महाबळेश्वर-खेड परिसरातील सह्यभ्रमंती : दाभीळटोक घाट आणि निगडा घाट

स्वच्छंदी_मनोज's picture
स्वच्छंदी_मनोज in दिवाळी अंक
17 Oct 2017 - 12:00 am

Header2

'टिंग'.. अर्धवट झोपेतल्या कंडक्टरने बेल मारली आणि झोपेतच आम्हाला म्हणाला, "चला उतरा, उशीर होतोय (???)." बाहेर मिट्ट काळोख. आजूबाजूला कुठेही गावाच्या खुणा नाहीत. कदाचित स्टॉप असावा असे वाटू शकेल अशा टपर्‍यांशेजारी गाडी थांबली. आता दाभीळ फाटा स्टॉप कुठे आहे, हे आमच्यापैकी कोणालाच माहीत नव्हते. गाडीतले लाईट लागले तेव्हा बघितले, तर सगळे झोपले होते. पोलादपूरला कंडक्टरने सांगितले होते की मी सांगतो तिथेच उतरा. करता काय, वरच्या रॅकवरच्या बॅगा घेऊन आम्ही उतरलो.
--------आम्ही आठ जण जमलो होतो एका वेगळ्या वाटेवरच्या रेंज ट्रेकसाठी. जवळजवळ दोन महिने आणि पावसाचा मेन सीझन ट्रेकविना घालविल्यावर एखादा भन्नाट ट्रेक करावा असे मनात होते. कुठे करता येईल? असा विचार करतानाच माझ्या मित्राने काही वर्षांपूर्वी सांगितलेला धबधबा डोळ्यासमोर आला. ह्याला बघायला जायचे, म्हणजे पावसाळ्यातच आणि जायचे तर ह्याला जोडून आणखी काहीतरी हवे, म्हणून हा रेंज ट्रेकचा घाट घातला होता. सावित्री घाट - दाभीळ - किनेश्वर - पार घाट - कुमठे - कुडपण - वडगाव असा हा दणकट दोन दिवसांचा प्लॅन. थोडेसे जुजबी प्लॅनिंग केले होते, पण काय अनुभव आले, कसा सह्याद्री अनुभवला, कसे गावकरी भेटले ते सर्व येईलच पुढे.
-------
दिवस पहिला
उतरलो, तेव्हा पहाटेचे चार वाजले होते किंवा असावेत. दिवसा ऑक्टोबर हीट जरी जाणवत असली, तरी रात्री मात्र मस्त हुडहुडी भरविणारी थंडीच होती. मुंबई सोडल्यावर तर ती जास्तच जाणवत होती. एस्टीने पोलादपूर सोडून महाबळेश्वर रस्त्याला वळण घेतल्यावर ड्रायव्हर जास्तच रंगात आला होता. पाऊस असा नव्हता, पण हवेत मस्त गारवा होता. ज्या ठिकाणी उतरलो, ते ठिकाण कुठे आहे ह्याचा काहीही पत्ता नव्हता. एक माहीत होते की पोलादपूर-महाबळेश्वर रस्त्यावर वाडा-कुंभरोशी गावाच्या अलीकडे दाभीळ फाट्याला उतरून पायवाटेने जायचे. हाच तो सावित्री घाट. (ह्या नावाची काय गंमत झाली ते शेवटी सांगतोच). पण आम्ही उतरलो तिथे कोणी चिटपाखरूही नव्हते. (पहाटे चार वाजता आमच्या स्वागताला कोण असणार म्हणा :) ). नाही म्हणायला, दिवसा चालू असणार्‍या दोन-चार बंद टपर्‍या दिसत होत्या. आमचा प्लॅन होता की जरासे दिसायला लागले की वाट पकडून खालच्या गावात जायचे. पण कसचे काय! आम्हाला कंडक्टरने अशा ठिकाणी उतरवले होते की वाट सोडाच, समोर अशी 'आ' वासून दरी होती :) . आता या दरीतून सावित्री घाट असेल तर आम्ही मेलोच, असा विचार करत मी आणि इम्रान दोन दिशेला रस्ता शोधायला गेलो. पण रस्त्यावरून एक कि.मी. चालत गेलो, तरी कोणालाच खाली उतरायची वाट सापडेना. काय करता, बसून राहिलो तशाच अंधारात. थोड्या वेळाने पाच-साडेपाच वाजता समोरच्या डोंगरावर अचानक लाईट लागला. आम्ही नीट बघितले, तेव्हा समोर एक झोपडे दिसले.
आम्ही बॅटरीच्या उजेडात गप्पा मारत बसलो होतो, तेवढ्यात "ओ, कोणेय?" "थांबा तितंच" करत हाका ऐकू यायला लागल्या. थोड्याच वेळात बॅटर्‍या, कंदील घेऊन काही माणसे खाली उतरायला लागली. नाही म्हटले तरी आम्ही थोडेसे घाबरलोच. थोड्याच वेळात ती लाठ्या काठ्या घेतलेली माणसे आमच्याजवळ आली आणि उलगडा झाला. आम्ही त्यांना घाबरलो होतो आणि ते आम्हाला :) . झाले होते काय, की काही दिवसांपुर्वीच ह्या रस्त्यावरच्या होटेल्सवर काही भुरट्या चोरांचा दरोडा पडला होता. आता इतक्या पहाटे जवळ कुठलाही गाव आणी बस थांबा नसताना बॅटर्‍यावाली माणसे बघितल्यावर त्याना आम्ही भुरटे चोर वाटलो होतो. (कर्म आमचं. नशीब, चौकशी न करता हाणले नाही ते :) :) ). पण ह्या नादात आम्हाला एक वेगळाच फायदा झाला. आम्ही कोण कुठले, कुठे जाणार ते सांगताच गावकर्‍यांनी सांगितले की आम्ही चु़कीच्या ठिकाणी उतरलोय. (आम्हाला ते जाणवायला लागले होतेच.) आणि दाभीळगाव फाटा आणि घाटाची सुरुवात चार कि.मी. पुढे आहे :( :(. त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही होतो तिथूनही एक वाट खाली 'करंदी घाटाने' खाली हळदुले गावात उतरते, पण ती पावसाळ्यात बंद असते.
आम्ही अशा गप्पा मारत होतो, तो गावकर्‍यांच्या घरातल्या बायका आणि मुले हंडे घेऊन खाली रस्त्यावर उतरले. आम्ही विचारले, "आता इथे कुठले पाणी भरणार? ओढ्याचे काय?" उत्तर आले, "ओढा कशाला, टाके आहे ना? लय जुनं हाय." जुने टाके म्हटल्यावर आमचे कान टवकारले आणि आम्ही लगेच ते टाके बघायला गेलो. बघतो तो खरेच, शिवकालीन टाके आणि आत थंडगार पाणी. व्वाव.. लॉटरीच लागली. या वाटेवर असे इथे कुठे टाके असेल असे वाटलेही नव्हते. शिवकालीन टाकी म्हणजे नक्कीच दाभीळ ते प्रतापगड, कुंभरोशी, पार गावाला जोडणारा हा रस्ता. टाके बघून गावकर्‍यांकडून रस्ता समजावून घेत आम्ही कुंभरोशीच्या दिशेने निघालो. नुकतेच उजाडायला लागले होते. इतक्या सकाळी चार कि.मी. चढणाचा डांबरी रोड तुडवणे म्हणजे शिक्षाच की हो. पण काय करता, ती शिक्षा भोगतच, महाबळेश्वरला जाणार्‍या-येणार्‍यांच्या थोड्याशा आश्चर्यकारक आणि बर्‍याचश्या दुर्लक्षित नजरा झेलत जेव्हा चार कि.मी. चालत आलो, तेव्हा एका वळणावर 'दाभीळ फाटा' असा बोर्ड दिसला आणि पायवाटही सापडली. आता स्पष्ट उजाडले होते. समोर महाबळेश्वरची डोंगररांग अंग झटकून सकाळच्या सूर्याचे स्वागत करायला तयार होती.
