La Ruta del Cares

निशाचर's picture
निशाचर in दिवाळी अंक
20 Oct 2017 - 12:00 am

अटलांटिक महासागराला पायाशी घेऊन उभा असणारा उत्तर स्पेन! लाखो वर्षांपूर्वी नष्ट झालेल्या डायनोसॉरच्या खर्‍याखुर्‍या पाऊलखुणा इथे पाहायला मिळतात, तशीच पस्तीस ते चाळीस हजार वर्षांपूर्वी मानवाने रंगवलेली गुफाचित्रंही. पण सोळाव्या शतकात अमेरिका खंडाहून युरोपला परतणार्‍या खलाश्यांसाठी या भागाचं वेगळंच महत्त्व होतं. जिवावर उदार होऊन केलेल्या सागरसफरीनंतर युरोपच्या भूमीचं प्रथमदर्शन त्यांना होत असे उत्तर स्पेनच्या एका पर्वतरांगेमुळे. तेव्हापासून Los Picos de Europa अर्थात युरोपची शिखरे असं नाव मिळालेली ही पर्वतरांग किनारपट्टीला साधारण समांतर आहे. सागराकडे पाठ करावी, तर एखाद्या अभेद्य तटासारखे हे पर्वत उभे ठाकलेले दिसतात.

.

स्पेनच्या अस्तुरियाज, कांताब्रिया आणि लिऑन प्रांतांमध्ये पसरलेले हे पर्वत कांताब्रियन पर्वतराजीचा एक भाग आहेत. याच कांताब्रियन पर्वतांमुळे उत्तर भागात उर्वरित स्पेनच नव्हे, तर बहुतांश युरोपपेक्षा जास्त पर्जनमान्य आहे. उन्हाळ्यात बाकीचा देश भाजून निघत असताना इथे मात्र २० ते २५°C तापमान असतं. इथल्या वैशिष्ट्यपूर्ण हवामानामुळे आणि जीववैविध्यामुळे हा भाग España Verde (हरित स्पेन) म्हणून ओळखला जातो.

कांताब्रियन पर्वत, विशेषतः पिकोज हे स्पेनच्या इतिहासाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे आहेत. आफ्रिकेहून आलेल्या मुसलमान मूर आक्रमकांनी आठव्या शतकात स्पेन आणि पोर्तुगालवर ताबा मिळविला. फक्त उत्तरेचा काही पर्वतीय भाग त्यांना जिंकता आला नाही. राजकीय आणि धार्मिक आक्रमणात या पर्वतांनी लोकांना आसरा दिला. तिथे राहणारे लोक धर्मांतरापासून वाचले, म्हणून ते शुद्ध आहेत असा विचार प्रचलित आहे. म्हणूनच स्पेनच्या युवराजाला वा युवराज्ञीला Príncipe / Princesa de Asturias (Prince / Princess of Asturias) म्हणतात असे वाचले होते. पण या नावामागे स्पेनच्या Reconquistaचा (पुनर्विजयाचा) इतिहास आहे. मूर शासकांकडून ख्रिश्चनांनी स्पेन पुन्हा जिंकून घ्यायला सुरुवात झाली पिकोजमध्ये असलेल्या कोवाडोंगा येथील लढाईपासून. या Battle of Covadonga म्हणून प्रसिद्ध लढाईत लहानश्या ख्रिश्चन सेनेचा नेता होता सरदार पेलायो. त्याने जिंकलेल्या भूभागातून पुढे अस्तुरियाज हे राज्य स्थापन केलं आणि कांगास (Cangas de Onís) या गावातून राज्यकारभार पाहिला. एका आख्यायिकेनुसार कोवाडोंगा येथील एका गुहेत लपवून ठेवलेल्या व्हर्जिन मेरीच्या मूर्तीसमोर पेलायोने प्रार्थना केली, तिच्या आशीर्वादाने पेलायोने मूर सैन्याचा पराभव केला. पेलायोच्या घराण्याचा इतिहास, मेरीचा आशीर्वाद, लढाईसाठी डोंगराळ भागाचा वापर अशा अनेक गोष्टींमुळे शिवाजी महाराजांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

त्या गुहेत नंतरच्या राजांनी Our Lady of Covadongaचं देऊळ बांधलं. गुहेच्या समोर असलेल्या टेकडीवर एक बॅसिलिकाही आहे. कोवाडोंगा हे अस्तुरियन लोकांसाठी आजही पवित्र क्षेत्र आहे.

