सनी देओल, तू पुन्हा वापस ये!

पिंपातला उंदीर's picture
पिंपातला उंदीर in जनातलं, मनातलं
23 Sep 2017 - 8:07 pm

मी पत्रकारितेचं शिक्षण घेत होतो तो काळ. उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही आमच्या गावातच कुठल्याही वर्तमानपत्रात उमेदवारी करणं अपेक्षित होतं. तशी मी करत होतो. मी ज्या वर्तमानपत्रात काम करत होतो, त्यात एकदा बॉलिवुडमधल्या घराणेशाहीवर लेख आला होता. त्या लेखात धर्मेंद्रच्या दोन्ही मुलांनी म्हणजे सनी देओल आणि बॉबी देओल यांनी धर्मेंद्रच्या परंपरेचा सत्यानाश केला या अर्थाची काही वाक्यं होती. तो लेख प्रकाशित झाल्यावर पत्रांचे गठ्ठेच्या गठ्ठे यवतमाळ, बीड, चंद्रपूर, उस्मानाबाद आणि तत्सम जिल्ह्यांमधून वर्तमानपत्राच्या मुख्य कचेरीत आले. सनी देओलबद्दल असं लिहिण्याची लेखकाची हिंमत झाली तरी कशी, असा बहुतेक पत्रांचा सूर होता. काही लोकांनी तर वर्तमानपत्रानं हा लेख मागे घ्यावा अशी आग्रही मागणी केली होती. महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातल्या किंवा छोट्या शहरातल्या लोकांचं या लाजाळू पंजाबी अभिनेत्यासोबत काय कनेक्शन असावं असा प्रश्न तेव्हा मला पडला होता. नंतर मला स्वतःला सनी देओलचे सिनेमे रिपीट मोडवर बघण्याचा चस्का लागला. तेव्हा मी या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा करण्याचा प्रयत्न केला.

सिंगल स्क्रीनवर सिनेमे बघणारा 'बी' आणि 'सी' सेंटरवरच्या प्रेक्षकांमध्ये सनी देओलचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. माझं लहानपण गेलं परभणीमध्ये. चित्रपटाच्या वितरणाच्या दृष्टीने चित्रपट वितरकांनी या खंडप्राय देशाचे अकरा भाग केले आहेत. बॉंम्बे सर्किट, दिल्ली सर्किट, इस्टर्न सर्किट, इस्टर्न पंजाब सर्किट, निजाम सर्किट, सी. पी. बेरार सर्किट, सेंट्रल इंडिया सर्किट, राजस्थान सर्किट, मायसोर सर्किट, तमिळनाडू सर्किट आणि आंध्र सर्किट असे ते अकरा भाग. पूर्वीच्या निजाम राजवटीचा भाग निज़ाम सर्किटमध्ये येतो. आमचं परभणी त्यातच येतं. हे निजाम सर्किट म्हणजे सलमान खानचा बालेकिल्ला. पण सलमान खालोखाल तिथं चालतो, तो सनी देओलच. या निजाम सर्किटमधल्या प्रेक्षकांमध्ये सनी देओलचं जे वेड आहे, ते शब्दांत बसण्यासारखं नाही.

काही भाग वगळता अजूनही या सर्किटमध्ये मल्टिप्लेक्सचं प्रस्थ एवढं नाहीये. सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांच्या तिकीट खिडक्यांवर अजूनही सनी देओलचे ‘घायल’, ‘घातक’, ‘बॉर्डर’सारखे जुने चित्रपट लागले की, हाऊसफुल’चा बोर्ड लागतो. ‘चित्रपट बनवणं हे एक टीमवर्क आहे’, ‘चित्रपट हे समाजाभिमुख हवेत’, वगैरे नियम निजाम सर्किटच्या हद्दीबाहेरच मान टाकून पडले आहेत. ‘सनी देओल की फिल्लम है. देखनी है. बस!’ हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या पंजाबमध्येही सनी देओल आणि एकूणच देओल घराण्याचे चित्रपट नेहमीच हाऊसफुल होतात. नामदेव महाराजांनंतर पंजाब आणि महाराष्ट्र या सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय भिन्न प्रांतांना जोडणारा दुसरा समान दुवा म्हणजे सनी देओल! हे विधान काही लोकांना अतिशयोक्तीपूर्ण वाटू शकतं, पण अनेक लोकांसाठी ते खरं आहे.

१९८३ साली धर्मेंद्रने आपल्या मोठ्या मुलाला, सनी देओलला 'बेताब' या प्रेमकथेमधून लाँच केलं. स्वप्नाळू डोळ्यांचा हा पोरगा आयुष्यभर टिपिकल बॉलीवुडी प्रेमकथा करत राहील असं अनेकांना वाटलं होतं, पण तसं व्हायचं नव्हतं. दोन वर्षांनंतरच आलेल्या 'अर्जुन' या चित्रपटानं सनी देओल या अभिनेत्याचा मेकओव्हर केला. 'अर्जुन'मध्ये सनीने अर्जुन मालवणकर या राजकारण्यांच्या हातच खेळणं बनलेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणाची भूमिका साकारली होती. रोमँटिक भूमिकेच्या पलीकडे सनीचा विचार करू न शकणाऱ्यांना सनी हा किती जबरदस्त अॅक्शन हिरो आहे, याची जाणीव झाली. 'अर्जुन' हा चित्रपट सनीच्या कारकिर्दीमधलाच नाही तर एकूणच बॉलिवुडच्या इतिहासातलाच एक महत्त्वाचा चित्रपट आहे. मेनस्ट्रीम बॉलीवुडने सर्वसामान्य मध्यमवर्गीय बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांचा वेध घेण्याची ही पहिलीच वेळ होती.
या चित्रपटातली गाणी, मित्रांमधली केमिस्ट्री, शेळीचं कातडं पांघरून फिरणारा राजकारणी खलनायक, अतिशय वास्तवपणे चित्रित केलेलं मध्यमवर्गीय परिवाराचं चित्रण, बाप आणि मुलाच्या नात्यात असलेलं अवघडलेपण, अशा अनेक गोष्टी 'अर्जुन' ला एक संस्मरणीय चित्रपट बनवून जातात. हा चित्रपट इतका चांगला बनण्यामागे दिग्दर्शक रजत रवेल इतकाच वाटा अर्जुन मालवणकर अतिशय कन्व्हिक्शनने निभावणाऱ्या सनीचाही आहे.

