हिरवाईच्या गप्पा - भाग १

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in कृषी
18 Aug 2017 - 2:11 am

नमस्कार मंडळी!

'हिरवाईच्या गप्पा' ह्या सदाहरित धाग्यामध्ये स्वागत आहे. ह्या धाग्याचे प्रयोजन हे बागकाम, परसबागेतील शेती, सेंद्रिय खतनिर्मिती, सेंद्रिय आणि जैविक पद्धतीने कीडनियंत्रण, बर्ड-फीडर बनवणे, झाडांचे संगोपन इत्यादी विषयांवर चर्चा करणे हे आहे. येथे मिपाकरांना वरीलपैकी आणि इतरही हिरवाईशी संबंधित विषयांवर चर्चा करता येईल. प्रश्न विचारता येतील, उत्तरे देता येतील, माहितीची देवाणघेवाण करता येईल, आणि अर्थातच, आपल्या बागेचे फोटो टाकता येतील. साधारणपणे पन्नास प्रतिसाद अथवा दोन पाने भरली की कोणीही सदस्य नवीन धागा सुरू करू शकेल. सुरुवात करून देण्याकरिता पहिला धागा साहित्य-संपादक आयडीने काढत आहोत. (फोटो प्रकाशित करण्यास मदत हवी असल्यास निःसंकोचपणे संपर्क साधावा).

धन्यवाद!
- साहित्य-संपादक

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

18 Aug 2017 - 2:36 am | पिलीयन रायडर

धन्यवाद!

सध्या म्हात्रे काका आणि कंजुस काका ह्यांच्या सल्ल्याप्रमाणे मेथी आणि लसुण लावला आहे. इथे फोटो देईन. प्रयोग म्हणुन मिरची लावावी असाही विचार आहे.

कुणाला काचेच्या बरणीमध्ये नुसत्या पाण्यात मनीप्लांट सारखी झाडे लावता येतात, त्याबद्दल काही माहिती असेल तर सांगावी. माझ्याकडे १-२ बरण्या मी जपुन ठेवल्यात त्या साठी.

हो, मनीप्लॅन्ट हा नुसत्या पाण्यात वाढू शकतो. विशेषतः फिश बाउलसारख्या काचेच्या गोल भांड्यात छान दिसतो. पाणी मात्र दर दोन दिवसांनी बदलावे.

https://en.m.wikipedia.org/wiki/Epipremnum_aureum

ही मूळची फ्रेंच पॉलिनेशियामधील वनस्पती आहे. तिथल्या नैसर्गिक वातावरणात ती राक्षसी वेलीप्रमाणे (Giant Creepers) प्रचंड मोठी होते व पानेदेखील खूप मोठाली असतात. अतिशय चिवट प्रजाती आहे. घरात कुंडीत वगैरे पाने लहान येतात.

रुस्तम's picture

19 Aug 2017 - 3:27 pm | रुस्तम

इथें ही झाडावर (आंब्याच्या, नारळाच्या) सोडली तर राक्षसी वेलीप्रमाणे प्रचंड मोठी होते व पानेदेखील खूप मोठाली होतात.

कंजूस's picture

18 Aug 2017 - 5:17 pm | कंजूस

खरडफळ्यावरून
डॉ सुहास म्हात्रे — 13 Aug 2017 - 00:17

मेथी कशी लावायची? मेथ्या पुरायच्या की मेथीच्या कांड्याच?

बाजारात मिळणारे मेथीचे दाणे हे मेथीचे बी असते; तेच वापरून लागवड करायची असते.

ही घ्या घरातल्या मेथीच्या शेतीची संपूर्ण प्रणाली ( ;) :) )...

घरातल्या-घरात मेथी पिकवायची सरळ सोपी पद्धत.




हे फोटो, घरातल्या एकरकंडिशन्ड वातावरणात, एक-दोन दिवसांच्या अंतराने काढलेले आहेत.

लागवडीसाठीचा कार्टन/ट्रे पुळणीच्या (बारीक) रेतीने भरावा. माती न वापरता रेती वापरल्याने चिखल होत नाही व तयार मेथी सहजपणे उपटून काढाता येते. त्याच रेतीत परत नवीन लागवड करता येते. रेतीवर मेथीचे दाणे पसरून त्यांच्यावर १-२ मिमी जाडीचा रेतीचा थर द्यावा किंवा रेतीवर मेथी पसरून ते जेमतेम रेतीखाली जातील अश्या तर्‍हेने हाताने रेती फिरवावी. मेथी पृष्ठभागाच्या खूप खाली ठेवल्यास ती रुजून वर यायला जास्त वेळ लागतो व पाण्याच्या अतिरेकाने कुजण्याची शक्यता वाढते. रेती केवळ ओली होईल पण पाणथळ होणार नाही इतपतच पाणी शिंपडावे.

दर दिवशी गरजेप्रमाणे (साधारणपणे हिवाळ्यात एकदा व उन्हाळ्यात दोनदा असे) रेती ओलसर राहील इतपतच पाणी द्यावे. रेती पाणथळ झाल्यास मेथीचे दाणे व मुळे कुजतात.

पाणथळपणा टाळण्यासाठी, मेथीच्या लागवडीसाठी छिद्रे असलेला छोटा (सुपमार्केट्समधून मिळणार्‍या फळांचा) कार्टन वापरून त्याच्या खाली घडी घातलेले वर्तमानपत्र अंथरावे. वर्तमानपत्र छिद्रांतून झिरपलेले पाणी धरून ठेवते. त्यामुळे, पाणथळपणा टाळून रेतीचा तळ जास्त काळ ओला राहतो. वर्तमानपत्राखाली छिद्रे नसलेला मोठा प्लॅस्टीकचा कार्टन/ट्रे ठेवल्यास झिरपणार्‍या पाण्याने होऊ शकणारी अस्वच्छता अथवा खिडकी खराब होणे टाळता येते.

ट्रे खिडकीत ठेवल्यास तडक उन (उजेड व उब) मिळाल्याने मेथीची भरकन वाढ होते व भाजीही उत्तम प्रतीची (जास्त हिरवी व चवदार) मिळते. बाल्कनी/टेरेस मध्येही ही लागवड करता येईल, पण हवामानाप्रमाणे पाण्याचे तंत्र बदलावे लागेल.

