रिचर्ड गेयर आणि चीन

सांरा's picture
सांरा in जनातलं, मनातलं
13 Jul 2017 - 8:51 pm

पुन्हा एकदा चीनने आपल्या डोक ला भागात घुसखोरी केली आहे. भारत, भूटान आणि तिबेट या देशांना जोडणारा हा भाग सामरिक दृष्ट्या फार महत्वाचा आहे. तेथे चीन सध्या रस्ता बांधत आहे. भारतीय जवानांनी ते काम रोखल्यावर चीनी लोकमुक्ती सेनेने तीन किमी आत येऊन भारतीय बंकर उध्वस्त तर केलेच पण आंतरराष्ट्रीय पातळीवर फार मोठा तमाशा करून भारतावर नियंत्रण रेषेच्या उल्लंघनाचा आरोप ठेवला आहे. यालाच मराठीत ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असे म्हणतात.

आपल्यापैकी अनेकांनी ‘रिचर्ड गेयर’ हे नाव ऐकलेच असेल. रिचर्ड गेयर हा नव्वदीच्या दशकातला हॉलीवूड सुपरस्टार. त्याचे अमेरिकन जिगोलो, शिकागो, सारखे अनेक चित्रपट गाजलेले आहेत. १९९० साली आलेला त्याचा जुलिया रॉबर्ट्स सोबतचा ‘प्रेटी वूमन’ इतका गाजला की १९९९ साली त्याचा दुसरा भाग ‘रनवे ब्राईड’ या नावाने पुन्हा त्याच दोघांना घेऊन काढण्यात आला. रिचर्ड गेयर अनेक वेळा भारतात येतो आणि त्याचा ‘गेयर फाउंडेशन ट्रस्ट’ भारतात सेवाभावी कामे चालवतो. २००७ साली एड्स विषयी जागरूकतेच्या कार्यक्रमात त्याच्या शिल्पा शेट्टी सोबतच्या चुंबन दृश्यामुळे त्याला फार टीकेचा सामना करावा लागला.

तर अशा या रिचर्ड गेयरला हॉलीवूड मधील मुख्य धारेतील मोठमोठ्या चित्रपट कंपन्या जसे एमजीएम, डिस्ने, वार्नर ब्रदर्स इत्यादी आपल्या चित्रपटांमध्ये घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे रिचर्डला फार कमी काम मिळत आहे. सध्या तो कमी खर्चाचे आणि समांतर चित्रपट करतोय. नुकताच त्याचा ‘द डिनर’ हा चित्रपट प्रदर्शित झालाय. नाही नाही एखाद्या बॉलीवूड सुपरस्टारप्रमाणे त्याला त्याच्या अहंकाराने कामे नाकारली जात नसून, त्याचं कारण आहे चीन.

दुसऱ्या महायुद्धाला अमेरिकेने दोन अणुबॉम्ब टाकून संपवले आणि जपानवर सामरिक निर्बंध घातले तसेच जपानची राज्यघटना बदलली. हेतू हा की पुन्हा जपानमध्ये युद्धखोर सरकार येऊन अशी आगळीक करायला नको. सध्याच्या जपानी घटनेत सरकारने जपानी भूमीबाहेर कुठेही युद्ध करायला बंदी आहे. परंतु जग फक्त शस्त्रांनीच जिंकता येते असे नाही. महायुद्धानंतर जपानने उद्योगशीलता आणि कल्पकतेच्या जोरावर वीस वर्षांतच स्वतःला सावरले आणि व्यापारात प्रचंड वाढ केली. अगदी १९८० च्या दशकातच सोनी, टोयोटा सारख्या जपानी कंपन्या अमेरिकेत बस्तान बसवू लागल्या आणि त्यांनी अनेक अमेरिकन कंपन्या विकत घेतल्या. दुसऱ्या देशांत मुक्त व्यापाराच्या मोठ्या गोष्टी करणाऱ्या अमेरिकनांना यावेळी पाहण्याशिवाय काहीच करता आले नाही. अगदी हाच कित्ता गिरवत चीनने २००० च्या दशकात अमेरिकन कंपन्यांमध्ये फार मोठी गुंतवणूक केली. तेव्हापासून आतापर्यंत चीनने जगभर अनेक ठिकाणी पैसे गुंतवले आहेत; त्यामध्ये चित्रपट कंपन्याही आल्याच. तसेच अनेक कंपन्यांचे गुंतवणूकदार चीनी आहेत आणि चीनी बाजारपेठही फार मोठी आहे. त्यामुळे चीनला दुखवायला कोणी तयार नाही.

