अमेझिंग अॅमेझॉन

समर्पक's picture
समर्पक in भटकंती
31 Jul 2017 - 11:35 am

अॅमेझॉन! नाव घेताक्षणी डोळ्यासमोर येतं ते घनदाट जंगल, असंख्य कीटक साप पक्ष्यांनी भरलेली समृद्ध भूमी, अजूनही जगाच्या आधुनिक संपर्कांस नाकारणारे आदिवासी आणि बरंच काही. अॅमेझॉनच्या जंगलातील भटकंतीचा हा माझा दुसरा अनुभव. काही वर्षांपूर्वी पेरूमध्ये नदीच्या उगमाकडच्या प्रवाहांच्या प्रदेशात जाणे झाले होते तेव्हाच या निसर्गाच्या मायाजालात पूर्ण गुंतलो होतो. नदीच्या अवाढव्य विस्ताराविषयी माहितीत होते, त्यामुळे पुढीलवेळी जाताना जिथे नदीचे विस्तृत रूप पाहता येईल अशा एखाद्या प्रदेशात जायचे हे मनात होते. अॅमेझॉनचा वनप्रदेश हा तसा ९ देशात विस्तारलेला आहे, परंतु महानदी आकार घेते ती ब्राझीलमधेच. "स्टेट ऑफ अमेझॉनास" म्हणजे या वनप्रदेशाचं हृदय! रिओ नेग्रो व सोलीमोस या महानद्या व अनेक उपनद्या एकत्र येत इथे अॅमेझॉन नदास जन्म देतात. अजूनही येथील बऱ्याच भागात मानवी स्पर्श नाही. वाहतूक व प्रवासी वर्दळ फारच कमी व मोजक्या ठिकाणीच. येथेच कुठेतरी जायचे एवढेच नक्की केले.

अॅमेझॉनास राज्याची राजधानी व रिओनेग्रो-सोलीमोस संगमापासून जवळच वसलेले शहर 'मनाऊस' हा या साहसाचा मुख्य तळ म्हणून निश्चित केला. एक कारण म्हणजे शहर म्हणण्यासारखे हे इथले एकच. व हा नदीसंगम अतिशय विशेष आहे हे पुढे दिसेलच. इथली प्रवासी माहिती तशी बरीच कमी उपलब्ध आहे व असलेली बऱ्यापैकी पोर्तुगीजेत. तशी रिओ-साओ पॉलो-इग्वाझू प्रवासाच्या च्या निमित्ताने आधी थोडी भाषा शिकणे झाले होते, पण का कुणास ठाऊक मला हि भाषा अजिबात रुचत नाही. स्पॅनिश त्यापेक्षा फार बरी. शेजारी भाषा असूनही या दोघीत मराठी-कानडी प्रमाणे फरक, त्यामुळे त्या भाषेचे ज्ञानही उपयोगाचे नाही. असो, तर तयारीत प्रथम भाषा. व्हिजा तसा सहज मिळतो, तोही गेल्या वेळचा प्रवासी व्हिसा होताच, पण गंमत म्हणजे तो किती महिने/वर्ष वापरू शकतो हे त्यावर लिहीत नाहीत व ते तिथे गेल्यावरच कळते. पण शक्यतो एक वर्षाचा असतो. तशी हि सहल बरीच माझ्या नेहमीच्या प्रवास सवयीच्या विरुद्ध होती असे म्हंटले पाहिजे. केवळ ‘इथे जायचे आहे’ असे म्हणून होत नसते, तिथला अभ्यास करायला वेळ द्यायला हवा, परंतु या प्रवासात ‘आज ठरविले आणि आठा दिवसात तिथे’ असे काहीसे झाले. बऱ्याच अंशी ट्रू बॅकपॅकिंग... प्लॅन ऍज यु गो... एक्सिक्युट ऍज यु प्लॅन... पोहोचायच्या दिवशीचे हॉस्टेल तेवढे बुक केले आणि प्रस्थान. आता एक नेहमीची प्रवासाची यादी तशी तयारच असते त्यामुळे त्याचेही फार कष्ट नव्हतेच, पण काही गोष्टी यावेळी अधिक घेतल्या त्या म्हणजे पाणी शुद्ध करायच्या गोळ्या आणि दोन प्रकारचे कीटकनाशक स्प्रे.

प्रवासासाठी उत्तम कालावधी होता कारण भरपूर पाऊस पडून गेलेला होता. नद्या अगदी ओतप्रोत भरून वाहत होत्या. सर्व मैदानी भाग पुराखाली आलेला होता (या भागात हे सामान्य आहे). परंतु याचाच अर्थ, कीटकांची नवी पैदास झालेली आहे, वन्यजीव त्यांच्या क्षेत्राच्या बाहेर आलेले आहेत, जलचर दिसणे पुरामुळे अधिक कठीण, स्थानिक प्रवास कठीण, जंगलात कोरडी जागा मिळणे व राहणे कठीण, व सर्वात महत्वाचे म्हणजे अन्नाची उपलब्धता व उपलब्ध अन्नाची शुद्धता... या सर्वांचा विचार करून ज्या गोष्टी बरोबर आवश्यक वाटल्या त्या घेतल्या बाकी तिकडे जाऊन आता इतर सगळ्याचा बंदोबस्त. (या प्रदेशात जाण्यासाठी पीतज्वराची लस व ती घेतल्याचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे, एकदा घेतलेली लस १० वर्षे उपयोगी असते त्यामुळे पेरूला गेलो असतानाचे प्रमाणपत्र असल्याने मला परत घ्यावी लागली नाही. परत मायदेशी पुनर्प्रवेशासही भारतीय अधिकारी याची विचारणा करू शकतात. माझ्या अनुभवात कुठेच कोणी विचारले नाही हा भाग वेगळा... )

मनाऊस : रात्री १० च्या सुमारास मनाऊसमध्ये आगमन झाले. तसे लहान विमानतळ असल्याने इमिग्रेशन अगदी मिनिटात पार. गरम दमट हवा अगदी मुंबई सारखी. हॉस्टेलचे बुकिंग होतेच, त्यामुळे थेट तिथेच आधी गेलो. टॅक्सीचालक १० मैल जाईपर्यंत चांगला मित्र बनला, त्याने एका जवळच्या टूर कंपनीचा पत्ता सांगितला. हॉस्टेल 'अजुरिकाबा' अपेक्षेपेक्षा फारच उत्तम होते. शहराच्या मध्यवर्ती भागात एका जुन्या छोट्या बंगल्याचे हॉस्टेलमध्ये रूपांतर केलेले होते. ब्राझीलमध्ये इंग्लिशला अगदी कोणीही विचारत नाही. रिओ-साओपॉलो सारख्या शहरी भागातसुद्धा क्वचित कोणी मिळते. पण हॉस्टेल चा मालकही अपवाद नाही. माडीवरच्या खोलीत मला जागा दिली. उशीर बराच झालेला त्यामुळे सगळे बाकीचे झोपले होते. प्रवासी हॉस्टेल मध्ये साधारण २ ते ६ दुमजली बंकबेड एका खोलीत असतात. मला एक कोपऱ्यात रिकामा ठेवलेला होता. अजून दोन रिकामे होते तिथे एक जोडपे उशिरा रात्री आले. दमट गरमी चांगलीच जाणवत होती. एकंदरच मोठ्या कपड्याचे या देशात कमीच महत्व असल्याने गरमीच्या दिवसात ते सर्वांच्याच फायद्याचे ठरलेले दिसत होते. ;-)

