दृकश्राव्य विभाग : आगळी वेगळी दिवाळी! (दिवाळी फोटो)

गोष्ट तशी छोटी...'s picture
गोष्ट तशी छोटी... in दिवाळी अंक
21 Oct 2017 - 12:00 am

Header2

नमस्कार मिपाकरहो,

दृकश्राव्य विभागाच्या आवाहनाच्या वेळेस जेव्हा दिवाळीच्या फोटोंचे आवाहन केले, तेव्हा असे वाटत होते की मिपासारख्या प्रचंड वाचकवर्ग असलेल्या संस्थळावर केवळ फराळ आणि पणत्यांचे फोटो असू नयेत. ह्या विभागात काय वेगळे करता येईल ह्याचा विचार करत असताना दिवाळीशी निगडीत अनेक कल्पना समोर आल्या. पण सरते शेवटी आपण ह्या संधीचा वापर उत्तम काम करणार्‍या संस्थांची माहिती देऊन केला पाहिजे ह्यावरच टीमचे एकमत झाले. त्या दृष्टीने आम्ही झोपडपट्टी, अनाथालये, रेडलाईट एरियात काम करणार्‍या अनेक संस्थांना विचारणा करयास सुरूवात केली. ह्या संस्थांमध्ये साजरी झालेली दिवाळी हा विषय घेऊन आपण १-१ मिनिटांच्या लहानशा फिल्म्स बनवाव्यात असा विचार होता. योगायोगाने लहान मुलांसाठी काम करणार्‍या तीन संस्थांची माहिती मिळाली. फिल्म बनवण्यास वेळ पुरा पडत नसला तरी फोटो स्वरुपात ही माहिती देत आहोत. मिपाकरांनी ह्या संस्थांना भरभरून मदत करावी आणि दिवाळीचा आनंद सहस्त्रपटींनी वाढवावा ही विनंती.

आपल्या आजुबाजुला चालु असणार्‍या अशा सकारात्मक कामांची माहिती ह्या धाग्यात नक्की द्या.

शुभ दिपावली!

सिग्नल शाळा, ठाणे

समर्थ भारत व्यासपीठ आणि ठाणे पालिकेच्या माध्यमातून तीन हात नाक्यावरील सिग्नलवरच्या मुलांसाठी सुरू करण्यात आलेला सिग्नल शाळेचा उपक्रम हा अत्यंत स्तुत्य, आणि कमालीचा लक्षवेधी प्रकल्प आहे. शहरातील सिग्नलवर शालेय वयाची मुले भीक मागताना, पालकांसोबत विविध वस्तू विकताना दिसतात. परिणामी शिक्षणापासून मुलांना वंचित राहावे लागते. यासाठी १५ जून २०१६ साली ठाणे शहरात सिग्नल शाळा सुरू करण्यात आली. तीन हात सिग्नलवरील मुले, या शाळेत शिकू लागली. या शाळेत सध्या २८ मुले शिकत आहेत. यामध्ये पूर्व माध्यमिकची १० तर प्राथमिकची १८ मुले शिक्षण घेत आहेत.

शाळेच्या शिक्षिका, संस्थापक यांच्याशी बोलताना ही शाळा उभी करताना किती मेहनत घेण्यात आली याची कल्पना येते. सिग्नल वरच्या मुलांना माणसांमधे कसं वागायचं हेच मुळी शिकवावं लागलं. प्रेम म्हणजे काय, माया म्हणजे काय, याची त्यांना पारख असली तरी सवय नव्हती. त्यामुळे हा प्रवास इथल्या समस्त शिक्षकवर्गासाठीही इथल्या मुलांच्या इतकाच विशेष होता असं ते सांगतात. एका कंटेनरमधे ही शाळा भरते. इथे प्रार्थना होते, परीक्षा होते, अभ्यास होतो, तसंच खेळही होतो. इथे एक छोटेखानी ग्रंथालयही आहे. 

लोकांचा याला प्रचंड पाठिंबा मिळाला. प्रसारमाध्यमांनीही कौतुक केलं. बीबीसी पासून अनेक वृत्तवाहिन्यांनी यावर प्रकाश टाकला, आणि ही संकल्पना एक आदर्श संकल्पना म्हणून मानली गेली. ही संकल्पना इतर शहरात, देशात इतकंच नव्हे तर जगात राबवण्याचा आता विचार होतो आहे.

