लोकसाधना : एका रुजव्याची गाथा

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in दिवाळी अंक
17 Oct 2017 - 12:00 am

Header2

१९८२ साली एक दांपत्य पुण्याहून दापोलीजवळच्या चिखलगाव इथे वास्तव्यास आलं. मुलगा बी.ए.एम.एस. होता, मुलगी एम.ए. होती. पुण्यासारख्या शहरात व्यवस्थित चाललेलं, चालू शकणारं जीवन सोडून हे तरुण जोडपं धड रस्ते, वीज नसलेल्या गावात आलं.

गावातच जन्म झालेला त्यातला मुलगा. वयाच्या सहाव्या वर्षी शिक्षणासाठी घराबाहेर पडला होता. पुढे याच्याकडे राहा, त्याच्याकडे राहा अशा एकूण २४ घरांमध्ये राहून त्याने शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर पुण्यात आला. वैद्यकीय शिक्षण घेऊन बी.ए.एम.एस.ची पदवी प्राप्त केली. परंतु समाजाचं ऋण फेडण्याची तळमळ स्वस्थ बसू देत नव्हती. शिक्षण, ग्रामकल्याण आणि आरोग्य या विषयांत कार्य करण्याचं वेड ज्याला गावाकडे घेऊन आलं आणि १९८२पासून आजतागायत ज्याने या वेडाला जागृत, शाश्वत ठेवलेलं आहे, तो माणूस म्हणजे डॉ. राजा दांडेकर.

वेड म्हटलं की बंडखोर वृत्ती आलीच. अडचणींना आव्हान देण्याचा स्वभाव आलाच. हा स्वभाव राजा दांडेकरांशी बोलताना सतत जाणवतो. पुण्यात असताना कॉलेजमध्ये विद्यार्थी संघटनेचं अध्यक्षपद भूषवणार्‍या या माणसाने अणीबाणीच्या काळात तुरुंगवासही सोसलेला आहे. समाजासाठी काहीतरी करणं, चळवळीचा भाग होणं हा स्वभावच त्यांच्या पुढच्या कार्याचं इंधन ठरला.

लोकसाधना, लोकमान्य पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट या नावाने लोकमान्य टिळकांच्या जन्मगावी, चिखलगाव इथे शिक्षण आणि ग्रामकल्याणाचा एक वटवृक्ष उभा आहे. राजा दांडेकर आणि रेणू दांडेकर या दांपत्याने तो वसवलेला आहे, त्यांच्याच भाषेत म्हणायचं तर 'रुजवलेला आहे.' कॉलेजनंतर संघटनात्मक काम न करता पुढे केवळ रचनात्मक काम करायचं, हे मनाशी पक्कं ठरवून हे दोघे चिखलगावी आले आणि १ ऑगस्ट १९८२ रोजी एका गोठ्यात त्यांची पहिली शाळा भरली.

राजा दांडेकर अतिशय बोलके आहेत. कुणाला शिकवण्याआधी "मी स्वतः विद्यार्थी आहे, आजन्म विद्यार्थी आहे" असं ते म्हणतात. लोकमान्यांचेच हे शब्द ते खरे करतात. गावकर्‍यांना शाळेचं महत्त्व पटवण्यापासून त्यांचा प्रवास सुरू झाला. जेम्स लेनची पाच सूत्रं ते आवर्जून नमूद करतात - १. लोकांच्यात जा. २. लोकांसारखं राहा ३. लोकांपासून शिका. ४. तुम्हाला काय येतं हे विसरा. ५. लोकांच्या गरजांसाठी काम करा. ही सूत्रं घेऊन त्यांनी काम सुरू केलं. गावातल्या प्रत्येकाशी निर्माण झालेले संपर्क, संबंध यांनी समाजकार्याची पायाभरणी केली. शिक्षण हा जरी राजा दांडेकरांच्या कामाचा अग्रक्रम असला, तरीही आरोग्य, समाजमन या बाजूंनाही पैलू पाडणं हे त्यांच्या कामाचा भाग होतं.

लोकमान्य टिळक विद्यामंदिर ही इतर कुठल्याही शाळेसारखी नसलेली शाळा असण्याचं कारण म्हणजे वेगळा विचार करायची दांडेकर पती-पत्नींची आग्रही भूमिका. गोठ्यात सुरू झालेली शाळा आज शासनाची दाद मिळवतेय. तिच्या वेगळेपणामुळे खुद्द युनायटेड नेशन्सने तिला प्रमाणित केलेलं आहे. हसत खेळत, वेगवेगळ्या पद्धती, खेळ खेळत इथे शिक्षण चालतं. शाळा म्हणून कसला जाच नसतो, पण विद्यार्थी म्हणून जबाबदारी मात्र असते. शिक्षक म्हणूनही शाळेबद्दल आपलेपणाची भावना जपणारे इथले सगळे लोक आहेत.

