श्रीगणेश लेखमाला : लेख क्रमांक ८ : दिव्यत्वाची प्रचिती

बाजीप्रभू's picture
बाजीप्रभू in लेखमाला
2 Sep 2017 - 12:13 pm

प्रश्न : सगळे डॉक्टर हरामखोर असतात का?
उत्तर : "होय"
प्रश्न : सगळे डॉक्टर रुग्णांचं रक्त पितात का?
उत्तर : "अलबत"
प्रश्न : डॉक्टर गुजराथी असल्यास?
उत्तर : तर तो महाहरामखोर असेल.
प्रश्न : हॉस्पिटल जर बनियाचं आणि डॉक्टर मारवाडी असल्यास?
उत्तर : लांडग्यांच्या कळपात मारलेली उडी, पायावर कुऱ्हाड किंवा कुऱ्हाडीवर पाय वगैरे वगैरे.

२०१५ सालच्या १ ऑगस्टपूर्वीपर्यंत एखाद्या ‘रॅपिड फायर’मध्ये मला जर कोणी वरील प्रश्न विचारले असते, तर हीच उत्तरं मी तत्काळ दिली असती. असं म्हणतात आजकाल चांगला डॉक्टर मिळायचा असेल तर पदरी भरपूर पुण्य असावं लागतं, आणि माझं तर देव दरबारात साधं करंट अकाउंटदेखील नव्हतं. नाही म्हणायला खात्यात दोन पुण्यकामं जमा होती, ती म्हणजे मी बऱ्याच बाईकवाल्यांना आणि स्कूटरवाल्यांना दिवसा त्यांचे हेडलाईट चालू आहे, किंवा स्टॅन्ड काढलेला नाहीये असं हातांच्या खुणेने सांगितलं होतं आणि एकदा एका वेडसर अर्धनग्न बाईला अंगावरचा टी-शर्ट काढून दिला होता. बस्स! इतकीच काय ती पुण्याची शिदोरी, बाकी सगळीकडे लबाडी.

ब्रह्मांड आठवेल असे बरेच प्रसंग स्वतःवर येऊन गेले, पण कधी शरण जाऊन हात जोडले नव्हते. डॉक्टरांसमोर तर नाहीच नाही. 'धूर्त कोल्हा' असं एका शब्दात जरी माझं वर्णन करता येत असलं. तरी एक गोष्ट मी मनापासून करत होतो, ते म्हणजे ‘बायकोवर प्रेम’ - अगदी निस्सीम. ‘चांगल्या झाडावर माकडं चढतात’ या एका वाक्यात मित्राने मी किती नशीबवान आहे याची जाणीव करून दिली होती, मीही ती जाणीव नेहमीच ठेवली. लग्नानंतर सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. उत्तम वैवाहिक जीवन, मूल, चांगली नोकरी, दर महिन्याला बँकेत जमा होणारा पगार, त्यातून बुक केलेला फ्लॅट, त्याचे हप्ते भरणं, वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी त्या कवितेप्रमाणे, म्हणजे ‘सोलोमन ग्रँडी बॉर्न ऑन मंडे, बाप्तिस्ड ऑन ट्यूसडे ……… आणि डाईड ऑन सनडे’प्रमाणे होत होत्या.

सुखनैव चाललेल्या आयुष्याची झिंगही मला दिवसेंदिवस चढत होती. मात्र १ ऑगस्टचं ते अखेरचं वळण आलं आणि माझं आयुष्य पूर्णपणे बदललं. त्याला शरण जाण्याशिवाय माझ्या हातात कुठलाच पर्याय नव्हता. नियतीने मला धडा शिकवण्यासाठी नेमकी माझ्या बायकोचीच निवड केली होती. सगळा माज, घमेंड, गर्व, आत्मविश्वास गळून पाडायला लावणारा तो दिवस, ती संध्याकाळ मला आजही जशीच्या तशी आठवतेय.

ती - अहो, एक ऐका ना? उद्या तुमच्या शाळेच्या री-युनियनमध्ये तुमचा स्वित्झर्लंडचा किस्सा सांगा.
मी - थांब गं, जरा वाचू दे! पण बोल तू, ऐकतोय मी. कोणता किस्सा?
ती - तो नाही का? तुम्ही तुमच्या स्विस कलीगला सांगत होतात की शाळेत ‘थर्ड डिग्री’ची ट्रीटमेंट खूप मिळालीय म्हणून... ३ डिग्रीपर्यंत तुम्ही लोकरीचे कपडे घालत नाही तो.
मी - अच्छा, तो होय!… अगं, पण मला बोलायला मिळेल तर ना? असं म्हणत बायकोचं म्हणणं मी उडवून लावलं, त्या वेळी मी तिच्या MRI रिपोर्टचा शेवटचा शब्द वाचत होतो – ‘ग्लिओब्लास्टोमा (हाय ग्रेड)’ अर्थात ‘ब्रेन ट्यूमर’.

