हेईनरिश हारर : पराक्रमाची आश्चर्यकारक गाथा

मार्गी's picture
मार्गी in दिवाळी अंक
21 Oct 2017 - 12:00 am

.
एखाद्या माणसामध्ये जिद्द असेल, हिंमत असेल, तळमळ असेल तर नियती त्याला कुठून कुठे नेते, ह्याचे अतिशय तेजस्वी उदाहरण म्हणजे हेईनरिश हारर! स्वामी विवेकानंदांनी निर्भयता हा गुण धार्मिकतेचा मुख्य सद्गुण सांगितला गेला आहे. कशालाही आणि मृत्यूलाही न घाबरणारा माणूसच खर्‍या अर्थाने धार्मिक असतो. आणि जेव्हा एखादा माणूस असा असतो, तेव्हा नियतीसुद्धा त्याला जीवनाच्या रंगमंचावर अतिशय अद्वितीय अशी भूमिका बहाल करते!


हेईनरिश हारर यांचा फोटो जालावरून साभार

अतिशय अस्थिर व नाट्यमय अशा विसाव्या शतकाच्या सुरुवातीला १९१२मध्ये युरोपात ऑस्ट्रिया देशात हाररचा जन्म झाला. त्याचे वडील टपाल खात्यामध्ये होते. अशा सामान्य परिस्थितीतून हाररने शब्दश: जीवनातील शिखराकडे जाणारा मार्ग शोधून काढला आणि शरीर थकेपर्यंत व वयाची सत्तरी ओलांडेपर्यंत पराक्रमाची व कर्तृत्वाची अनेक शिखरे पादाक्रांत केली. आणि हे करताना त्याने तितकीच आध्यात्मिक साधनाही केली. अशा ह्या विलक्षण अवलियाच्या जीवनाची सुरुवात ग्राझ ह्या ऑस्ट्रियन गावातून झाली. योगायोग म्हणजे ग्राझ ह्या गावीच कुप्रसिद्ध नरपशू हिटलरसुद्धा वाढला होता. त्याच ग्राझ गावच्या हाररमध्ये पाश्चात्त्य पराक्रम व पौर्वात्य अध्यात्म ह्यांचा दुर्मीळ संगम घडून आला.

लहानपणापासून भूगोलाची आवड असलेल्या हाररने तेविसाव्या वर्षी, म्हणजे १९३५मध्ये गिर्यारोहणामध्ये कारकिर्द घडवण्यास सुरुवात केली. लवकरच त्याने आल्प्स पर्वतरांगेतले एक कठीण शिखर पादाक्रांत केले. तेव्हा ऑस्ट्रियावर नाझी जर्मनीचा ताबा झालेला असल्यामुळे हिटरलरच्या हस्ते त्याचा सन्मान करण्यात आला. युरोपावर आणि जगावरच युद्धाची छाया असलेले ते दिवस होते. पुढे ऑगस्ट १९३९मध्ये भारताच्या तत्कालीन वायव्य सरहद्द प्रांतातील (आजचा पाकव्याप्त कश्मीर) नंगा पर्वतामध्ये एक गिर्यारोहण मोहीम करण्यासाठी काही गिर्यारोहकांसोबत हारर भारतात आला. त्यांनी नंगा पर्वतावर चढाई केली व मोहीम पूर्ण केली. इथेसुद्धा हारर हिमकड्यामध्ये कोसळता कोसळता बचावला. ऑगस्टच्या शेवटी हारर सहकार्‍यांसोबत ऑस्ट्रियाला जाणार्‍या जहाजाची प्रतीक्षा करत कराची बंदरामध्ये थांबला होता. बराच काळ प्रतीक्षा करून त्यांनी इराणमार्गे ऑस्ट्रियाला जायचा निर्णय घेतला. आणि नियतीच्या नाट्याची सुरुवात झाली. सिंध प्रांतातून प्रवास करत असताना ब्रिटिश पोलिसांनी ह्या गिर्यारोहकांना ताब्यात घेतले. कारण तोपर्यंत युद्धाची नांदी झालेली होती व ऑस्ट्रियन गिर्यारोहक ब्रिटिशांच्या शत्रू देशाचे नागरिक ठरले होते. सुरुवातीला स्थानबद्धता आणि नंतर ब्रिटिश तुरुंगवास! ब्रिटिश भारतातील एका तुरुंगातून दुसर्‍या तुरुंगात ह्यांची रवानगी सुरू झाली. परंतु हाररने ऑस्ट्रियाला जावे हे नियतीला जसे मान्य नव्हते, तसे तो ब्रिटिशांच्या तुरुंगात खितपत पडावा, हेही‌ मान्य नव्हते.