"आम्ही काहीही वेगळं केलं नाही. आम्ही शासनाच्या चौकटीत राहून सगळं केलं. आमची शाळा एसएससी बोर्डाचीच आहे, त्यांचाच अभ्यासक्रम आहे. परंतु आपण असं काम करावं की शासनालाच आश्चर्य वाटलं पाहिजे की अरे! आपला अभ्यासक्रम इतका चांगल्या प्रकारे राबवला जाऊ शकतो! मी देशभरातल्या शाळा बघितल्या. त्यांच्यातलं जे चांगलं आहे ते निवडलं." राजा दांडेकर सांगतात, "आम्ही इथे आलो, तेव्हा एक ट्रेंड होता की १४व्या वर्षी गावातली मुलं शहरात जायची, मुंबईला जायची. १७-१८व्या वर्षी लग्न. पुन्हा बायको गावाकडे आणि मुलगा शहराकडे. मग शिमगा-गणपतीपुरतं गावाला परत यायचं. आय.टी.आय.सारख्या संस्थांचं अपयश तिथून बाहेर पडणार्‍या मुलांमध्ये दिसत होतं. त्यांना एक आणि एकच गोष्ट येत असायची. बाहेरच्या देशांसारखी 'मल्टि स्किल्ड वर्कर' किंवा 'हँडी मॅन' प्रकारची मुलं आपण निर्माण करायला हवीत, म्हणून शाळेतच तांत्रिक शिक्षण द्यायला सुरुवात केली. आज शासनासकट अनेक संस्थांनी, कंपन्यांनी आमच्या 'डिप्लोमा इन बेसिक रूरल टेक्नॉलॉजी' या संस्थांना मान्यता दिलेली आहे, तोशिबासारख्या कंपन्यांबरोबर आमच्या शाळेने जॉईंट प्रॉडक्ट डेव्हलपमेंट केलेली आहे."

प्रचलित शिक्षणपद्धतीत ज्या प्रकारे शाळा चालतात, त्या प्रकारे डॉ. दांडेकरांना ही शाळा चालवायचीच नव्हती. त्यांनी वर्गात जाऊन कधीच शिकवलं नाही. मुलांच्या खांद्यावर हात ठेवून गप्पा मारणारे असे ते शिक्षक. ‘मुलांना देण्याकरता माझ्याकडे काय आहे?’ हा प्रश्न ते सतत स्वतःला करत. एका मुलाखतीत त्यांनी संत तुकडोजी महाराजांचं उदाहरण दिलेलं आहे. 'करावे काय शिक्षणाचे जे कधी कामास येईना' असं तुकडोजी महाराज म्हणून गेलेत. तुकडोजी महाराज स्वतः तीन महिने जपानला शिक्षणपद्धतीचा अभ्यास करायला गेले होते. आणि तिथल्या तीन महिन्यांचं डायरीवजा पुस्तक दांडेकरांकडे आहे. जपानच्याच उदाहरणासारखं, शिक्षण हे प्रयोगशील आणि उत्पादक कसं होईल हा त्यांचा विचार होता. शिक्षणाची प्रयोगशाळा, प्रयोगशाळेची कार्यशाळा आणि कार्यशाळेची उद्योगशाळा झाली पाहिजे, असं ते म्हणतात. "आम्ही मुलं हेरत असतो. एखाद्याला नसते शिक्षणाची आवड; पण हातात कला असते. अशा मुलाला आर्टिस्टच झालं पाहिजे. स्किल बेस्ड एज्युकेशन आपल्या देशात क्वचितच मिळतं. आपण आजही मॅकॉलेच्या शिक्षणपद्धतीचे गुलाम असल्यासारखे आहोत. अगदी आत्ता - म्हणजे २०१२मध्ये आसाममध्ये लॉर्ड मॅकॉले हायस्कूल निघतं, यातच सगळं आलं." दांडेकर सांगतात.

