'ती'

Mahesh Bhalerao's picture
Mahesh Bhalerao in दिवाळी अंक
17 Oct 2017 - 12:00 am

Header2

होती तिची मनीषा चौकट ओलांडून, दूर सुखाच्या गावी जाण्याची
बुक्क्या मारून दाबलेलं, तिच्या पंखातलं बळ, मोठी झेप घेऊ पाहत होतं
धडपडतच कशीतरी गाठली तिने मिळेल ती गाडी, कोंबून घेत स्वतःला घुसली कशीबशी आत
इथेही कामी आली तडजोड, स्वाभिमानाशी केलेली, थोडी जागा मिळवण्यासाठी…...

पडून होते तसेच अजून डोळ्यांच्या पापण्यात उसवलेल्या नात्यांचे धागे दोरे
पण तिची नजर शोधत होती अंधुक काचातून, येणारा तिचा गाव, अन पुढे निघून गेलेलं मन…

तिच्याजवळ होता, फक्त शरीराचा गोळा, चालीरितींच्या बेड्यांचे व्रण पडलेला
न्यायचा होता तिला तो लांब नवा आकार देण्यासाठी, मनासारखे रंग भरण्याकरिता
पण भेटले रस्त्यावर तिच्याच गावाचे तुकडे थोड्या थोड्या अंतरावर, अन तिच्याच सारखे देह थोड्याफार फरकांचे
गाडी नुसतीच धावत होती अन नव्हत्या दिसत खुणा कुठेही एखादा नवा गाव असण्याच्या…

आलीच नाही एकही वेस की तिला पार करत मोकळा श्वास घेता येईल अशी
पृथ्वीबरोबर नशीबही गोल होऊन पुन्हा त्याच बिंदूवर थांबल्यासारखं वाटलं तिला….

'समाज' नावाचं आकाश संपलंच नाही कितीही जमीन तुडवत दूर आली तरी…
मग कुणाला दाखवणार होती ती तिचं नवं अस्तित्व, तिचं वेगळेपण आणि नावीन्य?
अजून तिच्यासारख्यांचा गाव जन्माला यायचा होता …
अजून तिला हात देणाऱ्या हातात बळ यायचं बाकी होतं …
तोवर ती अशीच चक्रव्यूहातून पळत राहणार, बाहेर पडण्याची वाट मिळेपर्यंत.....

Footer

प्रतिक्रिया

बाजीप्रभू's picture

17 Oct 2017 - 7:35 am | बाजीप्रभू

आवडली...

सुखीमाणूस's picture

17 Oct 2017 - 9:44 pm | सुखीमाणूस

माणूस म्हणून जगणे शोधणार्या प्रत्येकाची कविता होइल ही

सही रे सई's picture

18 Oct 2017 - 5:20 pm | सही रे सई

आवडली..
अन पुढे निघून गेलेलं मन हे खासच

धन्यवाद! प्रतिक्रियेबद्दल आभार !

धन्यवाद! प्रतिक्रियेबद्दल आभार !

पद्मावति's picture

28 Oct 2017 - 6:52 pm | पद्मावति

खुप आवडली कविता.

पैसा's picture

30 Oct 2017 - 6:20 pm | पैसा

कविता आवडली

चौथा कोनाडा's picture

7 Nov 2017 - 5:49 pm | चौथा कोनाडा

एका असाह्य दुर्दैवाची अधांतर व्यक्त करणारी शब्दसंपन्न कविता !

सुंदर, आवडली !

अस्वस्थ करणारी कविता.