ट्रेड (व्यापार) - झिरो सम गेम इत्यादी

साहना's picture
साहना in जनातलं, मनातलं
18 Aug 2017 - 4:03 am

गेम थेअरी म्हणजे गणित, तर्कशास्त्र आणि मानवी स्वभाव विशेषतः निर्णय घेण्याची मानवी क्षमता ह्यांची सांगड घालणारे एक क्षेत्र आहे. अर्थशास्त्र, राजकारण, युद्धशास्त्र इत्यादीने अनेक क्षेत्रांत गेम थेअरी वापरली जाते. गेम थेअरी मधील काही संकल्पना जर आपण समजून घेतल्या तर अनेक क्षेत्रांत आपण निर्णय पद्धतीने घेऊ शकतो.

गेम म्हणजे काय ?

बुद्धिबळ हा एक खेळ आहे आणि ह्यांत दोन खेळाडू एक मेका विरुद्ध खेळतात. ह्या खेळाचे ठराविक नियम असतात आणि आलटून पालटून प्रत्येक खेळाडू एक निर्णय घेतो. प्रत्येक निर्णय घेण्याआधी खेळाडूंकडे काही "पर्याय" असतात. निर्णय म्हणजे ह्या पर्यायातून तो एक पर्याय निवडतो.

गेम हि संकल्पना अशीच आहे. गेम मध्ये एक किंवा अनेक "एजन्ट" असतात. प्रत्येक एजन्ट नियमा प्रमाणे निर्णय घेतो. एजंट रॅशनल आहेत असे बहुतेक वेळा मानले जाते म्हणजे एजंट वेडे नसतात आणि प्रत्येक निर्णय आपली विचारक्षमता वापरून घेतात.

आता काही सोपी उदाहरणे पाहूया :

१. श्री पाटील आणि श्री पवार आमदारकीच्या निवडणुकीत एक मेका विरुद्ध उभे आहेत. हि झाली "कॉम्पिटिटिव्ह गेम" म्हणजे दोघेही एक मेका वर कुरघोडी करायचा प्रयत्न करत आहेत.

२. कुमार श्रेयस आणि कुमारी प्रिया दोघेही शिकायला हुशार नाहीत पण परीक्षा हाल मध्ये त्यांचे बेंच एका मेकांच्या शेजारी आहेत म्हणून दोघेही जण कॉपी करायचा बेत आखतात. हि झाली कॉऑपरेटिव्ह गेम.

आपण दररोज अश्या अनेक प्रकारच्या गेम मध्ये भाग घेतो.

गेम चे तीन प्रकार अतिशय सोपे आणि कॉमन आहेत.

१. झिरो सम गेम

"कुठे तरी मातीचा ढिगारा दिसला तर कुठेतरी खड्डा पडला आहे असे समजावे." असा एक वाक्प्रचार आहे. हा झिरो सम गेम संकल्पनेचा गाभा आहे. इथे एकाचा संपूर्ण फायदा आणि दुसऱ्याचे "तितकेच" नुकसान होते. झिरो सम गेम मध्ये लोक शक्यतो कमीच भाग घेतात. मित्राबरोबर जर आपण एखादी शर्त लावली असेल तर ती झिरो सम गेम असते. उदाहरणार्थ "उद्या भारत जिंकला तर मी तुला १०० रुपये देईन नाही तर तू मला १०० रुपये दे".

मानवी मन अनेक वेळा काही घटनांना "झिरो सम गेम " म्हणून मॉडेल करते पण प्रत्यक्षांत ह्या घटना "झिरो सम गेम" नसतात त्या मुले आपलेच फार नुकसान होते. चांगले उदाहरण म्हणजे वाहतुकीतील बेशिस्त पणा. अनेक लोकांना वाटते कि दुसरा माणूस वेळेवर पोचला ह्याचा अर्थ आपण लेट पोचू पण प्रत्यक्षांत सर्वच चालकांनी जर एक मेकाला नियम व्यवस्थित पाळून जाण्याची मदत केली तर सर्व वाहतूक जास्त सुरळीत पने चालेल आणि सर्वच लोक लवकर पोचतील.

२. निगेटिव्ह सम गेम

समजा मी तुमचा लॅपटॉप चोरून नेला तर ती "झिरो सम गेम " ठरेल काय ? वर वर पाहता असे वाटेल कि होय कारण तुमचा लॅपटॉप गेला आणि तो मला मिळाला. पण समजा तुम्ही फ्रीलान्सर आहेत आणि लॅपटॉप वापरून तुम्ही महिना १ लाख रुपये कमावता. मी बेकार असून लॅपटॉप चित्रपट पाहण्यासाठी वापरते. इथे तुमचे फक्त लॅपटॉप चे नुकसान नाही झाले तर लॅपटॉप नसल्यामुळे तुमचा जो धंदा बुडाला त्याचे सुद्धा नुकसान झाले. आणि माझा विशेष फायदा नाही झाला कारण चित्रपट पाहण्याशिवाय त्या लॅपटॉप चा मला नाही.

तुम्हाला झालेला फायदा (नुकसान म्हणजे निगेटिव्ह फायदा) आणि मला झालेला फायदा ह्यांची बेरीज केली तर बाकी निगेटिव्ह येते. म्हणून निगेटिव्ह सॅम गेम.

समाज तुमच्या तिजोरीत भरपूर पैसे आहेत. तुम्ही अश्या लोकवस्तीत राहता जिथे फार चोऱ्या होतात. म्हणून तुम्ही एक सुरक्षा कर्मचारी ठेवलाय आणि त्याला तुम्ही दर महिना पगार देता. म्हणजे दार महिना त्या तिजोरीतील पैसे कमी कमी होत आहेत. थोडक्यांत चोरी नाही जरी झाली तरी हि निगेटिव्ह सम गेम झाली कारण निव्वळ चोरीच्या भीतीने तुमचे पैसे कमी कमी होत आहेत.

आता तुम्ही एका चांगल्या लोकवस्तीत राहायला गेला जिथे चोरीची शक्यता कमी आहे इथे तुम्ही सुरक्षा कर्मचारी नाही ठेवला तर पैसे तिजोरीत ठेवणे हि झिरो सम गेम झाली.

२. पॉसिटीव्ह सम गेम

हि संकल्पना बहुतेक लोकांना समजायला अवघड जाते. तुम्ही सलून मध्ये जाता आणि केस कापून घेता. कपणारीला ५०० रुपये देता. हि कसली गेम झाली ? अनेक वेळा लोक ह्याला झिरो सम गेम समजतात. मी तिच्या दुकानातून बाहेर पडताना माझ्या खिश्यांत ५०० रुपये कमी आणि तिच्या खिश्यांत ५०० रुपये जास्त म्हणजे झिरो सम गेम झाली ना ?

नाही. कारण तुम्ही तिला ५०० रुपये दिले ते तिच्या २० मिनिटा साठी. तिने आपले कौशल्य वापरून तुमचे २० मिनिटांत केस कापले. तेच केस जर तुम्ही स्वतः कापायचे ठरवले असते तर तुम्हाला आधी ते कौशल्य हजारो रुपये खर्च करून मिळवावे लागले असते. नंतर इतर सर्व साधन साहित्य विकार घ्यावे लागले असते. नंतर २० मिनटात तुम्ही स्वतःचे केस कापून ५०० रुपये वाचवले असते. पण तुमच्या वेळाची (केस कापायचा वेळ आणि कौशल्य प्राप्त करायचा वेळ) किंमत ५०० रुपये पेक्षा जास्त असल्याने तुम्ही तिला ५०० रुपये देऊन जास्त पैसे वाचवले.

ह्या उलट ती सलून वालीने आधीच २ लाख रुपये खर्च करून कोर्स केलाय आणि दुकान भाड्यावर घेतली. तिला केस कापायला ३०० रुपये खर्च येतो (दुकानाचे भाडे वगैरे धरून). आणि तुम्ही जेव्हा ५०० रूपये देता तेंव्हा तिला २०० रुपये फायदा होतो. थोडक्यांत काय तर तुम्ही जेंव्हा त्या दुकानातून बाहेर पडत तेंव्हा तुम्हा दोघांना फायदा होतो.
म्हणून ह्याला "पॉसिटीव्ह सम गेम" म्हणतात.

इथे फायदा हा तीन गोष्टींवर अवलंबून असतो :

१. तुमच्या दोघांच्या गरजा मधील तफावत. (तुम्हाला चांगली हेरस्टाईल हि ५०० रुपया पेक्षा जास्त महत्वाची वाटते, तिला ५०० रुपये तिच्या २० मिनिटा पेक्षा जास्त महत्वाचे वाटतात)
२. तुमच्या दोघांच्या कौशल्या मधील तफावत. (समजा तुम्ही डॉक्टर आहेत आणि २० मिनिटांची तुमची फी ८०० रुपये आहे तर तुम्ही पैसे कमावण्यात त्या सलून वाली पेक्षा जास्त चांगले आहेत तर ती तुमच्या पेक्षा केस कापण्यात जास्त सक्षम आहे)
३. तुमच्या मनाचे समाधान.