लोकमान्य टिळक विद्यामंदिरात शिक्षणाचं माध्यम मराठी आहे. मातृभाषेतून शिक्षण व्हावं ही दांडेकर सरांची आग्रही भूमिका आहे. या शाळेत पाचवीपासूनच मुलांना कौशल्याभिमुख किंवा स्किल बेस्ड शिक्षण दिलं जातं. व्यवसायाभिमुख शिक्षणपद्धतीचं महत्त्व आज हळूहळू वाढतंय, पण लोकमान्य टिळक विद्यामंदिरात ते गेली ३० वर्षं मिळतं. इथे होम सायन्स, एनर्जी अँड एन्व्हायर्न्मेंट, मेकॅनिकल इत्यादी विषयक वेगवेगळ्या प्रयोगशाळा आहेत. उदाहरणार्थ, होम सायन्समध्ये भाजी चिरण्यापासून केक बनवण्यापर्यंत, ओव्हन, मिक्सर वापरण्यासारख्या गोष्टींचं शिक्षण मुलांना दिलं जातं. जीवनोपयोगी शिक्षण - उदा., बटण तुटलं तर ते आपलं आपण लावता येणं - या शाळेतल्या प्रत्येकाला मिळतं. त्यामुळे इथल्या कुठल्याच विद्यार्थ्याचं फारसं कुठे अडत नाही. ही आणि अशी सगळी 'स्किल्स' शिकलेल्या मुलाला 'पुढे काय करायचंय?' या प्रश्नाचं उत्तर शहरात पंधरा वर्षं शिकूनही त्या प्रश्नावर रेंगाळणार्‍या मुलांपेक्षा बरंच आधी मिळालेलं असतं.

इथे आठवी ते दहावीच्या मुलांना आय.बी.टी. म्हणजेच इंट्रोडक्शन टू बेसिक टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमाचा पर्याय मिळतो. हा एसएससी बोर्डाने मान्य केलेला व्यावसायिक अभ्यासक्रम आहे. आठवड्यातला एक दिवस ही मुलं विविध तंत्रज्ञान प्रत्यक्षात वापरण्यात घालवतात. त्यापुढील विद्यार्थ्यांसाठी डिप्लोमा इन बेसिक रूरल टेक्नॉलॉजी हा अधिक प्रगत अभ्यासक्रम आहे, ज्यात शेतीपासून ते बांधकामापर्यंत सर्व तंत्रांचं शिक्षण त्यांना मिळतं. ही शाळा हाच एक कारखानाही बनतो. विजेवर चालणारे दिवे इत्यादी अनेक उपकरणं मुलं शिकता शिकता बनवतात. यातली काही उपकरणं विक्रीसाठीही उपलब्ध असतात. यातून मुलं आपल्यासाठी, कुटुंबासाठी, गावासाठी अनेक गोष्टी करू शकतात. आपण काहीतरी करू शकतो हा आत्मविश्वास जर शिक्षणाने दिला नाही, तर मग काय अर्थ आहे? असं राजा दांडेकरांचं म्हणणं. त्यामुळे चिखलगावच्या शाळेत प्रत्यक्ष करून मुलं इतकं काही शिकतात की त्यातून कायमचा आणि कधीही न ढळणारा आत्मविश्वास त्यांना मिळतो.

आत्मविश्वासाचं, जबाबदारीचं हे बीज प्राथमिक शिक्षणातच पेरलं जातं. मुख्याध्यापक थोरात सर सांगतात, "हसत खेळत शिक्षण हा साधा सोपा नियम इथे आहे." इथे गोल आकाराचे हवेशीर वर्ग आहेत. वर्गातल्या भिंतींवर काही चित्रं, जमिनीपासून तीन फुटांपर्यंत फळा अशी रचना आहे. इथे शिक्षक एकाच जागी असतात, आणि तासानुसार मुलं वेगवेगळ्या वर्गात जातात. त्यामुळे मराठीच्या वर्गात पहिली ते दहावीचं मराठीचंच साहित्य असतं. मोजकाच गृहपाठ, अतिशय प्रेमळ, मनमिळाऊ शिक्षक आणि मोकळं वातावरण यामुळे मुलांमधली चौकस वृत्ती बहरत जाते. गणिताचे कल्पक खेळ, इतिहासाच्या गप्पा अशा अभ्यासाचं दडपण येतच नाही मुळी. एकेक विषयाची कपाटं इथे असतात आणि त्या त्या विषयाचं साहित्य त्या कपाटात असतं. मुलांवर आलटून पालटून त्या कपाटांची जबाबदारी दिली जाते. हे आपलं कपाट आहे आणि हे आपण नीट ठेवायचं आहे, ही 'ओनरशिप'ची भावना लहानपणापासून त्यांना समजते. इथल्या भावे बाई संस्कृतप्रवीण आहेत, त्यामुळे इथली मुलं संस्कृतमध्येही संभाषण आत्मसात करताना दिसतात. अशा या निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या आणि तितक्याच साध्या दिसणार्‍या शाळेत फेरफटका मारताना आपलीच आपल्याला नवीन ओळख होत जाते.

