उनाडटप्पू

चॅट्सवूड's picture
चॅट्सवूड in दिवाळी अंक
21 Oct 2017 - 12:00 am


"उभ्या लाइफमध्ये काहीतरी आडवं केलं पाहिजे"
असं म्हणून लौकिक खाली बसला. त्याने त्याची निळ्या रंगाची, उजव्या पायातील स्लीपर हातात घेतली. स्लीपरचा बंद बाहेर आला होता, तो जागच्या जागी बसवू लागला.
"भावा... मर्दा.... करू या काहीतरी" लौकिकच्या खांद्यावर हात ठेवत प्रतीक म्हणाला. लौकिक आणि प्रतीक नेहमीसारखे 'विपुल की चाय' टपरीवर चहा घेत होते. हा त्यांचा नेहमीचा कट्टा होता.

प्रतिक आणि लौकिक... दिसायला तसे साधारण, वागण्यात असाधारण. जीवनाबद्दल काहीच धोरण त्यांच्याकडे नव्हते. नुकतेच बारावी काठावर पास झाले होते, पण त्यांना कुठल्याच काठावर प्रवेश मिळाला नाही. दोघांनी गयावया केल्यावर एका कॉलेजला दया आली. या कॉलेजमध्ये मुलं कमी, बाक जास्त होते. दोघांना पहिल्या वर्षाला प्रवेश मिळाला. फर्स्ट इयरचे विषय हा विषय या दोघांनी फार ताणला. कला शाखेत कल्ला करायला नव्हते, केमिस्ट्रीबद्दल क्लॅरिटी नव्हती, गणित यांना गौण वाटले. शेवटी जमेल त्या, जमेल तसे, जमेल तेव्हा एखाद्या विषयाच्या वर्गात बसू लागले.

याच काळात भारतात चमत्कार झाला. जिओ कंपनीकडून इंटरनेट फुकट मिळायला लागले. 'फुकट तर नाही दुखत' हे धोरण राबवून रोज सलग बारा तास यू ट्युब व्हिडिओ बघू लागले. दिसेल तो व्हिडिओ बघायचा. काही असो मग. मान खाली करून, पाठीचा कणा वाकवून दोघे मोबाइलला चिकटले. हे सगळे व्हिडिओ बघून त्यांना 'जग मोठे...आपलं नाव छोटे' याचा प्रत्यय आला. एके दिवशी इंटरनेट स्लो झाले आणि यांची मती फास्ट झाली. बाहेर पाऊस पडत असताना डोक्यात विजा चमकल्या. 'सेल्फी विथ रेन' घेताना दोघांना साक्षात्कार झाला - आपले हक्काचे यू ट्यूब चॅनल पाहिजे!!असे एक टकाटक चॅनल, त्यावर पाहिजे ते टाकू शकतो, काहीही, कसेही, केव्हाही करू शकतो!! असे व्हिडिओ टाकायचे की लोक येडे होऊन पेढे वाटतील, आपल्याभोवती वेढे घालतील!!

'डोक्यात आले...कामात दिसले.' पुढचा-मागचा विचार न करता, यू ट्यूबवर लॉग इन केले. मग लक्षात आले, नाव काय द्यायचे? काम मोठे अन... नाव छोटे? असे कसे चालेल? मग तीन दिवस 'चिवड्यावर चर्चा' झाली, भांडणे झाली, विचार झाला. विनिमय होईना, नाव काही ठरेना!!

लौकिकचा कारभार 'मीच खरा...मागे सरा' असा होता. त्याला काहीतरी आसक्त, विरक्त, अभिज्ञ वगैरे नाव ठेवायचे होते. पण अभिज्ञ 'अपिलिंग' वाटत नव्हते. 'अभिज्ञ'चे स्पेलिंग काय करावे? हाच यक्षप्रश्न होता. तेव्हा साधेच, चार अक्षराचे नाव ठेवावे असे ठरले.
"आपलं चॅनल...तर आपलंच नाव देऊ" प्रतीकचा मूड अन मुद्दा वेगळाच होता.
"लौ...." लौकिक विजेचा धक्का बसल्यासारखा म्हणाला.
"लव्ह?"
"लौ.. फक्त लौ....ऐकताना लव्ह वाटेल...लिहिताना लौ असेल." लौकिक तोऱ्यात म्हणाला.
"लेका असं हाय का? तुझ्या नावाचा शॉर्ट फॉर्म.... माझ्या नावाचं काय??" प्रतीक स्वतःच्या हक्कासाठी लढत होता. मग 'लौ' नावाला 'किक' मारून शेवटी 'लौप्र' नाव ठेवण्यात आलं. दोघांनी स्वतःच्या नावाचे आद्याक्षर दान केले, यू ट्यूब चॅनल सुरू झाले.
"लौप्रज....शेवटाला झेड अ‍ॅड करू." प्रतीक म्हणाला.
"नको रे... लोकांना कळणार नाही" लौकिकने समजावले, पण 'लौप्र' नाव लोकांना कळेल, आपण 'लोकप्रिय' होऊ, असा दांडगा विश्वास त्यांना होता.
लौकिकच्या काकाकडून एक डीएसएलआर कॅमेरा प्रकट झाला. अ‍ॅमेझॉनमधून एक माईक मागवला, काम सुरू झाले. पण कशाचे काम?
कशाचा व्हिडिओ करावा? हा प्रश्न नवीन कॅमेऱ्यावर सत्याऐंशी सेल्फीज काढून झाल्यावर या दोघांना पडला.