एकदा सनी देओल चांगली अॅक्शन करू शकतो, हे कळल्यावर त्याच्यावर त्याच प्रकारच्या भूमिकांचा भडीमार होऊ लागला. 'जोशिले', 'त्रिदेव', 'पाप की दुनिया', ‘डकैत' असे अनेक अॅक्शन चित्रपट त्याने केले. काही बरे होते, काही वाईट. पण सनी टाइपकास्ट झाला होता हे खरं. सनी देओल नावाच्या अभिनेत्यावर पडलेली टाइपकास्टपणाची धूळ साफ केली ती राजकुमार संतोषीच्या 'घायल' ने. ‘घायल’ अॅक्शनपटच होता, पण त्यातला सनी देओलने साकारलेल्या अजय मेहराचा भ्रष्ट व्यवस्थेविरुद्धचा संघर्ष प्रेक्षकांना भावला.

राजकुमार संतोषी आणि सनी देओल यांची सृजनशील भागिदारी ही प्रेक्षकांसाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा ही भागिदारी सुरू झाली, तेव्हाची परिस्थिती युनिक म्हणता येईल अशी होती. व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणारा आणि 'अँग्री यंग मॅन' अशी इमेज असणारा बच्चन उताराला लागला होता. एक तर 'बोफोर्स' केसमध्ये नाव आल्यामुळे लोक या एकेकाळच्या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणाऱ्या, पण आता स्वतःच व्यवस्था बनून राहिलेल्या महानायकाकडे संशयानं बघू लागला होता. बच्चनने त्या काळात अतिशय मोजकेच सिनेमे करण्याचं ठरवलं होतं. भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध सिनेमाच्या पडद्यावर आवाज उठवणाऱ्या नायकाची एक मोठी पोकळी तयार झाली होती. ही पोकळी राजकुमार संतोषीनं हेरली.

'घायल', 'घातक' आणि 'दामिनी' या तिन्ही चित्रपटांमध्ये सनीचा नायक हा अशाच भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवतो. 'घायल'मधला सनीचा अजय मेहरा हा भ्रष्ट उद्योगपती आणि पोलिसांच्या अभद्र युतीविरुद्ध संघर्ष करतो. 'घायल'मधला घाटावरचा भोळाभाळा काशिनाथ मुंबईतल्या लँडमाफियाविरुद्ध लढा पुकारतो. 'दामिनी'मधला वैयक्तिक आयुष्यातल्या घटनांनी वैफल्यग्रस्त झालेला दारुडा वकील गोविंद एका बलात्कारित स्त्रीला न्याय मिळवून देण्यासाठी झगडतो. यातला त्याचा 'तारीख पे तारीख' हा संवाद न्यायव्यवस्थेमधल्या न्याय मिळण्याच्या विलंबावर अतिशय मार्मिकपणे बोट ठेवतो.

या चित्रपटांमध्ये मांडलेले विषय हे प्रेक्षकांच्या अतिशय जिव्हाळ्याचे होते. सनीने आपल्या खड्या आवाजात अतिशय आक्रमकपणे या सर्वसामान्य जनतेला न्याय न देणाऱ्या व्यवस्थेविरुद्धचे संवाद पडद्यावर म्हटले. आपल्या प्रश्नाला वाचा फोडणाऱ्या या नायकाबद्दल प्रेक्षकांना आपसूकच जिव्हाळा वाटू लागला. सनी देओल नावाचा लीजंड तयार होण्याची सुरुवात या राजकुमार संतोषीच्या चित्रपटांपासूनच झाली. देशाच्या व्यवस्थेनं कायमच दुर्लक्ष केलेल्या निमशहरी आणि ग्रामीण भागातल्या जनतेची नाळ सनी देओलशी जुळली ती इथं. पण दुर्दैवानं वैयक्तिक मतभेदांमुळे संतोषी आणि सनीची भागिदारी संपुष्टात आली. हे व्यक्तिशः दोघांचं नुकसान तर होतंच, पण तितकंच प्रेक्षकांचंही होतं. हे दोघे आपले मतभेद मिटवून पुन्हा एकत्र येणार अशा बातम्या मध्ये मध्ये येतात, पण ते मृगजळच सिद्ध होतं.

सनी देओलनं राहुल रवेल, जे. पी. दत्ता, अनिल शर्मा अशा दिग्दर्शकांसोबत अनेक हिट सिनेमे दिले, पण राजकुमार संतोषींसोबत त्यानं आपलं सर्वोत्तम दिलं आहे हे तो स्वतःही कबूल करेल. एन . चंद्राच्या 'नरसिम्हा'मध्ये सनीने जी भूमिका केली, त्यातही आपल्याच भ्रष्ट नेत्याविरुद्ध बंड पुकारणारा अनुयायी सनीने मस्त रंगवला होता.

