सतीश पिंपळे - एक ऋषिरंग

Naval's picture
Naval in दिवाळी अंक
20 Oct 2017 - 12:00 am

३१ डिसेंबरचा दिवस होता. आम्ही सगळे न्यू इयर सेलिब्रेशनच्या तयारीत होतो. खाण्याचा एखादा मस्त बेत आणि टीव्हीवरचे कार्यक्रम बघत बसणं असा नेहमीचा प्लॅन. आज आमच्याकडे एक चित्रकार येणार होते. आजवर मी आमच्या घरी खूप लेखक, कवी मंडळी आलेली पाहिली होती, पण  एका चित्रकाराला पहिल्यांदाच पाहणार होते. मला चित्रं काढण्याचं फार वेड, त्यामुळे मी फार खूश होते. वर्तमानपत्रात आणि टी.व्ही.मध्ये पाहून चित्रकारांविषयी काही कल्पना तयार झालेल्या होत्या - लांब केस, दाढी, झब्बा असं काहीतरी... संध्याकाळच्या सुमारास ते आमच्या घरी आले. माझ्या या कल्पनांपेक्षा एकदम वेगळे अगदी साधे. सतीश पिंपळे त्यांचं नाव.  

gadi2

काही वेळातच काका आमच्या सगळ्यांमध्ये मिसळून गेले. जेवढे मृदुभाषी, तेवढेच मिस्कील. घरातल्या छोट्यांपासून ते माझ्या आजोबांपर्यंत सगळ्यांशी त्यांचा फार सुंदर कनेक्ट होता. काका आमच्या छोट्या गावात चित्रप्रदर्शन भरवायला आले होते. आमच्या गावच्या इतिहासातलें कदाचित ते पहिलंच प्रदर्शन. त्यासाठी भलीमोठी कॅनव्हास पेंटिग्ज फार सांभाळून आणलेली होती. काका मूळचे अकोल्याचे. इतक्या दूर ही पेंटिग्ज आणण्याचा खर्चही खूप आला असणार , हे आता कळतं. कलेच्या व्यावहारिक पैलूचं ज्ञान झाल्यावर विचार करते की, जिथे आपली पेंटिग्ज विकली जातील याची शक्यता अगदी नसल्यात जमा, तिथे लोकांना अशी पेंटिग्ज बघायला मिळावीत या आग्रहाखातर ते तयार झाले होते. या प्रदर्शनाचा अनुभव आम्ही अगदी जवळून घेत होतो. ती चित्रं ठेवावी कुठे इथपासून प्रश्न होते. काही ठिकाणी खिळे मारून, काही मोठी पेंटिंग्ज खुर्च्या-टेबल यांच्यावर ठेवून, तर काही ठिकाणी सुतळीने बांधून चित्रं मांडण्यात आली. आर्ट गॅलरीमधून या गोष्टीची नीट व्यवस्था असते. पुरेशी आणि साजेशी प्रकाशव्यवस्थाही तिथे असते, ज्यामुळे चित्रं अधिक उठावदार दिसतात. आमच्या या प्रदर्शनात अनेक गोष्टींची त्रुटी असून लोकांसाठी ती पर्वणी होती, हीच महत्त्वाची बाब होती. त्यात प्रदर्शनात मुख्यतः काकांची अ‍ॅब्स्ट्रॅक्ट पेंटिंग्ज ठेवल्याने लोकांसाठी हा आणखी एक वेगळा अनुभव  ठरला. बरेच लोक असं काही पहिल्यांदाच बघत होते. अ‍ॅब्स्ट्रॅक्ट चित्र बघताना त्यांच्या प्रतिक्रिया, हावभाव अगदी बघण्यासारखे होते. मी आणि माझा भाऊ तिथे बॅक स्टेज कलाकार होतो. हा अनुभव आम्हीही नव्याने घेत होतो आणि सोबत काकांचा विलक्षण सुंदर सहवास. लहान मुलांना इतकं महत्त्व देऊन वागवणारा पहिलाच मोठा आणि थोर माणूस पाहत होतो आम्ही. काकांशी बोलताना एखादी मिश्कील कॉमेंट करून दुसऱ्याच क्षणी अत्यंत गंभीरपणे ते प्रदर्शन पाहायला आलेल्या लोकांशी बोलायला लागत. त्यांच्या निरागस प्रश्नांना अतिशय सहजतेने हाताळत. एखाद्या चित्राबद्दल स्वतःचा दृष्टिकोन दुसऱ्यांवर लादण्यापेक्षा "तुम्हाला काय वाटलं ते सांगा" असं म्हणून त्याला बोलतं करायचे. कुठेही आपण किती थोर याचा आव नाही.

