teen age बालक आणि त्यांचे पालक!!!

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in काथ्याकूट
12 Jul 2017 - 6:08 pm
गाभा: 

teen age बालक आणि त्यांचे पालक!!!

"chill मॉम! उग्गाच चिडू नकोस. किती वेळा आवरायला सांगशील?"
"अग किती सारखा पसारा करतेस. मग नको सांगू आवरायला?"
"आई, परत होणारच आहे न माझा पसारा?"
"हो! करशीलच परत दोन दिवसात."
"अग, मग आवरून ठेवूच कशाला? तूच म्हणतेस ना वेळ वाया घालवू नये! मग जर मी परत पसारा करणार आहे तर आवरू कशाला?"
"कमाल आहे ह तुझी!" (नवऱ्याकडे वळून) "अरे तू तरी बोल काहीतरी."
"हे काय ग सानु? आई आवर म्हणते आहे तर आवर की एकदा." वडिलांच नरो वा कुंजरो वा!
"अहो बाबा.... पण माझा मुद्दा बरोबर आहे न? परत पसारा होणारच आहे तर का आवरू मी? तुम्हाला पण पटत आहे. उगाच आई म्हणाली म्हणून तुम्ही मला रागावू नका."
"अशक्य आहेस अगदी. जिभेला हाड नाही तुझ्या. आम्ही नव्हतो अस बोलत आमच्या आई-वडिलांशी." आईचं काहीसं मुलीच्या दिशेने आणि काहीसं स्वगत. नवरा मुलीला रागावत नाही याचा देखील थोडा राग मनात.
साधारण चौदा-पंधरा वर्षाची मुलं असणाऱ्या सगळ्याच सुखवस्तू घरातून अशाच प्रकारचे संवाद आपण ऐकत असतो. पण याचा अर्थ ही मुलं उद्धट असतात का? त्यांना त्यांच्या आईवडिलांची किंमत नसते का? मला नाही तसं वाटत.
एकतर अलीकडे आपण पालकच मुलांशी खूप मोकळेपणाने बोलतो-वागतो. त्यामुळे आपण सांगत असलेलं एखाद काम 'नाही करणार' अस बिंदिक्तपणे सांगताना ही मुलं विचारसुद्धा करत नाहीत. त्यात आपण पालक आपल्याला जे मिळालं नाही ते सगळ आपल्या मुलांना मिळावं म्हणून धडपडत असतो; त्याशिवाय जे आपण देऊ शकतो ते तर देतोच. ही सवय त्यांना लहानपणापासूनच लागलेली असते. मग मुलं मोठी व्हायला लागतात आणि आपल्याला वाटत त्यांना आपण शिस्त लावली पाहिजे. त्यामुळे क्वचित कधी जर म्हंटल,"हे काम कर तर ते देईन." तर ते मुलांना मान्य होत नाही. कारण मुळात आपण त्यांच्या मनाची घडण तशी केलेलीच नसते. तोपर्यंत teen age मध्ये आलेल्या या मुलांना प्रत्येक गोष्ट त्यांचा अधिकार वाटायला लागलेला असतो.

पण आपण त्यांना शिस्त लावायचीच नाही का? 'आम्ही नव्हतो अशी उत्तरं देत.... किंवा बोलत आमच्यापेक्षा मोठ्या माणसांशी.' अस त्यांना ऐकावाण्यापेक्षा मुळात लहानपणी केलेल्या दोस्तीचा... मोकळेपणी बोलतो-वागतो त्याचा आपणच योग्य वापर करून काही गोष्टी मुलांना कमी शब्दात आणि कमी वेळात सांगितल्या तर नात्यात असणाऱ्या मोकळेपणामुळे ही मुलं आपलं म्हणण समजून घेतील अस मला वाटत.

माझा विश्वास आहे की त्याक्षणी जरी ही मुलं आपलं बोलण म्हणजे लेक्चर म्हणत असली आणि दुर्लक्ष करत असली तरी त्यांची संस्कारक्षम मनं आपण सांगितलेले मुद्दे नक्की मनात साठवत असतील. आणि कधी ना कधी त्यांना या जगात स्वतःच्या पायावर उभं रहायचंच आहे... त्यावेळी हेच आपले बोल ती आठवतील.

नात्यात येणाऱ्या कडवटपणाला टाळून कदाचित् आपणच समजावायची आणि त्यांना समजून घ्यायची नवीन वाट शोधायला हवी.

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

12 Jul 2017 - 6:19 pm | पद्मावति

मस्तं लिहिलंय. रीलेट करू शकतेय :)
माझा विश्वास आहे की त्याक्षणी जरी ही मुलं आपलं बोलण म्हणजे लेक्चर म्हणत असली आणि दुर्लक्ष करत असली तरी त्यांची संस्कारक्षम मनं आपण सांगितलेले मुद्दे नक्की मनात साठवत असतील. आणि कधी ना कधी त्यांना या जगात स्वतःच्या पायावर उभं रहायचंच आहे... त्यावेळी हेच आपले बोल ती आठवतील. +१ नक्कीच.

दशानन's picture

12 Jul 2017 - 9:54 pm | दशानन

महत्त्वाचा विषय आहे हा.

