डंकर्क........भाग - १

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
20 Sep 2017 - 12:35 pm

डंकर्क.... भाग-१

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

मे १०, १९४०
फ्रान्समधील संथ वाहणार्‍या नद्यांवरचे धूके, मंद वार्‍यात हिरव्यागार कुरणावर व वसंत ऋतूत बहरलेल्या बागांवर पसरत होते. कोणाच्याही मनास भुरळ पाडेल असेच दृष्य होते ते. पण त्याच वेळी एक अकराळ विकराळ वादळ फ्रान्सच्या जमिनीवर घोंगावत होते. आठ महिन्याच्या लुटुपुटूच्या लढाईनंतर, ब्रिटनचे पंतप्रधान चेंबरलेन यांनी ‘‘हिटलरची गाडी चुकलेली आहे !’’ असे उद्‌गार काढून जगाला हिटलरपासून आता कसलाही धोका उरलेला नाही असे आश्वासित केले होते त्याला फक्त पाचच आठवडे उलटून गेले होते. त्याच आश्वासनानंतर हिटलरने पश्चिमेला ब्लिट्झक्रीग चढवले. ब्लिटझक्रीगचा अर्थ : शत्रूवर आकाशातून व जमिनीवरून अचानक हल्ला चढवून त्याला निर्णयकरित्या पराभूत करणे. हा झाला डिक्शनरीतील अर्थ. वाचायला हा अर्थ फार सोपा साधा आहे पण यात जर्मन सेनापतींनी आपले पूर्ण लक्ष घालून हे युद्ध तंत्र कसे प्रगत केले होते हे पुढे येईलच.

एकंदरीत आंतरराष्ट्रीय वातावरण आणि त्यात पोलंडला जर्मनीकडून मिळणार्‍या धमक्या बघता, पोलंडवरच्या जर्मनीच्या आक्रमणाचा कोणाला धक्का बसेल, असे हिटलरला बिलकूल वाटत नव्हते. उलट जर्मनीच्या लष्कराने, जे “वेअरमाख्ट” या नावाने ओळखले जाते, ब्लिटझक्रिग नावाचे जे नवीन युद्धतंत्र अवलंबले होते त्याने पोलंडला व्यूहात्मक दणका सहज देता येईल असा त्याचा होरा होता. या डावपेचात नेहमीपेक्षा काय विशेष होते ? एकतर या तंत्रामधे वेगाने हालचाली करणारे रणगाडे एकमेकांशी बिनतारी संदेश यंत्रणांनी जोडलेले असायचे. यांच्याशी मोठमोठ्या ट्रकवरील हलता तोफखाना तो आणि ट्रकमधील पायदळ ही जोडलेले असायचे एवढेच नाही तर हवाई दलाची विमानेही या दलाच्या संपर्कात राहू शकायची. हे सगळे सैन्य हालचाल करायला लागले की त्याचा वेग प्रचंड असायचा आणि त्यापुढे शत्रू टिकाव धरणे अवघड ! १९१४ ते १९१८ या सालात हिटलरने पहिल्या महायुद्धातील खंदक युद्धाचा अनुभव घेतल्यामुळे तो त्या प्रकारच्या युद्धाचा तिरस्कार करत असे. तो त्यावेळी १६-बव्हेरियन इन्फंट्रीमधे निरोप्या होता व तेव्हापासून त्याला सैन्याच्या वेगवान हालचालींचे महत्त्व पटले होते. त्या काळात तोफखान्याचा मारा थांबला की खंदकातून उडी मारून दुसर्‍या खंदकापर्यंत निरोप घेऊन जिवाच्या आकांताने पळत जावे लागायचे. त्याने बहुतेक त्या युद्धात एकही माणूस मारला नसेल पण त्याचे कर्तव्य तो चोखपणे बजावायचा. ती रेजिमेंट त्याचे घरच झाले होते व तेथेच राहण्यासाठी त्याने दोनदा बढती नाकारली होती. आपल्या सोबत्यांबरोबर तो ते युद्ध लढला. त्यातच त्याने दोन आयर्न क्रॉस मिळवले.