.

.

डॉन पेलायोच्या लढ्याला पार्श्वभूमी म्हणून लाभलेल्या पिकोज पर्वतराजीत स्पेनचं पहिलं नॅशनल पार्क १९१८ साली निर्माण करण्यात आलं. नव्वदच्या दशकात त्याचा विस्तार करून Picos de Europa National Park हे नाव देण्यात आलं. आता हे पार्क युनेस्कोच्या Biosphere Reserve मध्ये येतं. मध्य, पूर्व आणि पश्चिम असे तीन massifs असलेले पिकोज गिर्यारोहणासाठी आणि प्रस्तरारोहणासाठी उत्तम आहेत. परंतु दुर्गमता, माहितीचा आणि सार्वजनिक वाहतुकीचा अभाव, पाऊस या कारणांमुळे काही त्यातल्या त्यात प्रसिद्ध ठिकाणं सोडल्यास इकडे पर्यटकांचा ओघ कमी आहे. अशा प्रसिद्ध जागांपैकी एक आहे La Ruta del Cares.
डोंगरांत पडणार्‍या पावसाचं आणि बर्फाचं पाणी जवळच असलेल्या सागराकडे नेणार्‍या इथल्या उत्तरवाहिनी नद्यांमध्ये देवा (Deva) ही एक महत्त्वाची नदी. एका ब्रिजवरून गाडीने ही नदी पार करताना नावाची पाटी वाचल्यावर ही नदी एकदम आपली वाटली होती. देवाची उपनदी असलेली कारेस (Cares) नदी पिकोजच्या मध्य आणि पश्चिम massifsच्या मध्ये असलेल्या घळीतून वाहते. सुमारे शंभर वर्षांपूर्वी तिच्यावर जलविद्युत प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पाच्या देखभालीसाठी कारेसच्या घळीत एक पायवाट खोदण्यात आली. ती वाट म्हणजेच La Ruta del Cares (Cares Trail) आता पिकोज नॅशनल पार्कचं आकर्षण ठरली आहे. इथे भटकायला जसे गिर्यारोहक येतात, तसेच हौशी पर्यटकही येतात. मूळचा सुमारे २१ कि.मी.चा मार्ग लिऑन प्रांतातील पोसाडा (Posada de Valdeón) या गावापासून सुरू होऊन काइन (Caín) ला येऊन अस्तुरियास प्रांतातील पोंसेबोस (Poncebos) ला पोहोचतो. त्याचा काइन ते पोंसेबोस हा १३ कि.मी.चा ट्रेक जास्त लोकप्रिय आहे.

.

जुलै २०१५च्या उत्तर स्पेनच्या भटकंतीत हा ट्रेक करायचाच असं नवर्‍याने आणि मी ठरवलं होतं. या ट्रेकसाठी काही गोष्टींचं पूर्वनियोजन करणं आवश्यक आहे. काइन वा पोंसेबोसला राहण्याखाण्याच्या मर्यादित सोयी आहेत. त्यामुळे कांगास किंवा अरेनास (Arenas de Cabrales) ला राहणं बरं पडतं. स्वतःच्या गाडीने प्रवास करायचा तर पोंसेबोसहून अरेनास जवळ आहे. पण स्वतः ड्राइव्ह केल्यास २६ कि.मी.चा परतीचा ट्रेक करणं किंवा थोडाच भाग पाहून परत फिरणं हे पर्याय आहेत. तसेच पोंसेबोसहून सुरुवातीला जवळजवळ ३०० मीटरचा खडा चढ आहे. कांगासला जास्त सुविधा आहेत, तिथून आसपासचा परिसर पाहणं सोपं आहे. शिवाय जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत कांगासहून काइनसाठी रोज सकाळी दोन बसेस असतात. दुपारनंतर काइन आणि पोंसेबोसहून कांगासला परतीच्या बसेस असतात. कांगासला राहून बसने काइनला येऊन ट्रेक करून पोंसेबोसहून परत यायचं, असं आम्ही ठरवलं. नकाशात कांगास वरच्या बाजूला आहे आणि बसचा मार्ग निळ्या रंगात दाखविलेला आहे.


