स्मृतिगंध

प्रभाकर पेठकर's picture
प्रभाकर पेठकर in दिवाळी अंक
17 Oct 2017 - 12:00 am

Header2

दिवाळी तोंडावर आली होती. शनिवार-रविवारला जोडून सोमवारची सुटी आल्याने आज नीरजाने फराळाचा घाट घातला होता. सकाळपासून चिवडा आणि चकल्या बनवून झाल्या होत्या. आता जरा निवांत बसावं आणि घोटभर चहात श्रमपरिहार शोधावा, असा विचार करून नीरजाने चहा टाकला. आता उद्या बेसनाचे लाडू बनवू या, की मग बस झालं. बाकी सर्व बाजारातून तयार आणायचं. हल्ली पूर्वीसारखी श्रमाची कामं जमत नाहीत आणि तेवढा उत्साहही नाही राहिला. रवी - तिचा नवरा - नेहमी तिला चिडवायचा की आता तू म्हातारी झालीस. कशाला हे सर्व घरी करायचं? बाजारातूनच आण. पण तिला आपल्या हातचे निदान २-४ पदार्थ तरी आपल्या नवर्‍याच्या आणि मुलाच्या पोटी जावेत असं वाटायचं.

कपात चहा गाळून आणि चवीला म्हणून २ चकल्या घेऊन ती गॅलरीतल्या खुर्चीत विसावली. संध्याकाळचे ५ वाजले होते. सहाव्या मजल्यावरून खाली नजर टाकली. खाली कॉलनीत संध्याकाळची एक निवांत धावपळ चालू होती. दिवाळीसारखा मोठा आणि महत्त्वाचा सण तोंडावर आल्याने कॉलनीच्या मारवाड्याच्या दुकानात चांगलीच गर्दी होती. दिवाळी आल्यामुळे मारवाड्याचं दुकानही विविध वस्तूंनी खचाखच भरलं होतं. वेगवेगळ्या भाजण्या, अनारशाच्या पिठापासून तयार मिठाई आणि आकाश कंदील, फटाके सर्व काही होतं. त्यामुळे दुकान गिर्‍हाइकांनी फुललं होतं.

हवेत छान गारवा होता. वाराही जरा उदार मनाने वाहत होता. चहा घेता घेता नीरजा रिलॅक्स झाली. आजची फराळाची कामं आटोपली होतीच. रात्रीचा स्वयंपाकही करायचा नव्हता. रात्री जेवायला बाहेर जायचं होतं. तिच्या मुलाच्या - सुशांतच्या - बॉसने जेवणाचं आमंत्रण दिलं होतं. खाली कॉलनीतील मुलांचा गोंगाट चालू होता. 'शर्वरीsss, मालविकाsssss, अनन्ताsssss' अशा ललकार्‍यांनी बाल उत्साह ओसंडत होता. दिवाळीची सुट्टी 'एन्जॉय' करणं चाललं होतं. मॅगी, दूध-बिस्किटं खाऊन ही मुलं खेळायला नुकतीच बाहेर पडली असणार. तिच्या लहानपणी भारतात 'मॅगी'चं आगमन झालं नव्हतं. एवढंच काय, हॉटेलिंग हा प्रकारही नव्हता. घरीच सांजा, पोहे, पोळीचा कुस्कुरा, दूध पोळी नाहीतर फोडणीचा भात हीच पंचपक्वान्नं असायची. शाळेत तर कित्येकदा, तिला आवडायचं म्हणून पोळीचा लाडू नाहीतर गव्हाच्या पिठाचा शिरा असायचा. गव्हाच्या पिठाच्या शिर्‍याने तिच्या शाळेतल्या स्मृती चाळवल्या. तिच्या मैत्रिणींनाही तिच्या आईच्या हातचा गव्हाच्या पिठाचा शिरा खूप आवडायचा. घरचं खमंग साजूक तूप, वेलची पावडर आणि गूळ.... अहाहा!!!
शाळेच्या तिच्या जुन्या मैत्रिणी आठवल्या, सर-मॅडम, मुख्याध्यापक आणि अगदी घंटेचे टोल बडविणारा, सुटीची नोटीस वर्गात आणणारा शिपाईसुद्धा आठवला. ह्या सर्व आठवणी म्हणजे तिच्या चिंतामुक्त जीवनातील दागिने होते. नकळत ती सुखावली. शाळेच्या वर्धापनदिवशी ती नाटकात कामं करायची, भरतनाट्यमचं क्लासेसही लावले होते. अभ्यासात फार हुशार नाही, पण चुणचुणीत होती.

