लेखकाची थेट भेट !

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
11 Oct 2017 - 5:44 pm

समाजात वावरताना आपल्याला अनेक अनुभव येत असतात- काही भले तर काही बुरे. दोन्ही प्रकारचे अनुभव आपल्याला बरेच काही शिकवून जातात. त्यातूनच आपला व्यक्तिमत्वविकास घडत असतो. चांगले अनुभव आपल्याला उल्हसित करतात, तर कटू अनुभव मनाला जखम करून जातात. या दोन प्रकारच्या अनुभवांची जर तुलना केली, तर आपल्या लक्षात येईल की चांगल्या अनुभवांची स्मृती ही अल्पकाळ राहते. याउलट, कटू अनुभव मात्र दीर्घकाळ मनात खोलवर दडून राहतात. त्यांना विस्मृतीत ढकलणे हे तसे अवघड काम असते. आपण तसा कितीही प्रयत्न केला तरी त्यांच्या आठवणी अधूनमधून उफाळून येतात.

साहित्याच्या प्रांतात लेखक व वाचक हे दोन परस्परावलंबी घटक आहेत. चांगला लेखक वाचकांना रिझवतो तर वाचक त्यांच्या प्रतिसादांतून त्या लेखकाला सुखावतात. एकप्रकारे लेखक आणि वाचक हे एकमेकाला घडवतात. लेखक हा एक कलाकार असतो पण वाचकाच्या दृष्टीने तो ‘पडद्यामागचा कलाकार’ असतो. एखाद्या चोखंदळ वाचकाला जर काही निमित्ताने लेखकाची भेट घडली तर त्याच्या दृष्टीने तो अविस्मरणीय प्रसंग असतो. पण अशा भेटीचे लेखकाच्या दृष्टीने काय मोल असते, कोण जाणे?
असो, आता प्रास्ताविक आवरतो आणि सुरू करतो माझ्या याबाबतीतल्या एका अनुभवकथनाला......
........
एका शहरातील प्रसिद्ध सभागृहात एक कलाविषयक वस्तूंचे प्रदर्शन भरले होते. वृत्तपत्रात त्याची बातमी वाचली आणि उत्सुकतेने ते बघायला गेलो. प्रदर्शन सुंदर होते. एकून सहा विभागांत ते मांडले होते. प्रत्येक विभागात संबंधित कलाकार उपस्थित होते. तेथील एका विभागाने माझे लक्ष वेधून घेतले. याचे कारण म्हणजे तेथे बसलेले कलाकार हे एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते. त्या गृहस्थांना एका कलेत गती आहे आणि ते एक प्रसिद्ध लेखकही आहेत. त्यांच्या लेखनाचा मी तरुणपणी चाहता होतो. याखेरीज ते लेखक विविध व्यासपीठांवरून भाषणे करीत असतात. तसेच अधूनमधून त्यांच्या जाहीर मुलाखती होत असतात. त्यातून त्यांनी सांगितलेले स्वतःच्या साधी राहणी आणि कमी खर्चाची जीवनशैली याबद्दलचे अनुभव खरेच चांगले असतात. त्यांच्या अशा काही चांगल्या सवयींचे मी अनुकरण करत असतो. एक ज्येष्ठ लेखक म्हणून मला त्यांच्याबद्दल आदर वाटतो.

आता या प्रदर्शनात त्यांना पाहिल्यावर क्षणभर मी आनंदलो. हे लेखक माझ्याच कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत. अर्थात आम्हा दोघांच्या वयात बरेच अंतर असल्याने आमच्या शिक्षणाचा काळ वेगवेगळा होता. तेव्हा मनात म्हटले, चला आज त्यांना भेटून त्यांची ओळख करून घेता येईल. त्यांना चांगले ओळखणारे दोघे जण माझेही मित्र आहेत. त्यांपैकी एकाचे नाव त्यांना सांगायचे मी मनात पक्के केले.
प्रदर्शनास फारशी गर्दी नव्हती. ते लेखकही त्यांच्या विभागात शांतपणे बसून होते. म्हणून मी त्यांच्या जवळ गेलो आणि त्यांना अभिवादन केले. मग माझे नाव सांगून आम्ही दोघे एकाच कॉलेजचे माजी विद्यार्थी असल्याचे सांगितले. त्यावर ते फक्त ‘हूं’ म्हणाले. मग मी त्यांना आमच्या समान मित्राची ओळख सांगितली. त्यावर ते पुन्हा एकदा पण अस्पष्ट आवाजात ‘हूं’ म्हणाले. स्वतःची मान हलवण्याचीही तसदी त्यांनी घेतली नाही. आता माझी अपेक्षा होती, की ते थोडा संवाद करतील. निदान, ‘बरं, तुम्ही काय करता आता’ एवढे तरी मला विचारतील. पण छे! ते निर्विकारपणे त्यांच्या हातातील एका माहितीपत्रकाकडे बघत बसले.