काकांबद्दल मला हळूहळू कळत गेलं. G.D. आर्ट झाल्यावर काकांनी याच क्षेत्रात अध्यापन केलं. राष्ट्रीय पातळीवरचे ते अतिशय मोठे चित्रकार आहेत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांची अनेक चित्रं पोहोचलेली आहेत. जहांगीर आर्ट गॅलरी, बालगंधर्व इ. प्रसिद्ध ठिकाणी त्यांची कित्येक प्रदर्शनं भरली होती. अशा महान चित्रकाराने आमच्या गावात येऊन आमचा मान वाढवला होता.   

gadi2
           
संध्याकाळी घरी परतल्यावर आम्ही सगळे काकांभोवती कडं करून बसायचो. कित्ती विषय, कित्ती किस्से आणि त्यांना सांगण्याची अचाट विनोदबुद्धी. चेहरा नेहमी हसरा आणि डोळे मात्र जणू एखादा संथ प्रवाह आणि त्यात तरंगणारी एक संथ होडी. त्यात नेहमी एक दिव्यता जाणवायची मला. मी चित्र काढते हे त्यांना कोणीतरी सांगितलं, तेव्हा खरं तर मी अवघडले होते. इतक्या मोठ्या माणसासमोर काय दाखवायची आपली चित्रं? मी काढलेली चित्रं काकांनी मला आवर्जून दाखवायला लावली. त्यात मी एक टोपले घेऊन जाणारी बाई काढली होती. तिची हुबेहूब सावली काकांनी फार appreciate केली होती. चित्र जिवंत आणि प्रभावी वाटण्यासाठी चित्रातला प्रकाश आणि सावली यांचा किती महत्त्वाचा रोल आहे, हे त्या वेळी त्यांनी मला सांगितलं. "कुठलंही चित्र समोर ठेवून त्याची कॉपी करू नकोस, त्यामुळे तुला तुझी शैली कधीच सापडणार नाही" हा त्यांचा सल्ला फार मोलाचा ठरला मला. माझ्या आजोबांशी काकांची विशेष गट्टी जमली होती. तेही चित्रकार, त्यामुळे काकांकडून एखाद्या विद्यार्थ्यांसारखं आम्ही दोघे शिकत होतो. माझे आजोबा खूप सुरेल आणि पहाडी गळ्याचे. त्यांना काका भजनाच्या फर्माइश करायचे आणि दोघांची ती मैफल अगदी रंगून जायची. भजन म्हणतानाच्या त्यांच्या मुद्रा काकांनी त्यांच्या स्केचेसमधून फार सुंदर टिपून ठेवलेल्या आहेत.