पहिला व्हिडिओ काय करावा हे कळत होते, वळत होते, पण वळवळत नव्हते. पहिला व्हिडिओ आगळावेगळा असावा, अजागळ नको, असे ठरले. सोशल एक्सपेरिमेंट करावा, पण तो सोसेल का? कुणाला राग आला तर? कुणी मारायला आले तर? मग काय करायचे?
"सोशल एक्सपेरिमेंट म्हणजे?" प्रतीकने विचारले. प्रतीकची 'मराठी भारी....इंग्लिशला सॉरी' अशी अवस्था असे.
"अरे, म्हणजे सामाजिक प्रयोग." लौकिक म्हणाला. लौकिकचे मराठी जरा जास्तच भारी होते.
"म्हणजे?"
"अरे म्हणजे, तो नाही का आपण व्हिडिओ बघितला होता - मुलाचा रस्त्यावर अ‍ॅक्सिडेन्ट होतो, पण कोणीच मदत करायला येत नाही, पण मुलीचा जेव्हा अ‍ॅक्सिडेन्ट होतो, तेव्हा मोजून शंभर लोक तिला मदत करायला धावत येतात."
"अरे हां...आलं लक्षात."
"आपणपण असंच काही करू या, एकदम.... " लौकिकने हातवारे करून भावना पोहोचवल्या. प्रतीकने फक्त मान डोलावली. अजूनही प्रश्न तोच होता, करायचे काय?
लोकांना सहज प्रश्न विचारावेत, त्यांचे मत जाणून घ्यावे, असे ठरले. पण काय प्रश्न विचारावा? हाच मोठा प्रश्न पडला. मग त्यांनी डोके खाजवून बराच कोंडा पडला.
"असं विचारायचं की पहिलं प्रेम कधी झालं?" लौकिक म्हणाला.
प्रतीकला वाद घालायचा कंटाळा आला होता. त्याला झोप आली होती. काही सुचत नव्हते. त्याने हो म्हणून मान डोलाव. "ओके भावा...करू हवा" असे प्रतीकने म्हटल्यावर लौकिक चेकाळला उद्या सकाळी बस स्टँडवरच्या लोकांना हा प्रश्न विचारायचा, त्यांची प्रतिक्रिया शूट करायची असे ठरले.

सकाळी नऊला सुरुवात झाली. प्रतीकने कॅमेरा, लौकिकने माइक पकडला. एकदम जोशात ते येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना विचारू लागले, पण कोणी थांबेनाच!! 'काम नाही सुरू... शेवट करू' अशी परिस्थिती झाली. दुपारी दोन वाजेपर्यंत एकही माणूस बोलायला तयार झाला नाही. लौकिकचा धीर खचला. रस्त्यात डिव्हायडरवर बसून तो रडू लागला. प्रतीकला वाईट वाटले. 'भाऊ रडतोय.... दुखणी काढतोय' हे बघून प्रतीकला काय करावे ते कळेना. तो इकडे तिकडे बघत त्याच्या शेजारी उभा राहिला. तेवढ्यात एक माणूस त्यांच्याकडे आला. तो लौकिककडे बघत म्हणाला, "काय रे, काय झालं...का रडतोय?"
तसा लौकिक रडायचा थांबला. त्याने त्या माणसाकडे बघितले. त्याला काय बोलावे ते कळेना.
शेवटी प्रतीक म्हणाला, "नाय, ते व्हिडिओ बनवायचा होता....पण कोणी..."
"माझा घ्या की मग" तो माणूस उत्साहाने म्हणाला, तसे हे दोघे खुलले. लौकिक उभा राहिला. या माणसासमोर माइक धरत त्याने प्रश्न केला,
"तुमचं पहिलं प्रेम कोण होतं?"
"पहिलं प्रेम....पहिलं प्रेम....." तो माणूस दोन-तीन वेळा म्हणाला.
"तीन-चार होते रे, त्यातलं पहिलं आठवत नाही... हां, पण शेवटचं प्रेम आठवततंय."
"शेवटचं?"
"हां शेवटचं, ते चांगलं आठवतंय.' तो माणूस म्हणाला. लौकिकने प्रतीककडे बघितले.
"तुमची मिसेस का?" लौकिकने विचारले.
"नाही नाही....ती सेकंड लास्ट होती" असे म्हणून तो माणूस हसू लागला. लौकिकला काय करावे ते कळेना. तोही हसू लागला. दोघेही हसत आहेत हे बघून प्रतीकही हसू लागला.
आणखी थोडे बोलून तो माणूस निघून गेला.

