एक उनाड दिवस..

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in दिवाळी अंक
18 Oct 2017 - 12:00 am

Header2

एगरकिंगनच्या फॅक्टरीमध्ये दिनेशची व्हिजिट होती. तो गाडीने जाणार हे ठरल्यावर मीही त्याच्याबरोबर जायचं ठरवलं. ए ५वरून आमची गाडी बासेलच्या दिशेने पळू लागली. कार्ल्सरुह मागे पडलं, आता स्ट्रासबुर्गकडे जाणारा रस्ता दिसू लागला. ए५ वरूनच पुढे जात फ्रायबुर्ग ओलांडून आम्ही बासेलकडे कूच केलं. मध्येच एकदा आमच्या आणि गाडीच्या टाक्या भरल्या. जरी ही काही माझी पहिली स्विस ट्रिप नव्हती, तरीही तिकडे जायचं असलं की वेगळाच उत्साह मनात असतो. त्यातून अनवट ठिकाणी जायचं असलं की बघायलाच नको.. बासेल क्रॉस करून आम्ही स्विसमध्ये प्रवेशलो आणि एगरकिंगनच्या वाटेला लागलो. दोबाजूला डोंगर, त्यावर चरणार्‍या गाई, त्यांच्या गळ्यातल्या घंटांची किणकिण.. "इथे फॅक्टरी आहे? इतक्या सुंदर खेड्यात?" माझ्या प्रश्नाला "हो" उत्तर देताना दिनेश म्हणाला, "तिकडे बघ डावीकडे.." उजवीकडे डोंगर ठेवून डाव्या बाजूच्या दरीत खोल पाहिलं, तर टुमदार गाव खाली वसलं होतं. कौलारू लहान घरं आणि एखाद्याच चर्चचा उंच कळस दिसत होता.एक वळण घेऊन पुढे गेल्यावर चित्र आणखीनच स्पष्ट दिसायला लागलं.

एगरकिंगन, ते चिमुकलं गाव आता अगदी समोर आलं होतं. एका बाजूला डोंगरांच्या माळा आणि समोरच्या दरीतच खाली उतरून आमचं हॉटेल होतं. हॉटेल फक्त दुमजली. तळमजल्यावर चारी बाजूंनी खोल्या आणि मधल्या चौकात मोठ्ठं हिरवळीचं अंगण. प्रत्येक खोलीचं दार त्या अंंगणात उघडत होतं आणि दाराबाहेरच बागेत बसायच्या खुर्च्या, टेबलही .. वरच्या मजल्यावरच्या खोल्यांना मोठा वर्‍हांडा होता, जो ह्याच हिरवळीच्या चौकात उघडत होता. दिल बाग बाग व्हायला त्या बागेतच गेलं एकदम.. त्या अंगणात खुर्च्या टाकून मस्त गाणी ऐकत संध्याकाळ सरली.दुसर्‍या दिवशी दिनेशची फॅक्टरी व्हिजिट होती. ह्या, अशा सुंदर गावात रूक्ष कारखाना आहे हेच मुळी पटत नाही. पण मध्येच दिसणार्‍या चिमण्यातला निळसर धूर ते सत्य सांगतो.भरपेट न्याहारी करून दिनेश कामाला आणि मी भटकायला बाहेर पडले.

.

.