आम्ही लगेच वेळ न घालवता पायवाटेने चालायला लागलो. साधारण १० मिनिटे पठारावरून सरळ चालत गेल्यावर टोकाशी आलो तो अफलातून नजारा डोळ्यासमोर उघडला गेला. कसल्या जबरदस्त जागी आम्ही उभे होतो! पायाखाली महाबळेश्वरवरून उगम पावणारी सावित्री नदी पूर्ण भरात नागमोडी वाहत होती. सभोवताली आणि तळात सगळीकडे हिरव्या रंगाचे साम्राज्य होते. नदीच्या अल्याड-पल्याड हळदुले, दाभीळ, लहुळसे, करंजे, देवळे अशी गावे आळस देऊन उठत होती. शेते पूर्ण भरात आली होती आणि सूर्याचे तिरपे किरण त्यांचे रंग आणखीनच खुलवत होते. समोर करंजे गावाची डोंगररांग होती, जिच्या पलीकडे ढवळीचे खोरे आणि ढवळे गाव दिसत होते. उजवीकडे जुन्या महाबळेश्वरची डोंगररांग आणि पठार दिसत होते. अगदी उजवीकडे कुंभरोशी, जावळी, दरे एरियाचा नजारा आम्हाला फ्रेश करून गेला. चार कि.मी. चालण्याने आलेला थकवा कधी पळाला, कळलेच नाही.
वाटेवरचे गवत जरी उंच वाढले असले, तरी भराभर वाट पायाखाली घालत आम्ही दाभीळ गावात उतरायला लागलो. झिग-झॅग, मध्येच कड्याकाठाने, मधेच कारवीतून असे तासा-दीड तासात आम्ही गावापाठच्या शेतात उतरलो आणि शेतावरच्या बांधावरून गावात दाखल झालो. प्लॅनप्रमाणे आम्ही जरी लेट (एस्टीच्या कंडक्टरची कृपा :) ) झालो असलो, तरी जरासा जोर केला तर आम्ही आमच्या पुढच्या गावात किनेश्वरला वेळेत पोहोचू शकलो असतो. गावात चौकशी केली, तर कळले की एस्टीशिवाय कुठलेही पब्लिक वाहन गावात येत नाही :( . आमच्या सुदैवाने ८ वाजता पोलदपूरहून एस्टी येणार होती. जरासे चालून एस्टीच्या स्टॉपजवळ आलो आणि जवळचे थोडेसे खाऊन घेतले. ८.३० झाले आणि बस आली. आम्हाला आता पोलादपूर-महाबळेश्वर रस्त्यावरील कापडा गावात उतरून पोलादपूर-किनेश्वर बस पकडायची होती. ९.३०ला फाट्याला उतरलो आणि १०.०० वाजता येणार्‍या गाडीला वेळ आहे म्हणून मिसळीची ऑर्डर देऊन पावाचा पहिला घास घेतला, तो समोर गाडी येऊन ५ सेकंद थांबून आमच्यावर धुळ उडवून निघून गेली. आम्ही बघतच बसलो :) :).
दाभीळ फाट्यावरून दिसणारे पहाटेचे दृश्यDawn with M'Shwar backdrop from dabhil tok
दाभीळटोक घाटाच्या सुरुवातीहून दिसणारे सावित्री नदीचे खोरे आणि पायथ्याची गावेSavitri river basin from ghat top
दाभीळ गावातून दिसणारा सूर्योदय आणि पाठीमागे महाबळेश्वर रांगSunrise from Dabhil village with backdrop of M'shwar range
आता काय? असा विचार करत होतो, तोच एक सिक्स सिटर रिक्शावाला आम्हाला विचारता झाला, "किनेश्वरला जायचंय काय?" आम्ही चकित झालो. म्हटले, हा काय आमची बस चुकायचीच वाट बघत होता की काय? आम्ही त्याला सांगितले की एवीतेवी बस गेलीच आहे, तो आता मिसळ आणि तर्री मन लावून खाऊ दे, मग जाऊ निवांत. सावकाश मिसळ आणि कटींग मारून त्याच्याबरोबर निघालो. मनात एक विचार आला होता की आडच्या फाट्यावर उतरून चालत जावे काय? पण म्हटले, नको. जाऊ तसेच. (पुढे तो निर्णय अत्यंत योग्य ठरला). आडगावाला बगल देऊन मेन रस्ता सोडून आम्ही किनेश्वरच्या 'आड'रस्त्याला लागलो आणि शपथेवर सांगतो - कसला डेंजर रस्ता होता. ही अशी अंगावर येणारी वळणे. एका मागोमाग नुसती वळणेच वळणे. ह्या एवढ्याशा बारीक रस्त्यावरून बस चालवणे म्हणजे कौशल्याची सीमाच. सतत रस्ता चढण चढत होता. आमच्या सहनशक्तीची परीक्षा घेऊन २५ मिनिटांनी रस्ता संपला, तेव्हा किनेश्वर गाव आलेले होते.
किनेश्वर गाव शिवकालापासून प्रसिद्ध आहे ते शिवकालीन शंकर मंदिरामुळे आणि गावात उतरणार्‍या पारघाटामुळे. पार, कुमठे, डोंगर वरदायनी मंदिर करत करत हा जुना पार घाट प्रतापगडावरून खाली कोकणात उतरतो. आम्हाला तोच वर चढून कुमठे गावात जायचे होते आणि पुढे कुडपणला. आमच्यापैकी कुणीच या वाटेने गेले नसल्याने गावात चौकशी केली की कुणी आमच्या बरोबर येईल का? तर धक्काच बसला. "आम्ही येऊ, पण २००० रुपये होतील" अशी स्वच्छ आणि स्पष्ट ऑफर :) :). आता यापूर्वी आम्ही गाईड घेऊन घाटवाटा केल्यात आणि न घेताही केल्यात. पण पार घाट मोडलेला, गवत मरणाचे वाढलेले आणि पूर्वी कोणीच गेले नसल्याने हातातील वेळ बघता गाईडशिवाय शोधाशोध करणे मूर्खपणाचे होते आणि किनेश्वरवाले म्हणत होते की "शहरातले तुम्ही, २००० तुम्हाला जड हयेत व्हय." थोडीशीही घासाघीस करायला तयार न झाल्यामुळे आम्ही परत फिरण्याचा निर्णय घेतला. पारघाट हुकल्याचे दु:ख तर होतेच, पण त्याहून गावकर्‍यांनी दाखवलेल्या माजाचा आणि मस्तीचा राग जास्त होता. गावात आलेल्याला साधे पाणीही विचारण्याचे सौजन्य किनेश्वरवाल्यांनी दाखवले नाही.
-------
आताशा हा अनुभव सर्वत्र यायला लागला आहे. "१००० घेईन", "२००० घेईन", "ते देतात तर तुम्ही का नाई", "तुम्हाला काय कमी" "अर्धाच रस्ता दाखवू" अशी पूर्वी ट्रेकिंग करताना कल्पनाही न केलेली वाक्ये सररास ऐकू यायला लागलीत. दोष कुणाचा यावर चर्चा झडतील, दोन्ही बाजू बरोबर अशी मते व्यक्त होतील, पण हाती येणार्‍या पैशाने आणि शहरातल्या चमचमाटामुळे गावात पैशाचे विष पसरले आहे, हे नक्की. असो.