कुटुंबाला एक वेळेस पुरेल इतकी मेथी मिळेल अश्या आकारांच्या ट्रेमध्ये, चारपाच दिवसांच्या अंतराने एक ट्रे, अशी तीन-चार ट्रेमध्ये लागवड करावी. तयार मेथी काढून झाल्यावर त्याच ट्रे मध्ये लगेच परत लागवड करत राहिल्यास वर्षभर हवी तेव्हा कोवळ्या मेथीची भाजी मिळते. बाजारात मिळणार्‍या जून मेथीपेक्षा ही कोवळ्या मेथीची भाजी जास्त चवदार लागते. शिवाय, इतर भाज्यांची चव वाढवायला ताजी मेथी (ही कसुरी मेथीपेक्षा केव्हाही जास्त सरस असते) सतत उपलब्ध राहते.

अतिशय उपयुक्त माहिती. रेती मध्ये कोणते खत मिसळण्याची आवश्यकता असते का?

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Sep 2017 - 2:41 am | डॉ सुहास म्हात्रे

नाही. रेतीत आणि पाण्यात असलेले घटक मेथीला पुरेसे असतात.

वेल्लाभट's picture

8 Sep 2017 - 7:06 pm | वेल्लाभट

रेती म्हणजे कुठली नक्की?

बांधकामाला वापरतात ती??

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Sep 2017 - 12:20 am | डॉ सुहास म्हात्रे

कोणतीही रेती चालेल. रेती अश्यासाठी की, त्यामुळे मेथीच्या मुळाशी पाणी साचून राहत नाही... तसे झाल्यास मेथीची मुळे कुजू लागतात. अधिकचा फायदा म्हणजे, रेतीमुळे मेथी उपटून काढणे सहजशक्य होते.

किंबहुना, रेतीत मातीची मिसळ असली तर मी ती रेती धुवून वापरतो. मेथीच्या वाढीला रेतीला चिकटलेली अत्यंत कमी प्रमाणात असलेली आणि पाण्यातून मिळणारी सूक्ष्मतत्वे पुरेशी होतात... विशेषत : चित्रांत दाखवलेल्या ५-६ सेमी उंचीच्या कोवळ्या मेथीसाठी. ही कोवळी मेथी जास्त चवदार असल्याने मी तिची त्यापेक्षा जास्त वाढ होऊ देत नाही. तोच तो रेतीचा ट्रे वापरून मी मेथीची आठ-दहा पिके काढली आहेत.

रेवती's picture

18 Aug 2017 - 5:51 pm | रेवती

अरेच्च्या! मी मोदकाच्या धाग्यावर प्रतिसाद दिलाय. असो.
एक्काकाकांनी फोटोसहित पद्धत समजावल्यानुसार मेथी पेरली तिचे कोंब दिसायला लागलेत. पाणी तीनपैकी दोन दिवस बेताने घातले. एक दिवस पाऊस पडला त्यामुळे नाही घातले.

नूतन सावंत's picture

19 Aug 2017 - 2:25 pm | नूतन सावंत

कोणतीही बियांपासूनची झाडे लावताना शक्यतो भरच त्याला मोड आणून मग पेरावीत.
मेथीही मोड काढूनच पेरावी,कधी कधी मेथीच्या बुळबुळीतपणामुळे जमिनीखाली मोड आले तरी कुजून जातात.

रेवती's picture

19 Aug 2017 - 11:22 pm | रेवती

ओक्के सुरन्गीतै, आता पुढीलवेळी मोड फडक्यात बांधून आणते मग पेरते.

नूतन सावंत's picture

19 Aug 2017 - 2:35 pm | नूतन सावंत

मस्त धागा.
महिन्यायापूर्वी माठाचे देठ आणले होते मुळाकडची बाजू कुंडीत खोचून ठेवली होती,छान रुजले. काल साधारण एक जुडीइतकी भाजी निघाली.आता त्याला फुलंY येतील,तीही तशीच रुजून नवी भाजी येत राहील.
आता वर्ष /दीड वर्ष बघायला नको.दोन वर्षांपूर्वीही हा प्रयोग यशस्वीरित्या केला होता.

विशुमित's picture

19 Aug 2017 - 5:46 pm | विशुमित

माठाच्या भाजी सारखीच "तांदुळईची " ची भाजीचे देठ पण तुम्ही वापरू शकता. दोन्ही भाज्या दिसायला सारख्याच असतात. तुम्ही पुणे ला राहत असाल तर हडपसर किंवा सासवडच्या आठवडी बाजारात मिळू शकेल.
माठाच्या भाजीला थोडासा उग्र वास येतो जो तांदळी मध्ये कमी असतो.
लहान मुलांना तिची चव जास्त आवडते.

पिलीयन रायडर's picture

19 Aug 2017 - 8:28 pm | पिलीयन रायडर

अरे वा! अशा अजुन कोणत्या भाज्या असतात ज्यांचे देठ वापरता येतात?

सहजा सहजी ज्या भाज्या घरातच लावता येतील त्यांची माहिती द्याल का?

आणि सांगायला लाज वाटली पाहिजे, पण फोटो पण द्याल का? मला तांदुळई ही भाजी कशी दिसते ते माहिती नाही. :(

विशुमित's picture

19 Aug 2017 - 10:30 pm | विशुमित

पिरा ताई,
खरे म्हणजे तांदळीची भाजी माठाच्या भाजीसारखेच ऊसात येणारे एक प्रकारचे गवत आहे. सहसा खुरपणी करताना महिला मजूर त्याला राखतात.
कुंडीत लावण्या पेक्षा मोकळ्या जागेत लावले तर जास्त पसरेल.
फोटो काढावे लागतील. सध्या बाहेर आहे घरापासून. सांगतो कोणाला तरी पाठवायला.
------------
महाराष्ट्रातल्या हवामानामध्ये सहज येणाऱ्या काही भाज्या लावू शकता:
१) कोथंबीर (धने चोळून घ्याचे. ५ बोटात मावेल एवढे पुंजके लावायचे.)
२) वेली वर्गात काकडी, कारली आणि दोडक्याची बी लावायच्या. प्रत्येकाची १-२ वेली जरी आल्या तर २ महिने भाज्यांची काळजी नाही. भरपूर जागा उपलब्ध असेल तर दुधी भोपळा लावा. भरमसाट उत्पन्न.
३) वांग्याची कुंड्यांमध्ये ३-४ रोपे लावली तर तुमच्या छोट्याश्या कुटुंबाला पुरेशी आहेत. वानवळा पण देऊ शकता शेजारी पाजाऱ्यांना. रोपं नाही मिळाली तर वांग्याची बी आणून म्हात्रे सरांनी वर मेथी लावली त्या प्रमाणे बिन्दास्त (फक्त विरळ) लावा. येतात उगवून.
४) नासलेले टोमॅटो मातीत पुरा आणि बरीच रोपं उगवतील. त्यांना वेगळे करा आणि इतरत्र लावा. टोमॅटोची रोपं नाजूक असतात लावताना काळजी घ्या.
५) १ हात लांब आखुड जातीच्या शेवग्याचा बुंदा आणून तो जमिनी मध्ये १ इत गाडा आणि वर शेणाचा गोळा लावा. दिस आड थोडे थोडे पाणी घालत राहा.
---
अजून आठवले तर सांगतो.