तर या चित्रपट कंपन्यांना त्यांच्या चीनी मालकांनी रिचर्डला चित्रपटांत घेण्यास बिलकुल मनाई केलेली आहे. सर्व चीनी कंपन्या या चीनी सरकारच्या मालकीच्या असतात. म्हणजे या रिचर्डबंदी मागे सरकारचा हात ओघाने आलाच. रिचर्ड म्हणतो की चीनी गुंतवणूक असलेल्या सर्व कंपन्यांनी तर त्याला वाळीत तर टाकले आहेच पण कोणीही चीनी कलाकार किंवा तंत्रज्ञ त्याच्यासोबत काम करायला तयार नाही. तो पुढे म्हणतो, “माझ्या एका चित्रपटामध्ये एक चीनी दिग्दर्शक काम करीत होता. जेव्हा त्याला कळले की चित्रपटात मी आहे, तो एक आठवड्यात काम सोडून गेला. त्यानंतर मी त्याच्याशी एका गुप्त फोन यंत्रणेद्वारे संपर्क साधला तेव्हा त्याने मला सांगितले की जर त्याने माझ्यासाबत काम केले तर त्याला किंवा त्याच्या कुटुंबियांना कधीच चीन बाहेर पडता येणार नाही आणि त्यालाही कधी काम करता येणार नाही. या गोष्टीचा अर्थ आपण जाणतोच.” पण रिचर्ड अजून पर्यंत त्याची फिकीर करत नाही. तो म्हणतो, “मी तीन दशके पुरेसा यशस्वी राहिलेलो आहे त्यामुळे आता अशी कामे करणे मला परवडते” पण रिचर्डवरील एवढ्या रागाच कारण तरी काय?

तर कारण हे आहे की रिचर्ड हा बौद्ध आहे. तो नुसताच बौद्ध नसून बौद्ध धर्माच्या तिबेटन गेलुगपा पद्धतीचा उपासक आहे. दलाई लामांबरोबर त्याचे चांगले संबंध असून त्याची इंटरनॅशनल ‘कॅम्पेईन फोर तिबेट’ हि संघटना तिबेटी स्वातंत्र्यासाठी काम करते. चीनशी त्याची पहिली ठिणगी पडली १९९३ मध्ये, जेव्हा त्याने ऑस्कर सोहळ्याचे समालोचन करतांना तिबेटवरील अत्याचाराला वाचा फोडली. त्यामुळे त्याला पुन्हा ऑस्कर समालोचन करण्यास आणि चीन मध्ये प्रवेश करण्यास बंदी करण्यात आली. त्याने २००८ साली तिबेटमधील मानवी हक्कांच्या उल्लंघनाच्या निषेधार्थ चीनमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक खेळांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन हि केले होते.

या एका उदाहरणावरून चीनी लोकांचे देशप्रेम आणि चीनी सरकारची देशहितासाठी कुठल्याही पातळीवर जाण्याची वृत्ती दिसून येते. चीनच्या विभाजनाबद्दल बोलणाऱ्या कोणाचीही चीनी लोक गय करीत नाही, आणि ‘भारत तेरे तुकडे होंगे’ म्हणणाऱ्यांना आपण अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणून कुरवाळतो. आता या आठवड्यात झालेल्या प्रकरणानंतर आपल्यापैकी किती लोक चीनी वस्तू घेणे बंद करतील?

(हा लेख दैनिक तरुण भारतच्या अंकात प्रसिद्ध झालेला आहे.)

धोरणविचार

प्रतिक्रिया

शेवटच्या तीन वाक्यांशी अगदी सहमत

सोमनाथ खांदवे's picture

13 Jul 2017 - 9:57 pm | सोमनाथ खांदवे

चीनी वस्तु वापर न करण्या साठी पर्याय आहेत कुठे ? बऱ्याचशा इलेक्ट्रॉनिक वस्तु चीन मधेच बनवल्या जातात त्या मुळे नाइलाज असेल तरच नवीन घ्या अन्यथा जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तु वरच दिवस घालवा.

सोमनाथ खांदवे's picture

13 Jul 2017 - 9:57 pm | सोमनाथ खांदवे

चीनी वस्तु वापर न करण्या साठी पर्याय आहेत कुठे ? बऱ्याचशा इलेक्ट्रॉनिक वस्तु चीन मधेच बनवल्या जातात त्या मुळे नाइलाज असेल तरच नवीन घ्या अन्यथा जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तु वरच दिवस घालवा.

जेम्स वांड's picture

13 Jul 2017 - 10:48 pm | जेम्स वांड

आपल्यापैकी किती लोक चीनी वस्तू घेणे बंद करतील?

भारतात चिनी वस्तू कोण आणते? कारण मी तर बुआ बाजाराची पिशवी घेऊन चीनला जात नाही, जो आणतो, विकतो त्याला विचारावेत ही विनंती.