मी दोन मिनिटे तेथे रेंगाळलो. त्यांच्या कलाकृतींवर एक नजर टाकली अन तेथून सटकलो. एव्हाना त्यांना माझ्याशी संवाद करण्यात बिलकूल रस नव्हता, हे स्पष्ट झाले होते. अधिक काही मीहून बोलणे आता वेडेपणाचे ठरले असते. कोणतीही दोन माणसे जेव्हा एकमेकांना भेटतात आणि ओळख करू पाहतात, तेव्हा त्यातील प्रत्येकाने दुसऱ्याला ‘आपण काय करता’ एवढे माफक विचारावे, हा शिष्टाचार आहे. त्यामुळे माझी काही त्यांच्याकडून ‘फार मोठी’ अपेक्षा होती, असे मला वाटत नाही. त्यांनी माझ्याशी किमान दोन वाक्यांचा संवाद केला असता तर मलाही त्यांच्या कलेसंबंधी अधिक जाणून घ्यायची इच्छा होती. उगाचच हवापाण्याच्या गप्पा मारण्याचा माझा इरादा नक्कीच नव्हता.

खरे म्हणजे अशा वलयांकित व्यक्तींच्या जवळपास फिरकायचा माझा स्वभाव नाही. याचे कारण असे, की बहुसंख्य गाजलेले लेखक, कलाकार, खेळाडू इत्यादी मंडळी ही आत्मकेंद्री असतात, असा सर्वसाधारण अनुभव आहे. ही मंडळी जेव्हा सार्वजनिक ठिकाणी वावरतात, तेव्हा त्यांच्या भोवती बऱ्याचदा खुशमस्कऱ्यांचा गराडा असतो. या सगळ्याचा मला अगदी तिटकारा आहे. पण या वेळेस मी सपशेल चूक केली आणि पस्तावलो. त्याबद्दल नंतर मनातल्या मनात माझ्यावरच रागावलो.

वास्तविक अशी मंडळी जनसामान्यांच्या प्रतिसादांमुळेच ‘मोठी’ झालेली असतात. पण, एकदा का ती वलयांकित झाली, की मग ‘मला पाहा आणि फुले वाहा’ अशी त्यांची प्रवृत्ती होते.
माझ्या वरील एका अनुभवावरून मी त्या लेखकाबद्दल कुठलाही निष्कर्ष काढू इच्छित नाही. माझ्या मनातील त्यांच्याबद्दलचा आदर कायम आहे. तरीपण मला जे खटकले ते मी मोकळेपणाने लिहीले आहे.
लेखकांच्या संदर्भात मी पूर्वी प्रसिद्ध अमेरिकी लेखक Robert Persig यांचे एक अवतरण वाचले होते. ते असे आहे, “The best place to meet an author is on the pages of his book. Anywhere else is a disappointment”.
या अनुभवाच्या निमित्ताने मला हे वाक्य मनापासून पटले. लेखकांबद्दल खुद्द एका लेखकानेच मांडलेले हे मत किती मार्मिक आहे!

…. तर असा होता माझ्या आयुष्यातील प्रत्यक्ष लेखक-भेटीचा एकमेव अनुभव. तशी आतापर्यंत काही प्रसिद्ध लेखकांशी पत्रभेट झालेली आहे आणि ती नक्कीच आनंददायी होती. एकांनी तर मला पत्रोत्तराबरोबर त्यांचे एक पुस्तकही भेट पाठवले होते.

आपल्यातील ज्यांना कुठल्याही वलयांकित व्यक्तीच्या प्रत्यक्ष भेटीचा अनुभव असेल तर त्याबद्दल जाणून घेण्यास मी उत्सुक आहे. असा अनुभव गोड वा कडू असणे हे व्यक्तीनुसार अवलंबून आहे. तर मग जरूर लिहा. धन्यवाद.
******************

साहित्यिकविचार

प्रतिक्रिया

पुंबा's picture

11 Oct 2017 - 7:21 pm | पुंबा

“The best place to meet an author is on the pages of his book. Anywhere else is a disappointment”.

अगदी खरंय..

सचिन काळे's picture

11 Oct 2017 - 9:44 pm | सचिन काळे

अगदी खरंय..

आणि हे माझे आवडते वाक्य बनलेय.

कुमार१'s picture

13 Oct 2017 - 2:31 pm | कुमार१

सचिन, सहमत.
मी तर त्या वाक्याच्या अगदी प्रेमात पडलो आहे !
जेव्हा Persig ना एका पत्रकाराने फोनवरु न मुलाखत घ्यायला येऊ का असे विचारले तेव्हा त्यानी ते उत्तर दिले होते.

