रनवे

मंगेश पंचाक्षरी's picture
मंगेश पंचाक्षरी in जनातलं, मनातलं
19 Aug 2017 - 3:32 pm

-मंगेश पंचाक्षरी, नासिक. (मुक्तचिंतन)

अलीकडेच नाशिक मध्ये खा. शरद पवार यांची एक मनमोकळी मुलाखत विश्वास लॉन्स येथे झाली. दुसऱ्या दिवशी साहेब जळगावला जाणार होते. आम्ही त्यांना निरोप देण्यासाठी ओझर विमानतळावर गेलो होतो. साहेब विमानात बसले आणि थोढ्याच वेळात विमानाने पश्चिम दिशेला टेक-ऑफ घेतला. कोणीतरी पटकन बोलले की अरे साहेबाना तर जळगावला जायचे होते आणि विमान तर मुबईकडे गेले. पायलट विसरले की काय? सर्वांच्याच मनात हा प्रश्न आला होता की विमान मुंबईच्या दिशेने का उडाले असेल?

आम्ही याबाबत माहिती घेतली असता असे लक्षात आले की विमान नेहमी हवेच्या विरुद्ध दिशेला उडते. प्रत्येक विमानतळावर हवेचा प्रवाह दाखवणारा झेंडा असतो. विमान नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला टेकऑफ आणि लँडिंग करते. भारतात वारा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतो. कधी या उलटही वाहत असतो. त्यामुळे येथील रनवे नेहमी पूर्व-पश्चिम असतात. अमेरिकेसह काही देशात चारही दिशांना तोंड करून 'रनवे' असतात. विमान हवेचा अवरोध 45 डिग्री अँगल पर्यंत ऍडजस्ट करू शकतात. त्यामुळे काही रनवे अधिकच्या चिन्हासारखे 'क्रॉस' मध्येही असतात. या रनवे ना 9-27 (पूर्व-पश्चिम) किंवा 18-36 म्हणजे (उत्तर - दक्षिण) असे नंबर दिलेले असतात. आपण विमानात बसलेलो असताना उड्डाणपूर्वी कॅप्टन रनवे नंबरची घोषणा करत असतात. हे समजण्यास अगदी सोपं आहे. हे आकडे म्हणजे डिग्री आहेत. 9 म्हणजे उत्तर दिशेपासून 90 डिग्री. उत्तर दिशेपासून घड्याळाच्या काट्याप्रमाणे मोजलेल्या अँगलला बेअरिंग किंवा अझीमुथ म्हणतात. रनवे 9 म्हणजेच विमान पूर्वेकडे उड्डाण करणार आहे. 27 म्हणजे 270 डिग्री अर्थात पूर्वेकडून पश्चिमेकडे, याचप्रमाणे 18 असेल तर 180 डिग्री म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि 36 म्हणजे 360 डिग्री अर्थात दक्षिणेकडून उत्तर दिशेकडे विमानाचे उड्डाण होते. धावपट्टी किमान 1829 मीटर ते 5500 मीटर म्हणजे साडेपाच किलोमीटर लांबीची असते. मुंबईत 9-27 (3445 मी.) आणि 14-32 (2925 मी.)असे दोन रनवे असून ते एकमेकांना छेदणारे आहेत. भारतात दिल्लीचा रनवे सर्वात लांब (4430 मी.) आहे तर जगात क्वामडो (चीन) चा रनवे सर्वात लांब (5500 मी.)आहे. भारतापेक्षा मोठे रनवे इराक, इराण, कोंगो, आफ्रिका, झिम्बाब्वे, नमिबिया, कतार, दुबई, ब्राझील, रशिया, इथिओपिया इत्यादी देशात आहेत. प्रवासी विमानाचा उड्डाणसमयी वेग सुमारे 300 किमी प्रतितास असतो तर हवेत तोच वेग 1000 किमी प्रतितास असतो. त्यामुळे स्थूल मानाने किती हजार किमी अंतर आहे तेव्हडे तास विमान प्रवास करते. रनवेच्या शेवटी पांढऱ्या अक्षरात त्या धावपट्टीचा क्रमांक लिहिलेला असतो. काही ठिकाणी हवा एवढी जोरात वाहत असते की विमान रनवेच्या जवळ येई पर्यंत हवेच्या अनुरोधाने चक्क तिरके खाली आणले जाते आणि अगदी चाक स्पर्श करण्यापूर्वी विमानाची दिशा रनवे प्रमाणे बदलली जाते.

