रूममेट (स्वानुभवावर आधारित काल्पनिक कथा)

प्रशांत लेले's picture
प्रशांत लेले in जनातलं, मनातलं
16 Aug 2017 - 12:04 am

रूममेट भाग १

ICWA ची परीक्षा पास झालो आणी कॅडबरी मध्ये नोकरी लागली. पहिलाच जॉब आणी तो पण कॅडबरी सारख्या मोठ्या कंपनीमध्ये, त्यामुळे खुश होतो. थोडे टेंशन सुद्धा होते. त्यातून कामाचे ठिकाण होते सातारा जिल्ह्यातील, फलटण तालुका. कॅडबरी कंपनीची एक काँट्रॅक्ट मनुफॅक्चरिंग साईट फलटण तालुक्यातील साखरवाडी गावात होती. कॉन्ट्रॅक्ट मनुफॅक्चरर कंपनी होती डॉ. रायटर्स. कॅडबरी ची आम्ही एकूण चार माणसे होतो. सुधीर, रवी, मी आणी योगेश. बाकी सर्व स्टाफ आणि वर्कर्स डॉ. रायटर्स चे होते. योगेश भावसार म्हणजे आमचे साहेब. भावसार साहेब प्रोडक्शन सांभाळायचे. सुधिर क्वालिटी, रवी लॉजिस्टिक्स आणी मी अकौंट्स वाला.
साखरवाडी गाव म्हणजे ब्रिटिशकालीन हिलस्टेशन होते. ब्रिटिशांनी बांधलेले मोठे मोठे बंगले होते गावात. ब्रिटिश गेल्यानंतर काही बंगले डॉ. रायटर्स चे मालक श्री आपटे यांनी त्या काळी विकत घेतले होते. त्यांपैकी मला दोन बंगले माहित होते. एक डायरेक्टर बंगला, जिथे श्री आपटे स्वतः राहत. तसे ते राहायला मुंबईला होते, पण जेव्हा साखरवाडीच्या दौऱ्यावर येत तेव्हा त्यांचा मुक्काम डायरेक्टर बंगल्यावर असे. दुसरा बंगला होता जी एम बंगला, जिथे डॉ रायटर्स चे जनरल मॅनेजर पुर्वी राहत असत. पण सध्या तो आम्हाला, म्हणजे कॅडबरी वाल्यांना राहायला दिलेला होता. जी एम बंगल्यात आम्ही एकूण सहा जण राहत असू, कॅडबरीचे आम्ही चौघं आणि डॉ. रायटर्स चे दोघं, अकौंट्स मॅनेजर काळे साहेब आणि एच आर मॅनेजर साळवी साहेब.

बंगला चांगला ऐसपैस होता. रस्त्यावरून बंगल्याची मागची बाजू दिसत असे, फाटकातून आत शिरल्यावर बंगल्याला वळसा घालून पलीकडच्या बाजूला प्रवेशद्वार होते. दारातून आत गेल्यावर ओसरी, सरळ गेल्यावर मोठ्ठा हॉल, मग पुढे एक पडवी तर पडवीच्या पलीकडे, दारातून बाहेर पडून छोटेसे अंगण होते . अंगण बंदिस्त होते म्हणजे वरती आकाश पण चारी बाजू बंद. फरशा घातलेल्या, एका बाजूला मुख्य बंगला, दोन बाजू भिंती घालून बंद केलेल्या तर चौथ्या बाजूला, बंगल्याला समांतर दोन बैठ्या कौलारू खोल्या होत्या. तिथे आपट्यांचे बरेच जुने सामान कुलूपबंद करून ठेवलेले होते.

हॉलच्या उजवीकडे गेस्ट रूम आणि त्यापलीकडे एक मोठ्ठी बेडरूम होती जिथे भावसार साहेब राहत. हॉलच्या डावीकडे एक ऐसपैस सोपा होता. सोप्याचे दोन भाग केल्यास एका बाजूला डायनिंग टेबल व दुसऱ्या बाजूला टिटी टेबल होते तिथे आम्ही कधीमधी टेबल टेनिस खेळायचो. डायनिंग टेबलच्या बाजूला छोटेसे स्वयंपाकघर होते. तसा आम्हाला जेवणाचा डबा येत असे पण कधीतरी मॅगी वगैरे बनवायला, किंवा पाणी तापवायला स्वयंपाकघराचा उपयोग होत असे. सोप्यापालिकडे आणिक एक बेडरूम होती जिथे रवी व सुधीर चा मुक्काम होता.

गेस्टरुम बंद असायची. कॅडबरी किंवा डॉ. रायटर्सचे कोणी व्हिजिटर्स रात्री मुक्कामाला असतील तर त्यांची सोय गेस्टरुम मध्ये करण्यात येत असे. गेस्टरुम समोरून एक वळणदार, संगमरवरी फरशा असलेला जिना वरती पहिल्या मजल्याकडे जात असे. वर गेल्यावर समोरच एक (कुलूपबंद) रेकॉर्डरूम होती जी गेस्टरुमच्या बरोबर वर येत असे. एकदा जुने रेकॉर्ड शोधण्यासाठी ती उघडली होती तेव्हा तिथल्या धुळीमुळे मला आठवडाभर शिंका येत होत्या. रेकॉर्डरुमच्या डावीकडे दोन बेडरूम होत्या. एकीत काळे साहेब राहत तर दुसरीत साळवी साहेब.

या बंगल्याची सर्व व्यवस्था पाहण्यासाठी राजाभाऊ म्हणून एक मध्यमवयीन गृहस्थ होते. आमची राहण्याची, जेवणाची, अगदि कपडे इस्त्री करून आणण्यापासून सगळी व्यवस्था ते अगदी चोख पार पाडत.

मी जेव्हा कामावर रुजू झालो, तेव्हा माझी राहण्याची सोय पहिल्या मजल्यावर साळवी साहेबांबरोबर केलेली होती. त्या खोलीत दोन बेड व दोन ड्रेसिंग टेबलं होती. बाथरूम बाहेरच्या बाजूला खोलीला लागूनच होतें. खोलीला चार खिडक्या होत्या. खिडक्यांना जाळीची तावदाने व कॉटन चे पडदे होते. दिवसा खोलीत भरपूर हवा व उजेड असे, परंतू रात्री थोडी भीती वाटे. कारण एका बाजूच्या खिडक्यांतून बंगल्याच्या मागच्या बाजूच्या, म्हणजे रस्त्याच्या बाजूच्या "त्या" दोन बंद खोल्या दिसत तर दुसऱ्या बाजूने बंगल्याभोवतिच्या मोकळ्या जागेची एक बाजू दिसत असे जिथे पूर्ण अंधार असायचा. म्हणजे रात्री कुठच्याही बाजूच्या खिडकीतून बाहेर बघितले तर अंधाराशिवाय काहीही दिसत नसे.