या ट्रेकमध्ये काइन आणि पोंसेबोस सोडल्यास खाणंपिणं, अगदी प्यायचं पाणीही मिळत नाही. त्यामुळे हे सगळं बरोबर नेणं भाग आहे. १३ कि.मी.त कुठेही स्वच्छतागृहं नाहीत. कुठेही फारशी सावली किंवा बसायला जागाही नाही. ही एक वाट सोडली तर इतर वाटा नाहीत, कोणतेही shortcuts नाहीत. उन्हाळ्यात गर्दीचाही त्रास होऊ शकतो. बराचसा ट्रेक कड्याच्या बाजूने आहे. वाट बहुतेक ठिकाणी किमान दीड मीटर रुंद आहे, पण कुठेही संरक्षक कठडे नाहीत. तरीही पोंसेबोसकडचे ३ कि.मी. वगळता उंचीची भीती नसेल तर हा ट्रेक कठीण नाही.

कांगासला आमचा दोन दिवस मुक्काम होता. पाऊस पडणार हे सांगायला हवामान खात्याची गरज नव्हती. तसंही लख्ख ऊन असेल, तर सावली नसल्याने आणि चुनखडीच्या डोंगरांमुळे परावर्तनाने वाढणारा उष्मा यामुळे ट्रेक करणं कठीण होतं. त्या मानाने ढगाळ वातावरण सुसह्य असतं. अर्थात जोरदार पाऊस किंवा धुकंही वाईट!

दोनच बस आहेत, भरल्या तर काय असा विचार करून आदल्या दिवशी संध्याकाळी कांगासला पोहोचल्यावर तिकिट काढायला बस स्टँडला गेलो. पण तिकिट खिडकी बंद झाली होती. बस स्टँड उचलून कोकणात कुठेही ठेवावा असा होता. तसेच नंबर असलेले तिरके समांतर फलाट, गाडी कुठे लागणार माहीत नसलेले प्रवासी आणि एक अंधारं कँटीन. प्रवाश्यांची संख्या आणि बसेसची अवस्था हेच फरक होते फक्त.

दुसर्‍या दिवशी सकाळी ८च्या बससाठी अर्धा तास आधी जाऊन परतीचं तिकिट काढलं. कँटीनला बटाटा घातलेलं ऑम्लेट आणि पाव अशी न्याहारी केली आणि बसमध्ये पुढच्या जागा पटकावल्या. बस रिकामी होती, आमचा गर्दीचा अंदाज सपशेल चुकला होता. बस सुटायच्या आधी एक तरुण जोडपं फक्त चढलं. प्रवास सुरू झाला आणि पाच मिनिटांत ढग आणि धुक्यामुळे बाहेर काही दिसेनासं झालं. अडीच तासाचा प्रवास होता. घाटाच्या रस्त्यावर ड्रायवर गाडी कशी चालवणार हा विचार करत बसण्यापेक्षा झोप काढली.

काइनला पोहोचलो, तर थंडी आणि मुसळधार पाऊस! तीच बस किती वेळाने परत जाणार ते ड्रायव्हरला विचारून ठेवलं. एक कॅफे दिसला, त्यात शिरलो. आत मस्त ऊबदार होतं. हॉट चॉकोलेट्ची ऑर्डर दिली. आमच्यामागोमाग बसमधलं जोडपंही आलं. मुलाच्या पाठीवर मोठ्ठं बॅकपॅक आणि त्यावर स्लीपिंग बॅग्ज बांधलेल्या. आणि मुलीकडे एक छोटीशी पर्स फक्त, आत अर्धा लीटर पाण्याची बाटलीही राहिली नसती. दोघांनाही मनातल्या मनात कोपरापासून नमस्कार केला.

सुदैवाने अर्ध्या तासाने पाऊस थांबला. बाहेर पडून थोडा वेळ चालून धुक्याचा वगैरे अंदाज घेऊ म्हणून निघालो. तर मागोमाग ते दोघंही आले. आणखी एक वयस्कर जोडपंही आमच्यापुढे दिसलं. चला, सोबत तर होती. कारेस नदीच्या बाजूने चालायला सुरुवात केली. नदीला पाणी खूप कमी होतं.

