एका माणसाची गोष्ट

किरण गायकर's picture
किरण गायकर in दिवाळी अंक
20 Oct 2017 - 12:00 am

चिक्या आबा आपली टोकराची लांब काठी टेकत सरकंवरून जाऊ लागला की गावातील उसाट पोरे घरात लपून 'चिक्या, ये चिक्या' असे ओरडायला लागत. म्हाताऱ्याला चिडवून त्याची टिंगल करून त्याच्या शिव्या आइकने हा या उसाट पोरांचा खेळच. चिक्या आबाही मग वयतागून "तुझ्या आयला मी xxx" अशा शिव्या देत दात-ओठ खात तणतणत निघून जायचा.

अंगात मलकट कफनी, खाकी रंगाची हाफ पँट, डोक्यावर गांधी टोपी, खाकेत शबनम बॅग असा चिक्या आबाचा एकूण पेहराव. केसांची पार अनारकली झालेली. तोंडात हिरड्याच शिल्लक राहिलेल्या. असा हा चिक्या आबा रस्त्यावरून जाऊ लागला की उसाट पोरे घरात लपून आरडायची, कारण जर कोणा पोराला प्रत्यक्ष ओरडताना चिक्या आबाने बघितले, तर त्याच्यावर टोकराची लांब काठी फेकून शिव्या ठरलेल्याच.

चिक्या आबाचे मूळ नाव तुकाराम, पण गावातील सगळे त्याला 'चिक्या' या नावानेच हाक मारीत. त्याच्या 'चिक्या' या नावाचीसुद्धा एक कहानीच आहे. एकदा जवळच्या गावात देवीची जत्रा होती. जत्रेत तमाशाचा फड आला होता. तुकाराम चिकुलाल मारवाड्याबरोबर तमाशा पाहायला गेला असता त्या दोघांची इतकी दोस्ती जमली की चिकुलाल मारवाड्याने तुकारामला 'चिक्या' असे नाव ठेवले. पुढे चिकुलाल मारवाडी मरण पावला, पण तुकाराम तिथून पुढे 'चिक्या' या नावानेच ओळखला जाऊ लागला.

चिक्या आबा सोळा-सतरा वर्षांचा असल्यापासूनच शेठलोकांकडे स्वयंपाकी म्हणून काम करू लागला. स्वयंपाक त्याला छान जमायचा - मग तो मटनाचा असो की तरकारी. आज या शेठकडे, तर उद्या त्या शेठकडे असा सतत फिरतीवरच असल्याने तुकारामच्या लग्नाचा योगच कधी आला नाही. त्याची सतत फिरस्ती चालू असायची. मात्र एका बोर्डिंगमध्ये मुलांचे जेवण बनवायचे काम मिळाल्यावर तो स्थिर झाला. तिथेच एका बाईशी त्याचे सूत जमले व तो लग्न न करताच तिच्यासोबत राहू लागला. तीही बोर्डिंगमध्ये साफसफाईचे काम करायची. परंतु ती बाई थोडी नखऱ्याची होती. एकदा तुकारामने तिला एका दुसऱ्या पुरुषाबरोबर पाहिले. त्यावरून त्या दोघांत भांडण होऊन तुकारामने तिला खूप बडवली. लग्नाची बायको नाही म्हणून ती थोडीच त्याच्याकडे राहणार होती? ती तुकारामला सोडून निघून गेली. तुकाराम आता एकटाच राहू लागला.

बोर्डिंगच्या मुलांना उन्हाळ्याची, दिवाळसणाची सुट्टी लागली की तुकारामलाही काही काम नसायचे व म्हणून तो आपल्या गावी लहान भावाकडे यायचा. लहान भावाचे लग्न होऊन त्याला दोन मुलेही होती व ती आता शाळेतही जात होती. तुकाराम सुट्टीत गावी आला की भावाच्या मुलांसाठी भरपूर खाऊ घेऊन यायचा. कारण त्यांच्याशिवाय त्याचे होते तरी कोण?