विशुमित's picture

19 Aug 2017 - 10:40 pm | विशुमित

ही एक लिंक सापडली. ह्यात तांदळजा भाजी आहे.
http://www.vadanikavalgheta.com/p/green-leafy-vegetables.html

चिवळ / चिऊची भाजी.. बच्चे कंपनीला या भाजीची चव आवडते. नाव पण त्यांच्या आवडीचे आहे. ट्राय करा. ही जर भाजी मिळाली तर ती जमिनीवर कोठे ही टाका पाणी मिळाले की लगेच फुटवा फुटणार.

विशुमित's picture

19 Aug 2017 - 10:41 pm | विशुमित

ही एक लिंक सापडली. ह्यात तांदळजा भाजी आहे.
http://www.vadanikavalgheta.com/p/green-leafy-vegetables.html

चिवळ / चिऊची भाजी.. बच्चे कंपनीला या भाजीची चव आवडते. नाव पण त्यांच्या आवडीचे आहे. ट्राय करा. ही जर भाजी मिळाली तर ती जमिनीवर कोठे ही टाका पाणी मिळाले की लगेच फुटवा फुटणार.

अभ्या..'s picture

19 Aug 2017 - 11:08 pm | अभ्या..

तांदुळसा, राजगिरा, करडी, चाकवत, अंबाडी, चिगुळ, सगळ्या भाज्या एक लंबर.

विशुमित's picture

19 Aug 2017 - 11:16 pm | विशुमित

चिगुळ च म्हणार होतो पण सदस्यांना नसती समजली.

----
पण रानात चिगूळ झाली तर पिकाचे पार वाटोळे करते.

पिलीयन रायडर's picture

19 Aug 2017 - 11:21 pm | पिलीयन रायडर

धन्यवाद! इथे शक्य नाही पण भारतात गेले की लगेच लावणार!

चिगुळ म्हणजे?!

पिलीयन रायडर's picture

19 Aug 2017 - 11:23 pm | पिलीयन रायडर

सापडली त्या लिंकवर. ही भाजी मी पाहिलीये. पण का कोण जाणे मला ती शोभेचे झाड म्हणुन पाहिल्यासारखी वाटतेय.

ही भाजी जाणकार व्यक्ती कडूनच घ्या. ह्या मध्ये खूप प्रकार असतात. मला पण नाही अजून नीट ओळखता येत. आई बरोबर ओळखून आणते शेतातून.

आमच्या घरीही "तांदुळसा'च म्हणतात.
आकुर्डीच्या भाजी मंडईतपण मिळते ही भाजी..

जागु's picture

19 Aug 2017 - 4:35 pm | जागु

खुप छान धागा आहे.

पिलीयन रायडर's picture

19 Aug 2017 - 8:29 pm | पिलीयन रायडर

अरे वा! जागु ताईच आली इथे!

तू तर चिक्कार नवी माहिती देशील इथे!

आणि मलाही खुप नविन माहीती मिळेल इथे.
माझ्या ऑफिसमधून पिकासातून फोटो टाकणे बॅन झालय. त्यामुळे मला जरा हल्ली अडचण येते बरीच माहीती शेयर करायला. पण हळू हळू टाकेन.

आम्ही वाट पाहतोय जागु ताई !

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Aug 2017 - 5:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

स्वयंपाकघराच्या बागेतील मिरचीचे पीक

घराला बाल्कनी अथवा टेरेस असल्यास कुटुंबापुरते मिरचीचे पीकही सहज घेता येते. मिरचीचे झुडुप कुंडीतल्या कुठल्याही झुडुपाप्रमाणे वाढते. चार-सहा महिन्यांत केवळ एक-दोन झुडुपे सर्वसाधारण छोट्या कुटुंबाला पुरतील इतक्या मिरच्या वर्षभर पुरवू शकतात. जहाल मिरचीरसिकांना व मोठ्या कुटंबांना त्याच्या जिभेच्या आवडीप्रमाणे जास्त झाडे लावावी लागतील. :)

बाजारातून आणलेल्या एखाद्या चांगल्या मोठ्या, जून, लालभडल मिरचीला उन्हात कडकडीत वाळवून तिच्या बिया पेरता येतील. बिया मातीत एकदोन सेमी खोलवर पेरून माती ओली होईल इतपत (हवामानाप्रमाणे दिवसातून एक-दोनदा) पाणी देत रहावे. रोपे मोठी होईपर्यंत तरी माती पाणथळ होणार नाही याची काळजी घ्यावी. एकदा रोपे ५०-६० सेमी पेक्षा जास्त उंच झाली की दिवसातून एकदा पाणी देण्यापलिकडे इतर काही काळजी घ्यावी लागत नाही. एकवेळचे पाणी शक्यतो संध्याकाळी ५ वाजल्यानंतर द्यावे... हे तत्व उघड्यावरच्या सगळ्याच लागवडींना लागू आहे. कारण त्यामुळे, कुंडीतल्या/वाफ्यातल्या पाण्याचे बाष्पीभवन कमी होते व पाण्याचा वापर इष्टतम (optimum) होतो.

ही पहा आमची टेरेसवरच्या कुंडीतील मिरचीची लागवड. या दोन कुंड्यातली दोन झाडे आम्हाला पुरून उरेल इतक्या मिरच्या वर्षभर देतात.

lal mirchya

सुबोध खरे's picture

19 Aug 2017 - 6:37 pm | सुबोध खरे

लैच भारी फोटो आहे

स्रुजा's picture

4 Sep 2017 - 6:19 pm | स्रुजा

खत्तरनाक दिसतंय !! थँक्यु काका, एवढ्या तपशीलवार प्रतिसादासाठी - जरा उशीर च झाला तुम्हाला परत प्रतिसाद द्यायला, त्याबद्दल सॉरी :)

इरामयी's picture

5 Jul 2019 - 6:24 pm | इरामयी

सुपर्ब!!