रूममेट भाग २

एकूण काय तर रात्री कुठच्याही बाजूच्या खिडकीतून बाहेर बघण्याची सोय नव्हती, अंधाराशिवाय काहीही दिसत नसे.

अजून एक गोष्ट म्हणजे साळवी व काळे साहेब रोज बंगल्यावर असतच असे नाही. काळे साहेब कामानिमित्त बरेचदा पुण्याला जायचे व त्यांचे घर पुण्यालाच असल्याने रात्री घरीच राहून दुसऱ्या दिवशी थेट ऑफिस ला येत असत. साळवी साहेबांची सुद्धा तीच तऱ्हा होती. शिवाय साळवी साहेबांना स्वतंत्र स्टाफ क्वार्टर्स होते जे फॅमिली वाल्यांना मिळत असे. पण त्यांची फॅमिली (म्हणजे सौ.) कधी पुण्याला तर कधी साखरवाडीला अशी येऊन जाऊन असे, त्यामुळे ते सुद्धा फॅमिली नसलीकीच बंगल्यावर राहत कारण त्यांना एकट्याला क्वार्टर्सवर कंटाळा येत असे.

कधी कधी जर ते दोघेही नसतील तर पहिल्या मजल्यावर मी एकटाच असे. तेव्हा मला एकदम बाजूला पडल्यासारखे, इतरांपासून तुटल्यासारखे वाटत असे व रात्री बराच वेळ झोप लागत नसे. सुधीर वगैरेनी सांगितलेल्या बंगल्याच्या कहाण्या आठवत व मी शांत झोपु शकत नसे. गेस्टरुम बद्दल तर बऱ्याच कहाण्या ऐकल्या होत्या. तिथे झोपणाऱ्याला रात्री कोणीतरी हलवून जागे करत असे, अजीज म्हणून भावसार साहेबांचा मित्र व कॅडबरी मधला जुना माणूस तर रात्री खिडकीतून कोणीतरी बघतेय असे वाटते म्हणून तक्रार करायचा. एका हेड ऑफिसहून आलेल्या माणसाला तर एक तिशी-पस्तिशीची बाई त्याच्या छातीवर बसलीय असे दिसले व तो घाबरून ओरडला, वगैरे बऱ्याच गोष्टी हे लोक मला सांगत. पण ते माझी मस्करी करत आहेत असे मानून मी सोडून देत असे व मी अजिबात घाबरलेलो नाही असे दाखवीत असे. तरीही जिन्यावरून वर जाताना मी गेस्टरुम कडे पाहण्याचे टाळायचोच.

भावसार साहेबांची खोली एका कोपऱ्यात होती. मध्ये गेस्टरुम मग हॉल मग सोपा व त्यानंतर रवी व सुधीर चि रूम. त्यामुळे ते सुद्धा तसे एकीकडे पडल्यासारखेच राहत. सुरुवातीला त्यांना बाहेरून कोणीतरी रडल्याचा आवाज नेहमी यायचा. नंतर तो बंद झाला. मला मात्र भावसार साहेबांच्या खोलीत एकदम छान वाटत असे. भरपूर उजेड, हवा, कोपऱ्यात मोठ्ठा देव्हारा. भावसार साहेब सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस पूजा करत, उदबत्ती व धूप जाळत व आम्हाला प्रसाद देत.

जी एम बंगल्याच्या चारही बाजूंना चांगली ४०-५० फूट मोकळी जागा होती. तिथे अर्धा एक फूट उंचीचे गवत वाढलेले असे. बंगल्याच्या दारासमोर १०-१२ फूट जागेत फरश्या बसवलेल्या होत्या. त्याच्या थोडे पुढे म्हणजे दारापासून वीसेक फूट अंतरावर एक कारंजे होते. त्याच्या भोवतीने गोलाकार अशोकाची ७-८ झाडे होती. झाडांमुळे कारंजे लांबून नीट दिसत नसे. पहिल्याच आठवड्यात एका संध्याकाळी हॉलमध्ये बसून टि व्ही पाहताना सहज बाहेर बघितले तर अर्धवट उजेडात कारंज्याच्या कठड्यावर कोणीतरी बसले आहे असे वाटले. बाहेर जाऊन पाहिले तर कुणीच नव्हते. नंतर इतरांना विचारले तर, "कुत्रा असेल !" असे उत्तर मिळाले. आणि खरेच "तो" कुत्रा नंतरही बरेचदा मला तिकडे बसलेला दिसायचा.

साखरवाडी गावात १२ तास लोड शेडिंग असे. संध्याकाळी सहा वाजता वीज गेली की सकाळी सहाला येत असे. बंगल्यावर इन्व्हर्टर होता. त्याची बॅटरी ४-५ तास चाले. आम्ही फॅक्टरीतुन साधारण साडेआठ-नऊला परतत असू. तेव्हा संपूर्ण बंगला अंधारात बुडालेला असे. लोड शेडिंग असल्यामुळे संध्याकाळी वीज गेल्यावर चुकून एखादा पंखा किंवा दिवा सुरु राहून इन्व्हर्टरची बॅटरी वाया जाऊ नये म्हणून राजाभाऊ दुपारीच इन्व्हर्टर बंद करून ठेवत, तो थेट फॅक्टरीतून आल्यावर सुरु करत असू. तसे माझे काम सात वाजेपर्यंत आटपत असे पण एकट्याने बंगल्यावर जायला नको म्हणून मी हे तिघे निघेपर्यंत थांबून राही.