पहिल्या महायुद्धात चार वर्षे दोन्ही बाजूचे सैन्य खंदकातून नुसते एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्या युद्धात हिटलर २९ वर्षाचा होता, त्यातील अनुभवावरून त्याने मनाशी एक खूणगाठ पक्की बांधली होती आणि ती म्हणजे सैन्याच्या वेगाने हालचाली करून शत्रूला आश्चर्याचे धक्के देऊनच या विचित्र परिस्थितीवर मात करता येऊ शकते. तेच त्याने त्याच्या ’माईन कांफ’ या पुस्तकातही लिहिले, “तीस वर्षात माणूस आयुष्यात बरेच काही शिकतो पण याचे महत्व काही वेगळेच आहे”. त्याच्या राजकीय जीवनात प्रत्येक उठावात त्याने या धक्का तंत्राचा यशस्वीपणे अनेक वेळा वापर केलेला आढळतो. उदा. १९२३ साली त्याने जो “बीअरहॉल” उठाव केला; त्यात तसे काही होणार आहे याची त्या उठावाचे प्रमुख जनरल लुडेनडॉर्फ आणि जनरल रॉम यांनाही पूर्ण कल्पना देण्यात आली नव्हती.

या आक्रमणात जर्मनीने पूर्णपणे प्रशिक्षण झालेल्या १३६ डिव्हिजन उतरवल्या होत्या. त्यांच्या पुढे होत्या १० पॅन्झर डिव्हिजन. यात अंदाजे ३००० रणगाडे व अगणित चिलखती गाड्या होत्या. या सगळ्या सैन्याच्या मदतीसाठी आकाशातून बाँबर, फायटर, डाईव्ह बाँबर्स उडत होती. यात पॅराट्रुपर सैनिकांसाठी काही ग्लायडरही होती. असे हे प्रचंड सैन्य हिटलरने फ्रान्स, ब्रिटन, बेल्जियम व डच सैन्यासमोर उतरवले होते. या आधी हिटलरने मोठ्या चलाखीने रशियाशी अनाक्रमणाचा करार करून टाकला होता.

त्या काळात हिटलर त्याच्या सेनानींचे सल्ले ऐकत असे. पोलंडवर आक्रमण करताना रशिया त्यात हस्तक्षेप करणार नाही अशी काहीतरी व्यवस्था करणे आवश्यक आहे असा सल्ला त्याच्या जनरलांनी त्याला दिला. हिटलर कम्युनिझमचा अत्यंत द्वेष करत असे परंतु या बाबतीत त्याने कोलांटी उडी मारून त्याचा परराष्ट्रमंत्री रिबेन्ट्रॉप याला, स्टॅलिन व त्याच्या परराष्ट्र मंत्र्यांशी (जनरल मोलोटोव्ह) वाटाघाटी करायला मॉस्कोला पाठवले. या शतकातील ही एक अत्यंत पाताळयंत्री खेळी होती. या वाटाघाटींच्या मागे दोन्ही नेत्यांचे अंत:स्थ हेतू वेगळे होते. स्टॅलिनला जर्मनीने पश्चिमेशी युद्ध केले तर हवेच होते आणि हिटलरला एकाच वेळी दोन आघाड्यांवर युद्ध कुठल्याही परिस्थितीत टाळायचे होते. या अंत:स्थ हेतूंच्या समोर त्यांनी त्यांच्या राजकीय तत्त्वप्रणाली तात्पुरत्या गुंडाळून ठेवल्या व २४ ऑगस्टच्या पहाटे जर्मनी आणि रशिया या दोन देशातील अनाक्रमणाचा करार अस्तित्वात आला. एक ब्रिटीश प्रशासकीय अधिकाऱ्याने याच्यावर टिप्पणी केली “All the ‘isms’ have become ‘wasms’. म्हणजे सगळे isms आता भूतकाळात जमा झाले होते. रशिया आणि जर्मनी यांच्यामधे पोलंडची वाटणी कशी करायची यासाठी ही भेट होती. एका संध्याकाळी रशियन बोलशॉय नावाच्या बॅलेगृहात स्वान लेक हा बॅले बघून झाल्यावर दुसर्‍या दिवशीच्या पहाटेपर्यंत रशियाच्या परराष्ट्रमंत्री मोलोटोव्ह याच्याबरोबर ही वादळी चर्चा झाली. यात असे ठरले की जर्मनीने वॉर्सा आणि लुब्लिन स्वत:कडे ठेवावे आणि रशियाने उर्वरित पूर्व पोलंड आणि बाल्टिक देशांचे काय करायचे ते करावे. हे देश होते इस्टोनिया, लॅटिव्हिया आणि लिथुआनिआ. या बैठकीनुसार जर्मन सैन्याने ब्रेस्ट-लिटॉस्क आणि बियालिस्टॉक येथून माघार घेतली आणि पोलंडचे चौथ्यांदा तुकडे पाडण्याचे कारस्थान पूर्ण झाले. पहिले झाले होते १७७२ मधे. दुसरे झाले १७९० मधे आणि तिसरे झाले लगेचच १७९५ मधे. मोलोटोव्हने या चर्चेअगोदर हिटलरने ’माईन कांफ’मधे काय लिहिले होते हे वाचले असते तर बरे झाले असते असे म्हणायची वेळ त्याच्यावर नंतर आली. हिटलरने बर्‍याच वर्षापूर्वी त्यात लिहिले होते, “रशियाशी आम्ही तह केला तर याचा अर्थ आम्ही त्यांच्याशी युद्ध पुकारणार नाही असा होत नाही. किंवा युद्धाच्या तयारीला वेळ मिळावा म्हणून आम्ही हा तह करू असेही नाही. कुठल्याही तहाच्या मागे युद्ध हे उद्दिष्ट नसेल तर तो तह काय कामाचा ? हे तह दीर्घकाळ चालणार्‍या संघर्षाची पहिली पायरी असते असा माझा विश्वास आहे.”

