स्पर्शाला पारखा... पुरुष

मराठी कथालेखक's picture
मराठी कथालेखक in जनातलं, मनातलं
23 Sep 2017 - 4:15 pm

स्पर्श ही सुद्धा एक संवादाची भाषा आहे असं म्हंटलं जातं.
चित्रपट, मालिका यांतली पात्र अनेकदा एकमेकांना स्पर्श करताना दाखवतात, अनेकविध नात्यातले (मैत्री) स्त्रीपुरुष हातात हात घेतात , कधी आलिंगन देतात , कधी स्नेहाने, प्रेमाने, कधी सांत्वन करण्यासाठी , तर कधी धीर देण्यासाठी..काही वेळा तर रोज 'गुड मॉर्निंग/नाईट' म्हणत 'हग करणे' ही दाखवतात. आणि यात पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसी हे तर आलेच पण त्याशिवाय आई-वडील आणि मुलगा/गी, मैत्रमैत्रिणी, आजी आजोबा आणि नातवंड इतकेच काय तर कधी दीर-वहिनी वगैरे वगैरे असे अनेक नात्यात होणारा स्पर्श अगदी सहज दाखवतात. मला त्यावर अजिबात टीका करायची नाही. पण मला ते बघताना नेहमी आश्चर्य वाटते. त्यामुळे स्पर्श याविषयावर लिहावसं वाटलं ...
वास्तवात आयुष्यात आपल्या इतके स्पर्श होतात का ?
त्यातही पुढे जावून मला वाटते की एक पुरुषाच्या जीवनात स्त्रीच्या तुलनेत खूप कमी स्पर्श असतात. लहानपणी होणारा आई वडील, भावंड ,काही प्रमाणात इतर नातेवाईक यांचा स्पर्श थोडे मोठे झाल्यावर (म्हणजे वय वर्षे १०-१२ नंतर) हळूहळू कमी होत , जवळपास पुर्णतः बंद होतो. मित्रांशी काही प्रमाणात स्पर्श असतो (पाठीवर थाप मारणे, गळाभेट घेणे ई) पण तरी सगळ्याच पुरुषांच्याबाबत ते होत नाही. मी तरी कधी अगदी जवळच्या मित्रांचीही गळाभेट घेतल्याचे मला आठवत नाही. कॉलेजजीवनात काही प्रमाणात मुला मुलींचा मस्ती करताना एकमेकांचा स्पर्श होतो हे मी पाहिले आहे. पण फार कमी मुलांच्या बाबतच हे घडते. बाकी अनेक मुलांना मैत्रिणी नसताता किंवा असल्यातरी त्यांच्याशी औपचारिक हँडशेक सोडल्यास कोणताही प्रकरचा स्पर्श नसतो. म्हणजे बालपण सरल्यानंतर पहिली प्रेयसी भेटेपर्यंत वा विवाह होईपर्यंत अनेक मुलांच्या जीवनात कोणताही स्पर्श जवळपास नसतोच. पुढे प्रेयसी , पत्नी, अपत्ये यांचा स्पर्श पुरुषाच्या जीवनात असतो पण मुले मोठी होतात तसे पुन्हा मुलांचा स्पर्श आयुष्यातून कमी होतो. मग फक्त पत्नीचाच काय तो स्पर्श आयुष्यभर कमी अधिक प्रमाणात रहातो. त्यानंतर दोघांतले भावबंध, आकर्षण , मतभेद यानुसार तो कमी अधिक असतो. पण एकंदरीतच आयुष्यात पुरुष हा कमी अधिक प्रमाणात स्पर्शाला पारखा असतो.
याउलट स्त्रियांच्या जीवनात विविध स्पर्शाचे प्रमाण खूप जास्त असते. मुलगी मोठी झाली तरी आईशी, बहिणीशी तिचा स्पर्श बर्‍याच प्रमाणात असतो असे मला वाटते. [तर दोन भावांत ,किंवा बहीण भावात स्पर्श फारसा नसतो असे माझे निरिक्षण आहे ], दोन मैत्रिणीसुद्धा बराच स्पर्श करतात. इतर स्त्री नातेवाईकांशीही मुलींचा सहज स्पर्श मी पाहिला आहे. माझी पत्नी माझ्या मावशीची आणि आत्येचीही गळाभेट घेते याचे मला खूप अप्रुप वाटते (या नातेवाईकांचा स्पर्श मी कधी अनुभवला नाही !!).
तसेच स्त्रीचा आपल्या अपत्याशी होणारा स्पर्श तिच्या पतीच्या तुलनेत खूप जास्त असतो. इतकेच काय तर आसपासच्या (नात्यातील , शेजारचया) इतर अनेक लहान मुलांना स्त्री सहज जवळ घेते, खेळवते ; पण पुरुष सहसा असं करत नाहीत.
स्त्री आणि पुरुषांच्या मानसिकतेत फरक असल्याने दोघांची स्पर्शाची भावनिक गरज भिन्न असते की हा केवळ संस्कारांचा भाग आहे ? इतर मिपाकरांच काय मत आहे ?इतर देशांत राहणार्‍या / राहिलेल्या मिपाकरांची तिथली निरिक्षणं काय आहेत हे जाणूण घ्यायला आवडेल.
आयुष्यातील स्पर्शाच्या कमी अधिक असण्याने (वा नसण्याने) व्यक्तीमत्वावर, मानसिकतेवर काय परिणाम होतात ?