हाररने व त्याच्या सहकार्‍यांनी ब्रिटिशांच्या तुरुंगवासातून पळून जाण्याचे प्रयत्न सुरू केले. अनेकदा ते पळून गेले आणि पकडलेसुद्धा गेले. त्यामध्येच तीन वर्षे गेली. ह्या काळात हाररने जुजबी हिंदी भाषा शिकून घेतली. उत्तर भारतातले काही रितीरिवाज शिकून घेतले. बाहेर युद्धाचा डाव सगळीकडे पसरला होता. जर्मनीचे मित्रराष्ट्र असलेल्या जपानच्या ताब्यात तेव्हापर्यंत ब्रह्मदेश आणि चीन हे देश होते. त्यामुळे त्या दोन दिशांनी जाण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू ठेवला. अखेरीस बर्‍याच मेहनतीने व बुद्धिचातुर्याने ब्रिटिशांची पोलादी पकड भेदून भारतीय मजुराच्या वेषात हारर व त्याच्या गिर्यारोहक मित्रांनी हृषीकेशजवळील ब्रिटिश कँटोनमेंटमधून पळ काढला. काही जण कलकत्तामार्गे ब्रह्मदेशला जाण्यासाठी दक्षिणेकडे निघाले, तर काही जण तिबेटमार्गे चीनला जाण्यासाठी निघाले. हारर व अन्य दोन जण तिबेटला जाण्यासाठी निघाले!

तिबेटच्या सुवर्णकाळाचा साक्षीदार

एप्रिल १९४४मध्ये हारर व तिबेटी भाषा येणारा अन्य एक साथीदार असे दोघे तिबेटकडे निघाले. तिबेट तटस्थ देश असल्यामुळे आश्रय देईल, असा त्यांना विश्वास वाटत होता. अखेरीस मे १९४४मध्ये एका साथीदारासोबत हाररने सुमारे सहा हजार मीटर उंचीचा खडतर आडवाटेचा घाट पार करून तिबेटी भूमीवर पाय ठेवला! मुरलेला ट्रेकर असल्यामुळेच त्याला हे कसेबसे शक्य झाले. त्या काळातला तिबेट जगापासून अतिशय विलग असल्यामुळे त्यांना कोणीच थारा दिला नाही. पण तरीही मजल दरमजल करत, आणि सोबत असलेले एक तिबेटी चिन्ह लोकांना दाखवत तिबेटी भाषा येणार्‍या साथीदाराबरोबर तो पुढे जात राहिला. त्याचे काही साथीदार प्रतिकूल वातावरणामुळे परत माघारी परतले. एक साथीदार नेपाळमध्ये परतला. हारर अखेरीस दीड वर्षांनी - म्हणजे जानेवारी १९४६मध्ये ल्हासाला पोहोचला.