.
लगेच कारेसवर बांधलेला छोटा बंधारा लागला. बंधार्‍याआधी ट्रेकचा नकाशा आणि profileचा बोर्ड होता. पुढचे १० कि.मी. हलका उतार किंवा सपाट रस्ता होता. शेवटी एक तीव्र चढ आणि मग पोंसेबोसपर्यंत उतार होता.

.
.

बंधार्‍याचं आरस्पानी पाणी बघून बंधारा पार केला. वाटेत एक बोगदा आहे. तिथे बरोबर आणलेल्या टॉर्चचा उपयोग झाला. बोगद्यातून बाहेर आलो, तर उलट्या दिशेने एक तरुण धावत येताना दिसला. (काही अ‍ॅथलीट इथे सरावासाठी धावायला येतात असं वाचलं होतं.) बोगद्याआधी तो थांबला. तो परत धावत जाणार होता. त्याला इंग्लिश येत होतं. त्याच्या म्हणण्याप्रमाणे धुकं नव्हतं. ढगही एका ठरावीक उंचीवर अडकतात. त्यामुळे visibilityचा प्रश्न नव्हता. शिवाय पावसामुळे गर्दीही कमी होती. (नाहीतर उन्हाळ्यात बर्‍याचदा गर्दीमुळे चालणं मुश्कील होतं.) त्याचे आभार मानले. आता आम्हाला काहीही शंका नव्हत्या; कांगासला परत फिरण्याची गरज नव्हती. त्या अरुंद खिंडीसारख्या भागातून बाहेर आलो, तर आजूबाजूला कडे आणि वर ढग. एका अविस्मरणीय ट्रेकची ती सुरुवात होती.

.

कारेसच्या पात्राची खोली हळूहळू वाढत होती, पात्रात पाणी असं नव्हतंच. मध्येच वाट गुहेतून जात होती. वाटेत दोन पूल लागले.
.

.

आतापर्यंत पात्र तसं अरुंद होतं. अचानक झाडं कमी झाली, दरी रुंदावली आणि वेगळाच नजारा दिसला.

.

वाट मध्येच डोंगराच्या पोटातून जात होती. कुठे Aqueductही दिसत होतं. अधूनमधून मागे वळून पाहायचा मोह होत होता.

.
.

नदी आता दरीत खोल कुठेतरी होती. पुढे दिसणारी वाट पाण्यापासून खूप उंचावर होती. याआधी पाहिलेल्या gorgesपेक्षा इथलं दृश्य खूप वेगळं होतं.

.

एका जागी कोवाडोंगाकडे जाणारा फाटा फुटला होता. तिथे लावलेल्या बोर्डनुसार कोवाडोंगाला चालत जायला ९ तास लागतात. अशी वाट आहे ही माहिती नवीन होती. बोर्डनुसार आमचा साधारण अर्धा ट्रेक झाला होता. तिथे फक्त लागणारा वेळ दिला होता, अंतर नव्हतं. अर्धा ट्रेक झाला असेल असं आम्हाला तरी वाटलं नाही.

.

कारेस रूट ज्याच्यासाठी प्रसिद्ध आहे तसं 'खाली खोल दरी, वर उंच कडा' दृश्य दिसत होतं. आणि त्या कड्याला वेटोळं घालून बसलेली पायवाट! दगडात एखादं लेणं कोरावं तशी ती वाट कोरून काढणार्‍या मानवाच्या जिद्दीला काय म्हणावं!!

.

ट्रेलवर अजूनतरी तुरळकच माणसं होती. पोंसेबोसहून जास्त लोक ट्रेक सुरू करतात. त्यामुळे इथून पुढे विरुद्ध दिशेने येणारे लोक भेटण्याची शक्यता होती. एका ठिकाणी वाटेच्या बाजूला थांबण्यासारखी जागा दिसली. भूकही लागली होती. मग बरोबर आणलेले तिकडचे रसाळ पीच आणि आलुबुखार खाल्ले. तहान आणि भूक दोन्ही भागले. १५ मिनिटं थांबलो असू. आमच्यासारखेच जागा शोधणारे आल्यावर आम्ही मुक्काम आवरता घेतला.
वाटेत हे रावसाहेब दिसले. गळ्यात मस्त घंटा बांधलेली होती. तोरा त्या कडेकपारींचा राजा असल्यासारखा होता. उन्हाळ्यात चरण्यासाठी बकर्‍यांना वगैरे डोंगरांत आणतात. तिथे असलेल्या गुहांमध्ये हे प्राणी रात्री जाऊन राहतात.