तिसरा पॉईंट थोडा साधारण वाटला तरी अर्थशास्त्राचे मूळ ह्या तिसऱ्या मुद्यात आहे. प्रत्येक माणूस आपल्या सध्याच्या स्थितीबद्दल नेहमीच असमाधानी असतो आणि म्हणूनच "असमाधाना" कडून "समाधानाकडे" तो वाटचाल करण्याच्या प्रयत्न करतो. सर्व मानवी हालचाली ह्यातूनच निर्माण होतात. तुम्ही अन्न ग्रहण करतात ते भूक लागली म्हणून, तुम्ही टीव्ही व करतात तो बोर झालात म्हणून इत्यादी इत्यादी.

कदाचित तुम्हाला आपली चांगली हेरस्टाईल करून जास्त समाधान मिळत असेल आणि त्या समाधानाची किंमत तुमच्या दृष्टीने ५०० रुपया पेक्षा जास्त असेल. म्हणून तुम्ही ५०० रुपये खर्च करायला मागे पुढे पाहत नाही. ह्या उलट तुमच्या जागी मी असते तर ५०० रुपये हि किंमत जास्त वाटून मी आणखीन काही पर्याय शोधला असता.

प्रत्येक मानवाचे मन वेगळे असते आणि म्हणून प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्टीची किमंत वेगवेगळी ठरवतो. "पॉसिटीव्ह सम गेम" ह्याची संकल्पना ह्यावरच आधारित आहे.

व्यापार आणि पॉसिटीव्ह सम गेम.
जेंव्हा जेंव्हा दोन व्यक्ती एकमेकांच्या संमतीने (कुणाचीही कसलीही जबरदस्ती नसताना) काही व्यवहार करतात तेंव्हादोघांनाही दोन्ही लोकांना त्यातून फायदा होतो. कारण जर फायदा नसता झाला तर मुळी त्यांनी त्या व्यवहारांत भागच नसता घेतला.

पण हे सर्वच लोकांना स्पष्ट दिसत नाही. उदाहरणार्थ एक माणूस प्लेन ने दिल्लीला जातो आणि त्या छोट्याश्या सीट साठी ५००० रुपये खूप आहेत आणि ह्या एअर लाईन्स कश्या लुटत आहेत असे सांगून हि जणू काही "झिरो सम गेम" असे भासवतो. पण आम्हाला होणारा फायदा प्रत्यक्षांत आपल्या कडे पर्याय काय आहेत त्याच्यावर अवलंबून असतो आपल्याला काय वाटते ह्यावर नाही.

उदाहरणार्थ प्लेन चा पर्याय म्हणजे १८ तासांचा रेल्वे प्रवास होता. स्वस्त असला तरी १२ तास जास्त लागले असते. अनेक लोकांना ते बारा तास ५००० रुपया पेक्षा जास्त मौल्यवान वाटतात म्हणून तर ते लोक प्लेन ने जातात. नाहीतर रेल्वेने गेले असते.

सर्वच व्यापार वर वर पाहता "पॉसिटीव्ह सम गेम" वाटले तरी ते असत नाहीत. उदाहरणार्थ जेंव्हा सरकार व्यापारांत लुडबुड करू लागते तेंव्हा दोन्ही व्यक्तींचा फायदा कमी होतो तर कधी कधी एकाच व्यक्तीचा फायदा होतो. जेंव्हा फक्त BSNL देशांत सेवा देत होती तेंव्हा तुम्ही स्वतःच्या मर्जीनेच bsnl ची सेवा घेतली होती पण सरकारने इतर खाजगी कंपन्यांना प्रवेश नाकारून तुमचे पर्याय कमी केले होते. जेंव्हा ते पर्याय निर्माण झाले तेंव्हा लोकांनी ते जास्त प्रमाणात निवडले ह्यावरून bsnl ने लोकांचे किती नुकसान केले हे आता लक्षांत येते.

** रिक्षाचे दर

फार चांगले उदाहरण म्हणजे रिक्षा चे दर. इथे सरकार हस्तक्षेप करून प्रवाश्यांचा फायदा करण्यासाठी दर निर्धारित करते. थोडक्यांत काय तर रिक्षावाला तुम्हाला स्वतःच्या मर्जीने नेत नाही तर सरकारी जबरदस्तीने त्या रेट वर नेतो. इथे सर्व प्रवास पॉसिटीव्ह सम गेम नसतात.

उदाहरण १ : तुम्हाला दहावीची परीक्षा द्यायची आहे आणि त्यासाठी तुम्ही रिक्षाला हात दाखवता. रिक्षाने तुम्हाला नाही नेले तर अक्खे वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे. तुमच्या दृष्टीने त्या प्रवासाची किंमत १००० रुपये आहे पण रिक्षावाला फक्त १५ रुपये चार्ज करू शकतो.

उदाहरण २: काही मुले चित्रपट पाहण्यासाठी मॉल ला जात आहेत. उशीर झाला तर १०० रुपयांचे तिकीत बुडेल म्हणून त्या प्रवासाची किंमत त्या मुलां साठी ३०० रुपये आहे. पण रिक्षावाला फक्त १५ रुपये चार्ज करू शकतो.

उदाहरण ३: एक तरुण मुलगी रात्री स्टेशनवर आली आणि तिला घरी जायचे आहे. तिला स्वतःच्या सुरक्षेची भीती वाटते आणि तिचं दृष्टीने ती ५०० रुपये सुद्धा मोजायला तयार आहे जर सुरक्षेची हमी असेल तर. पण रिक्षावाला फक्त १५ रुपये चार्ज करू शकतो.

वरील तिन्ही उदाहरणात प्रत्येक प्रवाश्याला आपल्या प्रवासाची किंमत वेग वेगळी आहे पण रिक्षावाल्याला मात्र फायदा सेम आहे. ह्यामुळे तुमच्या गरजेची त्याला अजिबात पर्वा नाही. त्याच्यासाठी तिन्ही प्रवासी सेम आहेत. त्यामुळे तो कदाचित दहावीच्या मुलाला न नेता चित्रपट पाहायला जाण्याऱ्या मुलांना मुलांना घेऊन जाईल.

रिक्षाच्या उदाहरणात सरकारने दर निर्धारीत केल्याने काही तरी नाविन्यपूर्ण करून जास्त फायदा तो करू शकत नाही उलट फक्त प्रवाश्याना लुबाडून जास्त फायदा करू शकतो. ह्यामुळे लुबाडणाऱ्या लोकांचे जास्त फावते आणि अश्या व्यवसायांत त्यांचा एकदा वाढत जातो. उदाहरणार्थ एखादी महिला चला ५x दर आकारून रात्री अपरात्री महिला प्रवाश्याना नेण्याचे काम करू शकत होती पण असे काम बेकायदेशीर ठरते. जो रिक्षावाला प्रामाणिक आहे जो लुबाडत नाही त्याला रात्री अपरात्री काम करण्यासाठी काहीच इन्सेन्टिव्ह राहत नाही उलट जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना रात्री अपरात्री काम करायला जास्त स्फुरण चढते.

रिक्षा किंवा बस चे दर निर्धारित करून आपला फायदा होतो असे अनेक जणांना वाटले तरी त्यामुळे अनेक प्रकारच्या नाविन्यपूर्ण सेवा आम्हाला मिळत नाहीत.

** समाज आणि व्यक्ती

एका व्यक्तीसाठी आपण गेम थेअरी कशी काम करते हे पहिले पण संपूर्ण समाजासाठी ती कशी काम करते हे सुद्धा पाहणे मजेशीर आहे. आपल्या समाजांत करोडो देवाणघेवाण दरक्षणी होतात. कुणी रिक्षाने प्रवास करतो तर कुणी मार्केट मध्ये भाजी विकत घेतो तर कोणी फोन वरून SMS पाठवतो.

समजा भारतातील सर्व १००% देवाणघेवाण झिरो सम गेम आहेत. ह्याचा सामाजिक स्तरावर अर्थ काय ? ह्याचा अर्थ हाच कि त्या देवाण घेवाण नसत्या झाल्या तरी काही फायदा नव्हता कारण एकूण संपत्ती तितकीच राहिली आहे.

समाजा भारतातील सर्व १००% देवाण घेवाण निगेटिव्ह सम गेम आहेत ह्याचा सामाजिक स्तरावरील अर्थ काय ? तर प्रचंड वेगाने आपली संपत्ती कमी होत आहे. असल्या देवाण घेवाण कमी करण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे.