मग अन्यायाविरुद्ध लढा देणाऱ्या नायकाच्या भूमिकेमधून सनीनं आपला मोहरा राष्ट्रवादाकडे वळवला. सुरुवात झाली ती जे. पी. दत्ताच्या ‘बॉर्डर’पासून. या चित्रपटात अवघ्या एकशेवीस सैनिकांना सोबत घेऊन सनीचा मेजर कुलदीप सिंह संख्येनं आणि साधनसामग्रीनं कित्येक पटीनं सामर्थ्यवान पाकिस्तानी सैन्याला खडे चारतो. चित्रपटाचं कथानक सत्य घटनेपासून प्रेरित होतं. चित्रपटात अनेक मोठे कलाकार होते, पण खऱ्या अर्थानं सनी देओलच चित्रपटाचा नायक होता. नवऱ्याची आघाडीवरून दुसरीकडे बदली व्हावी म्हणून प्रयत्न करणाऱ्या बायकोला सुनावणारा नवरा, फोनवर धमक्या देणाऱ्या पाकिस्तानी अधिकाऱ्याला प्रत्युत्तर देणारा फौजी, रजा मिळाली म्हणून जल्लोष करणाऱ्या सहकाऱ्याला खडे बोल सुनावून इतर सहकाऱ्यांचं मनोधैर्य उंचावणारा नेता आणि शेवटी शेकडो पाकिस्तानी सैनिकांची एकट्यानंच कबर खणणारा सैनिक, असे या भूमिकेचे पैलू रंगवण्यासाठी सनी देओलपेक्षा आदर्श नायक दुसरा कोणी असूच शकत नव्हता. 'गदर' मधल्या त्याच्या पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानलाच नमवणाऱ्या आणि 'हिंदुस्तान जिंदाबाद'ची हाळी देणारा सरदार तारासिंग ही सनीची बहुतेक सगळ्यात लोकप्रिय भूमिका असावी. जमिनीतला हँडपंप उपसून पाकिस्तानी पब्लिकची धुनाई करणारा प्रसंग 'suspension of disbelief' चं एक अतिशय मार्मिक उदाहरण. ‘गदर’नंतर त्याने 'इंडियन', 'माँ तुझे सलाम', 'जोर', 'द हिरो - स्टोरी ऑफ अ स्पाय' आणि असे अनेक त्याची राष्ट्रवादी किंवा देशभक्त अशी इमेज बळकट करणारे चित्रपट केले. मध्यंतरी पाकिस्तानात झालेल्या एका सर्व्हेमध्ये सनी देओल हा तिथला सगळ्यात अ-लोकप्रिय भारतीय नट आहे असं सिद्ध झालं होतं. त्याला सनीची 'गदर' आणि 'बॉर्डर'मधली इमेज कारणीभूत असावी.
मजेशीर योगायोग असा की, नंतर एका चित्रपटात सनीनं पाकिस्तानी सैनिकाची भूमिका बजावली होती, पण तो चित्रपट कधी आला आणि कधी गेला हे कुणालाच कळलं नाही. सध्या भारतीय राष्ट्रवादाच्या लाटेवर सवार होण्याची अहमहिका अनेक नटांमध्ये सुरू आहे. खरं तर त्यासाठी सनी देओलपेक्षा लायक उमेदवार दुसरा कुठला नाही. पण लाइमलाईट आणि कुठल्याही वादविवादापासून दूर राहण्याच्या त्याचा स्वभाव असल्यामुळे तो तसं करणार नाही. पण साधारणपणे २००३ सालापासून सनीच्या कारकिर्दीला उतरती कळा लागल्याचं दिसून येतं. त्याला अनेक कारणं आहेत.

एक तर चित्रपटसृष्टीत अनेक प्रयोग होत असताना सनी देओलनं त्यांच्यापासून दूर राहण्यातच धन्यता मानली. जुन्या वळणाचेच मारधाडपट करण्याच्या प्रथेलाच तो चिकटून राहिला. दुसरं म्हणजे त्याचा माध्यमांपासून दूर राहण्याचा स्वभाव. जोरदार मार्केटिंग हा चित्रपट यशस्वी करण्याचा मंत्र मानला जाऊ लागला आहे. चित्रपट बनवण्याइतकंच त्याचं प्रमोशन करणंही तितकंच महत्त्वाचं मानलं जाऊ लागलं आहे. चित्रपटाच्या बजेटमध्येच प्रमोशनसाठी मोठा हिस्सा राखीव ठेवण्यात येऊ लागला आहे. हल्लीचे अभिनेते चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मॉलपासून ते रेल्वे स्टेशनपर्यंत सगळीकडे जातात. संकोची स्वभावाच्या सनीला हे जमलं नाही. त्याने प्रयत्न केले नाहीत असं नाही, पण त्याला जमलंच नाही ते. मार्केटिंगच्या या जमान्यात सनी झपाट्यानं आऊटडेटेड होत गेला. गेल्या काही वर्षांत 'यमला, पगला दिवाना' आणि काही प्रमाणात 'अपने' वगळता सनीला बॉक्स ऑफिसच्या यशाचं तोंड बघायला मिळालं नाही. प्रचंड पाठदुखीमुळे त्याच्या उमेदीच्या काळातली तब्बल पाच वर्षं वाया गेली. हाही एक महत्त्वाचा घटक ठरला.