या शाळेने अनेकांची भविष्य प्रकाशमान करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. तशाच प्रकारे दिवाळीसारखे सण इथे तुम्हा आम्हा लोकांसोबत साजरे होतात, या मुलामुलींना नवे कपडे, खेळणी मिळतात आणि तो प्रकाश त्यांच्या वर्तमानातही झिरपत जातो. सिग्नल शाळेच्या या दिवाळीची ही काही क्षणचित्रं !

संपर्कः- भटू सावंत - +91 99870 30916

signal shala

सिग्नल शाळा येथील दिवाळी - २०१७

पुनरुत्थान समरसता गुरूकुलम, चिंचवड, पुणे

छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकदिनी , ९ जुन २००६ ला पारधी, कैकाडी, डोंबारी, मरिआईवाले, सोनझारी, तांबट, भटके विमुक्त, आदिवासी, वनवासी, दलित, बौद्ध ह्या समाजघटकातील विद्यार्थ्यांसाठी "पुनरुत्थान समरसता गुरूकुलम"ची स्थापना झाली. चिंचवड येथील क्रांतीवीर चापेकर वाड्यात पहिले दोन वर्ष ही शाळा सुरु होती. पिंपरी चिंचवड आणि पुणे परिसरातील झोपडपट्टीमध्ये राहणारा, बालमजुर, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाला या शाळेत प्रवेश मिळतो. येथील शिक्षणपद्धतीचे वैशिष्ट्य म्हणजे मुलांचे निरीक्षण करुन, त्यांच्या सवयी, क्षमता, कौशल्य ह्यांचा विचार करुन मग शिकवले जाते. एक महिना कोणत्याही पुस्तका शिवाय केवळ सामुहिक कॄतींमधून अभ्यास घेतला जातो. ह्या दरम्यान मुलची वागणूक, गुण-अवगुण, स्वच्छता, लेखन/वाचन/ संख्याज्ञान ह्यांच्यातील सफाईदार पणा पाहून मुल कोणत्या वर्गात बसेल हे ठरवले जाते. त्यांच्या कौशल्यानुसार गट पाडले जातात.

shala

चिंचवड येथील गुरुकुलाची सुंदर वास्तु

सुरूवातीला मुलांच्या रहाण्या खाण्यापिण्याची सोय होते म्हणून मुलांना शाळेत पाठवणार्‍या पालकांच्या विचारांमध्ये हळूहळू बदल झाला. आता पालक मुलांना शिक्षण आणि संस्कारासाठी शाळेत पाठवू लागले. त्यामुळे २००६ मध्ये २५ विद्यार्थीसंख्या होती जी २०११ सालापर्यंत १५० वर गेली.

गुरुकुलात शालेय विषयांसोबतच जीवनावश्यक विषयांचेही ज्ञान दिले जाते. ह्यात प्रामुख्याने कला (चित्रकला, शिल्पकला, कागदकाम इ.), मैत्र (पुस्तकवाचन, कथाकथन, लेखन, अभिनय), संगणक, नैपुण्य (भटक्या जमातीमधल्या नैपुण्यांचा वापर करण्यासाठी नेमबाजी, रो क्लायबिंग इ. खेळ), गृहविज्ञान (लोणचे, सॉस, चिक्की इ. पदार्थ / खडू, मेणबत्त्या, अगरबत्त्या इ. बनवणे), आयुर्वेद (वनौषधींची माहिती, काढे, दंतमंजन इ. बनवणे), कॄषी आणि गोविज्ञान ( भाजीपाला, मातीचा अभ्यास, रोपवाटिका इ.) , अभियांत्रिकी (सुतार काम, वेल्डींग, प्लंबिंग, इलेक्ट्रिकल इ.) हे विषयही शिकवले जातात. मुलांनी बनवलेल्या वस्तुंचे फोटो नक्की पहा.

samarasata work

मुलांनी बनवलेल्या वस्तु

ह्या शाळेत मुलं भुमिती फळ्यावर न शिकता बांधकामातून शिकतात. विज्ञानात वनस्पती निरीक्षण प्रयोगशाळे बरोबरच वनस्पतींच्या सानिध्यात करतात. पावसात चार भिंतींमध्ये न शिकता पावसात भिजून कविता शिकतात!

