घरा कडून घराकडे सायकल प्रवास एक स्वप्न पूर्ती (भाग पहिला)

भ ट क्या खे ड वा ला's picture
भ ट क्या खे ड वा ला in भटकंती
26 Sep 2017 - 12:00 pm

घराकडून घराकडे सायकल प्रवास.... एक स्वप्न पूर्ती!
भाग १

सायकलिंगला सुरवात केल्यापासून आपल्या जन्मगावी एकदा तरी सायकलने जावे, ही सुप्त इच्छा मनात कायमच होती. गेल्या काही दिवसांतील सरावामुळे अंतर कापू शकेन या बद्दल पूर्ण आत्मविश्वास होता. प्रश्न होता फक्त रस्त्यावरील सुरक्षेचा! पनवेल- गोवा महामार्गाचे सध्याचे स्वरूप थोडे उलगडून सांगितले की याविषयी अधिक खुलासा होईल. राष्ट्रीय महामार्ग असूनदेखील दुभाजकाशिवाय असलेला हा रस्ता मी स्वतः पाहिल्यानुसार गेली पंचवीस वर्षे आहे तसाच आहे. वाकण ते जवळपास इंदापूर या भागात चौपदरीकरणाचे काम अर्धवट अवस्थेत झाले आहे. त्यामुळे तो भाग सायकलीस्ट साठी तसा सुरक्षित आहे, त्या चौपदरीकरण झालेल्या रस्त्याचा वापर करून सायकलीस्टला एका बाजूने सुरक्षितपणे जाता येते..... इंदापूर ते खेड ( मला खेडपर्यंतच जायचे होते म्हणून)! मात्र दुभाजकाशिवायचा रस्ता, पंचवीस वर्षात दहा पटीने वाढलेली रहदारी, त्याच्या दुप्पट वाहन चालवण्यात वाढलेला बेशिस्तपणा, विशेषतः दुचाकी व चारचाकी पांढर्या शुभ्र आणि “नंबरी” गाड्यांचा (सुज्ञांस सांगणे न लगे......), त्यामुळे इंदापूरपुढील प्रवास हा सुरक्षित वाटत नसल्याने हा बेत बरेच दिवस पुढे जात होता. यावर एक उपाय होता, होता होईल तो हा मार्ग टाळायचा व जेव्हा टाळणे अशक्य असेल तेव्हा ११०% सुरक्षा उपकरणे व राहुल द्रविडसारखे पूर्ण बचावात्मक धोरण वापरून सायकलिंग करणे!

बेत मनात तयार झाला. अश्विन शुद्ध प्रतिपदेला निघायचे, असे ठरवले! पण “सारे वादे इरादे बरसात आके धो जाते है,” असे झाले. घरातील मंडळींचा व मित्रपरिवाराचा प्रेमळ सल्ला जाऊ नये असा होता. त्याचा आदर करून २१ तारखेला निघायचा बेत रहित केला व २२ला निघायचे की नाही हे २१ तारखेच्या अंबरनाथ, माणगाव, खेड येथील पावसाच्या ताज्या, प्रत्यक्षदर्शी अहवालावर अवलंबून ठेवले. सुदैवाने तीनही ठिकाणी पाऊस कमी झाल्याचे समजले. त्याव्यतिरिक्त महाजालातील विश्वासार्ह संकेत स्थळांनी याला दुजोरा दिला. बाकी सर्व तयारी होतीच. पहिला पडाव माणगावच्या आसपास करायचे नक्की होते. माझ्या whats app समुहावरील मित्र-मैत्रिणींकडे याबाबत विचारणा केली होती. त्यातून माणगाव नजीक वडघर येथील “साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक” या संस्थेची माहिती समजली. अजूनही एका ठिकाणी “तुमचा मित्र आहे ना”, मग येऊ दे घरी, सांगा त्याला,असा विश्वास मिळाला. माझ्या मनातील “सायकल साखळी” या संकल्पनेनुसार वडघरचे राष्ट्रीय स्मारक जास्त योग्य वाटले. म्हणून २२ सप्टेंबर च्या रात्रीचा मुक्काम तेथे करायचा, असे नक्की केले.