फोर्टिसचे रेडिऑलॉजिस्ट डॉ. रजत भार्गवांच्या त्या टीचभर रिपोर्टची फडफड मला येणाऱ्या वादळाची चाहूल देत होती. नियतीच्या ह्या अनपेक्षित फटकाऱ्याने मी पार ढेपाळलो होतो. रिपोर्टच्या पलीकडल्या स्वतःच्या विश्वात असलेल्या पत्नीला कोणत्या शब्दात सांगायचं ह्याची जुळवाजुळव करत स्वतःलादेखील सावरत होतो.

अलीकडे तिचं डोकं खूप दुखायचं. त्यातच एक दिवस तिन्हीसांजेला सोफ्यावरून उठताना उजव्या डोळ्याची व्हिजन ब्लर झाली, म्हणून डॉ. अनिताचा मित्र डॉ. अमोल ननावरेकडे ती काही दिवसांपूर्वी गेली होती. तिच्या एकूण तक्रारीचा धागा पकडत त्यांनी MRI करायचा सल्ला दिला, म्हणून हे मेंदूत वाढत चाललेलं बांडगुळ लक्षात तरी आलं.

“मी परवा थायलंडला जात नाहीये. तिकीट वाढवतोय. आपण सोमवारी हॉस्पिटलला जाऊ या. मी स्वतः येतो तुझ्याबरोबर” इतकंच सांगून बायकोची बोळवण करून दुसऱ्या रूममध्ये गेलो. खूप सारी फोनाफोनी, गुगल आणि डॉक्टर मित्रांच्या सल्ल्यानंतर कोकिलाबेन धीरूभाई अंबानीचे न्यूरोसर्जन डॉ. अभयकुमार यांचं नाव पुढे आलं.

न्यूरोसर्जन डॉ. अभयकुमार म्हणजे एक अतिशय उमदं व्यक्तिमत्त्व! पावणेसहा फुटांची उंची, उत्तम देहयष्टी असलेलं एक आकर्षक व्यक्तिमत्त्व. पाच हजारांवर यशस्वी शस्त्रक्रिया नावावर असलेले हे डॉक्टर कमालीचे नम्र आहेत. ओपीडी कॅन्सल झाल्यामुळे ओटीमध्ये मला एकट्यालाच बोलावून MRIमधून समजलेल्या जीवघेण्या आजाराची कल्पना दिली. माझ्या पत्नीचं आयुष्य कसं धोक्यात आहे, हे त्यांच्या साउथ इंडियन हिंदीमध्ये ऐकत असताना माझ्या हृदयाची धडधड टिपेला पोहोचली होती. एखाद्या सिद्धहस्त ज्योतिषाप्रमाणे जन्मकुंडली मांडून तिच्या आयुष्यातील अशुभ योग सांगताना डॉ. अभयकुमारांच्या आवाजातही कंप जाणवत होता. कधी साधी आजारीही न पडलेल्या माझ्या बायकोची मेडिकल हिस्ट्री आणि रिपोर्ट पाहताना नकळत म्हणाले "पुअर गर्ल, शी इज इन ट्रबल, इजंट शी? आय थिंक, शी इज नॉट लाइकली टू मेक इट, आय ऍम अफ्रेड शी विल सर्व्हाइव्ह ओन्ली ७-८ मंथ्स".... आपल्या सहचारिणीचं डेथ सेंस्टेन्स ऐकताना माझ्या पोटात खड्डा पडल्यासारखं झालं होतं.

सेकंड ओपिनियनही घेऊन झालं. सर्जरीशिवाय पर्याय नव्हता. कॅन्सर चौथ्या ग्रेडचा असेल हे डॉक्टरांना कन्फर्म होतं, पण बायोप्सी रिपोर्ट आल्याशिवाय पेशंटला सांगायचं नाही, ह्यावर आम्हा दोघांचं एकमत झालं.

‘नाही उत्तर देता येत नियतीच्या गणिताला
बुद्धाच्याही डोळा अंती शून्याचाच थेंब आला’

