आमचे बालपण

ऋतु हिरवा's picture
ऋतु हिरवा in जनातलं, मनातलं
19 Jul 2017 - 4:37 pm

मुलांच्या परीक्षा होत आल्या आहेत. पालक आपापल्या मुलांना वेगवेगळ्या शिबिरात पाठवण्याच्या खटपटीत आहेत. जर बाहेर पडलं तर ठिकठिकाणी वेगवेगळ्या शिबिरांच्या जाहिराती लागलेल्या दिसत आहेत. दिवसभर मुले घरात.. त्यामुळे आया...'आता बघायला नको..दोन महिने नुसता धुडगूस...'असे बोलत आहेत. शेजारीही मुलांच्या आवाजामुळे त्रस्त आहेत.
अशावेळी मला माझे बालपण आठवते. आमच्या लहानपणी मे महिन्यात आमचा एकच कार्यक्रम असायचा..तो म्हणजे दापोली तालुक्यातील कोळथरे या आमच्या गावी जाणे. माझे काका व त्यांचे कुटुंबीय तेथे राहत असत.
समुद्रकिनारी वसलेलं आमचं छोटंसं गाव. रस्त्याच्या दुतर्फा घरे..एका बाजूला समुद्र आणि दुसर्या बाजूला डोंगर. आमचे घर समुद्राच्या बाजूला. घराच्या मागे नारळ-सुपारीची वाडी आणि लगेच मागे समुद्र. घरात समुद्रा ची गाज सतत ऐकू येते.
दर वर्षी मे महिन्यात गावी जायचे. आमच्या सारखीच शेजारीपाजारी सुद्धा पाहुणे मंडळी आलेली असायची. एरवी शांत असणारे गाव त्यामुळे गजबजून गेलेले असायचे. आम्ही सगळी मुले विविध खेळ खेळायचो. डबा ऐसपैस, जोडसाखळी, लपंडाव असे धावपळीचे खेळ, त्याशिवाय आम्ही मुली दोरीच्या उद्या खेळायचो. हजार-हजार दोरीच्या उड्या आम्ही मारायचो.
देवपूजेसाठी फुले गोळा करायची, अंगण झाडायचे, घरातील केर काढायचे अशी कामे असायची. पाण्याचा पंप होता तरी घरापर्यंत पाणी येत नसे. त्यामुळे विहिरीवरून हंडा-कळशीने पाणी भरायचे.
मग सकाळच्या नाश्त्यासाठी मऊ-भात असायचा. चुलीवर तांब्याच्या भांड्यामध्ये शिजवलेला, घरच्या शेतातले लाल तांदूळ..असा गरम गरम गुरगुट्या भात केळीच्या पानावर वाढला कि केळीच्या पानाचा छान वास सुटायचा. जोडीला घरच्या म्हशीच्या दुधाचे घट्ट विरजलेले दही आणि फोडणीची मिरची. त्या भाताची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे. जेवण झालं की केळीचं पान म्हशीच्या पुढ्यात नेउन टाकायचं. त्यावेळी जेवण झालं की जमिनीला शेण लावायचे काम माझ्यावर सोपवलेलं असायचं. ते मला अजिबात आवडायचं नाही कारण त्या शेणाचा हाताला लागलेला वास जाता जात नसे. मग मी साबण लावून लावून हात धूत असे व सगळे माझी चेष्टा करत.

काकांची घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. पण सर्व पाव्हण्या रावण्यांचे ते आनंदाने सर्व करत असत. कोकण बघायला दूरचे नातेवाईक यायचे. घरात १७-१८ माणसे असायची. स्वयंपाक चुलीवर. मुंबईकर पाहुणे तर चुलीवर होणार्या साध्या सुध्या स्वयंपाकावर खुश असायचे. घरात शेणाने सारवलेली जमीन असायची. पिवळे बल्ब , पंखे तर नाहीच. त्यामुळे झोपाळ्यावर बसण्यासाठी चढाओढ लागायची. बायका स्वयंपाक करून आल्या की आम्हा मुलांना झोपाळ्यावरून हाकलून लावायच्या. तसेच दुपारी जेवणे झाली की त्यांना झोपायचे असायचे. पण आम्हाला झोप कुठली? मग पुन्हा आमची हकालपट्टी!