सायकल मोठ्या प्रवासासाठी आधीच सुसज्ज केली होती. मनाचीही तयारी झाली होती. फक्त वेळ यायची बाकी होती. त्यामुळे, २१ ची रात्र तळमळत काढली. पहाटे चारलाच गजराच्या पंधरा मिनिटे आधी जागा झालो. सर्व आन्हिके उरकून ५ वाजून 40 मिनिटांनी घराबाहेर पडलो. सायकल मित्र व तरुण संगणक तज्ञ विनायक पाटील याने स्ट्रावा हे अॅप्लीकेशन पूर्ण क्षमतेने कसे वापरावे याचे प्रशिक्षण नुकतेच दिले होते. त्याचा वापर करायची संधी आज मिळणार होती. त्यानुसार स्ट्रावा सुरु करून हाती हँडल धरून पॅडल मारायला सुरवात केली. पूर्वी केलेल्या महड व पाली या सवारीमुळे व पाली ते वाकण फाटा हा रस्ताही माहित असल्याने वाकण पर्यंत जाण्यासाठी काहीच अडचण नव्हती. आज मोठा पल्ला गाठायचा असल्याने पहिला थांबा भिवपुरीला घेतला. भिवपुरी येथे डेअरीवाले पाटील हे सायकल प्रवास दरम्यान झालेल्या मित्रांपैकी एक! माझा बेत त्यांना सांगितल्यावर त्यांनी पळसदरी मार्गे महड या रस्त्यावरचे खड्डे भरलेले आहेत, त्यामुळे, त्या रस्त्याने गेलात तरी चालेल. (जुलै मधल्या पाली राइडच्या वेळी हा रस्ता वापरू नका, असा सल्ला त्यांनी दिला होता.) त्याशिवाय महड गावातून पालीकडे जाणारा एक जवळचा रस्ताही त्यांनी सुचवला. त्यांचा शब्द प्रमाण मानुन पळसदरी रस्त्याला लागलो. खरोखरच खड्डे भरलेले होते. एक सांगायचं राहिलं.... बदलापूर कर्जत रस्त्यावर नेहमीप्रमाणेच नेरळच्या आसपास मोराची केकावली मस्त ऐकू आली. दहाच्या आसपास महडला पोचलो. हॉटेल साई गणेश येथे नाश्त्याकरता थांबलो. या हॉटेलचा मालक निव्वळ धन्देवाला नसून एक रसिकही आहे. हॉटेलमध्ये मित्र, बाप, आई, बहिण, कुटुंब अशा अनेक मानवी नात्यांच्या व्याख्या अत्यंत सुंदर, समर्पक स्वरुपात इंग्रजीत लिहिल्या आहेत. नाश्ता आणि सोलकढी यांचा आस्वाद घेतल्यावर हॉटेल मालकाची थोडा सुसंवाद साधला. मला या व्याख्यांच्या थीमबद्दल थोडे कुतूहल होते. म्हणून विचारले,” ही कल्पना कुणाची?” “माझीच! आणि दरवर्षी बदलतो. निव्वळ व्यवसाय न करता काहीतरी चांगला संदेश, न बोलता आपल्या ग्राहकांना द्यावा, म्हणून दरवर्षी अशीच काही नवी थीम इथे मांडतो. याबरोबरच महड गावातून पाली रस्त्याला लागण्यासाठी जवळचा रस्ताही हॉटेल मालकांनी सुचवला. त्या रस्त्याला लागलो.