पण मला न कोलमडता पत्नीच्या प्रश्नांना सामोरं जायचं होतं. महाभारतात अश्वत्थामाच्या मृत्यूची बातमी आल्यावर सत्यवचनी धर्मराजाला द्रोणाचार्य "खरं काय ते सांग?" असं विचारतात, तेव्हा धर्मराजावरसुद्धा खोटं बोलण्याची वेळ आली होती. खरं माहीत असूनही "नरो वा कुंजरो वा" असं खोटं म्हणून धर्मराज शिताफीने निसटले होते. धर्मराजावर जर ही वेळ येऊ शकते, तर माझी आणि डॉक्टरांची काय कथा. पण माझ्या खोट्याचं खरंखोटं करणं खूपच सोपं असतं. बायकोने ते पकडलं नसतं तर नवलच... सर्जरी, केमो, रेडिएशन वगैरे ऐकून ती पार हादरून गेली होती. तिचं त्या दिवशीचं हमसून हमसून रडणं आठवलं की आजही काळजात चर्र होत. डॉ. अभयकुमार १५ दिवस सुट्टीवर होते, म्हणून मग २८ ऑगस्टला ऑपेरेशन करायचं ठरलं. मीही मधल्या वेळेत थायलंडला ऑफिसची कामं उरकून यायचं ठरलं.

ऑपरेशन! मग ते कोणत्याही पातळीचं वा प्रकारचं असो, त्याविषयी सर्वसामान्य काहीसा दूरच राहू इच्छितो. माझी पत्नीही त्याला अपवाद नव्हती, म्हणून मग समांतर चिकित्सा पद्धतीचा आढावा घ्यायला सुरुवात केली. ट्यूमर आणि कॅन्सर यासारख्या आजारावर होमिओपॅथीत आणि आयुर्वेदात उत्तर नाहीये, हे माझं मत होतं. मुळात बारा महिने आधुनिक वैद्यकशास्त्राच्या दुष्परिणामावर टीका करून आपली रेषा मोठी करण्यासाठी दुसऱ्याची रेषा लहान करून दाखवण्याचा होमिओपॅथीमधील कोतेपणा मला नेहमीच डाचत होता. दुसरीकडे स्वदेशी आयुर्वेदात ऑलमोस्ट झीरो R&D असलेले आणि तीच ती जुनी वाग्भट/चरक कवटाळून बसलेले माझे काही आयुर्वेदिक डॉक्टर मित्र, ऍलोपथी प्रॅक्टिस करण्याची कोर्टातून परवानगी आणतात हा विरोधाभास मला आयुर्वेदही जवळ करू देत नव्हता. पण म्हणतात ना, माणूस संकटात असला की त्याची सारासार विचार करण्याची क्षमता संपते. “आमच्या औषधाने कॅन्सर १०१ टक्के बरा होतो मिस्टर!! आहात कुठे.. अहो, काविळच्या पेशंटला तर आम्ही इकडे औषध घ्या आणि तिकडे वडापाव खा, काही होणार नाही, इतकी इफेक्टिव औषधं आहेत आमची” असं छातीठोकपणे सांगणाऱ्या होमिओपॅथी डॉक्टराकडे ४० हजार फुकट घालवून झाले. माझा आधीच विरोध होता, पण दुसरे काही प्रयत्न केले नाही ह्याचं दूषण लागू नये म्हणून पत्नीच्या समाधानासाठी त्यावर पाणी सोडायची माझी तयारी होती. तो प्लासेबो इफेक्ट फार काळ टिकला नाही. २२ तारखेला तिची तब्बेत खूपच खालावली... काळ आला होता!! पण तिचा भाऊ 'किरण' आधी पोहोचला. वेळेवर अंबानी हॉस्पिटलमध्ये नेलं आणि ती अधू होता होता वाचली.

ऑपरेशनसाठी आता डॉ.अभयकुमारांची वाट बघण्याएवढा वेळ नव्हता. त्यांनीच न्यूरोसर्जन डॉ. राजन शहांकडून ऑपरेट करून घायचा सल्ला दिला. "डोंट वरी सर! शी इज गोइंग टू बी इन द बेस्ट हँड्स. अरे, सेलिब्रिटी स्पेशिअली रेकमेंड करतात त्यांना. डोंट वेट फॉर मी. गेट इट डन बाय राजन". आता बनियाच्या हॉस्पिटलमध्ये मारवाडी डॉक्टराशी माझा संबंध येणार होता. फक्त डिपॉझिट म्हणून २ लाख भरून झाले होते. पुढे आणखी किती लागतील काहीच अंदाज येत नव्हता. पण इथपासून पुढे एकेक गैरसमज, नकारात्मक स्टीरिओटाईप गळून पडायला लागले.

डॉ. राजन शहा हे एक मध्यम उंचीचे, बहुतेक साठी उलटलेले, किरकोळ प्रकृती असलेले डॉक्टर नुकतेच कोकिलाबेनमध्ये जॉईन झाले होते. मितभाषी पण स्पष्टवक्ते असलेले ते मला पहिल्या दहा मिनिटांच्या संभाषणातच आवडले होते. बायकोच्या सगळ्या प्रश्नांना त्यांनी तांत्रिक व शास्त्रीय भाषेत उत्तरं दिली. माझ्यासारख्या सर्वसामान्यांना जास्त काही समजत नसलं, तरी अशा एका डॉक्टराच्या हाती आपला पेशंट दिला आहे की ज्याच्या कर्तृत्वामुळे पेशंट धडधाकट होऊनच घरी परतेल याचा विश्वास वाटतो, तो विश्वास डॉ. राजन शहांबद्दल वाटत होता. पत्नीच्याही चेहऱ्यावर खूप दिवसांनी अगदी हलकी अशी प्रसन्नतेची झलक दिसत होती.