-------
नशिबाने आम्ही सिक्स सिटरवाल्याला परत पाठवले नव्हते :) . त्याच्याच बरोबर परत त्याच रस्त्याने 'आड'ला आलो. सकाळपासून तीनदा प्लॅन गंडला होता. एकदा बसवाल्याने त्याच्या मर्जीच्या ठिकाणी उतरवले, एकदा किनेश्वर बस समोरून निघून गेली, एकदा किनेश्वरवाल्यांनी झटका दिला. (तसे किनेश्वरहून कुमठ्याला न जाता कोंडोशीवरून कुडपणला डायरेक्ट जाता येते, पण तो पर्यायही प्रचंड गवतामुळे बारगळला होता). पारघाटाने कुमठ्याला जायचा प्लॅन हुकल्याने आता आमच्यासमोर वाडा कुंभरोशीवरून परत एकदा जीप करून कुमठ्याला जाण्याशिवाय पर्याय नव्हता. आम्ही तसेच केले. एका बसमधून कुंभरोशीला उतरून दुसर्‍या जीपमधून कुमठ्यात उतरलो, तेव्हा १.३० वाजला होता. आम्ही आमच्या पूर् नियोजित वेळेत कुमठ्यात दाखल झालो होतो, पण अर्थात पार घाटाचा बळी देऊन :) :)
किनेश्वर गावातून दिसणारा रडतोंडी घाट.मध्यभागी डोंगराच्या पाठीमागे कुमठे गाव.Kineshwar with kumathe at center
कुमठ्यात चौकशी केली तेव्हा कळले की आता कुडपणला जायला अर्ध्यापर्यंत कच्चा रस्ता झालाय. व्वा! हे तर मस्तच काम झाले. रस्ता वळण वळण घेत हळूहळू चढत होता. गाव सोडताच जंगल लागले, त्यामुळे ऑक्टोबर हीटचा त्रास जाणवत नव्हता. आहा, काय मस्त चाल होती. जंगलातून रस्त्याने चालत चढत केव्हा टॉपला आलो, कळलेच नाही. वाटेत एक मोठा सहा-सात फुटी साप आडवा गेला, पण मी काय 'जॅक डनियल' नसल्याने त्याला ओळखता आले नाही :) :) . टॉपला आल्यावर एक रस्ता सरळ कोंडोशीला जातो, तर डावीकडचा रस्ता एक-दीड कि.मी. पुढे एका झोपड्यापर्यंत जातो. आम्हाला डावीकडेच जायचे असल्याने आम्ही न थांबता तसेच पुढे निघालो. रस्ता संपून धनगराच्या झोपड्यापाशी आलो, तर २.३० वाजले होते. सकाळच्या मिसळीने आम्हाला इथपर्यंत तर आणून सोडले होते, पण पुढे जायचे तर जेवणाचा ब्रेक घेणे आवश्यक होते. तिथेच झोपडीच्या सावलीत जेवण केले. मी नको म्हणत होतो तरीही बाकीचे भिडू झोपण्याचा वेळ कमी होतो म्हणून पाचएक मिनिटात जेवण उरकून घोरायला लागलेही. मग मीही त्याना आणि स्वतःला नाराज केले नाही :) :).
३.३० वाजता कसेबसे बळेच उठून कुडपणच्या वाटेला लागलो. वाट पठारावरून आहे आणि पठार शेवटपर्यंत ठळक आहे. पठार संपता संपता समोर सह्याद्रीचा रौद्र पण तेवढाच लोभस कॅनव्हास समोर आला. आम्ही हरखून गेलो. ऐन सह्याद्रीच्या गाभ्यातला, सह्याद्री पर्वतरांगेच्या क्रेस्टलाईनवरचा हा प्रदेश. कुठे कुठे चुकार गावे सोडली, तर तसा निर्मनुष्यच. आत्ता कुठे गाडीचाकांचा स्पर्श इथल्या निसर्गाला होतोय. डावीकडून उजवीकडे नजर फिरवली, तर नजर संपेपर्यंत घनदाट जंगलच जंगल. डावीकडे अस्पष्टसा मधु मकरंद दिसत होता, हातलोट घाट जाणवत होता, समोर नवप्रसिद्ध भिवाची काठी सुळका आणि खडशीचा धबधबा (ह्याचा खास उल्लेख पुढे येईलच) दिसत होता, पायथ्याशी कुडपण गावाची कौलारू घरे आणि भातशेती दिसत होती. पण पुढे नजर जाईल तिकडे अफाट जंगल, खोल खोल दर्‍या. ढग दरीत उतरले होते. पलीकडे सूर्य अस्ताला चालला होता, पायाखालच्या पठारावर मऊ हिरवे गवत पायांशी खेळ करत होते. आहाहा... नजरबंदी व्हावी तशी आम्ही तिथे त्या क्षणाला ते सर्व डोळ्यांतून पिऊन घेत होतो आणि तरीही समाधान होत नव्हते.
पठार संपले, जंगल उतार सुरू झाला आणि वाट गायब झाली. पण आम्हाला आता तशी फार चिंता नव्हती. एकतर ५.३० वाजले होते आणि खाली कुडपणची घरे दिसत असल्याने अंधार पडायच्या आत गावात पोहोचू शकणार होतो. थोडे इकडे, तिकडे करत खाली उतरायची वाट शोधत असताना अगम्य भाषा बोलणारे एक आजोबा गुराखी तिथे आले. त्यांनीच मग योग्य वाट दाखवली. त्या वाटेच्या घसार्‍यावरून वाटेतल्या एका धनगराच्या झापावरून ४५ मिनिटात कुडपण गावात एंट्री मारली. गावात देवळाची चौकशी करता कळले एक देऊळ ओढ्यापलीकडे आहे. गावातल्या एका घरी गरमागरम चहाची विनंती करून १५ मिनिटांत गावाबाहेरच्या देवळात दाखल झालो, आणि पहिल्या दिवसाचा ट्रेक संपवला, तेव्हा ६.३० झाले होते.
देवळात आलो, तर देऊळ बघून आश्चर्यचकित झालो. इतक्या आडवाटेला रिमोट गावात इतके मस्त देऊळ असेल असे वाटलेच नव्हते. भिंतीना मस्त रंग दिलेला, चकचकीत संगमरवरी लाद्या, नवीन पंखे, नवीन लाईट बघून हे नुकतेच जिर्णोद्धारित मंदिर आहे हे कळले. मंदिराशेजारून एक डोंगरातून येणारा थंडगार पाण्याचा ओढा वाहात होता. मग काय, वेळ न दवडता बॅगा एका कोपर्‍यात लावून तिकडेच पळालो. मस्त आंघोळ करून आलो तो दिवसभराचा सगळा शिणवटा पळून गेला होता. आजच्या दिवसात बरेच काही घडले होते. अचानक सापडलेले पाण्याचे टाके, अनावश्यक करायला लागलेली पायपीट, दाभीळ टोकावरून दिसलेले सावित्री खोर्‍याचे नयनरम्य दृश्य, चुकलेली बस, किनेश्वरचा कडवट अनुभव, कुमठे ते कुडपण मस्त चाल, कुडपण पठारावरून अनुभवलेला सह्याद्री आणि सरतेशेवटी रात्री पाठ टेकायला असे मस्त मंदिर. व्वाह!