"तुमचं शेवटचं प्रेम काय होतं?" हा प्रश्न ते दिसेल त्या लोकांना, दिसेल तिथे, दिसेल तेव्हा विचारू लागले.
बरेच लोक थांबून त्यांना उत्तर देत होते.
एक म्हणाला, "माझं शेवटचं प्रेम - माझी बाईक."
दुसरा म्हणाला, "माझं शेवटचं प्रेम माझी तिसरी गर्लफ्रेंड."
"प्रेम वगैरे झूठ हैं"
"मी प्रेम नाही... मी फक्त गेम करतो"
"आधी प्रेमात होतो.. आता फक्त रम घेतो"
एकाने तर 'पाहिलंच प्रेम पण तिचा नव्हता नेम' ही कविता म्हणून दाखवली.
अशी बरीच उत्तरे मिळाली. बरेच 'फूटेज' मिळाले. आता हे फूटेज 'एडिट' करण्याची गरज होती, तेव्हा प्रतीकने मामाच्या जुन्या घरी जाऊ, असे ठरवले. त्या घरी मामाचा जुना डेस्कटॉप कॉम्प्युटर पडून होता, त्यावर एडिट करू, असे ठरले. प्रतीकचा मामा परदेशात स्थायिक झाला होता, त्यामुळे त्याच्या जुन्या घरात आता कोणी राहत नसे. प्रतीक लहानपणी त्या घरी गेला होता, त्यानंतर कधीच गेला नव्हता. मामाचे घर नेमके कुठे आहे हे त्याला माहीत नव्हते. त्याने मामाला फोन केला, पत्ता घेतला. घर शहराबाहेर होते. ह्या दोघांनी बस पकडली आणि निघाले. दोघांनी घरी 'यायला उशीर होईल... कॉलेजचा प्रोजेक्ट आहे असा निरोप धाडला. थोडक्यात, 'काम भारी तर रात्रीची वारी' होणार होती.

दोघे जेव्हा बसमधून उतरले, तेव्हा संध्याकाळ झाली होती. अंधार पडला होता. थंडी वाजत होती. त्या आवारात जास्त घरे नव्हती. सुनसान जागा होती. प्रतीकला घर कुठे आहे हे माहित नव्हते. प्रतीकने अंदाज घेत घर शोधले. घर छोटेच होते. आजूबाजूला कोणी नव्हते. 'एरिया सुनसान, ना आदमी ना मकान' असा सारा प्रकार होता. मामाचे घर कुठेतरी कोपऱ्यात होते. हे दोघे जसे घरासमोर आले, तसा प्रतीकने डोक्याला हात मारला!!

"काय झालं?" लौकिकने विचारले.
"चावी विसरलो" प्रतीक म्हणाला.
लौकिकचा चेहरा पडला, पण प्रतीक लगेच म्हणाला, "थांब भावा... सगळं करेल हा छावा."
''कशाला...चल परत जाऊ' लौकिक म्हणाला.
"थांब रे भावड्या" असे म्हणत प्रतिकने दगड शोधला आणि दोन्ही हातांनी दगड उचलून कुलपावर घातला. पण कुलुप तुटले नाही. मोठा आवाज झाला, पण आजूबाजूला तसे कोणीच नव्हते. नाहीतरी ते प्रतीकच्या मामाचे घर होते, त्यामुळे नंतर नवीन कुलूप लावले असते. प्रतीकने आणखी घाव घातले. शेवटी ते कुलूप तुटले. प्रतीकने लौकिककडे बघत म्हणाला,
"भावा.... मी बिनधास्त... तू फक्त हास "
असे म्हणत प्रतीकने कडी काढून दरवाजा उघडला. त्याचे समोर लक्ष गेलं आणि प्रतीक एक पाऊल मागे सरकला!! लौकिक दचकला, त्याचा तोल गेला. तो घाबरला, धडपडत धावतच सुटला. प्रतीक तसाच उभा राहून समोर बघत होता. आयला, हे काय झाले? कुलूप तोडलं...समोर ही कोण??