आता पुढची पायरी ‘ऑपरेशन’ होती, पण तत्पूर्वी रुग्णाला मृत्यूपर्यंत पोहोचू न देता झोप व मृत्यू यांच्या मधली जागा अचूक साधणाऱ्या भूलतज्ज्ञाची भेट अजून बाकी होती. मनावरचं शस्त्रक्रियेबद्दलचं दडपण दूर करत सुसंवाद साधत शांत स्वभावाच्या अॅनेस्थेशिऑलॉजिस्ट डॉ. चिन्मय भावेंनी कन्सेंट फॉर्मही तितक्याच शांतपणे समजावून भरून घेतला. अपेक्षेप्रमाणे ऑपरेशनपूर्वी पत्नीला जाणिवेतून नेणिवेत नेणारा डॉ. भावेंचा डोस कामी आला. सर्जरी करणाऱ्या डॉक्टरांना जितका दुवा दिला जावा, तितकाच ते ऑपरेशन सुरू होण्यापूर्वी आणि ते संपेपर्यंत एका ठिकाणी शांतपणे बसणाऱ्या भूलतज्ज्ञालादेखील का द्यावा, हे त्या दिवशी कळलं. अज्ञानाने आपण आंतरजालावर डॉक्टरांची किती हुर्यो उडवतो, हे आठवून स्वतःचीच लाज वाटली.

२६ तारखेला सकाळी डॉ. राजन शहांनी ऑपरेशनपूर्वी मला ओटीमध्ये बोलावलं. सगळ्या अशुभ शक्यतांची उजळणी झाली. मी कधी नव्हे ती उपासनेची माळ हातात धरली होती. निश्चल पडलेल्या पत्नीकडे पाहून भर ओटीमध्ये डॉक्टर शहांच्या पाया पडलो. “डॉक्टर, देवावर माझा विश्वास नाही, पण तुमच्यावर आहे. कसंही करून हिला वाचवा” म्हणत डबडबलेल्या डोळ्यांनी डॉक्टरांना हात जोडले. ‘कोणाहीपुढे हात जोडणार नाही’च्या वल्गना करणारा मी त्या वेळी पुरता दीनवाणा झाला होतो. डॉ. राजनही माझ्या अनपेक्षित कृतीने अचंबित झाले होते. कारण इतके दिवस पैसे व्हर्सेस सर्व्हिस याचा हिशोब मांडणाऱ्या इसमाकडून अशा नम्रतेची अपेक्षा नव्हती. ऑपरेशन पार पडलं. पत्नीच्या मेंदूतील 'शुक्राचार्यांचा अडथळा' डॉ. राजनरूपी बळीराजाने दूर केला होता. ‘इडापीडा टळो, बळीराजाचं राज्य येवो!’ असं मनी म्हणतच देवाचे आभार मानले.

मला बायकोला पाहायला बोलावलं, तेव्हा ती बेशुद्धच होती. ऑपरेशनदरम्यान एक जरी 'व्हेन' कट झाली असती, तर डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे तिची उजवी बाजू लुळी पडणार होती. अनिमिष नेत्रांनी मी तिच्याकडे पाहत होतो. घड्याळाचा सेकंदकाटा मिनिटकाट्याच्या वेगाने चालल्यासारखं वाटत होतं. “अगं!! हॅलो!! पिल्लू!! बरं वाटतंय का? ओळखलंस का मला?” तिच्या डोळ्यात पाणी तरारलं होतं अन माझ्याही. डॉ. राजन तिच्यासमोरच होते. आपल्या अर्धोन्मीलित डोळ्यांनी त्या देवदूताची धूसर मूर्ती डोळ्यात साठवत जेव्हा तिने माझ्या हाकेला होकार दिला, तेव्हा सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला. जणू तिच्या आयुष्याला लागलेलं ग्रहण सुटत चालल्याची ती पूर्वसूचनाच होती. हळूहळू ती शुद्धीवर येत होती. पुढील तीन-चार दिवसांत तिच्या तब्येतीत भरभर आणि भरपूर सुधारणा झाली. इतके दिवस हरवलेलं हास्य डिस्चार्जच्या दिवशी आम्हा दोघांच्याही चेहऱ्यावर पुन्हा विराजमान झालं होतं. हॉस्पिटलमधल्या डॉक्टर, नर्सेस आणि इतर स्टाफ, सर्वांचे साश्रू नयनांनी आभार मानत हॉस्पिटलचा निरोप घेतला.