कुमठाहून कुडपणकडे जाताना पाठीमागे दिसणारा प्रतापगड आणि पारगावPratapgad seen from road of Kumathe to Kudpan
कुडपणकडे जाणारा कच्चा रस्ताRoad to Kudpan from kumathe
कुडपण पठाराहून होणारे मुख्य सह्यधारेचे आणि कोकण खोर्‍याचे होणारे पहिले दर्शनFirst view of Kudpan and Kokan valley enroute to Kudpan
कुडपणकडे जाणारा रस्ताEnroute to Kudpan
कुडपणकडे उतरण्यापूर्वीचे शेवटचे पठार.Platue before Kudpan final descent. Center mountain of Kumathe
कुडपण पठार. मध्यभागी इंग्लिश व्ही म्हणजे कुडपण ३वरून वडगावला उतरणारा म्हारखिंडीचा रस्ताKudpan Platue. Center V is Mharkhind to Vadgaon
कुडपणकडे उतरणारा शेवटचा टप्पा. मध्यभागी भिवाची काठी सुळका आणि निगडा घाट. फोटोच्या मध्यभागी सर्वात पाठीमागे वडगाव.Final descent to Kudpan. Center pinnal is Bhivachi kathi and valley is nigada ghat. Exterme backdrop is vadgaon
पण दिवसाचा शेवट इथेच झाला नाही. आणखी धक्के बाकी होतेच. देवळातल्या घडाळ्याने सातवर काटा नेला आणि लिटरली "हर हर महादेव"च्या आवेशात घटना घडल्या. अचानक गाभार्‍यापासून सभामंडपातले आणि आजूबाजूचे लाईट लागले, नगारा सुरू झाला, स्पीकरवर भजन सुरू झाले. आम्हा सगळ्यांना हे असे अचानक काय झाले हे कळेचना. विचार केला की कुठेतरी एकच बटन असेल आणि संध्याकाळच्या पुजार्‍याने ते चालू केले असेल. पण ७.३० झाले, तरी मंदिरात कोणी येईचना. मग आम्ही बुचकळ्यात पडलो. ७.४५ झाले तशी जसे एकदम सुरू झाले होते, तसे एकदम सगळे बंद झाले. आम्ही टरकलोच, म्हटले, ही काय भानामती झाली?? ८.०० वाजता एक गावकरी आम्ही सांगितलेला चहा घेऊन आला, पण तो तर नॉर्मल वाटत होता :) :) . आमचा त्याला पहिलाच प्रश्न की हे काय होते? त्याचे अतिशय कॅज्युअल उत्तर - "ह्या, ते होय. ते टायमरवर चालते".. हे भगवान.. कुडपणसारख्या अतिशय दुर्गम खेड्यात असे टायमरवर ऑपरेट होणारे देऊळ आणि त्याची व्यवस्था आम्ही कल्पिलेही नव्हते.
तो गावकरी आला थोडाच वेळ, पण आमचा मस्त बनलेला मूड खराब करून गेला. पहिल्यांदा त्याने आम्हाला घाबरवले, म्हणाला की तुम्ही ज्या वाटेने कुमठ्यावरून आलात त्या एरियात हल्ली अस्वलांचा आणि रानडुकरांचा वावर भयानक वाढला आहे. तुमचे नशीब की तुम्ही सुखरूप आलात. असे म्हणून त्याने गेल्या आठवड्यातल्या एका गावकर्‍याच्या झालेल्या शिकारीचा फोटो मोबाइलवर दाखवला. अत्यंत भयावह दृश्य, एका सुळेवाल्या रानडुकराने त्याला अक्षरशः उभा फाडला होता. जागच्या जागी खलास :( :( . हे बघितल्यावर आम्ही किती सुदैवी ठरलो याची आम्हाला जाणीव झाली. त्याला विचारले की उद्या आम्हाला इथून वडगावला जायचे तर कोकणात कसे उतरू? त्याचा प्रतिप्रश्न, "वडगावला उतरून काय करणार?", "तिथून पुढे खेड आणि पुढे मुंबई" - आम्ही. "मंग मुंबईला जायला वडगावला कशाला जायला लागतेय? इथूनच १०ची पोलादपूर एस्टी पकडा आणि जा की मुंबईला." जा की काय कप्पाळ. आता आम्ही त्याला आमचा प्लॅन समजावण्याच्या भानगडीत पडलो नाही. विचारले की इथून वडगावला जायला वाटा किती? त्याच्या म्हणण्यानुसार दोन, महारखिंडीची एक वाट आणि दुसरी निगडा घाटाची. महारखिंडीची वाट पावसाळ्यात अतिशय अडचणीची आणि लांबची. निगडा घाट जवळचा पण जंगलातला. पण प्रॉब्लेम असा होता की शेतीची कामे आणि शहराकडे गेलेले असल्याने वाटेने सोबतीला येणारे गावातले कोणी नव्हते. अस्वलाच्या आणि रानडुकरांच्या भीतीने आम्हीही गावकर्‍यांशीवाय जायचा धोका घेऊ इच्छित नव्हतो.
शेवटी नाइलाजानेच चौथ्यांदा प्लॅनमध्ये बदल करून सकाळी लवकर उठून फक्त कुडपणशेजारचा खडशीचा धबधबा आणि भिवाची काठी सुळका बघून १०.०० च्या गाडीने पोलादपूरमार्गे परतायचे ठरले. मग बॅगेतले रेडी-टू-ईट काढून जेवून झोपून गेलो.
-------
दिवस पहिला समाप्त
------
दिवस दुसरा
सकाळी जाग येण्याकरता वेगळे काही करावेच लागले नाही. देवळाचा टायमर होता ना :) . ठरल्याप्रमाणे सकाळी ६.००ला सगळे सुरू झाले :) . भिवाची काठी सुळका आणि खडशी धबधबा कुडपण गावापासून थोडासा लांब आहे. रस्त्यावरून पोलादपूरच्या दिशेला गेल्यावर १ ते १.५ कि.मी.वर आणखी एक कुडपण आहे. ही कुडपण बौद्धवाडी, तिथेच हा धबधबा आहे आणि एक्झॅकटली समोर भिवाची काठी सुळका. (हा सुळका साधारण ६०० फुट आहे आणि मुख्य डोंगररांगेपासून सुटावलेला आहे. यावर आरोहणदेखील झाले आहे.). तसे तिसरे कुडपणही आहे, त्याला 'मोर्‍यांचे कुडपण' म्हणतात. ते डोंगराच्या पलीकडे आहे. आम्ही राहिलो ते कुडपण बु. किंवा शेलारांचे कुडपण. (पूर्वी ह्या तिन्ही गावांना कुडपण १, कुडपण २, कुडपण ३ अशी सिंपल नावे होती :) :) ).
