गायीचे आत्मवृत्त

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
15 Jul 2017 - 5:20 pm

- डॉ. सुधीर रा. देवरे

मी गाय आहे. माझ्यात देव वास्तव्य करत असल्यामुळे मला माणसाचं प्रबोधन करायचा हक्क आहे. म्हणून तर आता बोलायची हिंमत करते:
मला माणसापेक्षा जास्त किंमत आहे. राजस्थानात गाय आणि वासरूच्या जोडीला एकशे पाच रूपये अनुदान मिळतं तर दारिद्र्य रेषेखाली असलेल्या माणसांच्या जोडप्याला सत्तर रूपये मिळतात.
वि. दा. सावरकर म्हणाले होते, ‘गाय हा फक्‍त उपयुक्‍त पशू आहे!’ तर महात्मा गांधी म्हणाले होते, ‘गायीला वाचवायलाच हवं, पण माणसाला मारून नाही तर गाय मारणार्‍या माणसाला हात जोडून- विनंती करून!’ तरीही माझ्यासाठी म्हणजे गायी वाचवण्यासाठी आज सरेआम माणसांची कत्तल सुरू झाली.
माझ्या पोटात तेहतीस कोटी देव असतीलही. पण जगातील सर्वात प्रगत माणसाच्या पोटात एक तरी देव असेलच ना? मग माणसात देव असूनही माणूस माणसाला का मारतो? अगदी प्रत्यक्षातले देव सुध्दा असुरांचे शंभर गुन्हे भरल्याशिवाय त्यांचा वध करत नव्हते. मग कायद्याच्या लोकशाही देशात राहून माणसाच्या एकाच गुन्ह्याच्या बदल्यात तुम्ही त्याचा जीव घेणार?
माझ्याबद्दल तुम्हाला खूप प्रेम आहे, हे लक्षात आलंय माझ्या. मला मारून कोणी माझं मांस खाऊ नये, हे तुमचं म्हणणंही मान्य आहे. पण केवळ अशा संशयानेही तुम्ही जीव घेता. कायदा हातात घेऊन कोणालाही मारहाण करता. तुम्ही वाटेल तसे बकरे कापता, कोंबड्या कापता याबद्दल तुम्हाला थोडाही संकोच वाटत नाही? माझ्यातच काय सर्व भूतमात्रांत देव असेल तर हत्त्या कोणाचीच व्हायला नको. मला मारणार्‍या माणसाच्या अंगावर तुम्ही धाऊन जाणार नसाल- कोणाची हत्त्या करणार नसाल तरच तुम्हाला धार्मिक- अध्यात्मिक म्हणता येईल!
(काश्मीरातली डीएसपीची हत्त्या असो की दगड फेकणारे लोक... अतिरेकी असोत की अतिरेक्यांना मदत करणारे साळसूद निशस्त्र दिसणारे लोक... माझ्यात देव असल्यामुळे, अशा सर्वांची मला प्रचंड चीड आहे. सावधान. माणसाने मॉबचा घटक होऊ नये. मॉबचे मानसशास्त्र हिंसक बनते.)
माझ्याबद्दल तुमच्या मनात इतकं प्रेम असून सुध्दा मला रोज अर्धपोटी उपाशी का रहावं लागतं? माझ्याकडून दूध मिळणं बंद होताच मला रस्त्यावर बेवारशी का सोडलं जातं? शहरातल्या चौकाचौकातल्या कचराकोंडीत आणि गावाला लागून असलेल्या उकीरड्यांवर मला रोज प्लॅस्टीक का चघळावं लागतं? नेमकं अडत्यालाच का विकलं जातं मला? असे प्रश्नही माझ्या प्रेमाखातीर आपल्या मनात असू द्या. म्हणजे तुम्ही निरपराध माणसांना शिक्षा देत आहात हे कदाचित तुमच्या लक्षात येईल.
मला तुम्ही आधार कार्ड दिलं. आवडलं मला. तुम्ही मला मतदार सुध्दा केलं असतं. पण माझ्याकडून मतदान कसं करून घ्यायचं याची तुमच्यापुढे टेक्निकल अडचण दिसते. असो.
(या ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

– डॉ. सुधीर रा. देवरे
इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

वाङ्मयलेख

प्रतिक्रिया

तेजस आठवले's picture

15 Jul 2017 - 10:41 pm | तेजस आठवले

तुम्हाला नक्की कुठल्या माणसांचं प्रबोधन करायचं आहे ? निर्दयपणे मारून चवीने तुम्हाला खाणाऱ्यांचं का तुम्हाला वाचवणाऱ्यांचं ?

काश्मीरातली डीएसपीची हत्त्या असो की दगड फेकणारे लोक... अतिरेकी असोत की अतिरेक्यांना मदत करणारे साळसूद निशस्त्र दिसणारे लोक... माझ्यात देव असल्यामुळे, अशा सर्वांची मला प्रचंड चीड आहे.