कंजूस's picture

19 Aug 2017 - 9:01 pm | कंजूस

खफवरून-
पुदिना आणि लसूण

पुदिना:-
*एक प्लास्टिक ट्रे साधारण दोनअडिच इंच उंच, साताठ इंच लांबरुंद घेऊन त्यास तळाशी भोके न पाडता थोडा मातीचा थर भरा.
*एक पॅालिस्टर कापडाची पिशवी चार पाच इंच उंच आणि रुंद शिऊन त्यात चाळलेली माती आणि थोडे गांडूळखत भरा. ही पिशवी त्या ट्रेमधल्या मातीवर ठेवा. प्लास्टिक पिशवी भोके पाडून घेतली तरी चालेल.
*पुदिना आणल्यावर पाने काढून घेऊन काड्यांची वेटोळी /बांगड्या करून पिशवीतल्या मातीवर ठेवा. त्यावर थोडी माती पसरून पाणी द्या.जास्तीचं पाणी खालच्या ट्रेमधल्या मातीमध्ये मुरेल आणि पुढे बरेच तास ओलावा देईल. डास होत नाहीत. सतततच्या ओलाव्यावर पुदिना फोफावतो. गांडुळखताने पाने चांगली पोसतात. महिन्यात एक दोन चमचे टाका.
*ट्रेस दोय्रा बांधून टांगल्यास पुदिना स्वच्छ राहतो आणि लगेच वापरता येतो. खूप वाढल्यास लांब शेंडे कापून वाळवून ठेवता येतात. पुन्हा नवीन बहर येतो.
*इनडॅार प्लांटसारखाही बॅल्कनित राहतो कारण दोनतीन तासांचे ऊन पुरेसे आहे.
लसूण:-
दादर,माहीम,माटुंगा भागातले बरेच लोक ओली लसुण पात स्वयंपाकात वापरतात. जवळच असणाय्रा आगरबाजार परिसरात पुर्वी नारळाच्या बागा होत्या त्यात खाली ही लसुण पात लावत असत.
लसणाच्या छोट्या पाकळ्या मातीत टोचायच्या. अर्धी पाकळी मातीवर ठेवायची. माती दमट राहील इतकेच पाणी द्या. दहाबारा पाकळ्यांची बॅच पंधरा दिवसांच्या अंतराने पेरल्यास ओली पात मिळते.
पाकळीतले अन्न वापरून खाली मुळे आणि वरती चारपाच पाने आली की ती उपटून वापरायची.
( यास खाली लसूण येणार नाही. पाने बरीच आल्यावर त्यास फुलांचा गोंडा येतो व बी धरते. हे बी पुन्हा पेरल्यावर त्याला खाली लसूण येतो. असे हे कांद्यासारखे द्विमोसमी पीक आहे.)

मोदक's picture

19 Aug 2017 - 10:18 pm | मोदक

उपयुक्त धागा...

जमेल तशी भर घालतो आहेच.

पॅालिएस्टर कापडी पिशवीत पुदिना

संजय पाटिल's picture

20 Aug 2017 - 10:26 am | संजय पाटिल

बरीच उपयुक्त माहिती मिळाली... चला आता कामाला लागतो आणि बाल्कनी भरून टाकतो..

स्रुजा's picture

20 Aug 2017 - 6:00 pm | स्रुजा

खुप माहिती मिळतीये इथे. इतक्या तत्परतेने धागा काढला ते बरं झालं. मी पण म्हात्रे काकांनी सांगितल्याप्रमाणे मेथी लावली आहे आणि आता कंकाकांच्या खरडीनुसार पुदिना लावावा म्हणते.

मला मिरच्यांबद्दल एक प्रश्न आहे पण - लवकरच म्हणजे महिन्या भरात इथे तापमान कमी व्हायला सुरुवात होईल. बर्फाला वेळ आहे पण थंडीत म्हणजे १५ डीग्रीत वगैरे मिरच्या येतात का? मुळात आत्ता लावल्या मिरच्या तर मिरच्या यायला किती वेळ लागतो?

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Aug 2017 - 11:01 pm | डॉ सुहास म्हात्रे

मिरचीची रोपे कुंडीत घरात लावली तर घरातील तापमानात टिकून रहायला हरकत नसावी, असा अंदाज आहे. कुंडी स्वयंपाकघरात असल्यास अजून जास्त गरम हवा मिळेल :)

मिरचीच्या झाडाची फुले येण्यापूर्वीची वाढ महिन्यांत मोजावी लागते... हवामानाप्रमाणे कमी जास्त (एक ते तीन महिने). मात्र एकदा मिरच्या लागू लागल्या की भरपूर उजेड मिळाल्यास सतत मिरच्या मिळतात, असा अनुभव आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Aug 2017 - 11:12 pm | डॉ सुहास म्हात्रे

मिरचीसाठी वापरलेली पद्धत वापरून, पूर्ण पिकलेल्या टोमॅटोमधिल बी वापरून कुंडीत टोमॅटोची लागवड करता येते.

आज पोतंभर नवी माती आणली. सीडस मात्र होम डिपोमध्ये मिळाल्या नाहीत. आता ट्यूलिप्स लावण्यात अर्थ नाही म्हणून ते बल्ब्ज आणले नाहीत.
स्रुजा, मोगरा, मिरच्या, कढिपत्ता अशी सगळी रोपे आजूबाजूच्या लोकांकडे आहेत. उन्हाळा संपला की आधी गराजमध्ये, मग बेसमेंटमध्ये, त्यानंतर उबदार जागी कुंड्यांचा प्रवास होतो व सुकून गेल्यावरही तशीच ठेवतात. स्प्रिंग आला की पुन्हा बाहेर काढतात. हळूहळू पाने फुटतात. मला हे माहीत नव्हते. कढीपत्ता वाळल्यावर मी झाड टाकून दिले. तसे केले नसते तर बरे झाले असते असे वाटले.

स्वाती२ ताई यांच्याकडील झाडाला भरपूर मिरच्या येतात. त्यांना शेवटी झिपलॉक पिशवीत फ्रीझरमध्ये ठेवाव्या लागतात.
म्हात्रेकाका, मिरच्यांची लागवड आवडली.
कंकाका, पुदिन्याच्या काड्यांची वेटोळी लावताना मुळे नसली तरी चालेल ना? तशीही मला वेटोळी नाही करता येणार. उगीच चार बोटं इतक्याच उंचीच्या काड्या मिळतात. त्या तश्याच मातीत लावाव्या म्हणते.