मग आम्ही वाडीत जायचो. नारळाचे पडलेले झाप गोळा करायचे आणि नारळाच्याच झाडाखाली पसरायचे. मग सगळे त्यावर बसायचो आणि गप्पागोष्टी सुरु व्हायच्या. जोडीला समुद्राची गाज! पाण्याच्या आवाजावरून भारती आहे की ओहोटी ते कळायचे. कधी त्या झापांवरच आडवे व्हायचे आणि पानाच्या गर्दीतून तुकड्यातून दिसणारे आभाळ न्याहाळत राहायचे.
त्यावेळी आमच्याकडे गुरे होती. पण पावसाळ्याची तयारी म्हणून वाड्याची डागडुजी करायची असायची. त्यामुळे गुरांना बाहेर बांधलेले असायचे. वाड्याची जमीन करून तो शेणाने स्वच्छ सारवलेला असायचा. मग दुपारी आम्हा मुलांचे वाड्यात बसून झब्बू, तीनशे चार, गुलामचोर, बदामसात, मेंढीकोट असे पत्त्यांचे डाव रंगायचे.
कधी काका फरमान काढायचे.. चला झाप विणायचे आहेत. झापांचे हिर काढायचे आहेत. मग केरसुण्या बनवण्यासाठी हिर काढायचे. काका इतकी घट्ट केरसुणी बांधत असत की केरसुणी झिजली तरी बांधणी सुटायची नाही. त्यावेळी अशी कौशल्ये सुद्धा आत्मसात झाली. कधी नारळ पाडण्याचा कार्यक्रम असायचा. मग चढाओढीने जास्तीजास्त नारळ टोपलीत भरून डोक्यावरून घरापर्यंत आणायचे. वाडीचे शिपणे काढायचे. यामुळे कष्टाच्या कामाची सुद्धा सवय होत गेली.
आमचे शेत डोंगरावर. अर्धा तास डोंगर चढून जायचे ..मग करवंद, जांभळे, अळू यांचा समाचार घ्यायचा.
या शिवाय जोडीला आंबे - फणस सुद्धा असायचे. फणसाची सांदणे, काप्या फणसाची नारळाच्या दुधातील खीर यांवर आम्ही तुटून पडायचो.

संध्याकाळचा कार्यक्रम म्हणजे समुद्रावर जाणे. तिथे आम्ही मनसोक्त हुंदडायचो. एकदा मी मोठ्या मुलींबरोबर समुद्राच्या पाण्यात गेले. त्यांच्या गुडघ्या एवढे पाणी माझ्या कमरेपर्यंत आले. मोठी लाट आली आणि मी पाण्यात पडले. मग त्या मुली मलाच ओरडू लागल्या, कशाला आलीस आमच्याबरोबर म्हणून! मग समुद्राच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत म्हणजे एका बाजूला खाडी तर एका बाजूला खडकाळ भाग आणि स्मशान, अशी मोठ्ठी रपेट मारली आणि कपडे वाळून गेले. शिवाय घरी सांगू नकोस हं, असा दमही मिळाला.

वाळूचे किल्ले करायचे, पाण्यात जायचे आणि सुर्य समुद्रात बुडाला कि घरी यायचे. स्वच्छ हात पाय धुवून झोपाळ्यावर बसून आधी परवचा म्हणायचा. रामरक्षा, मारुती स्तोत्र, गणपती स्तोत्र म्हणायचे. शेजारपाजारची मुलं एकत्र बसून परवचा म्हणताना आपोआपच नवनवीन श्लोक पाठ केले जायचे. पाढे पाठ होऊन जायचे. मला आठवतंय आम्ही पावकी-निमकी सुद्धा पाठ केली होती.
तोपर्यंत पोटात कावळे ओरडू लागलेले असायचे. रात्रीचे जेवण म्हणजे चुलीवर शिजवलेला घरच्या तान्दुलांचा भात आणि कधी कुळथाचे पिठले किंवा एखाद्या कडधान्याची उसळ असेच असायचे. पण ते अमृताहूनही गोड लागायचे. त्याकाळी भौतिक सुखे फारशी नव्हती, पण भरपूर माणसांना सामावून घेईल एवढे घर होते आणि माणसांची मने मोठी होती.