तुकाराम सुट्टीत घरी आला म्हणजे आपल्या भावाकडे लग्नाचा विषय काढायचा. कारण मोठा असूनही अजून त्याचे लग्न झाले नव्हते.
"लोड्या, आरं, आता मला एकट्यानं राहावत नाय. दीस खायला उठतो, लगीन करावं म्हणतो."
"आरं चिक्यादा, मंग आमी तुला काय नाय म्हणतो का? कर की लगीन." लोड्या काहीसा नाखुशीनेच म्हणाला.
"पण नवरी बगायला गेलो तर घरची मानसं तर संग पायजेत."
"आता आगोट आले. आजून राबनी बाकी हाये. पटकन पानी पडला तर इसपायचं की सगलच. म्हणून म्या काय म्हणतो, ही आगोट जाऊ दे, बगू की पुढच्या टायमाला. शिमगा उगवला की लवकरच जाऊ पोरगी बगायला." लोड्या टाळाटाळ करत म्हणला.

लोड्याला तुकारामचे लगीनच करायचे नवते. कारण तुकारामचे लगीन केले तर त्याला मुले होतील व नंतर तो जागेची वाटणी मागेल. त्यापेक्षा त्याचे लगीनच जर केले नाही तर त्याचा हिस्साही आपल्यालाच मिळेल, असा विचार लोड्या करत होता. शेवटी झालेही तसेच. लगीन शिमग्याला करू, माईला करू असे करता करता वरसं पुढे जात राहिली व तुकाराम आता म्हातारा दिसू लागला. त्यातच तुकारामला मोतीबिंदू झाल्याने त्याची नजरही कमी झाली. शिवाय बोर्डिंगमध्ये जेवण बनवताना धुरामुळे त्याच्या डोळ्यांतून सतत पाणी येऊ लागले. त्यामुळे बोर्डिंग चालकाने त्याला त्याचा पगार देऊन कामावरून काढून टाकले.

आपला बाड-बिस्तरा गुंडाळून तुकाराम गावी आला व लोड्याकडे राहू लागला. जवळ पैसे होते तोपर्यंत लोड्याला आधार दिला. लोड्याची बायकोही "किराणा संपलंय; जरा भावोजींकडून पैकं मागा की, नायतरी आपणच पोसतोय त्याला" असं म्हणून तुकारामकडून पैसे घेऊ लागली. काही दिवसांनी तुकारामकडचे पैसे संपल्यावर, "थेरडा सारका गिळायला बसलाय. इकडं आमचंच खायाचं वांदं झालंत" असं तुकारामला सतत आयकवू लागली.
"चांगला धडधाकट व्हता, तवा इकरं तिकरं भिकोटला व आता हातपाय आडल्यावर भाव दिसला" अशी लोड्याच्या बायकोची तुकारामच्या मागे सारखी भुणभुण असायची.
तुकारामला विड्या फुकायची सवय असल्याने तो रात्रभर खोकत बसायचा.
"मेली रातभर डोळ्याला झोप नाय. हे थेरडं सारकं खोकतंय," लोड्याची बायको लोड्याला म्हणाली.
"मंग काय करू म्या?"
"म्या काय सांगत्ये, आपला ढोरांचा गोठा हाये ना, त्याच्या एका खोपट्यात राहू दे की त्याला. नायतर आपल्या पोरास्नी काई रोग व्हयाचा."

अशा प्रकारे तुकारामची रवानगी ढोरांच्या गोठ्यात करण्यात आली. तुकारामला घरातून बाहेर काढल्यावर त्याच्या जेवणाखाण्याचीही आबाळ होऊ लागली. जेवून उष्टे शिल्लक राहिले, तर ते ताटात वाढून कधीतरी खोपट्यात नेऊन दिले जाई. जेवणानंतर तुकारामचे जेवणाचे ताट व पाण्याचा तांब्याही वेगळाच ठेवला जाई.