दारात एक मुलगी कमरेवर हात ठेवून उभी होती!!
मुलगी साधारण प्रतीक-लौकिकच्या वयाची होती. ती रागाने प्रतीककडे बघत होती. इथे लौकिक धावत पार लांब पोहोचला!!
प्रतीकने रागात विचारले "कोण तू??"
"म्या कोण? भयताडा तू कोण हायस?" ती मुलगी चिडून म्हणाली.
'ती म्हटली भयताडा... झाला राडा' प्रतीकची बोबडी वळली. त्याने मागे बघितले. लौकिक आता थांबला होता. लांबून बघत होता, प्रतीकने हाताने त्याला परत बोलावले, पण लौकिक काही परत येईना.
"माझ्या मामाचं घर हाय. तू कोन?" उसने अवसान घेत प्रतीक म्हणाला.
"ह्ये घर मह्या आयचं हाय" त्या मुलीचा राग वाढला.
"कुलूप का होतं मग?" प्रतीकने उलट प्रश्न केला.
"रोज रातच्याला माही आय कुलूप लावून कामाला जाती.....मी घरात येकटीचं असत्ये" ती मुलगी म्हणाली.
आपण चुकीच्या घराचं कुलूप तोडलं!! प्रतीकला कळले, लौकिक लांब पळाला!! त्या मुलीचा रुद्रावतार बघून प्रतीक टरकला. त्याने लौकिकला हाक मारून परत बोलावले. लौकिक लांबून हा सगळा प्रकार बघत होता. तो परत धावत प्रतीककडे आला. त्याला सगळ्याचा अंदाज आला. ती मुलगी लौकिककडे रागाने बघू लागली. लौकिक स्वतःचा हात पुढे करत म्हणाला, "हाय, आय एम लौकिक....."
तिने लौकिककडे नुसतं बघितले. काही बोलली नाही.
"कुलूप कशाले तोडलं?" ती मुलगी रागावून ओरडली.
"च्च....कशाले नाही क...शा....ला..... '' लौकिकने तिला म्हणाला.
"कानाखाली जाळ काढू का?"
तसा लौकिक एक पाऊल मागे सरकला. त्याने प्रतीककडे बघितले. प्रतीक म्हणाला,
"माफ करा दीदी...आम्हाला वाटलं..."
प्रतीकचे बोलणे सुरू होण्याच्या आत त्या मुलीने दरवाजा लावला. दोघांनी एकमेकांकडे बघितले. दोघे माघारी निघाले. नेमके काय घडले याचा विचार करू लागले. मामाचे घर काही सापडले नाही, त्यात दुसऱ्याच्या घराचे कुलूप तोडून आलो!! नशीब, त्या पोरीने आरडाओरडा करून गाव गोळा केला नाही. लोकांनी मारून आपला 'गोळा' केला असता, तुरुंगात रवानगी झाली असती. घरी जाताना दोघे एकमेकांशी बोलले नाहीत. बस करून घरी आले.