देवळातून बाहेर पडून डांबरी रस्त्याने कुडपण १कडे चालायला लागलो, अर्धा रस्ता चालल्यानंतर सगळा नजारा समोर आला. काय जबरदस्त व्ह्यू.. अफलातून.. वर्णन करायला शब्द अपुरे. डावीकडे भिवाची काठी, उजवीकडे खडशी धबधबा, मध्ये प्रचंड खोल दरी आणि तळापासून समोर लांबवर पसरलेले वेडेवाकडे घनदाट जंगल. समोरच्या जंगलाच्या टोकाला कुठेतरी वडगाव होते. जरा पुढे गेलो तर खडशी धबधबा समोर आला. पाऊस उणावल्याने बारीक धारेचा जरी पडत असला, तरी मी इतकी वर्षे भटकताना बघितलेल्या धबधब्यात याचा नंबर फार वरचा. वरुन तो जो सुटलाय, तो सरळ थेट १००० फूट दरीत कोसळतो. ऐन पावसाळ्यात रौद्र पण लोभसवाणा दिसतो. याचे आंतरजालावर फोटोही उपलब्ध आहेत.
कुडपण गावKudpan Village. This is Kudpan 2
खडशी धबधब्याचा पहिला व्ह्यूKhadshi waterfall first view
खडशी धबधबा, भिवाची काठी सुळका, जगबुडी नदीची दरी आणि वडगावKhadshi waterfall, bhivaci kathi, jagbudi valley and vadgaon
इथे फोटोग्राफी करून पुढे गेलो, तो कुडपण १ वस्ती लागली. कोणाच्यातरी घरी चहा प्यावा म्हणून आम्ही वस्तीवर गेलो, तर गावकरी म्हणाले, "इकडे कुठे?" मग सगळा सविस्तर प्लॅन त्यांना सांगितला आणि वडगावला कोकणात उतरता येत नसल्याचे दु:खदेखील बोलून दाखवले. मग अचानक काय कसे झाले, पण बोलण्याची गाडी अचानक निगडा घाट उतरण्याकडे वळली. फासे मनाजोगते पडले म्हणा की आणखी काही, गावातला एक जण त्याच्या दिवसभराच्या मजूरीवर यायला तयार झाला. आम्ही नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. पण मुख्य अडचण वेळेची होती. आत्ता वजले होते ९.००. वडगावला खेडवरून एस्टी येते १.३० वाजता. म्हणजे आमच्या हातात होते जेमतेम ४ तास. आमच्या गावकर्‍यांच्या मते जर आम्ही त्याच्या चालीने चाललो, तर साडेतीन-चार तासांत वडगावला पोहोचणे शक्य होते. बरोबरच्यांचा कौल घेतला. सगळे एका पायावर तयार झाल्यावर चहा घेऊन ९.३० ला निघालो. ह्या बौद्धवस्तीतूनच एक वाट खडशी धबधब्याच्या टॉपला जाते, तिकडे दुर्लक्ष करून पलीकडील भिवाच्या काठीकडे नजर टाकून निघालो. वस्तीच्या पाठीमागे भातशेती आहे, तिथेच एका मळ्यात माझा पाय भसकन फूटभर एका मोठ्या खेकड्याच्या बिळात गेला आणि मी शेतात आडवा झालो :) . मला लागले नव्हते, पण सगळा चिखलात बरबटलो होतो. तसाच पुढे निघालो.
वस्तीच्या पाठीमागे लगेचच निगडा घाट सुरू होतो. हे दिसते तेवढे साधे प्रकरण नाही, हे लगेच लक्षात आले, कारण घाट सुरू झाल्या झाल्या पहिल्या वळणांवरच आम्ही ८-१० फूट खाली उतरलो. अक्षरशः एकमेकांच्या डोक्यावरून उतरतोय की काय, असा भास व्हावा असा ग्रॅडिएंट होता. पण थांबायला वेळ कुठे होता? अंधुकशी वाट झाडाझुडपांतुन जात होती आणि बरी होती म्हणण्यापेक्षा एकच होती आणि गावकरी पुढे होता. तो तर सटासट स्लीपरवर उड्या मारत झाडे बाजूला करत जात होता आणि आम्ही त्याच्या मागे धडाधड उतरत होतो. वाटेच्या एकंदर अवस्थेवरून असे वाटत होते की शिकारी किंवा अस्सल भटके ट्रेकर याशिवाय ह्या वाटेचा कोणी क्वचितच वापर करत असेल. आम्ही दुसर्‍या प्रकारातले, तर आमच्या गावकरी पहिल्या प्रकारातला :) :). धबधब्याला समांतर एकेक पावलाला ३-४ फूट उतरत चाललो होतो. चाललो होतो म्हणण्यापेक्षा उभे उतरत होतो. शेजारीच खडशी धबधबा जणवत होता आणि मधूनच त्याचा आवाज येत होता. असाच एक तास उतरल्यावर पार तळात आलो आणि पहिली सपाटी आली. इथे दोन वाटा फुटत होत्या - डावीकडची वाट धबधब्याच्या पायथ्याला जात होती (गावकर्‍यांच्यामते तिथे मोठे कुंड आहे आणि बारमाही पाण्याचा साठा. शिकारीच्या वेळेला त्यांचा तो रात्रीचा अड्डा.) आणि सरळ जाणारी वडगावकडे. आम्ही सरळ जाणारी वाट पकडली आणि जंगलात घुसलो.
रच्याकने : हा धबधबा आणि भिवाची काठी यांच्यामधली दरी म्हणजेच खेडच्या प्रसिद्ध जगबुडी नदीचा उगम.
जंगल कसले, ते मिनी अॅमेझॉनच होते ते. पायाखालची अस्पष्ट अशी वाट, ओला पालापाचोळा तुडवत आम्ही चालत होतो. २ तास झाले होते निघाल्यापासून, पण जराही ब्रेक घेतला नव्हता. एका बर्‍या ठिकाणी बघून आम्ही १० मिनिटे विसावा घेतला. पाठीमागे वळून बघितले, तर आम्ही कसे आलो ते कळत होते. समोर नाळ (हाच तो निगडा घाट, जो उतरून आम्ही आलो होतो), शेजारी दरी आणि पलीकडे भिवाची काठी सुळका. हाच धबधबा, दरी, सुळका काही तासांपूर्वीच आम्ही वरून बघितला होता आणि आता खालून बघत होतो. डोळे फिरवणारे दृश्य होते ते. दरीच्या पायथ्याला नदीशेजारी घनदाट जंगलाच्या मध्यभागी असा ब्रेक घेणे ही कल्पनाच जरी जबरी रोमांचकारी असली, तरी आम्हाला जास्त वेळ घालवून चालणार नव्हता. एव्हाना आमचे आणि गावकर्‍याचे मस्त ट्यूनिंग जमले होते. आता पार नदी पळाशी आल्याने जंगल चालत राहणे हाच एक कार्यक्रम राहिला होता.
