जीना यहाँ, मरना यहाँ...

अभिदेश's picture
अभिदेश in दिवाळी अंक
20 Oct 2017 - 12:00 am

एक टिपिकल सकाळ. डोळ्यांवर अजूनही असलेली झोप. कोणीतरी हाका मारून उठवतंय. आपल्याला उठवत नाहीये, पण नाइलाज आहे. कसंबसं उठून, अर्धवट झोपेत ब्रश सुरू झालाय आणि तिकडे रेडियोवर 'भूले बिसरे गीत' सुरू झालंय. लता गातेय - कधी 'राजा की आएगी बरात...', तर कधी 'बरसात मे हमसे मिले तुम...'. सत्तरच्या दशकात जन्मलेल्यांच्या आणि खासकरून सकाळची शाळा असलेल्यांच्या घरातलं हे अगदी रोजचं दृश्य. सकाळपासून सुरू झालेला रेडिओ हा रात्री छायागीत, बेला के फूल ऐकूनच बंद व्हायचा. त्या काळी रेडिओ हा मध्यम आणि निम्न मध्यमवर्गाच्या आयुष्याचा अगदी अविभाज्य घटक. नंतर साधारण ७८-७९च्या सुमारास घरात टेलिव्हिजनचं आगमन झालं. इतके दिवस नुसती ऐकलेली गाणी अचानक प्रत्यक्ष दिसायला लागली. रेडिओमुळे गाण्यांचं संगीत, गायक आवडायचे आणि आता प्रत्यक्ष चित्रीकरण बघून पडद्यावरचे कलाकार आवडू लागले. हळूहळू रेडिओ मागे पडायला लागला. तरीही सकाळी रेडिओ हवाच, त्यामुळे 'भूले बिसरे गीत' ऐकू येतंच होतं. नंतर पुढे उच्च शिक्षणासाठी घरापासून दूर गेल्यावर अचानक रेडिओ पुन्हा एकदा मेन स्ट्रीममध्ये आला, पण ह्या वेळेस नुसतं संगीत आणि गायक नाही, तर गीतकारालासुद्धा बरोबर घेऊन. जसजशी गाणी अधिक बारकाईने ऐकायला लागलो, नुसती चालच नाही तर गीतांचे शब्ददेखील ऐकायला लागलो, तसं लक्षात येऊ लागले की खूप साऱ्या गाण्यांमध्ये बराच अर्थ दडलाय. मग गाण्यांचे शब्द ऐकण्याचं हे वेड वाढतच गेलं. हळूहळू मग गीतकारांची माहिती होऊ लागली आणि मग लक्षात आलं की आपल्याला आवडणारी बरीचशी गाणी एकाच गीतकाराची आहेत आणि एवढंच नाही, तर त्याने आपला प्रत्येक मूड पकडणारी गाणी लिहिलीयेत. तो गीतकार म्हणजे कवी शैलेंद्र.

शंकरदास केसरीलाल नावाने रावळपिंडीत जन्मलेला, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत वाढलेला, जातीयवादाचा शिकार झालेला, रेल्वे वर्कशॉपमध्ये नोकरी करणारा, सिनेमा आणि सिनेसंगीत यांच्याबद्दल तिटकारा असणारा, पण शैलेंद्र ह्या टोपणनावाने कविता करणारा अपघाताने किंवा नाइलाजाने सिने गीतकार बनतो काय आणि अवघ्या १६-१७ वर्षांच्या व्यावसायिक कारकिर्दीत आख्ख्या चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवतो काय - तेही साहिर, हसरत, मजरूह, शकील ह्या दिग्गजांच्या स्पर्धेला तोंड देत..... सगळंच विलक्षण!

हलाखीच्या परिस्थितीमुळे शैलेंद्रच्या परिवाराने रावळपिंडीहून मथुरेला प्रस्थान केलं. तिथे त्यांचे मोठे भाऊ रेल्वेत नोकरीत असल्यामुळे कुटुंबाला आधार होता. तिथेच सरकारी शाळेमधून ते इंटर पास झाले, तेही राज्यात (उ.प्रदेश) तिसऱ्या क्रमांकाने. पुढे शिकायची खूप इच्छा होती, पण घरच्या परिस्थितीमुळे नोकरी करावी लागली आणि ते मुंबईला माटुंग्याला रेल्वे वर्कशॉपमध्ये ट्रेनी म्हणून रुजू झाले. कसं काय ते कोणास ठाऊक, पण त्यांना लहानपणापासूनच कविता लिहिण्याचा आणि डफ वाजवण्याचा छंद लागला होता. खूप उदास वाटायला लागलं की दूर कुठेतरी यमुनातीरी एकटंच बसून कविता लिहायचे, नाहीतर डफ वाजवत बसायचे. (हे डफलीप्रेमच एक दिवस त्यांना राज कपूरचा अत्यंत जिवलग मित्र बनवणार होतं. इतकं की राज कपूरनी पडद्यावर अनेक गाण्यांत डफली वाजवली - श्री ४२०, जिस देश मी गंगा ... इत्यादी). मथुरेत असतानाच साधना, हंस, नया युग इत्यादी मासिकांत त्यांच्या कविता प्रकाशित व्हायला लागल्या होत्या आणि त्या लोकांना आवडतही होत्या. मुंबईत आल्यावर खाण्या-पिण्याचा प्रश्न तर सुटला, पण मशीनच्या कोलाहलात खूप घुसमट होत होती. त्यांच्यातला कवी आतल्या आत कुढत होता. कवितेवरचं प्रेम काही कमी झालं नव्हतं. पण काय लिहायचं आणि कोणासाठी? हा साधारण १९४२चा काळ. स्वातंत्र्यचळवळ अगदी शिखरावर होती. सगळीकडे भारत छोडो आंदोलन, 'करो या मरो'चे नारे चालू होते. ह्या वातावरणाचा शैलेंद्रच्या मनावर परिणाम झाला नसता तरच नवल. त्यांनीही आंदोलनात भाग घेतला आणि तुरुंगवासही भोगला. त्याच वेळेस ठरवलं की आता लेखणीही ह्याच कामासाठी वापरायची. डफली घेऊन तेही इप्टाच्या (इंडिअन नॅशनल थिएटरच्या) नाटकांमध्ये आपल्या स्वातंत्राविषयीच्या, क्रांतिकारक कविता लिहू लागले, म्हणू लागले. पुढे स्वातंत्र्य तर मिळालं, पण फाळणीची किंमत चुकवून. उद्विग्नतेने आणि अत्यंत दुःखी अंतःकरणाने त्यांनी लिहिलं -
सुन भैया, सुन भैया
दोनो के आँगन एक थे भैया
कजरा और सावन एक थे भैया
ओढ़न पहरावन एक थे भैया
जोधा हम दोनों एक ही मैदान के
परदेसी कैसे चाल चल गया
झूठे सपनों में हमको छल गया
वो डर से घरसे निकल तो गया
पर दो आँगन कर गया मकान के