एकसारख्या चेहऱ्याची सात माणसे असतात, असे ऐकले होते. पण एकाच वेळी आपल्याला परिचित असलेल्या चेहऱ्यांची दोन माणसे एकदम समोर कशी दिसतात ....... याविषयी थोडं आश्चर्य वाटत होतं. तोच,”काका”, अशी हाक ऐकू आली. रवी आणि अनिल हे कार्यालयातील दोन सहकारी नेमके याच दिवशी महड वरद विनायकच्या दर्शनासाठी सहकुटुंब आले होते. मग त्यांच्या बरोबर सेल्फी झाला. पुढील प्रवासासाठी त्यांच्या शुभेच्छा घेऊन, वरद विनायकाला बाहेरूनच नमस्कार करून पुढे निघालो. महड गावातून जवळच्या रस्त्याने पालीसाठी मार्गस्थ झालो. बल्लाळेश्वराचे दर्शन न घेताच मनोमन नमस्कार करून पाली वाकण रस्त्याला लागलो. या रस्त्याला लागताच एक छान फील आला. डाव्या बाजूला नदीचा प्रवाह व रस्त्याच्या दोबाजूला ऐन, साग, किंजळ अशा अस्सल देशी वृक्षांची मांदियाळी! थोडेसे खड्डे वगळता हा रस्ता खूपच आनंददायी होता. हा हा म्हणता वाकण फाट्यापर्यंत आलो. तिथे हनुमान हॉटेल या छोट्याशा हॉटेलमध्ये खरंतर नवीन पाणी बाटली घेण्यासाठी थांबलो. पण, तळणीतले बटाटे वडे बघून चित्त चाळवले. पाणी बाटली सायकलच्या केज मध्ये लावली व एक वडापावही द्या, असे सांगितले. वडापाव समोर येईपर्यंत मालकीण बाईंशी संवाद साधला. कारण दुकानाच्या फलकावरती १९८९ व २००५ चे पूरग्रस्त असा उल्लेख होता. दोन्ही सालच्या पूराविषयी थोडी अधिक माहिती घेतली. तोपर्यंत गरमागरम वडापाव समोर आला.दोन अमूल मस्ती ताकाचे पाउच ही फस्त केले. माणगाव पर्यंतच्या अंतराची चौकशी केली. ३०/३५ किलोमीटर असे उत्तर आले. दुपारचा एक वाजला होता. निघालो.......उन रणरणत होते, रुंदीकरणामुळे बाजूची झाडी ही नाहीशी झालेली, १०० किमी च्या आसपास झालेली दौड,या सर्वामुळे वेग मंदावला होता. रस्ता चारपदरी होता. पण वळणमार्ग कुठे वापरावा, वा वापरू नये याबद्दलच्या सूचना सुस्पष्ट नसल्याने, रहदारी मन मानेल तशी दोबाजुच्या रस्त्यावरून सुरु होती. थोडा विरंगुळा म्हणून गाणी सुरु केली, पहिलीच गजल लागली भूपिंदर व मिताली ची अनेक वेळा ऐकलेली “ राहों पे नजर रखना, होठों पे दुवा रखना.... इतके वेळा ऐकून देखील लक्षात न आलेला अर्थ आज लक्षात आला, खरच पुढचा सर्व प्रवास असाच करायला हवाय, एक छोटीशी चूक किंवा वावगा शब्द आपल्याला संकटात टाकू शकतो. मग तीच गजल तीन चार वेळा रिपीट करून ऐकली. सुकेळीच्या खिंडी ची चढाई सुरु झाली, वेग अजूनच मंदावला. रस्ता ही अरुंद झाला, मग गाणी बंद करून नेटाने पुढे जात राहिलो.चढ संपला. उतार संपता संपता रस्ता पुन्हा रुंद झाला. आता वेग ही वाढला. इंदापूर च्या आधी तीन चार किमी एक दुचाकी चा अपघात पाहिला. या संपूर्ण प्रवासात पाहिलेला हा पहिला अपघात. एक जण रस्त्यात पूर्ण आडवा झालेला व दुसरा जखमी अवस्थेत पाणी पाणी ओरडत होता. पाण्याची बाटली दिली, गर्दी जमू लागताच सटकलो. इंदापूर येताच एका धाब्यावर बाटली घेतली व अपघाताचे वृत्त ही सांगितले. विना हेल्मेट विना पाणी प्रवास व त्यात बेदरकार वेग , मग असं घडायचंच कधीतरी.
इथून पुढचा रस्ता गेली अनेक वर्षे जेव्हढा रुंद आहे तेव्हढाच आहे, त्यात अनेक वेळा केलेले डांबरीकरण यामुळे रस्ता वर व साईड पट्टी खाली अशी अवस्था, जी दुचाकी व सायकल स्वारांसाठी अत्यंत धोकादायक! समोरून येणारे वाहन व मागून पुढे जाणारे वाहन जर एकाच वेळी आपल्याला समांतर आले तर खाली ( साईड पट्टीवर ) उतरण्याशिवाय पर्याय नाही. न उतरल्यास ठोकरीचा धोका व अचानक खाली उतरले तर पडायची भीती! या सर्व परिस्थितीचा विचार करून सावधपणे व कमी वेगाने मार्गक्रमण सुरु ठेवले. फक्त १६/१७ किलोमीटर अंतर जायचे होते. मग माझे आजचे मुक्कामाचे ठिकाण “साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक” येणार होते. उजव्या बाजूला केव्हा एकदा हा फलक दिसतोय असे झाले होते. संध्याकाळचे पाच वाजले आणि हा फलक दिसला. मागे बघून सुरक्षितपणे उजवीकडे वळलो व कच्च्या रस्त्याला लागलो. दोन अडीच किलोमीटर आत गेल्यावर स्मारकाचे प्रवेशद्वार लागले. आत गेलो, व्यवस्थापक सामोरे आले. माझी वाटच पाहत होते. त्यांनी सांगितलेल्या जागी सायकल लावली, सायकलवरील सर्व वस्तू काढून त्यांच्यामागोमाग त्यांनी दाखवलेल्या खोलीत गेलो.आज १५१किमी अंतर पार झाले असे strava सांगत होते. हुश्श.......