समाजजीवनमानप्रकटनविचारलेख

प्रतिक्रिया

माम्लेदारचा पन्खा's picture

23 Sep 2017 - 4:50 pm | माम्लेदारचा पन्खा

प्रतिक्रिया काय येणार ते पाहिलं पाहिजे . . . . .

म्हणता ते पटलं आहे बरंचसं . . . !

पगला गजोधर's picture

23 Sep 2017 - 4:57 pm | पगला गजोधर

स्पर्श व भारतीय पुरुष, याबाबतीत तुमचे मत पटतंय.

बोलघेवडा's picture

23 Sep 2017 - 6:20 pm | बोलघेवडा

खरंय. तुम्ही म्हणता आहात तसं होत खरं.

स्पर्शाची भाषा ही व्यक्तीच्या जीवनातील गुंतण्याशी समप्रमाणात वाढते वा कमी होते. स्त्रियांची सामाजिक व कौटुंबिक गुंतणूक (इनवोल्वमेंट) ही वय वाढेल तसतशी वाढत जाते, तर पुरुषांची कमीकमी होत जाते. यावर विस्तृत संशोधन झालेलं आहे. जिज्ञासूंनी आंतरजालावर धांडोळा घेऊन पाहावा.

सिंथेटिक जिनियस's picture

23 Sep 2017 - 7:30 pm | सिंथेटिक जिनियस

विषय पटला.

मराठी कथालेखक's picture

23 Sep 2017 - 8:45 pm | मराठी कथालेखक

आणि इतके विविध मानवी स्पर्श कमी पडतात की काय म्हणून काही मुली बाहूल्याला / टेडीला कवटाळतात

पगला गजोधर's picture

23 Sep 2017 - 8:54 pm | पगला गजोधर

आणि इतके विविध मानवी स्पर्श कमी पडतात की काय म्हणून

५० शेड्स ऑफ ग्रे, सारखं, काही जणांना चाबूक / टीव्ही केबल वायर, वैगरेच्या फटाक्यांचा स्पर्श आवडत असेल काय ? म क ले साहेब ????

मराठी कथालेखक's picture

23 Sep 2017 - 9:09 pm | मराठी कथालेखक

एखाद्या लेखकाच्या एका लेखावर प्रतिक्रिया देताना त्याच्या विषयाने दुरान्वयेही संबंध नसलेल्या दुसर्‍या लेख/कथांचा संदर्भ जोडणे हे वाचक म्हणून असलेल्या परिपक्वतेबद्दल प्रश्न निर्माण करणार आहे.
बाकी माझ्या इतर कथा/लेख ई बद्दल तुम्हाला टीका टिपण्णी करण्याचं स्वातंत्र्य आहेच आणि ते त्यामुळे ते धागे वर आलेत तर मिपाचा कुठला नियम पायदळी तुडवल्याचं पातक तुमच्या माथी येणार नाही.
असो.

ज्योति अळवणी's picture

24 Sep 2017 - 12:40 am | ज्योति अळवणी

खरय. स्त्रियांच्या आयुष्यात स्पर्शाची भाषा जास्त असते.