गावातल्या लोकांची उत्पन्नाची मुख्यत्वे तीनच साधने होती. शेती, साखरकारखान्यात नोकरी, किंवा चॉकलेट फॅक्टरीत नोकरी. गावाच्या चहूबाजूंनी उसाची शेते होती. तसेच ज्वारी, बाजरी, मका, भाज्या, इ. पिकेदेखील घेतली जात. फॅक्टरीतल्या स्टाफपैकी बहुतेकांची शेती होतीच. आम्ही "साहेब" कॅटेगरीतले असल्यामुळे हुरडा पार्ट्यांची वगैरे बरीच आमंत्रणे येत. एकदा तर गणेश उत्सवात भावसार साहेबांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते. आणि खास तमाशाचा प्रोग्रॅम पण होता. भावसार साहेबांची अवस्था खूपच वाईट झाली होती त्या वेळेस. त्यानंतर त्यांनी असे कुठलेही अमंत्रण स्वीकारायचे नाही असे ठरवले. असो. हुरडा पार्ट्यांना मात्र आम्ही आवर्जून जात असू. ज्वारीची कोवळी कोवळी कणसे निखार्यावर भाजून हुरडा तयार होई. तो शेंगदाण्याच्या चटणीबरोबर आणि दह्याबरोबर खायला फार मजा येत असे, बरोबर ताजा गूळ किंवा उसाचा रस सुद्धा असे. हुरडा खाऊन झाल्यावर वांग्याचं भरीत किंवा भरलं वांगं आणि भाकरी असा फर्मास जेवणाचा बेत असे.

असेच एकदा विक्रम आपटेंनी डायरेक्टर बंगल्यावर रात्री हुरडा पार्टी ठेवली होती. तेव्हा फॅक्टरीत ऑडिट चालू होते व ऑडिटर मंडळी जी एम बंगल्यावर मुक्कामाला होती. संध्याकाळी आम्ही फॅक्टरीतून सरळ डायरेक्टर बंगल्यावर पार्टीसाठी गेलो तर ऑडिटर्स मंडळी जी एम बंगल्यावर गेली. मी पोट फुटेस्तोवर हुरडा खाल्ल्यामुळे मला जेवायचे नव्हते. बाकीचे जेवायला बसले. मला कंटाळा आला होता म्हणून मी जी एम बंगल्यावर जायचे ठरवले. दहा साडेदहा झाले असतील. बंगल्यावर ऑडिटर्स मंडळी असल्याने माझा रोजच्या सारखा प्रॉब्लेम नव्हता. प्रश्न फक्त अंधारात डायरेक्टर बंगल्यावरून जी एम बंगल्यावर जाण्याचा होता. तसेच फाटकातून आत शिरून, वळसा घालुन, इकडे तिकडे न बघता व कारंज्यापासून नजर चुकवून पटकन बंगल्यात घुसले कि झाले. असा विचार करून मी निघालो.

रस्ता सरळच होता. चालत जायला १० मिनिटे लागायची. रस्त्याच्या डाव्या बाजूला मोकळी जागा तर उजव्या बाजूला एक दोन (बंद) घरे व फलटण शुगर वर्क्सची (साखरकारखाना) गोदामे होती. त्यातच एक मोडकळीला आलेली वाचनालयाची इमारत होती जी कायमच बंद असे. जी एम बंगल्यावरील माझी खोली डायरेक्टर बंगल्याच्या दिशेलाच होती त्यामुळे अर्ध्या रस्त्यात पोहचल्यावर खोलीच्या खिडक्या दिसत. त्या रात्री मी मोबाईलमधल्या टॉर्चच्या प्रकाशात खाली मान घालून जात होतो. जी एम बंगला जवळ आल्यावर सहज मान वर करून पहिले तर माझ्या खोलीत मला उजेड दिसला, बहुतेक सकाळी दिवा चालू राहिला होता. पण मला ते पाहून बरे वाटले कारण आता मला अंधारात रूममध्ये जाऊन दिवा लावावा लागणार नव्हता. मी झपाझप चालत बंगला गाठला. ऑडिटर्स मंडळी बंगल्यात नव्हती. गावात एक नमुनेदार सिनेमा थिएटर होते जिथे आम्ही जवळपास दर शुक्रवारी सिनेमा पहायला जात असू. ऑडिटर्स मंडळी रात्रीच्या शो ला गेली होती. बंगला पूर्ण अंधारात. तसेच बंगल्यावर ऑडिटर्स असतील म्हणून मी राजाभाऊंकडून चावी पण घेतली नव्हती. तसाच परत रस्त्यावर आलो. फाटकात उभा राहिलो. इथून माझी रूम दिसत नसे. थोडा पुढे जाऊन फलटण शुगर वर्क्सच्या मुख्यालयासमोर रस्त्यावरचा सौरदिव्याखाली एक बाक होता तिथे गाणी ऐकत बसून राहिलो. २०-२५ मिनिटांनी डायरेक्टर बंगल्याकडून आमचे तिघे जण व त्यांच्याबरोबर काळे व साळवी साहेब येताना दिसले. सगळ्यांबरोबर बंगल्यावर गेलो. हॉल मधले दिवे लावले. मी बिनधास्त पहिल्या मजल्यावर गेलो. मला माहित होते की आमच्या खोलीचा दिवा चालू आहे ते. दार लोटलेले होते, पॅसेज मधला दिवा बंद होता, मी सरळ दार ढकलून खोलीत शिरलो तर घुप्प ! ! !

खोलीत पूर्ण अंधार होता. चाचपडत घाईघाईत दिव्याचे बटण शोधले. बटण तर बंद होते. मग मला रस्त्यावरून दिवा चालू का दिसला होता ? मला घाम फुटला. इतक्यात साळवी साहेब जिना चढून वर आले व मला दारात उभा असलेला पाहून माझ्याकडे प्रश्नार्थक चेहरा करून बघू लागले. मी काही न बोलता खाली मान घालून टॉवेल घेऊन अंघोळीसाठी बाथरूम मध्ये शिरलो. माझ्या छातीत धडधडत होते व पाय लटपटत होते. डोक्यात फक्त एकच विचार ढणढणत होता की आज जर माझ्याकडे चावी असती आणि मी एकट्याने बंगल्यात व माझ्या खोलीत आलो असतो तर ? ? ?

रूममेट भाग ३

या गोष्टीला आता आठ वर्षे झाली, पण अजूनही आठवले कि अंगावर काटा येतो की खरोखर त्या रात्री माझ्याकडे बंगल्याची चावी असती, आणी मी एकट्याने बंगल्यात व माझ्या खोलीत आलो असतो तर काय झालं असतं ? मला असे नाही म्हणायचे की मला तिथे काही दिसलं असतं किंवा कोणी भेटलं असतं. तसं काही नसतंही झालं कदाचित. पण खोलीतला दिवा चालू आहे असे वाटताना आणि त्या दिव्याच्या आशेवर अंधारातून जिना चढून अंधाऱ्या पॅसेजमधून गेल्यावर अचानक खोलीत अंधार दिसणे हा धक्का मी बंगल्यात एकटाच असताना पचवू शकलो असतो की नाही ते मी नाही सांगू शकत.