रच्याकने,

शेवटच्या छापील परिच्छेदाने पूर्ण लेखतली हवाच काढून टाकली, शेवटचा परिच्छेद वाचून जमत आलेल्या बासुंदीत लिंबू पिळल्यागत भावना आली एकदम. डोकलम पासून सुरुवात करून वरतून चिन्यांच्याच देशभक्तीची उदाहरणे देणे ह्यात विपर्यास अन विसंगती जाणवली नाही का हो तुमची तुम्हाला? अन कसले काढले आहे चिनी लोकांचे देशप्रेम, सरकार म्हणते ते नाही ऐकले तर घरादारावर गाढवाचा नांगर फिरायच्या भीतीने केलेली कृत्यं देशभक्ती म्हणून मोजणार असाल तर विषयच खुंटला, उलट त्या पिचक्या पिवळ्या भडव्यांच्या देशभक्तीचे मासले अन उदाहरणे देण्यापेक्षा रिचर्ड गेर अन तिबेटी बुद्ध पंथ, दलाई लामा ह्यांची एकत्र मोट बांधून चीन विरुद्ध आंतरराष्ट्रीय बोंब मारण्याबद्दल काही चर्चा असती तर वाचायला मजा आली असती, ही काहीतरीच मानसिक गुलामीची लक्षणे वाटली उलट शेवटच्या परिच्छेदामुळे.

एकंदरीत लैच कैच्याकै 'लेख'

थॉर माणूस's picture

14 Jul 2017 - 12:28 am | थॉर माणूस

>>>या एका उदाहरणावरून चीनी लोकांचे देशप्रेम आणि चीनी सरकारची देशहितासाठी कुठल्याही पातळीवर जाण्याची वृत्ती दिसून येते.

एका वाक्यात माहितीपर धाग्याला विनोदी बनवलेत की. :)

बाकी कम्युनिजम ला ढीगभर शिव्या घालणारे अशा बाबतीत चीनची तळी नेमकी उचलतात. लोकशाही आणि कम्युनिजम मधे काही मुलभूत फरक आहेत आणि त्याच्या परीणामाची उदाहरणे तुमच्याच लेखात आलेली आहेत की हो.

पण
>>>चीनी सरकारची देशहितासाठी कुठल्याही पातळीवर जाण्याची वृत्ती दिसून येते.
हे तर मानाल कि नाही.

मागे एकदा चीनच्या उत्पादनावर बंदी घाला अशी ओरड झाल्यावर निर्मला सीतारमण काय म्हणाल्या माहितेय का,
"WTO च्या नियमानुसार कोणत्याही देशावर ब्लॅंकेट बॅन नाही टाकता येत. त्यासाठी आम्ही अँटी डम्पिंग शुल्काचा पर्याय वापरू." इथे
हे नियम काय फक्त भारतासाठीच बनले आहेत काय.
मागे दक्षिण कोरिया ने scud क्षेपणास्त्रे स्वीकारल्यापासून आजपर्यंत चीन मध्ये दक्षिण कोरियाची उत्पादने बंद आहेत. कोरियन टीव्ही कार्यक्रम, चित्रपट, सौन्दर्य प्रसाधने या सर्वांवर बंदी आहे तिथे. एकदा मंगोलिया सोबत वाद झाल्यावर मंगोलियाचे सर्व ट्रक्स चीनने सीमेवर रोखले होते. तेव्हा कुठे गेले होते WTO चे नियम? बाकी आपला ट्रेड डेफिसिट कितीही वाढो, आम्हाला काही फरक पडत नाही.
सध्या आपल्या ऍलोपॅथी औषधांचा सर्व कच्चा माल चीन मधून येतो(अन तरीही भारतीय कंपन्या चीन मध्ये औषधे विकू शकत नाहीत हि गोष्ट वेगळी). हळू हळू कच्चा माल भारतात बनणारच नाही. समोर या गोष्टीचा वापर चीनने नियंत्रण रेषेला सरकवण्यासाठी केला तर काय करणार आहोत आपण?
आता मी जर तुम्हाला आयुर्वेद किंवा होमिओपथी वापर म्हटले तर मला वेड्यात काढाल तुम्ही.
>>>बाकी कम्युनिजम ला ढीगभर शिव्या घालणारे अशा बाबतीत चीनची तळी नेमकी उचलतात. लोकशाही आणि कम्युनिजम मधे काही मुलभूत फरक आहेत आणि त्याच्या परीणामाची उदाहरणे तुमच्याच लेखात आलेली आहेत की हो.
लोकशाही, स्वातंत्र्य जास्त महत्वाचे कि संरक्षणसिद्धता आणि जगात देशाची ओळख? समजा चीन साम्यवादी नसता किंवा त्याजागी अमेरिका असती तरी त्यांनी तेच केले असते. एक माणूस व्यासपीठावर तुमच्या देशाला शिव्या देतोय, देश तोडण्याची किंवा एखादा भाग स्वतन्त्र करण्याची भाषा बोलतोय, त्याचे तुम्ही काय कराल?
हाच फरक रिचर्ड गेयर आणि उमर खालिद, कन्हैया कुमार तसेच भारत आणि चीनमध्ये आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Jul 2017 - 12:47 am | डॉ सुहास म्हात्रे