हॉस्टेल अजुरीकाबा
शहरातली एक म्युरल / भित्तीचित्र
दुसऱ्या दिवशी सकाळची न्याहारी स्वतःच करून घ्यायची होती. तिथे काही दोस्त झाले पण ते सर्व पॅकेज टूर बरोबर कुठे कुठे जात होते त्यामुळे मी आपला मार्ग वेगळाच ठेवला. आधल्या दिवशी मिळालेल्या एका टूर कंपनीलाही भेट द्यावी असे ठरवून एक फेरफटका मारायला बाहेर पडलो. छान कोवळ्या उन्हात परिसर सुंदर दिसत होता. शहरातील प्रसिद्ध नाट्यगृह “तीआत्रो अमॅझॉनास” शेजारीच होते, काही छान चित्रे मिळाली. पुढे टूर कंपनीच्या कार्यालयात काही माहिती घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे किंवा कुठलेच 'पॅकेज' नको असल्याने दक्षिणेस मामोरी नदीच्या खोऱ्यात त्यांच्या मदतीने जावे, तिथे पर्यटकांची सोय तिथले गावकरी करतात असे समजले. व पुढचे आयोजन स्वतःच करायचे असे ठरले. होस्टेलवरून बंदरापर्यंत लिफ्ट, तिथून पुढे मोटार बोट, तिथून एक बस, पुढे पूर आलेला असल्याने पुन्हा बोट, व शेवटी त्या गावात वस्ती असा अर्ध्या दिवसाचा कार्यक्रम. नाऊ धिस प्लॅन इज टोटली ऑफ माय टाईप! ठरले!

तीआत्रो अमॅझॉनास
शहरातली एक चौक
महापालिका
फोटोशूट साठी आलेले एक नवविवाहित दाम्पत्य. मुलगी, स्थानिक जमातीतील लोक नाकीडोळी कसे दिसतात याचे प्रातिनिधिक रूप. मुलगा मिश्र अमेरिन्डियन वर्णाचा आहे.
या साहसाचे साधारण भौगोलिक स्थान

पहिला पडाव मनाऊस बंदरापर्यंत. नेग्रो नदीच्या उत्तर तटावर हे बंदर आहे. आतापर्यंत कल्पनेतच असलेले अॅमेझॉनचे रूप आता इथे पाहावयास मिळणार... अवाढव्य कंटेनर कार्गो समुद्रात असल्याप्रमाणे ये जा करीत आहेत, मासेमारीचे मोठे ट्रॉलर्स व इतर प्रवासी वाहतुकीच्या नावा नांगर टाकून आहेत असे दृश्य. अथांग! एकच शब्द... अफाट पसरलेली रिओ नेग्रो... नावाप्रमाणेच काळे शांत पाणी… सुदूर एक किनाऱ्याची रेष, पण तो तर केवळ मध्यबिंदू, त्यापलीकडे गढूळलेली तेवढीच रुंद सोलीमोस नदी... माझ्या बरोबरच्या चालकाने एकाशी ओळख करून दिली व पुढचा नदीचा प्रवास काही वेळात सुरु. रिओ नेग्रो हि कोलोम्बियामधून उत्तर पूर्वेकडून वाहत येते. या जीवनवाहिनीमुळेच इथल्या समृद्ध जंगलाचे पोषण होते व शेवटी सर्व तिच्यातच सामावून जाते, या साखळीचे आकारमान इतके मोठे आहे की या मिसळून जाणाऱ्या द्रव्यांमुळे नदीचा रंगच गहिरा काळा झालेला आहे. अशीच कथा सोलीमोस नदीची, परंतु ती अँडीज पर्वतश्रेणी कापत येत असल्याने मातीचाही गढूळ रंग लावून घेते. दोघींची भेट इथे होते व पुढील प्रवाहास जग ओळखते ते अॅमेझॉन नावाने!
नदीसंगम, उपग्रहचित्र
प्रथम दर्शन
धक्क्यावर विक्रीस असलेले मासे
नदीत ये जा करणारे अवाढव्य कंटेनर वाहक
अवाढव्य कंटेनर वाहक

एक कोळी महिला तिची मुलगी व मी असे तीन प्रवासी असलेली ती छोटेखानी मोटरबोट नदीच्या लाटांवर स्वार होत पलीकडच्या तिराकडे झेपावू लागली. नेग्रो नदी पार करत असता हळूहळू सोलीमोस चे पाणी दिसू लागले. दोन्ही नद्या वेगवेगळ्या प्रदेशातून येतात त्यामुळे पाण्याचे तापमान, त्यात मिसळलेले घटक यातील मोठ्या फरकामुळे दोघींच्या पाण्याची घनता यात मोठी तफावत आहे. व त्यामुळे संगमस्थानी पाणी एकत्र येत नाही. अनेक नद्यांचे संगम असे विलग दिसतात परंतु येथील घनतेतील तफावत मोठी असल्याने अनेक मैलांपर्यंत त्या शेजारी परंतु वेगळ्या वाहतात त्यामुळे हे विशेष. 'मीटिंग ऑफ वॉटर्स' नावाने प्रसिद्ध असलेला हा संगम एक विशेष अनुभव. संगमस्थानी चालकाने नाव थोडी संथ केली... तिथे कॅमेरानी टिपलेले दोन्ही बाजूना पसरलेले अमर्याद पाणी... एक अथांग श्यामल प्रवाह, आणि दुसरा तितकाच अफाट पिंगल प्रवाह...
अलीकडच्या किनाऱ्यावर श्यामलेचे पाणी ओंजळीत घेतले, स्वतःच्या क्षौद्रत्वाचे प्रतिबिंब पाहिले. पलीकडच्या किनाऱ्यावर पिंगलेचे पाणी ओंजळीत घेतले, स्वतःच्या मलिनतेचे प्रतीक पाहिले. निसर्गाच्या सान्निध्यात विचार थंडावले. चित्त शांत प्रशांत झाले. ओंजळीतल्या पाण्याचा अर्घ्य दिला... पुढले काही दिवस या अमितमगंगेच्या अंगणात खेळायचे... पण हे रौद्र रूप झेपणारे नव्हे, त्यासाठी थोडे लांब लहान प्रवाहांच्या प्रदेशात, 'मामोरी खोरे'!
मीटिंग ऑफ वॉटर्स
नदीसंगम

किनाऱ्यावर एक लहान बस पुढे घेऊन जाणार होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूस लहान खेडी, शेतं, गाव संपलं कि जंगल आणि तळी. ताटापेक्षा मोठाली, कडा असलेली पाने असलेली कमळाची जाळी आणि भरपूर प्रमाणात देशी गायी हे या प्रवासातले विशेष. सगळेच नवीन असल्याने अंतर पटकन पार झाल्यासारखे वाटले. एखाद दोन सरी हजेरी लावून गेल्या त्यामुळे वातावरण गरम असले तरी दृश्य फार सुंदर होते. पुढे बस चा मार्ग संपला, एका तळ्याच्या काठी पुढली नाव. जाताना कळले कि हे तळे नसून पुराचे साठलेले पाणी आहे, अन्यथा रस्ता या खोलगट भागातून पुढे जातो. पाण्याच्या चहू बाजूंस शांत निरव जंगल. या शांत वातावरणात मोटरबोटचा वापर किती अयोग्य आहे असेही वाटले, वाटत राहिले, परंतु येथील हीच वाहतुकीची सोय असल्याने सध्यातरी इलाज नाही.