कॉलेजची आणि नवयौवनाची सुरुवात एकत्रच झाली. कॉलेजच्या मैत्रिणी फक्त मराठी भाषक नव्हत्या, तर मिश्र भाषक होत्या. पण विचार जुळले होते आणि आता नुसत्या मैत्रिणी नव्हत्या, तर मित्रही होते. त्यांचा असा ३-४ मैत्रिणी आणि २-३ मित्रांचा चमू होता. अभ्यासाव्यतिरिक्त कँटीनच्या मीटिंग्ज, एकांकिका स्पर्धा, स्पोर्ट्स डे हे सर्व असायचंच, तसंच राजकारण, समाजसेवा, ज्येष्ठांचा शिस्तीचा अवाजवी धोशा असे अनेक गंभीर आणि चेष्टेचे विषय असायचे. कृतु (कृतिका), मितू (मिताली), अनु (अनघा), सागू (सागरिका) वगैरे मैत्रीणी आणि रुष (ॠषी), आदू (अद्वैत) (पण तिला आदू नाही, तर अद्वैत नांवच खूप आवडायचं), वैभू किवा भूभू (वैभव) वगैरे मित्र एखाद्या विषयावर शिरा ताणताणून वाद घालायचे. आवाज खूप वाढला की कँटीनचा तंबी येऊन तंबी देऊन जायचा. मग गाडी सौम्य विषयांकडे वळायची.
************************************************************************
"नीरजाssss, ए नीरजाssss!" नीरजा दचकून भानावर आली. देशपांडे आजी खालून हाका मारत होत्या.
"काय हो?"
"अगं, किती हाका मारल्या? काय करते आहेस? झाली का फराळाची तयारी?"
"हो, झाली. या की वरती चव पाहायला."
"अग नको. वेळ नाहीए अजिबात. सामान आणायला निघाले आहे."
"बsssssरं" तिलाही आजी आत्ता वर यायला नकोच होत्या. आत्ता तिच्या निवांत समयी तिला एकांत हवा होता.
नवरा अजून ऑफिसातून आला नव्हता आणि मुलगा त्याच्या खोलीत कॉम्प्युटरवर मग्न होता. नाही म्हटलं तरी अद्वैतच्या आठवणी जाग्या झाल्याच.
*****************************************************************************
ग्रूपमध्ये दोघांचे विचार जुळायचे. वैचारिक पातळीवर तो तिला जवळचा वाटायचा. ग्रूपमध्ये वादावादी झाली की ते दोघेही नकळत एकमेकांची बाजू घ्यायचे. अद्वैत जरा सावळा, अभ्यासात हुशार आणि वादावादीत मुद्देसूद बोलण्याने सामोरच्याची हवाच काढून टाकायचा. पुढे जवळीक वाढत गेली. कधी ग्रूपमध्ये, तर कधी ग्रूपशिवाय कँटीनमध्ये भेटीगाठी वाढू लागल्या. कॉफीच्या एका कपाभोवती गप्पा रंगू लागल्या आणि अद्वैतच्या विनोदी स्वभावाचा नवाच पैलू तिला जाणवायला लागला आणि भावलाही. तिला खळखळून हसायची सवय होती. तो अगदी मंत्रमुग्ध होऊन पाहत राहायचा. आज त्या सर्व आठवणी ताज्या होऊन ती मनोमन सुखावली. शेवटची चकली पुरवून पुरवून खाताना, ते तारुण्याचे क्षण आपण पुन्हा जगतो आहोत असा तिला भास झाला. आयुष्यातील हे सोनेरी क्षण लग्नानंतर तिने मनाच्या पाटीवरून जाणीवपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक पुसून टाकले होते. पण आज त्या अवखळ आठवणी चौखूर उधळल्याच होत्या जणू. आवरायचं म्हटलं तरी आवरत नव्हत्या.