चीन जगभरच्या सर्व प्रभावी लोकांवर आणि तथाकथित विचारवंतांवर "साम-दाम-दंड-भेद" चा प्रयोग करून आपल्याबद्दलचे आपल्याला सोईचे मत बनवण्याचा प्रयत्न करत असतो हे जगजाहीर आहे.

सांरा's picture

14 Jul 2017 - 12:39 pm | सांरा

हा लेख दैनिक तरुण भारतच्या अंकात प्रसिद्ध झालेला आहे. हे चुकून लिहायचे विसरलो. कृपया अॅडवा.

कपिलमुनी's picture

14 Jul 2017 - 8:30 pm | कपिलमुनी

(हा लेख दैनिक तरुण भारतच्या अंकात प्रसिद्ध झालेला आहे.)

तुम्ही तरुण भारत मध्ये लिहिला आहे की तिकडून कॉपी पेस्ट मारला आहे ?

सांरा's picture

15 Aug 2020 - 4:32 pm | सांरा

मीच लिहिलेला आहे. तरी सहसा एकदा लेख वर्तमानपत्रात प्रकाशित झाल्यावर राइट्स त्यान्च्या कडे जाते.

सौन्दर्य's picture

15 Jul 2017 - 10:16 am | सौन्दर्य

२००४ च्या आसपास भारतात अनेक चीनी प्रोडक्ट्स विकायला आले होते. त्यात कार्सचे टायर्स, पेंट्स, इलेक्ट्रिक बल्ब्स, सिरॅमिक्सच्या टाईल्स वगैरे प्रोडक्ट्स मोठ्या प्रमाणावर होते, पण त्याच्या क्वालिटीमुळे ते फारसे टिकाव धरू शकले नव्हते. त्यानंतर तर जवळजवळ प्रत्येक वस्तू चायनाची यायला लागली आणि लोकांनी ती उचलून घेतली. कदाचित त्या वस्तूंच्या स्वस्तते मुळे तसे घडले असेल.

इथे अमेरिकेत तर ह्याहून वाईट परिस्थिती आहे. अगदी पिन ते पियानो सर्व गोष्टी मेड इन चायनाच आहेत. मी काही वर्षांपूर्वी नायकॉनचा कॅमेरा घेतला तर तो मेड इन चायना, आय फोन मेड इन चायना, कोणत्याही वस्तूंवर लेबल पाहिलं तर ते मेड इन चायनाचेच दिसते.

तरी देखील हळूहळू लोकांना आपल्या देशाच्या उत्पन्नाना मान देण्याची गरज भासू लागली आहे. कित्येक लोकं आता 'मेड इन द युसए' चा आग्रह धरायला लागली आहेत.

सांरा's picture

15 Jul 2017 - 3:54 pm | सांरा

साठ च्या दशकात जपानने एक उसा नावाचे औद्योगिक गाव बसवले होते. अमेरिकेत पाठवल्या जाणाऱ्या वस्तूंवर मेड इन उसा, जपान असे लिहिलेले असायचे.

वाल्मिकी's picture

7 Sep 2017 - 3:02 am | वाल्मिकी

अप्रतिम माहिती

सांरा's picture

15 Aug 2020 - 4:36 pm | सांरा

फार काळानन्तर हॉटेलात आगमन केले आणि हा जुना लेख दिसला. २०२० मधे पण तिच स्थिति आहे गड्या.

ऍमेझॉन प्राईम वरील न्यू सिल्क रोड हा माहितीपट बघावा ,,,चीन कुठे आणि काय करताय याचा आढावा .. आहे त्यात , ग्वादार पासून ते इथिओपिया पर्यंत लाम्ब पाल्याचा डाव ...
त्यांना भारताशी पारंपरिक युद्ध करण्याची फारशी आवश्यकता नाही ,, आर्थिक युद्धात ते फार पुढे गेलेलं आहेत .. तरी पण सध्याच्या परिस्थितीत चीन ला पर्याय म्हणून भारताने उतपादन क्षेत्रात पुढे आले तर भारताचाच फायदा आहे , त्यामुळे अंतर्गत राजकारण सोडून याचा फायदा भारत घेईल तर भारताचेच भले ...