निसर्गरम्य खेडं

तासाभरात एका गावात पोहोचलो. खरेतर गाव नाहीच तसे, आजूबाजूच्या वस्तीतल्या लोकांनी एकत्र येऊन इथे काही लाकडी घरे बांधली आहेत व पर्यटक त्याचा हॉटेल/हॉस्टेल सारखा वापर करतात. बदल्यात स्थानिकांनाही पैसे मिळतो व पर्यटकांनाही कमीत कमी कृत्रिम असलेला पर्यटनाचा अनुभव. एक मोठ्या वर्तुळाकृती मचाणासारख्या उंचावरच्या माडीवर १०-१२ लाकडी पलंग व सर्वांवर डासाच्या जाळ्या. त्यातलाच एक मी घेतला. साधारण ८-१० लोक आधीपासून आलेले होते. काही रिओ-साओ च्या शहरी भागातले, काही इतर देशातले. माझ्या अपेक्षेपेक्षा अधिक लोक होते पण बहुतेकजण माझ्यासारखेच, त्यामुळे धम्माल! दुपार कलत होती, पण तरीही घामाच्या धारा लागलेल्या होत्या. त्यावर इथे सोपा उपाय, लगतच असलेल्या तळ्यात बुडी मारायची. पाण्याचा रंग सर्वत्र गहिरा काळा-पिवळा, बुडी घेऊन बाहेर आलं कि सगळ्या शरीरावर एक पिवळसर छटा चढलेली. हे मात्र फारच अनपेक्षित होते. नंतर त्याच तळ्याच्या गाळलेल्या (थोड्या कमी पिवळ्या) पाण्याने अंघोळ. कपडे धुतले तरी दमटपणामुळे वाळायला कठीण. हे असे असल्याने सगळी जनता कपड्याचे वावडे असल्यागतच वावरत होती. आल्या दिवशी संध्याकाळी केवळ जंगलाची तोंड ओळख म्हणून आम्ही २-४ टवाळ असेच फिरून आलो. अतोनात डास व तदृश कीटक. दोन वेगवेगळे बग स्प्रे नेऊनही उपयोग शून्य. सूर्यास्तानंतर थोडा भात खाऊन मी ढेर.

राहती जागा

यापुढे रोजचा उद्योग, काही दोस्त बरोबर पकडून, एक काहीतरी दिशा ठरवून जवळच्या गावात जाणे, कोणी स्थानिक बरोबर घेणे, आणि मग दिवसभर भटकणे. हा सर्व प्रदेश मामोरी नावाच्या उपनदीच्या खोऱ्यातील. परंतु पावसाने अॅमेझॉन सर्वदूर भरून जाते. पाहाल तिथे पाणीच पाणी. त्यामुळे रोजचा प्रवास होडीनेच. एक दिवस पिरान्हा शिकार, एक दिवस मोठाल्या वृक्षांच्या शोधात, एकदा मगरी पकडण्याचा उद्योग, एकदा जंगलात राहण्याचे साहस, एकदा स्थानिक आदिवासींना भेट, एकदा डॉल्फिन दर्शन असे अनेक उद्योग करत करत एक छान कंपू जमला. रोजची दिनचर्या ठरलेलीच, सकाळी उठल्यावर बरोबर आणलेल्या ग्रॅनोला चिक्कीची न्याहारी, तळ्यात डुबकी अंघोळ, काही फळे असतील गावात तर ती खाऊन पक्षी वगैरे टिपण्यासाठी एखादी लहानशी रपेट, त्यानंतर आमच्यातले काही जण व बरोबर एखाद दोन स्थानिक असे थोडी दूरची भटकंती, संध्याकाळी घरट्यात परत, पुन्हा डुबकी अंघोळ... एकंदरच जंगल तुलनेत अतिशय शांत होते. नावेची मोटारही आम्ही दाट जंगलात गेल्यावर बंद करत असू. पण स्थानिकाची आवश्यकता फिरण्यासाठी अनिवार्य. एक तळे पार करत काठाच्या झाडीपर्यंत पोहोचावे तर पलीकडेच दुसरे तळे, पुढे तिसरे... कुठेही चकवा लागलाय असा वाटावं इतके सगळे भाग सारखे. काही ठिकाणी विशेष वेगळी झाडे खुणेसाठी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला पण तरीही स्वतःहून वाट शोधणे कठीणच.

रोजचे वाहतूक साधन
रम्य परिसर
पुरामुळे अर्धे पाण्यात बुडालेले जंगल
काही ठिकाणी फसवी जमीन वाटावी अशी जलवनस्पतींची हिरवळ
पाण्यातील प्रवासाची काही क्षणचित्रे

एक दिवस स्थानिक आदिवासी वस्तीलाही भेट दिली. टीव्ही वर पाहतो तसे पाने वगैरे बांधणारे आदिवासीही इथे आहेत, पण या भागातले आता तसे बरेच पुढारले आहेत व आधुनिक जगात बरेच सामावत आहेत. प्रामुख्याने टॅपिओका (साबुदाणा) व काही जंगली फळे याची शेती येथील लोक करतात व त्याशिवाय नदीतील शिकार हे मुख्य अन्न स्रोत. काही खेड्यात वीज येत आहे. त्याबरोबर बाकीच्याही सुधारणा होत आहेत. फोटोसाठी मनाई केली नाही तरी ते लोक फार उत्सुकही वाटले नाहीत त्यामुळे आम्ही कोणी फारसे उगा क्लिकक्लीकाट करायचा नाही असे ठरविले. एक गम्मत म्हणजे हे लोक रोजच हॅमॉक मध्ये झोपतात, फारच विचित्र...

आदिवासी खेड्यात जाताना


रंगीत चिमण्या
मोठाले तुराको पक्षी

एका रात्री मगरी पकडण्याचा उद्योग केला. कायमन या उपजातीतला हा निशाचर प्राणी रात्री शिकारीला बाहेर पडतो. चमकणारे डोळे ही ओळखण्याची विशेष खूण. नवख्यांनी पिले पकडणे सोपे व सुरक्षित. येथे आढळणाऱ्या काळ्या व पिवळ्या (शेपटीतील फरक पहा) दोन्ही जातीच्या मगरी पाहावयास मिळाल्या. किर्रर्र अंधारात पाच सेकंद हेडलाईट चालू करून काही दिसतंय का पाहणे, न दिसल्यास पुढे हळूहळू वल्हवत राहणे, व एकदा चमकणारे डोळे दिसले कि सगळ्यात अवघड म्हणजे शांत राहून हळूहळू होडी तिथे घेऊन जाणे, आणि सार्याव अवघड, एकाच झटक्यात मानगूट धरणे, एकंदरच थरार. एवढेसे पिलू दिसले तरी जाम दम काढते... एकंदर १५ प्रयत्नातील हे दोन यशस्वी...

कायमन मगरी
एका संध्याकाळी पकडलेला टॅरेंटुला
मंद अस्वल स्लॉथ
खंडेराव
परसातले प्राणी
स्थानिक गिधाड प्रजाती
जकान्या पाणकोंबडी