पुढे काकांचं औरंगाबादला प्रदर्शन भरणार होतं. त्यात त्यांचा वाढदिवस जवळ आलेला, म्हणून आम्ही तिथे जाऊन धडकलो. मी तर त्या चित्रप्रदर्शनात चित्रकार काकांना फार जवळून पाहिलं. काका नेहमी स्केचेस काढण्यात व्यग्र असायचे. ते कुठेही जावो, त्यांचं स्केचबुक हातातच असायचं. हे प्रदर्शन एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भरलं होतं. तिथली वर्दळ, शाही झुंबरं, सुंदर अशी सजावट काही काही काकांच्या नजरेतून सुटलं नाही. प्रदर्शनाचं मीडिया कव्हरेज घ्यायला मीडियाची माणसं येणार असं कळलं. काका मजेत मला म्हणाले, "तूच उभी राहा रसिक म्हणून." मी एकदम गांगरून गेले. मुळात स्वभाव बुजरा, त्यामुळे मी तयार नव्हते. तर काका म्हणाले, "अगं  काय त्यात अवघड? बे एके बे चा पाढा म्हणायचा, झालं." मी म्हणाले, "कसा काका?" तर एकदम ते सिरियस चेहरा करून म्हणाले,"हे बघ, कसं असतं माहिते का, बे एक बे आणि बे दुणे चार असतं. बे त्रिक सहा हेही लक्षात घ्यायला हवंय." हे ऐकून मी एकदम हसायला लागले. मग हसू आवरत त्यांच्यात मिसळायचा प्रयत्न करत म्हणाले, "म्हणजे बे चोक आठ का?" काका लगेच म्हणाले, "हां... आणि बे पंचे दहा असं हे सगळं आहे." आम्ही दोघेही हसायला लागलो, अर्थात नंतर काकांचा मीडियासमोर अतिशय सुंदर interview झाला आणि रसिकही फार उत्तम लाभले त्यासाठी. तेव्हाच काकांचे जवळचे मित्र गझलनवाझ भीमराव पांचाळे काका तिथे काकांना भेटायला आले. भीमराव काकांनी मराठी गझलला फार मोठं स्थान मिळवून दिलं आहे. दोन महान कलाकारांची मैत्री, दोघांमध्ये काही कॉमन गोष्टी होत्या, त्या म्हणजे त्यांच्यातली सादगी, आपल्या कलेविषयीच समर्पण आणि अलौकिक प्रतिभा. कलेचा प्रकार कोणताही असो - दोन सर्जनशील व्यक्तींमध्ये एका विशिष्ट पातळीवर जो संवाद चालतो, तो ऐकणं केवळ अवर्णनीय! काकांसोबतची पहिली ट्रिप म्हणजे जेव्हा आम्ही औरंगाबादजवळच्या निपट निरंजन लेण्या पाहायला गेलो होतो. लेण्या कशा बघाव्या, हे काकांकडून समजावून घेत होतो. त्यात सोबत इतिहासकार ब्रह्मानंद देशपांडे काका. मग तर काय, लेण्यांचा इतिहास आणि त्यातली सौंदर्यस्थळं बघत समृद्ध होत होतो. याबरोबर काकांचं स्केचिंग बघणं! अहाहा!

gadi2

आम्ही त्यांच्या घरी अकोल्याला गेलो, ते फार संस्मरणीय दिवस होते. अतिशय अगत्यशील कुटुंब, साधी प्रेमळ माणसं. घरात सगळीकडे चित्रं, पारितोषिकं अगदी भरभरून. घरातच कॅनव्हास, फ्रेम्स, म्युरल्ससाठी लागणारं सामान यांनी भरलेला त्यांचा स्टुडिओ. मला तर मिठाईच्या दुकानात गेलेल्या एखाद्या छोट्या मुलासारखं होत होतं. काकांच्या पत्नी पद्माकाकू स्वतः एक उत्तम चित्रकार. त्या दोघांची जोडी मी पाहिलेल्या आदर्श जोड्यांपैकी एक. त्या मुख्यतः वारली हा कलाप्रकार हाताळतात. त्यांची दोन्ही मुलं अमित आणि अंजली उत्तम कलाकार आहेत. अमित एक प्रसिद्ध चित्रकार आणि आर्किटेक्ट आणि अंजली एक नृत्यांगना आहे. कलेच्या देवतेने या घराला भरभरून दिलं आहे. काका आपल्या मुलांचे किती चांगले मित्र आहेत, हे त्यांच्याबरोबर राहताना लगेच लक्षात येतं. काका आणि त्यांचे सगळे भाऊ एकत्र राहतात. सगळ्यांचं मिळून एक मोठ्ठं कुटुंब आहे. बाकी भाऊदेखील याच कलेशी निगडित आहेत.