एव्हाना त्यांच्या ग्रूपमधील मित्रमैत्रिणींनी (आणि ग्रूपबाहेरील काही विद्यार्थ्यांनीही) तिच्या आणि अद्वैतच्या नात्याला लेबलंं लावायला सुरुवात केली होती. मितूने तर संधी पाहून थेट प्रश्नच केला होता. पण "तसं कांही नाहीये गं!" असं म्हणतानाही 'तसंच' काही आहे असे जिवाला हुरहुर लावणारे भास नीरजाला होऊ लागले होते. तो एक अव्यक्त प्रेमाचा काळ होता.

अद्वैतला त्याच्या बाबांनी एक बाईक घेऊन दिली. बुलेट की काय म्हणतात ती. तर दुसर्‍या दिवशी नीरजा कॉलेजला जायला बस स्टॉपवर उभी होती, तर हा बाईक घेऊन तिच्या समोरच येऊन ठाकला. अगदी फिल्मी. तिच्या आवडीचा टीशर्ट त्याने घातला होता. कस्स्ला रुबाबदार दिसत होता. अद्वैतने नीरजाला त्याच्या बाईकवर बसायची खूण केली. स्टॉपवर तसे ओळखीचे कोणी नव्हतेच. ती सराईताच्या आविर्भावात बसली, पण मनातून 'कोणी बघत तर नाही नं?' आशंकेने घाबरली होती.
"ओढणी नीट आवरून घे आणि माझ्या खांद्याला धर." अद्वैत म्हणाला.
बाईक निघाली, तेव्हा एक हलकासा हेलकावा बसला आणि तिने घाबरून त्याच्या खांद्याला धरलं. मुद्दामहून झालेला तसा तो पहिलाच स्पर्श होता. रस्ताभर तो काय बोलतोय इकडे तिचं लक्षच नव्हतं.
कॉलेज जवळ आलं, तसं ती म्हणाली, "कॉलेजच्या गेटजवळच मला सोड."
पण तो थांबलाच नाही. अगदी थेट, त्यांचा ग्रूप बसला होता तिथेच जाऊन थांबला. ग्रूपमध्ये त्याच्या नवीन बाईकचीच जास्त चर्चा झाली. त्यांच नातं मित्र-मैत्रिणींनी गृहीतच धरलं होतं, हे तिला जाणवलं.

त्या दिवशी ती घरी पोहोचली ते हवेत तरंगतच. बाबा आरामखुर्चीत काहीतरी पुस्तक वाचत होते आणि धाकटा भाऊ उमेश एक मोडका मिक्सर दुरुस्त करायचा प्रयत्न करीत होता. दोघांनी मान वर करून बघितलं, पण काही बोलले नाहीत. नाहीतर नॉर्मली बाबा, "या, झालं का कॉलेज?" किंवा उमेश "आल्या महाराणी धाड मारून" किंवा तत्सम वाक्य फेकायचे. पण आज तसं काही झालं नाही. तिला नवल वाटलं. आईलाच विचारावं. कपडे वगैरे बदलून ती स्वयंपाकघरात गेली.
आईने चहाचा कप हाती देता देताच "कोण होता गं?" असा रोखून पाहत प्रश्न केला.
"क..कोण?" तिने वेड पांघरायचा प्रयत्न केला. पण ह्या एकदम झालेल्या हल्ल्याने ती मनोमन थंडगार पडली होती.
"तोच तो, ज्याच्या खांद्यावर हात ठेवून कॉलेजच्या नावावर गावभर भटकतेस, तो."
माय गॉड! पहिल्याच दिवशी बातमी घरापर्यंत पोहोचली होती. ती स्वतःहून एक दिवस घरात सांगणार होतीच, पण हे म्हणजे फार लवकरच भांडं फुटलं होतं.
"वसंताने पाहिलं तुम्हाला आज." वसंता म्हणजे नीरजाचा मामा. त्याने कधी, केव्हा आणि कुठे पाहिलं, देव जाणे. पण तत्परतेने बहिणीच्या कानावर घातलं होतं. बाहेरच्या खोलीत शांतता होती, पण सहजता नव्हती.
"किती दिवस चाललंय हे?" आईने अजून एक मिसाईल डागलं.
"अगं! कसलं काय? माझा कॉलेजचा मित्र आहे. चांगल्या घरचा आहे. आज पहिल्यांदाच आणि तेही, तो म्हणाला म्हणून त्याच्या बाईकवरून गेले. नेहमी बसनेच तर जाते." तिने आवाजात अगदी सहजता आणायचा आटोकाट प्रयत्न केला. प्रकरण जास्त तापलं नाही. पण "हे असले थेर आपल्या घरात चालणार नाहीत, सांगून ठेवते आहे" असा एक माफक दम मिळाला.