आवडाबाई's picture

21 Aug 2017 - 11:21 am | आवडाबाई

मेथी लावून बघण्यात येईल, लवकरच. ती वाळू मिळणे सोपे आहे.
पण साधी तुळस येत नाहिये सध्या कुंडीत. मी खाली विटांचे तुकडे, नारळाचा काथ्या घालते आणि वर माती. ह्यात काही चुकते आहे का?
माती बदलून पहायची असेल तर नर्सरीमधे विकत मिळणारी चालेल का माती ?

कंजूस's picture

21 Aug 2017 - 8:20 pm | कंजूस

मी पुदिन्याची पिशवी ट्रेमधल्या मातीतून फोटोसाठी बाहेर काढली होती. काड्यांची वेटोळी केली नाही तर आडव्या मातीवर ठेवून थोड्या मातीने झाकल्या की काम झाले.

#तुळस -
ट्रेमधल्या मातीवर तुळशीची पिशवी ठेवा आणि प्लास्टिकची असल्यास तळाला भोके कापायला विसरू नका. तळातल्या मातीत मुळे पसरतात व तुळस मरत नाही. तीन तासांपेक्षा अधिक ऊन हवे. मंजिय्रा येऊ लागल्या की शेंडे खुडायचे म्हणजे आडव्या फांद्या येत राहतात व रोप डेरेदार गोल होते. ( कुंडीच्या तळाशी कपच्या, विटाचे तुकडे घालण्याची पद्धत वापरल्यास मुळे सुकतात. ही पद्धत गुलाब ,मोगरा यास उत्तम. त्यांना तळाशी ओल सोसत नाही.)

आवडाबाई's picture

22 Aug 2017 - 11:19 am | आवडाबाई

अशी गडबड झाली तर !! डेरेदार करायची आयडीया पण आवडली. (तीन तास डायरेक्ट उन्हाचे कठीण आहे. तरी) बघू प्रयत्न करून.

दिवसभर सावलीच असलेल्या बाल्कनीत काय लावता येतील ?

आवडाबाई's picture

6 Oct 2017 - 7:54 am | आवडाबाई

तुळस. २ आठवडे झाले. मूळ धरलंय छान.
आता कोथिंबीर !!

बाजारात भाजीवाल्याकडे एखादे पिकलेले कारले मिळाले तर त्याच्या बिया रुजतात. मोठ्या कुंडीतही वेल होतो. तसेच चवळी, काकडी शिराळ, घोसाळही कुंडीत येऊ शकत.

पालेभाजीही खुप सोपी आहे लावायला. बाजारातून पालक, माठ, मुळा, मेथी असे बी आणायचे. मोठा टब, टोपली म्हणजे जरा पसरट असतील अशी भांडी घेउन त्यात भुसभुशीत माती घालायची. मग त्यावर हवे असलेले बी विरळ पेरायचे हाताने थोडी माती पसरायची आणि रोज एक वेळा पाणी घालायचे.

वांगी, मिरच्या, टोमॅटो अशा भाज्याही कुंडीत चांगल्या येतात. शक्यतो कुंडी मोठी घ्यायची म्हणजे मुळांना पसरायला जागा चांगली मिळून भाजीचा पोत चांगला येतो. भाज्या लावायला जमीनीत जागा असेल तर उत्तमच.

लसूणाची एक एक पाकळी कुंडीत बोटबर अंतरावर लावायच्या. लावताना टोकदार बाजू असते ती वर लावायची. त्यातून लसुण पात येते. ती चटणी करायला व कांदेपात प्रमाणे भाजी करायला उपयोगी पडते.

आपल्या घरात बर्‍याच वेळा कांद्यांना मोड येतात. हे कांदे लावले की त्यांना पात येते. ती कांदेपात म्हणून वापरता येते. पण खाली नविन कांदे नाही येणार. कांदे येण्यासाठी बाजारात कांद्याच बी मिळत कलौंजी म्हणतात त्याला ते पेराव लागत.

पुदीन्याच्या बाजारातून आणलेल्या काड्या कुंडीत रोवल्यास अगदी सहज जगतात.

चहापातीचे मुळही कुंडीत लावल्यास घरची चहापात मिळेल.

बाजारात ओली हळद येते ती ही लावता येते. त्यामुळे घरची हळदीची पाने मिळतात. ती पातोळ्या करायला तसेच मोदक वाफवायला उपयोगी पडतात.

वडीच्या अळूच्या (काळा अळू) मुळ्या लावल्या की त्या हळू हळू पसरतात व घरच्या पानांची अळूवडी मिळेल.

बाळ शोपा पेरला की शेपूची भाजी मिळेल.

मुळ्यामधे दोन प्रकार असतात. पात मुळा आणि कांदेमुळा. ह्या दोघांचेही बी वेगळे असते. पात मुळ्याला कांदे धरत नाहीत. कांदेमुळ्याला मुळे लागतात.

बाजारातून आख्खा सुरण आणला तर त्याच्या वरच्या भागाला गोल चकती असते. ती जरा १ इंच जाडीची काढायची आणी लावायची त्यापासून सुरणाचे झाड येऊन खाली सुरणही येतो. पण हे एक ते दोन वर्ष ठेवावे लागते तेव्हा कंदाचा आकार वाढेल. कधी कधी सुरणाला चिकटून छोटे सुरण लागलेले असतात. हे छोटे सुरणही लावता येतात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Aug 2017 - 12:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धागा माहितीपूर्ण आहे.

-दिलीप बिरुटे
(वाचक)

रेवती's picture

21 Aug 2017 - 6:20 pm | रेवती

ओक्के जागु.
पुदिन्याच्या काड्या लावेन.

थँक यु रेवाक्का, लावुन बघते आणि मुख्य म्हणजे टाकुन देणार नाही थंडीत, मला तेच कळायचं नाही की बर्फात काय करायचं.