जर भारतातील सर्व १००% देवाण घेवाण पॉसिटीव्ह सम गेम आहेत तर त्याचा अर्थ काय होतो ? तर भारत नवीन संपत्ती निर्माण करत आहे. लोक जास्त सुखी होत आहेत इत्यादी. जर आम्हाला जास्त सुखी व्हायचे असेल तर लोकांचा फायदा जास्तीत जास्त कसा वाढवता येईल हे पाहणे गरजेचे आहे. जितका फायदा जास्त तितक्या लवकर आम्ही गरिबी हटवू शकतो.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

अभिजीत अवलिया's picture

18 Aug 2017 - 6:13 am | अभिजीत अवलिया

लेख आवडला.

ढब्ब्या's picture

18 Aug 2017 - 6:46 am | ढब्ब्या

आवडला.

साहना's picture

18 Aug 2017 - 6:52 am | साहना

धन्यवाद.

लेख आवडला, विचार करण्यालायक आहे. एखादे काम करून घेण्यासाठी लाच देणे हा कोणता सम गेम आहे?

एकच कृती शॉर्ट टर्म मध्ये पॉझिटिव्ह सम पण लॉन्ग टर्म विचार केला तर निगेटिव्ह/ झिरो सम असू शकते का?

मिल्टन's picture

18 Aug 2017 - 10:58 am | मिल्टन

मस्त लेख. आवडला.

समाजवादी विचारांच्या लोकांना पॉझिटिव्ह सम गेम असू शकतात यावर विश्वासच नसतो. त्यामुळे संपत्ती वाढविण्यापेक्षा संपत्तीचे समान वाटप व्हावे याकडे त्यांचा कल असतो. आमच्या मिल्टन फ्रिडमन साहेबांनी अशा लोकांविषयी पुढील गोष्ट म्हटली आहे.

1

आदूबाळ's picture

18 Aug 2017 - 11:15 am | आदूबाळ

ये बात! आवडलं! लिहीत राहा.

खेडूत's picture

18 Aug 2017 - 11:38 am | खेडूत

आवडला!
अन्य अनेक गेमांविषयी वाचायला आवडेल, जसे चिंधीगिरी किंवा मिनिमलिस्ट असणे हे गेम्स आहेत का?
१. एका मित्राच्या सोसायटीत तीन सुरक्षा रक्षक आहेत. तो सेक्रेटरी आहे, त्याने असा नियम केलाय, की अकरा महिने झाले की प्रत्येक वॉचमनला एक महिना ब्रेक द्यायचा, दोघांवर भागवायचे. त्यामुळे तो ८.३३% वाचवतो म्हणे. या काळात बदली रक्षक न ठेवण्याच्या अटीवर एजन्सी निवडली आहे. :)
२. बंबूशेठच्या घरासमोर अन घरापासून एक किमी वर दुसरा बसस्टॉप आहे, तिथेपर्यंत चालून बस पकडल्याने रोजचे पाच रुपये कमी लागतात. उर्वरित नोकरीत फक्त १५००० वाचणार असल्याने ते नेहमी असेच करतात!

अत्रे's picture

18 Aug 2017 - 1:24 pm | अत्रे

बंबूशेठच्या घरासमोर अन घरापासून एक किमी वर दुसरा बसस्टॉप आहे, तिथेपर्यंत चालून बस पकडल्याने रोजचे पाच रुपये कमी लागतात. उर्वरित नोकरीत फक्त १५००० वाचणार असल्याने ते नेहमी असेच करतात!

चालण्यामुळे बांबूशेठ चे आरोग्य सुधारू शकते. त्यामुळे हा फायदा पैशात कसा मोजणार?

९% पैश्यांची बचत होते तर एक माणूस कमी असल्याने तितकी रिस्क सुद्धा वाढते. आता ती रिस्क किती आहे ह्यावर त्या ९% टक्के बचतीला पॉसिटीव्ह किंवा निगेटिव्ह ठरवावे लागेल.

> बंबूशेठच्या घरासमोर अन घरापासून एक किमी वर दुसरा बसस्टॉप आहे, तिथेपर्यंत चालून बस पकडल्याने रोजचे पाच रुपये कमी लागतात. उर्वरित नोकरीत फक्त १५००० वाचणार असल्याने ते नेहमी असेच करतात!

रंजक प्रश्न आहे. बाम्बु शेठ ना ते एक कीमी किती वेळ लागतो ? त्या वेळाची किंमत ५ रुपयांपेक्षा कमी असेल तर हि पॉसिटीव्ह गेम म्हटली जाऊ शकते.

महेश हतोळकर's picture

18 Aug 2017 - 12:24 pm | महेश हतोळकर

मस्त लेख. आवडला. आजून सविस्तर लिहा. मराठीत असे लिखाण खूप कमी आहे.

अनुप ढेरे's picture

18 Aug 2017 - 12:34 pm | अनुप ढेरे

मस्तं लेख! आवडला.

===
एक जोकः
सोशलिस्ट माणुसः एक १०" पिझ्झा द्या.
हाटेलवाला: सहा तुकडे करु का आठ?
सोशलिस्ट माणुसः आज खूप भूक लागलिये. आठ तुकडे करा.

निनाद आचार्य's picture

18 Aug 2017 - 12:48 pm | निनाद आचार्य

फारच छान लेख॰ खूप दिवसापासून गेम थियरि बद्दल वाचण्याची इच्छा होती॰ धन्यवाद!

वरुण मोहिते's picture

18 Aug 2017 - 1:01 pm | वरुण मोहिते

आवडलं .

स्त्री-पुरुष काम विभागणी. एकाने घराबाहेर जॉब करायचा, दुसर्याने घर सांभाळायचं - हा कोणता गेम आहे?

(अवांतर: लेखिकेने प्रश्नांची उत्तरे दिली तर बरे होईल, फक्त लेख नको, वाचकांशी संवाद पण हवा)

या प्रश्नावर लेखिकेचे उत्तर वाचायला आवडेल.

पण समाज/सरकारने लादलेली मोनोगमीची सक्ती 'जेंव्हा जेंव्हा दोन व्यक्ती एकमेकांच्या संमतीने (कुणाचीही कसलीही जबरदस्ती नसताना) काही व्यवहार करतात' या must conditionच्या विरोधात नाही का?

बाकी लेख आवडला.

चांगला प्रश्न आहे आणि उत्तर कठीण आहे.

कधी कधी महिला जर घरी राहिली तर पुरुषावरचा इतर ताण कमी होऊन तो आपल्या करिअर वर जास्त ध्यान देऊ शकतो आणि जास्त पैसे कमावू शकतो. पुरुषाची जर कार्यक्षमता त्याच्या पत्नीपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे तर बहुतेक वेळा महिलेने काम न करता पुरुषाचा वेळ केंद्रित केले तर हि पॉसिटीव्ह गेम ठरू शकते.

.

पिलीयन रायडर's picture

19 Aug 2017 - 6:48 am | पिलीयन रायडर

ह्यात पुरुषाची कार्यक्षमाता अधिक आहे असे मानले आहे. दुसरे असे की घरी बसण्यामुळे होणारे फायदे हे बाहेर नोकरी करण्यामुळे मिळणार्‍या फायद्यांपेक्षा अधिक आहेत हे ही मानले आहे. म्हणुन हा पॉझीटिव्ह गेम होतोय.

पण समजा बायको सुद्धा स्किल्ड आहे तर घरात तिनेही पगार आणुन त्यातला काही भाग आणखीन २-३ बायकांना रोजगार देण्यात घालवला तर त्या केस मध्ये नोकरी करणे हा पॉझिटिव्ह गेम असु शकतो.

मला वाटतं ह्या प्रश्नाचे उत्तर हे तुम्हाला कशात "समाधान" मिळते ह्यावर अवलंबुन आहे.

जर बायकोला स्वतःच्या करिअरमध्ये जास्त रस असेल तर ती घरात राहुन असमाधानी असु शकते. किंवा जर तिला घर सांभाळण्यातच मनापासुन रस असेल तर ती समाधानी असेल.

किंवा नवर्‍याचे नोकरीची वेळ फिक्स नसेल आणि दोघे मिळुन घर आणि काम सांभाळु शकत असतील तर हा पॉझिटिव्ह गेम असु शकतो. पण समजा नवरा अत्यंत धकाधकीच्या नोकरीत आहे/ अनेक दिवस बाहेर फिरतीच्या नोकरीत आहे, तर कदाचित बायकोने एकटीने नोकरी सकट घर सांभाळणे निगेटिव्ह गेम असु शकतो. कारण त्यात मोनेटरी बेनेफिट असले तरी दगदग आणि ताण जास्त आहे. पण पुन्हा एकदा, हे त्या व्यक्तिचे समाधान कशात आहे ह्यावरच अवलंबुन आहे.

