दक्षिणायन चित्रपटांचे !

धर्मराजमुटके's picture
धर्मराजमुटके in जनातलं, मनातलं
22 Jul 2017 - 7:48 pm

युट्युबवर शोधतांना उत्तम दर्जाचे मराठी चित्रपट जास्त सापडत नाहित. जे उत्तम आशय असलेले आहेत ते उत्तम दर्जाचे चित्रिकरण असलेले असतीलच असे नाही. बहुसंख्य मराठी, हिंदी चित्रपट एकतर नवीन आले असताना चित्रपटगृहात बघीतलेले असतात किंवा थोड्याच दिवसात युट्युब, टोरंटस वर मिळतात. हॉलीवुड चित्रपट देखील बरेच पाहायला मिळतात. पण ते कधी कोणत्या प्रकारचे धक्के देतील ते सांगता येत नाही म्हणून घरात बघण्याला मर्यादा येतात. या सगळ्या चित्रपटांच्या भाऊगर्दीत दक्षिणेचे चित्रपट पहायला सुरुवात केली आणि मग ते आवडू लागले.

विशाखापटटणमला कंपनीच्या कामानिमित्त महिनाभर रहावे लागले होते. साईट होती भारतिय नौदलाचे 'जहाज बांधणी कार्यालय'. दिवसभर काम करुन दमल्यावर विरंगुळा काय ? तर एकतर समुद्रकिनार्‍यावर जाऊन बसणे किंवा मग टिव्ही पाहणे. पण टिव्ही पाहायला मजा येत नसायची. कारण त्या वेळी केबलचा इतका प्रसार झालेला नव्हता. एके दिवशी ठरवले की चला सिनेमागृहात जाऊन एखादा सिनेमा पाहु. सिनेमागृहाच्या बाहेर हे भले मोठे मोठे होर्डींग्स लागलेले असायचे. हिरोंना हार घातलेले असायचे. चित्रपटाचे नाव आणि चित्रपटातील भाषा काहिच कळत नसे. मात्र आजुबाजुच्या प्रेक्षकांच्या उत्साहाची लागण होत असे. पहिलाच चित्रपट बघीतला तो 'महेश बाबू' या नटाचा. अगदीच आवडून गेला. अर्थात नाव मात्र नंतर कोणालातरी विचारले तेव्हा कळाले.

एकंदरीत दक्षिणेतील चित्रपटसृष्टी प्रचंड मोठी आहे. प्रादेशिक चित्रपट तिकडे अमाप पैसा खेचतात. तिकडच्या नायक नायिकांची राजकीय उदाहरणे तर आपण नेहमीच बघत / ऐकत आलेलो असतो. कानडी, तेलुगु, तमिळ, मल्याळी अभिनेते वेगवेगळ्या भाषेतील चित्रपटांत काम करताना दिसतात. नायिका मात्र बर्‍याचशा उत्तरेकडच्या आहेत. (गोर्‍या रंगाची कृपा ??)

टाटा सुमो, स्कॉर्पियो, बोलेरो, फॉर्चुनर आणि तत्सम एसयुव्ही गाड्यांना या चित्रपटांत भरमसाठ मागणी असते. कारण खलनायक आले की गाड्याच्या गाड्या भरुन येतात. छोट्या कार्समधे असे कितीजण मावणार ? एकंदरीतच सगळ्या एसयुव्ही निर्मात्यांनी यांचे आजन्म ऋणी होऊन रहावे. जाहिरातीत होणार नाही एवढी पब्लिसिटी एक चित्रपट करतो.

युट्युबकृपेने आता बरेचसे (म्हणजे जवळपास सर्वच चित्रपट) हिंदी भाषेत अनुवादित होऊन आपल्यासमोर येतात. बर्‍याचशा चित्रपटांत नायक खलनायक अगदी ब्लॅक अँड व्हाईट शेडसह स्पष्ट ओळखता येतात. बर्‍याचशा चित्रपटांत हिरोला दोन हिरॉईन्स सोबत काम करायला मिळते. (एक चित्रपटाच्या मध्यंतरापर्यंत बहुधा काही कारणाने मरते). रजनिकांत, कमल हसन, मोहनलाल ज्यु. एन.टी.आर, विजय, नितिन, आलु अर्जुन, रवि तेजा (हा मला फार आवडतो. कारण चित्रपट हिंदीत असला तरी याचे २५% डायलॉग मराठीत असतात), अजित, नागार्जुन, वेंकटेश, चिरंजीवी, राम चरण तेजा, पवन कल्याण, प्रभास, राणा दगुबत्ती, सुर्या, गोपीचंद असे कितीतरी कलाकार आहेत. त्यांचा स्वतःचा प्रेक्षकवर्ग आहे. एका नायकाचे चित्रपट बघून त्याच्या प्रेमात पडायला सुरुवात करावी तोच दुसरा एखाद्याचा चित्रपट बघण्यात येतो. कधीकधी यांच्यात डावे उजवे करणे, क्रमांक देऊन त्यांची प्रसिद्धी मोजणे अशक्य होऊन बसते.