कुमार१'s picture

11 Oct 2017 - 8:25 pm | कुमार१

सौरा, आभार !

उदय's picture

11 Oct 2017 - 10:56 pm | उदय

वास्तविक अशी मंडळी जनसामान्यांच्या प्रतिसादांमुळेच ‘मोठी’ झालेली असतात. पण, एकदा का ती वलयांकित झाली, की मग ‘मला पाहा आणि फुले वाहा’ अशी त्यांची प्रवृत्ती होते.

साधारणतः २००० साली "पुरुष" नाटक वॉशिंग्टन डी.सी. ला आले होते तेव्हा मी सहज बॅकस्टेजला गेलो आणि नाना पाटेकरबरोबर एकट्याने ४० मिनिटे मराठीत गप्पा मारल्या. मिरचीचे आईसक्रीम कसे लागते ते सिनेमात किती पैसे मिळतात ते सिनेमा जास्त आवडतो की नाटक, अशा विविध विषयांवर बोललो. त्याला भेटायच्या आधी मला अगदी "वॉव" असे वाटत होते, पण त्याच्याशी इतक्या सहज गप्पा मारल्या की नंतर लक्षात आले की हे कलाकार म्हणजे काही आकाशातून पडलेले नाहीत, तुमच्या-माझ्यासारखीच सामान्य माणसे आहेत. पण तेव्हापासून मुद्दाम कुणालाही भेटायचा विचार मात्र निघून गेला. चांगले की वाईट ते माहीत नाही, पण तेव्हापासून आता कुणालाही भेटायचे विषेश कौतुक वाटत नाही.

व्यक्ती तितके स्वभाव हे खरंच. तरीही..

भारत आणि विदेश.. यात काही फरक पडत असेल असं वाटतं का?

कुमार१'s picture

12 Oct 2017 - 12:33 pm | कुमार१

होय, मला वाटते की फरक पडत असावा !

भारत आणि विदेश यामुळे नक्कीच काही फरक पडत असेल. पण माझ्या मित्राचा अनुभव सांगतो. तो डेनव्हरला होता, तेव्हा त्याची मुलगी ज्या कुमॉन क्लासमध्ये जायची तिथेच माधुरी दीक्षितपण यायची. तिथे बसायला जेमतेम चारच खुर्च्या असल्याने जवळपास दररोज भेटत आहे. पण एकंदरीत ती शिष्ट आहे, असे त्याचे मत आहे. शिवाय ती मराठीत बोलणे टाळायची असा त्याचा अनुभव आहे. १-२ वाक्ये झाली की सरळ हिंदीत बोलायची किंवा इंग्रजीत. त्यामुळे देश/परदेश यापेक्षा ते व्यक्तिवर जास्त अवलंबून आहे, असे मला वाटते.

उदय's picture

13 Oct 2017 - 9:20 pm | उदय

* भेटत असे.

सुबोध खरे's picture

14 Oct 2017 - 6:58 pm | सुबोध खरे

दोन तर्हेची माणसं असतात.
NRI (नॉन रेसिडेंट इंडियन्स) आणि
RNI ( रेसिडेंट नॉन इंडियन्स)

अमरेंद्र बाहुबली's picture

12 Oct 2017 - 1:27 am | अमरेंद्र बाहुबली

4/5 वर्षांआधी अशोक सराफ धुळ्यात एका नाटकासाठी आले होते.ते ज्या होटेल मध्ये थांबले ते अगदी माझ्या घरासमोरच. आम्ही काँलनीतले मित्र एका autograph साठी तिथे गेलो. रूम बाहेर 2 तास वाट पाहिली पण काहीच मिळाले नाही. बाहेरयेऊनही त्यांनी autograph दिली नाही. शेवटी hotel मालकाने विनवल्यावर एक फोटो काढण्याची परवानगी दिली 30 लोकं आणी अशोक सराफ. फोटो बोंबलला. वाईट अनुभव. याऊलट तेथेच भरत जाधव, संजय नार्वेकर यांचा अनुभव चांगला आला.

कदाचित त्याना या ग्लॅमरचा कालपरत्वे कंटाळा येत असावा..
यामध्ये तरुण आणि म्हातारे असाही फरक आहे काय?

सतिश गावडे's picture

12 Oct 2017 - 8:44 am | सतिश गावडे

असाच अनुभव मलाही आला एका पुस्तक प्रदर्शनात. एका लेखक महाशयांच्या पुस्तकांचा एक रॅक तिथे होता. लेखक ही तिथेच होते. मी त्यांना नमस्कार केला. तुमची पुस्तकं वाचतो म्हणालो. तर लेखक महाशय इतर काही न बोलता एखाद्या सराईत सेल्समनप्रमाणे रॅकवरील जास्तीत जास्त पुस्तकं माझ्या गळ्यात मारण्याचा प्रयत्न करु लागले.