सनी देओलचं अभिनय सोडूनही भारतीय चित्रपटसृष्टीला मोठं योगदान आहे. राजकुमार संतोषी, इम्तियाज अली आणि अभय देओल हे लोक चित्रपटसृष्टीत आज पाय रोवून उभे आहेत ते सनी देओलने संधी दिल्यामुळे. अर्थातच वर उल्लेख केलेले लोक एवढे गुणवान आहेत की, त्यांना संधी मिळाली असतीच. पण या नवोदितांमधली गुणवत्ता हेरून त्यांना पहिली संधी देण्याचं श्रेय सनीलाच द्यावं लागतं. 'घायल'ला निर्माता मिळत नसताना स्वतः सनी निर्माता म्हणून बोर्डवर आला. इम्तियाज 'सोचा न था'ची स्क्रिप्ट घेऊन अनेक निर्मात्यांकडून नकार मिळवत होता. त्याला संधी सनीनेच दिली. अभय देओल या आपल्या बंडखोर चुलत भावामागे सनीच ठामपणे उभा राहिला. अभयची चित्रपटांची निवड ही अतिशय वेगळी होती, पण चित्रपटनिर्मितीबद्दल अतिशय पारंपरिक दृष्टीकोन असणाऱ्या सनीनं आपल्या भावाला खंबीर पाठिंबा दिला. आज हे तिघंही इंडस्ट्री गाजवत आहेत, पण त्यांच्या यशाचं श्रेय घ्यायला सनी कधीच पुढे आला नाही हे विशेष. आपण न केलेल्या कामाचं श्रेय घेण्यासाठीही धडपडणाऱ्या इंडस्ट्रीत सनीसारखा माणूस विरळाच.
सनीचं वैयक्तिक आयुष्यही बाकी देओल मंडळींपेक्षा वेगळं आहे. देओल असून सनी दारूच्या थेंबाला शिवत नाही. धूम्रपान करत नाही. रात्री दहाला झोपी जातो. सकाळी लवकर उठून जिम गाठतो. आपल्या खाजगी आयुष्याबद्दल तो अतिशय प्रोटेक्टिव्ह आहे. जाणत्या वयात वडिलांनी दुसरी बायको केल्याचं त्याला पाहावं लागलं. त्या काळात परिवारात निर्माण झालेल्या वादळाचे चरे त्याच्या मनावर अजून आहेत. स्वतःच्या आईची मानसिक फरफट त्यानं जवळून पाहिली आहे. त्यामुळेच त्याचा स्वभाव मितभाषी आणि संकोची बनला.

अमरीश पुरी आणि सनी देओल यांच्यात असलेल्या घनिष्ट मैत्री अनेक लोकांना माहीत नाही. मारधाडीच्या प्रसंगात अमरीश पुरीसोबत शूटिंग करताना सनीला फार ऑकवर्ड व्हायचं. कारण बहुतेक प्रसंगात त्याला अमरीश पुरीच्या कॉलरला धरून (‘घायल’, ‘गदर’ आणि कितीतरी) उचलावं लागायचं. एकदा अशाच एका प्रसंगात अमरीश पुरी सनी देओलच्या चुकीमुळे जखमी झाला आणि दोन दिवस हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होता, तर दोन दिवस सनी त्याच्या उशाशी बसून होता. धर्मेंद्रच्या दुसऱ्या लग्नामुळे मध्ये बरीच वर्षं धमेंद्र आपल्या परिवारापासून दुरावला होता. त्यामुळे सनी बहुतेक अमरीश पुरीमध्ये कुठेतरी ‘फादर फिगर’ शोधत असावा. पण सनीसारखे लाजाळू लोक माध्यमांसमोर येत नाहीत, त्यामुळे त्यांची ही बाजू लोकांसमोर येतच नाही.

जेव्हा सलमानचे चित्रपट हिट होत नव्हते, तेव्हा सलमान मदतीसाठी सनीकडे गेला. सनीने लगेच दिग्दर्शक राज कंवरला फोन करून सलमानला ते करत असलेल्या चित्रपटात भूमिका देण्याची विनंती केली. तो चित्रपट होता- 'जीत'. तो हिट झाला. सलमानची कारकीर्द तरली. सलमान याच्यासाठी अजूनही सनीचे कौतुकाचे इमले बांधताना थकत नाही. पडद्यावर रांगडा नायक अशी इमेज असणाऱ्या सनीची हीसुद्धा एक हळुवार बाजू आहे.

मध्यंतरी सलमानच्या 'दस का दम' या शोमध्ये सनी देओल पाहुणा आला होता. सलमानने एक वजन काटा मागवला आणि अक्षरशः सनीच्या हाताचं वजन 'ढाई किलो'पेक्षा किंचित कमी भरलं. हा 'ढाई किलो' चा संदर्भ सनीच्या चाहत्यांना समजावून सांगण्याची गरज नाही, पण या दणकट हाताचा मालक आता साठीचा झाला आहे, पण उजवा मेंदू हे मान्य करत नाही. कारण सनीचं म्हातारं होणं म्हणजे आमच्या टीनएजरपणाच्या आठवणींचं म्हातारं होणं. गुगलवर सनी असा सर्च केला की, सनी देओल अगोदर सनी लिओनी दिसते. त्यांच्या सारख्या नावावरून बरेच विनोद फिरवले जातात. हल्ली व्यवस्थेविरुद्ध असणाऱ्या असंतोषाला वाचा फोडणारे पडद्यावरचे नायक दिसतच नाहीत. सरकारं बदलली, नेते बदलले, व्यवस्थेचा मनू बदलला, पण लोकांमधला असंतोष तसाच आहे. नोटबंदी, वेगवेगळे असंख्य टॅक्स, तुम्ही काय खाता-काय बघता यावर बारीक लक्ष ठेवून असलेले लोक, दहशतवादी हल्ले, या सगळ्यांना लोक कावले आहेत.