दिवा प्रकरण झाल्यानंतर मी अगदी कटाक्षाने एकटा दुकटा कुठे जाण्याचे टाळू लागलो व बंगल्यावरही मी एकटा अजिबात थांबत नसे. जेव्हा साळवी साहेब नसत तेव्हा मी एकटा रूममध्ये अजिबात झोपत नसे. मी समोर काळे साहेबांच्या किंवा खाली रवी-सुधीरच्या खोलीत झोपायला जात असे. मी परस्पर गावात कुठे भाड्याने खोली मिळतेय का ते सुद्धा बघायचा प्रयत्न केला पण व्यर्थ. बरं कोणाशी या विषयावर बोलावे तर माझा (फालतू) स्वाभिमान मला तसं करू देईना. सगळे हसतील, माझी टर उडवतील, शिवाय कोणीही विश्वास ठेवणार नाही व बोलण्याचा काही उपयोग होणार नाही असे वाटून मी गप्प राहिलो. असेच दिवस जात होते, काही विशेष घटना घडली नव्हती. आम्ही दर शनिवारी आपापल्या घरी जात असू व सोमवारी परत साखरवाडीला येत असू. मला कधी एकदा शनिवार येतोय आणि मी कल्याणला घरी जातोय असे वाटत असे. नुकतेच लग्न ठरलेले असल्याने होणाऱ्या बायकोलाही आठवड्यातून एकदाच भेटता येई. शानिवार-रविवारी बंगल्यावर कुणीच नसायचे. सगळे आपापल्या घरी जात. काळे व साळवी साहेब पुण्याला, रवी आणि सुधीर सातारा आणि भावसार साहेब ठाण्याला राहायचे. मी बसने पुण्याला येऊन मग इंद्रायणीने कल्याणला जात असे. रात्री दहा वाजता घरी पोहचायचो, रविवारचा एक दिवस मिळे कि लगेच सोमवारी पहाटे परत. कधी कधी कंटाळा येई पण बंगल्यावर एकटे कोण राहणार म्हणून घरी जातच असे.

एकदा मी कुठे काम करतो , कसा राहतो ते दाखवायला व थोडा बदल म्हणून आई बाबा, सासू सासरे, होणारी पत्नी व मेव्हणा अश्या सगळ्यांना साखरवाडीला बोलावले. शनिवारी ते सगळे कोयना एक्सप्रेसने आले. दुपारचे जेवण आम्ही सगळ्यांनी एकत्र घेतले. जेवण झाल्यावर भावसार साहेब, रवी व सुधीर घरी निघून गेले. आमची घरची मंडळी शनिवारी साखरवाडीलाच राहिली. दोन दिवस सगळ्यांना गोंदवले, मोरगाव, जेजुरी, कानिफनाथ गड, असे फिरवून आणले. रविवारी संध्याकाळी मंडळी परत गेली. मी सगळ्यांना पुण्यापर्यंत सोडायला गेलो. इंद्रायणीत बसवून परत साखरवाडीला आलो. कारण घरी फक्त रात्रीपुरते जाण्यात काही पॉईंट नव्हता. तसेच राजाभाऊ माझ्याबरोबर बंगल्यावर रात्री राहणार होते. त्यामुळे मी साखरवाडीलाच परतायचा निर्णय घेतला. आठ वाजता बंगल्यावर पोहचलो. राजाभाऊ माझी वाट बघत बसले होते. त्यांच्या पत्नीची तब्येत ठीक नव्हती त्यामुळे रात्री घरी जावे लागेल म्हणाले. आता आली का पंचाईत. त्यांना थांबा म्हणावे तर बायको आजारी, जा म्हणावे तर बंगल्यावर मी एकटा. मी संभ्रमात पडलो. पण तेच म्हणाले की माझा धाकटा मुलगा येईल तुम्हाला सोबतीला. नऊ वाजता जेवण घेऊन येतो असे सांगून ते गेले. मी अंघोळ वगैरे करून टीव्ही पाहत बसलो. विशेष म्हणजे त्या दिवशी वीज गेली नव्हती. मी दिवाळी असल्यासारखे सगळे दिवे चालू ठेऊन बसलो होतो. फार भीती वाटत नव्हती. सव्वा नऊला राजाभाऊ आले. माझे जेवण होईपर्यंत थांबले व नंतर सगळे आवरून साडेदहाच्या सुमारास जायला निघाले. धाकट्याचा कुठे पत्ता नव्हता म्हणून त्यांना विचारले की येणार आहे ना तुमचा मुलगा ? त्यावर ते म्हणाले की तो सिनेमाला गेला आहे. शो संपला की थेट बंगल्यावर येईल. मी म्हटले मला झोप येतेय. तर ते म्हणाले की तुम्ही खालीच सुधीर-रवीच्या खोलीत झोपा. तो येईल आणी बाहेर हॉलमध्ये झोपेल. मी बरं म्हटले व टीव्ही बंद करून बेड वर जाऊन पडलो. राजाभाऊ निघून गेले. त्यांच्या सायकल चा आवाज दूर दूर जात ऐकु येईनासा झाला. मी मनात आकडेमोड करत होतो. आत्ता अकरा वाजलेत, बाराला शो संपेल, बारा दहा पर्यंत राजाभाऊंचा मुलगा येईल. म्हणजे फक्त एकच तास मी एकटा, वगैरे विचार चालू होते. विचार करता करता व दिवसभराच्या धावपळीने थकल्यामुळे माझ्या डोळ्यावर झापड येत होती. पण मी जागे राहण्याचा प्रयत्न करत होतो. बंगल्याच्या आत किंवा बाहेरून कुठलाही अनोळखी आवाज येत नव्हता. पंखा तेवढा घरघरत होता व बाथरूम मधला गळका नळ ठिबकत होता बस्स एवढेच दोन आवाज ऐकू येत होते. हळू हळू झोप अनावर होऊन माझा डोळा लागला. झोपेतच मला बाहेर कुत्री भुंकत आहेत हे समजत होते पण तरीही मी उठलो नाही. आता आश्चर्य वाटते पण खरच तेव्हा मी गाढ झोपून गेलो होतो. किती वेळ गेला ते समजले नाही पण बंगल्यात कुणाच्या तरी वावरण्याचा आवाज यायला लागला व माझी झोप मोडली. डोळे उघडले. खोलीत उजेड होता. मी झोपताना दिवा सुरूच ठेऊन झोपलो होतो त्यामुळे तेव्हा खोलीत उजेड होता. आत्ता उठल्यावर सुद्धा खोलीत उजेड होताच पण प्रखर उजेड होता. डोळ्यावर प्रकाशाची तिरीप येत होती. मी अजूनही अर्धवट झोपेत होतो त्यामुळे समजत नव्हते की काय होतंय ते. रात्री एवढा दिवसासारखा प्रकाश कसा येतोय ? इतक्यात राजाभाऊंचा आवाज आला. "लेले साहेब उठा, नऊ वाजले, चहा आणलाय". माझा कानांवर विश्वास बसेना. नऊ वाजले ? म्हणजे रात्र संपली ? मी खडबडून उठून बसलो. खरेच सर्व खोलीत सूर्यप्रकाश होता. पडद्याच्या फटीतून उन्हाची तिरीप माझ्या अंगावर येत होती. मी फारच चकित झालो. उठून तोंड धुवून डायनिंग टेबलवर जाऊन बसलो. चहा घेता घेता विचार करत होतो. असे कसे आपण निश्चिन्त झोपलो रात्रभर. राजाभाऊंचा मुलगा रात्री कधी आला आणि सकाळ झाल्यावर कधी गेला ते मला अजिबात कळाले नाही. पण खरा आश्चर्याचा धक्का तर पुढेच होता. राजाभाऊंना विचारल्यावर ते म्हणाले की अहो तो तर बंगल्यावर आलाच नाही . घरीच झोपला. मी त्याला सांगितलं की जा साहेब एकटे आहेत, पण त्याने ऐकलच नाही. आता मात्र मी उडालो. मी चक्क बंगल्यावर रात्रभर एकटा झोपलो होतो अणी तरीसुद्धा अगदी सहीसलामत होतो. माझे मलाच हसू आले. इतके दिवस उगाच घाबरून काढले. एकटा असताना काही झाले नाही तर सगळे असताना काय होणार आहे ? खुशीतच मी तयार होऊन फॅक्टरीत गेलो. बाकीची मंडळी सुद्धा घरून फॅक्टरीत आली. दुपारी जेवायला बंगल्यावर आलो तेव्हा सगळ्यांना कळले की मी रात्री बंगल्यावर एकटा झोपलो होतो ते. सगळ्यांनी माझे कौतुक वगैरे केले. मीही थोडा सैलावलो. मनातील भीती आता पूर्ण निघून गेली होती.