गाईला कश्याला ह्याची चीड येईल? काहीही.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

16 Jul 2017 - 4:47 pm | डॉ. सुधीर राजार...

धन्यवाद तेजसजी आठवले

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Jul 2017 - 9:09 pm | अमरेंद्र बाहुबली

मला एक समजत नाही. रस्त्यावर फिरणार्या गायी सगळ्यांना दिसतात. पण एका गाय खाणार्या धर्माचे लोकं 12 15 पोरं पैदा करून रस्त्यावर भिक मागायला पाठवतात. ते का नाही दिसत? त्यांना आम्ही भरलेल्या करावर का पोसायचं? आणि वरून ओरडायच माणसाचा जिव गायी पेक्षा स्वस्त झाला. अरे होणारच ना??

गामा पैलवान's picture

16 Jul 2017 - 10:12 pm | गामा पैलवान

डॉ. सुधीर रा. देवरे,

सावधान. माणसाने मॉबचा घटक होऊ नये. मॉबचे मानसशास्त्र हिंसक बनते.

हे गोप्रेमींपेक्षा नक्षल्यांना अधिक चपखलपणे लागू पडतं. गेल्या कित्येक दशकांत हजारो निरपराध्यांच्या हत्या करणारे नक्षलवादी हा खरा धोका आहे. गोप्रेमींचा कणमात्र धोका नाही.

आ.न.,
-गा.पै.

पैसा's picture

17 Jul 2017 - 11:09 am | पैसा

गोरक्षक मंडळी गायींना रस्त्यात प्लॅस्टिक खात का फिरू देतात हे मात्र मोठं कोडं आहे.

गामा पैलवान's picture

17 Jul 2017 - 11:46 am | गामा पैलवान

पैसाताई,

आई आपल्याला दिवसभर दुसरीकडे सोडून का जाते हे लहान शिशूला पडलेलं कोडं आहे. शिवाय संध्याकाळी घरी आल्यावर म्हणते की तुझ्यासाठी मी दिवसभर काम करते. एकतर मला सोडून जाते आणि वर माझ्यासाठीच काम करते असं म्हणते, म्हणजे नक्की काय करते बरं? हे पडलेलं दुसरं कोडं आहे.

आ.न.,
-गा.पै.

माहितगार's picture

17 Jul 2017 - 12:42 pm | माहितगार

पण माझ्याकडून मतदान कसं करून घ्यायचं याची तुमच्यापुढे टेक्निकल अडचण दिसते. असो.

प्रतिक्रीया जरा मनमोकळी देतो. हे वाक्य निबंधातील अधिक प्रगल्भ जाणीव दाखवत, ह्यातला विनोद समजण्यास वेळही लागतो (सत्ताधार्‍यांना बदनाम करण्यासाठी अशी कारस्थाने विरोधकही करुन घेऊ शकतात सत्ताधार्‍यांचे समर्थक अशा जाळ्यात अनाहुतपणे अडकू शकतात - राजकारणात असे अपवित्र खेळ होऊ शकतात ह्या बाजू कडे विश्लेषकाचे लक्ष असावयास हवे असे वाटून गेले) एरवी लेखन रोचक होउनही जरा शालेय वाटल्यामुळे मी निबंध लेखन कसे करावे ? विकिबुक्स प्रकल्पात येथे दुवा दिला आहे. :)

माहितगार's picture

17 Jul 2017 - 2:47 pm | माहितगार

सावधान. माणसाने मॉबचा घटक होऊ नये. मॉबचे मानसशास्त्र हिंसक बनते.

ह्या वाक्याच्या मागे पुरेसे विश्लेषण दिसले नाही. मह्राष्ट्रात अलिकडे निघालेले मराठा मोर्चे (उद्देश्य सफलता बाजूला ठेऊ) लिडरशीप प्रेशी जबाबदार असेल तर मोठा मॉब अहिंसक सुद्धा वागू शकतो.

हिंसा करण्यासाठी लागणारे मॉब भारतात पैसे देऊन मिळवले जातात अशीही वंदता असते. एखादा पोलीस अधिकारी, एखादा आयुक्त, अखादा कलेक्टर एखादा मुख्यमंत्री व्यापारी दृष्तीने अडचणीचा झाला तरी त्याला दूर करण्यासाठी दबाव आणावा म्हणूनही हिंसा हेतुपुरस्सरही भडकवल्या जातात. सर्वच गोष्टींचा शोध न्याय यंत्रणा घेऊ शकत नाही. वर-वर समोर दिसणार्‍या मॉबच्या मागे नेमके कोण राजकारण करते आहे याचा शोध घेण्याची जबाबदारी वृत्त माध्यमांची आहे. जुन्या घटनांचा धांडोळा घेऊन भारतात अश्या गोष्टी का हडतात त्याच्या मागे नेमके कोण होते ह्याचा शोध वृद्ध व्यक्तिंना भेटून समाजशास्त्राच्या अभ्यासकांनी घ्यावयास हवा तेवढ्या प्रमाणात ते होताना दिसत नाही.