सकाळी उठल्यावर चहा पिणं ही तर ‘तबियत से’ करायची गोष्ट. एक कप संपला की त्याच कपात लगेच दुसऱ्यांदा चहा, त्यासोबत स्नॅक्स आणि गप्पा. या मुक्कामात आम्ही अकोल्याच्या आजूबाजूचे काही स्पॉट फिरायला गेलो. सहलीला जाताना काकांसारखी कंपनी नाही. गाडीत आम्ही गाणी म्हणून तर धुडगूस घातला. आपण एका मोठ्या माणसाबरोबर आहोत, याची ते जाणीवच होऊ देत नाहीत. गाणी तर इतकी पाठ, तीही त्यातल्या म्युझिक पीससकट . तिथेही भटकताना काका आमच्या सगळ्यांच्या पुढे असायचे. ते पोलिओग्रस्त आहेत याची कुठलीच जाणीव न बाळगता, कुणाचा कुठे आधार न घेता काका मनसोक्त फिरत होते. उलट शारीरिक ताकदीच्या बाबतीत ते कित्येकांना सरस ठरतात.  

gadi2

काकांच्या चित्राबद्दल काही लिहिण्याची माझी पात्रता नाही. पण एक रसिक प्रेक्षक म्हणून जे जाणवलं ते लिहायचा प्रयत्न करते. त्यांची अ‍ॅब्स्ट्रॅक्ट पैंटिंग्स खूपच vibrant. प्रकाश, तेजस्वी रंग आणि त्यांच्यातल्या गतिमान हालचाली यांचा थरार प्रत्यक्ष अनुभवण्यासारखा. त्यांचे अत्यंत पॉवरफुल स्ट्रोक्स, रंगाची एकमेकांमधली प्रभावी गुंफण मनाच्या कॉम्प्लेक्स अशा प्रवासाला प्रभावीपणे कॅनव्हासवर साकारतात. चित्रातून मुख्यतः जाणवते ती काकांची आधिभौतिकतेची, अध्यात्माची ओढ, स्वतःला जाणून घेण्याची ओढ... बाहेरच्या जगाकडून आतल्या गूढ, अनाकलनीय जगाकडे त्यांचा प्रवास आपण रसिक म्हणून दृश्य पातळीवर चित्राच्या रूपात बघू शकतो, हे केवढं भाग्य!

अ‍ॅब्स्ट्रॅक्ट पेंटिंगबद्दल मला नेहमीच उत्सुकता वाटत आलीये. हुबेहूब चित्र काढणारा एखादा चित्रकार अ‍ॅब्स्ट्रॅक्ट पेंटिंग करताना  नक्की काय विचार करत असेल? अ‍ॅब्स्ट्रॅक्ट पेंटिंग म्हणजे हळूहळू रेषा विरघळत जाऊन अगदी कमी शब्दात आशय मांडणारी कविताच असते जणू. त्याची निर्मिती प्रत्यक्ष बघणं खरंच अद्भुत. काकांनी स्वतःच्या चित्रनिर्मिती प्रक्रियेबद्दल लिहिलेलं वाक्य इथे सांगावंस वाटतं - "माझ्या मनाच्या विस्तीर्ण अंगणात असंख्य रंग एकमेकांचा हात धरून नाचतच असतात. बाहेर पडण्याची प्रत्येकाला घाई झालेली... हा त्यांचा बालिशपणा की समजूतदारपणा... माहीत नाही. पण मी ते होऊ देतो... त्यांचं ते कागदावर किंवा कॅनव्हासवर उतरणं तटस्थतेने पाहणं खूपच इंटरेस्टिंग असतं....!"

gadi2

त्यांच्या  ‘रूट्स’ पेंटिंगमधलं  ते जमिनीखालचं अद्भुत जग, मुळांमध्ये झिरपलेलं पाणी, त्यात पसरलेला दिव्य प्रकाश, अप्रतिम!

gadi2

‘केव्ह्ज ‘ हे त्यांचं अवॉर्ड विनिंग पेंटिंग, वेरूळच्या १० नंबरच्या लेण्यावर काढलेलं. लेण्याची भव्यता, गूढता त्यातल्या ब्लॅक ग्रीन रंगाने ठळकपणे जाणवते आणि लेण्या बघत असताना जणू त्या गूढतेत सामावून गेलेलं आपलं अस्तित्व दाखवणारा तो लाल रंग ...