स्मारक ३६ एकर जागेवर वसले आहे. फारच छान परिसर. दोन विशाल वटवृक्ष, त्यांना बांधलेले तितकेच भव्य पार, कमालीची स्वच्छता व शांतता, हे सर्व पाहून प्रवासाचा सारा शीण निघून गेला. या ठिकाणी साने गुरुजींचे जीवन दर्शन व त्यांचे कार्य एका मोठ्या सभागृहात फलकांवर उधृत केले आहे. या ठिकाणी रुईया, पाटकर, सी.डी. देशमुख आदि नामवंत महाविद्यालयांची एन एस एस (राष्ट्रीय सेवा योजना) शिबिरे होतात. सध्या दोन युवक व एक युवती या परिसराचा कारभार बघतात. चहा पीत पीत या तिघांशी छान गप्पा झाल्या. या स्मारकातील सुविधा खालीप्रमाणे आहेत.
निवासव्यवस्था, भोजन व्यवस्था, बंदिस्त व खुले सभागृह, दृक्श्राव्य व्यवस्था, संदर्भ ग्रंथालय, कार्यशाळांसाठी विशेष व्यवस्था आणि तंबू निवास! त्याचबरोबर अत्याधुनिक टेलिस्कोप असलेले आकाशनिरीक्षण केंद्रही आहे.