काल दुरून पाहिलं होतं, आज ह्या गावाला भेटायचं होतं. रिसेप्शनवरून नकाशा घेतला आणि चर्चच्या दिशेने चढू लागले. सगळं गाव मुळी डोंगरात आहे. सरळ रस्ता नाहीच, सारखेच चढ-उतार.. समोरच्या डोंगरावर चरणार्‍या गाई, त्यांच्या गळ्यातल्या घंटांचा किणकिणाट ऐकू येऊ लागला. युरोपातलं गाव म्हटलं की एक चर्च, एक नदी, तिच्यावरचा एक पूल, नाहीतर मग एखादं सरोवर, हिरवे डोंगर, डोंगरातली चिमुकली घरं असं दृश्य डोळ्यापुढे येतंच. हे गावही त्याला अपवाद नव्हतं. रस्ता ओलांडून समोरच्या टेकडीच्या दिशेने चालायला लागले. हातातला नकाशा डावी घेऊन समोर चढायला सांगत होता. पुढे गेले आणि चर्चचा कळस दिसायला लागला, पण तिथेच वळणावर थबकले. नुकताच पाऊस पडून गेला होता. हवेत ओलसर गारवा होता. पाऊस पडून हिरव्या गवतावरची रंगीत रानफुलं वार्‍यावर डोलत होती. तिथे किंचित रेंगाळून कॅमेर्‍याच्या चिमटीत तिथला निसर्ग पकडण्याचा प्रयत्न करून हातातला नकाशा आणि चर्चच्या कोपर्‍यावरच्या पाट्या ह्यांची सांगड घातली आणि सरळ थोडं चढायचं ठरवलं.

.

समोरच्या रस्त्याने सरळ वर चढत गेलं, तर इतकं सुंदर काही समोर येत होतं की मी चित्रकार असते, तर तिथेच एका कोपर्‍यात कॅनव्हास उभा केला असता आणि दिवसभर चित्रं काढत बसले असते. कॅमेर्‍यात किती बंदिस्त केलं, तरी काहीतरी उरत होतं, सुटत होतं.. हिरव्या गवतावरची फुलं, कुरणात चरणार्‍या गाई, त्यांच्या किणकिण घंटा आणि वातावरणातला पक्ष्यांचा किलबिलाट.. हे सगळं धावत्या गाडीतून नव्हे, तर हात लांब केला की स्पर्श होईल एवढ्याच अंतरावर होतं. एका दिव्याच्या खांबाला एका वेलीनं लपेटून घेतलं होतं आणि निवांत फुललीही होती. रेंगाळत टेकडी पायवाटेने चढत होते, तर मुलांचा किलबिलाट ऐकू आला. जरा कानोसा घेतला, तर चार-पाच मुलांचा घोळका पाठीवर दप्तर अडकवून शाळेत चालला होता. मुलं कसली? रंगीत फुलांच्या गुच्छालाच पाय फुटून तो चालला आहे, असं वाटत होतं. एका बैठ्या घराची बेल त्यांनी वाजवली, तर आतून एक गोडुला कोबीचा गड्डा लुटूलुटू आला आणि त्यांच्यात मिसळला. सगळे पुढे धावू लागले आणि माझी चाहूल लागून एकदम थबकले. त्या एवढ्याशा गावात ही कोण परकी बाई? असं परग्रहावरून आलेल्या व्यक्तीकडे बघावं तसं माझ्याकडे पाहू लागले. मी आपलं हसून त्यांना गुटन मॉर्गन करत "शुलं.?"म्हणजे शाळेत चाललेत का? असं विचारलं, तर माझ्या अभिवादनाला जेमतेम उत्तर देत धूम पळाली सगळी, अगदी कोबीच्या गड्ड्यासकट..

..

.

.

स्वतःशीच हसून तशीच थोडी पुढे गेले आणि डोळे विस्फारून पाहतच राहिले. मी बर्‍यापैकी वर आले होते. खालच्या झाडांचे शेंडे आता माझ्या आय लेव्हलला आले होते. सफरचंदं, प्लम्स, पेअर यांनी ती सगळी नुसती लदली होती. मी सहज हात पुढे केला, तर हाताला येतील अशी.. कोणाला विचारून एखादं अ‍ॅपल, एखादं प्लम तोडावं, असा विचार करत मी तिथल्या बांधावर बसले. बराच वेळ झाला, कोणीच दिसेना.. न राहवून मग मी मनाला येतील तेवढे प्लम्स आणि अ‍ॅपल्स तोडले, काही खाल्ले, उरलेले पाठीवरच्या पिशवीत टाकून पुढे जायला लागले. वाटेतल्या सुंदर सुंदर घरांचे, झाडापानाफुलांचे फोटो काढत सुटले. एका बैठ्या घराच्या समोर बेडूक राणीचा दोन-अडीच फुटाचा हिरवा पुतळा दिसला. मुकुटावर अगदी 'लारा' असं लिहिलं ही होतं. गंमतच वाटली. त्याचं इथे काय प्रयोजन असेल असा विचार करत पुढे गेले. एका तिठ्यावर एका घराच्या खिडक्या इतक्या सुंदर सजवल्या होत्या आणि चक्क खिडकीच्या बाहेरच्या जागेत एक पिटुकली सायकल, काही पक्षी मांडून ठेवले होते. सहज हाताला येतील असे! घराला कुंपण बिंपण काही नव्हतं. अगदी मोठ्या रस्त्यावर सहज हाताला येईल अशा त्या शोभेच्या, चिमुकल्या वस्तू इतक्या निरखून बघत आणि त्या तिथे टिकल्या कशा, याचं आश्चर्य बाळगत मी पुढे चालू लागले.