gadi2

अंकोरवट या चित्राबद्दल SPECIALLY लिहायला हवंय. कंबोडियाजवळ अंकोरवट हे प्राचीन बौद्ध मंदिर आहे. त्याच्या आजूबाजूला इतके प्रचंड वृक्ष वाढले. त्या झाडांच्या फांद्यांनी, मुळ्यांनी मंदिराला तडे गेले आणि त्याच फांद्यांनी आणि मुळांनी त्या इमारतीला धरून ठेवलं आहे. मंदिर आणि वृक्ष अगदी एकजीव झाले आहेत. पेंटिंगमध्ये दिसतो तो हास्य टिकवून असणारा बुद्धाचा चेहरा.

angkorwat

काकांची चित्रं देशीविदेशी पोहचलेली आहेत. एखादं चित्र विकलं गेल्यावर त्याला अलविदा करण्याचा सोहळाही फार सुंदर. 'कॅव्हेस' विकलं गेलं, तेव्हा मी तिथे होते. एका विदेशी माणसाने ते घेतलं. त्या माणसाला औक्षण करून चित्राला त्याच्या हातात फार प्रेमपूर्वक सुपुर्द केलं गेलं. अगदी त्याला गाडीपर्यंत काळजीपूर्वक पोहोचवलं गेलं. जणू 'माझ्या लेकराची काळजी घ्या हं' असच सांगत असावे.
गेली ४० वर्षं ते चित्र काढतायत. चित्रांबरोबरच म्युरल्स हा फॉर्मदेखील ते फार लीलया हाताळतात. त्यांनी बनवलेले भव्य असे म्युरल्स अनेक महत्त्वाच्या ठिकाणांची शोभा वाढवत आहेत.

'अकोला आर्ट अकॅडमी' या संस्थेची स्थापना करून कलेचा प्रसार अगदी सामान्य लोकांपर्यंत करण्याचं महत्त्वाचं काम ते करत आहेत. काकांनी आपल्या करियरच्या सुरुवातीच्या काळात औरंगाबादच्या यशवंत कला महाविद्यालयात अध्यापन केलं. पण पुढे आपल्या गावाच्या ओढीने ते अकोल्याला परतले आणि  तिथेच आपला एक स्टुडिओ उभा केला. काकांचं अकोला प्रेम त्यांच्या ई-मेल आयडीपासून सगळीकडे जाणवतं. विदर्भातील अनेक कलाकारांना त्यांनी एका व्यासपीठावर आणण्याचं महत्त्वपूर्ण काम केलं. दर वर्षी त्यांच्या अकादमीतर्फे भव्य चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलं जातं. विशेषतः अपंगांसाठी त्यांनी केलेलं काम मोठं आहे. मी जवळून पाहिलेल्या बऱ्याचशा कलाकारांना अतिशय समाजविन्मुख आणि आत्मकेंद्री आयुष्य जगताना पाहिलं आहे. पण काकांनी कलाकारांविषयीचे हे रूढ समज पार बदलून टाकले. सामाजिक जाणिवेचा कलाकार म्हणून ते सुपरिचित आहेत.
 
माझी काकांबद्दलची सगळ्यात सुंदर आठवण म्हणजे माझ्या लग्नाच्या आदल्या दिवशी काका सीमंतीसाठी पोहोचले होते. मी तयार होऊन वधुपक्षाच्या एका रूममध्ये तयार होऊन बसलेली. बाहेर नवरोबांची वरात निघालेली देवदर्शनाला. आईबाबा, भाऊ कामात गर्क. माझ्याजवळ घुटमळणाऱ्या बहिणी, मैत्रिणीसुद्धा वरात पाहण्यासाठी निघून गेल्या. मी एकटीच बसलेली. लग्नाच्या आधी मनात एक वेगळीच घालमेल असते. घसा कोरडा पडत होता, गलबलल्यासारखं होत होतं. तेवढ्यात काका मला शोधत रूममध्ये आले आणि माझ्याजवळ येऊन बसले. त्यांच्या हातात त्यांनी माझ्यासाठी बनवलेलं एक वूडन आर्ट आणि काकूंचं एक पेंटिंग होतं. ते मला दाखवलं आणि तिथेच थोडा वेळ बसून राहिले. माझा उतरलेला चेहरा त्यांच्या लक्षात आला असावा. काही न बोलता नुसता त्यांच्या 'प्रेझेन्स'नेच मला खूप बरं वाटलं. मग "कित्ती छान दिसतीये गं नवरीबाई' असं म्हणून मला हसवून माझ्या डोक्यावर हात ठेवून  ते बाहेर निघून गेले. ही आठवण माझ्या मनातल्या एका गोल्डन फ्रेममध्ये चिरंतन राहील.