सनी देओल, तू परत ये. एखाद्या नेत्याची गचांडी पकडून त्याला सवाल कर. पुन्हा एखादा हँडपंप उपसून निरपराध यात्रेकरूंना मारणाऱ्या अतिरेक्यांना बेदम मार. इस्लामाबादमध्ये जाऊन 'हिंदुस्तान जिंदाबाद'ची हाळी दे. वेगवेगळ्या नेत्यांनी भ्रमनिरास केल्यामुळे असंही पडद्यावरचं वास्तव हेच खरं वास्तव, अशी मनाची खोटी खोटी समजूत घालणं हेच बरं असतं, हे एव्हाना आम्हाला कळलं आहे. मग आम्हाला फसवण्यासाठी एखाद्या नेत्याची गरज काय? तूच ते काम खूप चांगलं करशील. हँडपंप उपसून तू आतंकवाद्यांना मारशील, तेव्हा आम्हाला जो मानसिक-भावनिक ऑर्गझम येईल तो सनी लिओनीला इमॅजिन करूनच आम्हाला येणाऱ्या ऑर्गझमपेक्षा भन्नाट असेल. तो अनुभवून आम्ही थिएटरमधल्या अंधारात जोरजोरात टाळ्या पिटू. त्या अंधारातून परत प्रकाशात आल्यावर तोंड लपवीत फिरू. सनी देओल, तू पुन्हा वापस ये.

लेख अक्षरनामा मध्ये पूर्वप्रकाशित .
http://www.aksharnama.com/client/article_detail/1022

चित्रपटलेख

प्रतिक्रिया

पगला गजोधर's picture

23 Sep 2017 - 8:29 pm | पगला गजोधर

छान लेख,

डिंपलबरोबर मैत्री विषयक उल्लेख टाळला, त्यामुळे काही बाजू अज्ञात राहिल्या, असो पण लेख छान, मजा आली वाचताना.

नोटबंदी, वेगवेगळे असंख्य टॅक्स, तुम्ही काय खाता-काय बघता यावर बारीक लक्ष ठेवून असलेले लोक, दहशतवादी हल्ले, या सगळ्यांना लोक कावले आहेत.

हे लिहिल्या मुळे कदाचित तुम्हाला काही अप्रिय प्रतिक्रिया येतील, टोळधाड येऊ शकते....

पगला गजोधर's picture

27 Sep 2017 - 4:33 pm | पगला गजोधर

11

मराठी कथालेखक's picture

23 Sep 2017 - 9:03 pm | मराठी कथालेखक

चांगला लेख..
सनी दारु अजिबातच पीत नाही हे वाचून आश्चर्य वाटलं...एक तर पंजाबी त्यात सिनेमासारख्या क्षेत्रात आणि दारुपासून दूर .. कमाल आहे.

सर टोबी's picture

23 Sep 2017 - 9:22 pm | सर टोबी

खरंच हा लेख आवडला. सहसा इतकं समरसून कोणी कोणाबद्दल लिहीत नाही म्हणून हा लेख जास्तच भावला.

सनीबद्दल माझ्याही अशाच भावना आहेत. तो ज्या काळात काम करायचा त्या काळात भारंभार काम स्वीकारणे असा जणू एक रिवाजच होता. मोजकेच काम करणाऱ्या लोकांमध्ध्ये सनीचे नाव सर्वात प्रथम घ्यावे लागेल.

सनीचे सिनेमा या माध्यमावर खरेच प्रेम आहे असे वाटते. बेताबची निर्मिती मूल्य वरच्या दर्जाची आहेत असे त्या पिढीच्या प्रेक्षकांना नक्कीच जाणवले असेल. कथेतील वेगळेपण, बांधीव पटकथा, आणि तांत्रिक सुबकता हि त्याच्या स्वतःच्या निर्मितीची वैशिष्ट्य असत.

एखाद्या नटाने भूमिकेचा कसा विचार करावा यासाठी सनीचा दामिनी हा जणू वस्तुपाठच ठरावा. चित्रपटाची शेवटची काही रीळ शिल्लक असताना त्याचा प्रवेश होतो आणि अगदी घड्याळ लावून पाच ते सात मिनिटांचा त्याचा एकूण वावर. कोणत्याही प्रस्थापित नटाने हि भूमिका स्वीकारली नसती. भारत सरकारने देखील या भूमिकेसाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार देऊन सरकारीपातळीवर कलेबद्दलच्या जाणीव समृद्ध होत असल्याचा सुखद अनुभव दिला.

एस's picture

24 Sep 2017 - 12:18 am | एस

लेख आवडला.

पिलीयन रायडर's picture

24 Sep 2017 - 12:41 am | पिलीयन रायडर

सनी देओल प्रेम ही मला कधीही न कळलेली पण नवऱ्यामुळे अगदी पुरेपूर परिचित भावना आहे. का एवढा आवडतो माहिती नाही पण तो लोकांना मनातून आवडतो हे मी सुद्धा आश्चर्यचकित होऊन पाहिलंय.. निजाम सर्किटचे सर्किट लोक्स घरात असल्याने बहुदा!

लेख आवडला!