त्यानंतर परत मी मोकळेपणाने वावरू लागलो. रात्री जेवणानंतर बाहेर आवारात फेऱ्या मारायचो, एक दोन वेळा फॅक्टरीतून काम आटोपल्यावर सगळे निघायच्या आधीच एकटाच पुढे येऊन आंघोळ वगैरे करून मस्त टीव्ही पाहत बसलो होतो. रात्री साळवी साहेब नसले तरी वर आमच्याच खोलीत झोपायचो. मनावरचे दडपण पूर्ण नाहीसे झाले होते. महिन्यातून एक दोनदा आम्ही सिनेमाला जायचो. साळवी साहेब तर दर शुक्रवारी नवीन सिनेमाला जायचे. फर्स्ट डे नाईट शो. अशाच एका शुक्रवारी आम्ही फॅक्टरीतून जरा उशिरा आलो. फ्रेश होईपर्यंत साडेदहा वाजले. जेवताना साळवी साहेब नव्हते. राजाभाऊंना विचारले तर म्हणाले सिनेमाला गेले असतील. जेवण करून , थोडा वेळ गप्पा मारून, साडे अकराच्या सुमारास आपापल्या खोलीत झोपायला गेलो. त्या दिवशी वीज नव्हती. मी आपला आमच्या खोलीत पहिल्या मजल्यावर जाऊन झोपलो. साळवी साहेब सव्वा बारा पर्यंत येणार होते. ते मच्छरदाणी लावून झोपत. बेडच्या चारही बाजूंनी मच्छरदाणी दांड्यांना बांधलेली असे. सकाळी ते ती वर गुंडाळून ठेवत व रात्री झोपताना खाली सोडत. त्या रात्री सुद्धा मच्छरदाणी वर गुंडाळून ठेवलेली होती. मी माझ्या सवयीप्रमाणे डोक्यावरून पांघरूण घेऊन झोपून गेलो. दार मी नुसते लोटलेले होते. साळवी साहेब आले की मला उठावे लागू नये म्हणून मी कडी लावत नसे. त्या दिवशी बरेच काम केल्याने दमलो होतो. लगेच झोप लागली. रात्री झोपेत खोलीत कुणीतरी वावरतय असे वाटले, पाय घासत चालल्याचे आवाज पण आले. झोपेत होतो म्हणून जास्त लक्ष दिले नाही. साळवी साहेब सिनेमावरून आले असतील म्हणून तसाच झोपून राहिलो कारण मी जर जागा आहे हे कळले तर लगेच ते सिनेमाची स्टोरी सांगायला लागायचे. रात्री कधीतरी इन्व्हर्टर संपला. पंखा व नाईटलॅम्प बंद झाले. मला उकडायला लागले म्हणून डोक्यावरचे पांघरूण काढले. खोलीत अंधार होता. साळवी साहेब पाठमोरे झोपलेले अस्पष्ट दिसत होते. मच्छरदाणी खाली सोडलेली होती. मी परत झोपी गेलो. सकाळी सहाला वीज आल्यावर पंखा सुरु झाला व थंडी वाजून मला जाग आली. बऱ्यापैकी उजाडले होते. साळवी साहेब जागेवर नव्हते. मच्छरदाणी वर गुंडाळून ठेवलेली होती. मला आश्चर्य वाटले की इतक्या सकाळी साळवी साहेब गेले कुठे ? थोडा वेळ लोळून मी उठलो. नेहमीप्रमाणे सर्व आवरले, नाश्ता करून फॅक्टरीत गेलो. आज शनिवार असल्याने पटापट काम आटपून घरी पळायचे होते. साळवी साहेब सुद्धा खूप कामात होते त्यामुळे त्यांच्याशी काही बोलणे झाले नाही. दुपारी घरी जायला निघालो. भावसार साहेबांबरोबर कारनेच मुंबई ला आलो. रविवार कसा गेला ते समजलेच नाही. सोमवारी परत साखरवाडी. या रुटीन ची सुद्धा आता सवय झाली होती. सोमवार नेहमीप्रमाणेच बिझी गेला. रात्री दमून भागून बंगल्यावर गेलो. अंघोळ वगैरे करून जेवणाच्या टेबल वर सगळे जमलो. गप्पा टप्पा सुरु होत्या. अचानक मला आठवण झाली व मी साळवी साहेबांना विचारले. " काय हो साळवी साहेब, सकाळी एवढ्या लवकर उठून कुठं गेला होतात ? काय जॉगिंग वगैरे सुरु केलंय कि काय?" यावर ते काही न संमजल्यासारखा चेहरा करून म्हणाले, "नाही हो, मी कुठे उठतो लवकर". मी म्हटले, अहो असं काय करताय? शनिवारी नाहीका सकाळी तुम्ही लवकर गेलात. मला तर तुम्ही रात्री सिनेमा वरून कधी आलात आणि सकाळी कधी गेलात ते कळले सुद्धा नाही. यावर ते अजूनच गोंधळलेल्या चेहऱ्याने म्हणाले, "अहो काय बोलताय तुम्ही? मी तर शुक्रवारी सिनेमाला गेलोच नव्हतो. आणि सिनेमा सोडा, मी तर बंगल्यावरच आलो नव्हतो. माझी फॅमिली आली होती पुण्यावरून, त्यामुळे मी क्वार्टर्स वरच राहिलो रात्री.