यातील जंगलातील वास्तव्याचा अनुभव विशेष उल्लेखनीय. खुल्या जंगलात एक रात्र तरी राहावे असे माझ्याबरोबरच अजून ५-६ जणांचे मत पडले. दोन स्थानिक वाटाडे शिकारीच्या वस्तीच्या ठिकाणी घेऊन जायला तयार झाले. मग अजून ४-५ जण सामील झाले. तयारी सुरु झाली... फळे, मांस, भाज्या, लाकडे, कापडी घडीचे झोपाळे, डासाच्या जाळ्या, ताडपत्री, कोयते-कुऱ्हाडी, पिण्याचे पाणी, इत्यादी... दुपारच्या सुमारास प्रवासाला सुरुवात, नेहमीप्रमाणे होडीने मुख्य अंतर कापायचे होते. एका ठिकाणी पाण्याचा डोह निमुळता होत पुढे भूभाग थोडा उंचावत होता तिथे नाव किनाऱ्यास लावली. हे लोक शिकारीला येत तेव्हा वस्तीच्या काही ठिकाणांपैकी हे एक होते. त्यामुळे तशी थोडी जागा मोकळी केलेली होती, काही मोठी लाकडे व चुलीची जागाही आधीच होती. लगेच कामाला लागणे आवश्यक होते कारण सूर्यास्तानंतर शून्य प्रकाश. मोठ्या लाकडांचा वापर करून एक रचना तिथे तात्पुरती उभी केलेली होती, त्यावर ताडपत्री टाकून पावसापासून संरक्षण तयार केले. त्याच्या आत, समोरासमोरच्या लाकडी वाशांचा वापर करून त्यावर झोपण्यासाठीचे झोपाळे (हॅमॉक) बांधले. डासाच्या जाळ्या त्यातच गोवल्या. हि सोय अशा जंगलांमध्ये रात्री अतिशय कामाची. हॅमॉक बाळगायला अतिशय हलका व सोपा, तसेच, त्यामुळे जमीन ओली असण्याचा त्रास नाही, जमिनीवरच्या किडे-प्राण्यांचाही उपद्रव कमी. वर जाळी असल्याने उडणाऱ्या कीटकांपासूनही रक्षण. साप व इतर सरीसृपांसाठी केवळ दोन कोपऱ्यात काटेरी किंवा चिकट किंवा दोन्ही प्रकारचे बंदोबस्त केले कि सर्वात सुरक्षित शयनव्यवस्था तयार! पटापट आमचे शयनागार बांधून झाले, सूर्यास्ताचा समय होता, बाजूलाच असलेल्या डोहात आम्ही काही जण एक मासेमारी साठी फेरी मारून आलो. निशाचर मगरी दिसताहेत का हे हि उद्देश्य होतेच. तोपर्यंत पाठी राहिलेल्या लोकांनी अग्नी चेतवला व स्वयंपाकाची तयारी सुरु केली. मोठा विस्तव करून त्यावर मास भाजण्यासाठी लटकवले. ताजे मासे हि होते, मला गावात दोन मोठी वांगी मिळालेली ती आगीत खुपसून ठेवली आणि बाजूला बटाटे. हे भोजन... कदाचित ७ वाजले असावेत... आमच्या गप्पा रंगल्या आणि तोपर्यंत समस्त कीटक वर्गात जंगी पार्टीची वर्दी गेली, त्यांचा उपद्रव वाढू लागला. गावातल्या एकाने आम्हाला अजून एक उपाय शिकविला. एक प्रकारच्या धावऱ्या काळ्या मुंग्या झाडावर वारूळ करून राहतात, त्या वारुळावर हात ठेऊन त्यांना थोडे डिवचले कि शेकड्याने त्या मुंग्या अंगावर चढतात, त्यानंतर तशाच त्या अंगावर चिरडायच्या. आयोडेक्स सारखा त्याचा वास येतो पण नंतर बाकी कोणी कीटक बराच काळ जवळ येत नाही. नंतर बऱ्याच गप्पा रंगल्या, शिकार कथा, भूत कथा, प्रवास कथा अशा अनेक कॅम्प फायर स्पेशल विषयांवर चर्चा. पौर्वात्य जगातला मी एकटाच असल्याने भूत-पिशाच-अध्यात्म-धर्माधर्म अशा विषयात बाकीच्यांना नवीन असलेले दृष्टिकोन चर्चेत आल्याने काही विषय अजूनच रंगले. हिंदू मतांमधील 'लॉ ऑफ कर्मा', 'अबसेन्स ऑफ डेव्हील' आणि 'एव्हरीथिंग हॅज अ स्पिरिट' या संकल्पना बऱ्याच लोकांना फार आकर्षक वाटतात. त्यामुळे स्थानिकांची नदी व जंगलातील देवतांची पूजा व माझी ‘रिव्हर वर्शीप’ (अर्घ्य) यात असलेला 'एव्हरीथिंग हॅज अ स्पिरिट' हा समान धागा व निसर्गाशी भावनिक पातळीवर नाते जोडण्याचा हा कसा एक सोपा मार्ग आहे असा एक विषय झाला. काही जणांना 'पेगन अँड प्राऊड' हा ऍटिट्यूड नवीन होता. आणि हे मला नवीन नव्हते :-) त्यामुळे चर्चा चांगलीच रंगली. विस्तव शांत होत आला तशी झोपाझोप चालू झाली, पण आकाश निरभ्र असल्याने तारकानिरीक्षणासाठी अजून एकदा होडक्यातून खुल्या डोहात एक चक्कर मारून आलो. मगरीचे चमकणारे अक्षद्वय पाण्यात हळूच कुठे दिसत होते. वर असंख्य चांदण्या, मैलोन्मैल कुठेही विजेचा स्पर्शही नसल्याने फारच सुंदर आकाश, अगदी परिचयाची नक्षत्रेही सहज ओळखता येईना इतका खच! सिंह पश्चिमेकडे झेपावलेला तर उगवतीकडे वृश्चिकेचा आकडा वर येत असलेला. डोहाच्या मधोमध वल्ही थांबली, सर्व चर्चामंथन निवले, निरभ्र आकाश, निश्चल डोह, निरव शांती, १० मिनिटांचा सुखानुभव... नंतर परत येऊन निद्रेच्या अधीन.
अजस्त्र काटे
कीटकरोधक रक्त असणाऱ्या मुंग्या
महाकाय वृक्ष

पुढे नदीतले डॉल्फिन पाहणे हा अजून एक खास कार्यक्रम. जगात फार मोजक्या ठिकाणी (अॅमेझॉन, गंगा व सिंधू याच नद्यांमध्ये) हा प्राणी आढळतो. सतत गढूळ पाण्यात वावर असल्याने त्यांना दृष्टी निरुपयोगी असल्याने ती अंध असतात. केवळ ध्वनीच्या साहाय्याने ते क्रमणा करतात. मोटरबोट त्यांना मैलांवरूनही कळते. पुराचा एक फायदा म्हणजे नवीन खाद्याच्या शोधात हे प्राणीही नदीपासून दूर बरेच आतमध्ये येतात. एका ठिकाणी २-४ च्या समूहाचे हलके दर्शन झाले. दुसरा अनुभव पिरान्हा मासेमारी, हे मासे झुंडीने त्यांच्या विशिष्ट डोहात राहतात. तशी शिकार सोपी असते पण फार चपळ व पाण्याबाहेर उड्या मारणारे मासे. मारलेल्या माशांचा बाकीच्या मंडळींनी तुरंत फन्ना उडविला.
गोड्या पाण्यातील डॉल्फिन, अस्पष्ट का होईना पण काही फोटो मिळाले
पिरान्हा मासे ताजे व भाजलेले (आणि खाल्लेले)

अशा या थोड्याच दिवसांच्या परंतु अविस्मरणीय अशा अॅमेझॉन वास्तव्याची हि कहाणी. पहिल्या वेळी पेरूमध्ये अनुभवास आलेली अॅमेझॉन हि बऱ्याच प्रकारे वेगळी होती. पेरूमध्ये नद्या लहान होत्या, जंगले घनदाट होती पण प्राणिजीवन अनुभवणे तुलनेत सोपे होते. रंगीत पक्षी फुले भरपूर प्रमाणात व सहज दिसत होती, वनराई सजलेली, नटलेली व आपल्या समृद्धीचे प्रदर्शन करणारी वाटली. ब्राझीलचे जंगल अधिक गंभीर अधिक दुर्गम वाटले. पक्ष्यांचे आवाज काही ठिकाणी होते पण नजरेस पडणे कठीण. तशीही कोरड्या जमिनीची कमतरता असल्याने प्राणिजीवन दृष्टीस पडणे दुरापास्तच होते, पण एकंदरच अरण्याचा सर्व काही गुप्त ठेवण्याचा नूर वाटला. जगावेगळी निशब्द अन स्तब्ध शांतता. हा इथला अनोखा, अनपेक्षित व काहीसा गूढ अनाकलनीय अनुभव होता.
इथल्या जंगलातली आरशासारखी स्तब्ध प्रतिबिंबे...