हा करार अस्तित्वात येईपर्यंत हिटलर इतर देशांच्या नेते मंडळींवर सतत दबाव टाकायचा. ऑस्ट्रिया, ब्रिटीश आणि फ्रान्सचे नेते या दबावाला बळी पडले. त्यांनी त्याला खूष ठेवायचा प्रयत्न चालवला हिटलरने त्याचा भरपूर फायदा उठवला. पण हिटलर रशियन नेत्यांशी मात्र जपून आणि आदराने वागायचा अर्थात हा नाटकीपणा होता. तो हे नाईलाजाने करायचा आणि त्यांची ही पाळी येणार आहे याची त्याने मनात खूणगाठ बांधली होती.

मोलोटोव्ह आणि रिबेनट्रॉप यांनी करारावर सह्या केल्यावर मात्र हिटलरने अजिबात वेळ घालवला नाही. पश्चिम आघाडीवर जर्मनीच्या आर्मी ग्रुप ‘बी’ ने हॉलंड व बेल्जियमवर हल्ला चढवला. हे दोन्ही देश अलिप्ततावादी होते हे लक्षात घेणे आवश्यक आहे. यावरून हिटलरला या असल्या मुर्खपणाची किती चाड होती हे कळते. याचा प्रमुख होता जनरल फेडॉर फॉन बॉक. या ग्रुपमधे २८ डिव्हिजन सैन्य होते. आर्मी ग्रुप बी ही जर्मन सैन्याची फ्रान्सवरील आक्रमणाची उजवी फळी सांभाळत होती तर जनरल गेर्ड फॉन रुनस्टेडच्या आधिपत्यखाली ‘आर्मी ग्रुप ए’ आर्मी बीच्या थोडसे दक्षिणेकडे हल्ला चढविणार होती. यात ४४ डिव्हिजन सैन्य होते. हे मुख्य आक्रमण होते. व ती आघाडी एक्स-ला-शॅपेल्ल ते मोसेले नदीपर्यंत एवढी विस्तृत होती. उजवीकडचे आक्रमण ‘आर्मी ग्रुप सी’ सांभाळणार होती व याचा प्रमुख होता जनरल रिटर फॉन लीब. याच्या हाताखाली १७ डिव्हिजन सैन्य दिलेले होते. याच्या सैन्याने मोसेले नदीपासून स्विट्झरलँडपर्यंतच्या आघाडीवर आक्रमण केले. या सगळ्या सैन्याशिवाय ४१ डिव्हिजन सैन्य राखीव म्हणून ठेवलेले होते. जनरल लीबच्या सैन्याला मॅजिनो तटबंदीचा बंदोबस्त करण्याची कामगिरी दिलेली होती. मॅजिनो तटबंदी ही फ्रेंच सरकारने अवाढव्य पैसा खर्च करून उभारलेली तटबंदी होती व त्याकाळात तेव्हातरी ती अभेद्य समजली जायची.