अनेक कविसंमेलनं, मुशायरे ह्यांमधून त्यांचं काव्यवाचन, गायन चालूच होतं. अशाच एका कविसंमेलनात ते त्यांची प्रसिद्ध 'जलता है पंजाब हमारा ... ' ही कविता सादर करत असताना त्यांना पृथ्वीराज आणि राज कपूर ह्यांनी ऐकलं. हाच तो त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण. काव्यवाचनानंतर राज लगेच शैलेंद्रना भेटला, म्हणाला, " मी आग नावाची फिल्म करतोय. माझ्या फिल्मसाठी गाणं लिहिशील?" ताडकन शैलेंद्र म्हणाले, "नही. मै पैसों के लिये नहीं लिखता. अशी कोणतीच गोष्ट तुझ्याकडे नाहीये की ती मला तुझ्यासाठी गाणं लिहायला उद्युक्त करेल. जेव्हा मला वाटेल तेव्हाच मी लिहीन." राज म्हणाला, "हरकत नाही. काही मदत लागल्यास सांग."

रेल्वेच्या नोकरीत तुटपुंज्या पगारात कसंबसं आयुष्य चालू होतं आणि त्या वेळच्या रिवाजानुसार घरून लग्न करण्यासाठी सतत विचारणा होत होती. लांबच्या नात्यातली असलेल्या शकुंतलाबरोबर त्यांचं मन जुळलं आणि दोघांचं लग्न झालं. लग्नातसुद्धा सगळ्यांनी बोल लावले, कारण नवऱ्यामुलाकडे घालायला धड कपडेसुद्धा नव्हते. पण शकुंतलाने आणि तिच्या घरच्यांनी खूप साथ दिली. लग्न तर झालं, पण मुंबईमध्ये दोघं राहू शकतील अशी जागा आणि आर्थिक परिस्थिती नव्हती. चारच दिवसांत ते एकटे मुंबईला परतले आणि रोज पत्नीच्या आठवणीत व्याकूळ होत होते. शेवटी परळला रेल्वे कॉलनीत एक छोटीशी खोली त्यांना कशीबशी मिळाली आणि त्यांचा संसार सुरू झाला . वर्षभरातच नव्या पाहुण्याची चाहूल लागली. घरी आधीच चणचण, त्यात कोणाचा आधार नाही, त्यामुळे बाळंतपण शकुंतलेच्या माहेरी - झाशीला - करायचं ठरलं. बायकोला माहेरी पाठवायलासुद्धा पैसे नव्हते. अचानक त्यांना राजचे बोल आठवले आणि तडक ते त्याला भेटायला त्याच्या महालक्ष्मीच्या (तेव्हा आर के स्टुडिओ नव्हता) ऑफिसात गेले. दारवानाला सांगितलं, "जा, जाऊन सांग, कवी शैलेंद्र भेटायला आलेत." राज जेव्हा भेटायला आला, तेव्हा त्याला शैलेंद्र खूप दु:खी, तणावात, चिडलेले वाटले. शैलेंद्र ताडकन म्हणाले, "तू मला त्या दिवशी भेटायला आला होतास. आठवतंय?" राजने "हो" म्हणताच ते म्हणाले, "मला आत्ता ५०० रुपयांची गरज आहे. तुला जे काम करून घ्यायचं असेल ते करून घे." राजने तत्काळ पैसे दिले आणि इथूनच एका महान पर्वाला आणि दोस्तीला सुरुवात झाली. जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत ही दोस्ती टिकली.