अद्वैत सातार्‍याला गेला होता. ८-१० दिवस येणार नव्हता. त्यामुळे त्याच्यासमोर लपवाछपवी करायचा प्रसंग टळला. तो आल्यानंतरही त्याने ऑफर केलेली लिफ्ट तिने शिताफीने नाकारली आणि बस प्रवासच सुरू ठेवला. त्याला कळेना काय झालं. पण अदरवाईज, त्यांच्यातील नातं हसतखेळतच राहिलं. घरचेही तिच्याशी हसून खेळून वागायला लागले आणि तिने सुटकेचा नि:श्वास टाकला. पण तिच्या नकळत चक्र फिरत होती आणि अचानक बाँब पडला.
बाबा म्हणाले, "उद्या कॉलेजला जाऊ नकोस. तुला बघायला एक स्थळ येणार आहे."
बापरे, स्थळ? एवढ्या झटपट? ती हादरली, रडली. "अजून शिक्षण पूर्ण होऊ द्या" असाही हट्ट करून पाहिला, पण तिच्या हट्टापुढे नेहमीच नमतं घेणारे तिचे बाबा म्हणाले, "अगं बेटा, त्यासंबंधी बोललोय मी त्यांच्याशी. लग्नानंतर तुझं शिक्षण पुढे चालूच राहील. ते थांबवणार नाहीत."
बराच वेळ तिने वाद घातला, रुसली, अबोला धरला, पण आई-बाबा बधले नाहीत. ..............ती हरली.

हे सर्व लवकरच अद्वैतच्या कानावर घालणं गरजेचं होतं. त्यांच्यातलं नातं अव्यक्त असलं, तरी दोघांनीही मनाने स्वीकारलेलं होतं. तिने अद्वैतला समुद्रकिनारी बोलावलं. आज त्यांच्या नात्याचा, सूर्याच्या साक्षीने, अस्त होणार होता. काहीच कल्पना नसलेला अद्वैत खूप आनंदात होता. आज आपल्या नात्याला मूर्त स्वरूप प्राप्त होणार, म्हणून होणारा आनंद अद्वैतच्या चेहर्‍यावरून ओसंडत होता. त्याचा विरस होणार, त्याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळणार ह्या कल्पनेने तिला खूप वाईट वाटलं, पण नाइलाज होता.
"अद्वैत, माझं लग्न ठरलंय." तिने धाडकन विषयच संपवून टाकला.
"काssssय?" अद्वैतच्या शब्दातील कंप, धार तिला सहन झाली नाही. तिच्या अश्रूंचा बांध तुटला. ती हमसाहमशी रडू लागली. हादरलेला अद्वैत पुरता भांबावला. काय करावं कळेना. पण लवकरच सावरला.
तिला आपल्या आधाराची गरज आहे, हे जाणून त्याने स्वतःचं दु:ख बाजूला ठेवून तो म्हणाला, "नीरजा, काय झालं हे? असं व्हायला नको होतं. पण....शेवटी आई-बाबांची इच्छा त्यांच्या मुलीच्या सुखासाठीच आहे. त्याचा आपण स्वीकार केला पाहिजे. तू वाईट वाटून घेऊ नकोस, अपराधी तर मुळीच वाटून घेऊ नकोस. आयुष्यात सर्वच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नसतात."
नीरजा ऐकत होती. अद्वैत बोलत होता. सूर्य अस्ताला जात होता आणि ............ तसंच त्यांचं नातंही.
खूप वेळ दोघेही शांत बसून राहिले. नीरजाने स्वतःला बरंच सावरलं होतं. आकाशात दोन पक्षी बराच वेळ विहरत होते. अद्वैत आणि नीरजा दोघेही त्यांना पाहत होते. त्यांना पाहताना दोन वेगवेगळी मनं एकाच भूतकाळात घुटमळत होती. भूतकाळातून पाय निघत नव्हता. त्या पक्ष्यांवरून आपलं लक्ष दूर करून ते त्या मोहक भूतकाळाला जाणीवपूर्वक दूर लोटण्याचा प्रयत्न करीत होते, पण भूतकाळाच्या दोर्‍या कच्च्या नव्हत्या. दोघांचीही बोटं एकमेकांच्या बोटांमध्ये केव्हा गुंफली गेली, दोघांनाही कळलं नाही.
********************************************************************