चष्मेबद्दूर's picture

13 Jul 2017 - 9:55 pm | चष्मेबद्दूर

हे असं वागणं नंतरही चालू रहातंच. त्या वेळचे प्रॉब्लेम अजून च वेगळे आणि आधी च्या वागणूकीत भर घालणारे. घरापासून दूर शिक्षणासाठी रहायला लागल्यावर त्यांना आपल्या(पालकांच्या) वागण्याची आठवण मनात येत असते आणि वेळ आली की ही मुलं त्याचा योग्य प्रकारे वापर करतात. त्या मुळे आपणमुलांना शिस्त बिस्त लावायच्या भानगडीत न पडता स्वतः च्या वागणूकीचा आदर्श त्यांच्या समोर ठेऊ शकतो.

टीकोजीराव's picture

15 Jul 2017 - 2:16 pm | टीकोजीराव

मुलांना शिस्त ही आयत्या वेळेस लागत नाही, त्यासाठी ३-४ वर्षां पासून त्याची सवय लावायला लागते. आपल्या वागण्या बोल्यांतून मुले ही शिकतच असतात.

मुले ही मातीच्या गोळ्याप्रमाणे असतात, त्याला जसा आकार देऊ तशी मूर्ती त्यातून घडते. यासाठी मुलांंना घडवण्यात पालकांसह समाजाचाही फार मोठा वाटा असतो. समाजातील प्रतिभावंत लोकांचा मनावर प्रभाव पडत असतो, तसाच गैरकृत्ये करणार्यांसचाही पडत असतो. काही पालक लहानपणापासूनच मुलांना इतक्या सोयीसुविधा आणि चैनीच्या वस्तू उपलब्ध करून देतात की, मुलांना त्याची सवय होऊन ती मूलभूत आवश्यकता होऊन बसते. मग एखाद्या वेळीस समजा ही अनावश्यक गरज भागवली गेली नाही किंवा पालकांनी काही बंधने घातली, तर पालक आपल्यावर अन्याय करत आहेत, असे मुलांना वाटते. पालकांविषयी मुलांच्या मनात द्वेषभावना निर्माण होते.

या सर्व घटनांना आळा घालण्यासाठी मुलांवर लहानपणापासूनच सुसंस्कार करणे हा एकमेव पर्याय आहे. मुलांना आवश्यक त्या, तसेच माफक किमतीच्या वस्तूच द्यायला हव्यात. त्या वस्तूंची मुलांच्या जीवनात खरोखरच आवश्यकता आहे का, ते पहायला हवे. तसे नसेल, तर ती कशी नाही, हे त्यांना समजावून सांगायला हवे. त्यांचे लक्ष चंगळवादी गोष्टींतून कमी होण्यासाठी त्यांच्या जीवनाला आणि मनाला संयमित जीवनाची शिस्त लावणे आवश्यक आहे. त्यासाठीच पाल्यांपुढे त्यांचे ध्येय सातत्याने ठेवायला हवे.

मुलाला शाळेत घातले म्हणजे त्याने अभ्यासात आघाडीवरच असले पाहिजे, असा पालकांचा आग्रह असतो. माझ्या मुलाने अभ्यासासह खेळातही अव्वल असले पाहिजे. त्याला एखादी कला आली पाहिजे. पालकांच्या अपेक्षांचे ओझे संपत नाही. ते पेलतांना मुलांची चांगलीच तारांबळ उडते. आपले मूल वर्गात इतर मुलांच्या तुलनेतच मागे पडते, असे लक्षात आल्यावर पालकांना धक्का बसतो. मग प्रश्न पडतो ‘आम्ही दोघे तर किती हुशार आहोत. मग आमचा मुलगा मठ्ठ कसा असेल ? साध्या साध्या प्रश्नांबची उत्तरे देणे त्याला का जमत नाही ?’ यावर ‘हा सगळा त्याचा हट्टीपणा असेल. नक्कीच शाळेत न जाण्याची कारण शोधतोय तो !’, अशा संवादांच्या फैरी झडू लागतात.

ज्योति अळवणी's picture

16 Jul 2017 - 1:20 am | ज्योति अळवणी

मुळात बाळाला जन्म दिला म्हणजे आपण आई-वडील झालो अस नसून; जन्मलेल्या बाळाला आयुष्य जगण्यासाठी सक्षम करणं म्हणजे आई-वडील होणं असत. आपली मुलं ही आपली जवाबदारी असते. पण अनेकदा पालक म्हणून आपण त्यांच्या आयुष्यावर आपला हक्क समजतो. त्यामुळे अनेकदा teen age मधल्या मुलांचे आणि पालकांचे खटके उडतात. अर्थात आयुष्याचा अनुभव पालकांना असल्याने जास्त समजूतदारपणा त्यांनी दाखवणे अपेक्षित असते. दोन पिढ्यांमध्ये वाद होणे अगदी स्वाभाविक आहे. पण विचारांमधल्या तफावतीमुळे वाद झाला तर कदाचित वाद मिटू शकतो. जर हाच वाद इगोमुळे झाला तर मात्र नात्यात दरी पडू शकते.

Teen age हे वयच handle with care असतं. हे ज्यांना समजत त्या घरातली मुलं आणि पालक यांचं नातं वाढत्या वयात जास्त घट्ट होत.

हे ज्यांना समजत त्या घरातली मुलं आणि पालक यांचं नातं वाढत्या वयात जास्त घट्ट होत.

पर्फेक्ट...