गेल्या दोन दिवसातील वादळी पावसामुळे येथील वीज मात्र गायब झाली होती. त्यामुळे मला माझ्या पॉवर बँकचे रेशनिंग करणे गरजेचे होते. अर्थातच प्राधान्य दिले ते सायकलच्या व हेल्मेटच्या लाल दिव्यांना! रात्रीपर्यंत वीज येईल अशी आशा व्यवस्थापकांनी व्यक्त केली. छान अंघोळ करून पुन्हा तीन तरुणांबरोबर गप्पा सुरु झाल्या. तरुणी नंदुरबारची, एक तरुण लातूरचा व एक कोल्हापूरचा. तिघेही उच्च शिक्षित व पुढील शिक्षण व सेवा कार्य यासाठी इथे राहतात. रात्रीचे भोजन एका मोठ्या स्वयंपाकगृहात चौघांनी मस्त मांडी ठोकून घेतले. साडे-नऊला खोलीवर परतलो. झोप लागते तोच वीज आली, एक मोठ्ठा प्रश्न सुटला. आता उद्या फक्त पंच्याऐंशी ते नव्वद किलोमीटरचा प्रवास बाकी होता, त्यामुळे थोडे उशिरा निघून चालणार होते. तरीही पाचला जाग आली, सर्व आवरून सायकलला दिवे जोडून, सामान बांधून सातला तयार झालो. चहा घेतला, नाश्ता नको असे आधीच सांगितले होते. तिघांचाही निरोप घेऊन साडेसातला निघालो. उनही नव्हते पण सूर्य ढगांमधून डोकावायचा प्रयत्न करत होता. फारशी रहदारी नसल्याने व ताजातवाना असल्याने महाड पर्यंतचे सुमारे तीस किलोमीटरचे अंतर वेगात पार झाले. या प्रवासात दुसरा एक अपघात पहिला. एक चारचाकी डावी बाजू सोडून उजव्या बाजूच्या कठड्यावर जाऊन आपटली होती. वाहन चालक व एक पोलीस अपघाताच्या कारणांची मीमांसा करत होते. काही मदत हवी आहे का विचारले, नको म्हणताच पुढे सटकलो. रायगड फाट्याच्या आधी वाहनांची रांग दिसली. चौकशी केल्यावर राज्य परिवहनची एक बस पलटी झाल्याचे समजले. गर्दी एवढी होती, बस काही दिसलीच नाही. कसातरी मार्ग काढत पुढे निघालो. हि वाहतूक कोंडी सुटेल तेव्हा खूपच काळजी घ्यावी लागेल, अशी खुणगाठ मनाशी बांधली. या सर्व गडबडीत रायगडाला नमस्कार करायची नेहमीची प्रथा राहून गेली. मग तिथेच थांबून मनोमन हात जोडले आणि पुढे निघालो. एक सत्तर वर्षाचा तरुण सायकलस्वार दिसला. जुनी, साधी, हर्क्युलस ची सायकल, कॅरिअरला लावलेला पंप व हँडलला लावलेली एक साधी पिशवी... कुतूहल चाळवले गेले. थोडे पुढे जाऊन सुरक्षित जागा बघून काकांची वाट पाहत थांबलो. काका आले, उतरले, थोडा संवाद साधला. नाव .. तुकाराम गणपत पवार! वयवर्षे ७० .. गेली चाळीस वर्षे याच सायकलने रोजचा २५/३० किलोमीटरचा प्रवास! गुडघे वगैरे दुखतात का असे विचारले, नाही म्हणाले. पंक्चर काढता येतो, बाकीची कामे मेकॅनिककडून करून घेतो. नमस्कार केला व पुढे निघालो. पोलादपूर आले, इथे क्षुधाशांती गृह या ठिकाणी नाश्ता करायचे नक्की केले होते. पूर्वी महाबळेश्वर परिसरात ट्रेक भटकंती,सहल करताना अनेकवेळा इथे थांबलो आहे. छोटेसेच पण स्वच्छ व सर्व पदार्थ उत्कृष्ट दर्जाचे! मस्त गरमागरम थालीपीठ, भरपूर दही व लसणीची चटणी असा फक्कड नाश्ता झाला. इथे पेढेही छान मिळतात. एक पाकीट घेतले. मालकांशी थोड्या गप्पा मारून पुढच्या प्रवासाला लागलो. आता बारा किलोमीटरची चढण व दहा किलोमीटरचा तीव्र उतार व त्यानंतर वीस-एक किलोमीटर सरळ रस्ता एवढेच बाकी होते. पण वाढलेले ऊन आणि कमालीची आर्द्रता, संपावर गेलेला वारा, यामुळे पहिले बारा किलोमीटर फारच कठीण गेले. वाटेत दोन वेळा थांबलो. एकदा दमलो होतो म्हणून व एकदा रस्त्याकडेच्या कठड्यावर बसलेल्या मुलांनी इंग्रजीत विचारल्यामुळे....where are you going? हेल्मेट, दिवे इत्यादी गोष्टी वापरून सायकल चालवणारा म्हणजे परदेशी किंवा परराज्यातील असावा असा ठाम समज त्या मुलांचा होता, “ अरे, मी खेडचाच आहे”, असे सांगत उतरलो. पेढ्यांचे पाकीट त्यांच्या हातात दिले. उरलेले मला द्या असे सांगितले. ( घरी जाऊन... एक वल्ली भेटली होती, असे त्यांनी सांगितले असेल. ) थोड्या गप्पा मारून निघालो व कशेडीघाटाच्या टॉपवर येऊन थांबलो. एक कोकम सरबत घेतले. सरबत देणाऱ्या आजीना एक फोन लावून हवा होता. त्यांच्याच फोनवर फोन लवून दिला. आता तीव्र उताराचा रस्ता सुरु होणार होता. सुरक्षेचा उपाय म्हणून सीटची उंची थोडी कमी केली. चल धन्नो.... च्या स्टाईलवर चल अस्मी ... म्हणत सुसाट निघालो. कशेडी घाटाचे हिरवेगार सौंदर्य न्याहाळीत पण वेगावर नियंत्रण ठेवून घाट पार केला. ईथेही मोराची केकावली छान ऐकू आली. घाट संपल्यावर मात्र सीट पुन्हा पूर्ववत केली. आता वेध लागले होते घराचे....! पण घरी जेवण मिळणार नव्हते. हॉटेल काळकाई कृपा .. भरणा नाक्याच्या अलीकडे येथे मस्त सामिष भोजन केले. हॉटेल मालकाने आधी ओळखलेच नाही. ओळख सांगितल्यावर छान गप्पा झाल्या. खेडमधील फक्त एका मित्राला फोन केला व निघालो. खेड शहरात माझ्या जुन्या आस्थापनातील एक जुना मित्र भेटला. सायकलवर आलेला बघून त्याने कोपरापासूनच हात जोडले. घरी आलो. पडवीत अस्मी लावली. घराचा व अस्मीचा एक फोटो घेतला आणि पायरीवरच विसावलो. आजचा प्रवास ८९ किमी.