इथून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथाही तितक्याच प्रेरक आहेत. 'अशी घडली माणसं' या राजा दांडेकरांनीच लिहिलेल्या पुस्तकात त्या संकलित केलेल्या मिळतात. 'मला लोकांशी बोलण्याचा आत्मविश्वास नाही' असं म्हणणारा, आय.टी.आय.ची परीक्षा उत्तीर्ण झालेला एक विद्यार्थी जेव्हा एक वर्ष लोकसाधनेच्या या संकुलात घालवतो आणि पुढे काही वर्षांत आपल्या कोट्यवधीच्या व्यवसायाची गाथा सरांना येऊन सांगतो, तेव्हा वाचकालाच इतका अभिमान वाटतो की सरांना किती वाटला असेल याची फक्त कल्पनाच करू शकतो. लोकसाधनेने चालवलेल्या या माणसांच्या शेतीचं हे टवटवीत, तेजस्वी पीक आहे. राजा दांडेकरांशी बोलत असताना त्यांचा तत्त्वनिष्ठपणा पदोपदी जाणवत होता. ते म्हणाले, "मी इथे शाळा सुरू करतानाच ठरवलं होतं, की २५ वर्षं मी कुठलंही भाषण देणार नाही, कुठल्याही माध्यमात काहीही लिहिणार नाही. मी फक्त काम करत राहणार." हा बाणा, हा व्रतस्थपणा एखाद्या योग्याला शोभेल. त्यांचं नाव जरी राजा असलं, तरी त्यांच्याशी बोलताना मात्र सतत त्यांच्यातला योगी दिसत राहतो.

डॉ. राजा दांडेकर व रेणू दांडेकर यांना दोन मुलं, एक मुलगा व एक मुलगी. मुलगी भारतीय सैन्यात कॅप्टन पदावर आहे आणि मुलगा वकिली शिक्षण घेतलेला असूनही 'कॉर्पोरेट लाईफ'चं जोखड झुगारून गावात स्थायिक झालेला आहे. २५हून अधिक वर्षं चाललेल्या या लोकसाधनेच्या साधकांशी माझा नुकताच परिचय झाला. कोकणात गेलो असता आवर्जून या शाळेला भेट दिली आणि दांडेकर सरांशी थोडाच पण फार प्रेरित करणारा संवाद घडला. खरं तर हे व्यक्तिचित्र म्हणावं असं नाही, आणि या व्यक्तीचं कार्यही इतकं अफाट आहे की ते शब्दात मांडणं कठीण. रेणू दांडेकरांशिवाय ते अर्थपूर्णही नसेल. तेव्हा हे खरं तर एक छोटंसं कार्यचित्र आहे. आणि झालीच तर एका असामान्य दांपत्याची ओळख आहे. त्यांच्या कामाला एकवटून त्याकडे बघायला बराच काळ जाईल. पण दापोलीला गेलात तर लोकसाधनाच्या लोकमान्य टिळक विद्यामंदिराला आवर्जून भेट द्या. शिक्षणाबरोबरच त्यापलीकडे जाऊन एक व्यक्ती लोकांवर किती प्रभाव टाकू शकते, ते बघता येईल. आणि आपल्या आयुष्याला दिशा देण्याची प्रेरणा तुम्हाला दांडेकर दांपत्याशी बोलून मिळेल. बाबा आमट्यांचं मार्गदर्शन लाभलेल्या दांडेकर सरांशी बोलताना आणि त्यांचा आणि रेणूताईंचा प्रवास ऐकताना तुम्हाला व्यक्तींमधलं, कार्यांमधलं आणि विचारांमधलं साम्य शोधायचा मोह नक्कीच आवरणार नाही.

a

संबंधित माहिती
डॉ. राजा दांडेकर आणि रेणू दांडेकर -
लोकसाधना, पोस्ट चिखलवाडी.
तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी
पिन - ४१५७१२
भ्रमणध्वनी ९४२२४ ३१२७५
http://www.loksadhana.org

संबंधित यूट्यूब दुवे
पाषाणपालवी - https://www.youtube.com/watch?v=GdCGJCEB5Jw
मुलाखत भाग १ - https://www.youtube.com/watch?v=ZrGVjsk3skw
मुलाखत भाग २ - https://www.youtube.com/watch?v=vuULd9WcuaE

2

a

3

4
शाळेचा परिसर

1
a
व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रम

cultivation
शेतीचं प्रात्यक्षिक करताना

chakali
चकली बनवताना

chintan baithak
शिक्षकांसाठी चिंतन बैठक

torch
torch1
विजेरी बनवण्याचं प्रात्यक्षिक

Footer

प्रतिक्रिया

विशाखा पाटील's picture

17 Oct 2017 - 9:05 am | विशाखा पाटील

उत्तम 'कार्यचित्र'. या शाळेविषयी ऐकलं होतं. सविस्तर ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!