gadi2

काकांसोबत राहताना सतत जाणवतो तो एक प्रसन्न शांतपणा, सगळ्यांमध्ये राहूनही एक विरक्तपणा . आयुष्याकडे बघण्याचा एक साक्षीभाव. 'अवघा रंग एक झाला ' या त्यांनी लिहलेल्या पुस्तकाचा उल्लेख केल्याशिवाय हे व्यक्तिचित्र अपुरं आहे. काकांचे गुरू श्री वासुदेव महाराज यांच्या कार्यावर लिहलेल्या पुस्तकातल्या परिच्छेदातून काकांची जीवनाविषयीची दृष्टी, चित्रकार म्हणून बघण्याचं वेगळेपण आणि त्यांची समर्पित वृत्ती दिसते. त्यांच्या पुस्तकातला एक परिच्छेद - 'निसर्गाची कमाल पाहा किती अद्भुत. प्रत्येक व्यक्ती भिन्न आहे. एकासारखी दुसरी नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपली अर्धी बाजू आपल्याच दुसऱ्या अर्ध्या बाजूसारखी नाही. हे सांगितले तर चट्कन विश्वास बसणार नाही. समोर मॉडेल बसवून केलेल्या अभ्यासामुळे मला चित्रकलेच्या उच्च शिक्षणादरम्यान असंख्य पोर्ट्रेट तयार करता आली. बारकाईने त्यांचा अभ्यास करता करता हे लक्षात आलं. आरशासमोर उभे राहिल्यास आणि एक उभी काल्पनिक मध्य रेषा मानली किंवा आपला चेहरा वहीने अर्धा झाकल्यास डावी आणि उजवी बाजू भिन्न आहे हे लक्षात येईल...असे सर्वसाधारण रूप जन्मतः लाभते व त्यामध्ये कालानुरूप बदल घडत जातो. कर्मानुसार त्याची वागणूक ठरत जाते. त्यामध्ये विचार, विवेकाच्या भाग मोठा. साथसंगत, पूर्वसुकृत आजूबाजूचे वातावरण, शिकवल्या जाणाऱ्या गोष्टी आणि महत्त्वाचे म्हणजे स्वतःहून आत्मसात केलेल्या गोष्टी त्याचा जीवनक्रम ठरवतात."

प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ मॅस्लोच्या HIERARCHY OF HUMAN NEEDSनुसार अन्न, वस्त्र, निवारा या भौतिक गरजा आणि त्याबरोबर प्रेम आणि सुरक्षितता या मूलभूत गरजा भागल्यानंतर प्रत्येक माणसाला ओढ लागते ती SELF ACTUALISATIONची, 'कोहं?' या प्रश्नाची. तो प्रश्न आपल्याबरोबर आयुष्यभर नुसता जरी बाळगला, तरी आपलं आत्मभान जागं राहायला मदत होते आणि जीवनाच्या कुठल्याही प्रसंगातला साक्षीभाव सुटत नाही. काकांच्या आयुष्यात सुरुवातीपासूनच असणारी आत्मज्ञानाची ओढ त्यांच्या गुरूंच्या सान्निध्यात अधिक उजळून निघाली. 'कोहं?' या प्रश्नाचं 'सोहं' हे जरी उत्तर असलं, तरी त्याला शोधण्याचा प्रत्येकाचा प्रवास वेगळा. इथे एक गोष्ट आठवते... नुकतेच पंख फुटलेलं एक पिल्लू आपल्या आईला विचारतं, "आई, या आकाशाचा अर्थ काय?" आई म्हणते, "तूच शोध बाळा." ते पिल्लू उडून जातं, तेव्हा दुसरं एक पाखरू त्या आईला विचारतं, "या आकाशाचा तर काहीच अर्थ नाही हे का नाही सांगितलंस त्याला?" आई म्हणते, ”त्याच्या शोधाच्या शेवटी त्याला हे कदाचित कळेलही, पण म्हणून तो अर्थ शोधण्याचा प्रवास तो अनुभवू शकणार नाही. आकाश निरर्थक असलं तरी ते शोधण्याचा प्रवास मोठा सुंदर आणि अर्थपूर्ण आहे."