भाग १ पूर्ण! परतीच्या प्रवासाचे वर्णन दुसऱ्या भागात!
साने गुरुजी स्मारक

तुकाराम गणपत पवार
कशेडी top"

प्रतिक्रिया

दो-पहिया's picture

26 Sep 2017 - 1:47 pm | दो-पहिया

खूप छान वर्णन. कशेडी घाटात लहानपणी एसटीतून खुपदा गेलो आहे. एकदा सायकलवरून जायची इच्छा आहे.

देशपांडेमामा's picture

26 Sep 2017 - 1:51 pm | देशपांडेमामा

आणि त्याहुन मस्त वर्णन !!! तुमच्या सारखे उत्साही तरुणच ग्रुपचे प्रेरणास्त्रोत्र आहेत _/\_

देश

भारीच प्रवास चालला आहे. दुसरा भाग वाचायची उत्सुकता वाढली.

नितीन पाठक's picture

26 Sep 2017 - 2:34 pm | नितीन पाठक

एकदम भारी राईड मारली आहे.
जबरदस्त
दंडवत ....
अजून फोटो टाका. अभिनंदन

कपिलमुनी's picture

26 Sep 2017 - 4:53 pm | कपिलमुनी

Cycle

इरसाल कार्टं's picture

26 Sep 2017 - 10:22 pm | इरसाल कार्टं

अनिवर्णनाने तर अख्खा प्रवास डोळ्यासमोर उभा केला.

स्थितप्रज्ञ's picture

26 Sep 2017 - 10:37 pm | स्थितप्रज्ञ

लाखात एक सायकलिस्ट अशी स्वच्छंदी राईड करत असेल. असंच चालू राहू द्या आणि असे भरपूर लेख येऊ द्या!

मोदक's picture

26 Sep 2017 - 10:46 pm | मोदक

झक्कास राईड..!!!

एस's picture

26 Sep 2017 - 11:30 pm | एस

क्या बात है! झक्कास!

एस's picture

26 Sep 2017 - 11:30 pm | एस

क्या बात है! झक्कास!

खाबुडकांदा's picture

27 Sep 2017 - 8:08 am | खाबुडकांदा

छान लेख
हा तर माझाच परिसर.. ओळखीचे संदर्भ व नेहमीचा रस्ता ..त्यामुळे अधिक मजा आली वाचताना. शुभेचछा !!

सुबोध खरे's picture

27 Sep 2017 - 10:22 am | सुबोध खरे

दंडवत घ्यावा
४०० सी सी ची मोटार सायकल असून जाणं जमत नाहीये आणि इथे तुम्ही सायकल वर पार खेड पर्यंत.
--/\--

शलभ's picture

28 Sep 2017 - 9:50 pm | शलभ

मस्तच राईड..