काही दिवसांनी शेलेंद्र राजकडे पुन्हा गेले, खिशात हात घातला आणि ५०० रुपये काढले. राजने ते पाहिलं, पैसे परत केले, चेहर्‍यावर मिश्कील हास्य आणून म्हटलं, "अरे बाबा, बरसात बनवतोय. दोन गाणी लिहून दे." शैलेंद्रनी जी दोन गीतं लिहिली, त्यापैकी एक बारसातचं टायटल साँग बनलं, जे भारतीय सिनेमाच्या इतिहासातलं पहिलं शीर्षक गीत (टायटल साँग) मानलं जातं - 'बरसात में हमसे मिले तुम सजन, तुमसे मिले हम, बरसात में...' इथून पुढे मग शैलेंद्रने कधी मागे वळून पाहिलंच नाही. घरातदेखील पैशांची कमी पडली नाही, जणू काही घरीसुद्धा 'पैसों की बरसात' सुरू झाली. नवीन बांधलेल्या बंगल्याचंदेखील नाव ठेवलं गेलं 'रिमझिम'. इथूनच मग पुढे राज कपूर, शैलेंद्र, शंकर-जयकिशन असं त्रिकूट जमलं ते अगदी शेवटपर्यंत. आवारा, आह, चोरी चोरी, श्री ४२०, अनाडी ते मेरा नाम जोकरपर्यंत. एक दिवस राज बळेच शैलेंद्रना घेऊन गेले के. अब्बासांकडे, चित्रपटाची कथा ऐकायला. अब्बासनी ह्या साधारण दिसणाऱ्या आणि अतिसामान्य कपडे घातलेल्या शैलेंद्रकडे अजिबात लक्ष दिलं नाही... हा कोण, काय करतो हेदेखील विचारलं नाही. अब्बासनी दोन-अडीच तास कथावाचन केलं आणि मग राजने शैलेंद्रना विचारलं, "क्यों कविराज, कुछ समझे?" शैलेंद्र म्हणाले, "हो, चांगली आहे कथा." पण राज म्हणाला, "नही.. और बताओ, क्या समझ में आया?" शैलेंद्र एकदम म्हणाले, "बेचारा गर्दिश मे था, पर आसमान का तारा था, आवारा था।" हे ऐकून अब्बासनी एकदम चमकून पाहिलं आणि विचारलं, "राज, हा नक्की कोण आहे? नीट ओळख करून दे. माझ्या अडीच तासांच्या कथेचं सार ह्याने एका वाक्यात सांगितलं." अशा रितीने आणखी एका अजरामर शीर्षक गीताचा जन्म झाला. शैलेंद्रनी तर पुढे अनेक शीर्षक गीतं लिहिली. इतकी की त्यांच्यापेक्षा कोणी चांगलं शीर्षक गीत लिहिणारा अजून जन्मलाच नाही. उदा., 'बरसात में हमसे मिले तुम सजन..', 'आवारा हूं ...', 'सबकुछ सीखा हमने, ....... , सच है दुनियावालो के हम है अनाड़ी... ', 'चाहे कोई मुझे जंगली कहे ...', 'मेरे मन की गंगा और तेरे मनकी जमुना का ... संगम होगा के नहीं...', 'भैया मेरे राखी के बंधन को निभाना... छोटी बहेन को ना भुलाना...', 'हम उस देस के वासी हैं जिस देस में गंगा बहती हैं...', 'दिल अपना और प्रीत परायी, किसने हैं ये रीत बनायी...' एकाच वाक्यात सांगायचं, तर 'ही वॉज किंग ऑफ टायटल साँग्ज'.

शेलेंद्रचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अतिशय सोपे पण गहन अर्थ मांडणारे शब्द, तरीही गेयता असलेलं गीतलेखन. आता हेच उदाहरण घ्या ना - लोकशाहीचं अगदी सोपं वर्णन करणारं हे गाणं - 'होंगे राजे राजकुंवर, हम बिगड़े दिल शहजादे, हम सिंघासन पर जा बैठे, जब जब करे इरादे...' थोडीशी डावी विचारसरणी असलेली त्यांची लेखणी सामाजिक विषमता, दारिद्र्य, शोषण ह्याविषयी कायमच हळवी राहिली आणि ते त्यांच्या गीतांमधून, कवितांमधुन हे विषय घेऊन लिहीतच होते. लहानपणी वाट्याला आलेला संघर्ष, गरिबी ते कायम पडद्यावर मांडायचे. श्री ४२०चं हे गाणं - 'छोटे से घर के गरीब का बेटा, मै भी हूं माँ के नसीब का बेटा, रंज और गम बचपन के साथी, आँधियो में जली जीवनबाती, भूख ने बड़े प्यारसे पाला... दिल का हाल सुने दिलवाला .. ' घ्या, किंवा दूर गगन की छावमेमधलं हे 'कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन' घ्या. तसंच सरळ आणि सोपे शब्द वापरून जीवनविषयक सूत्र सांगणारी अनेक गाणी त्यांनी लिहिली. सीमामधलं 'तू प्यार का सागर है, तेरी एक बूंद के प्यासे हम...' किंवा बंदिनीमधलं 'ओ जानेवाले हो साके तो लौट के आना' आणि अनाडीमधल्या 'सबकुछ सीखा हमने'मधला हा अंतरा घ्या - 'असली नकली चेहरे देखे, दिल पे सौ सौ पहेरे देखे, मेरे दुखते दिल से पूछो, क्या क्या ख्वाब सुनहरे देखे... टूटा जिस तारें पर नज़र थी हमारी, सबकुछ सीखा हमने...', तिसरी कसममधलं 'सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है, ना हाथी हैं ना घोड़ा हैं, वहा पैदल ही जाना है'... किती किती उदाहरणं द्यायची....

एकाच शेलेंद्रमध्ये अनेक कवी वास करून होते. एकीकडे क्रांतीची कविता, जीवनातल्या अनेक कटू प्रसंगांतून गेल्यामुळे जीवनविषयक निराळी दृष्टी असलेली कविता, तर त्याच वेळेस अतिशय हळुवार अशी प्रेमगीत असलेली कविता. प्रेमगीतांचं म्हणायचं झालं, तर यहुदीमधलं 'ये मेरा दिवानापन है, या मोहोब्बत का सुरूर...', मधुमतीमधलं 'दिल धडक धडक के कह रहा है आ भी जा, तुम्हारी हो चुकी हूं मै...', चोरी चोरीमधलं 'ये रात भीगी भीगी, ये मस्त समाये...', काला बाजारचं (हे गाणं काडेपेटीच्या तालावर सुचलेलं शीघ्रकाव्य.) 'खोया खोया चांद, खुला आसामां...', आणि पडद्यावरचं सर्वोत्तम प्रेमगीत 'प्यार हुआ इकरार हुआ है , प्यार से फिर भी डरता है दिल... आणि अजरामर झालेली त्यातलीच ही ओळ 'हम ना रहेंगे, तुम ना रहोगे, फिर भी रहेगी निशानिया....'

एवढंच नाही, तर नवं नवे शब्द वापरूनही गाणं लिहिण्याचा त्यांना नाद होता. उदा. 'जिंदगानी' हा आधी कधीच न वापरलेला शब्द. नेहमीचे शब्द म्हणजे जीवन, जिंदगी. पण जिंदगानी हा अतिशय गेय शब्द वापरून लिहिलेलं श्री ४२०चं 'मुडमुड के ना देख मुडमुडके, जिंदगानी के सफर मी तू अकेला ही नही है...' किंवा आहमधलं 'छोटीसी ये जिंदगानी रे, चार दिन की जवानी तेरी' ऐका, कानाला किती गोड वाटतं.

