शामभट्टाची "युरोप" वारी .. इटली, स्वीस, फ्रान्स लेखांक ९

चौकटराजा's picture
चौकटराजा in भटकंती
9 Aug 2017 - 10:15 am

दिवस ९ -
आमचा होस्ट एरिक याने सुचविल्याप्रमाणे माउंट रिगी ला जायचे असे नक्की केले होते त्याप्रमाणे सकाळी लवकर उठणे झाले. पण आज आम्ही आमची रूम सोडणार होतो. कारण बुकिंग एकाच रात्रीचे होते. मग काटजाला विचारले आम्ही रूम सोडून तुमचे इथे आमच्या दोन बॅगा ठेवल्या तर चालतील का? तिने लगेचच होकार भरला व आमची परत येण्याची वेळ नक्की करून घेतली. आम्हाला दुपारी साडेतीन च्या दरम्यान आमच्या पुढच्या मुक्कामासाठी लूझर्न वरून इसेल्टवाल्ड या अतिरम्य ठिकाणी जायचे होते.

काटजाकडे बॅगा सोडून बस गाठली व दहा मिनिटात लूझर्न रेल्वे स्टेशन समोरील बोटीच्या धक्यावर जाउन पोहोचलो. बोट आलेली नव्हती. थोडे फार पर्यटक मात्र गोळा झालेले होते.आजचा दिवस लुसर्न मधे तर मस्त उगवला होता. आजबाजूचे डोंगर आपले चंदेरी मुकुट उन्हात मिरवीत होते. दहा एक मिनिटात बोटीच्या धक्याचे प्रवेशद्वार उघडण्याच्या हालचाली चालू झाल्या . शाळेत ज्याप्रमाणे सहलीला दोन दोन मुलांच्या रांगा करतात त्याप्रमाणे आमच्या रांगा झाल्या. बोट आली तशी नौकानयनाचा आनंद प्रत्येकाच्या मनांत ओसंडू लागलेला दिसत होता. सर्वजण बोटीत बसल्यावर बोट सुटली. सुरूवातील अत्यंत कमी वेगाने जात दहा मिनिटात मात्र ती योग्य त्या दिशेने दौडू लागली.
.
माउंट पिलॅट्स
.

.

.

.

.
माउंट पिलॅटस हे लूझर्न लेकच्या नैऋत्येला , टिटलिस हे दक्षिणेला तर रिगी हे पूर्वेस आहे. रिगीला जाताना लेकच्या मध्यावर बोट जाते. व नंतर किनार्‍यावरील
अत्यंत सुंदर सुंदर देखाव्याचे दर्शन घेत आपण वेगीस या स्थानी येऊन पोहोचतो. यावेळी काठावरची छोटी छोटी गावे ,हॉटेल्स च्या इमारती. डोंगरांचे हिरवेकंच
उतार आपल्याला न भूतो असा आनंद देत सुटतात. बोटीवरचे वातावरण अगदी फेस्टीव्ह असते. आतमधे खाण्यापिण्याची सोय असते. व बाहेर पहिल्या व दुसर्‍या मजल्यावर ओपन डेक्स वर बाके टाकलेली असतात. प्रत्येक बोटीवर अर्थातच स्वीस चा ध्वज फडकत असतो. रिगीला जाण्यासाठी वेगीस येथून केबल कार आहे
वेगीस पासून पुढे दहा मिनिटावर एक विट्झनाउ नावाचे गाव आहे .तिथून . कॉगव्हील तंत्राचा वापर करून ४० /४५ अंशाचा कोन करीत चढणारी रिगीबान कंपनीची मिनिट्रेन आहे.
.