त्या लेखकाचे लेखन यथातथाच असल्याने मी काही हा अनुभव मनाला लावून घेतला नाही. :)

ते एक गोड गोड बोलणारे लेखक तर नव्हेत ना? पुस्तक प्रदर्शनांत ते हमखास दिसतात.

गोड बोलणारे असतील तर माझा अनुभव चांगला आहे, सांगलीला एका व्याख्यानासाठी आलेले तेव्हा पुस्तकांचा स्टॉल लावला होता तिथे त्यांनी.:प मी पुस्तक न घेता आगाऊपणे काही तरी लिबरलीझम, कम्युनिझमविषयीचा प्रश्न विचारला होता, त्यांनी बरंच व्यवस्थित उत्तर दिलेले. ५-७ मिनिट एंटरटेन केलं ते पण त्यांच्या पुस्तकविक्रीतून वेळ काढून. पण त्यानंतर आता कुठल्या लेखकाला भेटून बोलण्याची इच्छा नाही होत.

प्रचेतस's picture

12 Oct 2017 - 11:04 am | प्रचेतस

मला ते ८/१० वेळा पुस्तक प्रदर्शनांत दिसलेले, पण त्यांचे एकही पुस्तक मी वाचलेले नसल्याने मी त्यांच्याशी बोलायला धजू शकलो नाही,

मोदक's picture

12 Oct 2017 - 2:46 pm | मोदक

दवणे काय?

प्रचेतस's picture

12 Oct 2017 - 2:48 pm | प्रचेतस

गोडबोले :)

सतिश गावडे's picture

12 Oct 2017 - 9:48 am | सतिश गावडे

गोडबोले नव्हेत. :)

प्रचेतस's picture

12 Oct 2017 - 11:05 am | प्रचेतस

मग कोण?

पगला गजोधर's picture

12 Oct 2017 - 1:50 pm | पगला गजोधर

च्याय्ला पूर्ण लेख वाचून इथपर्यंत प्रतिक्रिया वाचेपर्यंत, मनात , "अच्युत गोडबोले" ??? असं विचारावं ... असं ठरवलेलं .. पण श्या ...

शब्दबम्बाळ's picture

12 Oct 2017 - 9:42 am | शब्दबम्बाळ

आपण हा अनुभव आधी कुठेतरी लिहिला होतात का?
वाचल्यासारखं वाटतंय... :)

कुमार१'s picture

12 Oct 2017 - 9:47 am | कुमार१

सर्वांचे आभार.

आपण हा अनुभव आधी कुठेतरी लिहिला होतात का?
वाचल्यासारखं वाटतंय... :)
>>>> होय, माबोवर.

प्राची अश्विनी's picture

12 Oct 2017 - 9:54 am | प्राची अश्विनी

ओरिगामीचं प्रदर्शन होतं का?

आठेक वर्षांपूर्वी माझ्यासोबत पण असाच किस्सा घडलेला. फक्त व्यक्ती लेखक नसून इतिहासकार होती. महाराष्ट्रातील एकदम प्रसिद्ध असामी. आमच्या परिचयातील एकांनी एक कार्यक्रम आयोजित केलेला जिथे हे प्रमुख वक्ते म्हणून आलेले होते. इतकं वय होऊनही त्यांच्या भाषणातील आवेश आणि ओघवती शैली कायम होती. कार्यक्रम संपल्यावर जेवण सुरु झालं आणि तिथं मी त्यांना हातात ताट घेऊन खुर्चीवर बसलेलं पाहिलं. यजमानांची परवानगी घेऊन मी त्यांच्यापाशी गेलो. सर्वप्रथम वंदन केलं. आणि खुर्ची घेऊन शेजारी बसलो. हे निर्विकार चेहऱ्यानी जेवत होते. त्यांना काही इतिहासाबद्दल , महाराजांबद्दल शंका , प्रश्न विचारले तर "हं"आणि "नाही" च्या पलीकडे काही उत्तर नाहीच. बरं प्रश्न काही अगदीच बाळबोध नव्हते.पण महाशय काहीच बोलेनात. भाषणात त्यांनी गडकिल्ले संवर्धनासाठी झटणाऱ्या एका व्यक्तीचा आवर्जून उल्लेख केलेला. त्यापासून प्रेरणा घेऊन आपल्याला अजून काही करता येईल का असं विचारलं तर "कर तुला काय करायचंय ते" इतकं एक वाक्य कसंबसं जुलमाचा रामराम केल्यागत बाहेर पडलं. नंतर काहीतरी प्रश्न विचारतील, निदान तू काय करतोस काय शिकतोस हे तरी विचारतील अशा अपेक्षेने पाच मिनिट बसून राहिलो पण इतिहासकार मेन्यूमध्ये भाकरी आणि भरल्या वांग्याची भाजी यासारखे मराठमोळे पदार्थ ठेवल्याबद्दल यजमानांचं कौतुक करण्यात गुंग झाले आणि मी तसाच उठून निघून आलो.