.

.

.

त्या सुंदर खिडकीच्या आणि तिच्यातल्या वस्तू बघण्याच्या नादात मी रस्ता चुकले. आता समोर फक्त झाडं, टेकडी, जंगल होतं. घरं खूपच मागे राहिली असावीत. माझ्या हातातला नकाशा आणि रस्त्यावरच्या खुणांच्या पाट्या ह्याचा आता मेळ बसेना. डोंगरात ढग उतरत होते आणि समोरची वाट धुक्यात हरवत चालली होती. धुकं वाढलं असतं तर रस्ता सापडणं आणखी अवघड झालं असतं. एव्हाना चालून, चढून तीन तासाच्या वर होऊन गेले होते. इतका वेळ ह्या चित्रासारख्या देखाव्यात मीच हरवून गेले होते, आता रस्ता हरवला होता.

एवढ्यात टोकाच्या घरापाशी गाडीचा प्रकाश दिसला आणि त्यातून कोणीतरी उतरलं. लगबगीने तिथे जाऊन पत्ता विचारला आणि पुढे चालू लागले. एक-दोन वळणं पार केल्यावर ओळखीच्या - म्हणजे आत्ताच ओळखीच्या झालेल्या खुणा दिसू लागल्या. हरवलेला रस्ता सापडल्याच्या आनंदात पावसाचे तुषार अंगावर घेतले. हळूहळू पाऊस वार्‍याचा झिम्मा सुरू झाला. गार, बोचरा वारा आणि पाऊस टोचू लागला. आता गरम गरम कॉफी आणि भजी मिळतील तर काय बहार येईल.. असा विचार मनात आला. पण त्या रानातल्या पायवाटेत असं काहीही मिळणार नव्हतं. पण पुढच्या वळणावरून खालच्या रस्त्यावर दूरवर दिवे दिसले आणि चक्क मॅकदादाही.. मस्त वाफाळती कॉफी घेतली आणि भज्यांची तल्लफ नगेट्सवर भागवली. एक कोपर्‍यातली खुर्ची पकडून ते पाऊसगाणं पाहत आणि ऐकत राहिले. किती वेळ तंद्री लागली कोण जाणे.. पाऊसवार्‍याचा खेळ संपला आणि लख्ख ऊन पडलं. मग मीही तिथून उठले आणि परत चालायला लागले. एव्हाना संध्याकाळ झाली होती. दिनेशचा फॅक्टरीतून निघाल्याचा फोन आला. माझा आजचा उनाड दिवस पावसात चिंब भिजून हिरव्या टेकड्यांवरच्या त्या पायवाटांत मस्त आनंदात उधळला होता.

.

Footer

प्रतिक्रिया

रुपी's picture

18 Oct 2017 - 1:52 am | रुपी

अहाहा! सुरेख! आणि स्वातीताईच्या खास शैलीतले वर्णन! 'फुलांचा गुच्छ', 'कोबीचा गड्डा' सर्वच भारी!
खरंच असा उनाड दिवस अधूनमधून आयुष्यात यावा..