जशी शंकर-जयकिशनबरोबर त्यांची जोडी जमली, तशीच एस.डी . बर्मनबरोबरही छान जोडी जमली आणि त्यांनी एकत्र अनेक चित्रपट केले. पण ह्या जोडीचा सर्वोच्च आविष्कार म्हणजे 'गाइड'. खरं तर गाइडची गाणी हा एक स्वतंत्र लेखाचाच विषय आहे. एकापेक्षा एक सरस अशी ९ गाणी, एकीकडे 'वहाँ कौन है तेरा, मुसाफिर तू जायेगा कहा', 'रामा मेघ दे, छाया दे'सारखी करुण रसातली, तर दुसरीकडे 'गाता रहे मेरा दिल', 'तेरे मेरे सपने अब एक रंग हैं' यासारखी प्रणयप्रधान गाणी. तसंच सगळी बंधनं तोडून सांगणारं, मुक्त 'काटो से खीचके ये आचल, तोड के बंधन बांधी पायल...', तर तसंच विरहरसातली लागोपाठ येणारी 'मोसे छल किये जा', 'क्या से क्या हो गया'. पण सर्वोत्तम हे 'दिन ढल जाये हाये , रात ना जाय'.. प्रेमभंगामुळे, अपेक्षाभंगामुळे उद्ध्वस्त झालेल्या नायकाच्या मनःस्थितीचं अतिशय परिणामकारक वर्णन करणारं. माझ्या मते भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासांत सर्वोत्तम ५ गाण्यांपैकी एक. दिग्दर्शक विजय आनंद, देव आनंद, एसडी, शैलेंद्र असेच एका गाण्याच्या प्रसांगाबद्दल चर्चा करत बसले होते. विजय आनंद सांगत होता, "नायिका नायकावर रागावलीये आणि त्याच्याशी बोलत नाहीये, त्याला टाळतीये. नायकाला हे सहन होत नाहीये, अत्यंत विमग्न अवस्थेत तो बसलाय. बाहेर पाऊसही पडतोय. इथे मला एक गाणं पाहिजे." शैलेंद्रनी डोळे मिटले आणि झरझर शब्द लिहिले -

प्यार में जिनके, सब जग छोड़ा और हुए बदनाम
उनके ही हाथों, हाल हुआ ये, बैठे है दिल को थाम, अपने कभी थे अब हैं पराये

नंतर येणारं हे कडवं -

ऐसी सी रिमझिम,ऐसी फ़ुहारें , ऐसी ही थी बरसात ,
खुद से जुदा और जग से पराये, हम दोनो थे साथ, फिर से वो सावन अब क्यों ना आये

मग शेवटचं कडवं , अक्षरश: काटा आणणारं

दिल के मेरे, पास हो इतने, फिर भी हो कितने दूर
तुम मुझसे, मै दिलसे परेशां, दोनों हैं मजबूर, ऐसे में किसको कौन मनाये

आणि सगळ्यात शेवटी लिहिलेला हा मुखडा

दिन ढल जाएं, हाये रात ना जाय
तू तो ना आये तेरी याद सताये , दिन ढल जाएं

सलाम त्या शैलेंद्रला आणि रफीला. कधीही हे गाणं ऐकलं आणि आपली कुठलीशी एक हळवी आठवण जागी झाली नाही असं होत नाही . कोणाला सांगूनही खरं वाटणार नाही की हे आख्खं गाणं शैलेंद्रनी अवघ्या अर्ध्या तासात लिहिलंय. हेही शैलेंद्रचं एक वैशिष्ट्य. कधी कोणतीच अडचण त्यांना गीतलेखनापासून रोखू शकली नाही. एकदा लिहिता लिहिता त्यांच्या पेनामधली शाई संपली, दुसरं पेन जवळ नाही, तर काडेपेटीतल्या खाली पडलेल्या १०-१२ जळलेल्या काड्या उचलल्या आणि सुपरहिट गाणं लिहिलं 'ए मेरे दिल कही और चल, गम की दुनियासे दिल भर गया, ढूंढ ले अब कोई घर नया...'

शैलेंद्रनी नुसती चित्रपट गीतंच नाही, तर अनेक गैरफिल्मी कवितासुद्धा लिहिल्या, ज्या कधी प्रकाशित झाल्याच नाहीत. त्यामुळेच त्यांना साहिर, कैफी आझमी यांच्यासारखा सरकार दरबारी कधीच सन्मान मिळाला नाही, ह्याचं खूप दुःख वाटतं. समाजानेसुद्धा थोडीसुद्धा परतफेड केली नाही, ह्याचं राहून राहून वाईट वाटतं.