फ्रान्सचा एक राजकारणी आंद्रे मॅजीनो याने पहिल्या महायुद्धात भाग घेतला होता आणि त्यात तो जखमीही झाला होता. (१८७७-१९३२). याच्या नावाने मॅजीनो ही संरक्षक तटबंदी ओळखली जाते. त्याने १९१४ साली जखमी झाल्यावर उरलेले आयुष्य कुबड्या वापरूनच व्यतीत केले. तो या महायुद्धादरम्यान फ्रान्सचा संरक्षण मंत्री होता. त्याने पहिल्या महायुद्धापासून बोध घेऊन फ्रान्सच्या संरक्षणासाठी ज्या काही अनेक योजना तयार केल्या त्यात ही तटबंदीही होती. या तटबंदीत आकाराने प्रचंड असलेले बावीस आणि त्याहून छोटे छत्तीस असे किल्ले जमिनीखाली बांधले होते. बंकर्स आणि चौक्या तर अगणित होत्या. ही तटबंदी उत्तर – पूर्वेला मजबूत केली होती कारण त्या भागात असलेली लोकसंख्या आणि मोसेले खोर्‍यात खनिजाचे असलेले प्रचंड साठे. या तटबंदीचे एक वैशिष्ट्य असे होते की ही तटबंदी दोन्ही बाजूने लढवता येत असे. त्यामुळे जर्मन सैन्याने जेव्हा पुढे या आघाडी वरून माघार घेतली तेव्हा त्यांना तेथे पराभूत करायला अमेरिकन सैन्याला चांगलेच जड गेले. (१९४४-१९४५) मॅजीनोचा जरी अर्थ छोटी तटबंदी असला तरी ही त्या शब्दाच्या अर्थाच्या बरोबर विरुद्ध होती. सीमेपासून आतपर्यंत त्याच्या खोलीची व्याप्ती जवळजवळ २५ मैल होती. यात काय नव्हते ? भूमिगत किल्ले, तटबंदी, लष्करी चौक्या, संदेश दळणवळणासाठी केंद्रे, पायदळासाठी आसरे, शत्रूच्या रणगाड्यांच्या हालचाली मंद करणारे अडथळे, तोफखाना, मशीनगनचे मोर्चे, रणगाडा विरोधी अस्त्रांसाठी खास सोय, पुरवठ्याची गोदामे, टेहळणीसाठी मनोरे....नॅरो गेज रेल्वेचे जाळे....उच्च दाबाचा विद्यूत पुरवठा, इ.इ.. वेगवेगळ्या प्रकारच्या मनोर्‍यांवर वेगवेगळ्या तोफा, मशीनगन, बंदूका ठेवण्यात येत. त्याचे काही फोटो वर दिलेले आहेत त्यावरून त्याच्या बांधकामाची कल्पना यावी.

आता पहायला मिळणार होते एक असे युद्ध ज्यात अभेद्य पाय रोवलेली एक संरक्षण योजना एका वेगवान हालचाली करणार्‍या प्रणाली विरुद्ध उभी राहणार होती…..

क्रमशः
जयंत कुलकर्णी.
२०/सप्टेंबर/२०१७

इतिहासलेख

प्रतिक्रिया

अरे व्वा... वेल्कम बॅक काका..!

वाचतोय..!!!!!