आतापर्यंतच्या एकल प्रवासामध्ये हा खासच वेगळा होता. नेहमीसारखे फार आयोजन-प्रयोजन नाही, पाहण्या-करण्याची मोठी यादी नाही, सुविधा असल्या तरी ठीक नसल्या तरी निभावेल अशी बेताची तयारी, समोर असलेल्या परिस्थितीत व सोबत असलेल्या संगतीबरोबर स्थानिक अनुभव जसा करता येईल तसतशी संथ कालक्रमणा अशी एकंदर 'लेड बॅक इझीगोइंग ट्रिप'... ब्राझीलच्या अॅमेझॉनइतक्याच सुंदर व समृद्ध इतर काही जागांविषयी पुन्हा कधी... तोपर्यंत 'आते लॉगो… चाओ!'

अरे हो... जाता जाता पेरुव्हियन अॅमेझॉनलाही जरूर भेट द्या.

साहस मित्र मंडळ...

अन्य भटकंती : दक्षिण अमेरिका - पेरू, दक्षिण अमेरिका - अमेझॉन ब्राझील, मध्य अमेरिका - ग्वाटेमाला होंडुरास एल साल्वाडोर बेलीझ, ईशान्य भारत - मणिपूर, ईशान्य भारत -त्रिपुरा, ईशान्य भारत : आसाम, आग्नेय आशिया - ब्रह्मदेश थाईलँड लाओस कंबोडिया मध्य व पश्चिम आशिया - उझबेकिस्तान ताजिकिस्तान अफगाणिस्तान अझरबैजान तुर्कस्तान , पूर्व आफ्रिका - इथियोपिया

प्रतिक्रिया

एस's picture

31 Jul 2017 - 12:46 pm | एस

काय बोलावं? नि:शब्द!

अत्रन्गि पाउस's picture

31 Jul 2017 - 1:06 pm | अत्रन्गि पाउस

म्हणतो

पिशी अबोली's picture

31 Jul 2017 - 1:06 pm | पिशी अबोली

किती समृद्ध जीवन आहे हो तुमचं!!! नुसत्या एका ट्रिपचा वृत्तांत वाचूनही असं वाटलं.. सुंदर!

अनिंद्य's picture

31 Jul 2017 - 1:44 pm | अनिंद्य

@ समर्पक

ती स्तब्ध प्रतिबिंबे... दोनच रंग - निळा आणि हिरवा. ऑस्सम !

तुमचा हेवा वाटला. हा भाग प्रत्यक्ष कधी पाहता येईल असे मनात आले.

नि३सोलपुरकर's picture

31 Jul 2017 - 1:45 pm | नि३सोलपुरकर

साक्षात दंडवत साहेब.

नि:शब्द!

Nitin Palkar's picture

1 Aug 2017 - 9:35 pm | Nitin Palkar

साक्षात दंडवत साहेब.

नि:शब्द!
हेच म्हणतो!!!

जबरदस्त लेख आणि आफाट फोटो. दंडवत स्विकारा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Jul 2017 - 2:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

सहल, वर्णनशैली आणि प्रकाशचित्रे सगळेच अप्रतिम ! व्हिडिओ क्लिप्सनी तर काहीक्षण तिथेच असल्याचा भास निर्माण केला. भन्नाट !!!

अजस्त्र अमेझॉन फार काळ मनात घर करून राहिली आहे, केव्हा जायला मिळेल ते माहित नाही... पण जाणार हे नक्की !

मळलेली पायवाट सोडून इतरत्र जाणारी आणि तुमच्या खास शैलीत वर्णन केलेली भटकंती फार आवडीची झाली आहे. इतर भटकंतीचे अनुभव वाचायला आवडतील.

अमोल काम्बले's picture

31 Jul 2017 - 3:25 pm | अमोल काम्बले

अप्रितम छायाचित्र व सुन्दर वृत्तांत. धन्यवाद अशी सफर घडवुन आनल्या बद्दल. ह्या जन्मात तर प्रत्यक्ष अॅमेझॉन सफर शक्य नाहि बघु पुढच्या जन्मी........

अप्पा जोगळेकर's picture

31 Jul 2017 - 3:37 pm | अप्पा जोगळेकर

सुपर.

नीलकांत's picture

31 Jul 2017 - 3:51 pm | नीलकांत

खुप छान प्रवासवर्णन... फोटो तर अगदी सुंदर आलेत. खुप छान.

कंजूस's picture

31 Jul 2017 - 4:46 pm | कंजूस

खरंच छान आणि धन्यवाद!

स्मिता.'s picture

31 Jul 2017 - 4:55 pm | स्मिता.

तुमच्या या साहस-सहलींचे वर्णन वाचून निव्वळ हेवा वाटतो. बरं आमच्यासारख्या कम्फर्ट-झोनमधून बाहेर न पडणार्‍या (किंवा बाहेर पडायला घाबरणार्‍या) लोकांना हे धाडस करवणारही नाही. पण इच्छा मात्र प्रचंड आहे. एकदा तरी नीरव शांतता अनुभवायची आहे, कृत्रिम प्रकाशाचा किरणही नसलेल्या रात्रीचं आकाश बघायचंय. कधी शक्य होईल देवच जाणे...

मनिमौ's picture

31 Jul 2017 - 5:24 pm | मनिमौ

डोळे निवले फोटो बघून. अशाच छान सफरी करा आणी आम्हाला पण सांगा

चिगो's picture

31 Jul 2017 - 5:45 pm | चिगो

अत्यंत सुंदर लेख व प्रवासवर्णन.. फोटो तर अफाटच. वाचतांनाही एक गुढरम्य 'फिल' येत होता. कधीतरी नक्की करणार ही सफर.

अलीकडच्या किनाऱ्यावर श्यामलेचे पाणी ओंजळीत घेतले, स्वतःच्या क्षौद्रत्वाचे प्रतिबिंब पाहिले. पलीकडच्या किनाऱ्यावर पिंगलेचे पाणी ओंजळीत घेतले, स्वतःच्या मलिनतेचे प्रतीक पाहिले.

क्या बात..

पिलीयन रायडर's picture

31 Jul 2017 - 7:12 pm | पिलीयन रायडर

अगदी!!

फोटो फार सुंदर आलेत.

किसन शिंदे's picture

31 Jul 2017 - 5:45 pm | किसन शिंदे

जबरदस्त. अगदी बर्‍याच दिवसांनी मिपावर संपूर्ण भटकंती वृत्तांत वाचला.

वर्णन व चित्रे भारी आहेत.

सूड's picture

31 Jul 2017 - 6:27 pm | सूड

डोळे निवले.

जबरदस्त! निव्वळ जबरदस्त! डोळे तृप्त झाले एकदम.

अभिजीत अवलिया's picture

31 Jul 2017 - 6:52 pm | अभिजीत अवलिया

सुंदर

राघवेंद्र's picture

31 Jul 2017 - 7:59 pm | राघवेंद्र

समर्पक भाऊ एकदम क्लासच ट्रिप !!!

ज्यायला आम्ही जिथे भारतीय रेस्टॉरंट आहे तिथेच ज्यायचे असा अलिखित नियम पाळतो.

तुमची ट्रिप तर अशक्य गोष्ट माझ्यासाठी.

फोटो साठी खूप धन्यवाद !!!

आमच्या सारख्या लोकांना घेऊन पण एखादी सहल करूया. काही प्लॅन असेल तर नक्की कळवा.

किल्लेदार's picture

31 Jul 2017 - 8:54 pm | किल्लेदार

मस्तच !!!!!