हवेचा प्रवाह विमानाच्या सोयीनुसार असेल तर विमान कोणत्याही दिशेने लँड करता येते. अशा वेळी विमानाचे पार्किंग हँगर जवळ पडेल, प्रवसी गेट जवळ पडेल, इतर विमानांचे टेक ऑफ किंवा लँडिंग मागोमाग त्वरित करता येतील असे विचार करून नियंत्रण केले जाते. आजच्या काळात विमानप्रवासा इतका आरामदायी प्रवास दुसरा नसेल. हवेत उडणाऱ्या या राजमहालामागे किती विज्ञान असते हे बघून आपण थक्क होतो. ज्या संशोधकांनी विमानाचा शोध लावून त्यात आतापर्यंतची प्रगती केली आहे, त्यांना सलाम करावासा वाटतो.

-©मंगेश पंचाक्षरी,नासिक.

हे ठिकाण

प्रतिक्रिया

आगाऊ म्हादया......'s picture

19 Aug 2017 - 9:21 pm | आगाऊ म्हादया......

"वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला उडत विमान"?? का बरं असं? वाऱ्याचा विरोध सहन करून उडतं? अवघड आहे...

टेकऑफ आणि लँडिंग नेहमी वा-याच्या विरुद्ध दिशेतच केलं जातं. समोरुन येणारा हवेचा झोत रनवेच्या कमी लांबीत विमानाची धाव संपवायला मदत करतो. विमानाच्या पंखांवरची लिफ्ट, जी विमानाला वर उचलते, ती जमिनीशी रिलेटिव्ह स्पीडवर अवलंबून नसून हवेशी रिलेटिव्ह स्पीडवर अवलंबून असते. पळत्या विमानावर समोरुन येणारा वारा हा पंखांवर हवेचा रिलेटिव्ह स्पीड वाढवतो.

(कृपया पूर्वपरवानगी शिवाय वरील प्रतिसाद मुद्रित किंवा प्रकाशित करू नये)

आगाऊ म्हादया......'s picture

19 Aug 2017 - 11:04 pm | आगाऊ म्हादया......

धन्यवाद

सुबोध खरे's picture

23 Aug 2017 - 10:33 am | सुबोध खरे

विक्रांत मुंबईत परत येताना माझ्या एका वैमानिक मित्राने समुद्रात उतरणारे "सी गल" हे पक्षी पण एक गिरकी/ वळण घेऊन वारा तोंडासमोर घेऊन उतरताना दाखवले. समोरून येणारा वारा असेल तर एरोडायनॅमिक्सच्या तत्वानुसार विमानाला वर उडायला किंवा उतरायला कमी इंधन लागते. हीच गोष्ट पक्षांना नैसर्गिक रित्या समजत(instinct) असते म्हणून ते आपोआप वाऱ्याच्या दिशेत उडतात किंवा उतरतात.
गम्मत म्हणून आता नदीत किंवा समुद्रात उतरणारे किंवा उडणारे पक्षी कसे उडतात ते पाहून घ्या.
गवि जे स्वतः एक वैमानिक आहेत त्यांनी यावर अधिक खुलासा करावा हि विनंती

जव्हेरगंज's picture

19 Aug 2017 - 9:42 pm | जव्हेरगंज

नवीनच माहिती मिळाली.
धन्यवाद.

ज्योति अळवणी's picture

19 Aug 2017 - 10:07 pm | ज्योति अळवणी

हा लेख मुद्रित किंवा प्रकाशित केला तर चालेल बहुतेक.

मार्मिक गोडसे's picture

20 Aug 2017 - 12:14 am | मार्मिक गोडसे

छान माहिती मिळाली.

पगला गजोधर's picture

20 Aug 2017 - 2:31 pm | पगला गजोधर

कृपया साहेबांच्या पूर्वपरवानगीशिवाय, त्यांना सी-ऑफ करायला येवू नये.

जेम्स वांड's picture

20 Aug 2017 - 3:14 pm | जेम्स वांड

निरोपाला हजर मंडळींना इतके सगळे विमानतळावरच धरून सांगितलेत का काय? गुरु आहात :D

अत्रे's picture

20 Aug 2017 - 3:34 pm | अत्रे

जर वारा वहात नसेल (शांत वातावरण) तर विमान कोणत्या दिशेने रनवे वरून जाते?