काही दिवसांत केमो आणि रेडिएशन ट्रीटमेंट चालू होऊन पुढील दोन महिने हॉस्पिटलच्या फेऱ्या झाल्या. सुदैवाने तिने त्या वेदना व्यवस्थित टॉलरेट केल्या. हे सगळे दिवस माझ्यासाठी आत्मचिंतनाचे होते. केलेल्या चुकांची दुरुस्ती करण्याचे होते. पत्नीला मृत्यूच्या दाढेतून परत आणणाऱ्या डॉक्टरांची क्षमा मागण्याचे होते. डॉक्टरांतल्या दिव्यत्वाचा मान राखण्याचे होते. आंतरजालावर जिथे जिथे म्हणून डॉक्टरांबद्दल विखारी टीका केली होती, तिथून सगळे प्रतिसाद मागे घेतले ते परत असा गाढवपणा न करण्याच्या निश्चयानेच.

जाता जाता...
- डॉ. राजन यांनी स्वतःचे वैयक्तिक ऑपरेशन चार्जेस वेव्ह ऑफ केले. (का? माहीत नाही.)
- डॉ. कौस्तव तलपत्रा (रेडिएशन ऑन्कॉलॉजी हेड) यांनी रेडिएशन मास्क चार्जेस वेव्ह ऑफ केले. (का? माहीत नाही.)
- पत्नीची मेडिक्लेम पॉलिसी होती, पण दोन वर्षांचा वेटिंग पिरियड संपला नव्हता, म्हणून सगळा खर्च सेविंग्समधून चालला होता. डॉ. शहांनी सांगितलं की ऍक्सिडेन्ट, हार्ट अटॅक आणि कॅन्सर असल्यास वेटिंग पिरियड लागू होत नाही. जवळपास ३.८ लाख रुपये डॉक्टरांच्या या माहितीमुळे रीएम्बर्स करता आले.
आणि सर्वात आनंदाची बाब म्हणजे पत्नीचे MRI रिपोर्ट्स ऑपरेशनपश्चात गेल्या दोन वर्षांपासून नॉर्मल येत आहेत. संकट तिच्यावर आलं होतं, पण धडा मला मिळाला होता.

प्रतिक्रिया

ग्लायोब्लास्टोमा निदान वाचून काळजात चर्रर्र झालं कि पुढे काय वाचायला मिळणार? देवाची कृपा म्हणा किंवा नशीब म्हणा किंवा पूर्वपुण्याई म्हणा या आजारातून आपली पत्नी पूर्ण बरी झाली याचे समाधान वाटते आहे. ईश्वर आपल्या युगुलाला सुखासमाधानाचे दीर्घायुष्य देवो. --/\--

यशोधरा's picture

2 Sep 2017 - 1:29 pm | यशोधरा

हेच म्हणते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Sep 2017 - 2:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

+११

आयुष्यातला वादळी प्रसंग साध्या सोप्या शब्दांत पण अत्यंत परिणामकपणे वाचकांपर्यंत पोचविला आहे. भविष्यातल्या निरोगी दीर्घायूसाठी अनेक शुभेछा !

संग्राम's picture

4 Sep 2017 - 3:04 pm | संग्राम

भविष्यातल्या निरोगी दीर्घायूसाठी अनेक शुभेछा !

प्रमोद देर्देकर's picture

2 Sep 2017 - 12:46 pm | प्रमोद देर्देकर

शब्द सुचत नाहीत.

निव्वळ निशब्द. तुम्हा दोघांना दंडवत.

__/\__

डॉक्टरांप्रती झालेला तुमच्या भावनांचा बदल खूप छान टिपला आहे.
आपण एखादीच केस बघून किंवा अनुभवून यच्चायावत डॉक्टरांबद्दल मत बनवतो ते किती पोकळ आणि वरवरचे असते हे नेमके पोचवणारा लेख आहे.

गुल्लू दादा's picture

2 Sep 2017 - 2:24 pm | गुल्लू दादा

सहमत.

सिरुसेरि's picture

2 Sep 2017 - 2:08 pm | सिरुसेरि

निशब्द . शेवट गोड झाला हे खुप बरे झाले . एक साक्षात्कारी अनुभव .