मराठी कथालेखक's picture

24 Sep 2017 - 11:07 am | मराठी कथालेखक

कुणाला कोण आवडावं याचं काही गणित नसतंच बहूधा.
मला राज बब्बर आवडतो (असं म्हणणारे या पृथ्वीतलावर अगदी मोजकेच जीव असतील, त्यातला मी एक) , शशी कपूर पण आवडतो.

शशी कपूर बर्याचजणांना आवडत असावा. मलापण आवडतो.

राज बब्बर देखणा आहे. पण मला आवडत नाही. नावडतो असेदेखील नाही.

===
बाकी लेख आवडला. सनीचे चित्रपट फारसे पाहिले नाहीत.

उगा काहितरीच's picture

24 Sep 2017 - 7:59 am | उगा काहितरीच

लहानपणी सनी खरंच मनापासून आवडत होता. अजाणत्या वयात त्याने पडद्यावर केलेल्या अवास्तव , अतार्कीक गोष्टी पण "भारी" वाटत होत्या . वय वाढलं ! विविध प्रकारचे चित्रपट पाहण्यात येत होते ,त्यामुळे हळूहळू सनी देओल वगैरे मंडळी आवडेनाशी झाली. अमिताब बच्चन, अनिल कपूर यासारख्या काही अभिनेत्यांनी काळाचा रोख पाहून वेगळ्या भूमिका स्विकारल्या . पण सनी सारख्या बर्याच लोकांना ते जमलं नाही . असो !

नाखु's picture

24 Sep 2017 - 12:38 pm | नाखु

पठडीतील भुमिकांमध्ये अडकला हि वस्तुस्थिती आहे
राजकुमार संतोषी, राहुल रवैल यांनीच​ अभिनयासाठी सन्नीवर मेहनत घेतली, बाकीच्या बाबत सन्नी चलनी नाणे होता

हे उमजेपर्यंत बराच उशीर झाला सनीला उदा ताजा पोष्टर बॉ ईज सिनेमा

तेजस आठवले's picture

24 Sep 2017 - 2:32 pm | तेजस आठवले

मला वैयक्तिकरित्या त्याचे चित्रपट आवडतात. प्रसंगी शांत, संयमी आणि गरज असेल तेव्हा चाळीस चाळीस जणांना धोपटून काढणारा अश्या दोन्ही भूमिकेत तो शोभून दिसतो.

चिकित्सक's picture

24 Sep 2017 - 3:03 pm | चिकित्सक

सनी देओल कुणी बी , सी ग्रेड एक्टर नाहीए घायल आणि दिल ह्या मूवी 1990 मध्ये एकाच दिवशी रिलीज झालेत त्यात घायल चे कलेक्शन जास्त होते तसेच ह्या घटनेला 11 वर्ष झाल्यानन्तर परत सनी देओल आणि आमिर खान चे मूवीज परत एकाच दिवशी रिलीज़ झाले दोन्ही मूवीज ने 100 करोड़ क्लब मध्ये स्थान मिळवले गदर ची कमाई लगान हुन जास्तीच होती ।

गामा पैलवान's picture

24 Sep 2017 - 6:25 pm | गामा पैलवान

पिंपातला उंदीर,

मला वाटतं की सनी देवलने स्वत:तल्या अभिनेत्यावर थोडा अन्यायच केला आहे. किंवा उद्योगाकडून अन्याय घडला आहे. त्याचा डरमधला अभिनय अजिबात पटला नाही. त्याला अभिनयाची जाण नाही असं काहीसं मत झालं. कदाचित मर्यादित भूमिका केल्याने त्यातल्या अभिनेत्यास आव्हान मिळालं नसावं.

डिंपलच्या अभिनयाची थोडीफार अशीच कथा आहे. सुरुवातच मुळी मादक सौंदर्याचा अणुबाँब म्हणून झाल्याने तिच्या अभिनयाकडे समीक्षकांचं म्हणावं तितकं लक्ष गेलेलं दिसंत नाही. सनीने समांतर सिनेमात काही हातपाय मारलेत काय? डिंपलने रुदाली वगैरे चित्रपट केलेत तसं काही?

आ.न.,
-गा.पै.

सनी देओलचे चित्रपटांमध्ये गदर व hero the love story of spy हे फारच उत्तम होते म्हणजे फारच आवडले होते यामध्ये त्यावेळी या चित्रपटानी माझ्या मनाचा ताबा घेतला होता त्यामध्ये त्यांना रंगवलेली गुप्तहेराची भूमिका फारच उत्तम रित्या रंगवली होती बाकी आता सनी फक्त कॉमेडी चित्रपटांमध्ये भेटतो .…

संग्राम's picture

25 Sep 2017 - 2:57 pm | संग्राम

माझ्या लहान चुलतभावाने हिरो पाहिला होता तो मला सांगत होता ... दहिरो दहिरो खूप मस्त आहे आधी तर कळालचं नाही कोणत्या सिनेमाबद्दल बोलत आहे नंतर कळाले की तो द हिरो - लव स्टोरी ऑफ स्पाय बद्दल बोलतोय ते :-)

सनीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल किंवा रील लाईफविषयी फारसे काही माहीत नाही पण त्याचे दामिनी व गदरमधील काम आवडले होते.

सनी देओल विषयी प्रचंड आदर आहे. त्याने स्वत:वर अन्याय केला काय किंवा इंडस्ट्रीने त्याच्यावर केला काय याविषयी मी जास्त विचार करत नाही. कारण या लोकांचे गणितं वेगळेच असतात. सनी देओलने जे करून ठेवलंय त्याला तोड नाही एवढं खरं..