अर्थात ही वरची सर्व उदाहरणे व्हाईस व्हर्सा आहेत. बायकोने नोकरी केली आणि नवरा घरी बसला तरी हे सगळं लागु होऊ शकतं. रादर प्रश्न हा केवळ एकाने नोकरी करणे आणि एकाने घरी बसणे हा आहे. आणि माझ्यामते उत्तर तुम्ही लेखात उदाहरण दिले तसे कुणाला काय महत्वाचे वाटते ह्यावरुन ठरवता येईल.

लेख अत्यंत आवडला. गेम थिअरी विषयी थोडं वाचलं होतं पण ह्या लेखाने जास्त चांगल्या पद्धतीने कन्सेप्ट समजली.

राजाभाउ's picture

18 Aug 2017 - 2:16 pm | राजाभाउ

आवडला

शलभ's picture

18 Aug 2017 - 3:41 pm | शलभ

छान माहिती

मराठी कथालेखक's picture

18 Aug 2017 - 5:50 pm | मराठी कथालेखक

रंजक लेख.
समाजात पॉजिटिव्ह आणि निगेटीव समचे गेम चालूच असतात. अर्थात पॉजिटिव्ह गेम्सचे प्रमाण जास्त आहे म्हणूनच जगण्यात अर्थ आहे.
पण काही वेळा "पॉजिटिव्ह आणि निगेटीव" ही विभागणी तितकीशी सोपी नसते.
उदा: पोलीस खाते , सैन्यदले यावरील खर्च
जर देशात गुन्हे घडत नसतील किंवा अजिबातच घडणार नसतील तसेच शेजारील देश पण अजिबात हल्ला करणार नसेल तर पोलीस , सैन्यदले यांची गरज भासणार नाही. याचा अर्थ देशांतर्गत गुन्हेगारी वा देशाबाहेरुन होणारे हल्ले यांच्या केवळ भितीने आपण मनुष्यबळ आणि शस्त्रास्त्र देशाचा कितीतरी पैसा खर्च होत असतो.
पण त्याचवेळी अनेक लोकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार मिळतो , त्यांच्याकडे क्रयशक्ती निर्माण होते /वाढते.
आता असेही म्हणता येईल की सरकारने हा खर्च न करता तेवढ्या पैशांत दुसरे उधोगधंदे उभारले तरी रोजगार उपलब्ध होवू शकेल. पण असे कोणते उद्योग उभारता येवू शकतील ज्यांच्या उत्पादन (वा सेवेस) खरोखर मागणी असेल हा ही एक प्रश्न आहे. थोडं पुढं जावून एक
तुलना करु शकतो. आता भारताचं सैन्यबळ एकूण दहा लाखांच्या आसपास आहे (नक्की आकडेवारी शोधता येईल , पण अंदाजे ) आता साधारण ३००-४०० वर्षांपुर्वी , शिवाजी महाराजांच्या काळात वगैरे देशाच्या (म्हणजे आताचा भारत जितक्या भूभागावर आहे अंदाजे तितकाच भूभाग ) सगळ्या राजांकडचे मिळून एकूण सैन्य नक्कीच कितीतरी जास्त होते.. कारण ? त्यावेळी लढाया , युद्ध जास्त होत हे जरी असलं तरी अनेकांना करण्यासारखं पुरेसं काम नव्हतं असही असेल का?
पॉजिटिव्ह सम हे खरंच नेहमी पॉजिटिव्ह असतो की तो तसा भास असतो ? कोणताही व्यहवार हा खर्‍याखुर्‍या गरजेतून निर्माण होतो की उत्पादन कंपन्यानी त्यांच्या गरजेपोटी निर्माण केलेली ती फसवी गरज असते ?
१) मी एका कार बनवणार्‍या कंपनीत काम करतो, कंपनीला प्रगती करायची आहे, ती उत्पादन ,विक्री वाढवण्याचा जोरदार प्रयत्न करत आहे, मी खूप मन लावून आणि भरपूर काम करत असल्याने कंपनी मला चांगला पगार देत आहे आणि त्या पगारातून मी माझ्या स्टेटसला शोभेल अशी महागडी कार घेतो...
२) चित्रपट निर्माते भरपूर पैसा खर्च करुन सिनेमा बनवतात, कलाकारांना करोडोंत मानधन मिळतेय...अनेक तंत्रज्ञ, दुय्यम कलाकार यांनाही मस्त पैसे मिळतायत.. असे अनेक चित्रपट येत आहेत. आणि लोक मेहनतीच्या पैशातून १५०-२०० वा त्याहून महागडे तिकीट काढून हे प्रत्येकी दोन-अडीच तासांचे सिनेमे बघत आहेत. सांगा हे पॉजिटिव की निगेटिव ? आणि खर्चलेल्या पैशांव्यतिरिक्तही इतर गोष्टींचा विचार करायला हवा.. अप्रत्यक्षपणे अनेक गोष्टी घडतात. जसे लोकांचा बराच वेळ सिनेमे बघण्यात गेल्याने (झालेच तर सोबत घरातल्या टीवीवर मालिकांचा रतीब आहे..)त्यांचे इतर कौशल्याविकासाकडे दुर्लक्ष होणे, कुटूंबातील संवाद कमी होणे...याचा पुढे परिणाम की लोकांच्या क्षमता अविकसित राहून उत्पादकतेवर परिणाम होवू शकतो.

मी हे थोडं विस्कळीतपणे लिहिलंय हे मान्य. पण अर्थशास्त्र मुळातच खूप रंजक पण तितकाच गुंतागुंतीचा विषय आहे असं मला वाटतं (एमबीए मध्ये थोडासा परिचय झाला आहे..फार अभ्यास नाही) अजून खूप चर्चा करता येईल.. करायला आवडेल

अनुप ढेरे's picture

18 Aug 2017 - 7:04 pm | अनुप ढेरे

तस बघायला गेलं तर अन्न, तेही अगदी कमीत कमी एवढीच मूळ गरज आहे. रोज एक पोळी खाल्ली फक्तं तरी जगाल. मग रोज दोन पोळ्या खाणं ही फसवी गरज म्हणाल काय?

मराठी कथालेखक's picture

18 Aug 2017 - 7:33 pm | मराठी कथालेखक

फक्त एक पोळी खाली तर जगाल.. पण ते अगदीच किमान जगणं होईल , उत्पादकता जवळपास शून्य असेल. उठून पोळी बनवायची पण ताकद असणार नाही.
त्याउलट रोज अनेक पदार्थांनी बनलेली थाळीच समोर हवी असं म्हंटलंत तरी गरजेपेक्षा जास्त आहार घेण्यानंही प्रकृतीचे नुकसान होवू शकते , पुन्हा उपचारांची गरज पडू शकते.

> चित्रपट निर्माते भरपूर पैसा खर्च करुन सिनेमा बनवतात, कलाकारांना करोडोंत मानधन मिळतेय...अनेक तंत्रज्ञ, दुय्यम कलाकार यांनाही मस्त पैसे मिळतायत.. असे अनेक चित्रपट येत आहेत. आणि लोक मेहनतीच्या पैशातून १५०-२०० वा त्याहून महागडे तिकीट काढून हे प्रत्येकी दोन-अडीच तासांचे सिनेमे बघत आहेत. सांगा हे पॉजिटिव की निगेटिव ? आणि खर्चलेल्या पैशांव्यतिरिक्तही इतर गोष्टींचा विचार करायला हवा.. अप्रत्यक्षपणे अनेक गोष्टी घडतात. जसे लोकांचा बराच वेळ सिनेमे बघण्यात गेल्याने (झालेच तर सोबत घरातल्या टीवीवर मालिकांचा रतीब आहे..)त्यांचे इतर कौशल्याविकासाकडे दुर्लक्ष होणे, कुटूंबातील संवाद कमी होणे...याचा पुढे परिणाम की लोकांच्या क्षमता अविकसित राहून उत्पादकतेवर परिणाम होवू शकतो.

निश्चितच पॉसिटीव्ह सम गेम. मुळांत कुठल्याही वस्तू आणि सेवेची किंमत प्रत्येक माणसाला वेगळी असते. जेंव्हा लोक स्वतःहून चित्रपट बघायला जातात तेंव्हा त्यांनी आधीच इतर गोष्टीपेक्षा चित्रपटावर खर्च करणे हे चांगले असा निर्णय घेतलेला असतो. "चित्रपट पाहिल्यामुळे वेळेचा अपव्यय होतो" वगैरे असे तुम्हाला किंवा मला वाटले तरी इतर लोकांना तसेच वाटते असे नाही. चित्रपट पाहिल्याने "अमुक तमुक नुकसान होते" असे तुमचे जे मत आहे ते तुम्ही दुसऱ्यावर लादणे बरोबर नाही त्यामुळे इतर लोकांचा चॉईस कमी होऊन ते "सब ऑप्टिमल" निर्यय घेतात. आपले राजकारणी नेहमीच अशी चूक करतात आणि त्यामुळेच दळिद्री राहिला आहे. एखाद्या गोष्टीची किंमत तोच माणूस निर्धारित जेंव्हा त्या माणसाचा त्या देवाण हिस्सा असतो. ह्याला "स्किन इन द गेम" असे म्हणतात.