दशानन's picture

31 Jul 2017 - 9:03 pm | दशानन

नशीबवान आहात हो :)

माम्लेदारचा पन्खा's picture

31 Jul 2017 - 9:21 pm | माम्लेदारचा पन्खा

काय म्हणाव तुम्हाला ??

___/\___ !!

जेम्स वांड's picture

31 Jul 2017 - 9:51 pm | जेम्स वांड

अलीकडच्या किनाऱ्यावर श्यामलेचे पाणी ओंजळीत घेतले, स्वतःच्या क्षौद्रत्वाचे प्रतिबिंब पाहिले. पलीकडच्या किनाऱ्यावर पिंगलेचे पाणी ओंजळीत घेतले, स्वतःच्या मलिनतेचे प्रतीक पाहिले. निसर्गाच्या सान्निध्यात विचार थंडावले.

तुमच्यात एक खूप मोठ्ठा लेखक दडलेला आहे, त्याला खूप मोठ्ठा करा अजून, आई सरस्वती तुम्हाला उदंड लेखनाचे विषय देओ, निव्वळ अप्रतिम आहे हे सगळे, फोटो वर्णन अन भावना सगळंच अप्रतिम..

समर्पक's picture

1 Aug 2017 - 10:03 pm | समर्पक

आशीर्वाद व आज्ञा शिरसावंद्य! प्रयत्न करत राहीन!

पैसा's picture

31 Jul 2017 - 9:57 pm | पैसा

क्लासिक!

पद्मावति's picture

31 Jul 2017 - 10:19 pm | पद्मावति

अप्रतिम...अप्रतिम!!

अंतु बर्वा's picture

31 Jul 2017 - 10:21 pm | अंतु बर्वा

वाह, निव्वळ अप्रतिम. अशा सुंदर लेखनामुळेच मिपावर असल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं... एका विडीओत तर आत्ता एखादा अ‍ॅनाकोंडा पाण्यातुन बाहेर येतो की काय, असं वाटलं! तुमच्या पुढच्या अ‍ॅड्वेंचरसाठी शुभेच्छा!!

जव्हेरगंज's picture

31 Jul 2017 - 10:21 pm | जव्हेरगंज

व्वाह!!

सौन्दर्य's picture

1 Aug 2017 - 7:31 am | सौन्दर्य

सुंदर वर्णन, त्याहून सुंदर फोटोग्राफ्स आणि विडीयो. सर्वात दाद तुमच्या हिमतीला. असेच लिहित रहा.

प्रचेतस's picture

1 Aug 2017 - 9:04 am | प्रचेतस

अफाट सुंदर

केवळ अप्रतिम.. खरोखर हेवा वाटला तुमच्या भाग्याचा.. मस्त!!

अलीकडच्या किनाऱ्यावर श्यामलेचे पाणी ओंजळीत घेतले, स्वतःच्या क्षौद्रत्वाचे प्रतिबिंब पाहिले. पलीकडच्या किनाऱ्यावर पिंगलेचे पाणी ओंजळीत घेतले, स्वतःच्या मलिनतेचे प्रतीक पाहिले. निसर्गाच्या सान्निध्यात विचार थंडावले. चित्त शांत प्रशांत झाले. ओंजळीतल्या पाण्याचा अर्घ्य दिला... पुढले काही दिवस या अमितमगंगेच्या अंगणात खेळायचे...

हा परिच्छेद या लेखाचा कळसध्यायच.. प्रकाशचित्रे तर अफाट सुंदर आहेत.

सुमीत भातखंडे's picture

1 Aug 2017 - 9:55 am | सुमीत भातखंडे

नि:शब्द!

लोनली प्लॅनेट's picture

1 Aug 2017 - 12:15 pm | लोनली प्लॅनेट

अतिशय सुंदर फोटो आणि हेवा वाटायला लावणारा अनुभव..
लहानपणी डिस्कव्हरी चॅनेल वर Untamed Amazonia हा माहितीपट पाहायचो तेंव्हापासून अमेझॉन चे प्रचंड आकर्षण आहे
तुम्हाला ते अमेझॉन चे प्रसिद्ध पक्षी लाल हिरव्या रंगाचा Scarlet Macaw आणि लांब पिवळ्या चोचीचाToco Tucon दिसले नाहीत काय ?

आधी ते सर्व चित्रित व प्रकाशित केल्यामुळे पुनरावृत्ती टाळली आहे http://www.misalpav.com/node/28684

मकॉव् - निळे

मकॉव् - लाल

टुकान

सस्नेह's picture

1 Aug 2017 - 12:58 pm | सस्नेह

भन्नाट आहे अमेझॉन !
...फोटो आणि वर्णन वाचून इनो घेतला गेला आहे !

मलाही दे थोडासा इनो!काय फोटो आहेत! अप्रतिम वर्णन.

अत्यंत थरारक, रोचक, सुंदर, ऑफबीट प्रदेश आणि सफर..

साहसी आहात.

आणखी एक.. "अमेझॉन" हे अॅक्चुअली मुळात एका नदीचं नाव आहे हेच हल्ली विसरुन गेलो होतो...

प्रसाद_१९८२'s picture

1 Aug 2017 - 1:30 pm | प्रसाद_१९८२

आणखी एक.. "अमेझॉन" हे अॅक्चुअली मुळात एका नदीचं नाव आहे हेच हल्ली विसरुन गेलो होतो...

--
अगदि.
लेखाचे नाव वाचून मलाही हा लेख 'अ‍ॅमेझॉन' या ऑनलाईन शॉपींग साईट बद्दल आहे असे वाटले होते.

balasaheb's picture

1 Aug 2017 - 3:09 pm | balasaheb

खुप छान

अजया's picture

1 Aug 2017 - 3:14 pm | अजया

अप्रतिम. _/\_

टवाळ कार्टा's picture

1 Aug 2017 - 3:47 pm | टवाळ कार्टा

अफाट जळजळाट झालेला आहे....

पीशिम्पी's picture

1 Aug 2017 - 4:07 pm | पीशिम्पी

प्रचि बघताना कुठून तरी एखादा अ‍ॅनाकोंडा येतोय काय असे वाटत होते. एक प्र.चि. तर अ‍ॅनाकोंडा मुव्ही मधून घेतल्यासारखे दिसतेय

वरुण मोहिते's picture

1 Aug 2017 - 4:12 pm | वरुण मोहिते

आवडले आहे वर्णन . पुढे कधी जमलं तर जाणारे .

संजय पाटिल's picture

1 Aug 2017 - 4:20 pm | संजय पाटिल

जबरदस्त हो...
एकिकडे तुमचा हेवा वाटतोय तर दुसरीकडे तुमची प्रवास वर्णनं वाचून तुमचा फॅन झालोय!

यशोधरा's picture

1 Aug 2017 - 6:41 pm | यशोधरा

ज ब र द स्त! अफाट हेवा वाटलेला आहे!

नीलमोहर's picture

1 Aug 2017 - 8:35 pm | नीलमोहर

अफाट अनुभव, लेखन, माहिती सर्वच, धन्य आहात खरंच !!
आधी वाटलं अ‍ॅमॅझोन कंपनीबद्दल लेख आहे, पण हे फारच उच्च आहे.
कुणी प्रत्यक्ष अ‍ॅमॅझोन जंगलांत जाऊन त्याबद्दल लिहीलेले प्रथमच वाचले.. धन्यवाद !