बाजीप्रभू's picture

17 Oct 2017 - 10:34 am | बाजीप्रभू

अतिशय सुंदर ओळख.. दांडेकर दांपत्यांचा अभिमान वाटला.
लेखन नेहमीप्रमाणे छान आणि ओघवतं.

छान लिहिलय. नक्की भेट देणार शाळेला.

शाळा ही सुंदर !, लेख ही छान!

अभिजीत अवलिया's picture

17 Oct 2017 - 6:43 pm | अभिजीत अवलिया

अतिशय सुंदर ओळख ...

सुबोध खरे's picture

17 Oct 2017 - 7:08 pm | सुबोध खरे

+१००

Ranapratap's picture

17 Oct 2017 - 7:29 pm | Ranapratap

लेख वाचून एक होता कार्व्हर मधील शाळेची आठवण झाली.

राघवेंद्र's picture

17 Oct 2017 - 9:32 pm | राघवेंद्र

कार्यचित्र आवडले.

खूप प्रेरणादायक आहे.

समर्पक's picture

17 Oct 2017 - 11:53 pm | समर्पक

"मी इथे शाळा सुरू करतानाच ठरवलं होतं, की २५ वर्षं मी कुठलंही भाषण देणार नाही, कुठल्याही माध्यमात काहीही लिहिणार नाही. मी फक्त काम करत राहणार." हा बाणा, हा व्रतस्थपणा एखाद्या योग्याला शोभेल. त्यांचं नाव जरी राजा असलं, तरी त्यांच्याशी बोलताना मात्र सतत त्यांच्यातला योगी दिसत राहतो.

त्यांच्या कार्याला आणि निष्ठेला सलाम!

सविस्तर ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!

जुइ's picture

18 Oct 2017 - 6:09 am | जुइ

दांडेकर दांपत्याच्या अनोख्या कार्यचित्राची सविस्तर ओळख करुन दिल्याबद्दल आभारी आहे.

मार्गी's picture

18 Oct 2017 - 10:26 am | मार्गी

एका सुंदर कामाची माहिती करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!!

मनिमौ's picture

18 Oct 2017 - 1:02 pm | मनिमौ

करून दिलीत

स्वाती दिनेश's picture

18 Oct 2017 - 8:36 pm | स्वाती दिनेश

दांडेकर दांपत्याची ओळख छान करून दिली आहे.
स्वाती

पाषाणभेद's picture

19 Oct 2017 - 8:48 am | पाषाणभेद

"श्रेयाचा मज नको लेशही, निर्माल्यातही विसावे"
वर फळ्यावर लिहील्यासारखे जगणे आहे या दांपत्याचे.
असले समाजाप्रती जगणे असणारे विरळच.

एस's picture

20 Oct 2017 - 2:15 pm | एस

अगदी असेच म्हणतो!

माम्लेदारचा पन्खा's picture

20 Oct 2017 - 1:49 pm | माम्लेदारचा पन्खा

त्यांना सलाम आणि तुम्हालाही . . . !

निष्ठापुर्ण जीवनाची छान ओळख .

सस्नेह's picture

21 Oct 2017 - 12:53 pm | सस्नेह

गौरवशाली व्यक्तिमवे आणि यथार्थ चित्रण !

पैसा's picture

23 Oct 2017 - 9:33 pm | पैसा

ओळख आवडली

दांडेकर दांपत्याच्या अतिशय सुंदर आणि निष्ठापूर्वक अशा निरतर कार्याची ओळख करुन दिल्याबद्द्ल हार्दिक आभार.

मित्रहो's picture

26 Oct 2017 - 6:36 am | मित्रहो

महान कार्य करनाऱ्या दांपत्याच्या कार्याची सुंदर ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद

नाखु's picture

26 Oct 2017 - 9:03 am | नाखु

कर माझे जुळती,
आवर्जून भेट द्यावी लागेल अशा ठिकाणी

उत्तम परिचय

उघड्या शाळेतला नाखु

पद्मावति's picture

26 Oct 2017 - 2:50 pm | पद्मावति

सुंदर ओळख.
दांडेकर दांपत्याच्या कार्याला शत शत नमन __/\__

पिशी अबोली's picture

12 Nov 2017 - 9:55 pm | पिशी अबोली

सुंदर ओळख!

सुरेख ओळख! खूप प्रेरणादायी दांपत्य आहे. या लेखासाठी धन्यवाद.