दुसऱ्या दिवशी दोघे नेहमीच्या कट्ट्यावर बसले होते, तेवढ्यात लौकिक म्हणाला,
"त्या खोलीवर आज परत जाऊ या?"
"कशाला...येड लागलं का तुला?" प्रतीक म्हणाला.
"हो....." लौकिक लाजत म्हणाला. प्रतीकला काय कळेना, हा असे का वागतोय?
प्रतीकने विचारले, "येड लागलं? का?"
लौकिक लाजला!! गालात हसला!! कट्ट्यावरून खाली उतरला. "अब तुम ही हो....बस तुम ही हो.. जिंदगी.." असे काहीतरी गाणे गुणगुणायला लागला.
प्रतीक खाली उतरला, त्याला म्हणाला, "भावा काय होतंय?"
लौकिक मिश्कील हसला. म्हणाला, "दोस्त तुम नही समझोगे...ये दर्द...."
"ती पोरगी असली हानल ना....सगळीकडून दर्द होईल" प्रतीक रागावून म्हणाला.
"पण मला ती आवडली...आय एम इन लव्ह!"
"तुझं लव्ह तिला नाय कळणार." प्रतीक हात जोडत म्हणाला.
"तू येणार आहेस की नाही?" लौकिकने एकदम धमकी दिली. "भावासाठी एवढंपण नाही करणार?" लौकिकने प्रतीकची स्टाईल वापरली, तसा प्रतीक शांत झाला. काय करावे ते त्याला कळेना. ती मुलगी भलतीच वस्ताद होती. परत भेटायला गेलो, तर तिने नक्कीच धरून मारले असते. पण लौकिकला कसे समजवणार?
"काय म्हणून भेटायचं... कारण काय सांगायचं?" प्रतीकने प्रश्न विचारला.
डोक्यात पडेलला लौकिक विचारात पडला. लौकिकचा पडेल, रडेल चेहरा बघून प्रतीकला राहवले नाही.
"येक आयडिया हाय" प्रतीक म्हणाला, तसा लौकिकचा चेहरा खुलला. प्रतीकला खरे तर लौकिकला त्या मुलीपासून लांब ठेवायचे होते. पण लौकिक 'प्रेमात अन डोक्यात' पडला होता, त्यामुळे प्रतीकचा आवाज कमी आणि नाइलाज जास्त झाला.

प्रतीक म्हणाला, "काल तिच्या घराचं कुलूप तोडलं....तिला एक नवीन कुलूप देऊ."
"भावा.. मर्दा...जिंकलंस.."
असं म्हणत लौकिकने प्रतीकला मिठी मारली. लौकिकला आयडिया भलतीच आवडली. तो चेकाळला!! लगेच एक 'मोठे' कुलूप घेण्यात आले. सगळा पॉकेट मनी खर्च झाला. बस केली, ते परत निघाले. या सर्वात आपण एक व्हिडिओ शूट केला आहे, तो 'एडिट' करायचा आहे, हे सगळे त्यांनी 'पोस्टपोन' केले.

दुपारीच त्या मुलीच्या घराजवळ पोहोचले. लांबून बघितले, तर दार बंद होते. या दोघांना दार वाजवायचे साहस होईना. लौकिकला धाडस होईना, प्रतीकचा आळस जाईना.
"भावा, तुला आवडलीय....तू कुलूप देऊन ये....तिच्याशी बोलून घे" प्रतीक लौकिकला म्हणाला.
'तुझी आवड...पण मला नाय सवड' असा पवित्रा घेत प्रतीक मागे हटला, लौकिकने कसे तरी पाय चालवले, पुढे जाऊ लागला.
"कानाखाली जाळ काढू का?"
लौकिकला तिचे वाक्य आठवले. त्याने गालाला हात लावला. तिचे रौद्र रूप आठवले आणि तो गर्रकन मागे वळला!!
कुलूप प्रतीकच्या हातात देत तो म्हणाला.."आपण इथेच तिची वाट बघू."
ते ऐकून प्रतीक मुकाट खाली बसला. लौकिक येरझाऱ्या घालू लागला. दुपारी एक वाजता ते तिथे आले होते, रात्री आठ वाजेपर्यंत तिथेच होते. त्या घरातून एवढ्या वेळात ना कोणी आत आले, ना बाहेर गेले. दोघे कंटाळले. आणखी वाट बघण्यात अर्थ नव्हता. लौकिकचा मूड गेला, प्रतीकला फूड खायचे होते. त्याला भूक लागली होती. त्यामुळे दोघे माघारी परतले. लौकिक बसमध्ये 'सुन रहा हैं ना तू...रो रहा हू में...' गाणे म्हणू लागला, प्रतीक वैतागला.