खलनायकांत प्रकाश राज, सोनु सुद, आशिष विद्यार्थी, राहुल देव, नासिर, प्रदिप रावत, अजय, विद्युत जामवाल असे नेहमीचे चेहरे असतात. नायिकांप्रमाणे खलनायकीमधे देखील उत्तरेने दक्षिणेवर स्वारी केलेली दिसते. आपला सयाजी शिंदे तर सहनायक, खलनायक, विनोदी, भ्रष्ट आणि इमानदार पोलीस ऑफीसर इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे रोल तितक्याच ताकदीने साकारत असतो.

नायिकांमधे राधिका आपटे, तमन्ना भाटीया, काजल अगरवाल, हंसिका मोटवानी, जेनेलिया डिसुजा, दिक्षा सेठ, भुमिका चावला अशी इतर भारतीय नावे दिसतात. मात्र खास साउथ इंडियन नायिकांचा ताफा देखील तितकाच अफाट आहे ! अनुष्का शेट्टी (बाहुबलीवाली), समांथा, आसिन, श्रूती हसन, श्रेया, तापसी पन्नु, रम्या, अमला पॉल...... यादी लांबच लांब आहे.

साउथ मधे कोणीही हिरो होऊ शकतो हा माझा आवडता वाक्यप्रचार आहे. काही चित्रपटांचे नायक बघीतले तर या वाक्याची प्रचिती नक्की येते. या सगळ्यात मल्याळम सिनेमे थोडे संथ आणि काळाच्या मागे वाटतात. (कदाचित मी जास्त चित्रपट पाहिलेले नसतील.) बहुधा सगळेच (नायक, खलनायक) जास्त प्रमाणात ढोसत असतात की काय कळेना. डोळे बघावे तर लाल लाल !

सर्व सिनेमांमधील महत्त्वाचे पात्र म्हणजे 'ब्रह्मानंद' १०० पैकी ९० सिनेमांमधे हा असतोच असतो. याची खासीयत वर्णन करण्यापेक्षा तुम्ही स्वत:च बघावी.

यातील बरेच कलाकार बॉलीवुडमधे ही चमकले आहेत. काही टिकून राहिलेत तर काही गायब झाले. काळाचा महिमा !

इति दक्षिणायन समाप्त !

आजचा चित्रपट : जनता (था) गराज ! : नायक : ज्यु. एन.टी.आर.

कलाप्रकटन

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Jul 2017 - 8:06 pm | अमरेंद्र बाहुबली

खरच! उच्च प्रतिच चित्रिकरणं, जबरजस्त कथानकं, साँलीड हिरो हिरोईन, काँमेडी, विदेशातील शुटिंग सगळंच जबरदस्त!!!हे सिनेमे जपान, थायलंड, मलेशिया ह्या भागात पण मोठ्या प्रमाणावर बघितले जातात.

सयाजी गायकवाड नाही, शिंदे.
बादवे ह्या धाग्यावर मी लै लिहिणारे प्रतिसाद. टावेल टाकून ठिवतुया.
.
हैस्स्सा, रुद्रस्सा, हैसर्वत्रसमुद्रस्सा...

धर्मराजमुटके's picture

23 Jul 2017 - 8:31 pm | धर्मराजमुटके

सयाजी गायकवाड नाही, शिंदेच. सं.मं. प्लीज दुरुस्ती कराल काय ?

सतिश गावडे's picture

23 Jul 2017 - 9:22 pm | सतिश गावडे

चांगल्या दाक्षिणात्य चित्रपटांचा दर्जा खुपच चांगला असतो. आपले लोक टिव्हीवर दाखवले जाणारे डब केलेले टुकार दाक्षिणात्य चित्रपट पाहून मत बनवतात की "यंडूगुंडूवाले चित्रपट टुकार असतात".

दाक्षिणात्य चित्रपटातील हिरो म्हटला की "पोकीरी"मधला महेशबाबू आठवतो. माझ्या मते इतका सुंदर अभिनय इतर कोणताच भारतीय नट करत नाही.

कपिलमुनी's picture

23 Jul 2017 - 10:35 pm | कपिलमुनी

लिहायला मजा येणार !
तेलुगू तमिळ मल्याळम मोस्टली पाहतो कन्नड कमी पाहिले आहेत

अनिरुद्ध प्रभू's picture

24 Jul 2017 - 10:59 am | अनिरुद्ध प्रभू

प्रामुख्यानं चार भागात विभागलेली आहे...
अर्थात भाषेवरुनच,
१. तेलुगु: मसाला आणि अ‍ॅक्शन चित्रपटान्चा भडि मार यालाच जास्त महत्व....
२.कन्नड : तेलुगु पाठोपाठ दुसरी अ‍ॅक्शनसाठी प्रसिद्ध
३.तमिळः या चित्रपत्स्रुष्टित कथेवर सगळ्यात जास्त प्रयोग होतात.
४.मल्याळमः बन्गाली नंतर आणि मराठीच्या आधी सगळ्यात आशयघन चित्रपटांची पंढरी...