असे जात असताना प्रथमच नदी ओलांडायची वेळ आली. मग तिथे संधी न दवडता फ्रेश झालो. अहाहा... नदीचे वाहते जंगलातील थंड पाणी. सुख अगदी... :) . पलीकडील तीरावर आल्यावर जंगल चालण्याचा कार्यक्रम परत चालू. असेच १० मिनिटे चालल्यावर परत नदी ओलांडून अलीकडे आणि परत सुरू. असे दोन-तीन वेळा घडले. तुम्हाला सांगतो, गावकर्‍यावर १००% विश्वास होता, म्हणून बिनधास्त चालत होतो त्याच्यामागून. गावकरी घेतला नसता, तर आम्हाला हे वडगाव निगडा घाटाचे कोडे सोडवणे अशक्य होते. हा भागच असा आहे ना, की माहीतगाराशिवाय या अशा भयकारी जंगलात शिरणे म्हणजे जिवाशीच खेळ. केवळ गावकरी होता, म्हणून आम्ही आरामात चालत होतो. साधारण एक तास असे चाललो असू, तरी गावाच्या खुणा काही येईनात. पण आता पुर्वी कधीतरी वहिवाटीतील असावेत असे वाटणारे शेतांचे चौकोनी तुकडे सुरू झाले होते. असे वाटत होते की वडगाव जवळच आहे, पण आमचा गाईड "वडगाव आले हो" हे शब्द काही उच्चारायला तयार नव्हता. सकाळी ७ला चाल सुरु केली होती आणि आत्ता वाजले होते १२.३०. छोटे छोटे एखाद-दोन ब्रेक सोडले, तर सतत चालत होतो. शेवट १ वाजायला आल्यावर गावाच्या खुणा दिसायला लागल्या आणि अखेरीस १.१५ वाजता वडगावला पोहोचलो.
निगडा घाटाची सुरुवातNigada Ghat Start
निगडा घाट उतरतानाNigada ghat Descenet
अत्यंत घनदाट जंगलातून निगडा घाट उतरताना. मध्यभागी वडगाव गावाची दिशा.Nigada Ghat Descent with Dense jagbudi valley. center is vadgaon
वाटेवरचे घनदाट जंगल. निगडा घाट उतरून तळाशी आल्यावर रस्ता अशा नदीकाठाने जंगलातून वडगावकडे जातो.Dense jungle enroute to vadgaon. Route goes from center
जगबुडी नदी आणि जंगल.Dense jungle with Jagbudi River
जगबुडी नदी.Jagbudi River
निगडा घाट उतरून आलो ती नाळ मध्यभागी.Nigada ghat adjescent to center mountain top
भिवाची काठी सुळका तळातूनBhivachi Kathi from bottom
घनदाट जंगलातून वडगावकडे जाताना.Route through dense jungle towards vadgaon
वडगावकडे. फोटोच्या मध्यभागीच्या डोंगराच्या पाठीमागे वडगाव गाव आहे.Towards vadgaon which is behind center mountain
वडगाव गावाची घरे दिसायला लागल्यावर गाईडला बिदागी देऊन परत पाठवले आणि १.३०ची एस्टी पकडायला निघालो. तो बस स्टॉपही गावाच्या पार पलीकडे होता. १.३०ला - म्हणजे निघाल्यापासून बरोब्बर चार तासांनी वडगाव बस स्टॉपवर पोहोचलो. कसला परफे़क्ट अंदाच वेळेचा! अर्थात हा अंदाज चुकला असता, तर वडगावात वस्ती करण्याशिवाय पर्याय नव्हता, कारण १.३० वाजताची ही शेवटची एस्टी होती खेडला जाणारी. पाठीमागे वळून बघितले, तर केवळ अफलातून, अशक्य अशी वाटणारी चाल अशा भयाकारी घनदाट जंगलातून केवळ स्थानिक गावकर्‍याच्या भरवशावर आम्ही हाणली होती.
--------वडगाव सह्यकुशीत अगदी अंतर्भागात डोंगरदरीच्या बेचक्यात वसले आहे. गाव तसे मोठे, खेडवरून बस येते (येते म्हणजे काय, तर एस्टी हेच प्रवासाचे एकमात्र साधन, कारण इथून खेडला पोहोचायला अडीच तास लागतात. म्हणजे इथल्या लोकांना शहराचा पहिला संपर्क अडीच तास लांब आहे :( ), वीज आहे, पण एकंदरीतच बेसिक सुविधांची कमरतता.
--------
हे वडगाव म्हणचेच ट्रेकर्समध्ये प्रसिद्ध असणार्‍या महिपतगडाच्या पूर्वेकडील पायथ्याचे गाव. महिपतगडावरून वडगावला यायला अशीच साडेतीन तासांची जंगल वाटचाल करावी लागते. १.३० वाजताची बस चक्क १.४५ वाजता आली आणि यू टर्न करून निघून गेली. आम्ही बघतच बसलो. नंतर कळले की शेजारच्या वस्तीपर्यंत जाऊन परत फिरून येणार आहे. २० मिनिटांत ती परत फिरून आली आणि आम्हाला खेडला घेऊन गेली. खेडला उतरल्यावर शहरी झटके बसायला सुरू झाले. मुंबईची एकही बस न थांबणे, प्रचंड गर्दी, मग अशाच कुठल्यातरी बसमधून उभ्याने पेण, पनवेल करत मुंबई गाठणे यात नेहमीप्रमाणेच घरी पोहोचायला रात्रीचा १ वाजला.
पण खेड ते मुंबई हा प्रवास त्रासदायक झालाच नाही, कारण आम्ही ह्या दुनियेत नव्हतोच मुळी! आम्ही हरवलो होतो दाभीळ टोकावर, किनेश्वरच्या गवतात, कुमठ्याच्या वाटेवर, कुडपणच्या ऑटोमॅटिक देवळात ( :) ), खडशी धबधब्याच्या अजस्रपणात, भिवाच्या काठीच्या भव्यपणात, निगडा घाटाच्या निबिड अरण्यात. असे हरवण्यातही असणारे सुख सह्याद्रीतल्या ट्रेकिंगने आम्हाला असंख्य वेळा दिलेय.
"सह्याद्रीतल्या २ दिवसातल्या टॉनिकवर शहरातले २८ दिवस आरामात जातात, हे इतक्या वर्षांच्या अनुभवाने आम्हाला कळून चुकलेय :) ".
भेटू अशाच एका ट्रेकला.
लेखनसीमा.
--------
ह्या लेखासाठी मोदक आणि वल्ली यांचे आभार. खासकरून वल्लीचे. त्यांनीच मागे लागून लागून हा लेख माझ्याकडून लिहून घेतला.
सर्व फोटो माझ्या मोबाइल कॅमेर्‍यातून...
रच्याकने : दोन वर्षांपूर्वी हा ट्रेक केल्यापासून ह्या वर्षीच्या पावसाळ्यापर्यंत मी आमच्या पहिल्या केलेल्या घाटाला सावित्री घाटच समजत होतो. पण माझा एक ट्रेकर मित्र पावसाळ्यात ह्या भागात ट्रेक करून आला आणि त्याने खातरी केली की आम्ही केला तो दाभीळ टोक घाट आणि सावित्री घाट दुसरा आहे, पण सध्या अनेक वर्षांमध्ये कोणी न गेल्यामुळे संपूर्ण मोडला आहे. काही का नाव असेना, नाव बदलले म्हणून आमच्या आनंदात शतांशानेही फरक पडला नाही :)
--------------