अशा ह्या शेलेंद्रनी पडद्यावर एक कविता जिवंत करण्यासाठी जिवाचं रान केलं, आपलं सर्वस्व अर्पून एक काव्यात्मक कथा पडद्यावर जिवंत केली.... 'तिसरी कसम.' बिहारचे सुपुत्र फणीश्वरनाथ 'रेणू ' ह्यांनी एक कथा लिहिली 'मारे गये गुलफाम', जी शेलेंद्रनी वाचली आणि लगेच रेणूंना एक चिठ्ठी लिहिली आणि ह्या कथेवर चित्रपट करण्याची परवानगी मागितली. रेणूंनी होकार देताच शैलेंद्रनी त्यांना १०,०००/- रुपये देऊन हक्क विकत घेतले आणि रेणूंना चित्रपटाची पटकथा लिहायला सांगितली. ही १९६० सालाची गोष्ट. चित्रपटाच्या नायकासाठी राज कपूर सोडता कोणी दुसरा कोणी डोळ्यापुढे येणं शक्यच नव्हतं. राजनेही होकार दिला, पण दिग्दर्शन करण्यास असमर्थता व्यक्त केली, कारण तेव्हा तो दुसर्‍या चित्रपटात व्यग्र होता. नायिका म्हणून वहिदा रेहमान नक्की झाली. दिग्दर्शकाचा शोध बासू भट्टाचार्यापाशी संपला. मोठ्या उत्साहात चित्रपटाचा मुहूर्त झाला. शैलेंद्रचा पहिलाच चित्रपट म्हणून सगळ्या चित्रपटसृष्टीने खूप कौतुक केलं. पण ह्या ना त्या कारणामुळे चित्रपट रखडत गेला. तब्बल ५ वर्षं झाली, तरी चित्रपट पूर्ण होत नव्हता. खूप लोकांनी त्यांना फसवलं. खर्च ४-५ लाखांवरून २५-२६ लाखांवर गेला. फिल्म एडिट करायलासुद्धा पैसे उरले नव्हते. ते अखंड कर्जात बुडालेले होते, पण त्यांना ती फिल्म चालण्यावर खूप विश्वास होता. त्याच वेळेस रेणूदेखील आजारपणामुळे त्यांच्या मूळ गावी परतले आणि शेलेंद्र एकदम एकटे पडले. शेवटी कशीबशी फिल्म पूर्ण झाली. खरंच दृष्ट लागावी अशी झाली होती. गाणी तर एकापेक्षा एक. बैलगाडीवान हिरामण आणि नौटंकीत नाचणारी हिराबाई ह्यांच्यामधल्या अव्यक्त आणि असफल प्रेमाची कहाणी. राज आणि वहिदा दोघांनी जीव तोडून कामं केली. पण ही फिल्म सर्वसामान्य लोकांसाठी नव्हतीच. वितरकांनी हात आखडता घेतला. कोणीच फिल्म रिलीज करायला तयार नव्हतं. लावलेली सगळी पुंजी अक्षरश: मातीमोल झाली होती. ह्या धक्क्यातून शैलेंद्र सावरलेच नाहीत. शेवटी एक-दोन वितरक उत्तर प्रदेशात आणि बिहारमध्ये फिल्म रिलीज करायला तयार झाले. आपली फिल्म मोठ्या पडद्यावर बघणं, प्रीमिअर शो करणं हे स्वप्नचं राहिलं.

असाच एक दिवस स्वतःला कसंबसं सावरून शैलेंद्र राज कपूरला भेटायला गेले. दोघेही नुसतेच एकमेकांकडे बघत नुसते गप्प बसून राहिले, निःशब्द. शेवटी मृतवत मनाने ते घरी आले. आता जगावंसं वाटत नव्हतं. एवढी हार कधीच झाली नव्हती. ह्या दिवसापासून त्यांनी कोणाशीही बोलणंच टाकलं. आतल्या आतच घुसमट वाढत होती. १३ डिसेंबरची सकाळ. शैलेंद्रची अस्वस्थता वाढतच चालली होती. शेवटी शकुंतलानी राज कपूरला फोन लावला. त्याने लगेच शैलेंद्रना डॉक्टर कपूरकडे न्यायचा सल्ला दिला. हॉस्पिटलमध्ये निघालेच होते, वाटेत शैलेंद्रना वाटलं, एकदा राज कपूरला भेटून घ्यावं. दोघं भेटले, भरपूर गप्पा झाल्या. राजने विचारलं, "रे कविराज.. जीना यहा, मरना यहा, इसके सिवा जाना कहा.. कब पूरा कर राहे हो?" राज तेव्हा 'मेरा नाम ज़ोकर'मध्ये व्यग्र होता. शैलेंद्र हसून म्हणाले, "कल का तमाशा निपटा लूँ, तभी पूरा कर लूंगा..." दुसऱ्या दिवशी राज कपूरचा वाढदिवस होता आणि नेहमीप्रमाणे त्याची जंगी पार्टी. शैलेंद्रचा इशारा ह्याच गोष्टीकडे होता.

नंतर मग हॉस्पिटलला पोहोचले, डॉक्टरांनी लगेच अ‍ॅडमिट केलं. तब्येत ढासळलीच. कशीबशी रात्र सरली. दुसर्‍या दिवशी सकाळपासूनच त्यांना राजला भेटून त्याचं अभिष्टचिंतन करावंसं वाटत होतं, पण डॉक्टर सोडायला तयार नव्हते. राजची पत्नी कृष्णा आणि गायक मुकेश त्यांच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये होते. शैलेंद्रना बरं वाटावं म्हणून तिकडे आर के स्टुडिओमध्ये विशेष पूजा, हवन चालू होतं. शेवटी दुपारी १२नंतर शैलेंद्रनी अखेरचा श्वास घेतला, डोळे कायमचे मिटले. वणव्यासारखी ही बातमी सगळीकडे पसरली. कोणाचा विश्वासच बसेना. एवढा उमदा कलाकार, असा अचानक कसा काय निघून जाऊ शकतो? राज कपूर तर अगदी पुतळ्यासारखा बसून होता, जणू काही त्याचा आत्माच निघून गेला होता. शेलेंद्रच्या घरी पोहोचल्यावर तर त्याची अवस्था कोणालाच बघवत नव्हती. शेलेंद्रच्या मृत शरीरापासून दूर हटायलाच तयार नव्हता हा त्यांचा जिवलग मित्र. आपल्या वाढदिवसाच्या दिवशीच शैलेंद्रचं असं निघून जाणं त्याला सहनच होत नव्हतं. ह्यानंतर प्रत्येक वाढदिवसाला हमसून हमसून रडत शैलेंद्रची आठवण काढल्याशिवाय त्याचा दिवस जात नसे. काही दिवसांनी धर्मयुग मासिकात राजने शैलेंद्रवर एक लेख लिहिला, त्यात त्याने म्हटलं, "माझं शरीर आर के स्टुडिओत होतं, पण आत्मा तर शैलेंद्रबरोबर निघून गेला होता." योगायोगाची गोष्ट म्हणजे शैलेंद्रने लिहिलेलं शेवटचं पूर्ण गीत म्हणजे 'हम तो जाते अपने गाव, अपनी राम राम राम....' काय न्याय म्हणावा देवाचा, शैलेंद्रच्या मृत्यूनंतर विताराकांनी 'तिसरी कसम ' विकत घेतली आणि फिल्म भारतभर रिलीज केली, भरपूर पैसे कमावले. एवढंच नाही, तर चित्रपटाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. राज, वहिदा , रेणू सगळ्या सगळ्यांनी हे यश बघितलं, पाहायला नव्हते तर ते फक्त शैलेंद्र. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर 'पथ भूला इक मुसाफ़िर, लेके मेरा मन दूर चला , बिखरे सपने, रह गयी यादें, रात से पहले चाँद ढला....'