चामुंडराय's picture

23 Aug 2017 - 4:50 am | चामुंडराय

माझ्या अंदाजाप्रमाणे ज्या दिशेला धावपट्टीचे दुसरे टोक (एन्ड) असेल त्या दिशेने विमान उडायला हवे. अर्थात मी काही या विषयातला तज्ज्ञ नाही तेव्हा जाणकार लोक्स पिंकतीलच.

तेव्हा जाणकार लोक्स पिंकतीलच

.

जाणकारांविषयी इतकी छद्मी भावना का असते हा प्रश्न बाजूला.

मी या विषयाबाबत किंचित जाणकार असल्याने "पिंक टाकतो".

..............

रनवेच्या भोवती विमान ज्या मार्गाने उडतं त्याला सर्किट पॅटर्न म्हणतात. सर्किट पॅटर्न हा सर्व एअरपोर्टसमधे जवळजवळ सारखाच असतो. एखाद्या एअरपोर्टच्या रनवेची दिशा ठरवताना त्या जागी वारा कसा वाहतो याचं अनेक वर्षांचं रेकॉर्ड पाहतात. विमानाचा टेकऑफ आणि लँडिंग, दोन्हीही वार्‍याच्या विरुद्ध दिशेत केलं जातं.
कारण.. ?
वर म्हटल्याप्रमाणे विमानाचे सर्व स्पीड हे हवेशी रिलेटिव्ह असतात. टेक ऑफसाठी आवश्यक स्पीडसुद्धा..
रनवेची लांबी अर्थातच मर्यादित असते.
त्यामुळे वारा समोरुन येत असला तर ट्रू एअरस्पीडच्या मानाने ग्राउंड स्पीड कमी राहतो आणि रनवेवरची कमी लांबी खर्च होऊन लवकर टेकऑफ होतो. एरवी विमान रनवेच्या दुसर्‍या टोकाशी जाऊन कदाचित ठोकरग्रस्त झालं असतं.
लँडिंगही याच, पक्षी वार्‍याच्या विरुद्ध दिशेत केलं जातं, कारण समोरुन येणार्‍या वार्‍याने लँडिंग झाल्यावर ग्राउंड स्पीड कमी होतो आणि विमान कमी अंतरात थांबतं..
रनवे जरी वार्‍याच्या हिस्टॉरिक दिशेवरुन बांधत असले, तरी वार्‍याची दिशा बदलत राहतेच. विशेषतः हवामान खूप बदललं की वार्‍याची दिशा उलटही होते. अशावेळी रनवे तर हलवता येत नाही.. मग टेकॉफ आणि लँडिंगची दिशा उलटी केली जाते.
मुंबईवासी विमानप्रवाशांनी किंवा नागरिकांनी खूपदा पाहिलं असेल की बर्‍याचवेळा घाटकोपरकडून लँडिंग करणारी आणि टेकॉफनंतर जुहू चौपाटीवर वर चढताना दिसणारी विमानं अचानक दिशा बदलून चौपाटीच्या दिशेने उलट लँडिंग करायला खाली येऊ लागतात. आणि टेकॉफनंतर ती जुहू ऐवजी घाटकोपर कुर्ल्यावर दिसतात. यालाच रनवे बदलला असं म्हणतात. मुंबई कंट्रोल टॉवर सर्व विमानांना "रनवे इन यूज" अशा नावाखाली नेहमीच याक्षणी कोणत्या बाजूने रनवे वापरात आहे हे सांगत असते.

चामुंडराय's picture

24 Aug 2017 - 7:22 am | चामुंडराय

माझ्या सारख्या नवमिपाकरा साठी हा मोठा प्रॉब्लेमच आहे.

एका जुन्या, जाणत्या, सिनिअर मिपाकराने सल्ला दिला होता कि मिपा वर कसे वागायला पाहिजे. हि लिंक बघा.

http://www.misalpav.com/comment/954132#comment-954132

आता तसं वागलं तरी प्रॉब्लेम आहे असे दिसते आहे.
एनीवे, माझ्या पिंकी प्रतिसादाने तुमच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा प्राप्तीची अभिलाषा.

बादवे : रनवेच्या टोकाला मोठ्ठा फॅन लावला तर रनवेची लांबी कमी असली तरी चालेल का? आणि बोटीवरून कमी लांबीच्या धावपट्टीवरून कसे विमानोड्डाण करतात?