Footer

प्रतिक्रिया

व्वा... काय वर्णन केले आहेस. भारी..!!!

वडगाव सह्यकुशीत अगदी अंतर्भागात डोंगरदरीच्या बेचक्यात वसले आहे. गाव तसे मोठे, खेडवरून बस येते (येते म्हणजे काय, तर एस्टी हेच प्रवासाचे एकमात्र साधन, कारण इथून खेडला पोहोचायला अडीच तास लागतात. म्हणजे इथल्या लोकांना शहराचा पहिला संपर्क अडीच तास लांब आहे :( ), वीज आहे, पण एकंदरीतच बेसिक सुविधांची कमरतता.

२००९ साली कोकणदिव्याला जाताना गारजाईवाडीत मुक्काम ठोकला होता.. त्यावेळी हेच विचार डोक्यात आले होते. वाईट गोष्ट म्हणजे आपत्कालीन वैद्यकीय सुविधेसाठीही गारजाईवाडीतून घोळ किंवा रायगडला उतरणे हाच सर्वात जवळचा मार्ग..
पुण्यापासून फक्त ६० किमी आणि वीजही पोहोचलेली नाही..
विषण्ण वाटले होते. :(
(आता गारजाईवाडीला रस्ता झाला आहे असे ऐकले आहे.)

समर्पक's picture

17 Oct 2017 - 1:37 am | समर्पक

सह्याद्री अनुभवणे नेहमीच थरारक असते. मस्त लेख!
ऑटोमॅटिक देऊळ... हाहाहा... नवे बदल वाचून अश्चर्य वाटले...!

फोटो तर एक्दम जुन्या आठ्वणीत घेऊन जाणारे... खूप छान!

जुइ's picture

17 Oct 2017 - 4:23 am | जुइ

खुमासदार शैलीतील वर्णन आवडले! सह्याद्रीचा निसर्ग जितका अवलौकिक आहे तितकेच तेथिल अनुभव थरारक.

मनिमौ's picture

17 Oct 2017 - 11:29 am | मनिमौ

कौतुक वाटते तुमच्या स्टॅमिनाचे. रच्याकने ऑटोमॅटीक देऊळ फारच आवडले अगदी हहपुवा

भ ट क्या खे ड वा ला's picture

17 Oct 2017 - 1:04 pm | भ ट क्या खे ड वा ला

परत ट्रेकिंग करावे से वाटू लागले आहे ..
बस एव्हढच म्हणेन .

स्वाती दिनेश's picture

17 Oct 2017 - 5:55 pm | स्वाती दिनेश

सुंदर वर्णन!वाचता वाचताच ट्रेक ला जावेसे वाटायला लागले .फोटोही छान!

पण खेड ते मुंबई हा प्रवास त्रासदायक झालाच नाही, कारण आम्ही ह्या दुनियेत नव्हतोच मुळी! आम्ही हरवलो होतो दाभीळ टोकावर, किनेश्वरच्या गवतात, कुमठ्याच्या वाटेवर, कुडपणच्या ऑटोमॅटिक देवळात ( :) ), खडशी धबधब्याच्या अजस्रपणात, भिवाच्या काठीच्या भव्यपणात, निगडा घाटाच्या निबिड अरण्यात.

हे बाकी अगदी पटलंच..

स्वाती

राघवेंद्र's picture

17 Oct 2017 - 9:41 pm | राघवेंद्र

असे लेख वाचून मागील १०-१२ वर्षे पुन्हा एकदा निसर्गाच्या सानिध्यात जगली पाहिजेत असे वाटते.

मस्त झालाय लेख.

balasaheb's picture

18 Oct 2017 - 8:38 am | balasaheb

खुप मस्त

अभिजीत अवलिया's picture

18 Oct 2017 - 9:33 am | अभिजीत अवलिया

मस्त ट्रेक आणि सुंंदर फोटो.

arunjoshi123's picture

18 Oct 2017 - 2:54 pm | arunjoshi123

मस्तच.

हेम's picture

18 Oct 2017 - 4:06 pm | हेम

एक्दम जबरदस्त वर्णन केलंयस मनोज! निम्म्याच्यावर वर्णन तुझ्याच तोंडून ऐकलंय तरी वाचतांना नव्याने अनुभव मिळाला.

सविता००१'s picture

18 Oct 2017 - 4:29 pm | सविता००१

लेख अन फोटो. मस्तच

गामा पैलवान's picture

18 Oct 2017 - 6:52 pm | गामा पैलवान

काय जबरी भटकंती केलीये राव तुम्ही. आमची बोटं गूगल म्याप्सवरनं फिरून फिरून थकली. पण सगळं बघायला मिळालं हां. अगदी वडगाव बुद्रुकच्या आधीचे शेतीचे चौकोनी तुकडे सुद्धा दिसले. तेव्हा कसला आनंद झाला म्हणून सांगू!

-गा.पै.

लेखन आणि फोटो दोन्ही मस्तच! अजूनही या भागात जंगल शिल्लक आहे हे वाचून बरं वाटलं. पण निसर्गाचा र्‍हास होऊ न देता सोयीही व्हायला हव्यात.

शीर्षकात चुकून दाभोळ वाचलं. दापोली-दाभोळ रस्त्यावर निगडे गाव आहे. तिकडे कोणते घाट अश्या विचारात पडले होते :)

प्रचेतस's picture

19 Oct 2017 - 8:42 am | प्रचेतस

जबरदस्त भ्रमंती. पायाला भिंगरीआहे तुझ्या :)

हा सर्वच परिसर व्हर्जिन आहे एकदम. अफाट सुंदर. इथल्या गावांचे गावपण हरवत असलेले जाणवतेय.