मराठी कथालेखक's picture

20 Aug 2017 - 11:39 pm | मराठी कथालेखक

चित्रपट पाहिल्याने "अमुक तमुक नुकसान होते" असे तुमचे जे मत आहे ते तुम्ही दुसऱ्यावर लादणे बरोबर नाही

मी मत लादले ? मला वाटते की मी मत फक्त मांडले होते.

तुमचे लेख चांगले असतात पण प्रतिक्रियांकडे तुम्ही सकारात्मक पद्धतीने न बघता 'वादाचा मुद्दा' बनवता असे खेदाने म्हणावेसे वाटते.
असो. वाद न होता चर्चा होणार असेल तर मला पुढे बोलायला आवडेल. धन्यवाद.

कदाचित मी चुकीचा शब्दप्रयोग केला असेल. तुमच्यावर व्यैयक्तिक कमेंट करण्याचा इथे अजिबात हेतू नव्हता. क्षमस्व.

मराठी कथालेखक's picture

21 Aug 2017 - 1:33 pm | मराठी कथालेखक

ठीक आहे..
मला फक्त हे म्हणायचे की वेगवेगळ्या कोनातून विचार होणे गरजेचे आहे...चित्रपट , मालिका ई तर मी पण बघतो, त्यामुळे बघू नये असं मी कसं म्हणणार..पण ते बघणे (म्हणजे अतिप्रमाणात ) कितपत योग्य आहे याचा विचार ज्याने त्याने करायला हवा.
एकदा असेच कसलीशी चर्चा चालू असताना कुणीतरी म्हणालं की "हे गिर्यारोहक वगैरे यांचं इतकं का कौतूक ? त्यांचा समाजाला काय उपयोग ? स्वतःच्या मनोरंजना करिता केवळ ते गिर्यारोहण करतात" ..त्यावेळी मी मुद्दा मांडला होता की "त्यांच्या गिर्यारोहणाचं कौतुक होतं तेव्हा आणखी काही तरुण या साहसी खेळाकडे वळण्यास प्रेरित होतात. त्याकरिता स्वत:च आरोग्य, व्यायाम याकडे अधिक लक्ष देतात.. झालंच तर या खेळाच्या पाठीमागे लागल्याने आपसूकच कुप्रवृत्तींपासून दूर राहतात"

पगला गजोधर's picture

18 Aug 2017 - 8:09 pm | पगला गजोधर

लेखं आवडला. १+

सवडीने आणखी प्रतिक्रिया देईल.

अमितदादा's picture

18 Aug 2017 - 8:11 pm | अमितदादा

उत्तम लेख. मग घरात लपवून/साठवून ठेवलेला पैसा निगेटिव्ह सम गेम म्हणायचा का? कारण तो जोपर्यंत अर्थव्यवस्थेत येत नाही तोपर्यंत कोणतही संपत्ती निर्माण करत नाही. तसेच चिरकाल टाकणाऱ्या वस्तू नेगटीव्ह सम गेम आणि सतत consume होणाऱ्या वस्तू पॉझिटिव्ह सम गेम ला चालना देतात का?

पगला गजोधर's picture

18 Aug 2017 - 8:18 pm | पगला गजोधर

घरात लपवून/साठवून ठेवलेला

माझ्या मते होय, काळा पैसा (अर्थ बाजार - सिस्टीम बाहेर ) साठवणे, म्हणजे निगेटिव्ह सम गेम.

पैसे म्हणजे "चलन", त्याने चालणे पळणे अपेक्षित आहे (एका हातातून दुसऱ्या हातात),

तो जर डबक्यातल्या पाण्यासारखा साठून राहिला तर निगेटिव्ह सम गेम.

अमितदादा's picture

18 Aug 2017 - 8:26 pm | अमितदादा

माझं ही असच मत आहे. दुसऱ्या प्रश्नाबाबत काय म्हणता? किंवा सोने/हिरे इत्यादी बाबत काय म्हणता?

अमितदादा's picture

18 Aug 2017 - 8:26 pm | अमितदादा

माझं ही असच मत आहे. दुसऱ्या प्रश्नाबाबत काय म्हणता? किंवा सोने/हिरे इत्यादी बाबत काय म्हणता?

पगला गजोधर's picture

18 Aug 2017 - 9:06 pm | पगला गजोधर

सोने हिरे यांचा औद्यौगिक वापर ( ड्रिलिंग, उपग्रह स्पेयर्स, मिष्टान्न, कपड़े), अर्थव्यवस्थेत अल्प आहे, हा पॉजिटिव आहे...

जास्त वापर हा नोशनल इमोशनल समाधनाकरता आहे, हा निगेटिव वाटतो मला वैयक्तिकरित्या..

साहना's picture

19 Aug 2017 - 2:06 am | साहना

> मग घरात लपवून/साठवून ठेवलेला पैसा निगेटिव्ह सम गेम म्हणायचा का?

पैसे साठवून ठेवणे हि निश्चितच निगेटिव्ह सम गेम आहे कारण त्या पैश्यांचे रक्षण करण्यासाठी तुम्हाला आणखीन पैसे खर्च करावे लागतात. पैसे बँकेला व्याजावर देणे हि पोस्टीव्हिए सम गेम आहे.

सोने किंवा स्थावर संपत्ती तुम्ही साठवून ठेवली तरी ती निगेटिव्ह गेम असेलच असे नाही कारण त्यांची किंमत काळासोबत वाढत राहते. पैश्यांचे तसे नाही त्यांची किंमत काळासोबत नेहमी कमीच होते.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Aug 2017 - 9:09 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

गेम थिअरी मधली जी गणिती प्रक्रिया आहे ती भारी आहे. बिझनेस मॉडेल्समधे कशी वापरली जातात ते वाचायला आवडेल.

लेख व अभ्यासू प्रतिसाद आवडले

तेजस आठवले's picture

19 Aug 2017 - 5:16 pm | तेजस आठवले

चांगला लेख. अजून उदाहरणे दिलीत तर वाचायला आवडतील.
सहज म्हणून, खालील उदाहरणे देतो आहे. चर्चा वैयक्तिक विचारसरणीवर आधारित असतील. भरपूर मतप्रवाह बघायला मिळतील.
१. इकडे आम्हाला प्यायला पाणी नाही आणि ह्यांच्याकडे मंगळावर यान पाठवायला पैसे आहेत.(प्यायला पाणी नाही पण हातात स्मार्टफोन आहे / घरात संडास नाही पण दारात बुलेट आहे इ.इ.)
२. पणजोबांपासून दर पिढीत घेतलेले सोने, जे आता साधारण १०० तोळे साठले आहे. (सध्याचा दर ३० हजार, पणजोबांच्या काळात दर ५०० रु. / घरात ठेवले अथवा दागिने घालून फिरले तर धोका, लॉकरमध्ये ठेवले तर त्याचे अव्वाच्या सव्वा वाटणारे दर / दागिने मोडायचे म्हटले तर येणारी घट आणि घडणावळ इ.इ.)
३. कंपनी प्रवासखर्चासाठी वातानुकूलित बस चे तिकीट दर गृहीत धरून एक ठराविक रक्कम देऊ करते. पैसे वाचवण्यासाठी साध्या बस अथवा रेल्वे ने जाणे.(आरामात शिवनेरीमधून / भरपूर उकाड्यात साधारण डब्यातून केलेला प्रवास / प्रवासातील दगदग, कटकटी इ.इ.)
४.अ-ब-क. अ ते क तिकीटदर १३ रुपये, ब ते क १० रुपये. अ ते ब अंतर चालण्यास ६ मिनिटे लागतात. ३ रुपये का ६ मिनिटे, कशाचे मोल जास्त? हे त्या वेळेच्या परिस्थितीवर अवलंबून आहे.
५. एलईडी दिवे कमी ऊर्जा वापरतात म्हणून जुने सीएफएल फेकून देऊन नवीन एलईडी विकत आणणे.

साहना's picture

20 Aug 2017 - 2:14 pm | साहना

> १. इकडे आम्हाला प्यायला पाणी नाही आणि ह्यांच्याकडे मंगळावर यान पाठवायला पैसे आहेत.(प्यायला पाणी नाही पण हातात स्मार्टफोन आहे / घरात संडास नाही पण दारात बुलेट आहे इ.इ.)