माझा चेहरा पांढराफटक पडला. हातातला घास गळून पडला. काहीतरी बोलून मी संभाषण संपवले. आता मला जेवण जाणेच शक्य नव्हते. हात धुवून हॉलमध्ये जाऊन बसलो. . शुक्रवारी रात्री जर साळवी साहेब बंगल्यावर आले नव्हते, तर मध्यरात्री खोलीत कोण वावरत होते? पाय घासत कोण चालत होते? साळवी साहेबांच्या बेड वर पाठमोरे कोण झोपले होते? मच्छरदाणी कोणी वर-खाली केली? माझे तोंड कोरडे पडले होते, घसा सुखला होता. हृदय धडधडत धडधडत आता तोंडातून बाहेर येतंय कि काय असे वाटू लागले. ती रात्र मी जागूनच काढली. दुसऱ्याच दिवशी मी माझी झोपायची सोय खाली रवी-सुधीरच्या खोलीत करायला सांगितली. वरच्या खोलीत काय' वरच्या मजल्यावरही जाणे मी बंद केले. संध्याकाळी काम संपल्यावर बंगल्यावर जाण्याची वेळ झाली की माझी छाती धडधडू लागे. काम करणे अशक्य झाले. माझ्यातला बदल इतरांच्या लक्षात येऊ लागला. सुदैवाने लवकरच मला दुसरी जॉब ऑफर पुण्याची आली आणि मी सगळ्यांचा इतकी चांगली कंपनी न सोडण्याचा आग्रह मोडून, (भावसार साहेबांचे मन दुखावून) कॅडबरीला, साखरवाडीला, जी एम बंगल्याला आणि त्या गूढ "रूममेट"ला कायमचा रामराम ठोकला.

समाप्त.

कथालेखअनुभव

प्रतिक्रिया

अमितदादा's picture

16 Aug 2017 - 1:28 am | अमितदादा

भारीच एकदम अनुभव/कथा..लेखनशैली ही छान

भारी लिहिलाय किस्सा. वाचायला मजा आली.

अभिजीत अवलिया's picture

16 Aug 2017 - 7:13 am | अभिजीत अवलिया

आवडली कथा.

अजया's picture

16 Aug 2017 - 7:31 am | अजया

खरं की कथा?

प्रशांत लेले's picture

16 Aug 2017 - 9:41 am | प्रशांत लेले

थोडं खरं थोडी कथा.

प्रशांत लेले's picture

16 Aug 2017 - 9:59 am | प्रशांत लेले

माझा मिपा वरील पहिलाच प्रयत्न आहे.

जेम्स वांड's picture

16 Aug 2017 - 10:01 am | जेम्स वांड

शैली मस्त आहे!

स्थळ आणि परिस्थिती वर्णनामुळे मूळ कथावस्तू थोडीशी झाकोळली जातेय एवढे सोडले तर मस्त लिखाण.

प्रशांत लेले's picture

16 Aug 2017 - 12:59 pm | प्रशांत लेले

सहमत

लोनली प्लॅनेट's picture

16 Aug 2017 - 12:10 pm | लोनली प्लॅनेट

भारीच... अंगावर काटा आला राव

प्रशांत लेले's picture

16 Aug 2017 - 12:54 pm | प्रशांत लेले

धन्यवाद

विवेक्पूजा's picture

16 Aug 2017 - 2:21 pm | विवेक्पूजा

या बंगल्या मागे एक विहीर आहे का हो? आणि पाण्याची टाकी?

प्रशांत लेले's picture

16 Aug 2017 - 5:16 pm | प्रशांत लेले

एक विहीर आणि पाण्याची टाकी आहे एका कोपर्यात

विवेक्पूजा's picture

17 Aug 2017 - 10:25 am | विवेक्पूजा

:) त्या विहिरीबद्ल कथा ऐकुन आहे.

सस्नेह's picture

16 Aug 2017 - 3:06 pm | सस्नेह

लेखन आवडले.

ज्योति अळवणी's picture

16 Aug 2017 - 4:02 pm | ज्योति अळवणी

झक्कास स्वानुभवाची कथा. खूप आवडली

भित्रा ससा's picture

16 Aug 2017 - 4:13 pm | भित्रा ससा

आवडले लिहीत राहा
शुभेच्या

भित्रा ससा's picture

16 Aug 2017 - 4:13 pm | भित्रा ससा

आवडले लिहीत राहा
शुभेच्या

शलभ's picture

16 Aug 2017 - 4:41 pm | शलभ

लिहिलंय मस्त..
साखर वाडी बद्दल ऐकलंय कॉलेज मध्ये असताना.. काही मित्र होते तिथले..

मराठी कथालेखक's picture

16 Aug 2017 - 4:43 pm | मराठी कथालेखक

छान..

सिरुसेरि's picture

16 Aug 2017 - 5:04 pm | सिरुसेरि

थरारक अनुभव / कथा .

प्रशांत लेले's picture

16 Aug 2017 - 5:17 pm | प्रशांत लेले

सगळ्यांना खूप खूप धन्यवाद

रेवती's picture

16 Aug 2017 - 5:42 pm | रेवती

बापरे....................अवघड आहे असं राहणं.

पद्मावति's picture

16 Aug 2017 - 8:02 pm | पद्मावति

मस्तच!

पैसा's picture

16 Aug 2017 - 10:22 pm | पैसा

खूपच छान लिहिलंय.