या विषयाला लेखनस्पर्ष फारसा झाला नसावा. आपले म्हणणे वरवर पाहता बरोबर वाटत आहे.
दणकून प्रतिसादास वाव आहे पण स्पर्षाची भाषा शब्दात कशी सांगणार?
मुलांना मोठे झाल्यावर आईबापांनी फार अंगाशी आलेले आवडत नाही म्हणून आम्ही येताजाता मुलाला मिठ्या मारणे हे तो लहान असतानाच करून घेतले.
आता दमून आल्यावर कुठं पाठीला तेल लावून दे, कुठं पाय दाबून दे, केसाना तेल लावून दे असे रोज काही ना काही चालू असते. यात माझा नवराही मागे नाही.
खरंतर आईबापाशी असे कनेक्टेड राहणे मुलांना आवडते. आपणही ते करावे.
तुम्हाला जर अस्पर्ष असल्यासरखे वाटत असेल तर आपल्या वयस्क आत्या, मावशी, आई यांचे पाय दाबून द्या. मग मायेनं त्यांनी डोक्यावरून हात फिरवला की मनातून ही गोष्ट निघून जाईल.
मला कधी मैत्रिणींशी गळाभेट घेणे आवडले नाही. सगळ्यांपासून लांब आल्यावर वर्षानुवर्षे भेटी न झाल्यामुळे आता जमेल तितक्या नातेवाईक महिला व मैत्रिणींची गळाभेट घेते.
अनेक वर्षांपूर्वी एक लेख वाचनात आला होता. फारसे काही आठवत नाही पण त्यात तान्ह्या बाळांचे दोन गट करून निरिक्षण केले गेले होते. एका गटातील बालके कायम आई, वडील, घरातील सदस्यांनी जवळ घेतलेली अशी राहतील असे पाहिले व दुसर्‍या गटातील बालके कमी स्पर्षित राहतील असे पाहिले. त्यांना हा प्रयोग अर्थातच फार दिवस करता आला नाही पण जितका केला गेला त्यात कमी स्पर्षित बालके असुक्षित होती हे साहजिकपणे लक्षात आले. आणखी कुठल्याश्या देशात काही प्रौढ लोक कमी वयात का निवर्तले असा सर्व्हे केला असता त्यातील बरेच लोक हे लहानपणी कमी मायेचा स्पर्ष झालेले होते असे लक्षात आले. त्यांच्या पालकांना घरातून लवकर कामासाठी बाहेर पडावे लागे व रात्री उशिरा घरी यावे लागे. ही मुले नंतर मोठेपणी खूप असुरक्षित व चिडचिडी झाली असल्याचे लक्षात आले.

शिव कन्या's picture

24 Sep 2017 - 7:34 am | शिव कन्या

रेवती, निरीक्षण आवडले. नवी माहिती कळली.

अरब देशांत, पुरुष गळा भेट घेतात. मनसोक्त. जोर्डन इत्यादी देशात, पुरुष एकमेकांच्या गालाला गाल लावतात, कपाळाचे चुंबन घेतात, हाताच्या पंज्याचे चुंबन घेतात... आणि greet करतांत.

पण मांडलेल्या विषयात तथ्य आहे.

मराठी कथालेखक's picture

24 Sep 2017 - 10:55 am | मराठी कथालेखक

प्रयोंगाची माहिती वाचायला आवडली.

तुम्हाला जर अस्पर्ष असल्यासरखे वाटत असेल तर आपल्या वयस्क आत्या, मावशी, आई यांचे पाय दाबून द्या. मग मायेनं त्यांनी डोक्यावरून हात फिरवला की मनातून ही गोष्ट निघून जाईल.

पायाला का ? कुणी मोठं -कुणी लहान अशी असमानता का असायला हवी ?

असो. मला अस्पर्ष असल्यासरखे वाटते हे खरे, पण मला त्याचे काही वाईट वाटत नाही. कारण माहित नाही पण मलाही कुणाला फारसा स्पर्श करायला आवडत नाही आई, बाबा , भाऊ, आजी , इतर नातेवाईक, मित्र .....कुणालाच नाही, लहान मुलांनाही सहसा नाही.
मला या विषयाला स्पर्श करावासा वाटला म्हणून मी हा लेख लिहिला. झालंच तर स्त्री आणि पुरुष यांच्या व्यक्तीमत्वातली एक तफावत यानिमित्ताने जाणून घेण्याची जिज्ञासा आहे.

रविकिरण फडके's picture

24 Sep 2017 - 8:37 am | रविकिरण फडके

लोकल ट्रेनने प्रवास करा. किंवा नुसते रस्त्यावर चाला. हवेत तितके आणि/किंवा नकोत तितके स्पर्शच स्पर्श!