काळ पुढे जात राहतो. परिस्थिती बदलते, त्याबरोबर माणसेही बदलतात. पण आठवणी मात्र कायम राहतात. ‘बालपणीचा काळ सुखाचा’ असे म्हटलेच आहे.
आता लठ्ठ झालेली टीवी समोर बसलेली, मोबाईलवर गेम खेळणारी मुले पहिले कि वाटते, त्यांना सुद्धा टीवी, कॉम्प्युटर पासून लांब अशा एखाद्या खेड्यात पाठवावे आणि मनसोक्त हुंदडू द्यावे.

वावर

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

19 Jul 2017 - 5:19 pm | पद्मावति

खुप सुरेख लिहिलेय.

व्वाह.. भारी लिहिले आहे.

काप्या फणसाची नारळाच्या दुधातील खीर - याची पाकृ टाका.

ऋतु हिरवा's picture

19 Jul 2017 - 9:46 pm | ऋतु हिरवा

पाकृ दिली आहे

रेवती's picture

19 Jul 2017 - 7:06 pm | रेवती

आठवणी आवडल्या. आपल्या सगळ्यांचे बालपण व सुट्ट्या या दिनक्रमाच्या आसपास रेंगाळायच्या. फारसे वेगळे नव्हते तरी प्रत्येकाला ते स्पेशल वाटते ही गंमत आहे.
तुमचा फोटूही छान आलाय. सध्या आमच्याकडे उन्हाळी सुट्ट्या आहेत. मलाही रोज वाटते की या मुलांना फोन टीव्हीपासून लांब पाठवावे.
फणसाची खीर हा प्रकार पहिल्यांदा ऐकलाय. कृपया पाकृ देणे.

ऋतु हिरवा's picture

19 Jul 2017 - 9:13 pm | ऋतु हिरवा

फोटो माझ्या मुलीचा आहे. मी फोटोखाली लिहायला विसरले.

कंजूस's picture

19 Jul 2017 - 7:41 pm | कंजूस

छान!
झाप,हिर काढणे यांचेही फोटो जमवायला लागतील. कधी या वस्तू गायब होतील पटकन.

ऋतु हिरवा's picture

19 Jul 2017 - 9:15 pm | ऋतु हिरवा

खरे आहे. माझ्याकडे फोटो असल्यास बघते

अतिशय सुंदर ठिकाण आहे हे! समुद्रकिनारा काही वेगळाच आहे.
लेखात उल्लेख नसलेले पण अतिसुंदर असे स्वयंभू कोळेश्वराचे मंदिर एकदा पहावेच असे आहे.
k

शेजारचे बुरुंडी पण असेच सुंदर आहे..

ऋतु हिरवा's picture

19 Jul 2017 - 9:16 pm | ऋतु हिरवा

होय, फारच सुन्दर आणि शांत मंदिर आहे

ऋतु हिरवा's picture

19 Jul 2017 - 9:45 pm | ऋतु हिरवा

कोळेश्वराच्या मंदिरातील चाफ्याची झाडे

ऋतु हिरवा's picture

19 Jul 2017 - 9:55 pm | ऋतु हिरवा

फक्त तेवढा 10 टक्के भगवा कलर काढून हिरवा केला तर दर्गा वाटेल.

अत्रुप्त आत्मा's picture

20 Jul 2017 - 12:59 pm | अत्रुप्त आत्मा

प्लस वन.
असेच म्हन्तो.

लेखन आवडले. आमच्या हरेश्वरच्या काही अठवणी जाग्या झाल्या.