मयुरा गुप्ते's picture

1 Aug 2017 - 8:36 pm | मयुरा गुप्ते

वेगळ्याच अनवट वाटेवरचा प्रवास, अत्यंत सुंदर फोटोज, आणि नेमकं वर्णन.
मजा आली वाचताना.
अमॅझोन बद्दलची माहिती,त्याच्याबाबतीत असलेलं एक गुढ वलय नेहमीच भुरळ घालतं पण एक अनामिक भितीही दाटुन येते.
--मयुरा

उदय's picture

1 Aug 2017 - 9:43 pm | उदय

सुंदर प्रवासवर्णन आणि अप्रतिम फोटोज. मलापण एकदा पॅटॅगोनिया ट्रीप करायची आहे, बघुया कधी जमते ते. तूर्तास इंका ट्रेल करणार आहे नोव्हेंबरमध्ये.

समर्पक's picture

1 Aug 2017 - 10:29 pm | समर्पक

सर्वांचे वाचन-प्रतिसाद-कौतुक-प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

सत्याचे प्रयोग's picture

2 Aug 2017 - 10:39 am | सत्याचे प्रयोग

साष्टांग दंडवत !!!!!!!!!!!!

मित्रहो's picture

2 Aug 2017 - 1:38 pm | मित्रहो

धाडस केले. सुंदर प्रवास वर्णन आणि सुंदर फोटो

रावणराज's picture

2 Aug 2017 - 3:11 pm | रावणराज

सुंदर फोटोज, आणि नेमकं वर्णन..

स्वराजित's picture

2 Aug 2017 - 6:08 pm | स्वराजित

अप्रतिम, धन्यवाद ...
असेच छान लिहित राहा..

धर्मराजमुटके's picture

2 Aug 2017 - 6:39 pm | धर्मराजमुटके

साहस, शब्दवर्णन, छायाचित्रण सगळ्याच बाबतीत हा लेख नं. १ आहे.

खरंच, डोळ्याचं पारणं फिटलं ......अफाट फोटो ......जबरदस्त आणि वरदहस्त लेखणी ......क्लास..... धाडसी आहात. ऑफबीट म्हणजे किती ऑफबीट...... थेट अमेझॉन ! पण तुमच्यामुळे आम्हालाही त्याचा आस्वाद घेता आला. तुमच्यातल्या मनस्वी भटक्याला सलाम ...

अतिशय जबरदस्त सहल! लिखाण जबरदस्त आहे. आणि प्रकाशचित्रे आणि व्हीडिओ मोहक! धाडस म्हणजे काय ते अशा सहलीं वरून लक्षात येते. नाहीतर आमच्या सहली...जेवण भारतीयच पाहिजे, नाश्ता हवाच, नाश्त्यात पोहे हवेतच, एसी कोच पाहिजे, सकाळी लवकर उठायला नको, रात्री शांत झोप पाहिजे, ती ही किंग साईझ बेडवर...

आपल्या या धाडसी सहलीला आणि सुरेख लिखाणाला त्रिवार सलाम!!!

गवि's picture

5 Aug 2017 - 12:03 pm | गवि

एसी कोच पाहिजे, सकाळी लवकर उठायला नको, रात्री शांत झोप पाहिजे, ती ही किंग साईझ बेडवर...

समीरसूरजी.. इसकी भी एक अलग नजाकत होती है.. अॅडव्हेचर, बॅकपॅकिंग हा टाईप एक वेगळा म्हणून चांगला असेलच. पण म्हणून लक्झरी टुरिझमला तुलनेत कमअस्सल ठरवू नये असं मत.

एकेकट्याने, एक थैली घेऊन, खडतर मार्गाने, लिफ्ट मागून, ट्रॅक्टरवर, रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणा ला फक्त 'पाठ टेकण्याची सोय' इतपतच समजून चालणं, खर्च वाचवण्यासाठी कॉमन अकोमोडेशन, कॉमन टॉयलेट चालवून घेणं, रोज स्वतःच मिनी स्टोव्हवर मॅगीबीगी बनवून खाणं (खाऊन विषय संपवणं!?).. यातल्या अनेक गोष्टी एका वेगळ्या ट्रॅव्हल मोडमधे घडतात. काहींना त्यात जास्त थ्रिल मिळतं. अनोळखी लोकांची कंपनीही कधीकधी आपली होऊन जाते प्रवासापुरती.

उलट अनेकांना आपल्या जवळच्यांसोबत एकत्र फिरणं यातच मुख्य आनंद असतो. अनुभव आपण तत्क्षणी एकत्र शेअर करावा, नंतर एकत्र आठवणी काढाव्यात, एरवी न मिळणारा ऐषोआराम, सेवा, सुखसोयी प्रवासात उपभोगाव्यात वगैरे असं वाटणारे लोक हाही एक इक्वली महत्वाचा वर्ग आहेच.

(बादवे परदेशातही भारतीय, शाकाहारी इ.इ.च पाहिजे हे मला अजिबातच पटत नाही.. पण ते एक सोडा.. )

-(दोन्ही प्रकार पुरेसे केलेला) गवि

गविजी,

आपले म्हणणे पटले. मला स्वतःला अशा व्यवस्थित सुखासीनच सहली आवडतात. मी क्वचित अशा धाडसी सहली केलेल्या आहेत. पण त्या अगदी जवळपासच्या - मढे घाट, दूधसागर धबधबा, दांडेली, महाबळेश्वर, वगैरे. पण मला स्थलदर्शनावर जास्त भर असलेल्या आरामदायी सहलीच जास्त आवडतात. मी रीतसर केसरीसोबत थायलंड, सिंगापूर, मलेशिया वगैरे फिरून आलो आणि त्या प्रकारच्या सहलींच्या प्रेमात पडलो. एका मोठ्या गटासोबत जाणे, प्रसिद्ध ठिकाणे बघणे, रात्री आरामात झोप काढणे हे मला आवडते. कुठल्यातरी परक्या मुलखात जाऊन टॅक्सी, बस, हॉटेले शोधत बसण्यात वेळ आणि ऊर्जा घालवणे मला तितकेसे पटत नाही. म्हणून अमेरिकेत असतांनादेखील मी अशाच एका कंपनीसोबत फिरलो होतो. सगळे कसे विनासायास होते. शिवाय थायलंडच्या सहलीत आमच्या गटात मी गाणारा म्हणून थोडासा पॉप्युलरदेखील झालो होतो. ते स्टार-लाईक फीलिंग अमेझिंग असते (माझी कुठलीही लायकी नसतांना!). अर्थात, धाडसी पद्धतीने सहली करणार्‍या तमाम उत्साही लोकांविषयी माझ्या मनात कायमच अतीव आदर असतो. ते थ्रिलच वेगळे!

पण माझा प्रकार म्हणाल तर "नाश्त्यात पोहे असते तर मजा आली असती..." हाच! :-) अर्थात, खाण्या-पिण्याच्या बाबतीत मी "काहीही, कसेही, कुठेही, आणि कितीही कमी" असाच आहे.

केसरी, वीणावर्ल्ड वगैरेच्या मेंढपाळ सहलींवर खूप लिहिण्याची इच्छा उसळी मारते आहे.

समीरसूर's picture

16 Aug 2017 - 1:26 pm | समीरसूर

गविजी - लिहा प्लीज. वाचायला खूप मजा येईल.

माझा दोन सहलींचा अनुभव मात्र चांगला होता. डोक्याला अजिबात ताप नाही. वेळच्या वेळी जेवण, नाश्ता, झोप आणि भरपूर स्थलदर्शन! थोडं महाग पडतं पण माझ्या माहितीनुसार स्वतः आखलेली सहलदेखील जवळपास तितक्याच किमतीमध्ये होते. अगदी दहा-पाच हजार इकडे-तिकडे होत असतील फार तर पण एकूण सोय आणि निवांतपणा बघता मेंढपाळ सहली कुटुंबांसाठी योग्य ठरतात.