वेगीसच्या धक्यावर बोट टेकली अन काही पर्यटक उतरले त्यात आम्हीही होतो. वेगीस वरून केबल कारने वर जावे व येताना ट्रेनने उतरावे असा आमचा बेत होता. वेगीसचे केबल कार लॉन्चिंग होते कुठून हे विचारण्यासाठी प्रवासी माहिती केंद्र समोरच होते. " आज दुरूस्तीमुळे केबल बंद आहे... पण तुम्ही आतच बसने विट्झनाउ ला जाउ शकता व तिथे तुम्हाला ट्रेन मिळेल. " तिथल्या स्वागतिकेने हे स्पष्ट केल्यावर बोटीला कनेक्टिंग बस असणारच हा स्वीसचा नियम एव्हाना ध्यानात आला होता. लगबगीनेच बाहेर आलो ते बस उभीच . आत शिरलो. लेकच्या काठाकाठाने रम्य झाडीतून माग काढीत बस जाउ लागली. दहा मिनिटात विट्झ्नाउ येथे पोहोचलो. तर इथे बसला कनेक्टिंग ट्रेन तयार. पास असल्याने तिकीट वगैरे भानगड नाही. ट्रेन बरोबर वेळेवर मार्गस्थ झाली. मार्ग म्हणजे काय ४० /४५ डिग्री असलेली चढण.
.
रिगीबान ची कॉगव्हील मिनिट्रेन
.
जसजसे वर जाउ लागलो तसे लूसर्न लेक च्या पाण्याचे निळे तुकडे , त्याभोवतीचे डोंगर, खाली किनार्‍यालगतच्या गावमधील इमारती, उतारावरची हिरवीगार कुरणे ही दिसू लागली. मधे काही स्टेशन वर ट्रेन थांबली.
.

.

.
लवकरच सर्व हिरवीगार कुरणे लुप्त होउन बर्फ पांघरलेल्या धरेचे चढउतार दिसू लागले. झाडे बर्फाने मढलेली तर घरे बरीचशी बर्फाच्या ढिगारा डोक्यावरती घेऊन उभी. दूरचे डोंगर धुक्यात दडलेले दिसू लागले. एरवी माउंट रिगी हे खान पान , मनसोक्त पोहोणे व कुरणांमधून भटकणे यासाठी प्रसिद्ध आहे.आता मात्र ते आम्हाला हवे असे बर्फावगुंठित असे दिसत होते.

.
.
रिगी क्लूम हे सर्वात वरचे स्टेशन आहे. एका बाजूला चढाव व दुसर्‍या बाजूला काहीसा उतार अशा बेचकीत ते बसविले गेले आहे.
.
चढावर सगळे बर्फ साठलेले. आजूबाजूस एकच सफेद असा धुक्याचा मलमली पडदा. सगळे पर्यटक उतरले व काही क्षणातच पांगले. आम्ही दोघे चढण चढू लागलो. वर जाता यावे म्हणून मुळात जिथे रस्ता आहे तो भाग बर्फापासून मुक्त करण्यात येत असावा. वितळलेल्या बर्फाच्या थंडगार पाण्याचे ओघळ रस्त्यावरून खाली येत होते. वर मधेच एका जागी फोटो काढण्यासाठी एक स्पॉट केला आहे. काही वेळेस आपण बर्फावरून घसरून पडू अशी स्थिती येतेच.पण गुलमर्ग ला एका कस्श्मीरी माणसाने सांगितलेली बर्फातून चालण्याची पद्धत अवलंबिली सबब यावेळी मात्र घसरून पडलो नाही. तिथून हलू नये असे वाट होतेच पण वेळेवर लूझर्न ना पोचून पुढे इसेल्टवाल्ड ला जायचे असल्याने मोह आवरून उतारास लागलो. जरासा पाउस पडू लागला. स्टेशन जवळ एक रेस्ट्रो सीजन साठी केलेले आहे . त्याच्या पोर्च मधे आडोशास घुसलो. खिडक्यांपुढील छज्जा वरून खाली येताना पाणी गोठून त्याच्या खाली वाकलेल्या सुया दिसत होत्या.
.
,
पाचेक मिनिटात पाउस ओसरला तसे खाली स्टेशनवर आलो. गाडी आली तसे स्वार होऊन उताराच्या मार्गास लागलो. अर्ध्या तासात विटझ्नाउ च्या धक्क्यावर येउन पोहोचलो.
.
स्वीस च्या नियमाप्रमाणे लगेचच बोट आली व आम्ही व काही पर्यटक पुन्हा लूझर्न लेक चा आनंद घेत लूसर्न च्या रेल्वेस्टेशन समोरील बोट स्थानकावर उतरलो. दोन पाच मिनिटात बस मिळाली. दहा मिनिटात काटजा च्या बंगल्यावर जाउन आमच्या बॅगा ताब्यात घेतल्या . काटजाचा तिच्या पोराबरोबर एक फोटो घेतला व तिचा ह्र्द्य निरोप घेऊन निघालो. लूझर्न ते इंटरलाकेन प्रवास सुरू झाला. कधी लेकस , अधे मधे पूल तर अधेमधे बोगदे. असा मस्त निसर्ग पहात आमची गाडी अखेर " ब्रिन्झ" ह्या गावी आली. आता येथून पुढचा प्रवास बिन्झ लेकच्या काठाकाठाची रम्य गावे पहात होणार होता.

