प्रिय घरास

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
18 Sep 2017 - 7:28 pm

प्रिय घरास,

नाही, तुझी आठवण येत नाही. बाई आहे मी. जाईन तिथे चूल मांडीन. रांधेन. खाऊ घालीन. चार फुले लावीन. शेज सजवीन. संग करीन. पोरं जन्माला घालीन. संसार थाटीन. वाढवीन. इथेही नवे घर करीनच की. नव्हे नव्हे केलेच आहे. नाही, तुझी आठवण येत नाही.

इथे मी पायी कुठे जात नाही. गाडीत जाते. पायी चालले असते तर थबकले असते. वळून पाहिले असते. मग एखादे घर तुझ्यासारखे दिसले असते. मग खिडकीतून आत शिरले असते. पडद्यामागे लपून बसले असते. नाही नाही ते आठवले असते. उगीच तो दिवस रडून घालवला असता. म्हणून मी इथे गाडीतून गालिच्यावर, गालिच्यावरून गाडीत एवढेच पाय खाली ठेवते. जमिनीला पाय लागले की डोळ्यातून खळळकन तुझ्या भिंती कोसळतात. बर, डोळ्यातून कोसळणाऱ्याया भिंती परत बांधायच्या म्हणजे फार खर्चिक काम. नाही झेपत.

इथे मी प्लास्टिकची भरपूर झाडीफुलंपानंवेली आणली आहेत. छानच दिसतात. कायम फ्रेश. रोज उठून पाणी नको की निगा नको. एकदा आणून ठेवली, अत्तराचा फवारा मारला, की झाले. ती गपचूप बसतात, मग मी माझे काम करायला मोकळी. नाही, मी इथल्या सुंदर सुंदर बागा, कातरून छान वाढवलेली झाडं असलं काही बघत नाही. डोळ्यांवर काळा काळा गॉगल लावून घेते. मला भीती वाटते, कुठून तरी चाफ्याचे अबोल झाड माझ्याशी बोलायला यायचे आणि मग तुझे दुष्ट सुगंधी अंगण मला इथे जगू द्यायचे नाही. भय वाटते.

इथे मी झुंबर टांगलेत. हजार लोलकांचे. किणकिण वाजणारे. एक दिवा लावायचा अवकाश, की त्याची हजारो सप्तरंगी आवर्तनं परावर्तित होतात. घराचा कोपरा न कोपरा त्या सप्तरंगात खेळत बसतो. मी संध्याकाळ होण्याचीही वाट पहात नाही कधी कधी. संध्याकाळ कातर असते. सगळं कातरून काढते. म्हणून मी या घरात संध्याकाळची सावलीच पडू देत नाही. अजून सूर्य भगभगत असतो, तोवर झुंबरं लावून मोकळी होते. कुठे अंधार नको, आणि हो..... तुझ्या डोळ्यात तेवणारा मंद नंदादीप, उदबत्तीचा दरवळ, तुझे वाट पाहणारे गायी सारखे करूण डोळे ....... माझा गपकन जीव घेतील. नाही, बऱ्याचदा घेतला आहे. मी कशीबशी त्यातून उठ्लेय. आता बळ नाही. पेक्षा झुंबर बरे.

तुझी आठवण कशी गाढून टाकायची, मनातल्या मनात तुला कसं पाडून टाकायचं हे शिकलेय.
पण आजी सांगायची, तुझ्या अंगणात माझी नाळ पुरलीय. ती तेवढी कुणाला उखडता येत नाहीये..
म्हणून.......
तुझी,
Rootless मुलगी.

धोरणमांडणीवावरवाङ्मयमुक्तकसाहित्यिकसमाजप्रकटनविचार

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

18 Sep 2017 - 8:54 pm | पद्मावति

सुरेख!

अनन्त अवधुत's picture

18 Sep 2017 - 9:32 pm | अनन्त अवधुत

.

तुमचे लेखन, कविता आवर्जून वाचावे असेच असतात.
हे लेखनही काळजाला भिडणारे आहे.

शिव कन्या's picture

22 Sep 2017 - 11:18 pm | शिव कन्या

रेवती, किती मना पासून वाचतेस! पुढे लिहायला बळ येते.

एस's picture

19 Sep 2017 - 2:46 am | एस

टोचलं काळजाला.

अप्रतिम लेख... शेवट तर आवडलाच.

चाणक्य's picture

19 Sep 2017 - 9:18 am | चाणक्य

अतिशय हृद्य.

पैसा's picture

19 Sep 2017 - 9:51 am | पैसा

हम्म

पुंबा's picture

19 Sep 2017 - 11:18 am | पुंबा

फार सुंदर लिहिलेत..

चष्मेबद्दूर's picture

19 Sep 2017 - 12:31 pm | चष्मेबद्दूर

शेवट अगदी वेगळा आणि म्हणूनच एकदम भिडला मनाला.

Naval's picture

20 Sep 2017 - 12:40 am | Naval

फारच सुंदर लिखाण...

ओळ न ओळ अगदी आटीव...केवळ अप्रतिम! शेवट तर क्या बात है!!

रुपी's picture

20 Sep 2017 - 1:03 am | रुपी

सुरेख!

पिलीयन रायडर's picture

20 Sep 2017 - 4:40 am | पिलीयन रायडर

सुरेख!!!!

सस्नेह's picture

20 Sep 2017 - 10:48 am | सस्नेह

जिवंत लेखन ! काळजात घरं पाडणारं ..

ज्योति अळवणी's picture

20 Sep 2017 - 5:29 pm | ज्योति अळवणी

अप्रतिम कस म्हणू? तरीही... आवडलंच

विचित्रा's picture

21 Sep 2017 - 1:06 pm | विचित्रा

आवडलं .

मितान's picture

21 Sep 2017 - 8:00 pm | मितान

!

शिव कन्या's picture

22 Sep 2017 - 11:19 pm | शिव कन्या

इतकं मनापासून वाचणार्यांचे आणि प्रतिसाद देणार्यांचे आभार.

चांदणे संदीप's picture

25 Sep 2017 - 12:12 pm | चांदणे संदीप

सुरेख... सुंदर.. अप्रतिम!

Sandy

जागु's picture

25 Sep 2017 - 12:37 pm | जागु

सुंदर.