.

या वाटेवर आम्ही एकाच दिशेने जाणार होतो. त्यामुळे पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत होतो. विरुद्ध दिशेने चालताना परिसर कसा दिसत असेल याची कल्पना येत होती. लोकांची गर्दी असती तर असं थांबून पाहणं, फोटो काढणं शक्य झालं नसतं. एका ठिकाणी बाजूला खडीची लांबलचक घसरगुंडी होती. कुठे गुहेतून वाट जात होती. अधूनमधून हलका पाऊस पडत होता. आजूबाजूची उंचच उंच शिखरं अजूनही ढगांच्या पडद्याआड होती. त्यांच्या उंचीचाही अंदाज येत नव्हता.

.

.

.

आणखी एकदोन वळणं घेतली आणि एवढा वेळ मागे पाहिल्यावर दिसणारी वाट डोंगराच्या आड दिसेनाशी झाली. आता डोंगराला उतार असा नव्हताच. उजवीकडे सरळसोट कडा आणि डोक्यावर दगडांचा overhang. त्या फत्तरांतल्या भेगा बघून इथे दरड कोसळायचा किती धोका आहे हे अचानक जाणवलं. त्यात नवीन काही नव्हतं. अश्या धोक्याचा इशारा देणारे फलकही दिसले होते. पण आपण डोंगराच्या पोटात आहोत आणि हजारो टन वजनाच्या दगडांखालून जातोय, यातला धोका त्या क्षणी जाणवला खरा. त्यात मोबाईलला रेंज नाही हेही आठवलं. अशी भीती दाखविणारा निसर्गच लगेच मंत्रमुग्धही करत होता. खरं तर तेच चुनखडीचे डोंगर, त्यांची एका साच्यातून काढल्यासारखी वळणं, थोडीफार हिरवळ आणि खोल कुठेतरी तळाशी आहे की नाही अशी शंका यावी इतकं पाणी! पण पावलागणिक आपण पुढे जावं आणि मधूनच मागे सोडलेल्या वाटेसाठी उदास वाटावं, असं होत होतं.

.

हा भाग पार केला आणि अचानक पुढची पुसटशी वाट समोर आली. समुद्रसपाटीपासून एवढ्या कमी उंचीवर असा निसर्ग प्रथमच पाहायला मिळत होता.

.

आपण सृष्टिसौंदर्य पाहण्यात दंग असावं आणि एखाद्या चळवळ्या माणसाला ती शांतता सहन न होऊन त्याने एखादा वाईट विनोद करावा असं थोडंफार ही पाटी पाहून झालं.

.

या पंपानंतर पुढचा पेट्रोल पंप किती अंतरावर आहे हे सांगणारी पाटी बघितली आहे. पण तिथे कचरापेटी नसताना कचरा किती अंतरावर टाका हे सांगण्यात काय हंशील? (अंतरही चुकलंय?!) बरं, काइनला अशा सूचनेसकट कचरापेटी ठेवलेली काही दिसली नव्हती. यावरून आठवलं, स्पेनला कचरापेट्यांवरही सरकारचं चिन्ह म्हणून राजमुकुट असतो. पहिल्यांदा पाहिल्यावर गंमत वाटली होती.
आता चढ सुरू होणार होता. जसजसं पुढे जावं, तसा निसर्गाचा पट बदलत होता.

.

कड्याच्या टोकाशी पाण्याकडे उतरणारी एक वाट दिसत होती. ही वाटही पुढे पोंसेबोसला जाते. तिकडून ट्रेकला सुरुवात केली, तर पाण्याच्या बाजूने जात असल्याने चुकून ही वाट धरण्याची शक्यता असते. पण या वाटेने कडा चढणं येरागबाळ्याचे काम नोहे!

.

