2017 - 11:37 am | सस्नेह

उत्तम रहस्य कथा !

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Oct 2017 - 12:10 pm | अमरेंद्र बाहुबली

मस्त! :-)

चॅट्सवूड's picture

21 Oct 2017 - 3:33 pm | चॅट्सवूड

सगळ्यांना मनापासून धन्यवाद : )

विनिता००२'s picture

23 Oct 2017 - 2:11 pm | विनिता००२

छान

मस्त आहे कथा. वेगळीच कल्पना.

मस्त कथा! छान रंगवली आहे.

अगदी वेगळ्या स्वरूपाची कथा! खूपच छान!

पैसा's picture

28 Oct 2017 - 6:42 pm | पैसा

खूप आवडली कथा!

चॅट्सवूड's picture

29 Oct 2017 - 3:08 am | चॅट्सवूड

सगळ्यांना धन्यवाद, कथा सगळ्यांना आवडली हे बघून छान वाटलं, मला बऱ्याच दिवसापासून "पैज" या संकल्पने वर कथा लिहायची होती, दोन मित्र पैज लावतात, काहीतरी वेगळ्या, भयंकर गोष्टीवर पैज लावतात, एवढंच डोक्यात होतं, पण कशावर पैज लावता येऊ शकते? ती गोष्ट शुल्लक नसावी, पण खूप महत्त्वाची असावी असं वाटलं, मग एखाद्याच्या मृत्यूवर सुद्धा पैज लावता येईल का? असं डोक्यात आलं, पण ते वास्तववादी वाटलं पाहिजे, फँटसी वगैरे नको असं डोक्यात ठेवून लिहायचा प्रयत्न केला.

याजसाठीं केला होता अट्टहास । शेवटचा दिस गोड व्हावा ॥
हा अभंग मला खूप आवडतो आणि त्यामुळे "शेवटचा दिस...." हे नाव समर्पक वाटलं

या कथेत अजून एक गोष्ट नमूद केली होती की "मिस्टर बी" कथेतल्या नायकाला एक गोळी देतो आणि म्हणतो, "तुला जेव्हा मरायचं ना तेव्हा ही गोळी घे तुला आरामात, पटकन मरण येईल" पण मला वाटलं, यामुळे "मिस्टर बी" पूर्णपणे खुनशी होतो, कथेची लांबी सुद्धा वाढत होती, त्यामुळे नंतर हा भाग काढून टाकला.

वकील साहेब's picture

30 Oct 2017 - 1:25 pm | वकील साहेब

कथा आवडली

पाटीलभाऊ's picture

30 Oct 2017 - 5:19 pm | पाटीलभाऊ

वेगळ्या शैलीतील कथा आवडली.

mayu4u's picture

2 Nov 2017 - 11:50 am | mayu4u

डोकं भिरभिरलं.

प्राची अश्विनी's picture

2 Nov 2017 - 5:29 pm | प्राची अश्विनी

कथा आवडली.

प्रमोद देर्देकर's picture

5 Nov 2017 - 6:15 pm | प्रमोद देर्देकर

आताच कथा वाचली एक वेगळीच संकल्पना. आवडली.