सही रे सई's picture

22 Aug 2017 - 2:02 am | सही रे सई

या वर्षी जरा आधीपासून ठरवून काही भाज्या लावण्याच्या दृष्टीने नियोजन केलं होत. त्याप्रमाणे साधारण बर्फ संपून थोडं उबदार वातावरण यायला लागल्यावर छोट्या छोट्या कुंड्यांमधे/सीड स्टार्टर मधे घरी वापरायला आणलेल्या टोमॅटो च्या आतील बिया गरासकट एका कुंडीत एक पेर खोल मातीत टाकून रोज त्याला पाणी घातलं. काही दिवसात छोटे कोंब दिसू लागले.
थोडी रोप मोठ्ठी झाल्यावर त्यातली फक्त सशक्त रोप निवडून मोठ्ठ्या कुंडीत हलवली. आता त्या झाडांना फुल येऊन ४-५ टोमॅटो पण यायला लागले आहेत.
तोम्यतो वाढवतानाच्या काही टीपा इथे दिल्या आहेत - http://www.smallscalegardening.com/2014/07/15/pruning-tomato-plants/

पुदिन्याची एक जुडी अशीच एप्रिल च्या सुरुवातीला आणून त्याची सगळी पान खुडून नुसत्या काड्या मातीत खोचून ठेवल्या तर भरगच्च पुदिना साधारण दीड दोन महिन्यापासून मिळायला लागला.

धने घेऊन एक एक बी चे दोन भाग करून ते पण मातीत पेरले. छोटी छोटी नाजुकशी कोथिंबीर आलेली वापरायला फार छान समाधान वाटलं.

इथल्या इंडिअन ग्रोसरी स्टोर मधे अळूकुडी (उपासाला खातात ते कंद) आणून नुसतेच काही दिवस ठेवले. त्याला कोंब आल्यावर मातीत रोवून (कोंब आलेली बाजू वर) रोज भरपूर पाणी दिलं. मागच्याच महिन्यात ७-८ पानांची अळूची पातळ भाजी खाताना खूप छान वाटल. अजूनही पुन्हा काही पान त्याच कंदाला येत आहेत.

पूर्वी पुण्यात असताना, नवीन आलं बाजारात यायचं ज्याला गुलाबीसर कोंब असायचे (कुठल्यातरी विशिष्ट महिन्यात ते यायचं पण आत्ता आठवत नाहीये) ते आणून जमिनीत अथवा कुंडीत पुरल कि काही महिन्यात त्याला वरती पात यायची. ती पात वर्षानंतर वाळून जायला लागली कि खाली जमिनीत दुप्पट तिप्पट आलं तयार झालेलं असायचं त्यातलं थोड आल तसचं जमिनीत ठेवून बाकीच काढून घ्यायचे जस लागेल तस. अस दोन-तीन वर्ष छान घरच आल मिळालं.

लसुणीच्या पाकळ्या पण वरती एक दोघांनी सांगितल्या प्रमाणे लावता येतात. त्याला येणारी पात, भाजी आमटी मध्ये मस्त लागते.
या लसणीचा आणखी एक उपयोग म्हणजे प्रत्येक कुंडी मधे एक दोन लसूण पाकळ्या खोवल्या कि त्या त्या कुंडीत लावलेल्या इतर रोपांवर पडणारे विविध रोग/कीड आटोक्यात राहते.

रुपी's picture

22 Aug 2017 - 5:07 am | रुपी

मस्त धागा.
मेथीबद्दल छान माहिती मिळाली, पण आता पुढच्या वर्षी प्रयोग करेन. सध्या जे आहे त्यातच वेळ जातोय.
पुदिन्यावर कीड पडलीये, त्यासाठी लसूण पाकळीचा प्रयोग करुन बघते. लसणीची पात बारीक चिरुन फ्रेंच फ्राइजवर घातलेली एकदा खाल्ली होती. थंडी/पाऊस आणि त्यात ही पात घातलेले गरमगरम फ्राइज मस्त लागतात!

आता थोड घरगूतीच झाडांच्या पौष्टीक खाद्या विषयी.

आपण कडधान्य भिजत घालतो त्याचे पाणी टाकून न देता ते कुंड्यांमधे घाला.
कंपोस्ट खत करायला वेळ मिळत नसेल तर घरातील भाजीपाल्याचा ओला कचरा कुंडीतील थोडी माती काढुन त्यात टाका आणि परत वरून थोडी माती पसरवा.
मासे, मटण धुतलेले पाणीही एक उत्तम खत असते. तेही झाडांना घाला.

झाडाला किड लागली की मिरच्या, लसूण, आल, हिंग, हळद यांची पेस्ट करा. ती भरपूर पाण्यात घालून ते झाडांवर फवारा. हे उत्तम किटक नाशक आहे.

आज प्राजक्ताची तीन फुले लागली होती.

.

आणि एक घोसावळे काढले (यालाच बहुदा गिल्का असे म्हणतात)

.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Aug 2017 - 11:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं घोसाळे आहे... याची भजी यम्मी-यम्मी होतात. बटाट्यासारखेच मध्यम पातळ काप नेहमीच्याच यशस्वी बॅटरमध्ये, नेहमीच्याच यशस्वी पद्धतीने, तळायचे आणि आवडीच्या चटणीबरोबर किंवा तसेच गट्टम करायचे !

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Aug 2017 - 11:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

जाल चाळताना, कुंडीत फळझाडे वाढविण्याची, ही नवीन माहिती मिळाली...

https://nurserylive.com/plantscaping-in-india/top-5-plants-pack/top-5-fr...

मनात असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळत आहेत, फक्त एक प्रश्न आहे, विचंवाचे बिराडं असलेल्या लोकांना देखील असे प्रयोग सहज करणे शक्य आहे का? म्हणजे घर बदललं तर सहज शिफ़्ट करता येतील का या कुंड्या इत्यादी ?

कंजूस's picture

29 Aug 2017 - 6:47 am | कंजूस

कापडी पिशव्या वापरा.

स्मिता.'s picture

29 Aug 2017 - 3:19 am | स्मिता.

यावर्षी वसंत तसा लवकर सुरू झाला म्हणून मार्च ते जुलै दरम्यान मेथी आणि शेपूचे अने अयशस्वी प्रयोग केले. मेथी कधी उगवलीच नाही आणि शेपू पार जून झाला तरी केव्हा काढायचा कळलंच नाही.

आज हा धागा वाचून मेथी न उगवण्याचं कारण समजलं. मी मेथीदाणे पसरून त्यावर मस्तपैकी एक-दोन इंच मातीचा थर देत होते :(

आज थोडे आश्चर्य वाटले. डॉ. म्हात्रे यांनी दिलेल्या फोटोंमध्ये बाळमेथीची पाने लंबगोलाकार आहेत. बाजारात अशा लहान लहान जुड्या आधी पाहिल्याही आहेत पण मी लावलेली मेथी काढायची वेळ झाली म्हणून पाहिले तर मोठ्या मेथीसारखी पाने आली आहेत पण रोपट्याची उंची तीनेक इंच आहे. एकदम मोठी मेथी कशी काय आली? लहानपण दिसलेच नाही. हे म्हणजे 'बाबूजी पैदा हुवे है' सारखे झाले. आता उद्या काढावी म्हणते.