आता हे उघड सत्य आहे की बरेचसे हिन्दी चित्रपट हे याच दाक्षिणात्य चित्रपटांवरुन ढापलेले असतात.
लिस्ट बरिच मोठी आहे पण थोडेच देतो.....
१.राऊडी राठोड : याचे मुळात तेलुगुआणि कन्नड मधेही रिमेक झाले आहेत. ( तेलुगु-हीरो रवि तेजा.....कन्नडः हीरो किच्चा सुदिप)
२.द्रुश्यम : हा मल्याळम मधिल मोहन्लाल आजोबान्चा बहुचर्चित चित्रपट
३.निशिकांत कामतचा 'फोर्स': तामिल मधे ज्योतिका आणि तिचा नवरा सुर्या याचा ब्लॉकबस्तर चित्रपट काखाकाखा चा रिमेक होता.
४.टागर श्रोफ चा पहिला चित्रपट हिरोपण्ती हा अलुअर्जुन च्या परुगु चा रिमेक होता.
५.मराठीतला व्रुन्दावन (राकेश बापट-पूजा सावंत आणि वैदेही पर्शुरामी) हा देखिल जु. एन टी आर - काजल- समांथा च्या त्याच नावाच्या तेलुगु फिल्मची कॉपी होती....

तुर्तास एवढेच.....!!

अभिदेश's picture

25 Jul 2017 - 1:34 am | अभिदेश

एवढे बिनडोक , स्टीरीओटाईप , भौतिकशास्त्राच्या नियमांना फाट्यावर मारणारे चित्रपट आवडणारे एवढे लोक्स आहेत हे वाचून अक्षरश: डोळे पाणावले .... उगा आमच्या मिथुनदांच्या चित्रपटांना का नाके मुरडायची ?

धर्मराजमुटके's picture

25 Jul 2017 - 8:01 pm | धर्मराजमुटके

भौतिकशास्त्राच्या नियमांना शाळेतच फाट्यावर मारले होते मग चित्रपटाची काय बात ? :)

अरारा !

२-४ टुकार चित्रपटाच्या क्लिपिन्ग बघून अशी मत बनवणार्‍याचे वाईट वाटते.
बाकी ९९% चित्रपटात भौतिकशास्त्राच्या नियमांना फाट्यावर मारलेले असते.

( वास्तववादी चित्रपट म्हणून एक माणूस ३ तास घोरत पडलेला दाखवून अ‍ॅवार्ड घावे म्हणतो )

अभिदेश's picture

25 Jul 2017 - 11:12 pm | अभिदेश

एका तरी चित्रपटाला मिथुनदांच्या गुंडाची सर आहे का ? आधी त्या दर्जाचे चित्रपट बनवा म्हणावं मग दखल घेण्यात येईल , तो पर्यंत नाय नो नेव्हर !!!!

काय फालतू प्रश्न आहे म्हणतो मी!
अजरामर इत्यादी शब्द वाचून तरी माहिती आहेत का?

गुंडा भक्त गुंड_दशानन

छान लेख आहे. साऊथ चे चित्रपट खूपच भारी असतात , कल्पना, टेकनॉलॉजि , कथा, पटकथा, संगीत सर्वेच बाबतीत साऊथ चे चित्रपट इतर भाषिक चित्रपट पेक्षा खूप पुढे आहेत. बाकी काहींना शितावरून भाताची परीक्षा करून नावे ठेवायचे असेल आणि फक्त पुणेरी मराठी चित्रपटाचं जगात भारी आहेत असे वाटत असेल तर ज्याचा त्याचा दृष्टी दोष म्हणावे लागेल.

विशुमित's picture

8 Aug 2017 - 6:30 pm | विशुमित

संगीत आणि गाणी .... अप्रतिम..!!

पैसा's picture

8 Aug 2017 - 9:02 pm | पैसा

आताच नव्हे, फार पूर्वीपासून अति उत्तम आणि अति भंगार दोन्ही प्रकार सौंधिंडियन सिनेमात बघायला मिळतात. दूरदर्शनवर असे अनेक उत्तमोत्तम सिनेमे बघितले आहेत.

अभिदेश's picture

8 Aug 2017 - 9:06 pm | अभिदेश

अति उत्तम हे मल्ल्यालम आणि अति भंगार हे तेलगू असे समीकरण असते.

चौथा कोनाडा's picture

9 Aug 2017 - 5:39 pm | चौथा कोनाडा

मस्त लेख आहे !
आवल्डला !

कपिलमुनी's picture

9 Aug 2017 - 5:54 pm | कपिलमुनी

pulimurugan

मोहनलालचा हा चित्रपट फुल्ल एच डी मधेच पहावा .

वरुण मोहिते's picture

9 Aug 2017 - 6:25 pm | वरुण मोहिते

पण फॅन आहे . आणि आज त्याचा वाढदिवस पण आहे . म्हणून प्रतिसाद . वाचेल कधीतरी मिपा वर तो .