काकांच्या विचारांमध्ये आणि वागण्यात नेहमीच एक सुसंगतता राहिली. त्यामुळेच कदाचित ते आम्हाला आदरणीय वाटत राहिले आहेत. खऱ्या अर्थाने प्रगल्भ होत जाणं काय आहे, हे मी त्यांच्याकडे पाहून शिकते. आयुष्याच्या योग्य टप्प्यावर मनाच्या योग्य अवस्थांना ते अनुभवत आहेत. त्यांच्या आयुष्यातलं समाधान, समर्पित वृत्ती एखाद्या ऋषीसारखी... काकांचा आणि माझा जो काही सहवास राहिला, त्यात हिमनगाचा जो काही भाग मी समजू शकले, तो इथं मांडला आहे. माझ्या आवाक्यापलीकडचे काका अजून शिल्लकच राहतील. खऱ्या अर्थाने ज्ञानी झालेली व्यक्ती अधिक नम्र, अधिक सुलभ होत जाते हे मी त्यांना बघून समजले. माझी त्यांच्याबद्दलची भावना पूर्णपणे कधीच व्यक्त होऊ शकत नाही. शब्द इथे अपुरे पडतात... लहानपणी आजीने सारवलेल्या तुळशी वृंदावनाच्या कोनाड्यात संध्याकाळी ती दिवा लावायची. त्या दिव्याने तो कोनाडा, वृंदावन उजळून निघायचं. ओट्यावर बसून मी त्याच्याकडे बघत राहायची. एखाद्या लख्ख मंदिरातल्या नक्षीदार ,सुंदर ,भव्य दिव्यांपेक्षा मातीचा तो साधासा दिवा मला अधिक आवडायचा. स्वतःत शांतपणे तेवत राहून आजूबाजूचा छोटासा परिसर उजळून टाकत मनात मांगल्याचे भाव जागवणारा तो दिवा. माझ्यासाठी सतीश काका म्हणजे तोच साधेपणा, तेच मांगल्य, तोच शांतपणा आणि तोच तो तुळशीपुढचा दिवा!

प्रतिक्रिया

दिपावलीच्या खूप शुभेच्छा!! दिवाळी अंकात हा लेख आल्याचा फार आनंद होतोय...

आपली ओघवती शैली आवडली.

"माझ्या मनाच्या विस्तीर्ण अंगणात असंख्य रंग एकमेकांचा हात धरून नाचतच असतात. बाहेर पडण्याची प्रत्येकाला घाई झालेली... हा त्यांचा बालिशपणा की समजूतदारपणा... माहीत नाही. पण मी ते होऊ देतो... त्यांचं ते कागदावर किंवा कॅनव्हासवर उतरणं तटस्थतेने पाहणं खूपच इंटरेस्टिंग असतं....!"

सृजनाची आणि सर्जनशीलतेची खूपच छान व्याख्या केली आहे.


"नुकतेच पंख फुटलेलं एक पिल्लू आपल्या आईला विचारतं, "आई, या आकाशाचा अर्थ काय?" .....आकाश निरर्थक असलं तरी ते शोधण्याचा प्रवास मोठा सुंदर आणि अर्थपूर्ण आहे."

...ही रूपककथा तर खूपच छान आहे!!!