गेम थेअरी पेक्षा हे False Dichotomy चे अगदी चपखल उदाहरण आहे.

माझे आवडते उदाहरण :

शाहरुख चा चित्रपट पाहायला आणि साईबाबांचे दर्शन घ्यायला तासभर रांगेत उभे राहू शकता पण डिमॉनेटीझशन साठी एक तास ATM रांगेत उभे राहायला का कंटाळता ?

पगला गजोधर's picture

20 Aug 2017 - 2:23 pm | पगला गजोधर

शाहरुख चा चित्रपट पाहायला आणि साईबाबांचे दर्शन घ्यायला तासभर रांगेत उभे राहू शकता पण डिमॉनेटीझशन साठी एक तास ATM रांगेत उभे राहायला का कंटाळता ?

होना आता सरकारने सक्तिच केली होती हो, येत्या 2 दिवसात शाहरुखचा चित्रपट व साईबाबांचे दर्शन घ्याच म्हणून. नाही तर भाजीवाले रिक्शावाले बस उपहरगृहे औषधे दळणवाले पेट्रोलपंप कुठे कुठे तुम्हाला फिरकता येणार नाही.

साहना's picture

20 Aug 2017 - 8:52 pm | साहना
आगाऊ म्हादया......'s picture

19 Aug 2017 - 9:18 pm | आगाऊ म्हादया......

वेगळीच आहे ही दुनिया. थोडं गेलं डोक्यावरून पण हरकत नाही, कळेल हळू हळू.

दीपक११७७'s picture

21 Aug 2017 - 12:58 pm | दीपक११७७

छान माहीती
धन्यवाद

अत्रन्गि पाउस's picture

21 Aug 2017 - 1:17 pm | अत्रन्गि पाउस

लेख टाकल्या बद्दल ...अप्रतिम विवेचन

मस्त लिहिलंय. नवीन विषय काळाला. प्रतिक्रिया सुद्धा छान चक्क. बरं वाटलं वाचून. अजून वाचायला आवडेल.

योगेश लक्ष्मण बोरोले's picture

23 Aug 2017 - 9:08 am | योगेश लक्ष्मण बोरोले

एका महत्वाच्या विषयाची ओळख करुन दिलीत. धन्यवाद. प्रतिक्रियासुध्धा मस्तच आहेत. अत्रेसाहेबांचा 'शाॅर्ट टर्म व लाँग टर्म, पाॅसिटीव्ह / नागेटिव्ह' वरील प्रश्न महत्वाचा वाटतो.

अमित खोजे's picture

24 Aug 2017 - 12:19 am | अमित खोजे

खूपच सुंदर सोप्या शब्दात केलेले विवेचन आवडले. तसेच त्यावरील अभ्यासू प्रतिक्रियाही आवडल्या. 'झिरो सम गेम' च मला इतके दिवस पूर्णपणे समजत नव्हती. त्यामुळे पुढचे 'पॉझिटिव्ह सम गेम' आणि 'निगेटिव्ह सम गेम' यांबद्दल विचारच करता येत नव्हता. आता तीनही संकल्पना व्यवस्थित लक्षात आल्याने मला माझ्या व्यवसायातील अनेक निर्णय घेणे सुद्धा अधिक सोपे जाईल.

आपल्या पुढे आलेली निर्णय घेण्याची संधी किंवा परिस्थिती; हिचा सर्व बाजूने विचार करून ती परिस्थिती 'पॉझिटिव्ह सम गेम', 'निगेटिव्ह सम गेम' कि 'झिरो सम गेम' हे ठरवणे अत्यंत महत्वाचे ठरते. बऱ्याच वेळेला एकदम वेगळा विचार करून आपलया समोरील 'झिरो सम गेम' परिस्थिती हि फक्त आपल्या फायद्यासाठी किंवा व्यवहारातील सर्व भागीदारांसाठी 'पॉझिटिव्ह सम गेम' बनवता येऊ शकते. तसा विचार करण्याची आपल्याकडे फक्त क्षमता पाहिजे. हाऊस ऑफ कार्ड्स मधील मला आवडलेले वाक्य - "In the deal, when you don't have any option , Turn the Table" अशा काहीशा अर्थाचे केविन स्पेसिच्या तोंडी हे वाक्य आहे.

मात्र आपलया पुढील परिस्थितीचा सर्वांगीण विचार करणे तेवढे सोपे नसते. त्याचे अनेक दृश्य व अदृश्य पैलू असतात. जसे सुरक्षा रक्षकाच्या उदाहरणात आपण पहिले कि ११ महिन्यातून एकदा एक रक्षक कमी करून तो मित्र ८% वाचवतो परंतु त्याच वेळेला त्याचा धोका वाढलेला असतो. ३ किमी कि ५ रुपये यात आपण अदृश्य असा चालण्याचा फायदा विसरतो. तसेच चालताना त्या काकांना दुकानावरील एखादा मित्र भेटण्याची व त्याच्याशी झालेल्या संभाषणातून नवीन नोकरी/ नवीन व्यवसाय / नवीन संधी मिळण्याची अथवा तत्सम शक्यता (कितीही कमी असली तरीही) विसरतो. लॅपटॉपच्या उदाहरणातील काम करण्याची गमावलेली क्षमता. या अशा आणि अनेक अदृश्य गोष्टी आपण लक्षात घेऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला त्यावेळी जेवढा विचार करता येईल तेवढा विचार करून - प्राप्त परिस्थितीत उपलब्ध असलेल्या माहितीवर निर्णय घेऊन - आपण पुढे जातो किंवा तसे जावे. नाहीतर एखादा निर्णय घेण्यासाठी आपण वर्षानुवर्षे वेळ घेऊ शकतो आणि तोपर्यंत ती संधी निघून जाते. (बुद्धिबळ खेळातील घड्याळ)

परिस्थिती बदलली तर गेम च्या प्रकारातही बदल होऊ शकतो किंवा होतोच. 'झिरो सम गेम' 'पॉझिटिव्ह सम गेम' किंवा 'निगेटिव्ह सम गेम' होऊ शकते किंवा त्यातील सरमिसळ. उदाहरणार्थ सैन्य. जोपर्यंत युद्ध होत नाही तोपर्यंत सैन्यावरचा खर्च 'निगेटिव्ह सम गेम' समजायचं का? कि उलट आपल्या कडे एवढे सैन्य वर क्षेपणास्त्रे आहेत आहे हे पाहूनच इतर देश आपल्याशी युद्ध करायला घाबरतात त्यामुळे युद्ध होत नाही म्हणून सैन्यावरचा खर्च 'पॉझिटिव्ह सम गेम' वा 'झिरो सम गेम' आहे? मुळात युद्ध हेच या 'पॉझिटिव्ह सम गेम' वा 'झिरो सम गेम' पैकी एका प्रकारच्या गेम मध्ये मोडते का? कि नेहमी 'निगेटिव्ह सम गेम'च असते? युद्धात भाग घेणाऱ्या सर्वांचेच कमी अधिक प्रमाणात नुकसान होतेच की!

तसेच विमा. फार भारी वाक्य ऐकले होते मी. "Insurance - You don't need it until you need it." जोपर्यंत आपल्याला त्याची गरज पडत नाही तोपर्यंत विम्याचा हफ्ता म्हणजे निव्वळ खर्च. एका वर्षात जर माझ्या गाडीला काहीही अपघात झाला नाही तर ते पैसे वाया गेले. मग मी विमा घ्यायचाच नाही का? मला तर जोपर्यंत वेगवेगळ्या विम्यातील प्रकारांची माहिती घेतली नव्हती तोपर्यंत विम्यावरील खर्च बेकारच वाटायचा. मग विम्यावरील खर्च (व्यावसायिक विमा, गृहकर्ज घेताना काढलेला विमा, जीवन विमा, इत्यादी ) वायफ़ळच समजायचं का? कोणत्या प्रकारात हा गेम मोडणार मग?

विम्यावर लिहिताना इथेच मिपावर वाचलेली मुंबईच्या लोकलमध्ये लोकांनी सुरु केलेली विम्याची गोष्ट आठवली. भारी होती. तुम्ही फक्त काही ठराविक रक्कम दर महिना त्या टोळीला द्यायची आणि लोकलने अगदी चकटफू प्रवास करायचा. तिकीट तपासनिकाने पकडले तर दंड भरायचा आणि त्याची पावती या टोळीला आणून द्यायची. तुमचे दंडाचे पैसे तुम्हाला परत.