रुपी's picture

16 Aug 2017 - 10:54 pm | रुपी

छान लिहिलंय.. कथा भारी रंगवलीये.

पण शेवटी जरा अपेक्षाभंग झाला. काहीतरी रहस्य बाहेर येईल असे वाटले होते, पण तसे काही झाले नाही.

एमी's picture

17 Aug 2017 - 2:37 am | एमी

+1

विवेक्पूजा's picture

17 Aug 2017 - 10:43 am | विवेक्पूजा

त्या विहिरीबद्ल अणि बंगल्याबद्ल भुताटकीच्या कथा आहेत. मी लहान असताना आम्हा मुलाना कधी बंगल्याजवळ जाऊ द्यायचे नाहीत. मलातरी असा अनुभव नाही त्या जागेचा. पण आमचे सर्व प्रयोग दुपारी केल्यामुळे रात्री तिथे काय खेळ चालतात माहिती नाही. :)

पगला गजोधर's picture

17 Aug 2017 - 10:46 am | पगला गजोधर

साखरवाडि माहित असल्यामुळे, बरेचसे वर्णन अचूक पकडले आहे.

प्रशांत लेले's picture

17 Aug 2017 - 10:01 pm | प्रशांत लेले

मला स्वतःला ते गाव खूप आवडलं होतं. म्हणून चांगलं वर्णन करू शकलोय.

पगला गजोधर's picture

18 Aug 2017 - 6:28 pm | पगला गजोधर

पहिले अतिशय टुमदार आखीव रेखीव सुरेख गाव होतं ते, आता रया गेलीय सगळी .....

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Aug 2017 - 1:20 pm | अमरेंद्र बाहुबली

आता माझी झोप उडेल त्याच काय?? मी पण एकटच राहतो रूमवर......:(

अभिजीत अवलिया's picture

17 Aug 2017 - 1:49 pm | अभिजीत अवलिया

तुम्ही बाहुबली आहात ना. मग भुतांची काय बिशाद?

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Aug 2017 - 3:00 pm | अमरेंद्र बाहुबली

हो. पण बाहुबली ला मेलेल्यांशी लढण्याचा अनुभव नाही. :(

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Aug 2017 - 10:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

बाहुबलीच्या पुढच्या भागात भूताखेतांशी लढण्याचा अनुभव पण मिळेल, हाकानाका ! :)

मस्त अनुभववर्णन केलेत तुम्ही. पण अभ्यादादा म्हटले तसे स्थलवर्णन जास्त झालेय. त्यामुळे व्हिज्युवलाईझ करायला त्रास होतोय.(निदान मला तरी झाला.)

आयडी घेताना आणि घेतल्यानंतर ४ वर्षे बिल्कुल वाटलेले नाही की एक ना एक दिवस आपण दादा होऊ.
चांगलेय चांगलेय. एन्जॉयींग दादागिरी, वेटिंग फॉर काकागीरी.

अभिदेश's picture

17 Aug 2017 - 10:03 pm | अभिदेश

मामा होऊ देऊ नकोस.... :-)

धर्मराजमुटके's picture

17 Aug 2017 - 6:35 pm | धर्मराजमुटके

मिपावरील सर्वांना विनंती की त्यांनी असे अनुभव घ्यावेत आणि इथे लिहावेत. :)

प्रशांत लेले's picture

17 Aug 2017 - 9:59 pm | प्रशांत लेले

सर्वांना खूप खूप धन्यवाद. विवेक्पूजा - मी सुद्धा कधी रात्री विहिरीच्या बाजूला गेलो नाही. पण सकाळी गेलोय. दोन पाण्याच्या मोटर होत्या, एक चालू एक बंद. बंद वाली विहिरीत आतमध्ये आडवा वासा टाकून त्यावर बांधून ठेवलेली होती व पूर्णपणे गंजलेली होती. तिथे मला नेहमी अस्वस्थ वाटायचं.

तुम्ही साखरवाडीचे आहात हे ऐकून बरं वाटलं.

प्रशांत लेले's picture

17 Aug 2017 - 10:39 pm | प्रशांत लेले

बंगल्याची काही छायाचित्रे डकवण्याचा प्रयत्न फोल ठरलाय माझा. काही केल्या जमत नाहीये.

असू द्या. खरं तर कथेत तुम्ही बरंच वर्णन केलं आहे आणि वाचकही त्यांच्या कल्पनेप्रमाणे तसे चित्र डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतात, त्यामुळे कथेमध्ये चित्रे नसलेलीच बरी (असं आपलं माझं मत).

विशुमित's picture

17 Aug 2017 - 11:43 pm | विशुमित

धागा आज उघडला. आणि बघतोय तर काय साखरवाडी? ४-५ किमी वरच माझे गाव आहे. बंगल्याबद्दल खूप ऐकून होतो.. स्थलमहिमा जवळपास सगळं कव्हर केले आहे.

प्रशांत लेले's picture

18 Aug 2017 - 12:27 pm | प्रशांत लेले

सर्वांना मनापासून धन्यवाद

गामा पैलवान's picture

18 Aug 2017 - 1:01 pm | गामा पैलवान

जाणकार लोकहो,

साखरवाडीत हा बंगला कुठेशी आहे? उत्सुकता जाम चाळवली गेलीये. कोणता रस्ता आहे जवळपास? संदर्भ म्हणून कृपया विकीम्यापियावरचं हे पान बघा : http://wikimapia.org/#lang=en&lat=18.055131&lon=74.331565&z=16&m=b&searc...

आणि बंगला कुठे आहे ते सांगा.

धन्यवाद.

आ.न.,
-गा.पै.

प्रशांत लेले's picture

18 Aug 2017 - 3:16 pm | प्रशांत लेले

फुटबॉल ग्राउंड च्या शेजारी मोठ्या मोकळ्या जागेच्या मधोमध आहे तोच जी एम बंगला.

गामा पैलवान's picture

18 Aug 2017 - 5:57 pm | गामा पैलवान

प्रशांत लेले,

अरे, हा बंगला तर भरवस्तीत आहे. मी गावाबाहेर शोधंत होतो. माणसांची गर्दी इतकी वाढलीये की भुतंही भरवस्तीत राहायला आली म्हणायची! ;-)

आ.न.,
-गा.पै.

