लिफ्ट करा दे

सरनौबत's picture
सरनौबत in जनातलं, मनातलं
21 Aug 2017 - 9:47 am

लिफ्ट करा दे

दिवसभर ऑफीसमध्ये एकामागोमाग एक मिटींग्समुळे पुरती दमणूक झालेली. संध्याकाळी उशीरा एकदाची कामं संपली. आता घरी जाऊन मस्तपैकी अंघोळ करायची आणि मग टीव्हीवर 'चला हवा येऊ द्या' बघत जेवायचं ह्या विचारात घराजवळ कधी पोचलो समजलंच नाही. तळमजल्यावर लिफ्ट जणू काही माझीच वाट बघत थांबली होती. लिफ्ट मध्ये मी एकटाच होतो. पाचव्या मजल्याचं बटण दाबलं. आता काही सेकंदातच घरी पोचणार ह्या विचाराने आनंद झाला. काही सेकंदातच लिफ्टचं दार उघडलं. मी बाहेर पडणार तेवढ्यात लक्षात आलं कि (च्यायला!) हा तर तिसरा मजला आहे. एवढ्या रात्री तिसऱ्या मजल्यावरून कोणाला 'वर जायची इच्छा झाली' असा प्रश्न पडला. तिसऱ्या मजल्यावर लिफ्ट बाहेर थांबलेला इसम आत आला आणि त्याने ग्राउंड फ्लोअरचं बटण दाबलं. मात्र त्याच्या आज्ञेला मान न देता लिफ्ट जेव्हा खाली न जाता वर जायला लागली तेव्हा 'लिफ्ट उपर कैसे जा रही हैं?" असे त्याने मोठ्या आश्चर्यचकित चेहेऱ्याने विचारले.

मी (दात-ओठ खात) शक्य तेवढा राग गिळून 'आपने शायद उपरवाला बटन प्रेस किया होगा' असे म्हणालो. वास्तविक अश्या वेळी त्या माणसास गदागदा हलवून 'खाली जायचं असताना वर जाण्याचं बटण तुझ्या बापाने तरी दाबलं होतं का रे’ असं म्हणायची अनिवार इच्छा होते. निदान 'वरचं बटण दाबल्यावर लिफ्ट शक्यतो वर जाते' असा टोमणा मारायचा मोह होतो. मात्र स्वतःच ब्लड प्रेशर आणि सोसायटीतल्या लोकांशी भांडणं वाढू नयेत म्हणून वेलकम पिच्चर मधल्या नाना पाटेकर सारखं 'कंट्रोल…कंट्रोल' म्हणत स्वतःला समजवावं लागतं. अश्या लोकांचा 'वरचा मजला रिकामा असेल' असं म्हणून सोडून देतो.
'खाली जायचं असल्यास खाली जाण्याचं आणि वर जाण्यासाठी लिफ्टचं वरचं बटण दाबावे' इतकी साधी गोष्ट काही लोकांना का समजत नाही हे मला न सुटलेलं कोडं आहे. आपण वरच्या मजल्यावर आणि लिफ्ट ग्राउंड फ्लोअर वर असल्यास तिला 'वर बोलावून घेण्यासाठी वरचं बटण दाबत असावेत' अशी एक शक्यता आहे. इतका तर्कशुद्ध(!) विचार जर खरोखरीच करत असतील तर आपला तर्क का चुकतो हे एकदा तरी न लाजता का विचारत नाहीत? 'कुठलही बटण दाबलं तरी लिफ्ट थांबतेच' म्हणून मूड प्रमाणे बटण दाबणारी ही लोकं असावीत.