हवालदार's picture

13 Oct 2017 - 3:27 pm | हवालदार

तूम्ही जेवायला बसल्यावर तुमच्या बाजूला कोणी तीर्हईत व्यक्ती येवून तुमच्याशी गप्पा मारू लागली तर तुम्हाला चालते का? तेही दररोज वेगळी व्यक्ती?

कपिलमुनी's picture

12 Oct 2017 - 10:59 am | कपिलमुनी

कोणत्याही अनोळखी प्रसिद्ध किंवा सामान्य माणसाशी बोलताना पूर्वपरवानगी घ्यावी , त्यांना वेळ आहे का ? आपण ५ मिनिट बोलू शकतो का ?
असे विचारूनच बोलावे.
आपल्याकडे हा कॉमन सेन्स सार्वजनिकरीत्या खूप कमी आहे.

( कदाचित इतिहासकारांना कडाडून भूक लागली असावी आणि तुमचा जेवणात व्यत्यय होत असावा! ह. घ्या. )

हं विचारायला हवं होतं खरं. तसं आयोजकांना (जे आमच्याच नात्यातील एक होते) आधी चारपाचदा विचारलेलं नक्की जाऊ का म्हणून. त्यांनी बिनधास्त जा म्हणून सांगितलं. जेवणानंतर ते तडक निघणार असल्याने हीच संधी आहे असंही त्यांनी सांगितलं.

मित्रहो's picture

12 Oct 2017 - 11:04 am | मित्रहो

ते माणसावर आणि त्यावेळेच्या पिरिस्थितीवर अवलंबून असावे. कुणी पुस्तक प्रदर्शानात असेल तर तो पुस्तके खपावायचाच प्रयत्न करेल. काही माणासांना दुसऱ्याशी बोलायला आवडत नाही. काही स्वतःत मग्न असतात.
मराठीतले एक लेखक माझ्या बायकोला इंग्रजी शिकवायचे आणि तिचे त्यांच्याविषयी कधीही चांगले मत नव्हते. आजही नाही. मी काहीतरी वेगळा आहे असे त्यांना वाटते असे तिचे मत आहे. असेच काहीसे मत माझ्या एका मित्राचे त्याच्या आजोबांविषयी होते. ते कवी होते. याउलट सर्वसामान्य माणसांसारखे वागनारे सुद्धा बरेच बघितले. शेवटी सारी माणसे असतात.

कुमार१'s picture

12 Oct 2017 - 11:05 am | कुमार१

यामध्ये तरुण आणि म्हातारे असाही फरक आहे काय? >>. असावा. सहसा तरूण बोलायला उत्सुक असतात.

दाह, अनुभवाशी सहमत

प्रत्येकाचे स्वभाव वेगळे असतात. कुणाला मी पणा जास्त असतो कोणाला नसतो असो.

मी मंगला गोडबोले आणि वीणा गावणकर यांना मेसेज पाठवले होते. त्यांनी मला खुप छान शब्दात रिप्लाय दिले होते. त्यामुळे त्यांच्याबद्दलचा आदर दुणावला माझा.

सुबोध खरे's picture

12 Oct 2017 - 1:31 pm | सुबोध खरे

माझे अनुभव काही निराळे आहेत.
पंडित शिवकुमार शर्मा यांच्या संतूर वादनाचा आर्यक्रम मुलुंड मध्ये (२०१५) झाला तेंव्हा आम्ही सुरुवातीला त्यांना भेटायला गेलो.त्यांनी आमचे छान हसून स्वागत केले. त्यांना नमस्कार केल्यावर आम्ही तुमचे चाहते आहोत सांगितले. त्यांनी मला विचारले "आप क्या करते हो? मी "लष्करातून रिटायर झालो" आहे असे सांगितल्यावर त्यांनी हसून "आप रिटायर हुए जैसे लगते नही हो" म्हणून सांगितले. माझ्या बायकोने आपला "किरवाणी" राग फार दिवसात ऐकला नाही असे सांगितले. त्यावर ते म्हणाले कि बरोबर आहे १९९७ नंतर मी तो वाजवलेला नाही.
काही काळाने कार्यक्रम सुरु झाला तेंव्हा त्यांनी प्रस्तावना झाल्यावर सांगितले कि बऱ्याच दिवसात किरवाणी राग वाजवला नाही म्हणून आज मी हा राग वाजवणार आहे. आमच्या "अंगावर रोमांच आणि डोळ्यात अश्रू" उभे राहिले.
आमच्या सारख्या एका टिनपाट श्रोत्याचे ऐकून एवढा मोठा दिग्गज कलाकार त्यांच्या आवडीचा राग पूर्ण दीड पावणे दोन तास वाजवतो हि आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. ( मला रागदारीतील ओ का ठो कळत नाही परंतु ऐकायला मात्र आवडतं आणि मी सलग चार पाच तास असे कार्यक्रम ऐकू शकतो/ ऐकतो ते सुद्धा फेसबुकवर/ इंस्टाग्राम वर स्टेटस न टाकता -- बायको गाणं शिकली आहे तिला थोडं फार समजत असावं.)
पंडित विश्वमोहन भट, पंडित विजय घाटे, पंडित सतीश व्यास, पंडित आनंद भाटे अशा अनेक दिग्गज कलाकारांना आम्ही भेटलो आहे. सर्वानी छान हसून व्यवस्थित संभाषण केले.
पुलं नि लिहिले आहे कि चार बुकं वाचलेला भिक्षुक आणि दशग्रंथ पचवून विनम्र झालेला व्युत्पन्न यातील हा फरक असावा असे कुठे तरी वाटते