साहित्य : २ नारळ, एक वाटी गूळ ( आवडीप्रमाणे कमी जास्त करणे), ८-१० काप्या फणसाचे गरे, वेलची, जायफळ किंवा केशर आवडीप्रमाणे, एक चमचा रवा, एक चमचा तूप

कृती : आधी दोन्ही नारळ खरवडून त्यांचे दूध काढून घ्यावे. गर्यांमधिल आठिळा काढून त्यांचे चौकोनी छोटे छोटे तुकडे करुन घ्यावेत. गर जास्त पिकलेले असू नयेत. एक चमचा तुपावर थोडा रवा भाजून घ्यावा. त्यावर नारळाचे दूध ओतावे व डावेने सारखे ढवळत रहावे. उकळी येउ देउ नये. चांगले गरम झाले की त्यात गूळ घालावा. गूळ विरघळला की गर्यांचे तुकडे घालावेत. २-३ उकळया आणून ग्यास बंद करावा. जायफळ वेलची केशर यापैकी आपल्या आवडीचा स्वाद घालावा.

करायला सोपी आहे आणि जास्त वेळ्ही लागत नाही. नारळ, गूळ आणि फणस या तिघांचा एकत्रित स्वाद अप्रतिम लागतो. दूध थोडे फाटल्यासार्खे होते. पण ढवळत राहिल्याने चोथा पाणी होत नाही व चवीत काही फरक पडत नाही.

रेवती's picture

20 Jul 2017 - 2:06 am | रेवती

धन्यवाद.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Jul 2017 - 9:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर मनोगत !

बर्‍याच गावांत आता पूर्वीचे वातावरण राहिले नाही, जे होणारच होते... पण जुन्या आठवणी विसरणेही शक्य होत नाही !

ऋतु हिरवा's picture

19 Jul 2017 - 9:50 pm | ऋतु हिरवा

खरे आहे

ऋतु हिरवा's picture

19 Jul 2017 - 9:49 pm | ऋतु हिरवा

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Jul 2017 - 9:53 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर !

भरलेली हिरवीगार नारळी-पोफळीची वाडी कोणत्याही कोनातून बघीतली तरी सुंदरच दिसते ! तिला फुललेल्या कात्री जास्वंदीचे कुंपण असले तर मग बघायलाच नको !!

ऋतु हिरवा's picture

19 Jul 2017 - 9:57 pm | ऋतु हिरवा

कात्री जास्वंद सुंदरच!शिवाय मोगरा, कुंद, अबोली , सीता अशोकाचे झाड असे कुंपणही सजलेले असते

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Jul 2017 - 10:12 pm | डॉ सुहास म्हात्रे

कात्री जास्वंद खूप फुलली की, झुडुपांच्या हिरवाईबरोबर स्पर्धा करणारी, भरघोस फुलांची लाल नक्षी फार सुंदर दिसते. आमच्या आजोबांनी इतर फुलझाडांची लागवड कुंपणाच्या आत स्वतंत्रपणे केली होती. कुंपणाची एक बाजू पूर्णपणे रातराणीची होती. (घरापासून जरा दूर असलेल्या बाजूला... कारण म्हणे तिच्या वासाने साप आकर्षित होतात ! मोठे झाल्यावर त्यात काही अर्थ नाही हे कळले, ते वेगळे :) ) त्यामुळे घराच्या सारवलेल्या अंगणात रात्री झोपणे हा एक सुगंधी अनुभव होता ! शिवाय, घरापासून जरा दूर असलेल्या निशीगंधाच्या शेतीशेजारून संध्याकाळी फेरी मारणे खूप आवडायचे. आजही हे लिहिताना, ते सगळे आठवून, नाकात ते सुवास दरवळले !

ऋतु हिरवा's picture

21 Jul 2017 - 9:13 pm | ऋतु हिरवा

वा सुंदर , तुमचा गाव कोणता?