बाकी, जीवनात (आणि समाजजीवनात) इतके प्रश्न आहेत की त्यापुढे हा मुद्दा गौणच.

(व्यक्तिशः, पुरुषाने मिठी वगैरे मारलेली मला आवडत नाही. आणि 'ऐशा ललना स्वये येऊनि, देती आलिंगन त्या धावुनी...' ह्या 'तेचि पुरुष दैवाचे' कॅटेगरीतला माणूस मी कधी नव्हतो!)

वकील साहेब's picture

24 Sep 2017 - 1:51 pm | वकील साहेब

कॉलेज ला जात असताना बस मध्ये त्याचा तिच्या हाताला स्पर्श होतो. अवचितच एका क्षणा साठी फक्त . पण दोघेही अंगभर मोहरून जातात. ती आठवण त्यांच्या मनात आजही कोरलेली आहे.
नंतर प्रेमात पडतात 3-4 वर्षाच्या प्रेम प्रकरणात कित्तेकदा एक मेकाचा हात हातात घेऊन बगीचात बसतात. तो स्पर्श खूप हवाहवासा वाटत असतो. तिने घरी जाऊच नाही अस वाटत असत . तरीही आता त्या पहिल्या स्पर्शा सारखं मोहरून जायला नाही होत.
आता तर लग्न बंधनात अडकून 15 वर्ष झालीत. .कित्ती तरी कामा निमित्ताने एकमेकांचा हस्त स्पर्श होतोही. पण जाणवत देखील नाही.
पण याचा अर्थ असा आहे का की वयाच्या बेचाळीशीत त्याच्या संवेदना गोठून गेल्या आहेत ? तर नाही. कालच नाहीका चिंटू च्या मित्राच्या मम्मी चा हात चुकून हाताला लागला. बस ने ते दीर्घ वळण घेतलं होत तेव्हा. किती मोहरून गेला होता तो ?
म्हणजे स्पर्शा स्पर्शात पण फरक असतो की काय ?
असेलच.
आई चेहर्‍या वरून हात फिरवते तर त्यातला भाव वात्सल्याचा असतो
आणि सलूनवाल्याने चेहर्‍या वरून हात फिरवला तर त्याचा भाव 30 रुपये असतो.

विशुमित's picture

26 Sep 2017 - 4:33 pm | विशुमित

आणि सलूनवाल्याने चेहर्‍या वरून हात फिरवला तर त्याचा भाव 30 रुपये असतो.>>
==>> पोट धरून हसलो

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Sep 2017 - 6:19 pm | अमरेंद्र बाहुबली

चांगल्या विषयाला स्पर्श केला. खरयं लहान असतांना आजी, आई डोक्यावरून हात फिरवायची तो स्पर्श आजुनही आठवतो. कधी कधी आत्याकडे गेल्यास आत्याही डोक्यावरून हात फिरवतात. तोही स्पर्श हवाहवासा वाटतो. कधी कधी बहिणीकडे गेल्यावर 4 वर्षांचा भाचा पळत येऊन गळ्याभोवती घट्ट मिठी मारतो. आताच गणपतीत आँफीसच्या ठीकाणी एक मित्र त्याच्या 1.5 वर्षांच्या मुलीला घेऊन आलेला.ती मुलगी माझ्या खांद्यावर डोके टेकवून शांत झोपली. असे स्पर्श खरचं भावनिक गरज पूर्ण करतात.

मराठी कथालेखक's picture

25 Sep 2017 - 7:55 pm | मराठी कथालेखक

तुमच्या लिहिण्यावरुन असे जाणवते की आता तुमचा आइ, आजी , आत्या , बहीण ई कोणाशीही स्पर्श सहसा नसतो..
तुमची बहीण किंवा इतर कोणत्या स्त्रीशी याबाब्त तुमची तुलना करता तुम्हाला काय वाटत ?

गामा पैलवान's picture

24 Sep 2017 - 11:39 pm | गामा पैलवान

अवांतर : तिचा पहिला स्पर्श ही कथा उगीच आठवली.

-गा.पै.