महेश हतोळकर's picture

20 Sep 2017 - 1:53 pm | महेश हतोळकर

मस्त! वेलकम बॅक सर

पैसा's picture

20 Sep 2017 - 2:29 pm | पैसा

झकास सुरुवात!

पद्मावति's picture

20 Sep 2017 - 2:36 pm | पद्मावति

क्या बात है! मस्तच. पु.भा.प्र.

इरसाल's picture

20 Sep 2017 - 2:44 pm | इरसाल

पुढचे भाग लवकर लवकर लवकर टाकावेत......ही नम्र विनंती

प्रचेतस's picture

20 Sep 2017 - 2:57 pm | प्रचेतस

जबरदस्त

अनिंद्य's picture

20 Sep 2017 - 4:04 pm | अनिंद्य

रोचक!
पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

कपिलमुनी's picture

20 Sep 2017 - 4:24 pm | कपिलमुनी

पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

पगला गजोधर's picture

20 Sep 2017 - 5:00 pm | पगला गजोधर

या आक्रमणात जर्मनीने पूर्णपणे प्रशिक्षण झालेल्या १३६ डिव्हिजन उतरवल्या होत्या. त्यांच्या पुढे होत्या १० पॅन्झर डिव्हिजन. यात अंदाजे ३००० रणगाडे व अगणित चिलखती गाड्या होत्या. या सगळ्या सैन्याच्या मदतीसाठी आकाशातून बाँबर, फायटर, डाईव्ह बाँबर्स उडत होती.

का माझा काही घोळ होतोय ? कारण आंतरजालावर या आक्रमणाची ताकत खालील प्रमाणे आढळत आहे.
Germany:
60 divisions,
2,750 tanks,
2,315 aircraft

पगला गजोधर's picture

20 Sep 2017 - 5:05 pm | पगला गजोधर

*हे वरील पोलंड आक्रमणा संधर्भात आहे ? की माझा घोळ होतोय ...

कारण आंतरजालावर या आक्रमणाची ताकत खालील प्रमाणे आढळत आहे.
Germany:
60 divisions,
2,750 tanks,
2,315 aircraft

जयंत कुलकर्णी's picture

20 Sep 2017 - 5:31 pm | जयंत कुलकर्णी

चेक करा बरं जरा.... मला वाटते तुम्ही म्हणताय ते पोलंडवर झालेल्या आक्रमणासाठी असण्याची शक्यता आहे. अर्थात मी हे आकडे एका पुस्तकातूनच घेतले आहेत.

इडली डोसा's picture

21 Sep 2017 - 1:16 am | इडली डोसा

ही मालिका लिहायला घेतल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार, नुकताच डंकर्क चित्रपट पाहण्यात आला, त्या घटनेबद्दल अजून वाचायला नक्कीच आवडेल.

तुमच्या दुसऱ्या महायुद्धावरच्या इतर लेख मालिका देखील सुंदर आहेत त्यांची पोचही इथेच देते.

तुषार काळभोर's picture

21 Sep 2017 - 7:50 am | तुषार काळभोर

तत्कालीन जगातला एक काळा अध्याय. जगाचा इतिहास-भूगोल-नागरिकशास्त्र बदलणारी घटना!

पण संपूर्ण युद्धच नव्हे तर त्यातील छोट्या छोट्या लढाया, इतकेच नव्हे तर अगदी व्यक्तींच्या भेटीगाठी व करार देखील 'वाचक' म्हणून अगदी खिळवून टाकणारे!!

एखादी माघारसुद्धा 'यशस्वी' असू शकते, आणि विशेष म्हणजे युध्दाचे पारडे उलटवणारी निर्णायक असू शकते, हे दाखवणारी विसाव्या शतकातील एक महत्वाची घटना जयंतकाकांच्या सिद्धहस्त लेखनातून वाचायची मेजवानी!!

एकनाथ जाधव's picture

21 Sep 2017 - 12:29 pm | एकनाथ जाधव

नविन लेखमाला सुरु केल्याबद्दल अभिन्दन!

वाचतोय. कृपया लेखमाला पूर्ण करावी ही विनंती.