(बादवे परदेशातही भारतीय, शाकाहारी इ.इ.च पाहिजे हे मला अजिबातच पटत नाही.. पण ते एक सोडा.. )
हॅहॅहॅ
अडचण अशी आहे कि मी शाकाहारी आहे तरीही देशोदेशीचे/नवं-नवीन खाद्य पदार्थ चाखायची खाज भरपूर आहे. तर माझ्या पुरता मी उपाय शोधला. आपण बिनघोर पणे एखाद्या स्ट्रीटफूड जॉईंट/ ठेला वर जायचं. तिथे "नो Meat " वैगरे शब्द वापरून, हातवारे करून आपल्याला हवा तसा पदार्थ बनवायला सांगायचं. बनवणारा माणूस "कोण कोण येडी येतात आजकाल" अशा विचारात असतो. त्याला थोडं बाबा-पूता करायचं. या वेळेत आपला आयुष्याचा जोडीदार आपल्याकडे 'खाऊ कि गिळू' अशा नजरेने पाहत असतो. त्याला ओळख द्यायची नाही. थोडीफार शाब्दिक कसरत करून जे काही समोर येईल ते विजयी मुद्रेने स्वाहा करायचं.
(मी या पद्धतीने काही पदार्थ थायलंड मध्ये खाल्ले आहेत. :) बाकी देशाटनाचा अनुभव नाही.)

नया है वह's picture

3 Aug 2017 - 4:53 pm | नया है वह

सुंदर प्रवास वर्णन आणि सुंदर फोटो!!!

रायनची आई's picture

3 Aug 2017 - 5:14 pm | रायनची आई

Tarantula हातात पकडला तरी कसा? तो विषारी असतो ना बहूतेक..
आणि पिरन्हा मासे कसे पकडले??? चावे नाही का घेतले त्यानी कचाकच : )

समर्पक's picture

4 Aug 2017 - 1:45 am | समर्पक

टॅरेंटूला : हे कोळी जाळे ना बनवता बिळे बनवून राहतात. मुख्यत्वे दिवसभर बिळात लपून राहतात व रात्री शिकार करतात. त्यामुळे संध्याकाळ हि त्यांना पाहण्याची योग्य वेळ. एक लांब लवचिक काडी घेऊन त्याला पुढच्या टोकाला लाळ किंवा पाण्याने ओले केले जाते. नंतर थोडे थरथरवत कोळ्याच्या बिळात ती काडी सरकावायची व पटकन काढून घ्यायची, असे २-४ वेळा केल्यावर टॅरेंटूलाला वाटते कि कोणी किडा आलेला आहे आणि शिकारीसाठी तो बाहेर येतो. कोळ्याचे विष हे सापाप्रमाणे दातात असते व दोन काळे मोठाले डंख हे त्याचे शक्तीस्थान. त्यापासून सावध राहून पाठीकडून कोळी पकडला तर काही धोका नाही. एकंदरच केसाळ किळसवाणा कीटक पण जाम घाबरगुंडी उडते हाताळताना...
पिरान्हा : नेहमीसारखीच मासेमारी पद्धत वापरली जाते. आमिष दाखवून मासे गळाला लागतात. संख्येत त्यांची खरी शक्ती आहे. एक मासा चावणे फारसे त्रासदायक नाही, पण तसे हजारात असतील तर काही वेळात हाडे शिल्लक ठेवतील. पिरान्हामुळे आजही लोकांचे मृत्यू होतात.

श्रीगुरुजी's picture

3 Aug 2017 - 6:44 pm | श्रीगुरुजी

अप्रतिम! प्रकाशचित्रे पाहून डोळ्याचं पारणं फिटलं!!

सानझरी's picture

3 Aug 2017 - 6:44 pm | सानझरी

__/\__

डोळ्याचं पारणं फिटलं. जबरदस्त लिहिलंय.. दंडवत घ्या!!
(इनो घेतलाय हं)

सपे-पुणे-३०'s picture

3 Aug 2017 - 9:21 pm | सपे-पुणे-३०

अगदी ऑफबीट प्रदेश निवडलात आणि आम्हालाही सफर घडवून आणलीत. फोटो, वर्णन केवळ अप्रतिम!

थॉर माणूस's picture

4 Aug 2017 - 2:22 am | थॉर माणूस

अप्रतिम... शब्दातीत असं सौंदर्य पहाण्यासाठी अशा ठिकाणी जाण्याचं धाडस करणं, इतके सुंदर फोटो घेणं आणि सुंदर शब्दांकनसुद्धा. उद्या अ‍ॅनिमल प्लॅनेट मराठी वगैरे सुरू झालं तर सुरूवात तुमच्यापासूनच करावी त्यांनी.

आयुश्यात क्वचितच जगता येण्यासारखा अनुभव वाटला..

जबरदस्त! अगदीच भन्नाट आहे ही सहल. फोटोज आणि लेखनही खूप सुंदर!

दिलिप भोसले's picture

5 Aug 2017 - 11:41 am | दिलिप भोसले

ग्रेट ! ग्रेट !

महेन्द्र ढवाण's picture

6 Aug 2017 - 1:57 pm | महेन्द्र ढवाण

खुप छान प्रवासवर्णन... फोटो तर अगदी सुंदर आलेत. खुप छान.

चौकटराजा's picture

9 Aug 2017 - 5:18 pm | चौकटराजा

सर्व फोटो विषय व गुणवत्तेत मस्त आलेयत. खास करून खंडेराव व तारेवरची लाईन फार भारी. दक्षिण अमेरिका हे एक वेगळे व रोमांचकारी प्रकरण आहे असे वर्णानावरून वाटतेय ! पुराच्या पाण्यात वेढलेली झाडे पाहून " डार्क वॉटर " या सिनेमाची आठवण मात्र आली. विडिओ सावकाश पहातो. आपल्यासाठी जर बघितले नसेल तर " टर्की" या सहलीची शिफारस करतो.

अप्रतिम.. टीव्ही वर बघून कधी आपण करू असं वाटलं नव्हतं पण तुमचा हा लेख वाचून आपल्याकडून कधीतरी नक्कीच होईल असं वाटतंय आता..धन्यवाद..

नया है वह's picture

11 Aug 2017 - 2:42 pm | नया है वह

खुप छान प्रवासवर्णन

पाटीलभाऊ's picture

14 Aug 2017 - 5:44 pm | पाटीलभाऊ

नितांत सुंदर प्रवासवर्णन आणि फोटो.

कवितानागेश's picture

14 Aug 2017 - 10:13 pm | कवितानागेश

पहिला फोटो पाहूनच गार गार वाटलं..
वाचनखूण साठवतेय.
आणि फोटो चोरतेय! ;)

नुसत्या वर्णनानेच चित्र डोळ्यासमोर उभे राहिले होते.
छायाचित्रे टाकून तर चार चाँद लागले.

लई भारी's picture

17 Aug 2017 - 11:32 am | लई भारी

आपल्या इच्छाशक्तीला सलाम.
लेखन आणि प्रचि निव्वळ अप्रतिम!
ह्या जन्मात तरी आम्हाला शक्य दिसत नाही.

गम्मत-जम्मत's picture

23 Aug 2017 - 11:50 am | गम्मत-जम्मत

किती अप्रतिम लिहिलं आहे... ३ ४ ओळी हि सलग मराठी न वाचणाऱ्या माझ्या नवऱ्याला हि मी संपूर्ण लेख वाचायला लावला.
खूप मस्त. दुसरा Video पाहून वाटलं कि शांततेचा हि आपला 'आवाज' असतो. तो अनुभवता येणारे तुम्ही भाग्यवान!!
अर्थात माझ्यासारख्याना डिस्कवरी च्या documentories पाहून च समाधान मानव लागत. असं काही अनुभवणे या जन्मात तरी शक्य वाटत नाही :D

मंजूताई's picture

23 Aug 2017 - 4:53 pm | मंजूताई

अप्रतिम!