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Jul 2017 - 10:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

वडखळ-अलिबाग रस्त्यावरच्या पेझारी नावाच्या गावापासून दोन-तीन किलोमीटर आत जंगलात असलेले वाडेवजा एकुलते एक चौसोपी घर आमच्या आईच्या आजोबांनी बांधले आहे. आता पेझारीपासूनची वस्ती वाढत वाढत घरापर्यंत पोचली आहे. लहानपणी तिथे आईच्या सहा बहिणी, तीन भाऊ आणि त्यांची दिडेक डझन मुले (ज्यातला मी एक होतो) असा सर्व गोतावळा दरवर्षी मे महिना व गणपतीच्या सुटीत जमत असे. घराचे आवार भरपूर मोठे होते. घराशेजारच्या एका मोठ्या भागात आजोबा आम्हा नातावांसाठी खास चोपण्याने ठोकून सपाट केलेले, शेणाने सारवलेले आणि पेंढ्याने शाकारलेले अंगण बनवून घेत असत. दुपारी उन्हे वर चढली की आम्हाला गोंधळ घालायला आणि रात्री वार्‍यावर झोपायला त्याचा उपयोग होत असे. चारपाच म्हशीही त्यांनी पाळलेल्या होत्या. ते स्वतः दूध काढायला बसले की हातात पितळी पेले घेऊन धारोष्ण दूध प्यायला आम्हा नातवंडांची रांग लागत असे.

आवाराच्या बाहेर जंगली मेव्याची (करवंदे, जांभळे, भोकरे, रानटी आंबे, इ) लयलूट असणारा टेकडी व पठार असलेला अर्धजंगली भाग होता. घराजवळच्या एका शेतात आजोबा कलिंगडाची काशी लावत असत (माहीत नसलेल्या लोकांसाठी : कलिंगडांची लागवड केलेल्या शेताला काशी म्हणतात... गैरसमज नसावा ;) ) तेथे कलिंगडांची कोल्ह्यांपासून राखण करण्याच्या निमित्ताने रात्रीच्या जेवणानंतर जात असू आणि दिवसा हेरून ठेवलेले कलिंगड फस्त केल्यावर राखणीचे काम गड्यावर सोपवून हळूच परतून अंगणात झोपत असू ! आजोबांना ते सगळे माहित असे पण ते एका शब्दांनेही बोलत नसत. किंबहुना ती कलिंगडांची लागवड "नातवंडांसाठी जास्त आणि व्यवसाय म्हणून कमी" अशीच होती हे मोठे झाल्यावर आमच्या ध्यानात आले.

घरापासून जरा दुरून वाहणारा एक ओढा, त्यावर एक लाकडी पूल आणि पलिकडे वडाच्या झाडांनी वेढलेले एक एकाकी मंदीर असा कादंबरीत असावा असा भाग होता तो. त्या वडांवर सुरपारंब्या खेळताना अनेकदा हात-पाय-डोके यांना जखमी करून घेतलेले आहे. :) सगळे भाऊबहिणी मोठे होत गेलो तसे शिक्षण, नोकरी-धंद्यामुळे फाटाफूट होत गेली आणि सगळ्यांना बांधून ठेवणारे आजोबा गेल्यानंतर नातेसंबंधांची गणितेही बदलत गेली.

गेल्या वीसेक वर्षांत तिकडे एकदाही जाणे झालेले नाही. :( मात्र, लहाणपणी, गणेशोत्सव आणि मे महिन्यांत (झाडांवरचे आणि माजघराच्या पोटमाळ्यांतल्या आढीतले) कलमी आंबे, जंगली मेवा, घरची कलिंगडे, ओल्या खोबर्‍याबरोबर खाल्लेली घरच्या वालांची पोपटी, इ च्या निमित्ताने एकत्र येणार्‍या सगळ्या भावंडांनी दिवसभर माजवलेल्या मनसोक्त गोंधळाच्या आठवणींची शिदोरी अजूनही विसरता विसरणे शक्य नाही !