सुबोध खरे's picture

24 Aug 2017 - 9:38 am | सुबोध खरे

https://en.wikipedia.org/wiki/Ski-jump_(aviation)
https://en.wikipedia.org/wiki/Aircraft_catapult
वरील दोन्ही दुवे वाचून पहा.
विमानवाहू नौकांवर दोन तर्हेने कमी लांबीच्या धावपट्टीच्या कमतरतेवर मात करता येते. अर्थात त्यावरून उड्डाण करणारी विमाने हि आपली नेहमीची नसून चपळ काटक कमी वजनाची आणि शक्तिशाली इंजिनांची अशी लढाऊ विमाने असतात.
https://www.youtube.com/watch?v=D3AMB7ZFF3Q
https://www.youtube.com/watch?v=EGhhwgQtuUg#t=93.44
ऍडमिरल कुझनेत्सोव आणि ऍडमिरल गोरोशकोव्ह(आता विक्रमादित्य) या रशियन विमानवाहू नौकेवर उतरणारी आणि स्की जंप वरून उड्डाण करणारी मिग २९ के हि विमाने पहा
बाकी -- रनवेच्या टोकाला मोठ्ठा पंख लावून जर तेवढ्या प्रमाणात हवेचा झोत निर्माण करता आला तर( महा कठीण काम आहे पण ) विमानांच्या धावपट्टीची लांबी कमी करणे सहज शक्य आहे

रनवेच्या टोकाला मोठ्ठा फॅन लावला तर रनवेची लांबी कमी असली तरी चालेल का?

हाहा, छान प्रश्न आहे https://what-if.xkcd.com/ वर विचारू शकता. तिथे अशाच प्रश्नाची उत्तरे देतात.

...आणि वारा रनवेच्या रेषेला समांतर नसेल, अँगलने वहात असेल, तर त्याचं टोकाचं उदाहरण म्हणजे crosswind landing. या व्हिडीओत उदाहरण बघा - https://www.youtube.com/watch?v=bMUdXJPUwm8
पहिल्या दोन-तीन विमानानी प्रयत्न करून पाहिला आणि शेवटी अ‍ॅबॉर्टच केलं. I think I kind of, sort of get the wind dynamics of such crosswind landing. गवि समजाउन देउ शकेल नीट.

टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Aug 2017 - 10:37 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी काही या विषयातला तज्ज्ञ नाही तेव्हा जाणकार लोक्स पिंकतीलच.

जाणकार लोक काय बोलायचं ते बोलतील, तुम्ही कशाला उगाच पिंकलात.

-दिलीप बिरुटे

चामुंडराय's picture

26 Aug 2017 - 7:01 am | चामुंडराय

प्राडॉसर,

मी थोडा लॉजिकल विचार करून माझे लेमन मत मांडले.

आणि मला या विषयातील फारसे ज्ञान नसल्याने तज्ञ् मंडळींनी पिंक टाकून ज्ञानात भर घालावी अशी अपेक्षा केली तर काय वावगे?

लेमन मत मांडायचेच नाही का?

प्रमोद देर्देकर's picture

23 Aug 2017 - 10:08 am | प्रमोद देर्देकर

चांगली माहिती मंगेश.

तरी पण लोकं नाव ठेवतातं च

सिरुसेरि's picture

23 Aug 2017 - 11:10 am | सिरुसेरि

चांगली माहिती . +१ . पण मुद्रीत म्हणजे काय आणी प्रकाशीत म्हणजे काय ? हे समजले नाही .

वाऱ्याची दिशा सहज समजण्यासाठी विंडसॉक किंवा हवाई मोजा असतो. कोणत्याही विमानतळावर आजही सहज दिसतो.
पहा https://en.wikipedia.org/wiki/Windsock

चामुंडराय's picture

26 Aug 2017 - 8:56 pm | चामुंडराय

डॉक्टर साहेब,

हवाई मोज्याबद्दल कल्पना नाही परंतु पायातील मोजा घरात इकडे तिकडे पडलेला / फेकलेला दिसला तर वादळ वाऱ्याचा रोख माझ्या दिशेला वळतो हे आत्तापर्यंत कळून चुकले आहे.

प्रत्येक काळ्या ढगाला सोनेरी किनार असते या न्यायाने अशा परिस्थितीत घराबाहेर पडण्यासाठी "ड्रॅग" कमी होऊन "लिफ्ट" चांगली मिळते असा आणभव आहे.

याबद्दल फक्त जाणकार आणि तज्ज्ञ मिपाकरच नाही तर माझ्या सारखे सामान्य मिपाकर देखील पिंकतील ही अपेक्षा ( स्वारी.... गगनविहारी आणि प्राडॉ सर्स).