तुषार काळभोर's picture

2 Sep 2017 - 2:16 pm | तुषार काळभोर

'फिरूनी नव्याने जन्मेन मी' ची प्रचिती देणारा लेख...
मानसिक दृष्ट्या तुम्ही व तुमच्या पत्नीने खूप भोगलं असेल, त्या काही आठवड्यांत.
डॉ खरेंच्या शब्दांत... ईश्वर आपल्या युगुलाला सुखासमाधानाचे दीर्घायुष्य देवो. --/\--

श्रीगुरुजी's picture

2 Sep 2017 - 2:34 pm | श्रीगुरुजी

कठीण प्रसंगातून पार पडलात. ईश्वर तुम्हा उभयतांना सुखासमाधानाचे निरोगी दीर्घायुष्य देवो.

प्रचेतस's picture

2 Sep 2017 - 3:55 pm | प्रचेतस

हेच म्हणतो

जबरदस्त लेख आहे. इतका जीवावरच्या संकटाचा अनुभवदेखील फार साध्या भाषेत मांडला आहे. शेवटी आता सर्व नॉर्मल आहे हे वाचून जीव भांड्यात पडला. खूप भोगलंत उभयतांनी. तुम्हांला निरामय आयुष्यासाठी शुभेच्छा!

संजय पाटिल's picture

2 Sep 2017 - 3:23 pm | संजय पाटिल

असेच म्हणतो...

पलाश's picture

3 Sep 2017 - 12:02 am | पलाश

अगदी असंच म्हणते. _/\_

बोका-ए-आझम's picture

2 Sep 2017 - 3:55 pm | बोका-ए-आझम

वाचतानाच अंगावर काटा आला! त्यातून प्रत्यक्ष जाताना तुमचं काय झालं असेल याची कल्पनाही करवत नाही! पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा!

माम्लेदारचा पन्खा's picture

2 Sep 2017 - 5:04 pm | माम्लेदारचा पन्खा

बाकी शब्द नाहीत . . . . . . .

बाजीप्रभू's picture

2 Sep 2017 - 5:17 pm | बाजीप्रभू

लेख देण्याची काल मर्यादा निघून गेली असतांनाही... लेख स्विकारण्याची लवचिकता दाखवल्याबद्दल आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल संपादक मंडळाचा ऋणी असेन. तसेच घाई-घाई लिहितांना झालेल्या शुद्धलेखनाच्या चुकाही दुरुस्त केल्याबद्दल आभार __/\__

बाकी आलेल्या आणि येणाऱ्या प्रतिक्रियांची पोचपावती सावकाशीने देईन.

बाप रे ! मेंदुचे आजार म्हणजे ऐकुनच भीती वाटते. ऐन वेळी डॉक्टर बदलावा लागणे वगैरे पर्यंत गोष्टी गेल्या म्हणजे तुमच्या पायाखालची जमीन निसटली असेल. देवाचीच कृपा ! यातुन तुमचा बदललेला दृष्टीकोन पण तुम्ही छान मांडला आहे. सुदैवाने , लहानपणापासून मला डॉ. चा अतिशय चांगला अनुभव येत गेला त्यामुळे एकुणच त्या व्यवसायाविषयी कधीच मनात संशय किंवा अविश्वास नसतो आणि नाही. पण, लोकांना आलेले अनुभव आणि त्यातुन बनणारी नकारात्न्मक मतं विचार करायला लावतात खरं. तुमची ती मतं बदलली ही तुमच्यासाठीच मुख्यत : दिलासादायक गोष्ट आहे. तुमच्या बायकोला पुढील निरोगी आणि दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा.

बाजीप्रभू's picture

2 Sep 2017 - 5:49 pm | बाजीप्रभू

बरेचदा आपण भाडोत्री/उधार अनुभवांवर डॉक्टरांबद्दल मत बनवतो... त्या त्रयस्थांचे अनुभव असतील खरे पण स्वतःला प्रत्यक्ष अनुभव आल्याशिवाय मत बनवू नये हि मोठी आणि महत्वाची शिकवण या घटनेने मिळाली.
दुसरी बाजूही असते... ती ऐकायला शिकलो, गुगलला किती महत्व द्यायचं हेही शिकलो.

स्वाती दिनेश's picture

2 Sep 2017 - 5:45 pm | स्वाती दिनेश

मेंदूच्या आजारातून तुमची पत्नी बरी झाली आणि तुमची ही सत्त्व परीक्षा तुम्ही पार पाडलीत. फिरूनी नव्याने जन्मलात.
तुम्हा उभयंताना भरपूर आयुरारोग्य चिंतीते.
स्वाती

विवेकपटाईत's picture

2 Sep 2017 - 6:01 pm | विवेकपटाईत

आपल्या पत्नीच्या दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा. वाचताना क्षणभर हृदयाचे ठोके चुकले. माझी जेंव्हा बाय पास झाली होती, तेंव्हा सौ. च्या डोक्यात काय विचार येत असतील याची हि जाणीव झाली. अधिकांश डॉक्टर चांगले असतात (3 ot ) जाण्याचा प्रसंग आला आहे.