असो. आता त्या आठवणी आल्या की काय लिहू आणि काय नको असे होते... म्हणून जरा जास्तच लिहिले :)

रेवती's picture

21 Jul 2017 - 10:47 pm | रेवती

वाह! असे काही वाचले की आठवणींच्या पोतड्या उघडतातच.

ऋतु हिरवा's picture

23 Jul 2017 - 10:40 pm | ऋतु हिरवा

वाह, फारच सुंदर. आता तुम्ही नवीन लेखच लिहा यावर.

छान गेले तुमचे बालपण. चांगले लिहिलेय.

ऋतु हिरवा's picture

21 Jul 2017 - 9:14 pm | ऋतु हिरवा

धन्यवाद

सौन्दर्य's picture

20 Jul 2017 - 12:27 am | सौन्दर्य

लेख एकदम सुंदर आणि वाचकाला स्वताबरोबर घेऊन जाणारा. जन्म आणि कार्यस्थळ मुंबई आणि इतर शहरे असल्यामुळे कोकणातील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद ह्याची देही अजून जमला नाही. तेव्हढीच एक खंत आहे.

ऋतु हिरवा's picture

21 Jul 2017 - 9:15 pm | ऋतु हिरवा

कोकण खुउप छान आहे. खरंच भेट द्या एकदा

रुपी's picture

20 Jul 2017 - 12:58 am | रुपी

सुंदर!

सुज्ञ's picture

20 Jul 2017 - 12:15 pm | सुज्ञ

अजूनही असेच टिकून आहे का ? की बरेचसे आधुनिक झाले ?

सुज्ञ's picture

20 Jul 2017 - 12:15 pm | सुज्ञ

अजूनही असेच टिकून आहे का ? की बरेचसे आधुनिक झाले ?

ऋतु हिरवा's picture

21 Jul 2017 - 9:16 pm | ऋतु हिरवा

गाव बरेचसे तसेच आहे. पण बदलत्या काळाबरोबर घरे सुखसोयींनी युक्त झाली आहेत.

प्रसाद_१९८२'s picture

20 Jul 2017 - 12:30 pm | प्रसाद_१९८२

ओघवते लेखन, खुप आवडले.

अजया's picture

20 Jul 2017 - 1:49 pm | अजया

सुरेख लेख.

ऋतु हिरवा's picture

21 Jul 2017 - 9:17 pm | ऋतु हिरवा

धन्यवाद

मितान's picture

20 Jul 2017 - 2:14 pm | मितान

सुंदर !!!!

ऋतु हिरवा's picture

21 Jul 2017 - 9:17 pm | ऋतु हिरवा

धन्यवाद

मंजूताई's picture

20 Jul 2017 - 2:52 pm | मंजूताई

वाटले लेखन वाचून !

ऋतु हिरवा's picture

21 Jul 2017 - 9:18 pm | ऋतु हिरवा

:) ___/|\___

स्मिता.'s picture

22 Jul 2017 - 1:06 am | स्मिता.

व्वा!! किती त्या रम्य आठवणी.
इथे मिपावर कोकणातल्या अश्या आठवणी वाचून कधी कोकणात, तेही लहानश्या गावात न गेल्याचं खूप दु:ख वाटतं.

यशोधरा's picture

22 Jul 2017 - 1:16 am | यशोधरा

सुरेख.

पिशी अबोली's picture

23 Jul 2017 - 11:10 pm | पिशी अबोली

खूप सुंदर लिहिलंय. कोकणातलं गाव म्हणजे आठवणींची खाण असते. सगळ्यांचाच हळवा कोपरा.. तुम्ही छान उभं केलंत खरंच..

सस्नेह's picture

24 Jul 2017 - 11:55 am | सस्नेह

खुप रम्य आठवणी आणि जिवंत चित्रण !
अशी बालपणे कुठे मिळतील आता ?
(अं हं ) स्नेहा

मनिमौ's picture

24 Jul 2017 - 1:16 pm | मनिमौ

आमचे कुलदैवत आहे. साधारण चारेक वर्षापुर्वी कोळथर ला फेरी झाली होती. बाकी लेख मस्त आहे