एनिग्मा's picture

22 Sep 2017 - 2:29 am | एनिग्मा

लै भारी जमलय हो. म्हणजे त्याच असा झाला बघा, ते डच आणि बेल्जीयम देश कुणाच्या लफड्यात पडायचं नाही म्हणून बाजूला बसल्यागत बसले. पण हिटलर कोणाच्या बापाला असा बाजूला बसू देणार थोडीच व्होता. बघता बघता १५ -२० दिवसात दोन्ही देश त्यानं आपल्या खिशात घातले कि राव.

किसनराव आपल्याला महाभारतात सांगून गेलेत, कुठल्याही युद्धात एक बाजूघेऊन लढावं. असं येगळं बसलं कि घाट होतो बघा.

असो पु.भा.प्र.

बेल्जियम आणि हॉलंड हे देश तटस्थ असले तरी हिटलरने त्यांच्यावर आक्रमण केलं याचं कारण म्हणजे फ्रान्सच्या मॅजिनो तटबंदीला टाळून उत्तरेकडून फ्रान्सवर हल्ला करायचा तर आधी बेल्जियम घ्यावे लागतच होते. आणि स्वीडनचा कोळसा बिनधोक मिळत राहावा म्हणून हॉलंड आणि नॉर्वे यांना गप्प बसवणे नाझी व्यूहरचनेनुसार आवश्यक होते. ब्रिटिश वायुदलाने हॉलंडच्या विमानतळांचा वापर करून जर्मनीवर आक्रमण करू नये म्हणूनही हॉलंडवर कब्जा करणं जर्मनीला आवश्यक वाटत होतं. पण बेल्जियम आणि हॉलंड या दोन्ही देशांकडून नाझी सैन्याला अनपेक्षित कडवा प्रतिकार झाला. फ्रेंच सैन्यही तितक्याच कट्टरतेने लढले असते तर दुसरे महायुद्ध कदाचित इतके लांबले नसते. अर्थात या जर-तरच्या गोष्टी झाल्या.

पगला गजोधर's picture

22 Sep 2017 - 2:40 pm | पगला गजोधर

किसनराव आपल्याला महाभारतात सांगून गेलेत, कुठल्याही युद्धात एक बाजूघेऊन लढावं. असं येगळं बसलं कि घाट होतो बघा.

जरा तपशील / संधर्भ देता येईल का तुम्हाला ?
महाभारतामध्ये कुठे असं म्हटले किसनरावजी ने ?
म्हणजे महाभारताची कुठली प्रत ? कुठलं प्रकरण ?
का महाभारत सिरीयल बद्दल लिहिलंय तुम्ही हे वरचं ?

मस्त ! 'वादळाचे घर' लेखाची आठवण झाली.

नरेश माने's picture

22 Sep 2017 - 3:02 pm | नरेश माने

मस्त! पुढील भागाच्या प्रतिक्षेत......

इशा१२३'s picture

22 Sep 2017 - 3:10 pm | इशा१२३

छान सुरवात!पुभाप्र

सस्नेह's picture

22 Sep 2017 - 3:49 pm | सस्नेह

वाचतेय...

स्वाती दिनेश's picture

24 Sep 2017 - 4:18 pm | स्वाती दिनेश

वाचते आहे.
पुभाप्र.
स्वाती

खूप दिवसांनी मिपावर आलो होतो. आणि छान लेख वाचायला मिळाला. पुभाप्र.

दीपक११७७'s picture

25 Sep 2017 - 11:55 am | दीपक११७७

नेहमी प्रमाणे उत्तम मालिका सर

जयंत कुलकर्णी's picture

25 Sep 2017 - 6:53 pm | जयंत कुलकर्णी

सर्वांना धन्यवाद !

कट्टापा's picture

28 Sep 2017 - 12:50 am | कट्टापा

साठवून ठेवलेलं आहे वाचतो निवांत. शीषर्क पाहून वाटले नोलनच्या चित्रपटावर लेख आहे. :)

बर्याच दिवसांनी काहीतरी रंजक वाचायला मिळ्नार