ह्या सोनेरी आठवणींतून बाहेर येताना नीरजाने एक मोठ्ठा नि:श्वास सोडला. तिच्या लग्नात, संसारात ती आता सुखी होती. नवरा रवी एक सुशील, घरावर, संसारावर प्रेम करणारा होता. मुलगा सुशांत हुशार होता. दोघांनाही नोकरीत स्थैर्य लाभलं होतं. वरच्या पदांवर होते दोघेही. भूतकाळ हा आता निव्वळ भूतकाळ उरला होता. तिचं वर्तमानावर प्रेम होतं आणि मुलाच्या उज्ज्वल भविष्याबाबत ती आश्वस्त होती. नुकतीच त्याला एका आय टी कंपनीत नोकरी लागली होती. आज त्याच्या बॉसनेच जेवणाचं आमंत्रण दिलं होतं. पंचतारांकित हॉटेलात जायचं होतं. त्या तोलामोलाचा जामानिमा केला पाहिजे. नवरा रवी तसा कितीही हुशार असला, तरी मुखदुर्बळच. अशा बहुतेक प्रसंगात बोलण्याचा जिम्मा तीच उचलायची. पण आज सुशांतची बॉस फॅमिली येणार होती. अघळपघळ गप्पा मारून चालणार नाही. नीट विचार करून बोलायला हवं. आपल्या बोलण्यात काही चूक होऊ नये, म्हणून परीक्षेपूर्वीचे 'अपेक्षित प्रश्न संच', 'संभाव्य प्रश्न' वगैरे गाईडचा अभ्यास मनातल्या मनात ती करत होती.

रवी, सुशांत आणि ती वेळेवरच हॉटेलला पोहोचले. तो पंचतारांकित थाटमाट आणि झगमगाट दडपून टाकणारा होता. सुशांतने स्वागतिकेकडे चौकशी केली आणि त्यांनी त्यांना त्यांच्या आरक्षित टेबलाकडे नेऊन बसविलं. तेवढ्यात सुशांतचा बॉस, त्याची पत्नी आणि सुशांतच्याच वयाची मुलगी असे तिघेही तिथे आले. सुशांतच्या बॉसच्या पत्नीची साडी फार भारी होती. खानदानी श्रीमंत वाटत होती. मुलीची आणि सुशांतची आधीची ओळख असावी, कारण त्याच्याशी हस्तांदोलन करताना त्यांच्या ओळखीची हिंट नीरजाने टिपली होती.
"बाबा, आई, हे माझे बॉस, त्यांच्या पत्नी आणि मुलगी." सुशांत ओळख करून देत होता.
हात जोडत नीरजाने प्रथमच त्यांना पाहिलं.
नकळत ती ओरडली,

"आँ! अद्वैत, तू?"

......समाप्त.......

Footer

प्रतिक्रिया

सूड's picture

17 Oct 2017 - 8:59 am | सूड

अर्र!! =))

मनिमौ's picture

17 Oct 2017 - 9:07 am | मनिमौ

आला होता. पण अर्ध्या वाटेत संपल्यासारखी वाटली कथा

मनिमौ's picture

17 Oct 2017 - 9:07 am | मनिमौ

आला होता. पण अर्ध्या वाटेत संपल्यासारखी वाटली कथा

जुइ's picture

17 Oct 2017 - 9:12 am | जुइ

कथा आवडली. शेवटचा अंदाज आला होताच.

पद्मावति's picture

17 Oct 2017 - 12:01 pm | पद्मावति

प्रसन्न, फील गूड कथा.
दिवाळीच्या लगबगीची वातावरणनिर्मीती फारच मस्तं केलीय.

अत्रन्गि पाउस's picture

17 Oct 2017 - 12:50 pm | अत्रन्गि पाउस

जिथे ख्यालाची पहिली सम तिथेच शेवटची तिहाई?

प्रभाकर पेठकर's picture

17 Oct 2017 - 12:57 pm | प्रभाकर पेठकर

सर्व प्रतिसादकांचे मनापासून धन्यवाद.