सुरुवातीला अर्थातच सर्वांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. काही जणांनी त्याची कुचेष्टा केली. विलग असलेल्या कोणत्याही समाजामध्ये इतर समाजांविषयी अज्ञान असते व त्यामुळे गैरसमजही असतात. तिबेटने फारच थोडे पाश्चात्त्य लोक बघितले होते. त्यामुळे पाश्चात्त्य लोक अतिशय स्वार्थी आहेत, ऐहिक आहेत, अशा त्यांच्या धारणा होत्या. शिवाय आपण कोणीतरी श्रेष्ठ आहोत आणि हे कोण कुठले दूरचे लोक, अशीही एक अहंमन्य भावना होती, जी आपण आपल्यामध्येही बघू शकतो - आपणही अमेरिकन लोकांना ऐहिक, स्वार्थी समजतो. पण हाररने सर्व स्थितीमध्ये टिकाव धरला. तिबेटमधल्या जाणत्या लामांनी निश्चितपणे त्याच्यावर नियतीने सुपुर्द केलेले कार्य ओळखले असणार. तिबेटी लामांना पूर्वीपासूनच भविष्यात येणार्‍या चिनी परचक्राची जाणीव होती व त्या दिशेने त्यांनी तयारीही सुरू केलेली होती. अशा वेळेस अशा युरोपियन व्यक्तीचे आगमन होणे, हासुद्धा ह्या तयारीचा भागच ठरला. कालांतराने त्याने मग तिथे फोटोग्राफर म्हणून काम सुरू केले. वंदनीय दलाई लामा तेव्हा वयाने लहान होते. पाश्चात्त्य जग, भूगोल, प्रवास, इंग्लिश असे विषय हाररने त्यांना शिकवले. तो त्यांचा शिक्षक बनला. पाश्चात्त्य व आधुनिक जगाचा परिचय त्यानेच त्यांना करून दिला. त्यांच्या शिकण्याच्या तयारीमुळे तोही प्रभावित झाला. तिबेटमध्ये आल्यापासून सात वर्षे, म्हणजे १९५१पर्यंत तो तिबेटमध्ये राहिला. पूर्वीचा शांत तिबेट आणि चिनी आक्रमणानंतरचा तिबेटही त्याने बघितला. अखेरीस अनिश्चित राजकीय स्थितीमुळे त्याला तिबेट सोडावा लागला. परंतु तोपर्यंत ह्या पराक्रमी पुरुषाला वंदनीय दलाई लामांचा सत्संग काही काळ मिळाला. तिबेटी जीवनपद्धतीशी परिचय झाला आणि तिबेटला विसाव्या शतकातील जगामध्ये येण्यासाठी मदत करण्याचे महान कार्यही त्याच्या हातून घडले. तिबेटी समाज तोपर्यंत अतिशय स्वमग्न होता. तिबेटमधले पाश्चात्त्य जगताबद्दलचे अज्ञान, गैरसमज, आत्मप्रौढी अशा विविध मुद्द्यांसंदर्भात हाररने पाश्चात्त्य जगताचा करून दिलेला परिचय व तिबेटी संस्कृती अंगीकारण्यामध्ये हाररला आलेले यश ही गोष्ट अतिशय मोलाची ठरली. विशेष म्हणजे हाररने तिबेटला आधुनिक जगाशी नाते जोडण्यासाठी मदत केली. 'तिबेट हे जगाचे छप्पर, म्हणून आम्ही तिबेटी इतरांपेक्षा श्रेष्ठ' अशी जी भावना होती, त्यामध्ये हाररने बदल घडवला. बाहेरून संस्कृतीचे, वातावरणाचे, पार्श्वभूमीचे असंख्य बदल असले, तरी आतमध्ये खोलवर माणूस म्हणून सर्व मानवजात समान आहे, हे त्याने त्यांना दाखवून दिले. त्या अर्थाने कोणीही उच्च नाहीत, कोणीही नीच नाहीत ही सुधारणा तिबेटमधल्या धर्मगुरूंच्या मानसिकतेमध्ये घडवून आणली.

१९३९नंतर तब्बल १३ वर्षांनी, म्हणजे १९५२मध्ये तो स्वदेशी - ऑस्ट्रियाला परतला. तोपर्यंत युद्धानंतरचे जगही‌ बदलले होते आणि हाररही बदलला होता! १९५२मध्येच त्याने 'सेव्हन इयर्स इन तिबेट' हे आपले पुस्तक प्रसिद्ध केले, ज्याचा लवकरच त्रेपन्न भाषांमध्ये अनुवाद झाला. ह्या पुस्तकामध्ये हाररने नंगा पर्वतावरील मोहिमेपासून वंदनीय दलाई लामांना भेटेपर्यंतच्या सर्व प्रवासाचे सुंदर वर्णन दिले आहे. तत्कालीन तिबेटी समाजाच्या तपशीलवार वर्णनासह त्यामध्ये पश्चिम तिबेटमधून ल्हासापर्यंत प्रवास करतानाच्या प्रवासाचे वर्णन रौद्र आहे. भारतातील पहाड ओलांडून प्रतिकूल परिस्थितीमध्ये तिबेटमध्ये केलेला प्रवेश, अन्नपूर्णासारख्या विविध हिमशिखरांचे घडलेले दर्शन आणि कैलास पर्वताची परिक्रमा ह्याविषयी त्याने अतिशय जिवंत वर्णन केले आहे. स्थानिक पौर्वात्य व्यक्तींपेक्षा हा पाश्चात्त्य पौर्वात्य जीवनामध्ये खोलवर गेला होता. पौर्वात्य जीवनपद्धतीचा त्याने आदर केला आणि काळानुरूप त्यामध्ये नवीन जोड देण्याची भूमिकाही पार पाडली.