सुबोध खरे's picture

26 Sep 2017 - 11:37 am | सुबोध खरे

स्पर्शाला असलेला गंड (taboo -- निषिद्ध किंवा अब्रह्मण्यम या अर्थाने) हा मराठी लोकांमध्ये खूप जास्त आहे. त्या मानाने पंजाबी आणि उत्तर भारतीय लोकांमध्ये तो खूप कमी आहे. लष्करात राहिल्यामुळे या बाबतीत असलेला एक मानसिक अडथळा (mental block) माझ्या कुटुंबात( मी बायको आणि मुलं) नाही.. आजही आम्ही लष्करातील वर्गमित्र आणि मैत्रिणी भेटलो तरी गळामिठी मारतो. हि गळामिठी बायकोसमोरही वर्गातील मुलींना मारताना कोणताही संकोच वाटत नाही किंवा माझा जिवलग मित्राने कितीतरी दिवसांनी भेटल्यावर माझ्या बायकोलाही गळा मिठी मारली यात मलाही काही वावगे वाटले नाही इतकी उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती ती.
बऱ्याचदा कृती करणाऱ्या माणसांच्या मनात नसलेल्या गोष्टी गंड(taboo) असलेल्या माणसांच्या मनात असतात.
आजही मी हॉटेलातहि माझ्या मुलीला आणि मुलाला खेटून बसतो किंवा तिचा गालगुच्चा घेतो. हे इतर लोकांना किती आवडते किंवा पटते याच्याबद्दल आम्ही फार विचार करत नाही. यात आम्हा दोघांना कोणताही कमीपणा वाटत नाही उलट अतिशय समाधान वाटते. मुलांना परीक्षेत अपयश आले तरीही त्यांना मिठी मारून सांत्वन करण्यात आम्ही दोघेही कोणतीही कसर ठेवत नाही.
आपल्या भावनांना आवर घालून जगाला मोठेपण दाखवण्यात आम्हाला कोणताही रस नाही.
पण अशी परिस्थिती आमच्या आईवडिलांची किंवा भावाची सुद्धा नाही. मी एम बी बी एस पास झाल्यावर लष्करात कमिशन झाले तेंव्हा आमचे वडील गळामिठी मारून रडले होते. अन्यथा असे सहसा होत नाही.
अर्थात मी आणि बायको डॉक्टर असल्याने आईवडील किंवा सासू सासरे यांची तब्येत पाहताना स्पर्श करतोच.
एखाद्या दुखऱ्या भागावर स्पर्श केल्यावर त्या माणसाला मिळणारे समाधान हे वेगळे असते शिवाय व्यवस्थित तपासले याचे समाधानही असते.
सारांश काय?-
रोजचेच ते वारे रोजचेच तारे
वाटते तरी नवीन विश्व आहे सारे
हि किमया स्पर्शाची.
भारिते जिवा

हात तुझा हातातून धुंद हि हवा
हे गाणे परत एकदा नीट ऎका.

मराठी कथालेखक's picture

26 Sep 2017 - 5:42 pm | मराठी कथालेखक

तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
पण गंड वा taboo हे एकच कारण आहे की आणखी काही मानसशास्त्रीय कारण आहे 'स्पर्श' नाकारण्यामागे (नाकारणे म्हणजे स्पर्शाच्या बाबत अनुत्सुक असणे किंवा तो टाळणे या अर्थाने) ?

सुबोध खरे's picture

26 Sep 2017 - 7:31 pm | सुबोध खरे

हा जास्त करून गंडच आहे. आपल्याकडे मोठी शहरे सोडली तर एखादा पुरुष स्त्रीशी सहजासहजी हस्तांदोलन करत नाही. नोकरी व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया याला अर्थातच अपवाद आहे. मग त्या स्त्रीचे किंवा पुरुषाचे वय काहीही असो. अर्थात बऱ्याच वेळेस लघळ पुरुष असेल तर(--आणि असे पुरुष भरपूर असतात/आहेत --) कोणतीही स्त्री त्याच्याशी स्पर्श टाळेलच. मग ते अगदी औपचारिक हस्तांदोलन असेल तरीही.
पण एखादी ६५-७० वर्षाची स्त्री सुद्धा आपल्याकडे "परपुरुषाचा" स्पर्श टाळते.मग तो २५-३० वयाचा तरुण असेल तरीही.
याच विरुद्ध पन्जाबी लोक किंवा गोव्याचे ख्रिश्चन लोक एकमेकांना (यात भिन्नलिंगी पण ओळखीतल्या व्यक्ती) सहज गळामिठी मारताना आढळतात.
याविरुद्ध आपल्याकडे अगदी जवळचे मित्र सोडले तर इतर पुरुष किंवा बायकांची प्रवृत्ती सुद्धा जास्त करून स्पर्श टाळण्याकडे असते. हा संस्कृती किंवा जडण घडणीचा एक भाग आहे.
मानसिक कारण हे एकतर मंत्रचळेपणा (OCD https://en.wikipedia.org/wiki/Obsessive%E2%80%93compulsive_disorder) यात काही व्यक्तीना आपले हात सतत अस्वच्छ आहेत असे भासत असते अशी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा स्पर्श टाळत असते.
अर्थात अति अद्ययावत व्यक्ती सुद्धा इतर लोकांचा / वस्तूचा स्पर्श "डर्टी" असल्याने टाळतात