मागेही एकदा लिहिलं होतं..दामिनी सिनेमातल्या एका प्रसंगात सनी म्हणतो (सिनेमा नक्की आठवत नाही पण बहुतेक दामिनीच आहे),

"चड्ढा अगर कोर्ट में तुने कोई बत्तमिजी की ना तो माई तेरा वो हाल करुंगा, के तुझे अपने पैदा होने पे अफसोस होगा."

ज्यांनी कोणी हे लिहलंय त्याला सलाम ! आणि ज्या ताकदीने सनीने हे म्हटलंय त्याला तोड नाही!
थंड डोक्याने दिलेली यापेक्षा भयंकर धमकी मी तरी ऐकलेली नाही!

किसन शिंदे's picture

25 Sep 2017 - 11:38 am | किसन शिंदे

दामिनीमधलाच आहे तो डॉगलॉग.

बाकी सनीवरचा हा लेख आवडला.

कपिलमुनी's picture

25 Sep 2017 - 11:42 am | कपिलमुनी

मला सनीचा आवडलेला चित्रपट म्हणजे घातक ! जबर्‍या डायलॉग डिलीव्हरी आहे त्यात !

मित्रहो's picture

25 Sep 2017 - 2:42 pm | मित्रहो

काही वेगळ्या अभिनेत्यांवर लिहायाचा तुमचा प्रपंच आवडला. अजय देवगन, सनी देवल वगेरे. बऱ्याचदा लेख एकतर शाहरुख , अमिताभ यांच्यावर येतात किंवा नासिर, संजीव कुमार, ओमपुरी वगेरे मंडळीवर टोपल्याने येतात. अशा अभिनेत्यांवर कुणी लिहित नाही.
मला स्वतःला घायल दामिनी आवडले होते. घातक त्याच लाइनीतला वाटला, फारसा आवडला नाही. अर्जुन घायल, दामिनीनंतर बघितला त्यामुळे बरा वाटला खूप आवडला नाही. बेताब नाही आवडला. तसेच गदर आणि त्यानंतरचे सिनेमे फारसे आवडले नाही. तो अभिनेता म्हणून फक्त घायल, दामिनी मधेच दिसला असेच म्हणावे लागेल.
माणूस म्हणून त्याची करुन दिलेली ओळख आवडली. वर कुणी म्हटल्याप्रमाणे काही विषय जाणूनबुजुन टाळलेत काय.

मराठी कथालेखक's picture

25 Sep 2017 - 7:58 pm | मराठी कथालेखक

सनीची चालबाझ मधली भूमिकापण बर्‍यापैकी लोकप्रिय झाली होती बहूधा...

सिरुसेरि's picture

25 Sep 2017 - 8:23 pm | सिरुसेरि

छान माहिती . एक दिग्दर्शक म्हणुनही सनी देओलने "घायल रिटर्न" मधे छाप पाडली आहे .

सन्नीभाव लैच भारी माणूसे.
घायल, घातक, गदर बार्शीत वर्षनुवर्षे चाललेले पिक्चर आहेत. गदर मी पूर्ण उभा राहून पाहिलेला पिक्चर हाय, बसायला जागाच नव्हत्या नुसते पैसे घेऊन डोरकीपर आत सोडायचा. घातक मी कमीतकमी ३० वेळा पहिलेला आहे. सन्नीसारखा कुठलाच हिरो स्टाईलीत चालू शकत नाही. एकदम मुठी वळवून मर्दानी चाल. गदरमधला हापसा उपसून हाणायचा सीन सन्नी हाय म्हनूनच जमला. सन्नीच्या एका डोळ्यात ब्लॅक स्पॉट आहे. नुसत्या मिशा लावलेला सन्नी एक लंबर हँडसम दिसतंय (त्रिदेवमध्ये आहे थोडा वेळ).
सोलापुरात डीएसबी फॅन क्लब आहे (धर्मेंद्र सन्नी बॉबी). भरपूर अ‍ॅक्टिव्ह मेंबर्स आहेत. सन्नीभाव पण त्यांना फोटो बिटो पाठवत असतंय. मेंबर्स मुंबईला गेले की भेटून येत असतेत.

पगला गजोधर's picture

25 Sep 2017 - 8:49 pm | पगला गजोधर

अजून एक पुरवणी..

सनीची फक्त एका भुवईची (काना कडची साईड) एक साईड वर असते, डायलॉग मारताना (काळजी पूर्वक ओबसर्व करा )

फक्त एक भुवई एका बाजूने उंचावल्यावर, २.५ कीलो चा इम्पॅक्ट पडतो प्रेक्षकांवर..
It's sign of self confidence.
काय समाजलात ?

पगला गजोधर's picture

26 Sep 2017 - 11:08 am | पगला गजोधर

हीच ती जगप्रसिद्ध डावी भुवई .. .

1

11

गदर मधली फायटिंग शेवट पर्यंत अतिशयोक्तीपर वाटली नाही. एकटा सनी आखा पाकिस्तान धुवून लोळवू शकतो असा विश्वास होता.