प्रशांत लेले's picture

18 Aug 2017 - 6:19 pm | प्रशांत लेले

आता वस्ती खूप वाढली आहे. मी तिकडे होतो तेव्हा बरीच कमी वस्ती होती. आठ नऊ वर्षे झाली आता. पण भर वस्तीत असला तरी बंगल्याच्या भोवती बरीच मोकळी जागा आहे. त्यामुळे भीतीदायक असते रात्री.

विशुमित's picture

18 Aug 2017 - 1:50 pm | विशुमित

साखरवाडीतील मित्राला आता फोन केला होता त्या बंगल्याबाबत. त्याच्या म्हण्या नुसार त्या सगळ्या कंपनीतल्या लोकांनी आणि स्थानिकांनी पसरवल्या अफवा आहेत भुताटकीच्या. आपटे सर आणि इतर साहेब लोकांना घाबरवण्यासाठी करत असावेत बहुतेक. काही त्यांचे जुने हिसाब 'किताब असतील, देव जाणे!! तुम्हाला आलेले अनुभव खोटे आहेत असे मला म्हणायचे नाही पण इतर ही काही कारणे असू शकतील असे वाटते.
मी आता सध्या भुबनेश्वर ला कामानिमित्त आहे. आमच्या कंपनीचे प्रशस्त गेस्ट हाऊस आहे. सुरवातीचे ३-४ दिवस मजेत गेले. छान झोप लागत होती.
इन्सुरन्सची कागदपत्रे तपासत असताना समजले की मी ज्या रूम मध्ये झोपतो ती २०११ मध्ये जळून खाक झाली होती. आग कशी लागली हे अजून तरी समजलेच नाही. पण झाले असे की त्या रूमकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला आहे. त्यात रात्री तुमचा लेख वाचला. पहाटे ३.३० वाजे पर्यंत टीव्ही पाहत बसलो. शेवटी शरीराने त्राण सोडून दिला आणि कधी झोप लागली ते समजले पण नाही. सकाळी १०.३० उठलो. नशीब ऑफिस गेस्ट हाऊस ला चिटकून आहे.

प्रशांत लेले's picture

18 Aug 2017 - 3:15 pm | प्रशांत लेले

मला झालेले भासही असू शकतात. पण एकूण वातावरणाचा परिणाम म्हणा किंवा इतरांनी सांगितलेल्या गोष्टींचा परिणाम म्हणा, मला मात्र तास अनुभव आला हे मात्र खरं.

अनुभव आला पण असेल त्यात काही दुमत नाही. असे २ अनुभव मला पण आले आहेत. पण अतींद्रिय अनुभव म्हणावे का हे समजत नाही.
---------------------------
हे म्हणणे माझ्या मित्राचे आहे. ती कंपनी बंद आहे गेली काही वर्षे. त्या बंगल्यासमोर आता मुले क्रिकेट खेळतात. पुन्हा चालू होणार आहे वाटतं ती कंपनी दुसरे प्रॉडक्ट लाँच करून.
येताय का परत ? आपण शोध घेऊन तुमच्या रूममेट चा. ; – ) (हा घ्या)

प्रशांत लेले's picture

18 Aug 2017 - 3:48 pm | प्रशांत लेले

कॅडबरी ने त्यांच्या बरोबर कॉन्ट्रॅक्ट तोडल्यावर काही दिवसातच ती बंद पडली होती. पण मी त्या आधीच तिथून गेलेलो होतो. खरं म्हणजे परत एकदा जाऊन तो सर्व परिसर पाहावा आहे खूप वाटते मला. बघू, जेव्हा जाईन तेव्हा तुम्हाला नक्की सांगेन.

विशुमित's picture

18 Aug 2017 - 3:54 pm | विशुमित

कट्टाच करायचा का त्या बंगल्यात ? आपण सगळे जमलो तर तो रूममेट पण जॉईन होईन, आपल्यातलेच दिसतात सगळे असे समजून, काय म्हणताय?

प्रशांत लेले's picture

18 Aug 2017 - 4:19 pm | प्रशांत लेले

जरूर

मराठी कथालेखक's picture

18 Aug 2017 - 3:59 pm | मराठी कथालेखक

साखरवाडी गाव म्हणजे ब्रिटिशकालीन हिलस्टेशन होते

आताही हवापालटाला जाता येईल का तिथे ? रहायला चांगले हॉटेल आणि जवळपास चांगले निसर्गसौंदर्य आहे का ?

हे गाव लोणंद फलटण रस्त्यावर आहे. पुण्याहून सासवडमार्गे गेलो तर वाटेत जेजुरी लागते. खेड शिवापूर मार्गे गेलो तर वाटेत वीर धारण लागते जो फारच सुरेख परिसर आहे. तसेच फलटण चे राम मंदिर, मोरगाव चा गणपती, गोंदवले, वगैरे ठिकाणे आहेत आजूबाजूला. पण गावात विशेष असं काही नाही (जी एम बंगला सोडला तर :)

नाही हो. साधारण गाव आहे. फक्त हे गाव खूप जुने आहे म्हणतात. पूर्वी तिथे इंग्रजांचा कॅम्प होता. फलटण संस्थान कनेक्शन असावे कदाचित. माझ्या आईच्या मोठ्या चुलत्यांना साप चावला होता त्या वेळेस इंग्रज डॉक्टरानी इलाज केला होता तिथे. पण ते त्यांना नाही वाचवू शकले.
इथला आठवडी बाजार पूर्वी खूप विशेष होता, असे जुनी लोक सांगतात. पण आता प्रत्येक गावा गावा मध्ये आठवडी बाजार चालू झाल्यामुळे एवढे विशेष काही नाही.
१५-२० गावामध्ये एकच थेटर होते, "रोशन" नावाचे. आमच्या काळात आम्ही रात्री सायकल वर जायचो. ते पण आता बंद पडले आहे.
बाकी काही विशेष नाही (जी एम बांगला सोडून )...!!

पगला गजोधर's picture

18 Aug 2017 - 6:32 pm | पगला गजोधर

आता सत्ताकेंद्र "सुरवडी" ला सरकलेले आहे ...

विशुमित's picture

18 Aug 2017 - 7:42 pm | विशुमित

राईट ...
कमिन्स आली ना

पगला गजोधर's picture

18 Aug 2017 - 7:53 pm | पगला गजोधर

पण सुरवडीकर, रेल्वे काय आणू शकले नाहीत अजून सुरवडीला, निदान लोणंद-सुरवडी लाईन टाकली असती ...

लोकांनी खोड घातला ना. नाहीतर नजीकच्या येणाऱ्या काळात लोकल पण चालू झाली असती पुण्यावरून. (स्वप्नरंजन आहे म्हणा)