बाकी आयुर्वेदिक औषधांत प्रयुक्त होणार्या घटकांचा शरीरावर कसा प्रभाव पडतो, याचे अजून अध्ययन झाले नाही. सरकारने त्या साठी काहीच केले नाही. व करण्याची शक्यता नाही. आयुर्वेदिक औषधी बनवणार्या कंपन्याची आर्थिक स्थिती एवढी सदृढ नाही कि ते या साठी प्रचंड खर्च करू शकतील. या मुळे आयुर्वेदाला जगात मान्यता हि नाही. याच साठी ५०० कोटी खर्च करून अत्याधुनिक आयुर्वेदिक रिसर्च सेंटर पतंजलीने बनविले आहे. १५० ते २०० कोटी दरवर्षी खर्च येईल. सध्या ३०० scientist तिथे कार्यरत आहेत. (पतंजलीला होणारा नफा यात वापरला जाईल). काही वर्षांनी निश्चित आयुर्वेदिक डॉक्टर विश्वासाने आपल्या औषधांचा परिणाम मानवीय शरीरावर कसा होतो हे सांगू शकतील. एलोपेथिक औषधी वापरण्याची त्यांना गरज पडणार नाही.

कपिलमुनी's picture

5 Sep 2017 - 5:46 pm | कपिलमुनी

कुटपन झैरात चालू !

ज्या धाडसाने तुम्ही हि परिस्थिती हाताळलीत, तुम्हाला सलाम.तुम्हा उभयतांना दिर्घायुष्य लाभो हि ईश्वर चरणी प्रार्थना.

ज्योति अळवणी's picture

2 Sep 2017 - 8:27 pm | ज्योति अळवणी

प्रत्येक शब्द वाचताना डोळ्यात पाणी उभं राहिलं होतं. तुमच्या पत्नी शतायुषी होवोत. तुम्ही धडा शिकलात अस म्हंटलत ते पटलं. एकेकदा कारण नसताना आपण एखाद्या प्रोफेशन बद्दल गैरसमज करून घेतो आणि चुकीचं बोलतो... अस करण्यापूर्वी 100 वेळा विचार केला पाहिजे; हा धडा मी देखील घेतला तुमचा लेख वाचून

गम्मत-जम्मत's picture

2 Sep 2017 - 9:09 pm | गम्मत-जम्मत

"ऑपरेशनदरम्यान एक जरी 'व्हेन' कट झाली असती, तर डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे तिची उजवी बाजू लुळी पडणार होती."
डॉक्टरांचे अद्वितीय कौशल्य तर आहेच आहे आणि तुम्हा दोघांची हि कोणती तरी फार मोठी पुण्याई देव म्हणून तुमच्या पाठीशी होती म्हणायची! वाचताना अंगावर काटा आला.

वरुण मोहिते's picture

2 Sep 2017 - 9:24 pm | वरुण मोहिते

दीर्घायुष्य लाभो आपल्या दोघांनाही .

पैसा's picture

2 Sep 2017 - 9:34 pm | पैसा

जिवावरचा प्रसंग निभावला॰ यापुढे मात्र काळजी घ्या॰ पुन्हाच्या रेग्युलर चेक अप ....व्हिजिट्स,,, इतर काही औषधे वगैरे चालू असतील ती चालू राहू देत.॰

मनिमौ's picture

2 Sep 2017 - 10:57 pm | मनिमौ

लिहीलय अस तरी कस म्हणणार. तुमच्या दृष्टी कोनात झालेला बदल वाचुन आनंद झाला. तुम्हा ऊभयतांना दीर्घायुष्य लाभुदे

दशानन's picture

2 Sep 2017 - 11:42 pm | दशानन

निशब्द!!!

अमितदादा's picture

3 Sep 2017 - 12:17 am | अमितदादा

कठीण प्रसंगातुन गेलात... काळजी घ्या शुभेच्छा. चांगले व निष्णात डॉक्टर मिळाले हे अगदी महत्वाचं.

हुश्श्य! लेखाच्या सुरुवातीला भीती वाटली. नंतर अंबानी हॉस्पिटल वाचून तर " आता काय होणार?" असा प्रश्न पडला व शेवटाला आपली पत्नी व्यवस्थित आहे म्हणून बरे वाटले. तुमच्यातील बदल तुम्ही काटेकोरपणे टिपले आहेत. डॉक्टरांचे आभार मानावेत तितके थोडे.

अनन्त अवधुत's picture

3 Sep 2017 - 5:55 am | अनन्त अवधुत

सुखरूप बाहेर पडल्याबद्दल दोघांचे हार्दिक अभिनंदन.
दोघांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा.

केडी's picture

3 Sep 2017 - 2:22 pm | केडी

हेच म्हणतो....