लेखन प्रभावी झालेय. एखादे महान व्यक्तिमत्व ताकदवान शब्दांनी चितारणे सोपे नाही. तुम्ही तर मुक्तहस्ते सुरेख शब्द वापरून लेखन केले आहेत.
श्री पिंपळे यांची ओळख आवडली. त्यांनी केलेलं घराचं स्केचिंग आवडलं. बाकी चित्रेही छान आहेत.

खूपच मस्त व्यक्तिमत्त्व आहे.. छान लिहिलंय तुम्ही..

पद्मावति's picture

22 Oct 2017 - 2:17 pm | पद्मावति

एका महान कलाकाराची खूप सुंदर ओळख करून दिलीत.
तुमची सहज सुंदर लेखनशैली आवडते मला खूप.

बाजीप्रभू's picture

22 Oct 2017 - 5:53 pm | बाजीप्रभू

अनुक्रमणिकेत जेव्हा नवल ताईंचं नाव वाचलं तेव्हा खूप आनंद झाला होता. शब्दांचे कुंचले वापरून केलेले एक उत्तम व्यक्तीचित्रण वाचायला मिळणार ह्याची खात्री होती... काही लेखक नो बॉल टाकतच नाहीत... नवलताई त्यांपैकी एक... तुमचे प्रत्येक लेख एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातात.. समृद्ध करतात...
आकाश, पणती ... या उपमा केवळ अप्रतिम..
अतिशय सुंदर लेख... खूप आवडला.. लिहीत रहा ताई.

इतकी मनातून दाद दिल्याबद्दल धन्यवाद !!

अतिशय आवडला लेख. तुम्हीही चित्रकार आहात हे कळल्यावर आनंद झाला. चित्रे फार आवडली. विशेषतः ते संगमरवराच्या पोताचा भास निर्माण करणारं अमूर्त चित्र खूप आवडलं.

पैसा's picture

22 Oct 2017 - 8:52 pm | पैसा

आवडले

माहितगार's picture

22 Oct 2017 - 8:58 pm | माहितगार

+१

नाखु's picture

22 Oct 2017 - 11:12 pm | नाखु

परिचय

पुलेशु

सर्वांचे खूप खूप आभार !!

मित्रहो's picture

23 Oct 2017 - 8:30 pm | मित्रहो

सुंदर ओळख करुन दिली

आनंदयात्री's picture

23 Oct 2017 - 9:06 pm | आनंदयात्री

अ‍ॅब्स्ट्रॅक्ट पेंटिंग म्हणजे हळूहळू रेषा विरघळत जाऊन अगदी कमी शब्दात आशय मांडणारी कविताच असते जणू. त्याची निर्मिती प्रत्यक्ष बघणं खरंच अद्भुत. काकांनी स्वतःच्या चित्रनिर्मिती प्रक्रियेबद्दल लिहिलेलं वाक्य इथे सांगावंस वाटतं - "माझ्या मनाच्या विस्तीर्ण अंगणात असंख्य रंग एकमेकांचा हात धरून नाचतच असतात. बाहेर पडण्याची प्रत्येकाला घाई झालेली... हा त्यांचा बालिशपणा की समजूतदारपणा... माहीत नाही. पण मी ते होऊ देतो... त्यांचं ते कागदावर किंवा कॅनव्हासवर उतरणं तटस्थतेने पाहणं खूपच इंटरेस्टिंग असतं....!"

हा परिच्छेद खूप आवडला. पुढे वाचतांना लेखातली किती वाक्यं क्वोट करू असे झाले म्हणून वाक्यावाक्याला दाद द्यायचा मोह आवरला. तुमचा हा लेख वाचणे हा अतिशय सॅटीस्फाईन्ग अनुभव होता. अजून लिहा, आम्ही वाचायला उत्सुक आहोत.

हा परिच्छेद खूप आवडला. पुढे वाचतांना लेखातली किती वाक्यं क्वोट करू असे झाले म्हणून वाक्यावाक्याला दाद द्यायचा मोह आवरला. तुमचा हा लेख वाचणे हा अतिशय सॅटीस्फाईन्ग अनुभव होता. अजून लिहा, आम्ही वाचायला उत्सुक आहोत.

धन्यवाद ! नक्की लिहीत राहीन.