एके दिवशी खूप वाट पाहूनही तुकारामला दुपारचे जेवण मिळाले नाही. जेवण होऊन बायामाणसांचा भांडी घासण्याचा आवाज येऊ लागला.
"लोड्या, आरं आज जेवायला मिलंल का नाय?" तुकाराम खोपट्यातून ओरडत म्हणाला. लोड्या व त्याच्या बायकोने जेवून अंग टाकले होते. आवाज ऐकूनही त्यांनी न ऐकल्यासारखे केले. तुकारामच्या पोटात मात्र कावळे ओरडत होते, कारण सकाळी फक्त वाडगाभर कणेरी त्याला मिळाली होती. तुकाराम उठला व काठी टेकत टेकत खालच्या आळीतील भग्याकडे गेला. भग्याची बायको मागच्याच वर्षी वारल्याने व मुलगा बाहेर नोकरीला असल्याने तो एकटाच राहत होता.
"ये भगेदा, काय जेवायचं शिल्लक आहे का?" भग्याचे जेवण होऊन थोडे उरले होते ते त्याने तुकारामला वाढले. जेवण झाल्यावर तुकाराम तेथेच थोडा वेळ खाटेवर पहुडला व भग्याला सांगू लागला, "मामलेदाराला अरजं करून आता म्या माजी जमीनच सरकारजमा करून टाकतो."
"आरं, पण असं का करतुयास?" भग्या चिंतेने म्हणाला.
"माज्या हिश्श्याची जमीन लावून खातात व मलाच खायला देत नाईत" तुकारामचा राग अनावर झाला.
"हे बग चिक्या, असं करू नगंस. तुजाच तर सक्का भाव हाये त्यो. दुसरा तर कोनी लावून खात नाय तुजी जिमिन?" भग्या तुकारामला समजावू लागला.
"आरं, पण लोड्याला त्याची शरम वाटली पायजे."
"चिक्या, शांत व्हय पाहू! असा डोसक्यात राग घालून घेऊ नगंस." भग्याने तुकारामला शांत केले.

ज्या दिवशी लोड्या तुकारामला जेवायला देत नसे, त्या दिवशी तुकाराम गावात कोणाच्याही घरी मागून खाऊ लागला. जसजसे दिवस पुढे सरकू लागले, तसतसे तुकारामला चालता येणेही अशक्य होऊ लागले. तो आता पडाव झाला होता, त्यामुळे खोपट्यातच पडून राहू लागला.
कित्येक दिसापास्न त्याच्या अंगाला पाणी नवते. केसही वाढलेले, त्यामुळे त्याच्या केसात उवा पडल्या. त्यातच तुकाराम एकदा पाय घसरून पडल्याने त्याच्या गुडघ्याला मोठी जखम झाली. गोठ्यातील माश्या त्या जखमेवर बसू लागल्या, त्यामुळे जखम अधिकच चिघळत गेली. जखम पिकून वास येऊ लागला.

एके दिवशी खोपट्यातुन काहीच आवाज येत नाही, ते पाहून लोड्याने आपल्या धाकल्या मुलाला काय झालेय ते पाहायला धाडले, तर ते पोरगे बोंबलतच घरात पळत आले, कारण हाका देऊनही काका उठत नव्हता. लोड्याला समजून चुकले की काहीतरी इपरीत घडलेय. जाऊन पाहतो तर तुकाराम आपल्यास वळकटीवर निपचित पडलेला होता. त्याची प्राणज्योत रात्रीच्या अंधारात कधीच मालवली होती.
लोड्या धाय मोकलून रडू लागला. "आरं भावा, मला सोडून तू कसा गेलास?" रडताना त्याच्या डोळ्यात पाण्याचा एक टिपूसही नव्हता. त्याला मनातून एक असुरी आनंद झाला होता, कारण आता सर्व त्याचेच झाले होते.

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

20 Oct 2017 - 11:12 pm | पद्मावति

उत्तम लेखन शैली. कथेचा मूड अचुक जमलाय.

दुर्दैवाचे दशावतार मांडणारी कथा. आजूबाजूला अशा सत्यघटना पाहण्यात आहेत. त्यामुळे धक्का बसला नाही. पण समाजात अजूनही असे प्रकार घडतात याचं वैषम्य मात्र वाटलं.

पैसा's picture

22 Oct 2017 - 8:47 pm | पैसा

हं

सौन्दर्य's picture

27 Oct 2017 - 12:42 am | सौन्दर्य

कथा चांगली लिहिली आहे, ग्रामीण शब्दांमुळे गावचे वातावरण डोळ्यासमोर उभे राहिले. कथेचा शेवट दु:खद असला तरी अनपेक्षित नव्हता.