तिसऱ्या दिवशीसुद्धा लौकिकचा हट्ट सुरू झाला. प्रतीकने मूठ घट्ट करत त्याला समजावले.
"व्हिडिओ एडिट करू, मग तुझं लव्ह सेट करू" असे म्हणून प्रतीकने लौकिकला मनवले. इंटरनेट कॅफेत जाऊन व्हिडिओ एडिट करायचे ठरले. व्हिडिओ एडिटिंगचा 'ए'सुद्धा माहीत नव्हता, त्यामुळे तो व्हिडिओ ऐटीत एडिट करायला त्यांना सात दिवस लागले, पण तरी मनासारखे एडिट होईना. लौकिकचे तर लक्चष नव्हते. तो वेगळ्याच दुनियेत होता. त्याने 'तुझी आठवण....मनात साठवण असा एक व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवला होता. लौकिकच्या प्रेमाचा काही नेम अन एम नाही, हे प्रतीकला कळले होते. एडिट करायला आता एक कॉम्प्युटर हवाच होता. प्रतीकने मामाला पुन्हा व्हॉट्स अ‍ॅप कॉल लावला आणि पत्ता विचारून घेतला. मामानेसुद्धा तोच पत्ता परत सांगितला. प्रतीक कोड्यात पडला. आयला तोच पत्ता!! तेच घर!! ते मामाचे घरच नाही, तिथे तर ती मुलगी राहते.
"काहीतरी चुकलं असेल... परत जाऊ " लौकिक म्हणाला. लौकिकला नाहीतरी तिथे जायचे होते. त्या पोरीला भेटायचे होते. तिला प्रेमात पाडायचे होते. परत बस करून दोघे त्या घराकडे गेले. त्या भागात काही लोकांना पत्ता विचारला, खातरी करून घेतली. पण मामाने त्याच घराचा पत्ता दिला होता. त्या दोघांना काही कळेना. मामा चुकीचा पत्ता का देतोय? मामा आपलाच मामा का करतोय? पण मामा असे का करेल? असा विचार करत ते दोघे परत त्याच घरपर्यंत पोहोचले आणि त्या घरासमोर उभे राहिले.

"जा, बोलून ये." प्रतीक लौकिकला म्हणाला.
"तू पण चल ना" लौकिक काकुळतीने म्हणाला. प्रतीक वैतागला, पण हा लौकिक ऐकणार नाही, हे त्याला समजले. प्रतीकने खिशातून कुलूप काढून लौकिकला दिले.
"तिलाच पत्ता विचारू" प्रतीक म्हणाला, तसा लौकिकला धीर आला. लौकिक पुढे, प्रतीक त्याच्यामागून हळूहळू जाऊ लागला. कासवाच्या गतीने ते कसेबसे घराच्या दारासमोर आले. त्या दिवशी प्रतीकने तोडलेले कुलूप अजूनही तिथेच पडले होते. प्रतीकने ते बघितले. लौकिकच्याही ते लक्षात आले, पण दोघांनी त्याकडे दुर्लक्ष केले. लौकिकने दार वाजवायला हात पुढे केला. त्याचा हात थरथर कापत होता. प्रतीकने थोडा वेळ वाट बघितली आणि मग मोठ्याने हाक मारली, "दीदीSS...."

पण काही उत्तर मिळाले नाही. प्रतीकने दोन-तीन वेळा हाका मारल्या, पण कोणी बाहेर आले नाही. लौकिकची भीड चेपली. त्याने दार वाजवले. दार वाजवल्यावर दार आत लोटले गेले. दार आतून बंद नव्हते, घर उघडेच होते. लौकिक दचकला. आता काय करावे? घरात जावे? का मागे फिरावे?
"दीदी, नवीन कुलूप द्यायला आलोय......." प्रतीक मोठ्याने म्हणाला, पण उत्तर आले नाही. काय करावे ते कळेना.
"चिठी लिहून कुलूप इथेच ठेवून....." लौकिक प्रतीकला सांगत होता. प्रतीकने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. तो विचार करू लागला. आपण जर आता माघारी गेलो, तर लौकिक परत इथे घेऊन येईल. आता काय तो सोक्षमोक्ष लावावा, असा विचार करून प्रतीक सरळ घरात घुसला!!

"ए, नको जाऊस" असे म्हणत लौकिक त्याच्या मागोमाग घरात गेला.
दुपारचे दोन वाजले होते. घरात पूर्ण अंधार होता. एकही दिवा चालू नव्हता. आत कोणीच नव्हते. कुबट वास होता, जळमटे, धूळ साचली होती. प्रतीकने हाका मारल्या, तरी कोणी "ओ" देईना. लौकिक एका हातात नवीन कुलूप, दुसऱ्या हाताने प्रतीकला पकडून चालत होता. त्या घरात फक्त दोन खोल्या होत्या - एक छोटा हॉल आणि एक किचन. घरात काही सामान नव्हते. कपडे नव्हते, काहीच नव्हते. सगळीकडे धूळ, कचरा पडला होता. अशा घरात कोण राहतेय? का राहतेय? दोघांनी घर बघितले. घरात कोणीच नव्हते. मग इथली माणसे गेली कुठे? ती मुलगी, तिची आई कुठे गेली? घर असे उघडे का ठेवले? घरात एवढा कचरा का? या दोघांना काही कळेना. प्रतीकने हॉलमध्ये बघितले. तिथे एक जुना डेस्कटॉप पडून होता. दोघांना काही कळेना, हे घर कोणाचे आहे? अशा अवस्थेत का आहे? काय गौडबंगाल आहे?