अनिंद्य's picture

12 Oct 2017 - 1:46 pm | अनिंद्य

लेखकांचे नाहीत पण चित्रकार मंडळींचे फार चांगले अनुभव आहेत मला. अगदी कमी बोलणाऱ्या बऱ्याच प्रसिद्ध चित्रकारांशी ओळखपाळख नसता छान गप्पा झाल्या आहेत.

सतीश गुजराल यांच्याबद्दलचा अनुभव तर हृद्य आणि कायम लक्षात राहील असा आहे. त्यांच्या अगदी लहानपणापासून त्यांना अजिबात ऐकू येत नाही, पण त्यांनी किरण गुजराल यांच्या मार्फत सुरेख संवाद साधला. न कंटाळता माझे बाळबोध म्हणणे ऐकले (म्हणजे किरणजींनी त्यांना हातवाऱ्याने / लिहून सांगितले). सतीशजींनी त्यांच्या प्रदर्शनात मांडलेली चित्रे आणि म्युरल्सबद्दल उत्साहाने सांगितले.... May be it was my lucky day :-)

नाटक-फिल्मी लोकांबद्दल आकर्षण नाही, पण दीपा-श्रीराम लागू, जावेद अख्तर, अमिताभ बच्चन ही मंडळी चाहत्यांशी विनम्रतेने वागतात - वागवतात हे बघितले आहे. मला वाटतं ही वागणूक व्यक्तीसापेक्ष असते.

बाकी The best place to meet an author is on the pages of his book ह्याच्याशी सहमत :-)

सुबोध व आनिंद्य, अनुभव आवडले. ते पुलं चे वाक्यही छान

आपल्याला जरा वाईट वाटल्याचे लेखनातून जाणवते आहे. साहजिक आहे.
आजवर मी आवडत्या लेखक, कलाकारांना भेटले नाहीये. तसे वाटलेही नाही त्यामुळे स्वत:चा असा अनुभव नाही.
तरीही मैत्रिणीला या त्रासातून जाताना पाहिलेय.
ती एका मंडळासाठी बरेच काम करते. वयाने मोठी आहे म्हणून तिचा यातील अनुभवही मोठा आहे.
दोन ते तीन राज्यांमध्ये तिचे वास्तव्य झाले आहे व त्या त्या ठिकाणी तिने या मंडळासाठी काम केले आहे.
प्रसंगानुरूप अनेक कलाकारांना, लेखकांना, गायकांना आमंत्रित केले जात असते.
एका हिंदीत स्थिरावलेल्या मराठी मनुष्याला सपत्निक आमंत्रित केले गेले.
राहण्याजेवणाच्या, वास्तव्याच्या सर्व अटी पूर्ण केल्या गेल्या. बिझनेस क्लास प्रवास मान्य केला.
तरी तो कलाकार व त्याची पत्नी यांनी बराच त्रास दिला. मैत्रिणीची कॉलेजवयीन कन्यका दिमतीला राहीली होती.
ती एका दिवसातच वैतागून काम सोडून गेली. मनुष्य शुद्धीत असेल तर बरा वागण्याची शक्यता. नसल्यास नाही.
त्याचप्रमाणे आणाखीही एक मराठी कलाकारांचा संच आला असताना अपरात्री पेयपान करून मोठ्याने हसत, गप्पा मारत हॉटेलच्या बाहेर बसून राहणे,
विनंती करूनही आपापल्या खोल्यांमध्ये न जाणे वगैरे प्रकार केले आहेत.
मग दुसरे दिवशी प्रयोगावेळेस घसे बसणे, झोपा पूर्ण न झाल्याने त्रास होणे वगैरे झाले.
एक गायिकाबाई तर ऐन कार्यक्रमावेळेस गाऊच शकल्या नाहीत.
काहीवेळा अपघाताने असे होते पण अनेक कलाकार आहेत जे स्वत:चे गळे जपतात व उत्तम कार्यक्रम पार पाडतात.
आपल्या देशातील हवामान व दुसर्‍या देशातील हवामानात फरक असतो.
थंडी, उन्हाळा हे वेगळे असल्याने त्रास झाल्यास व त्यामुळे प्रयोग व्यवस्थित न झाल्यास जबाबदार कोण?
व्यावसायिकता कोठे गेली? मैत्रिणीला फार मनस्ताप झाला.