ब्रिन्झ व थून ही दोन विशालकाय तळी आहेत. या दोन तलावाना जोडणारे ठिकाण म्हणजे इन्टरलाकेन. हे ही लूझर्न प्रमाणे पर्यटकांसाठीचे एक महत्वाचे बेस सेंटर आहे. म्युरेन ,आयगर , युंगफ्राउ, शिलट्होर्न, हार्डर क्लूम ई रम्य व गारठवणार्‍या जागी नेणारे हे केंद्र. त्याकडे जात असता तलावाच्या पलिकडील तीरावरचे मी जाणार असलेले अत्यंत रमणीय व चिमुकले इसेल्टवाल्ड मला दिसू लागले. इसेल्टवाल्ट ते इण्टरलाकेन अंतर १३ ते १४ किमी चे असेल. इंटरलाकेन वरून दर अर्ध्या तासाने बोट किंवा बसने जाण्याची सकाळी ६ ते रात्री ८ ३० पर्यन्त सोय आहे. (बहुदा बोट मात्र सहा नंतर नाही) .इंटरलाकेन स्थानकाच्या समोरच बस मिळाली. पुन्हा एका बाजूस अगदी रस्त्याला चिकटून असलेले ब्रिन्झ लेक व दुसर्‍या बाजूला डोंगर अशा मधून झाडीतून वाट काढीत एकदाचे इसेल्टवाल्ड डोरप्लाट्झ इथे उतरलो. बस स्थानकापासून अगदी पांच मिनिटाच्या अंतरावर असलेल्या "लेक लॉज "होस्टेल येथे दोन रात्रीचे बुकिंग घरूनच केले होते. व कसे जायचे हे अगोदर गूगल स्ट्रीट व्ह्यू मधून पाहून झालेले होते.
.
लेक लॉज च्या समोरच ब्रिन्झ लेक आहे. व तिकडच्या बाजूची रूम आम्हाला देण्यात येईल असे बुकिंग मधे होते. पण आम्ही कोणतेही पैसे आगाउ न भरल्याने कदाचित॑ आम्हाला मागे डोंगराकडे तोंड करून असलेली बालकनी मिळाली.असो. हे होस्टेल हा एक मजेदार अनुभव भारतीयानी घ्यावा असा आहे. तळमजल्यावर सुसज्ज असे स्वयंपाक घर आहे. इतर पर्यटकानी सोडलेली फळे, दूध ब्रेड कुणालाही वापरता येते. उत्तम प्रकारची कॉफी इथे आपल्याला करून घेता येते. आम्ही इथे पुलाव व ढोकळा करून पाहिला. मला इथे एक गोष्ट आढळली ती अशी की कोरिया , जपान चीन या देशातील मुले अधिक सुसंस्कारित असावीत पाश्चिमात्य व भारता पेक्षा. पंधरा सोळा वर्षाची मुलं मुली एकटे वा दुकटे येतात मायदेशातून. इथे निरनिराळ्या इव्हेन्टस अधे भाग घेतात. स्वयंपाक करतात. शिस्तीत वागतात.कोणतेही आचरट चाळे नाहीत. स्वयंपाकात तुम्हालाही मदत करतात मागितली तर. तळमजल्यावर एक प्रशस्त असा डायनिंग हॉल व त्यालागून लायब्ररी कम टीव्ही रूम आहे. आपण जेवण झाले की प्लेटस काटे चमचे सुर्‍या सर्व धूवून पुसून जागेवर लावायचे असा नियम. आपण एरवी गलथान भारतीय इथे मात्र सगळे नियम नीट पाळत असतो.
.

.

हे गाव खरेच परिकथेत शोभेल असे सुंदर , रम्य व शांत आहे. चेक इनचे सोपस्कार झाल्यावर लगेचच अर्ध्या तासात परिसरात चक्कर मारण्यासाठी बाहेर पडलो. होस्टेल च्या समोरच पसरलेले विशाल लेक. दूर किनार्यावर बर्फाछादित पर्वतांची रांग त्यात घुसलेले विरळ ढग.
.

.