एका अत्यंत अवघड प्रसंगातून जात असताना जवळच्या मित्राने दोन्ही हात खांद्यावर दोन सेकंद दाबले होते. तेव्हा प्रचंड आधार वाटला होता.

रविकिरण फडके's picture

27 Sep 2017 - 8:34 am | रविकिरण फडके

लेखक महोदय,

ह्याबद्दल जगात इतक्या भिन्नभिन्न पद्धती प्रचलित आहेत की काय योग्य काय अयोग्य ह्याचा विचार करू नये. जे आपल्याला योग्य / करावेसे वाटते व जे इतरांना खटकणारे किंवा प्रथेच्या नाहीतर कायद्याच्या विरुद्ध नाही*, (किंवा ज्यामुळे मार पडणार नाही) ते करावे.

तुम्हाला स्पर्श करणे / केलेले आवडत नसतील तर त्यात काहीही गैर नाही. मीही त्यातलाच आहे. मुंबईत दोनच ऋतू असतात;
उन्हाळा आणि जास्त उन्हाळा. दुसर्यांचा काय, आपला स्वतःचासुद्धा स्पर्श नको वाटावा अशा हवामानात आम्ही वाढलो. एकमेकाला आलिंगन देणे हे थंड प्रदेशात कदाचित उचित असेल, कुणास ठाऊक? (पण मग मध्य पूर्वेचे काय?)

* मध्य पूर्वेत बायकांशी हस्तांदोलन किंवा कोणत्याही प्रकारे स्पर्श,
* पाश्चिमात्य देशांमध्ये कुठल्याही परक्या लहान मुलाला हात लावणे (जसा खूप भारतीय 'सो स्वीट' असे म्हणत लावतात) कारण असे केल्यास तुम्हाला pedophile असल्याच्या संशयावरून पोलीस पकडून नेऊ शकतात, किंवा
* साधारणपणे जगात कुठेही स्त्रीला आपला हात हस्तांदोलनासाठी प्रथम ऑफर करणे (shake hand with a woman only if she offers her hand, is the rule),
* आपण भारतात करतो तसा कुणालाही पायाला हात लावून नमस्कार,
* इ. इ. (इंटरनेटवर ह्यावर खूप मजकूर उपलब्ध आहे.)

मराठी कथालेखक's picture

27 Sep 2017 - 2:45 pm | मराठी कथालेखक

धन्यवाद
पण मी काय योग्य /अयोग्य वा गैरे इत्यादी टिपणी करत नाहीये.. तर मानसिकता समजून घेण्याचा प्रयत्न करतोय.
बरं त्याहून पुढे एकाच समाजात स्त्री पुरुष यांतील भेद समजून घेण्याचाही प्रयत्न चाललाय.
झालंच तर चित्रपट /मालिकांत हाच समाज दाखवला जातो पण प्रत्यक्ष आयुष्यापेक्षा बरंच वेगळं दाखवलं (अगदी मराठी चित्रपट्/मालिका सुद्ध) जातं त्याबद्दलही चर्चा होवू शकते