-----------------------------------
जाता जाता --- जीना यहाँ , मरना यहाँ , इसके सिवा जाना कहा... हे गाणं अर्धवटच राहिलं होतं. अनेक गीतकारांनी ते पूर्ण करायाचा प्रयत्न केला, पण राज कपूरना कोणतंच पसंत पडत नव्हतं. शेवटी शैलेंद्रचाच मोठा मुलगा शैली शैलेंद्रने ते पूर्ण केलं, जे राजना पसंत पडलं. आज जे आपण पूर्ण गाणं ऐकतो, ते शैलेंद्रचं नाही. शैलेंद्रनी जवळजवळ ८०० चित्रपट गीतं लिहिली आणि अनेक गैरफिल्मी गीतं / कविता.

संदर्भ -
आंतरजाल.
आतापर्यंत वाचलेले , लक्षात राहिलेले लेख आणि किस्से.

प्रतिक्रिया

राघवेंद्र's picture

20 Oct 2017 - 1:22 am | राघवेंद्र

अभिदेश , छान ओळख करून दिली आहेस !!!

अतिशय छान लिहिलंय. शैलेंद्र यांची कित्येक गाणी मनात आजही रुंजी घालत असतात. 'सजन रे झूठ मत बोलो...' हे गाणं त्यांनी राज कपूर यांना उद्देशून लिहिलं होतं.

पद्मावति's picture

20 Oct 2017 - 11:41 am | पद्मावति

नितांतसुंदर लेख. शैलेन्द्र यांना यथोचित मानवंदना दिलीत तुम्ही.

माम्लेदारचा पन्खा's picture

20 Oct 2017 - 12:59 pm | माम्लेदारचा पन्खा

आभारी आहे अश्या महान व्यक्तीची नवीन ओळख करून दिल्याबद्दल !

मनिमौ's picture

20 Oct 2017 - 1:50 pm | मनिमौ

अगदी लहान असताना गाणी त्यांच्या गेयतेमुळे लक्षात राहिली. जसजसे समजायला लागले तसा छोट्या छोट्या शब्दात किती मोठा अर्थ आहे हे समजून खूप आदर वाटला या सर्व गीतकारांबद्दल. मात्र तिसरी कसम ची गोष्ट वाचुन वाईट वाटले

आनन्दा's picture

20 Oct 2017 - 3:52 pm | आनन्दा

नि:शब्द

शैलन्द्र या कवि- गीतकराची उत्तम ओळख...

पगला गजोधर's picture

20 Oct 2017 - 5:40 pm | पगला गजोधर

हा लेखं म्हणजे दिवाळीच्या फराळातला मोतीचूर लाडू ...

संग्राम's picture

20 Oct 2017 - 6:04 pm | संग्राम

शैलेंद्र यांची छान ओळख करून दिलीत

चित्रगुप्त's picture

20 Oct 2017 - 6:14 pm | चित्रगुप्त

शैलेन्द्र - मुकेशची सर्व गाणी लहानपणापासून आवडीने ऐकत असलो, तरी 'शैलेन्द्र'विषयी फारशी माहिती नव्हती. या लेखाने ती उणीव भरून काढली. लेख उत्तमच आहे. धन्यवाद.

सिरुसेरि's picture

20 Oct 2017 - 7:19 pm | सिरुसेरि

छान ओळख. शैलेन्द्र यांच्या साध्या सरळ पण अर्थपुर्ण लेखनामुळे तरुण आणी श्रमजीवी वर्गाला त्याची गाणी आपलीशी वाटत असत .

नाखु's picture

21 Oct 2017 - 12:37 pm | नाखु

सचिन दा यांनी गीत प्रकृती नुसार संगीत दिल्याने हि गाणी या दोघां साठी जन्मली असावी

सचिन दा पंखा नाखु शिनेमावाला

सस्नेह's picture

21 Oct 2017 - 12:48 pm | सस्नेह

सुरेख व्यक्तिपरिचय !
शैलेंद्र यांच्या गीतांनी हिंदी चित्रपट गीतांना बहर दिला.

संजय पाटिल's picture

21 Oct 2017 - 1:17 pm | संजय पाटिल

एक उत्तम ओळख!

गुल्लू दादा's picture

22 Oct 2017 - 12:19 pm | गुल्लू दादा

कवी शैलेंद्र याची नव्याने ओळख आवडली...धन्यवाद.

तुषार काळभोर's picture

22 Oct 2017 - 12:22 pm | तुषार काळभोर

छान व्यक्तिचित्र..

पैसा's picture

22 Oct 2017 - 8:47 pm | पैसा

आवडले

गामा पैलवान's picture

23 Oct 2017 - 2:29 am | गामा पैलवान

अभिदेश,

हृद्य ओळख करवून दिली आहे. धन्यवाद!

वरील गीतांत विरुद्धार्थी भावना फार विरळ दिसते. विरोधाभास दर्शवतांनाही पर, लेकीन, इत्यादि शब्द वापरलेले सहसा दिसंत नाहीत. त्यामुळेच की काय काव्य एकाचवेळी ओथंबलेलं आणि ओघवतं दोन्ही होतं. एका ओळीतल्या एका रंगातून दुसऱ्या ओळीतला दुसरा रंग (=मूड) अलवार उमलतो.

आ.न.,
-गा.पै.

mayu4u's picture

23 Oct 2017 - 3:22 pm | mayu4u

... तेवढाच छान प्रतिसाद!

अभिदेश's picture

23 Oct 2017 - 4:05 am | अभिदेश

सर्व वाचक आणि प्रतिक्रियाकारांचे आभार. आपल्या सकारात्मक प्रतिक्रियांमुळे हुरूप वाढला आहे.