पद्मावति's picture

18 Oct 2017 - 2:30 am | पद्मावति

खरंच असा उनाड दिवस अधूनमधून आयुष्यात यावा..येस अगदी.
सुरेख लिहिलं आहेस स्वाती.

प्रभाकर पेठकर's picture

18 Oct 2017 - 3:16 am | प्रभाकर पेठकर

स्विस आल्प्सच्या अंगाखांद्यावर चरणार्‍या गाईंच्या गळ्यातील घंटांचे आवाज तिथल्या थंडगार शांततेत फार मोहक वाटतात. त्या घंटाही वेगळ्या असतात. एखाद्या लांबड्या डब्याच्या आकाराच्या, बहुतेक पंचधातूच्या वाटतात. लांबूनच पाहिल्या आहेत. पण त्याला नाद खुप छान असातो. नाद टिकाऊ नसतो कांहीसा बसका असतो. पण तिथल्या शांततेला पुरक असतो. तिथेच गवताच्या उतारावर पडून राहावं आणि गाईंच्या हालचाली बरोबर बोलणार्‍या त्या घंटांना तास अन तास ऐकत राहावं असं वाटतं.
आजूबाजूचा हिरवागार निसर्ग, एखाद्या कसलेल्या चित्रकाराने चितारलेले आखीव आणि रेखीव पर्वत. स्वातंत्र्यात विहरणारे पक्षी आणि खट्याळपणे अंगाला झोंबणारी थंडी. व्वा! हा लेख वाचून ह्या सर्व आठवणी जाग्या झाल्या.
सुंदर वर्णन केलं आहेस स्वाती.

अभिजीत अवलिया's picture

18 Oct 2017 - 8:06 am | अभिजीत अवलिया

सुंंदर.

गुल्लू दादा's picture

18 Oct 2017 - 11:35 am | गुल्लू दादा

सुंदर फोटो आणि तेवढंच छान लेखन उनाड दिवसाचं.

वकील साहेब's picture

18 Oct 2017 - 2:27 pm | वकील साहेब

लेखन तर सुंदर आहेच पण फोटोही फार छान आलेत. वाचता वाचता तिथे पोहोचलो. सुरेख

श्रीगुरुजी's picture

18 Oct 2017 - 2:53 pm | श्रीगुरुजी

सुंदर अनुभव! लेखन आवडले.

त्या झाडावरची जांभळ्या/निळ्या रंगाची फळे कोणती ते समजले नाही.

स्वाती दिनेश's picture

18 Oct 2017 - 5:56 pm | स्वाती दिनेश

तो प्लम चा एक प्रकार आहे, लांबट, जांभळे zwetschgen आहेत ते.
(अवांतर- त्याचा केक अफलातून लागतो. एकदा केकृ देईन,:) )
स्वाती

संदीप चित्रे's picture

18 Oct 2017 - 4:54 pm | संदीप चित्रे

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

संदीप चित्रे's picture

18 Oct 2017 - 4:54 pm | संदीप चित्रे

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

खटपट्या's picture

18 Oct 2017 - 5:14 pm | खटपट्या

खूप छान वर्णन आणि फोटो.

नंदन's picture

18 Oct 2017 - 5:28 pm | नंदन

गाव, आणि त्याला साजेसाच असा नेटका सुरेख लेख.

पगला गजोधर's picture

18 Oct 2017 - 6:12 pm | पगला गजोधर

रिफ्रेशिंग

जुइ's picture

18 Oct 2017 - 8:46 pm | जुइ

कोबीचा गड्डा काय, फुलांचा गुच्छ काय मजा आली. युरोपातील खेड्यांमध्ये अशी उनाड भटकंती करायची इच्छा आहे. ओघवत्या शैलीत केलेली ही उनाड भटकंती अतिशय आवडली!

श्रीगुरुजी's picture

19 Oct 2017 - 10:07 am | श्रीगुरुजी

पूर्व युरोपातील एखाद्या दुर्गम खेड्यात अशीच निर्हेतुक, उनाड भटकंती करावी अशी इच्छा आहे.