"चित्रपट /मालिकांत हाच समाज दाखवला जातो पण प्रत्यक्ष आयुष्यापेक्षा बरंच वेगळं दाखवलं (अगदी मराठी चित्रपट्/मालिका सुद्ध) जातं त्याबद्दलही चर्चा होवू शकते"
हात्तिच्या, हे तर फारच सोपे आहे!
चित्रपट नाहीतर मालिकांत आणि आपल्या (निदान बहुसंख्य सामान्य माणसांच्या) आयष्यात काय साम्य असते? जवळजवळ शून्य.
# भरजरी साड्या नेसून दिवसभर घरात आणि स्वयंपाकघरात कुठल्या स्त्रिया वावरतात?
# कोण शहाणा मनुष्य आपल्या होणाऱ्या बायकोला (दुसऱ्याच कुणापासुन!) दिवस गेलेत हे समजूनही तिच्याशी लग्न करतो?
# काहीही उद्योग न करता, फक्त कटकारस्थाने करण्यात सगळा वेळ घालविणाऱ्या स्त्रिया तुम्हाला कुठे भेटतात?
# इ. इ. ही यादी खूप लांबविता येईल.
तर अशाच मालिकांमध्ये पस्तिशीतल्या घोड्यालाही, 'बाळा, दमळास का रे?' असे त्याच्या डोक्यातून व गालावरून हात फिरवीत त्याच्या आई विचारते.
हे अजिबात सिरिअसली घेऊ नका. सिरिअल्सचा आणि तुमच्या आमच्या आयुष्याचा काहीही संबंध नसतो.

पगला गजोधर's picture

28 Sep 2017 - 8:10 am | पगला गजोधर

हे अजिबात सिरिअसली घेऊ नका. सिरिअल्सचा आणि तुमच्या आमच्या आयुष्याचा काहीही संबंध नसतो.

तीव्र सहमत

arunjoshi123's picture

27 Sep 2017 - 3:44 pm | arunjoshi123

१. घरातल्या सदस्यांची संख्या ५० वरून ३ झालेली असणे.
२. शहरांत मनुष्य आणि निर्जीव वस्तू यांत फारसा फरक मानला जात नाही. कुरियर माणसाने आणलं काय आणि रोबोटनं काय, काही फरक नाही.
३. सिनेमांत लोक महान पातळीवर प्रेम, त्याग, सेवा, इ इ करतात. ते आदर्श समोर असताना तुमच्या क्षुद्र बाबींना कोणी मोजत नाही. म्हणून लोकं मोठी, महान, भारी, आदर्श, जवळ जावीशी वाटणं बंद झालेलं आहे. सिनेमात रोज ३०-४० गुंड मरतात, २-३ अजिबात न मरावी अशी माणसं मरतात, महिन्यातनं एकदा जगबुडी होते, म्हणून आजचे लोक कालच्च्यासारखं कुणी प्रत्यक्ष मेलं तर ढोरासारखे त्याच्या मुडद्याला स्पर्श करून रडत नाहीत.
४. जवळिक करायला पैसे पडतात.
५. खांद्यावर हात ठेवणं, अगदी मोठ्या लोकांत कॉमन होतं भारतात. आता ते गे लोकांशी जास्त वा पूर्णतः निगडित झाल्यामुळे खांदे मोकळे झालेत.
६. बॅक्टेरिया, व्हायरस यांचं वनस्पती ते प्राणी आणि अन्य प्राणी ते मनुष्य हे संक्रमण त्यामानानं थोडं अवघड. मनुश्य ते मनुष्य सोपं. हे ज्ञान सार्वत्रिक झालं आहे. नवं जन्मलेलं बाळ लोकं आता हातात देत नाहीत.
७. स्पर्श करायला वेळ लागतो. मंजे वेळ असावा लागतो.
८. स्पर्श करायची लोकं आपली असावी लागतात. इथे सगळे लहानपणीचे , घरचे लोक वाईट प्रकारे विखुरतात.
९. तुम्हाला फक्त तुमच्या ओळखीच्याच लहान मुलांना प्रेम करायचा अधिकार आहे. आम्हाला लहानपणी गावी कोणिही रँडमली खेळवायचे तसे करणे आम्हाला आता अलौड नाही. अपहरण, पेडोफिलिया, संसर्ग, इ इ शंभर शंका.
१०. फेमिनिस्ट चळवळीमुळे, इ इ स्त्री एक वेगळी स्पेसिस झाली आहे. हार्मोन्सच्या उनाडपणाला नक्की कोणत्या पातळीपर्यंत क्षमा आहे हे ठरवणं भयंकर रिस्की आहे. काहीही चालवून घेणार्‍या ते अजिबातच काही न चालणार्‍या स्त्रीया, आणि असल्याच रेंजमधले पुरुष भारतात असल्याने इथे जेन्यूइन लोकांना ऑडियन्स आयडेंटिफाय करता येत नाही. जी अन्य स्त्री पुरुष नाती आहेत, ती स्पर्शाबाबत नॉर्मल आहेत का सांगता येत नाही. नवरा एका ऑफिसात, बायको दुसर्‍या वा घरी असल्यामुळे जिथे क्वाम्स नाहित तिथेदेखिल स्कोप कमी झालाय.
११. दृश्ट काढायच्या परंपरेमुळे मिठी, जी उत्स्फूर्त असते, तिचा चान्स जातो. किमान ठेसनावर तरी मारली पाहिजे.
१२. भारताची लोकसंख्या वाढल्याने (१३ ते २६ पट झाल्याने) प्रायवसी कमी झाली आहे.
१३. सार्वजनिक लगट आपली संस्कृती नाही.
१४. अति लोकसंख्येमुळे लोकांचा लोकांना असलेला तिटकारा वाढला आहे.
१५. जवळीक नावाचं सामाजिक मूल्य त्याचं प्राधान्य हरवून बसलं आहे. त्याची जागा लोकांनी आपल्या यशाचं कौतुक करावं या इच्छेनं घेतली आहे. यशाच्या मागे असणारांस साहजिकच अशा गोष्टींसाठी प्राधान्य नसते.
==============================================
स्पर्श हे नव्या व्यवस्थेचं कंज्यूमेबल गुड नाही. त्याची अजून खूप वाट लागणार आहे.