.

सगळं डोळ्यात साठवीत आम्ही ज्या चौकात बसमधून उतरलो होतो इथे आलो.
.
आजूबाजूला नेटकी हॉटेल्स व त्याना लागून तलावाकाठी असलेले " खाजगी " असे लिहिलेले जमीनीचे तुकडे. त्यावर मांडलेली टेबले खुर्च्या सायंकालच्या पार्टीची तयारी बहुदा. सर्व होटेल्स च्या कुंपणावर विविध रंगाच्या फुलांची उधळण केली गेलेली दिसते.

वेळ कमी असताना देखील जमेल तितके परिसराचे अवलोकन करीत होस्टेलवर परतलो. किचन वर जाउन एक दोन पदार्थ तयार केले व निवांत ताणून दिली. उद्या झेरमाट, इटरलाकेन.ई ई ई भरगच्च कार्यक्रम ठरला होता.

क्रमशः

प्रतिक्रिया

हाही भाग आवडला! फोटू कुठेत? लूझर्न अन एकूणच त्या देशातले फोटो बघायला मज्जा येते.
फार पूर्वी तिकडेच केलेल्या बोडेन्सी/ लिन्डाऊ सहलीची आठवण आली.
क्रमशः वाचून आनंद जाहला.

चौकटराजा's picture

9 Aug 2017 - 11:51 am | चौकटराजा

खरेतर असे झाले की अगोदरच आमचा कॅमेरा हरवला.नंतर मोबाईल वर फोटो काढले . त्यात ८ जी बी जे कार्ड संंपले म्हणून लूसर्न मधे घेतलेले १६ जीबी चे कार्ड टाकले. पण हाय दैवा , येताना पासपोर्ट ज्या चोरखिशात ठेवला होता तो पॅरिस एअरपोर्टवरील ड्यूटी फ्री दुकानात बाहेर काढताना आत ठेवलेले ते चिमुकले कार्ड बाहेर पडले. व माउंट रिगी व लूसर्न चे तसेच इटरलाकेन चे फोटो ही हरवले. यातील काही फोटो आम्ही काढलेलेच नाहीत. पण एक नक्की की मी जे वर्णन करतोय त्या जागचेच आहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Aug 2017 - 2:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

स्वित्झर्लंड म्हटले की निसर्गरम्य हा शब्द वापरणे म्हणजे द्विरुक्ती होते.

आधी कॅमेरा आणि आता फोटोची चिप हरवली... म्हणजे बहुतेक सर्व सहलीतल्या अपघातांचा कोटा पुरा झाला. लेखातले फोटो डोळ्यांचे पारणे फेडणारे आहेत. वर्णनही मस्तच !

रुपी's picture

10 Aug 2017 - 4:27 am | रुपी

सुरेख!

प्रचेतस's picture

10 Aug 2017 - 8:44 am | प्रचेतस

जबरदस्त देखणा झालाय हा भाग.
भारी फिरताय काका.

अनिंद्य's picture

10 Aug 2017 - 2:55 pm | अनिंद्य

मालिका मस्त चालली आहे, असे चवीचवीने युरोप आणि त्यातही स्वित्झर्लंड बघणे - ऑस्सम !

(मनात आलेला एक दुष्ट विचार - त्या काटजाचा आपल्या काटजूंशी काही संबंध असावा का ? ... :-)

बोका's picture

10 Aug 2017 - 7:37 pm | बोका

ते नाव बहुतेक कात्या असे असावे. स्पेलिंग Katja. जर्मन भाषेत j चा उच्चार य असा होतो, म्हणून कात्या !
कात्या हे कॅथरीनचे एक लघुरुप आहे.

अनिंद्य's picture

18 Aug 2017 - 11:59 am | अनिंद्य

@ बोका

असू शकेल, पण चौकटराजा ह्यांनी काटजाकडे मुक्काम केलाय, तिच्याशी गप्पा मारल्या आहेत त्यामुळे ते नावाचा उच्चार स्पेलिंगवरून चुकीचा करतील असे वाटत नाही :-)

जर्मन मित्रांच्या जाधवांना 'मिस्टर याधव' आणि जोशींना 'मिस्टर योशी' म्हणायच्या सवयीला सरावलोय आता.

कात्या हे कॅथरीनचे एक लघुरुप आहे - साऊंड्स स्वीट !

अवांतराबद्दल क्षमस्व.