सविता००१'s picture

18 Oct 2017 - 9:22 pm | सविता००१

किती सुंदर लिहिलं आहेस स्वातीताई.....
आणि फोटो तर जबरी आहेत
खरच असा उनाड दिवस कसला गोड वाटेल...

जव्हेरगंज's picture

18 Oct 2017 - 9:52 pm | जव्हेरगंज

मस्तच की!!!

पाषाणभेद's picture

19 Oct 2017 - 9:01 am | पाषाणभेद

स्वातीताई, त्या प्लमच्या झाडाच्या खोडाला जाळी लावलेली दिसते आहे. म्हणजेच ती झाडे आपल्याकडच्यासारखी बोरी किंवा करवंदांच्या जाळ्यांसारखी रानातली नसावीत. बरोबर ना?
अन तुम्ही त्यावरील फळे चक्क तोडलीत? बरा तेथे कोणी रखवालदार नव्हता. नाहीतर तुमची पळताभुई थोडीच होती!

स्वाती दिनेश's picture

19 Oct 2017 - 4:54 pm | स्वाती दिनेश

ही रानातली झाडे नव्हेत, एकाच्या बागेतली झाडे आहेत ती. बाग खाली आणि मी चढावरच्या वळणावर होते. हात पुढे केला की शेंड्याला आणि फांद्यांना स्पर्श होत होता, त्यामुळे बागेत आत शिरायची वेळ आली नाही. तरीही मी कोणी तिथे येईल आणि मी परवानगी विचारेन अशी वाट पाहिली पण बराच वेळ कोणीच आले नाही, त्या झाडावरून फळे तोडण्याचा मोह न आवरता आल्याने मी मग अ‍ॅपल, प्लम्स तोडून तिथेच बांधावर बसून खाल्ले. :)
स्वाती

कविता१९७८'s picture

19 Oct 2017 - 10:09 am | कविता१९७८

उनाड दिवस छानच गेला म्हणायचा

सिरुसेरि's picture

21 Oct 2017 - 10:52 am | सिरुसेरि

छान दिवस

आहाहा! काय ते फोटू आणि वर्णन! लगेच त्या गावात जाऊन रहावं असं वाटतय. गायीसुद्धा निवांत बसल्यात.

पैसा's picture

23 Oct 2017 - 9:33 pm | पैसा

भटकंती आवडली

वाचताना मीच तिथे आहे आणि हे एक सुंदर स्वप्न आहे असे वाटात होते. खुप छान लिहीले आहे आणि फोटोही सुंदर.

मारवा's picture

25 Oct 2017 - 7:57 pm | मारवा

फोटोग्राफ्स आणि शैली दोन्ही आवडलेत.

स्वाती दिनेश's picture

5 Nov 2017 - 12:57 pm | स्वाती दिनेश

सर्वांना धन्यवाद,
ह्या वर्षी दिवाळी अंकासाठीचा लेख द्यायला वैयक्तिक कारणांमुळे खूप उशीर झाला. मुदत उलटून गेल्यावर एका आठवड्याने लेख दिला आणि दिवाळी अंक टीमने तो समाविष्ट केला. मी अंकाचे काम केले असल्याने आयत्या वेळचे लेख समाविष्ट करताना काय काय करावे लागते ह्याची कल्पना आहे, त्यामुळे त्यांचे विशेष आभार.
स्वाती

चौथा कोनाडा's picture

5 Nov 2017 - 1:41 pm | चौथा कोनाडा

किती सुंदर ! फोटो आणि शब्द ... अप्रतिम !

अगदी स्वप्नवत !

प्राची अश्विनी's picture

6 Nov 2017 - 6:23 pm | प्राची अश्विनी

खूप छान लिहिलंय.

एकविरा's picture

13 Nov 2017 - 4:28 pm | एकविरा

काय छान लिहिलत हो ,अगदी त्याच जागांवर,रस्त्याच्या बाजूला मी बसून हे सगळ अनुभवतेय असच वाटल