पिलीयन रायडर's picture

4 Sep 2017 - 7:32 am | पिलीयन रायडर

प्रगती:-

मेथी
मेथी

मिरची
मिरची

लसूण
लसूण

मध्ये मैत्रिणीचा लहान मुलगा येऊन गेला. त्याने मेथ्या फेकल्याने नक्की कुठे काय उगवलंय तेच कळत नाहीये.

मोदक's picture

4 Sep 2017 - 9:17 am | मोदक

भारी..

माझ्याकडे पण थोडे थोडे प्रकार उगवून आले आहेत. सवडेने फोटो टाकेन

लसूण मस्त फुटलाय.

पाती आल्यावर थोडी थोडी राख (लाकूड जाळून) टाकत राव्हा. काळोखी येईल आणि लसणाचा कांदा चांगला भरेल.

पिलीयन रायडर's picture

4 Sep 2017 - 6:13 pm | पिलीयन रायडर

हो तो लसूण फायनली अचानक रात्रीतून आला!!

इथे लाकूड जाळून राख मिळवणं अवघड आहे. पण जुगाड होतोय का बघते.

आणि हो, खरंच प्रगतीच झाल्यासारखं वाटतंय. :)

स्रुजा's picture

4 Sep 2017 - 6:17 pm | स्रुजा

भारी दिसतंय गं. मी फक्त मेथी लावलीये - अजुन एवढी नाही वाढली. फोटो टाकेन आठवड्याभरात .. हुरुप आलाय तुझे फोटो बघुन.

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Sep 2017 - 12:26 am | डॉ सुहास म्हात्रे

टाळ्या ! प्रयोग यशस्वी होत आहेत. थोड्या अनुभवाने आत्मविश्वास आला की सगळे हातचा मळ वाटू लागेल.

मेथीसाठी वाळू घेतात पिकवणारे कारण त्यांना ती भराभर काढून मुळं साफ करायला सोपे पडते. शेवटी आपण मुळांच्या वरचा भाग दांडे आणि पाने घेतो.

१) घरी स्वत:साठी लावली असेल तर सरळ वरच्यावर कात्रीने कापून घ्यावी. मुळे,माती धुण्याचा प्रश्न येत नाही.

२) ट्रेमध्ये गच्च पेरण्याऐवजी रेघा मारून ओळीत पेरावी.

३) कोणत्याही भाजी आमटीसाठी चवम्हणूनच हवी असेल तर दोनदोन ओळीत दाणे पेरल्यावर आठदहादिवसांनी पुढच्या दोनोळी याप्रमाणेपेरल्यास आता एवढ्या सगळ्या मेथीचं काय करायचं हा प्रश्न पडत नाही.

४) थोडक्यात वाळू हवीच असं नाही आणि प्रमाण कमीअधिक तसेच अंतराने केल्यास काम होते.
-मेथीपुराण समाप्त.

मोदक's picture

4 Sep 2017 - 2:17 pm | मोदक

एक मदत हवी आहे.

गोमय, गोमुत्र, डाळीचे पीठ, गुळ आणि माती यांच्या मिश्रणातून जीवामृत तयार केले आहे. दोनदा असे झाले आहे की जीवामृत केले की दुसर्‍याच दिवशी ती प्लॅस्टीकची बादली फुटते.

याचे कारण काय असावे..? गॅस फॉर्मेशन वगैरे होत असले तरी गॅस जायला भरपूर जागा आहे कारण बादली घट्ट झाकलेली नाही. फक्त त्यावर पोते ठेवले आहे.

उष्णतेमुळे फुटत असावी. त्यासाठी बादली उघडी ठेवायला हवी किंवा लोखंडी पिंप वगैरे वापरायला हवे असे मला वाटते.

जीवामृत हा प्रकार काही नवीन शोध केल्याचा दावा करतात त्यात नवीन काही नाही.

आता तुम्ही गूळ,डाळीचं पीठ हे विघटन न करताच दडपले तर त्याचं रसायन होताना मिथेन,कार्बन डाय निघेल आणि तीन महिन्यांनी कुजल्यावरच झाडांना उपलब्ध होईल. डाळीतला तीस टक्के नत्र. गुळात फक्त कार्बन असतो.

मोदक's picture

4 Sep 2017 - 5:26 pm | मोदक

ओके.

मी बागेतल्या कुंड्यांसाठी वापरले तर कांही हरकत नाही ना..?

मी लोखंडी मोठ्या पेंटच्या डब्यात केले होते. प्लास्टीकमधे असा प्रॉब्लेम होतो हे नव्हत माहीत.

मी लोखंडी मोठ्या पेंटच्या डब्यात केले होते. प्लास्टीकमधे असा प्रॉब्लेम होतो हे नव्हत माहीत.

पुंबा's picture

4 Sep 2017 - 4:56 pm | पुंबा

अति युजफूल धागा..

रेवती's picture

4 Sep 2017 - 6:22 pm | रेवती

छान चाललाय धागा.
धन्यवाद कंकाका.
पिरा, चांगली प्रगती आहे.

शंभर रु किलोच्या डाळीच्या पिठाच्या किंमतीत बारा किलो शेणखत मिळेल. ते मातीचा पोत सुधारेलच शिवाय जो काही ०.५ टक्के नत्र विखुरलेला मिळतो तो मुळांना सहन होतो.
व्हॅल्युफर मनी पाहावे.
पूर्ण कुजल्याशिवाय कुंडीतल्या फुलझाडांना खत देऊ नका. पंधरा दिवसांनंतर मुठभरपेक्षा जास्ती नको

पिलीयन रायडर's picture

4 Sep 2017 - 7:51 pm | पिलीयन रायडर

काका, ह्या विषयावर अजून लिहा ना. किंवा पुढचा हिरवाईचा धागा तुम्हीच काढा आणि त्यात ही महिती द्या. हे काहीच माहिती नाहीये. फार उपयोगी होईल सगळयांना.

उत्तम माहिती. ही व आणखी माहिती एका धाग्यात मिळाली तर फार उपयोगी होईल.

मागे एकदा बागकाम एक छंद-( http://www.misalpav.com/node/30818 ) धागा काढलेला त्यात सगळ्यांनी फोटो दिले होतेच. परंतू आता तो धागा फारच मोठा झाला.