१) मनिमौ - आयुष्यात अर्धवट राहिलेल्या गोष्टीचीच कथा आहे. साचेबद्ध पूर्णत्वास जाणारी कथा नाही. हा वेगळेपणा स्विकाराला तर कथा सुसह्य होईल.
२) जुई - सर्वसामान्यांची कथा असल्याकारणाने धोपटामार्गाने जाते आहे आणि त्यामुळेच शेवटाचा अंदाज येतोच. पण ती कथेची उणीव आहे असे मला वाटत नाही. कथा सुरस करण्यासाठी त्याला कांही अनैसर्गिक वळण देण्याचे टाळले आहे.

शेवटी सांगावेसे वाटेल की 'स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केंव्हा गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा.'

विनिता००२'s picture

17 Oct 2017 - 1:09 pm | विनिता००२

अव्यक्त असल तरी नातं तुटण फारच वाईट!!

कथा छान!

राघव's picture

17 Oct 2017 - 1:22 pm | राघव

छोटे-छोटे बारकावे व्यवस्थित टिपल्यामुळे कथा जिवंत झाली.
लेखकाचं कसब.. अजून काय!! :-)

सर्वसाक्षी's picture

17 Oct 2017 - 3:19 pm | सर्वसाक्षी

ओघवती कथा.

स्वाती दिनेश's picture

17 Oct 2017 - 3:37 pm | स्वाती दिनेश

दिवाळीच्या तयारीची लगबग पद्मावती म्हणते तशी कथेतून छान जाणवते आहे.
शेवटाचा अंदाज आला होता, कथा छान आहे.
स्वाती

सुखीमाणूस's picture

17 Oct 2017 - 3:42 pm | सुखीमाणूस

College days आठवले

पाषाणभेद's picture

19 Oct 2017 - 11:52 am | पाषाणभेद

+१
छान आहे कथा. दिवाळी अंकात शोभून दिसणारी.

मराठी कथालेखक's picture

17 Oct 2017 - 6:44 pm | मराठी कथालेखक

तो सध्या काय करतो :)

राघवेंद्र's picture

17 Oct 2017 - 9:35 pm | राघवेंद्र

कथेमधले detailing मस्त जमले आहे.
सुखद शेवट करणारी कथा आवडली.

पिवळा डांबिस's picture

18 Oct 2017 - 12:30 am | पिवळा डांबिस

पण काका, शेवटी अजुन एखाद दोन परिच्छेद वाचायला आवड्ले असते...
विशेषतः अद्वैतची रिअ‍ॅक्शन...
बाकी कथा झकास!

प्रभाकर पेठकर's picture

18 Oct 2017 - 2:41 am | प्रभाकर पेठकर

फक्त अद्वैतच्या प्रतिक्रियेवर कथा कशी संपली असती?
अद्वैतची प्रतिक्रिया आली असती की रवीची (नीरजाच्या नवर्‍याची) प्रतिक्रिया, अद्वैतच्या बायकोची प्रतिक्रिया त्यांच्या मुलांची प्रतिक्रिया.....
कथा भरकटली असती. कथेच्या पुढच्या भागाची प्रत्येक वाचकाने आपापल्या वकुबानुसार, पुर्वानुभवानुसार आपापल्या मनांत कल्पना करावी. ही कथा फक्त त्या घडलेल्या कथेचे रिपोर्टींग आहे. शिवाय, आपल्या कथेची नायिका, नीरजा, हिच्या भावविश्वाभोवती गुंफलेली आहे. अद्वैतचा कथेतील सहभाग हा दुय्यम आहे.
आपल्यापैकी कित्येकांच्या मनांत अशा अव्यक्त प्रेमाच्या कथा भूतकाळात पुरलेल्या असतात/असतील. पण आता प्रत्येक जण त्यातून बाहेर पडून आपापल्या संसारात, मुलांमध्ये रमलेला आणि समधानी असतो. अशा वेळी कधी अपघाताने जरी ती व्यक्ती समोर आली तरी आता वयपरत्वे आलेल्या परिपक्वतेमुळे मन दोलायमान होत नाही. अशी माझी प्रामाणिक धारणा आहे. म्हणून इथेच कथा संपवली आहे. माझ्या मते कथेचा तार्किक शेवट इथेच आहे.

धन्यवाद.