काही जागांबद्दल कितीही वाचलं, फोटो बघितले तरी प्रत्यक्ष तिथे गेल्यावर होणारा परिणाम काही वेगळाच असतो. निसर्गाचं रौद्रभीषण सौंदर्य आपल्या क्षुद्रतेची जाणीव करून देतं, पण ही जाणीव आपल्याला निसर्गाच्या जवळही घेऊन जाते. तर दुसरीकडे कुणा अनाम लोकांच्या कष्टांमुळे आपण हे सृष्टीचं रूप किती सहज पाहू शकतो, याची मनाला टोचणीही लागते.

.

.

चढ संपल्यावर थोडी सपाटी लागली. चालायला सुरुवात केल्यापासून प्रथमच एवढी मोकळी जागा लागली होती. दोन्ही दिशांनी येणारे लोक इथे थांबत होते. आम्हीही थोडे दमलो होतो. त्यामुळे १०-१५ मिनिटं विश्रांती घेतली. इथे सगळ्यांचीच फोटोग्राफी सुरू होती. पण कोणीही त्या नादात अतिसाहस करताना दिसलं नाही. उंचावर आल्याने मागचा मार्ग लांबवर दिसत होता.

सपाटीला वळसा घालून पुढे गेल्यावर मागचं दृश्य पूर्ण बदलून गेलं.

आता पोंसेबोसला पोहोचेपर्यंत उतार होता. एकदोन जागी दगडात पायर्‍याही खोदलेल्या होत्या.

.

या वाटेची कोणे एकेकाळी देखभाल करणार्‍यांसाठी बांधलेलं घर असावं.

थोडं चालल्यावर वाट खूप अरुंद झाली. उतार संपायचं नाव घेत नव्हता. इथे दगडधोंडेही खूप होते. त्यामुळे उतरताना लक्ष देणं भाग होतं.

उतार संपतासंपता तळाशी पार्क केलेल्या गाड्या दिसू लागल्या. पायवाटेचा शेवटचा टप्पा दगडात बांधलेला आहे. वाट गाडीरस्त्याशी येऊन थांबली. रस्त्यापलीकडे कारेस नदी तिच्या लयीत वाहत होती. काही क्षणांसाठी ढग बाजूला झाले आणि आम्हाला भोवती असलेल्या शिखरांचं प्रथमच दर्शन झालं.

प्रतिक्रिया

संग्राम's picture

20 Oct 2017 - 2:37 pm | संग्राम

वाह !!!

एस's picture

20 Oct 2017 - 3:07 pm | एस

अप्रतिम भटकंती!

पद्मावति's picture

20 Oct 2017 - 5:29 pm | पद्मावति

फारच मस्तं.

अप्रतिम भटकंती लेख , छान लेख आणी फोटो .

जुइ's picture

21 Oct 2017 - 12:30 am | जुइ

परिचित नसलेल्या जागेची फारच छान भटकंती. फोटो आणि वर्णन सर्वच खास आहे.

तुषार काळभोर's picture

21 Oct 2017 - 6:50 am | तुषार काळभोर

जग किती मोठं आहे आणि आयुष्य किती कमी आहे या जगाचा अनुभव घ्यायला...

जग किती मोठं आहे आणि आयुष्य किती कमी आहे या जगाचा अनुभव घ्यायला...

खरंय! आपण पुढे जावं तसं क्षितिज आणखी विस्तारत जातं.

वेल्लाभट's picture

21 Oct 2017 - 11:01 pm | वेल्लाभट

डोळ्याचं पारणं फिटलं

निशाचर's picture

23 Oct 2017 - 4:34 am | निशाचर

सगळ्या वाचकांचे आभार!

संग्राम, एस, पद्मावति, सिरुसेरि, जुइ, पैलवान आणि वेल्लाभट, आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद!

सुमीत भातखंडे's picture

23 Oct 2017 - 11:12 am | सुमीत भातखंडे

सगळीच चित्रं सुरेख आहेत

विनिता००२'s picture

23 Oct 2017 - 12:06 pm | विनिता००२

मस्त वाटलं

पैसा's picture

23 Oct 2017 - 9:45 pm | पैसा

सुरेख!

मित्रहो's picture

24 Oct 2017 - 11:28 am | मित्रहो

आणि तितकीच सुंदर ओळख
फारस सुंदर दिसतो परीसर

सुमीत भातखंडे, विनिता००२, पैसा आणि मित्रहो, अभिप्राय दिल्याबद्दल आभार!