विनिता००२'s picture

23 Oct 2017 - 3:40 pm | विनिता००२

डोळे पाणावले. किती वणवण नशीबात :(

मित्रहो's picture

24 Oct 2017 - 10:45 pm | मित्रहो

परत जुन्या गाण्यांच्या आठवणी जाग्या झाल्या
आता कितीतरी दिवस शैलेंद्रची गाणी ऐकण्यात जाणार.

हुप्प्या's picture

24 Oct 2017 - 11:01 pm | हुप्प्या

चांगली गाणी आठवतात तेव्हा बहुतेकांना फक्त गायकच लक्षात रहातात. कधी कधी ते गाणे पडद्यावर गाणारे अभिनेते आठवतात. पण खरे तर संगीतकार व गीतकार ह्यांचे योगदान गाणार्‍या व्यक्तीपेक्षा जास्त महत्त्वाचे असते. हे खरे त्या गाण्याचे शिल्पकार पण त्यांना तेवढे श्रेय मिळत नाही हे दुर्दैव.
ह्या लेखाच्या निमित्ताने शैलेंद्रची आठवण पुन्हा एकदा ताजी केल्याबद्दल आभार.

फेरफटका's picture

2 Nov 2017 - 2:31 am | फेरफटका

मागे बासू भट्टाचार्यांचं एक सदर वर्तमानपत्रात यायचं. त्यात असं वाचलेलं आठवतय की शैलेंद्र च्या मनात तिसरी कसम साठी राज कपूर चं नाव नव्हतं. शैलेंद्र ला कुणीतरी हट्टाकट्टा - मस्क्युलर - हीरो हवा होता गाडीवानाच्या भुमिकेसाठी. पण राज कपूर ला ते कॅरेक्टर आवडलं होतं आणी त्या रोल साठी राज कपूर ने शैलेंद्र कडे हट्ट धरला. शैलेंद्र ने जेव्हा, 'इस रोल के लिये कोई हट्टाकट्टा हीरो चाहीये' असं सांगितलं तेव्हा राज कपूरने 'कोई बात नही, अ‍ॅक्टींग कर लेंगे' असं उत्तर दिलं. राज कपूर ने त्या भुमिकेसाठी बरेच कष्ट घेतले आणी त्याला न्याय दिला.

सुरेख लेख! खूप उत्तम ओळख करुन दिलीत.
'तू प्यार का सागर है..' हे गाणं खूप आवडतं. बर्‍याचदा सुट्टीच्या दिवशी सकाळी ऐकते..

सर्वप्रथम, लेख आवडला--- कुणीही शैलेंद्रबद्दल इतका विस्तृत लेख लिहावा, हेच मुळात आवडले.

तर, ह्या लेखाला माझी काही जोडणी. ही माझ्या, शैलेंद्रच्या चित्रपटगीतांविषयींच्या टिपण्णींपुरती मर्यादित आहे, त्याच्या गैरफिल्मी गीतांचा/ कवितांचा मी विचार केलेला नाही.

लेखात लिहील्याप्रमाणे, थोडक्या शब्दांत आशय अचूक तर्‍हेने श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याची त्याची किमया अजब होती. उदा. 'मी मोहीमेवर गेल्यावर तू माझ्या वाटेकडे डोळे लावून बसत असायचीस' हे त्याने 'सफर के वक्त मे पलक पे मोतीयों को तोलती' असे एका छोटेखानी वाक्यात लिहीले आहे!

त्याने सहज उभ्या केलेल्या प्रतिमाही विलक्षण होत्या...'आग के फूल आँचल मे डाले हुवे, कब से जलता है ये आँसमाँ देख ले' हे एका नायिकेच घुसमटीचे वर्णन होते. तसेच 'दिल को संभाला न दामन बचाया, फैली जब आग तब होश आया, गम के मारे पुकारे किसे हम, हम से बिछडा हमारा ही साया ? दिल अपला और प्रीत पराई, किसने है ये रीत बनाई? आँधी मे एक दीप जलाया, और पानी मे आग लगाई'! हा आर्त हूंकारही.

हर तर्‍हेच्या मूडची गीते त्याने बहारदार लिहीली.

'रात ये निराली, ये ऋतू भी निराली, रंग बरसाये, उमंग मतवाली,
प्यार भरी ऑखों ने जाल है बिछाए, कैसे कोई दिल की करेगा रखवाली?'

अथवा,

'चाँदी की चमकती राहे, वो देखो झूम झूम के बुलाए,
किरनों ने पसारी बाहें, के अरमाँ नाच नाच लहराए,
बाजे दिल के तार, गाये ये बहार, उभरे है प्यार जीवन में
वो चाँद खिला, वो तारे हँसे, ये रात अजब मतवाली है'

त्याचप्रमाणे, हे 'अलविदा गीत' त्याने तितक्याच तीव्रतेने लिहीले...

'जिंदगी ख्वाब है, हॉं, हमे भी था पता,
पर हमे जिंदगी से बहोत प्यार था,
सुख भी थे, दुख भी थे,
दिल को घेरे हुवे,
चाहे जैसा भी था, रंगीन संसार था'

उत्तर भारतातील समाजजीवनाचे प्रतिबिंब त्याच्या गीतांतून सहज दिसून येई. 'तीसरी कसम' मधील त्याच्या रचना त्याची साक्ष देतात. तसेच इतरही काही होत्या. उदा.