मला वाटतं की लोकांनी यांना भेटायचे टाळावे व लेखक, कलाकारांनी व्यावसायिक मानसिकता ठेवून काम करावे.
असे करताना आपण सगळेजण मनुष्यप्राणी असल्याने कधी आनंदाच्या भरात भेटले जाणे हे आपल्याकडून, तर कधी व्यावसायिकतेचे भान सुटणे हे समोरच्याकडून थोडेफार झाल्यास सोडून देण्याशिवाय पर्याय नाही. पण वर उल्लेखलेल्या प्रसंगात झालेले अपमान, पेयपानाचा खर्च दुसर्‍याच्या माथी मारणे वगैरे खपवून घेतले जाऊ नये.
मी येत्या विकांती होणार्‍या एका मराठी नाटकाची तिकिटे काढलियेत. कार्यक्रम नीट होईल अशी आशा आहे.
कोणालाही भेटायला वगैरे जाणार नाहीये.

सचिन काळे's picture

12 Oct 2017 - 6:10 pm | सचिन काळे

सुंदर प्रतिसाद!

रेवती's picture

12 Oct 2017 - 6:55 pm | रेवती

धन्यवाद.

सुबोध खरे's picture

12 Oct 2017 - 6:29 pm | सुबोध खरे

आपण म्हणता तसा अनुभव बऱ्याच अनिवासी भारतीयांना आला आहे. आपण त्यांच्यासाठी कार्यक्रम करतो हे त्यांच्यावर उपकार करतो असा आव बऱ्याच कलाकारांचा असतो. शिवाय त्यांची सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी ते आपल्याला बोलावतात म्हणजे हि त्यांची निकड आपण भागवतो. ते श्रीमंत आहेत आणि भरपूर पैसे मिळवतात मग आम्ही त्यांना भरपूर पैसे मागितला तर काय चूक आहे असाही भाव असतो बरेच कलावंत आणतात. अशा वृत्तीच्या कलाकारांच्या मुळे माझ्या बऱ्याच अनिवासी मित्रांनी मनस्ताप झाल्याचे बोलून दाखवले आहे.
अर्थात याची दुसरी बाजू सुद्धा आहे म्हणजे शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम चालू असताना बियर पीत मोठ्यामोठ्याने गप्पा मारत राहणारी अनिवासी मंडळी सुद्धा कलाकारांच्या वाट्यास आली आहेत
आपण संयत भाषेत लिहिले आहे तेच मी स्पष्टपणे लिहिले आहे.

शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम चालू असताना बियर पीत मोठ्यामोठ्याने गप्पा मारत राहणारी अनिवासी मंडळी
अर्थातच ही बाजूही खरी असणार.

सुबोध खरे's picture

12 Oct 2017 - 8:55 pm | सुबोध खरे

हा प्रकार गानसरस्वती श्री किशोरी आमोणकर यांनी सांगितला होता. त्यांच्या मैफिलीत काही लोक बियर पीत गप्पा मारत होते त्यामुळे त्यांनी मैफिल आटोपती घेऊन तेथून रजा घेतली यावर त्यातील काही हुशार लोकांनी हि अमेरिकेची संस्कृती आहे, पॉप शो मध्ये पण असे होते म्हणून मल्लिनाथी पण केली होती. किशोरीताईंनी सांगितले कि संगीत हि माझ्यासाठी ईश्वर पूजा आहे आणि त्यासाठी मी माझे आयुष्य वेचले आहे त्याचा उपमर्द मला कधीही सहन होणार नाही. २०१५ मध्ये वयाच्या ८५ व्या वर्षी हि मैफिलीत आल्यावर आणि गायन संपल्यावर त्यांनी श्रोत्यांना डोके टेकून साष्टांग नमस्कार घातलेला मी स्वतः पाहिलेला आहे.
हा मूळ दोन संस्कृतीतील फरक आहे.

किशोरीताईंनी जे केले ते बरोबर होते असे वाटते. हा पॉप संगिताचा कार्यक्रम नव्हता आणि आपल्या संगिताच्या मैफिलीबद्दल काहीच माहीत नसणारे हे लोक्स नसावेत. उगीच सारवासारव केली.