जगबुडीचा उल्लेख वाचून श्रीनांचे 'तुंबाडचे खोत'च डोळ्यांसमोर येते.

अजूनही कित्येक घाटवाटा तुझ्या लेखणीतून आमच्या समोर यायच्या राहिल्या आहेत तेव्हा लवकरच लिहिता हो. निदान त्यांचे डॉक्युमेन्टेशन अवश्य कर. बर्‍याचश्या जुन्या वाटा आता मोडल्या आहेत, त्या विस्मृतीत जाण्याआधी त्यांचे दस्तावेजीकरण करणे गरजेचे आहे.

स्वच्छंदी_मनोज's picture

24 Oct 2017 - 11:36 am | स्वच्छंदी_मनोज

होय, ह्या सगळ्या नाहीतर निदान सद्य स्थीतितील चालू घाटवाटांचे डॉक्युमेंटेशन करणे गरजेचे आहेच.

ह्यातल्या अनेक घाटवाटा ह्या हळुहळु मागे पडत चालल्यात. अगदी दुर्गम खेड्यापर्यंतही झालेले रस्ते नेटवर्क, हातात असलेली खाजगी आणि सार्वजनीक प्रवासाची साधने, लोकांचा अनुत्साह, जंगलात फिरण्यास आलेली बंधने, बांधलेली धरणे या आणि अश्या कारणाने या वाटा एकतर साफ मोडल्यात किंवा फार वर्षांमध्ये यांचा वापर झालेला नाही.

हे असेच चालू राहीले तर घाटवाटा या पुरत्या मोडून लोकांच्याही विस्मरणात जातील हे नक्कीच. पण चित्र अगदीच निराशादायीही नाही. किल्ले, लेणी या बरोबरच जुन्या, अनगड घाटवाटांकडे ट्रेकर्स, निसर्ग अभासक यांची हल्ली इकडे नजर वळलेली आहे आणि नवनवीन वाटा धुंडाळण्यात येत आहेत.

होय, ह्या सगळ्या नाहीतर निदान सद्य स्थीतितील चालू घाटवाटांचे डॉक्युमेंटेशन करणे गरजेचे आहेच.

यांत कांही मदत लागली तर बिन्धास्त सांग रे. दिलीपलाही घेऊ मदतीला.

दुर्गविहारी's picture

25 Oct 2017 - 12:55 pm | दुर्गविहारी

घाटवाटांवर डॉक्युमेंटेशन करणे खरच गरजेचे आहे. एकतर स्थानिक गावकरीही सुखासीन झालेले असल्यामुळे बरेच घाट आणि रानवाटा मोडल्या आहेत. निदान या ठिकाणी अशी वाट होती ईतकी माहितीची नोंद असली तरी पुरे.
हे काम सध्या काही भटके करत आहेत. प्रिती पटेल या लोकप्रभामधे नियमित घाटवाटांवर लिहीतात. पण त्याचे अपडेटस का कोण जाणे त्यांच्या ह्या ब्लॉगवर नसतात
तंगडतोड (डॉ. प्रिती पटेल)
मी तशी त्यांना विनंती केली आहे. बघुया ब्लॉग अपडेट करतात का.
बाकी मि.पा.वर हे काम व्हायला हवे आहे. नक्कीच तुम्ही हे करु शकाल.

माम्लेदारचा पन्खा's picture

20 Oct 2017 - 1:44 pm | माम्लेदारचा पन्खा

काय अनुभव . . . . . काय शैली . . . . . .
और आंदो . . . . !!

सिरुसेरि's picture

20 Oct 2017 - 7:38 pm | सिरुसेरि

माहितीपुर्ण प्रवास लेखन .

पैसा's picture

23 Oct 2017 - 9:32 pm | पैसा

जबरदस्त!

स्वच्छंदी_मनोज's picture

24 Oct 2017 - 11:36 am | स्वच्छंदी_मनोज

प्रतीसादा बद्दल सर्वांचे धन्यवाद .. _/\_

पाटीलभाऊ's picture

24 Oct 2017 - 1:50 pm | पाटीलभाऊ

लेखन आणि फोटो...मस्त.

दुर्गविहारी's picture

25 Oct 2017 - 12:49 pm | दुर्गविहारी

अत्यंत उत्कॄष्ट ट्रेक वर्णन !!! जिओ.
घाईत प्रतिसाद द्यायचा नाही असे ठरवले होते. धागा उत्तम आहे. पण काही गोष्टी थोड्या खटकल्या त्या आधी लिहीतो.
एक तर भटकंतीचा धागा आणि तोही सह्याद्रीतील, साहजिकच फोटोंची उणीव जाणवली. त्या शिवकालीन टाक्याचा फोटो हवा होता असे वाटते.
दुसरी महत्वाची कमी म्हणजे ट्रेकरुटचा नकाशा. नकाशा असता तर नेमका कसा प्रवास केला हे चटकन डोळ्यासमोर येते. थोडा आगावूपणा करून तुमच्या भटकंतीचा नकाशा मी पोस्ट करतो.
map
नकाशात तुमचा ट्रेकरुट निळ्या रंगात तर हुकलेला पार घाट लाल रंगात दाखविलेला आहे.
आता धाग्याविषयी लिहीतो. मुळात हा ट्रेक ऑक्टोबरसारख्या काळात करणे फारसे योग्य आहे असे मला वाटत नाही. या काळात उंच वाढलेले गवत आणि त्यात कोकणात असणारी दमट हवा त्रासदायक ठरतात.
जर किनेश्वरला जायचे होते तर दाभिळचा का समवेश केला हे ही समजले नाही. असो.
किनेश्वरचा अनुभव मात्र विदारक आहे. हल्ली सह्याद्रीत हा अनुभव वारंवार येतो आहे. आपल्यातलेच काही महाभाग याला कारणीभुत आहेत ज्यांनी या लोकांना हि सवय लावली. या गिरीपुत्रांना पैसे मिळावेत यात काही शंका नाही , पण अडवाअडवी व्हावी हे समर्थनीय नाही. पारघाट हुकला हे वाईट झाले तरी पुन्हा केव्हातरी करता येईलच.
वडगावच्या देवळाचा अनुभव भन्नाट आहे. मजा वाटली.
खडशी धबधब्याविषयीची माहिती श्री. प्रशांत कोठावडे यांच्या ह्या ब्लॉगमधे आली आहे.
Vadgaon-Kudpan-Pratapgad -- The Sublime Trail Trek -- Part II

Vadgaon-Kudpan-Pratapgad -- The Sublime Trail Trek -- Part I
भिवाची काठी ह्या सुळक्यावर क्लायबिंगची माहिती सांगाती सह्याद्रीचा या पुस्तकात आहे.
बाकी या परिसरातील जंगल जबरदस्त घनदाट आहे हे दिसतच आहे. हा ट्रेक करायला नक्की आवडेल. खुपच सुंदर वर्णन तुम्ही केलेले आहे.
अजून असेच घाटवाटांवर लिहा. पु.ले.शु.

मित्रहो's picture

26 Oct 2017 - 10:23 pm | मित्रहो

जबरदस्त भटकंती आहे. फोटो पण सुंदर