कला/क्रीडा क्षेत्रात जे काम करतात त्यांचे काम व्यर्थ मानावे का असा प्रश्न वर उपस्थित झाला. मला त्याचे उत्तर देताना पु लं चे वाक्य उधृत करावेसे वाटते - 'जर तुम्हाला दोन पैसे मिळाले तर एका पैशाची भाकरी घ्या अन दुसऱ्याचे एक फुल. भाकरी तुम्हाला कसे जगावे ते शिकवेल आणि फुल तुम्हाला 'का' जगावे हे शिकवेल.' माणूस फक्त काम करून पैसे मिळवण्यासाठी जन्माला नाही आला. त्यास मनोरंजनाचे साधन हवेच. तसेच त्याच्यातील विचारांना, कलेला उत्स्फूर्त प्रतिसाद देणारी मंडळीही हवी. नाहीतर कारखान्यातील यंत्रे व आपण यातील फरकच काय? म्हणूनच हिमालयाची शिखरे चढणाऱ्यांना 'तुम्ही तुमचा जीव एवढा धोक्यात घालून का हि शिखरे चढता?' या विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी दिलेली 'कारण ते तिथे आहे म्हणून' अशी उत्तरे सर्वांना समजत नाहीत. 'बिग बँग थेअरी' मधल्या एका भागात पेनी विचारते - "एवढे इंटरनेटवर संदेश पाठवून, कुठल्या कुठल्या देशातून तो फिरवून मग तुम्ही तुमच्या टीव्हीचे बटण का दाबता? दुकानात १० डॉलरला टीव्हीचा रिमोट मिळतो की!" त्यावर चौकडीचे उत्तर असते 'कारण आम्ही ते करू शकतो म्हणून'! हे उत्तर देखील सर्वांसाठी नाही.

सिनेमा का बनवायचा? चित्रे का काढायची? खेळ का खेळायचे? केळकर वस्तू संग्रहालयात का जायचे? शनिवारवाडा का जतन करायचा? या सर्वांवर एवढ्या मेहनतीने कमावलेले पैसे का खर्च करायचे? या सर्वांचे उत्तर मला वाटते पु लं च्या 'भाकरी आणि फुल' या वाक्यातच दडलेले आहे.

असो - अवांतर विचार बरेच मांडून झाले.

मराठी - इंग्रजी शब्दांकडे जरा अधिक लक्ष असल्यामुळे मनास खटकले काही शब्द-प्रतिशब्द
प्लेन - विमान
हेरस्टाईल - केशरचना
रॅशनल - ? (सुचवा)
लेट - उशिरा
इन्सेन्टिव्ह - ? (सुचवा)

माझ्या लेखावर विचार करून आपण इतका चांगला कमेंट टाकला ह्याबद्धल आभार. अश्या कमेंटमुळे आणखीन लिहायचा हुरूप चढतो. कृपया ह्याच विषयावरील माझा दुसरा लेख सुद्धा वाचावा.

आपण विमा बद्दल विचारले. विमा ह्या गोष्टीत जर सर्वच लोक स्वतःहून भाग घेत असतील तर विमा त्या सर्व व्यक्तींना पॉसिटीव्ह गेम ठरतो. ह्याउलट विम्यांत नक्की कोणी भाग घ्यावा ह्यावर जर सरकारी किंवा इतर दबाव असेल तर त्यातील प्रत्येक भागधारकाचा फायदा कमी होतो.

आपण विमा घेतला आणि आपणाला त्याची कधीही गरज पडली नाही तर विमा हा निगेटिव्ह गेम समजायची का ? नाही. कारण "भविष्य हे अनिश्चित असते" ह्या आधारावर आपण आपल्या मानसिक शांती साठी विमा विकत घेतो. जेंव्हा विम्याची गरज पडली नाही तेंव्हा विमा आपण मानसिक शांती साठी घेतला आहे असे समजावे.

> सिनेमा का बनवायचा? चित्रे का काढायची? खेळ का खेळायचे? केळकर वस्तू संग्रहालयात का जायचे? शनिवारवाडा का जतन करायचा? या सर्वांवर एवढ्या मेहनतीने कमावलेले पैसे का खर्च करायचे? या सर्वांचे उत्तर मला वाटते पु लं च्या 'भाकरी आणि फुल' या वाक्यातच दडलेले आहे.

मानसिक शांती, निर्भेळ आनंद, कला इत्यादी गोष्टी अत्यंत व्यक्ती सापेक्ष असून प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांचे मूल्य वेगळे असते आणि ह्यावरच व्यापार आधारलेला असतो.

अत्रे's picture

24 Aug 2017 - 6:49 am | अत्रे

सुंदर प्रतिसाद.

त्यामुळे आपल्याला त्यावेळी जेवढा विचार करता येईल तेवढा विचार करून - प्राप्त परिस्थितीत उपलब्ध असलेल्या माहितीवर निर्णय घेऊन - आपण पुढे जातो किंवा तसे जावे. नाहीतर एखादा निर्णय घेण्यासाठी आपण वर्षानुवर्षे वेळ घेऊ शकतो आणि तोपर्यंत ती संधी निघून जाते. (बुद्धिबळ खेळातील घड्याळ)

जगातील सर्व परिस्थितींना कोणत्यातरी एका गेम कॅटेगरी मध्ये टाकणं मला अशक्य वाटत (जरी तुम्ही अनंत वेळ विचार करायला घेतला तरी). बर्याच गोष्टीचे गणितीय मूल्य ठरवणे अशक्य असते म्हणून हा संकल्पनेची उपयोगिता मर्यादित वाटते. ज्या परिस्थितीमधलया सगळ्या चल राशीचे (variables) चे गणितीय मूल्य काढता येते अशा ठिकाणी ही थेअरी खूप उपयोगाची वाटते.

योगेश लक्ष्मण बोरोले's picture

24 Aug 2017 - 9:49 pm | योगेश लक्ष्मण बोरोले

रॅशनल - विवेकी; ईन्सेटिव्ह - प्रलोभन किंवा बक्षिस ... हे कसे पर्याय आहेत?

रुपी's picture

24 Aug 2017 - 3:19 am | रुपी

छान लेख. आवडला.

स्वधर्म's picture

24 Aug 2017 - 12:39 pm | स्वधर्म

बरेच दिवस मनात शेअर बाजारासंबंधी एक प्रश्न होता. खरेच शेअर बाजाराला सरकार, अर्थमंत्री, लोक, उद्योजक इ. खूप महत्व देतात. तो जर वर खाली झाला, की त्याची ठळक बातमी होते. अाय पी अो जेव्हा निघतो, तेंव्हा त्या कंपनीला बरेच पैसे थेट गुंतवणूकदारांकडून मिळतात, पण ते व्यवहार अतिशय कमी व कधीतरीच होतात. शेअर विकत घेणारा किरकोळ गुंतवणूकदार भविष्यात भाव वाढेल या अटकळीनुसार शेअर घेतो, व विकणारा भविष्यात भाव पडेल म्हणून नुकसान टाळण्याकरता विकतो. हे सगळंच प्रतिकात्मक अाहे. भाव कितीही वाढला अगर कमी झाला, तरी मूळ कंपनीला काही पैसे मिळत नाहीत व त्याचा उपयोग संपत्तीची निर्मिती करण्यासाठी होत नाही. मग शेअर मार्केट हा नक्की झिरो सम गेम अाहे का? सर्वांचा दृष्टीकोन हा बाजार म्हणजे अर्थव्यवस्थेच्या अारोग्याचे लक्षण अाहे असा वाटतो. ‘मार्केट’ पडू नये याची सर्व लोक, सरकार इ. घेत असलेली दक्षता वगैरे हे हा पाॅसिटीव सम गेम असल्यासारखे भासवते.
टीप: व्यक्तीश: मी अाजपर्यंत कोणताही शेअर खरेदी केला नाही. त्याने समाजाच्या अार्थिक सुखावर काय नक्की परिणाम होतो हे एक कोडेच अाहे.

आधी शेअर बाजारवील काही स्वैर मते व्यक्त करते आणि शेवटी तुमच्या प्रश्नाची सरळ उत्तरे देते :

शेअर मार्केट मध्ये आपण जेंव्हा एक शेअर विकत घेतो तेंव्हा तो एक ट्रेड आहे. आपण जेंव्हा तो विकत घेता तेंव्हा आपली समजूत असते कि त्याची किंमत भविष्यांत वाढेल. त्यामुळे तुमच्या दृष्टीने त्याची किंमत जास्त असते. ह्या उलट जो विकणारा असतो त्याचे मत अगदी विरुद्ध असते. शेअर मार्केट मधील प्रत्येक ट्रेड हा पॉसिटीव्ह सम गेमच आहे.