लौकिकची भीती कमी झाली. तो एका स्टूलवर बसला आणि प्रतीकला म्हणाला, "मामाला फोन लाव."
"कशाला?" प्रतीकने विचारले.
"लाव ना..' लौकिक म्हणाला.
तसा प्रतीकने फोन लावला. रिंग वाजत होती.
लौकिक म्हणाला, "मामाला विचार, आधी इथे कोण राहत होतं?"
प्रतीकने ऐकून घेतले. त्याची ट्यूब पेटली. मामाला त्याने हाच प्रश्न विचारला. मामाने साहजिकच त्याला "का?" म्हणून विचारले. प्रतीकनेसुद्धा "नाही, असंच...घरात बराच कचरा आहे" असे काहीतरी म्हणून वेळ मारून नेली. त्यानंतर मामा बोलतच होता आणि प्रतीक ऐकून घेत होता. लौकिक त्याच्याकडे बघत होता. सुमारे पाच मिनिटानंतर प्रतीकने फोन ठेवला. प्रतीकने लौकिककडे बघितले, पण तो काहीच बोलला नाही.
"चल इथून" प्रतीक लौकिकला म्हणाला.
"अरे, काय झालं?"
"तू चल" प्रतीक ओरडलाच!!
लौकिक निमूटपणे उठला. दोघे घराबाहेर आले. प्रतीकने घराला नवीन कुलूप लावले आणि काही न बोलता तो माघारी निघाला. लौकिकला काही कळेना. तो त्याला "काय झाले?" "मामा काय म्हणाला?" हे सगळे विचारत होता, पण प्रतीक काहीच बोलत नव्हता. कसलातरी विचार करत होता, शेवटी दोघे बस स्टँडवर आले.
"अरे, काय झालं? सांग ना" लौकिक म्हणाला.
प्रतीकने त्याच्याकडे बघितले. तो म्हणाला,
"भावा, मला वचन दे, तू कधी परत या खोलीत जाणार नाहीस."
"अरे, पण का?"
"नाय, तू आधी वचन दे!" प्रतीक लौकिकचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवत म्हणाला.
लौकिकला वचन देणे भाग होते. त्याने "हो" म्हणून मान डोलावली.

प्रतीक सांगू लागला,
"मामाने त्या घरात एक भाडेकरू ठेवले होते. एक मुलगी, तिची आई अशा दोघीच राहत होत्या. आई हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून कामाला होती. तिला रोज रात्री हॉस्पिटलला शिफ्ट असायची. ती रोज रात्री घराला कुलूप लावून कामावर जायची. त्या खोलीत तिची मुलगी रात्री एकटी राहायची, एकटीच झोपायची. एकदा ती मुलगी तापाने फणफणली. सात दिवस झाले, तरी ताप उतरला नाही. पण नंतर ताप उतरू लागला. त्या मुलीला बरं वाटू लागलं. मुलीला बरं वाटतंय म्हणून तिची आई परत कामावर गेली. परत कुलूप लावलं. ती मुलगी आत नेहमीसारखी एकटीच झोपली होती, सकाळी आई परत आली, तिने दार उघडलं......"
एवढे बोलून प्रतीक थांबला, काही बोलला नाही. त्याने नजर आकाशाकडे फिरवली. लौकिक जे समजायचे ते समजला. तो दचकला. त्याने आवंढा गिळला. तो पुढे काहीच बोलला नाही.

नंतर सुमारे अर्धा तास कोणीच काही बोलले नाही, प्रतीकने आकाशाकडे बघत देवाचे आभार मानले.
तो लौकिकला म्हणाला..."वाचलो"
हे ऐकून लौकिकने मान डोलावली. जे काही घडले, ते अगम्य होते. हे सगळे पचवायला, रिचवायला त्यांना बराच वेळ जाणार होता.
"पण मग..." एवढं बोलून लौकिक थांबला, त्याला काय बोलावे ते कळेना.
तो परत म्हणाला, "पण मग ती कुठे गेली? आज का नाही दिसली?"
प्रतीकने खांदे उडवले. त्याच्याकडे उत्तर नव्हते. पण त्याला काहीतरी आठवले. तो बोलू लागला,
"माझा आजोबा जेव्हा गेला ना, तेव्हा आई म्हणायची, तो गेला तरी इथेच आहे असं वाटायचं. पप्पांना पण तो दिसायचा. काही दिवस असं वाटलं, की तो इथंच हाय, पण नंतर तो गेला, तो परत आलाच नाय."