पुन्हा नवीन माहिती लिहिनच.

बॅल्कनित झाडे लावायची असतील तर तीनचार तास उन यावेच लागते. साहजिकच उत्तर/दक्षिणेकडे पाहणारी बॅल्कनी असेल तर सहा महिने सरळ सावली येते.

बाहेर अंगणातली बाग असेल तर मोठी झाडे लावताना विचार करावा लागतो. सावली पडते खाली.

ओपन टेरेस असेल तर खालच्या मजल्यावर गळणार का/ अचानक सर्वजण बाहेरगावी जाऊ शकत नाहीत. खूप झाडे ठेवताना विचार करावा लागतो. मातीच्या कुंड्यांतले पाणी उन्हाळ्यात लवकर सुकते,प्लास्टिकच्या तडकतात कारण ऊन भरपूर असते. व्याप फार असतो.

सोसायटीच्या मोकळ्याजागेत { आपली हौस भागवण्यासाठी} झाडे लावू नये. मनस्ताप फक्त होतो. शहरातले,सोसायटीतले डास आपण लावलेल्या झाडांमुळेच होतात हा भांडणाचा विषय होतो. शिवाय यांनीच सगळी जागा बळकावली हा आरोपसुद्धा होतो.

खरच! डासांचा आणि झाडांचा काय संबंध काही कळत नाही. पण झाडांमुळे डास होतात ही हटकून सगळ्यांची समजूत असते.

रेवती's picture

4 Sep 2017 - 9:24 pm | रेवती

आज नवीन पॉटींग मिक्स कुंड्यांमध्ये घालून धणे पेरलेत. आता बर्‍या हवेचे फारसे दिवस हाती नाहीत म्हणून ही मिनी शेती चालूए.

गांडूळखत कसे तयार करावे किंवा गांडूळे कशी पाळावीत / वाढवावीत..?

याचे माहितीपट डीडी नॅशनल अथवा मध्य प्रदेश उत्तर प्रदेश सह्याद्री इत्यादी चानेल्सवर असतात मोदकराव. परंतू हे लोक कार्यक्रम रूपरेषा देत नसल्याने हुकतात.
तरी थोडक्यात-
तुमच्याकडे गोठा असेल अथवा ओला कचरा जमा होत असेल तर शक्य आहे. एक दहाएक किलो शेण,कचरा एका ठिकाणी टाकून त्यावर गांडुळं सोडायची. माल अगदी सुका होणारनाही अथवा पाण्याने पचपचीत ओला होणार नाही इतकेच पाणी शिंपडायचे.वरती ओले गोणपाट आणि वरती झावळ्यांची शेड ऊन लागू नये म्हणून.
आणखी दोनतीन दिवसांनतरचा मालयाजुन्या मालावर न टाकता त्याला चिकटूनच पुढे टाकावा. अगोदरच्या शेणाला खाऊन झाले की गांडुळे पुढे सरकतात तेव्हा ते खत झालेले असते. विकायचे असल्यास ते चाळून विकायचे अथवा तसेच झाडाला विशेषत: हर्बजसाठी उत्तम. जे तळाला पाणी वाहते तेही स्प्रेसाठी वापरू शकतो. टेरेससाठी ओलाकचय्रावर प्रयोग करता येईल. बॅच कराव्या आणि योग्यवेळी गांडुळं नव्या ओल्या कचय्रावर सोडून झालेले खत वापरायला घ्यावे. स्वयंपाकघरातील बाहेरपडणाय्रा कचय्राचे नीट तुकडे करून थोडी माती मिसळून ओलसर ठेवा. विकण्यासाठीच्या खतात माती देता येत नाही. घरच्यासाठी चालेल. फळझाडांना कंपोस्टच लागते. टोमॅटो,मिरची,झेंडू,शेवंती आणि मोगरा यांना शेणखत. चमेली, सायली , जाइ ,जुई ,पानवेल यांना खत नको - नवीन डोंगरातील उन खाल्लेली माती हवी

मोदक's picture

5 Sep 2017 - 12:16 pm | मोदक

प्रयत्न करतो.

वेलवर्गिय भाज्या दुधी ,कारली वगैरे-
हे वेल ओला कचरा थेट पचवू शकतात. कुजताना निर्माण होणारी गरमी चालते. एका प्लास्टिक पिशवीला (२ किलोची) तळाला भोके पाडून ओला कचरा अधिक माती भरा. ही पिशवी उलटी वेलापासून पाचसहा इंच दूर मातीवरच दाबा. वरतीच राहील. वेलाची मुळे यातलं खत खातात. वास येत नाही. थोडेसेच पाणी तळाच्या वर असलेल्या भोकांतून सोडून ओले ठेवा. पिशवीच्या तोंडाच्या भागाला थोडी माती लावा. कचरा कुजताकुजताच वापरला जातो.
ही पद्धत घेवडा,चवळी,वाल यांनाही चालेल.

पिलीयन रायडर's picture

6 Sep 2017 - 3:47 am | पिलीयन रायडर

फारच चांगली माहिती देताय काका.

मी आज मेथी काढली आणि वरणात टाकली. ताज्या मेथीचा घरभर वास सुटला होता. आता पुदिना लावावा म्हणतेय. इथे फोटो टाकेनच.

लसणीची पात भराभर वाढतेय. ती नक्की किती वाढू शकते हे शोधलं तर अशा इमेजेस मिळाल्या. इतकी वाढ लहान कुंदीत होईल ना?

lasun

पिलीयन रायडर's picture

6 Sep 2017 - 3:48 am | पिलीयन रायडर

आज अशा भल्या मोठ्या इमेजेस का पडताएत काय माहिती. जरा मापात बसवा ना कुणी तरी!

अतिशय छान धागा. चारच महिने झाले बाग बनवून. फोटो पाठवतो.

सही रे सई's picture

7 Sep 2017 - 12:15 am | सही रे सई

झाडावर कीड पडली तर काय काय उपाय करावे या बद्दल पण तज्ञांनी माहिती द्या.

माझ्या कडच्या झेंडूच्या झाडावर पांढरी बुर्शी टाईप काहीतरी रोग आलेला दिसतोय. काय करावे?

ऊन कमी पडते. सावलीत वाढते ही कीड. शिवाय दमटपणाही वाढला आहे.
एकदोन झाडे असतील तर खळ ( मैद्याची पातळ कांजी ) लावा.

इथे मोबाईलवरून फोटो टाकता येतील का?