वयस्कर लोकांचं एकवेळ समजू शकतो. ह्या लोकांनी 'हाताला येईल ते बटण दाबणं' ठीक आहे. मात्र डाव्या हातात लेटेस्ट iPhone 7 घेऊन उजव्या हाताने लिफ्टचे चुकीचे बटण दाबणारी तरणीताठी मुलं-मुली पाहिल्यावर संताप अनावर होतो. 'लिफ्टचं कुठलं बटण कधी दाबावे' इतकी साधी गोष्ट समजत नसेल तर हे iPhone काय वापरणार कप्पाळ? iPhone चा अपमान बघायला Apple चा स्टीव्ह जॉब्स हयात नाही हे एक प्रकारे बरंच झालं. असली लोकं बघून 'मुझको भी तो लिफ्ट करा दे' त्या बिचाऱ्याने जीझसला म्हणलं असणार. लोकांची चुकीची बटणं दाबण्याची खोड लक्षात घेऊन स्टीव्ह जॉब्सने वैतागून फोनवरील कीबोर्ड ची बटणे काढून ‘टचस्क्रीन’चा शोध लावला असावा.
विशेषतः घाईच्या वेळी जेव्हा लिफ्ट कारण नसताना मधेच थांबते तेव्हा फार चिडचिड होते. हॉस्पिटल मध्ये 'अमुक एक औषध ताबडतोब घेऊन या' असं डॉक्टर सांगतात. आपण घाईघाईने तळमजल्यावरील फार्मसीत जाण्यासाठी सहाव्या मजल्यावर लिफ्टची वाट बघत असतो. अश्या वेळी खाली जाताना लिफ्ट जवळ-जवळ प्रत्येक मजल्यावर थांबते. निम्म्या ठिकाणी लोकांनी वर जायचं असूनसुद्धा खाली जाण्याचे बटण दाबलेले असते. ह्या प्रसंगी पेशंटचे औषध आणायचे असल्याने आपल्याला patience ठेवावा लागतो. नाहीतर हॉस्पिटलच्या 'आज दाखल झालेले पेशंट्स' लिस्ट मध्ये ह्या लोकांची देखील नावे लावायची इच्छा होते.
लिफ्ट-प्रवासात इतर प्रकारे त्रास देणारे देखील अनेक भेटतात. लिफ्ट बिचारी "Please shut the door, कृपया दरवाजा बंद करा" असं दोन्ही भाषेत बोंबलून सांगत असते. तरीही अनेक जण दरवाजा नीट लावत नाहीत. आपण नेमकं दोन्ही हातात जड पिशव्या घेऊन तळमजल्यावर असतो आणि लिफ्टचं दार सातव्या मजल्यावर अडकलेलं. अजूनही एक प्रकार बघायला मिळतो तो मात्र बऱ्यापैकी निरुपद्रवी आहे. आपल्याला हवं ते बटण आधीच कोणीतरी दाबलं असलं तरीसुद्धा ही लोकं पुन्हा एकदा तेच बटण दोन-तीनदा दाबून खात्री करून घेतात.

अनेक ऑफिस बिल्डींग्स मध्ये लिफ्टमन असतात. मला आधी प्रश्न पडायचा कि आधीच अरुंद लिफ्ट त्यात ह्या माणसाची अडचण कशाला? लोकं इच्छित बटण दाबू शकतात तर मग लिफ्टमनचा खर्च उगाच का करायचा? मात्र चुकीची बटणे दाबणारे, दरवाजा नीट न लावणारे लोकं पाहिले कि लिफ्टमन ठेवणाऱ्या लोकांच्या दूरदर्शीपणाची दाद द्यावीशी वाटते.

सरकारने खेडेगावातल्या लोकांसाठी 'जहाँ शौच वहा शौचालय' ची मोहीम हाती घेतली. ह्याच स्तरावर मोठ्या शहरातील लोकांसाठी लिफ्ट वापरण्याबद्दल जनजागृती करण्याची गरज आहे. ड्रायव्हींग टेस्ट च्या धर्तीवर लिफ्ट वापरायचा परवाना देताना बिल्डिंग मधील सर्व लोकांची लेखी परीक्षा तसेच प्रात्यक्षिक अनिवार्य केले पाहिजे. चुकीची बटणे दाबणाऱ्यास ५ मजले जिन्याने चढ-उतार, लिफ्टमध्ये १० मिनिटे कोंडून ठेवणे, झालंच तर आधार कार्ड जप्त करणे वगैरे शिक्षा केल्या पाहिजेत. चुकीला माफी नाही!

सध्या App चा जमाना आहे. आदल्या रात्री स्वतःला झोप कशी लागली हे देखील लोकं Sleep चे App बघून ठरवतात. लिफ्ट चे कुठले बटण दाबावे ह्यासाठी देखील एखादे App पाहिजे. 'तुम्ही आत्ता कुठल्या मजल्यावर आहात, आणि कुठे जायचे आहे' इतकी माफक माहिती भरल्यास 'वरचे कि खालचे बटण दाबावे' ह्याचे उत्तर App देऊ शकेल!

स्मार्टसिटी मध्ये स्मार्ट लिफ्ट्स असल्या पाहिजेत. OTIS, Kone वगैरे लिफ्ट बनवणाऱ्या मातब्बर कंपन्यांनी माणसाच्या मनातील विचार ओळखून चुकीचे बटण दाबल्यास सौम्य शॉक बसण्याचे स्मार्ट तंत्रज्ञान विकसित करायला पाहिजे. ह्यामुळे योग्य मजल्यावरच लिफ्ट थांबल्यामुळे होणारी वीजबचत, वेळेची बचत तसेच ब्लड प्रेशर च्या गोळ्यांवरील खर्चात बचत होईल.