पिवळा डांबिस's picture

18 Oct 2017 - 10:03 pm | पिवळा डांबिस

पेठकरकाका,
मी वर म्हंट्ल्याप्रमाणे कथा झकास आहेच.,
मी फक्त कथा वाचून संपताच माझ्या मनात जो विचार आला होता तो प्रकट केला, इतकंच.
लेखकाचा निर्णय सुप्रीम हे तर मान्य आहेच.
राग नसावा.
आ.
पिडां

प्रभाकर पेठकर's picture

19 Oct 2017 - 1:57 pm | प्रभाकर पेठकर

पिवळा डांबिस,

राग तर अजिबात नाही. वाचकांच्या प्रामाणिक प्रतिक्रियाच लेखकाला समृद्ध करीत असतात.
फक्त हा बाज वेगळा असल्याकारणाने मी तो वेगळेपणा अधोरेखित करण्यासाठी मी स्पष्टीकरण दिले आहे. ह्यात लेखकाचा निर्णय मनावर न घेता कथेची ती गरज आहे (असे लेखकाला वाटते) एव्हढेच लक्षात घ्यावे.
धन्यवाद तुम्हा सर्वांची मते माझ्यासाठी महत्वाची आहेत.

लाल टोपी's picture

18 Oct 2017 - 5:45 am | लाल टोपी

कथा आवडली पण अचानक संपल्यासारखी वाट्ली.

प्रभाकर पेठकर's picture

18 Oct 2017 - 11:33 am | प्रभाकर पेठकर

तुमच्या मतांचा आदर आहेच. माझे मत मी वर दिले आहे.
कृपया हा प्रतिसाद पाहावा.

माझ्या तरूण वयात (म्हणजे आता म्हातारा झालो असे नाही), हिन्दी चित्रपटांचा शेवट हा नायक आणि खलनायकाच्या ढिश्यूं ढिश्यूं ने व्हायचा. नायक (अर्थातच) ती मारामारी जिंकायचा आणि खलप्रवृतीचा बिमोड व्हायचा. प्रेक्षकांना खुप समाधान मिळायचं. त्या काळात मीही प्रवाह पतितच होतो. तेंव्हा राजेश खन्ना आणि वहिदा रेहमानचा 'खामोशी' हा चित्रपट माझ्या पाहण्यात आला. मलाही तो सिनेमा अचानक संपल्यासारखा वाटला. हिन्दी चित्रपट आणि मारामारी नाही? छे: छे: हा चित्रपट कांही चांगला नाही अशा अस्वस्थ विचारांनी मी थिएटर बाहेर पडलो. पण नंतर विचार करता खामोशी चित्रपटाचा बाजच वेगळा आहे हे लक्षात आलं. चित्रपटाची कथा 'अशीही' असू शकते हे जाणवलं. आपण प्रवाहा बरोबर वाहताना खुपशा गोष्टी गृहीत धरून चालत असतो. त्याचं समाधान झालं नाही तर कथावस्तूत आपल्याला उणीव जाणवत राहते. पण व्यापक विचार केला तर आयुष्यातील प्रसंगांना, घटनांना अनेक कंगोरे असतात हे जाणवतं. अशीच ही कथा आयुष्याचा एक वेगळाच कंगोरा उलगडत जाते. 'स्मृतीगंध' शिर्षक त्या साठीच निवडलं आहे. तो फक्त 'स्मृतीं'च्या पडद्या आड गेलेल्या घटनेचा 'गंध' आहे. त्याला पुर्णत्वाचा आशिर्वाद लाभलेला नाही. अपूर्णच आहे, पण सुगंधी आहे, सुखावणारा आहे. त्या बद्दल तक्रार नाही की पूर्णत्वास नेण्याचा अट्टाहासही नाही.

भविष्यात तुम्हाला पटेल अशी एखादी कथा लिहायचा प्रयत्न नक्कीच करेन.

लाल टोपी's picture

19 Oct 2017 - 9:13 am | लाल टोपी

नाही कथा अर्धवट राहीली असे नाही वाटले; तुमचे वरचे प्रतिसादही वाचले , इतका सुंदर वेग आला आणि अचानक शेवट आला असे वाट्ले बाकी आपण कथा पाकक्रुती मनोगत काहीही लिहिले तरी आवडलेलंच आहे..

प्रभाकर पेठकर's picture

19 Oct 2017 - 2:00 pm | प्रभाकर पेठकर

धन्यवाद, लाल टोपी. असेच प्रेम राहू द्या ही विनंती.