पुढे तो परत ऑस्ट्रियाला गेला; त्याने नंतर गिर्यारोहणही केले. गिर्यारोहणाच्या क्षेत्रामध्ये अनेक खंडांमधील अवघड अशी अनेक शिखरे पादाक्रांत केली. अगदी वयाची पन्नाशी ओलांडली, तरी तो मोहिमांचे नेतृत्व करत राहिला. पर्वतांशी असलेले त्याचे नाते शेवटपर्यंत टिकून राहिले. भारतातील हिमालयामध्येही त्याने उत्तरायुष्यात भटकंती केली. त्यावर त्याने 'लदाख : मॉर्टल्स अँड गॉड्स बिहाइंड हिमालयाज' हे पुस्तकही लिहिले. भूतानमध्येही त्याने भ्रमंती केली. त्याने आयुष्यात जे विलक्षण अनुभव घेतले, ते वीसपेक्षा जास्त पुस्तकांद्वारे आणि कित्येक डॉक्युमेंटरीजद्वारे त्याने जगासमोर ठेवले. अर्थातच हे साहित्य प्रचंड लोकप्रिय झाले आणि भाषेच्या व देशाच्या सीमा ओलांडून जगभर पसरले. त्या अर्थाने लेखक आणि अभ्यासक म्हणूनही त्याचे कर्तृत्व 'उत्तुंग' आहे.

असे असले, तरीही तिबेट हा नेहमीच त्याच्या जिव्हाळ्याचा विषय राहिला. 'सेव्हन इअर्स इन तिबेट' हे त्याचे पुस्तक अतिशय प्रसिद्ध झाले. त्याने नंतर तिबेटचे स्वातंत्र्य व तिबेटी‌ जनतेचा प्रश्न 'असंवेदनशील' जगाला कळावा, म्हणूनही अनेक पुस्तके लिहिली. ऑस्ट्रियामधील त्याचा स्टुडिओ त्याने तिबेटला समर्पित केला. अनेक दशकानंतर १९८०मध्ये तो पुन: तिबेटला जाऊन आला. वंदनीय दलाई लामांसोबत त्याची मैत्री घट्ट राहिली. २००७मध्ये त्याचे निधन झाले. पण तिबेटच्या इतिहासामध्ये आणि वंदनीय दलाई लामांच्या जडणघडणीमध्ये त्याची भूमिका नेहमीच स्मरणात राहील. कालांतराने हेईनरिश हाररचे चरित्र 'सेव्हन इयर्स इन तिबेट' नावाच्या दोन चित्रपटांमधून पडद्यावर आले. असे चरित्र नेहमी आपल्याला एक प्रेरणा आणि दिशा देण्याचे काम करते. कारण ज्यामध्ये हिंमत आहे, धैर्य आहे, सामर्थ्य आहे, त्याला जीवन अतिशय वेगळी भूमिका देते, हे अशा माणसांकडून दिसते. प्रत्येकामध्ये हे असामान्यत्व असते. परंतु हे असमान्यत्व बाहेर आणण्यासाठी एखादा वाटाड्या लागतो, एखादा प्रेरणास्रोत लागतो. हाररसारखी माणसे येणार्‍या पिढ्यांना जीवन खोलवर जाऊन जगण्याची प्रेरणा देतात.

प्रतिक्रिया

राघवेंद्र's picture

21 Oct 2017 - 12:15 am | राघवेंद्र

मार्गी भाऊ, नवीनच ओळख करून दिली.

खूप धन्यवाद !!!

सेव्हन इयर्स इन तिबेट या पुस्तकावरचा सिनेमा पाहिला आहे. तुमच्या लेखातून हारर या अवलिया माणसाची अजून ओळख झाली. हा लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद!

पद्मावति's picture

21 Oct 2017 - 3:07 pm | पद्मावति

अतिशय उत्तम लेख.