बापरे!भीतीदायक अनुभव.यातुन सुखरुप बाहेर पडलात हे वाचुन बर वाटल.पुढील आयुष्यासाठी तुम्हा दोघांनाही शुभेच्छा.

पिशी अबोली's picture

3 Sep 2017 - 1:44 pm | पिशी अबोली

या लेखमालेचं एक वैशिष्ट्य जाणवतंय, ते म्हणजे यातील लिखाण अतिशय सकारात्मक आहे. तुम्हाला बसलेला एक एक हादरा तुम्ही किती शांतपणे पोचवला आहे.. धसकत राहतं, पण तरी ज्या पद्धतीने तुम्ही त्या सगळ्यातल्या सकारात्मक तेवढ्या बाजूवर भर दिला आहे, त्याला सलामच!
तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा.. खूप काही भोगलंत, आता पुढचं आयुष्य सुखासमाधानात जावो..

पद्मावति's picture

3 Sep 2017 - 4:13 pm | पद्मावति

तुम्हाला बसलेला एक एक हादरा तुम्ही किती शांतपणे पोचवला आहे.. धसकत राहतं, पण तरी ज्या पद्धतीने तुम्ही त्या सगळ्यातल्या सकारात्मक तेवढ्या बाजूवर भर दिला आहे, त्याला सलामच! अगदी हेच म्हणते. तुम्हा दोघांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

बापरे. किती मानसिक तणावातून गेला असाल. वादळातून सहीसलामत बाहेर पडलेल्या बोटीसारखे हे दिवस.
यापुढे सर्व चांगलेच होऊ दे तुमच्या आयुष्यात .

निशाचर's picture

3 Sep 2017 - 4:50 pm | निशाचर

पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा!

स्वत:ला काही झाले तरी माणुस निभावुण नेतो पण जोडीदाराला म्रुत्युच्या खाईत पाहणे अवघड असते ते तुम्ही पाहिले आणि त्यांना यातुन बाहेर काढले, सलाम ! दिर्घायुष्य मिळो ही सदिच्छा!

प्रीत-मोहर's picture

4 Sep 2017 - 10:23 am | प्रीत-मोहर

बाप्रे!!

यापुढचं आयुष्य अगदी आनंदाचो जावो तुम्हा दोघांचंही. काळजी घ्या.

काय प्रतिसाद द्यावा हेच कळत नाहीये.. इतका सुंदर लेख..
तुमचे संपूर्ण कुटुंब असेच कायम निरोगी, सुखी राहो हीच कामना..

स्मिता चौगुले's picture

4 Sep 2017 - 3:28 pm | स्मिता चौगुले

वाचताना डोळ्यात पाणी उभं राहिलं होतं
यापुढील आयुष्य आनंदाचे जावो __/\__

शब्दबम्बाळ's picture

10 Sep 2017 - 9:17 pm | शब्दबम्बाळ

हेच म्हणतो! _/\_

चिगो's picture

4 Sep 2017 - 5:32 pm | चिगो

आयुर्दात्या डॉक्टरांच्या कौशल्याला प्रणाम.. देवाची कृपा आपणां दोघांवरही नेहमीच राहो, हीच प्रार्थना..

नाखु's picture

4 Sep 2017 - 8:25 pm | नाखु

आयुर्दात्या डॉक्टरांच्या कौशल्याला प्रणाम.. देवाची कृपा आपणां दोघांवरही नेहमीच राहो, हीच प्रार्थना..

+११११

नतमस्तक नाखु

डॉक्टरांनी त्यांचे कार्य फार उत्तमरित्या पार पाडले.

तुम्हा उभयतांना दीर्घायुष्य लाभो, हीच प्रार्थना..

सुमीत भातखंडे's picture

5 Sep 2017 - 10:17 am | सुमीत भातखंडे

भिती वाटली वाचून.
तुम्हा दोघांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा!!!

संत घोडेकर's picture

5 Sep 2017 - 10:49 am | संत घोडेकर

__/\__
वाचताना काटा आला, आपली मनस्थिती काय झाली असेल याची कल्पना करवत नाही. आपल्याला आणि आपल्या सर्व कुटुंबाला दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना.

मृत्युन्जय's picture

5 Sep 2017 - 11:46 am | मृत्युन्जय

देव आणि डॉक्टर असेच तुमच्या पाठीशी नेहमीच राहू देत. डॉक्टरला यमराजसहोदर म्हणतात ते किमान तुमच्या बाबतीत तरी चुकले हे ऐकुन खुप बरे वाटले

सविता००१'s picture

5 Sep 2017 - 1:46 pm | सविता००१

किती धीराने सोसलं आहेत सगळं... तुम्हा उभयतांना आणि कुटुंबियांना दीर्घायुष्य लाभो.