मराठी_माणूस's picture

13 Oct 2017 - 10:35 am | मराठी_माणूस

काही हुशार लोकांनी हि अमेरिकेची संस्कृती आहे..................

अर्ध्या हळकुंडातील असावेत

कुमार१'s picture

12 Oct 2017 - 7:07 pm | कुमार१

रेवती, प्रतिसाद आवडला.
सर्वांचेच अनुभव वाचनीय आहेत.

दुर्गविहारी's picture

13 Oct 2017 - 12:41 pm | दुर्गविहारी

सेलिब्रिटी या देखील आपल्यासारख्याच हाडामासाची माणसेच असतात. त्यांना देखील त्यांचे मुड असतात. हे विसरले गेल्याने चाहत्यांना मारहाण सारख्या बातम्या वाचायला मिळतात.
मला स्वाक्षरी गोळा करायचा छंद आहे. या निमीत्ताने मी अनेक मान्यवरांना भेटलोय देखील , अगदी काही नामांकितांच्या घरीही गेलेलो आहे. थोडे फार बरे वाईट अनुभव गाठीशी आहेत. यावर धागा लिहावा ईतके मटेरियल आहे, पण उगाच मी अमुक्याला कसे भेटलो, त्यांनी माझे कौतुक कसे केले असे माझीच आरति ओवाळणारा म्हाग्रु छाप धागा होईल, तेव्हा न लिहीणेच बरे.

इरसाल's picture

13 Oct 2017 - 3:12 pm | इरसाल

किमान गुरु म्हणुन तरी लिहा. वाचायला आवडेल.

तुमचा छंद चांगला आहे. निवडक अनुभव जरूर लिहा

सचिन काळे's picture

13 Oct 2017 - 2:46 pm | सचिन काळे

आपणांस अनुमोदन!

नाटकाला जाऊन आलो. त्यांनी नाटकाच्या सुरुवातीला व शेवटी फोटू काढणे, सह्या घेणे, पडद्यापाठीमागे भेटणे वगैरे आज होऊ शकणार नाही हे सांगितल्याने कोणी गेले नाही. कार्य्क्रम अर्धा तास उशिराने सुरु झाला. इकडील पब्लिकची ती सवय मोडल्याने काही वेळाने लोकांनी विनाकारण टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली. मग चालू केला. सगळे कलाकार फार दमल्याचे समजत होते. ते एका राज्यातून उडून आमच्या राज्यात आले होते, प्रयोग सादर केला, उद्या जर्सी असे करत ६ नोव्हें. पर्यंत दौरा असणार आहे.
कार्यक्रमाच्या खर्चाचा बराच हिस्सा पु. ना. गाडगिळांनी उचलल्याने त्यांच्याकडील सोने व हिरे यांच्यात गुंतवणूक केली असता काय मिळेल ही झायरात कलाकारांकरवी करण्यात आली. त्यात एकरकमी २००० डॉ चे सोने खरेदी केले असता सलमान खानला भेटण्याची संधी अशी ऑफर होती. ती कोणाला इच्छा आहे? असे विचारताच एकही हात वर झाला नाही. (बरे झाले! असेच हवे त्या सलमानला!)
नाटक चांगले पार पाडले. शेवटी स्टेजवर कलाकारांना बॉस्टन मंडळातर्फे भेटवस्तू देण्यात आल्या. एक दोनजण सोडता बाकी कलाकारांनी पिशव्या उघडून त्यात काय आहे हे लगेच पाहिले त्याची गंमत वाटली.

सुबोध खरे's picture

15 Oct 2017 - 2:28 pm | सुबोध खरे

मी हात वर केला असता आणि सांगितले असते, मला 2000 डॉलरचे सोने दिलेत तर मी सलमानला भेटायला तयार होईना))-))--

चला, तुम्ही नाटकाचा आस्वाद घेतला हे छान.

गामा पैलवान's picture

15 Oct 2017 - 7:55 pm | गामा पैलवान

उदय,

शिवाय ती मराठीत बोलणे टाळायची असा त्याचा अनुभव आहे. १-२ वाक्ये झाली की सरळ हिंदीत बोलायची किंवा इंग्रजीत.

बऱ्याचदा अशी माणसे मराठीपणाच्या न्यूनगंडाने पछाडलेली असतात. पूर्वेतिहासाची कसलीशी असुरक्षितता वाटंत असते.

अगदी घरकुळाचा पत्ता नसलेलं अनौरस अपत्यसुद्धा आत्मसन्मान असेल तर आपला इतिहास दडवून ठेवंत नसतं. मग अतिप्रसिद्ध व्यक्तींना कसली अडचण आहे?

आ.न.,
-गा.पै.