तुम्ही जेंव्हा एक समभाग विकत घेता तेंव्हा त्या समभागांची किंमत असते :

= समभाग विकत घेण्याचा दर + ( तुम्ही guess केलेली किंमत) * (किंमत असूच guess करण्याची तुमची क्षमता (०-१) )

ट्रेड पॉसिटीव्ह म्हणजे काय तर दोन्ही बाजूना फायदा होतो. समजा एक रुपयाचा शेर विकून विकणाऱ्याला १० पैसे फायदा झाला. तुम्ही तो विकत घेतला आणि तुमच्या मते त्याची किंमत १.१० होईल (किमत वाढणार आहे अशी तुमची समजूत असेल तरच तुम्ही तो घेणार ना ? ) त्यामुळे त्या वेळी तुम्हाला मानसिक लेव्हल वर १० पैसे फायदा झाला. अनेकांना वाटते कि हा मानसिक लेव्हल वरचा फायदा खरा फायदा नाही. पण भविष्य कुणालाच ठाऊक नसल्याने "भविष्याची अनिश्चितता" ह्याच्या विरुद्ध तुम्ही ते पैसे लावले आहेत. विमा, लॉटरी, हेजफंड इत्यादी अनेक क्षेत्रांत लोक "भविष्याची अनिश्चितता" ह्यावर पैसे लावतात. इथे शेअर विकत घेणाऱ्याचा खरा जो फायदा आहे तो त्याच्या ज्ञानावर अवलंबून आहे. आपण भविष्य किती चांगल्या प्रकारे वार्तावू शकता ह्या आधारावर तो माणूस समभाग विकत घेतो. समजा आपणाला शेअर बाजारातील ज्ञान शून्य आहे आणि तरी सुद्धा तुम्ही समभाग विकत घेतले तर ते जवळ जवळ लॉटरीमध्ये पैस गुंतवलेल्या सारखे आहे.

समभाग विकत घेत असताना तुमच्या मनात आपण भविष्य ओळखू शकतो असा आत्मविश्वास आहे म्हणून तर तुम्ही तो घेता. समजा तो समभाग पडला तर त्यातून "माझा होरा चुकीचा होता" हे ज्ञान तुम्हाला मिळते आणि समाज १० पैश्यानि तो समभाग पडला असेल तर तुमच्या त्या ज्ञानाची किंमत २० पैसे ठरेल. त्याचमुळे तुम्हाला मार्केट समजत नसेल तर पैसे गुंतवू नका असा सल्ला लोक देतात. मार्केट मध्ये जास्त पैसे कमावणारे लोक भविष्य अचूक पणे ओळखण्याचे नवे नवे आणि कधी कधी बेकायदेशीर मार्ग सुद्धा शोधात असतात ( उदा insider ट्रेडिंग).

आता आम्ही शेअर मार्केट बद्दल पाहूया (म्हणजे सर्व ट्रेड बद्दल)

आधीच्या फॉर्मुला मध्ये एक घटक होता (किंमत असूच guess करण्याची तुमची क्षमता (०-१) ). आता दिवसाला करोडो ट्रेड होतात. प्रत्येक ट्रेड मध्ये वरील घटक प्रत्येक माणसा प्रमाणे बदलतो. पण समजा खूप लोकांनी जास्त किमतीत शेअर विकत घेतला तर "higher level" वर किंमत वाढेल हा तुमचा होरा आपोआप बरोबर ठरतो.

शेअर वाढेल हे तुमचे ज्ञान आता वाढलेल्या किमतीच्या स्वरूपांत जगाला समजते. पण शेअर वाढला ह्याचा नक्की अर्थ काय ? तर ती कंपनी जास्त नफा कमावेल, जास्त लोकांना रोजगार देईल, जास्त आधुनिक तंत्रज्ञांन वापरेल, नवीन मार्केट काबीज करेल इत्यादी. समजा सगळेच शेअर वाढत असेल तर देशातील बहुतेक कंपन्या चांगल्या दिशेने वाटचाल करीत आहेत असा त्याचा अर्थ होतो.

बहुतेक कंपन्या चांगल्या दिशेने तेंव्हाच वाटचाल करू शकतात जेंव्हा देशांत राजकीय स्थैर्य, कमी हिंसा, चांगले प्रशासन इत्यादी असते. त्यामुळे शेअर बाजार वाढावा आणि नेहमी वाढत राहावा ह्याचे प्रयत्न सरकार करीत असते.

> भाव कितीही वाढला अगर कमी झाला, तरी मूळ कंपनीला काही पैसे मिळत नाहीत व त्याचा उपयोग संपत्तीची निर्मिती करण्यासाठी होत नाही. मग शेअर मार्केट हा नक्की झिरो सम गेम अाहे का?

मुळांत कंपनी असे काही नसतेच. असतात ते समभाग धारक. ह्यांत काही मोठे समभाग धारक असतील तर काही आपल्या सारखे छोटे. कंपनी ह्याच सर्वांची मिळून बनलेली असते. समभाग धारकांचा जास्तीत जास्त फायदा करून द्यावा हे प्रत्येक कंपनीच्या संचालकांचे उद्धिष्ट असते. जेंव्हा रिलायन्स चे अंबानी रिलायन्स चा फायदा करून देण्यासाठी धडपडत असतात तेंव्हा "रिलायन्स चा फायदा" असे काही नसतेच. अंबानी हे सर्वांत मोठे भागधारक असल्याने ते आपला फायदा करण्याच्या नादात असतात.

त्यांत आपल्या सारखे छोटे लोक सुद्धा समभाग धारक असल्याने अंबानी जेंव्हा स्वतःचा फायदा करतो तेंव्हा आपला सुद्धा फायदा आपसूक होतो.

जेंव्हा रिलायन्सला प्रचंड नफा होतो तेंव्हा हा नफा एकतर कंपनीत पुन्हा गुंतवला जातो (ज्यामुळे शेअर किंमत वाढते) किंवा डिव्हिडंड म्हणून सर्व समभागधारकांना वाटून दिला जातो. त्यामुळे वारसाच्या शेवटी "कंपनी चा" फायदा हा समभाग धारकांचा फायदा असतो.

> सर्वांचा दृष्टीकोन हा बाजार म्हणजे अर्थव्यवस्थेच्या अारोग्याचे लक्षण अाहे असा वाटतो. ‘मार्केट’ पडू नये याची सर्व लोक, सरकार इ. घेत असलेली दक्षता वगैरे हे हा पाॅसिटीव सम गेम असल्यासारखे भासवते.

हा भास नाही, काही अपवाद सोडल्यास हे सत्य आहे. शेअर मार्केट वाढणे म्हणजे जास्त लोकांचा फायदा होत आहे असा होतो. हा फायदा जो पर्यंत चांगल्या ज्ञानावर आधारित आहे तोपर्यंत संपूर्ण देशाच्या अर्थस्थितीचे ते प्रतीक आहे असे आम्ही समजू शकतो.

------
अवांतर :

काही वर्षा पूर्वी मनमोहन सिंग सरकारने एक नवीन कायदा केला. सर्व कंपनी ज्यांना ५० कोटी पेक्षा जास्त नफा होतो त्यांनी त्यातील ५% रुपये सामाजिक कार्यावर खर्च करावेत असा हा कायदा होता. रग्गड पैसे कमावणाऱ्या रिलायन्स सारख्या कंपन्यांना असाच भुर्दंड पडला पाहिजे म्हणून काही लोकांनी त्याचे स्वागत केले.

पण मी वर लिहिल्याप्रमाणे कंपनी असे काही नसतेच. RIL जेंव्हा ५% नफा एका ट्रस्ट मध्ये टाकून सामाजिक कार्यावर खर्च करते तेंव्हा तो ५% पैसे सर्व समभाग धारकांचा असतो. त्यामुळे मध्यमवर्गीय लोक ज्यांनी RIL चे समभाग घेतले आहेत त्यांचे ५% नुकसान होते. अर्थांत सर्वांत मोठा समभाग धारक असल्याने अंबानीला सुद्धा आपले ५% रुपये त्या ट्रस्ट मध्ये टाकावे लागतात.

पण खरी मेख अशी आहे कि हा सर्व ट्रस्ट चालवावा कसा ह्याचा निर्णय मात्र सर्वांत मोठा समभाग धारक घेतो. तो ह्या ट्रस्टवर आपल्या पत्नीला नेमतो. ती मग जगभर फिरून "पाणी बचाव" किंवा इतर कुठल्या तरी फुटकळ कार्यावर तो पैसा खर्च करत स्वतः साठी प्रसिद्धी घेते. बहुतेक वेळा हा पैसे ती आपल्याच मित्रांना वाटून टाकते. थोडक्यांत काय तर मध्यमवर्गीय लोकांचा पैसे हे अतिश्रीमंत लोक "दान" करून स्वतः साठी प्रसिद्धी मिळवतात.

पैसा's picture

28 Aug 2017 - 12:45 am | पैसा

लेख आवडला