पिंपातला उंदीर's picture

25 Sep 2017 - 9:06 pm | पिंपातला उंदीर

काय जबरी अभ्यास आहे पब्लिकचा सनी पाजीबद्दल .मानलं राव

अंतु बर्वा's picture

25 Sep 2017 - 9:12 pm | अंतु बर्वा

आपन भी सनी का फॅन... "ये मजदूर का हाथ है कातिया, लोहा पिघला के उसका आकार बदल देता है. ये ताकत खुन पसीने से कमाई हुई रोटी की है, मुझे किसी के टुकडो पर पलने की जरुरत नही..." कींवा, "डराकर लोगोंको वो जिता है जिसकी हड्डीयों मे पानी भरा होता है" असले डायलॉक फक्त सनीपाजींनीच म्हणावेत! अमरीश पुरीला बखोटं पकडुन "आज के बाद तेरी हर सांस के पीछे मै मौत बनकर खडा हुं" म्हणुन सुनावल्यानंतर एक हात पुढे करुन "ए.." मुठी आवळुन ज्या त्वेषाने म्हटलय त्यालाच संजय जाधव च्या भाषेत कन्विक्शन का पैसा है बॉस! म्हणत असावेत.

गामा पैलवान's picture

26 Sep 2017 - 12:25 am | गामा पैलवान

बायको म्हणते की दाढीधारी शीख म्हणून शोभून दिसणारा एकमेव नट म्हणजे सनी देवल.
-गा.पै.

पद्मावति's picture

26 Sep 2017 - 11:16 am | पद्मावति

मस्तं लेख. आवडला.

वाल्मिकी's picture

26 Sep 2017 - 10:35 pm | वाल्मिकी

नंतर एका चित्रपटात सनीनं पाकिस्तानी सैनिकाची भूमिका बजावली होती????????????????????????????????

पैसा's picture

27 Sep 2017 - 7:37 pm | पैसा

लेख आवडला. मात्र तुमच्याकडून जास्त संतुलित, म्हणजे लेखनायकाच्या कमकुवत बाजूबद्दलही लिखाण व्हावे असे अपेक्षित आहे.

पिंपातला उंदीर's picture

27 Sep 2017 - 8:21 pm | पिंपातला उंदीर

"एक तर चित्रपटसृष्टीत अनेक प्रयोग होत असताना सनी देओलनं त्यांच्यापासून दूर राहण्यातच धन्यता मानली. जुन्या वळणाचेच मारधाडपट करण्याच्या प्रथेलाच तो चिकटून राहिला. दुसरं म्हणजे त्याचा माध्यमांपासून दूर राहण्याचा स्वभाव. जोरदार मार्केटिंग हा चित्रपट यशस्वी करण्याचा मंत्र मानला जाऊ लागला आहे. चित्रपट बनवण्याइतकंच त्याचं प्रमोशन करणंही तितकंच महत्त्वाचं मानलं जाऊ लागलं आहे. चित्रपटाच्या बजेटमध्येच प्रमोशनसाठी मोठा हिस्सा राखीव ठेवण्यात येऊ लागला आहे. हल्लीचे अभिनेते चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मॉलपासून ते रेल्वे स्टेशनपर्यंत सगळीकडे जातात. संकोची स्वभावाच्या सनीला हे जमलं नाही. त्याने प्रयत्न केले नाहीत असं नाही, पण त्याला जमलंच नाही ते. मार्केटिंगच्या या जमान्यात सनी झपाट्यानं आऊटडेटेड होत गेला. गेल्या काही वर्षांत 'यमला, पगला दिवाना' आणि काही प्रमाणात 'अपने' वगळता सनीला बॉक्स ऑफिसच्या यशाचं तोंड बघायला मिळालं नाही. प्रचंड पाठदुखीमुळे त्याच्या उमेदीच्या काळातली तब्बल पाच वर्षं वाया गेली. हाही एक महत्त्वाचा घटक ठरला."

पैसा's picture

27 Sep 2017 - 9:07 pm | पैसा

पण त्याच्या वडिलांसारखाच सनीही जर चांगला दिग्दर्शक नसेल तर ठोकळा वाटू शकतो, तसेच त्याची संवादफेक सुद्धा आवाजामुळे कधी कधी मार खाते.

हेमामालिनीमुळे आपल्या आईवडिलांचा संसार बिघडलेला पाहूनही त्याने डिम्पलला आयुष्यात स्थान दिले या दोन गोष्टींमुळे सनीला थोडा उणेपणा येतो.

सच६४८६'s picture

28 Sep 2017 - 9:52 am | सच६४८६

खूपच मस्त ...
मी जेव्हापासून आठवतंय तेव्हापासून त्याचा फॅन आहे ... अजूनही आहे ... मला त्याची smile खूप आवडते ....
माझ्या मुलाचं नाव सनीच ठेवणार होतो ..पण लिओनीबाईंनी घोळ घातला ...

अनुप ढेरे's picture

28 Sep 2017 - 10:41 am | अनुप ढेरे

लेख उत्तम. सनीचे अर्जुन आणि घायल अगदी लहानपणापासून बघत आलो आहे.

एक खटकलंं.

धर्मेंद्रच्या दुसऱ्या लग्नामुळे मध्ये बरीच वर्षं धमेंद्र आपल्या परिवारापासून दुरावला होता. त्यामुळे सनी बहुतेक अमरीश पुरीमध्ये कुठेतरी ‘फादर फिगर’ शोधत असावा.

लेखक हे जज करण्याच्या पोझिशन मध्ये असावा का असा प्रश्न पडला. का हे सनीने स्वतः मुलाखतीत सांगितलं आहे?

पिंपातला उंदीर's picture

28 Sep 2017 - 3:00 pm | पिंपातला उंदीर

अमरीश पुरीच्या आत्मचरित्रामध्ये त्याने सनी त्याला किती मानायचा , प्रेम करायचा हे लिहिलं आहे . लेखातल्या अमरीश पुरीच्या अपघाताचा किस्सा त्यातच वाचला होता .निष्कर्ष मात्र मीच काढला .