गुरुकुलाला तुमच्या शक्य त्या सर्व मदतीची गरज आहेच. सध्या इथे २००-२५० निवासी विद्यार्थी आहेत. आपण सहज करू शकू अशी एक गोष्ट म्हणजे मुलांशी स्काईपवर संवाद साधणे. इन्फोसिसचे काही स्वयंसेवक मुलांना स्काईपवर शिकवतात. त्यांना आपल्या क्षेत्राबद्दल माहिती देतात. नुकताच एका खगोलशास्त्रज्ञांनी बंगलोरहून मुलांशी संवाद साधला. मदतीसाठी खाली संपर्क देत आहोत.

पुनरुत्थान समरसता गुरुकुलम
Girish Prabhune
c/o Krantiveer Chapekar Smarak Samitee, Opposite Ram Mandir, Chinchwad Gaon, Pune 411033, Maharashtra, India
Tel: +91 20 65317268
Mobile: +91 97663 25082

samarasata

गुरुकुलातील दिपोत्सव २०१७

सोनदरा गुरुकुलम, पाटोदा, बीड

नवलताईंनी लिहीलेल्या लेखानंतर आम्ही सोनदरा येथील गुरुकुलम ह्यांच्याशी सुद्धा संपर्क साधला. तेथील सुदाम भोंडवे ह्यांच्याशी सुद्धा बोलणे झाले. त्यांनी दिलेली ही शाळेची माहिती.

ऊसतोडीसाठी जवळपास 6 महिन्यांसाठी होणारे स्थलांतर शिक्षणाचा अडथळा आहे. तसेच अनेक सामाजिक समस्यांचे मूळ देखील शिक्षणाचा अभाव आहे. हे ओळखून श्रद्धेय नानाजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस तोडणी कामगारांची २५ मुले आणि चार झोपड्या एवढ्या तुटपुंज्या सामग्रीवर १९८६ साली सोनदरा गुरुकुल प्रकल्पाची सुरुवात झाली. श्री सुदाम भोंडवे आणि सौ. सिंधू भोंडवे ह्यांनी ह्या कामासाठी वाहून घेतले. आजवर १५०० हून जास्त विद्यार्थ्यांनी इथे शिक्षण घेतलेले आहे. सध्या १८० निवासी मुले इथे शिक्षण घेत आहेत. इथल्या शिक्षणात कृषी व गोपालन, ऊर्जा संवर्धन, पर्यावरण संवर्धन (परिसरातल्या मोरांची काळजी इ.) अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे.

sondara

सोनदरा येथील दिवाळी - २०१७

कोणत्याही शासकीय मदतीशिवाय हा प्रकल्प गेले २५ वर्ष चालु आहे. ह्या प्रकल्पाची ओळख एका लहानशा चित्रफितीमधून करुन घेऊयात. प्रकल्पास मदत करायची असल्यास आवश्यक माहिती खाली दिलेली आहे.

संपर्कः-
दीनदयाळ नवरचना प्रतिष्ठान,
सोनदरा गुरुकुलम् डोमरी,
ता. पाटोदा, जि. बीड. – 414 204
Website: www.sondara.in
email: director@sondara.in

Footer

प्रतिक्रिया

आदूबाळ's picture

22 Oct 2017 - 11:34 pm | आदूबाळ

फारच सुंदर छायाचित्रे!

एस's picture

22 Oct 2017 - 11:46 pm | एस

स्तुत्य!

बाजीप्रभू's picture

22 Oct 2017 - 11:48 pm | बाजीप्रभू

अभिनव कल्पना..

वेल्लाभट's picture

23 Oct 2017 - 12:22 am | वेल्लाभट

प्रेरक!

पद्मावति's picture

23 Oct 2017 - 12:30 am | पद्मावति

__/\_

Naval's picture

23 Oct 2017 - 7:54 pm | Naval

खूपच स्तुत्य उपक्रम... दरवर्षी अजून नवनवीन संस्थांना संपर्क करता येईल. त्यानिमित्ताने सगळ्यांना त्यांचं काम कळेल.
नवलताईंनी लिहीलेल्या लेखानंतर आम्ही सोनदरा येथील गुरुकुलम ह्यांच्याशी सुद्धा संपर्क साधला. तेथील सुदाम भोंडवे ह्यांच्याशी सुद्धा बोलणे झाले. त्यांनी दिलेली ही शाळेची माहिती.

खूप आंनद झाला हे वाचून माझं लिहिणं सार्थक झालं .. खूप आभार !