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Oct 2017 - 6:14 pm | अमरेंद्र बाहुबली

उत्तम माहिती

हेम's picture

21 Oct 2017 - 7:10 pm | हेम

हारेरचे लदाख वरचे पुस्तक पाहूनच तिकडे भेट द्यायची खुमखुमी लागली होती. त्यामुळेच १९९८ मध्ये तिकडची वारी झाली. अप्रतिम फोटोग्राफ्स आहेत त्या पुस्तकात.

आयगर या स्विट्झर्लंडमधील शिखराची जगप्रसिद्ध Nordwand पादाक्रांत करणार्‍या हाररची सुंदर ओळख करून दिल्याबद्दल आभार! बर्‍याच वर्षांपूर्वी Seven Years in Tibet वाचलं तेव्हा हाररविषयी काहीच माहिती नव्हती. त्यामुळे त्या पुस्तकाचा खूप प्रभाव पडला होता.

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Oct 2017 - 9:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

अनवट माणसाच्या अनवट कामगितीची उत्तम तोंडओळख !

रेवती's picture

22 Oct 2017 - 5:12 am | रेवती

लेखन आवडले.

प्रमोद देर्देकर's picture

22 Oct 2017 - 8:47 pm | प्रमोद देर्देकर

मस्त लेखन. आवडले आता हे पुस्तक वाचणार.
मराठीत भाषांतर झाले आहे काय ?

मार्गी's picture

23 Oct 2017 - 1:08 pm | मार्गी

भाषांतर बहुतेक झालं नाहीय.

पैसा's picture

22 Oct 2017 - 8:51 pm | पैसा

जबरदस्त!

हेईनरिश हारर या अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची ओळख करुन देणारा हा लेख खूप भावला. सेव्हन इयर्स इन तिबेट हे पुस्तक वाचण्याची इच्छा निर्माण झाली आहे. या लेखनासाठी मनापासून आभार मानतो.

मार्गी's picture

23 Oct 2017 - 1:05 pm | मार्गी

सर्वप्रथम संपादक मंडळास खूप धन्यवाद, हा लेख घेतल्याबद्दल!

वाचल्याबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद!!

जाणकारांच्या प्रतिक्रियांमधून मलाही हाररबद्दल आणखी माहिती मिळाली, खूप छान वाटतंय! एक उत्तुंग व्यक्तिमत्व आपण अनेकांनी अनेक बाजूंनी बघितलेलं आहे तर!

हारर ह्यांच्यासंदर्भातला अजून एक गमतीचा किस्सा असा. आपल्यापैकी काही जणांनी संभाजी भोसले ह्या साधकांविषयी वाचलं असेल. हा माणूसही अतिशय अवलिया आहे. महात्मा गांधी, नेहरू अशा लोकांना त्यांनी मसाज केलेला आहे. त्याशिवाय स्वातंत्र्यसैनिक आहेत. आणखी म्हणजे नाझी जर्मनीत जाऊन नाझींना चूक झाली, हे कबूल करायला लावण्याचा दुर्मिळ पराक्रम त्यांनी केला होता! तर जेव्हा ब्रिटिशांच्या विरोधात सशस्त्र संघर्ष ते करत होते, तेव्हा तुरुंगवास टाळण्यासाठी ते भूमिगत झाले होते. साधूच्या वेषात ते हिमालयात गेले. तिथे ते लपून छपून राहात असताना एकदा त्यांना असं वाटलं की, एक पोलिस त्यांच्या मागावर आहे. त्यांची झटापट झाली. भोसलेंनी त्याला लोळवलं. तेव्हा अचानक तो पोलिस ओरडला आई गं आणि ते जर्मन भाषेत होतं!! भोसलेंना जर्मन येत होती आणि तो माणूस हारर होता! तेव्हा भोसलेंना कळालं की, तो पोलिस नाहीय तर जर्मन माणूस आहे. मग त्यांनी त्याला पुढे पळून जाण्यासाठी मदत केली. हारर ब्रिटिश तुरुंगातून निसटल्यानंतर तिबेटला जाताना भोसलेंना भेटला होता! हे संभाजी भोसलेंवरील एका पुस्तकात वाचलं होत (बहुतेक तुझिया कृपे, नीट आठवत नाही). हाररची ओळख झाली तेव्हा कळालं की, तोच हा!

सेव्हन यीअर्स इन तिबेट हा सिनेमाही खूप जोरदार आहे!