धोरणविचार

प्रतिक्रिया

खेडूत's picture

21 Aug 2017 - 10:20 am | खेडूत

मस्त! हाही आवडला. :)
App ची कल्पना उपयोगी आहे. तुम्ही असे एखादे App लवकर तयार करून घ्या, आणि आम्हालाही सांगाल अशी अपेक्षा आहे. (तसे तुम्ही Appलपोटे नसाल याची खात्री आहेच!)

तळमजल्यावर लिफ्ट जणू काही माझीच वाट बघत थांबली होती. लिफ्ट मध्ये मी एकटाच होतो. पाचव्या मजल्याचं बटण दाबलं. आता काही सेकंदातच घरी पोचणार ह्या विचाराने आनंद झाला. काही सेकंदातच लिफ्टचं दार उघडलं. मी बाहेर पडणार तेवढ्यात लक्षात आलं कि (च्यायला!) हा तर तिसरा मजला आहे. एवढ्या रात्री तिसऱ्या मजल्यावरून कोणाला 'वर जायची इच्छा झाली' असा प्रश्न पडला. तिसऱ्या मजल्यावर लिफ्ट बाहेर थांबलेला इसम आत आला आणि त्याने ग्राउंड फ्लोअरचं बटण दाबलं. मात्र त्याच्या आज्ञेला मान न देता लिफ्ट जेव्हा खाली न जाता वर जायला लागली तेव्हा 'लिफ्ट उपर कैसे जा रही हैं?" असे त्याने मोठ्या आश्चर्यचकित चेहेऱ्याने विचारले.

मी (दात-ओठ खात) शक्य तेवढा राग गिळून 'आपने शायद उपरवाला बटन प्रेस किया होगा' असे म्हणालो.

हाहा!

पुढच्या वेळी त्या माणसासोबत जेव्हा असेच होईल तेव्हा तो पण दात-ओठ खात चूक करणाऱ्या तिसऱ्या माणसाला असेच उत्तर देईल. आणि अशाच चुकांतून शिकत लिफ्ट ची बटणे कशी बरोबर दाबायची हे बिल्डिंग मधल्या सर्वाना कळेल.

अनिंद्य's picture

21 Aug 2017 - 12:17 pm | अनिंद्य

@ सरनौबत,

.......'खाली जायचं असल्यास खाली जाण्याचं आणि वर जाण्यासाठी लिफ्टचं वरचं बटण दाबावे' इतकी साधी गोष्ट काही लोकांना का समजत नाही हे मला न सुटलेलं कोडं आहे. .....

ह्या बाबतीत मी तुमच्याच मजल्यावर आहे :-)

मुंबई विमानतळाच्या टी २ आंतरराष्ट्रीय टर्मिनलवर सगळ्या लिफ्टस जवळ सगळ्या 'हुशार - स्मार्टफोनधारी - तरुण - शिकलेल्या -फ्याशनेबल' इत्यादी असलेल्या लोकांनी अशी हाताला येतील ती सर्व बटणे दाबल्यामुळे जो काही सोहळा नियमित होतो तो अनुभवताना आता मला तुमची आठवण हमखास होणार :-)

मस्त लेख.

कंजूस's picture

21 Aug 2017 - 1:10 pm | कंजूस

डिजिटल जमाना आहे.
१) मेट्रोचे रिटर्न तिकिट त्याच दिवशी चालते ( टोकन टाकून दांडा वर होणार नाही तारीख रात्री बदल्यावर.)पण लोकलचे रिटर्न बय्राचदा वापरता येते.
२)मोबाइलचे मेमरी कार्डवर अॅप्स टाकली असल्यास पुन्हा बदलल्यास सूचना लक्षात ठेवाव्या लागतील अथवा अॅप्स लोड होत नाहीत किंवा झटक्यात डिलिट होऊ शकतात.

ज्योति अळवणी's picture

21 Aug 2017 - 5:10 pm | ज्योति अळवणी

मनापासून सहमत

खग्या's picture

21 Aug 2017 - 10:52 pm | खग्या

लिफ्ट साठी चुकीचं बटण दाबणे या शुल्लक गोष्टीचा इतका त्रास कोणाला होऊ शकतो असं वाटलं नव्हतं ..