लौकिकने सगळे ऐकून घेतले. तो काही म्हणाला नाही. थोड्या वेळाने तो म्हणाला,
"आपण दार उघडलं, म्हणून ती निघून गेली....."
प्रतीकने त्याच्याकडे बघितले, भुवया उंचावल्या.
"म्हणजे आपण दार उघडलं, तिला मुक्ती मिळाली?" लौकिक आकाशाकडे बघत म्हणाला.
"बहुतेक" प्रतीक म्हणाला.
बस आली. दोघे बसमध्ये चढले, बसले. मामाला आणि कोणालाच काही सांगायचे नाही, असे दोघांचे ठरले.
"सॉरी भावा" लौकिक म्हणाला.
"सॉरी का?"
"तू बरोबर म्हणत होतास, त्या मुलीच्या नादी नको लागू म्हणून. पण तरी मीच तुला इथे रोज..." लौकिक म्हणाला.
"बस्स का भावा...तू सॉरी म्हणून मस्करी करतोय" प्रतीक त्याला गुद्दा मारत म्हणाला.

लौकिक आणि प्रतीकने कसातरी व्हिडिओ एडिट केला आणि यू ट्यूबवर अपलोड केला. त्याला सुमारे सहाशे सदोतीस व्ह्यूज मिळाले. लौकिक निराश झाला, पण प्रतीकने त्याला समजावले. या सगळ्या प्रकारात पहिल्याच व्हिडिओचा फज्जा उडाला, पण असे काम करताना मज्जा येते, हे त्यांना कळले. यू ट्यूब व्हिडिओज काढण्याचे काम त्यांनी चालूच ठेवले.

प्रतीकला दुसऱ्या व्हिडिओसाठी 'जब्राट अन भन्नाट' आयडिया मिळाली - आता ते लोकांना त्यांच्या भुतांच्या अनुभवाबद्दल विचारणार आहेत.

*समाप्त*

-चैतन्य रासकर
chaitanyaras@gmail.com

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Oct 2017 - 12:38 pm | अमरेंद्र बाहुबली

ही पण जबराट!

पद्मावति's picture

22 Oct 2017 - 2:58 pm | पद्मावति

:) मस्तंच!

एस's picture

22 Oct 2017 - 3:06 pm | एस

भारीये. :-)

अभ्या..'s picture

22 Oct 2017 - 3:18 pm | अभ्या..

हायला, नवीन पिढीचे लिखाण. मस्त आणि परफेक्ट जमलेय.
अशा उत्साही कार्यकर्त्यांनी तर युट्युबाला रौनक आणलीय.
कंटेंटच्या नावाने टोटल बोंब पण शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीच्या आयकॉनवर क्लिक करा आणि आम्हाला प्रसिध्द करा.

विशाल वाघोले's picture

24 Oct 2017 - 12:11 am | विशाल वाघोले

अप्रतिम कथा.
वाचताना क्षणभर कोकणात जाऊन आल्यासारखे वाटले.

विशाल वाघोले's picture

24 Oct 2017 - 12:11 am | विशाल वाघोले

अप्रतिम कथा.
वाचताना क्षणभर कोकणात जाऊन आल्यासारखे वाटले.

बाकी नवीन म्हणी जबरदस्त....

जव्हेरगंज's picture

26 Oct 2017 - 10:04 pm | जव्हेरगंज

भारी कथा!!

फारच भारी.. मजा आली वाचायला..
विशेष म्हणजे दोन्ही कथा अगदीच वेगवेगळ्या आणि दोन्हीमधली शैलीपण वेगळी आहे तरी दोन्हीही जबरदस्त!

पैसा's picture

28 Oct 2017 - 6:46 pm | पैसा

मस्त कथा!

बबन ताम्बे's picture

28 Oct 2017 - 11:06 pm | बबन ताम्बे

आवडली .

चॅट्सवूड's picture

30 Oct 2017 - 5:21 pm | चॅट्सवूड

सगळ्यांना धन्यवाद : )