सविता००१'s picture

18 Oct 2017 - 4:01 pm | सविता००१

आवडली कथा आणि तुमचे वरचे प्रतिसादही.
आपण प्रवाहा बरोबर वाहताना खुपशा गोष्टी गृहीत धरून चालत असतो. त्याचं समाधान झालं नाही तर कथावस्तूत आपल्याला उणीव जाणवत राहते. पण व्यापक विचार केला तर आयुष्यातील प्रसंगांना, घटनांना अनेक कंगोरे असतात हे जाणवतं. अशीच ही कथा आयुष्याचा एक वेगळाच कंगोरा उलगडत जाते. 'स्मृतीगंध' शिर्षक त्या साठीच निवडलं आहे. तो फक्त 'स्मृतीं'च्या पडद्या आड गेलेल्या घटनेचा 'गंध' आहे. त्याला पुर्णत्वाचा आशिर्वाद लाभलेला नाही. अपूर्णच आहे, पण सुगंधी आहे, सुखावणारा आहे. त्या बद्दल तक्रार नाही की पूर्णत्वास नेण्याचा अट्टाहासही नाही. हे विशेष आवडलं.

आता अवांतर: म्हणाले होते किनई - येणार तुमचा लेख????? अभी मेरी मिठाई किधर है ;)

प्रभाकर पेठकर's picture

19 Oct 2017 - 2:03 pm | प्रभाकर पेठकर

मिठाई आणि लेखाचा काय संबंध? मिठाई मला वर्ज्य असली तरी माझ्या वाचक मित्रांसाठी वर्षाचे ३६५ दिवस उपलब्ध आहे. कधीही ये.

शिव कन्या's picture

21 Oct 2017 - 9:04 am | शिव कन्या

सरळ कथानक त्यातल्या तपशिलामुळे भावली.
कुठेतरी आपले पण आहे या सगळ्याच कथनात.
आणखी सकस कथांची वाट पाहतोय.

मित्रहो's picture

24 Oct 2017 - 2:24 pm | मित्रहो

खूप सुंदर तपशिल आले आहेत. वर तुम्ही दिलेले स्पष्टीकरण सुद्धा पटले.
मागे फेसबुकवर एक विडीयो आला होता त्याचा शेवटही काहीसा असाच होता पण तो विडीयो बराच पुरुषी मानसिकेतून बनवला होता. एक मुलगी मुलाला सोडून जाते कारण त्याच्याकडे पैसे नाही म्हणून. काही दिवसांनी ती त्याला एका हॉटेलात बघते आणि विचारते तू इथे काय करतोय तेव्हा तिचा नवरा सांगतो हा माझा बॉस आहे. बऱ्याच मुलांना मुलीने नाकारल्यावर असे वाटते की मी हीच्या नवऱ्यापेक्षा जास्त कमवून दाखवीन वगेरे किंवा जुन्या सिनेमा किंवा नाटकासारखे तिचा नवरा दारुड्या निघतो वगेरे. प्रत्यक्षात असे काही होत नाही. दोघांचेही आयुष्य सुरळीत चालू असते. वरील कथेचे हेच वैशिष्ट आहे ही कथा जे घडले त्यासाठी कुणालाही दोष देत नाही हा फक्त स्मृतींचा गंध आहे.

सौन्दर्य's picture

27 Oct 2017 - 8:52 am | सौन्दर्य

कथा छानच आहे, आवडली. साधी, सरळ आणि सोपी. कॉलेजच्या वयात, बरोबरीच्या मुलींची लग्ने बहुतेक आधीच होतात कारण बरोबरीच्या मुलांना आधी आपल्या पायावर उभे राहायचे असते, स्व:ताला सिध्द करायचे असते. तोपर्यंत समवयस्क मुलींच्या घरी त्यांच्या लग्नाचे वेध लागलेले असतात आणि चांगला मुलगा बघून त्यांचे लग्नही लावून दिले जाते. कितीही प्रेम असले तरी अजून स्व:ताच्या आईबाबांवर अवलंबून असलेल्या मुलाशी लग्न होणे शक्यच नसते. ही वस्तुस्थिती फार चांगल्या रीतीने उलगडली आहे. कथा छान लिहिली आहे, आवडली.

पैसा's picture

28 Oct 2017 - 4:33 pm | पैसा

कथेचा शेवट आवडला!