मराठी कथालेखक's picture

27 Sep 2017 - 3:52 pm | मराठी कथालेखक

प्रतिसाद आवडला , धन्यवाद.

१४. अति लोकसंख्येमुळे लोकांचा लोकांना असलेला तिटकारा वाढला आहे.

हे अगदी पटले.. बाकीचे मुद्देही पटलेत.

पगला गजोधर's picture

27 Sep 2017 - 4:05 pm | पगला गजोधर

नै मला नै कळलं !
अति लोकसंख्या म्हणजे काय ? व्याख्या काय ?
आणि भारतात अतिलोकसंख्या हा प्रॉब्लेम, नुकताच सुरु झालाय का ?

arunjoshi123's picture

28 Sep 2017 - 6:36 pm | arunjoshi123

अति लोकसंख्या = आजची लोकसंख्या - सरासरी प्रत्येक वर्षाअंतीची लोकसंख्या फ्रॉम बीसी २२ लाख ते आज
===============
अ‍ॅडजस्टेड फॉर स्कॅटर अँड कंसंट्रेशन.

arunjoshi123's picture

28 Sep 2017 - 6:39 pm | arunjoshi123

नुकताच सुरु झालाय का ?

गेलीच बरीच हजार वर्षे भारताची (तो पाक धरून, इ) लोकसंख्या १ ते ५ कोटी असे.
==============================================================
सिविलायझेशनमुळे ती अनंतापर्यंत गेली तरी तिकडे पाहायचं नाही असं काही मत आहे का?

पगला गजोधर's picture

28 Sep 2017 - 7:42 pm | पगला गजोधर

अतिलोकसंख्या भारताला जर नवी नाही, तर
स्पर्शातून येणार तिटकारा नवीन का / किंवा वाढ का ?

सुबोध खरे's picture

28 Sep 2017 - 8:31 pm | सुबोध खरे

स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा भारताची लोकसंख्या ३८ कोटी होती ती आता १२५ कोटी झाली आहे म्हणजे सरळ सरळ तिप्पट आणि जमीन मात्र आहे तेवढीच राहिली आहे. जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या देशात चीन नंतर आपला दुसरा क्रमांक लागतो हि अजिबात भूषणावह गोष्ट नाही.

पगला गजोधर's picture

28 Sep 2017 - 9:26 pm | पगला गजोधर

१४. अति लोकसंख्येमुळे लोकांचा लोकांना असलेला तिटकारा वाढला आहे.

ह्यावर मी मत व्यक्त केले की

अतिलोकसंख्या भारताला जर नवी नाही, तर
स्पर्शातून येणार तिटकारा नवीन का / किंवा वाढ का ?

माझ्यामतेही अतिलोकसंख्या वाईटच.

त्याचप्रमाणे
२१ व्य शतकात लोकांनो ४ -४, ५-५ लेंडरं पैदा करा, अश्या अर्थी उपदेश करणारे, महामूर्ख व महावाईटच

अतिलोकसंख्या भारताला जर नवी नाही

नवी आहे.