सर्वांना धन्यवाद.

mayu4u's picture

23 Oct 2017 - 5:21 pm | mayu4u

लेख सुद्धा छान!

सर्वांना नमस्कार.

माझ्या नीट लक्षात नव्हतं, माझ्याकडून मोठी चूक झाली. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो व दुरुस्ती करतो. वर बोललो ते महान साधक संभाजी भोसले नव्हे राम भोसले. आणि त्यांच्यावरचं पुस्तक ते 'दिव्यस्पर्शी', लेखक धनंजय देशपांडे, प्रसाद प्रकाशन.

राम भोसलेंची/ ग्रूपची स्वत:ची वेबसाईट आहे; जिथे त्यांचं इंग्रजीतलं संक्षिप्त जीवन चरित्र, एका अमेरिकन क्लाएंटला मसाल केल्यानंतर मिळालेलं हॉनररी अमेरिकन नागरिकत्व, पंडीत नेहरूंनी १७ वर्षं मसाज केल्याबद्दल त्यांना लिहिलेलं पत्र, त्यांचं कार्य व साधना इ. विषयी सविस्तर माहिती आहे- http://www.samvahan.com/founder-frameset.htm हे सर्व फार फार थरारक आहे, इतकंच इथे म्हणेन!!

त्यांच्या वेबसाईटवरील सुविचार- "Knowledge is irritating. It's just talk, talk, talk. Wisdom is always humble." - Dr. R. K. Bhosale.

जुइ's picture

24 Oct 2017 - 1:56 am | जुइ

अतिशय प्रेरणादायी आणि अवलिया अश्या हारर यांची ओळख करून देणारा लेख आवडला! Seven Years in Tibet हे पुस्तक वाचायची इच्छा निर्माण झाली आहे. वर सांगितलेला किस्सा भारी आहे =)) .

अभिजीत अवलिया's picture

25 Oct 2017 - 7:09 pm | अभिजीत अवलिया

लेख आवडला. लवकरात लवकर पुस्तकाचे मराठीत भाषांतर यावे.

मारवा's picture

27 Oct 2017 - 8:39 pm | मारवा

लेख आवडला.

सेवन ईयर्स इन टिबेट बघताना हारर आणि दलाई लामाच्या निरोपाच्या प्रसंगी डोळ्यांत पाणी तरळल्याशिवाय रहात नाही, सिनेमातली ती फ्रेम कायम लक्षात राहील, लेख उत्तमच लिहिलाय

गामा पैलवान's picture

29 Oct 2017 - 2:42 pm | गामा पैलवान

मार्गी,

हेईनरिश हाररची करून दिलेली ओळख आवडली. माणूस मनस्वी दिसतोय.

मोजमापे, युनिट आणि दुर्घटना या लेखास प्रतिसाद लिहिण्यासाठी जालावरून अल इटालिया ७७१ विमानाच्या अपघातासंबंधी माहिती गोळा करंत होतो. हा अपघात माळशेज घाटाजवळ दवंड्याच्या डोंगरावर झाला. विमान बँकॉकहून मुंबईस येत होतं. हा प्रवास सिडनी ते रोम या प्रवासाची एक मजल होती.

जालावर एक लेख सापडला. त्यात लिहिलंय की हारर याच अपघातग्रस्त विमानातून प्रवास करीत होता. पण तो बँकॉकला अनपेक्षितपणे उतरला. जर ठरल्याप्रमाणे तसाच पुढे आला असता तर .... ?! दवंड्याच्या डोंगरावर एक पट्टीचा गिर्यारोहक चिरविश्रांती घेत पडला असता. पण नियतीला दुसरेच कोणीतरी तिथे हवे होते.

असो.

आ.न.,
-गा.पै.

मार्गी's picture

29 Oct 2017 - 6:33 pm | मार्गी

हा सुद्धा जबरदस्त योगायोग किंवा अ- योगायोग! म्हणतात ना, कोणताही योगायोग हा योगायोग नसतो, तर सिस्टीमॅटिक घटनाक्रम असतो, तसं!

इतकी महत्त्वाची माहिती आवर्जून इथे दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!!!

अभिनाम२३१२'s picture

3 Nov 2017 - 7:45 pm | अभिनाम२३१२

अप्रतिम......हा चित्रपट मी नक्की बघणार.......