'हरियाल सावन ढोल बजाता आया,
धिन तक धीन मन का मोर नचाता आया'

'अंबुवा तले फिरसे झूले पडेंगे, रिमझिम पडेंगी फुहारे,
लौटेंगी फिर तेरे आंगन मे बाबूल, सावन की ठंडी फूहारे'

मग ह्या समाजदर्शनांत, जुन्या रीतिरीवाजांचाही समावेश अपरिहार्यपणे झाला. 'संगम'मधील 'हर दिल जो प्यार करेगा'मधे नायिकेच्या तोंडी एक ओळ आहे, 'अब कह दूंगी, करते करते कितने सावन बीत गये'. ही ओळ लता रेकॉर्डिंगच्या वेळी गात असतांना, तिथे उपस्थित असलेल्या काहींना खटकली. 'करते करते' चूक आहे, ते खरे तर 'कहते कहते' (म्हणजे, 'हां हां म्हणता') असावे असे त्यांचे म्हणने होते. त्यावेळी शैलेंद्र तिथे उपस्थित नव्हता. तेव्हा त्याच्याशी तात्काळ संपर्क साधण्यात आला. त्याने सांगितले की 'करते करते' असेच त्याने लिहीले आहे. 'उत्तर भारतांत कुमारीका चांगला पति मिळावा ह्याकरीता दर श्रावणात काही विधी करतात. त्याचा इथे संदर्भ आहे' असा उलगडा त्याने केला !

काही ठिकाणी त्याने काही गीतांत तीव्र वाटावीत, अशा शब्दांचा वापर केला आहे. उदाहरणार्थ. 'रात और दिन' मधील दुभंग व्यतिमत्वाची नायिका एके ठिकाणी स्वतःबद्दल म्हणते, 'खुद ही गरीमा फाड लिया है, खुद ही गरीमा सिते है'. ह्यातील 'फाड' हा शब्द गीताच्या दृष्टीने कठीण वाटतो. तसेच 'गबन'मधे नायिका म्हणते 'उधर कडके बिजली, इधर जान जाये'. इथे 'चमके' चालले नसते का? पण नाही, त्याने त्याने 'कडके'चा वापर केला.

चित्रपट गीतांच्या लिखाणाच्या संदर्भातील एक अतिशय महत्वाची बाब म्हणजे, अनेकदा, गीतकाराला, संगीतकाराने दिलेल्या चालीवर गीत करावे लागते, ह्यात त्या गीताचा चित्रपटातील सर्वच संदर्भ लक्षात घ्यावा लागतोच, तसेच मीटरचे भानही ठेवावे लागते, आणि ज्या काळात शैलेंद्र कार्यरत होता, तेव्हा चित्रपट गीतांच्या शब्दांना बरेच महत्व असायचे. आजूबाजूस साहिर, शकील, मजरूह, राजेंद्रकृष्ण, राजा मेहंदी अली खाँ, कैफी आज़मी अशा गीतकारांची मांदियाळी होती. ह्यातून शैलेंद्रने अतिशय ताकदीने स्वतःची पाऊलखूण उमटवली. हे अगदी लक्षणीय कार्य होते.

त्याचे बहुतेक सर्व काम शंकर- जयकिशन, दादा बर्मन व सलील चौधरी ह्यांजसाठी झाले. ह्या व्यतिरीक्त त्याने एस. एन, त्रिपाठी व अनिल बिस्वास ह्यांच्यासाठीही गीते लिहीली. चाल प्रथम व गीत नंतर, हा प्रकार ह्यांतील शंकर जयकिशनकडेच होता असे नव्हे. दादा बर्मन व सलीलही हे अनेकदा करत असत. 'तो गेल्यानंतर त्याची उणीव मला खूपच भासू लागली' असे सलीलदांनी एका मुलाखतीत म्हटले होते. आणि 'ओ सजना' हे हिंदी गीतही असेच निर्माण झाले आहे, हेही सांगितले होते.

आपण अनेकदा चित्रपट गीतकाराने 'असे त्याच्या मनातील भाव मांडले, तसे मांडले' वगैरे म्हणतो. ते तसे फारसे खरे नाही. कारण प्रत्येक गीत, त्या त्या पात्रासाठी, त्या त्या सिच्युएशनसाठी लिहीलेले असते. तेव्हा ते काही त्या गीतकाराचे स्वतःचे भाव नसतात, तर त्या पात्राचे असतात. तरीही, ते जे काही त्या पात्राला म्हणायचे आहे, ते अतिशय सुबद्धरीत्या, मोजक्याच शब्दांत, मीटरमधे बसवून, स्वतःच्या प्रतिभेचा कस लावून आपल्यासमोर आणणे, ह्याला एक वेगळेच चापल्य लागते. ते शैलेंद्रकडे भरपूर होते, त्यातून त्याने जी गीते लिहीली, ती माझ्यासारख्या श्रोत्याला मोहीत करून गेली. शंकर- जयकिशनसाठी त्याने व हसरतने गीते लिहीली होती. त्यांची गीते ऐकतांना, प्रत्येक गीताचा गीतकार कोण आहे, हे अगदी सहज लक्षात येते. एका बाजूस अशी जीवघेणी प्रतिभा, दुसर्‍या बाजूस तुलनेने बरीचशी कोरडी जुळवाजुळव.

अभिदेश's picture

3 Nov 2017 - 7:46 pm | अभिदेश

अतिशय सुंदर. तुमचा हा प्रतिसाद स्वतंत्र लेख होऊ शकतो.

तिमा's picture

3 Nov 2017 - 8:35 pm | तिमा

आधी लेख वाचून डोळ्यांत पाणी आले. त्यानंतर प्रदीप यांचा लेखाएवढाच चांगला प्रतिसाद वाचून आनंद झाला.
शैलेंद्र संबंधी एक किस्सा वाचनात आला होता. त्याच्या हलाखीच्या परिस्थितीत, मानी असल्यामुळे तो मित्रांकडून मदत घेत नसे. स्वतःच्या लहान मुलाशी खेळताना त्याला ते किशोरचे गाणे सुचले. 'मुन्ना बडा प्यारा, अम्मीका दुलारा, कोई कहे आँख कोई आँखका तारा.....'
खरंच, पूर्वी अनेक क्षेत्रांत डोंगराएवढी माणसं होऊन गेली. पण त्यांच्या हयातीत त्यांना गृहीत धरलं गेलं. अशा अनेक कलावंतांची महती समाजाला त्यांच्या जाण्यानंतरच कळली!

तिमा's picture

3 Nov 2017 - 8:39 pm | तिमा

कोई कहे चाँद, कोई आँखका तारा!