अध्यात्मिक आणि संतसाहित्यातील नाममुद्रा

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
19 May 2017 - 8:25 am
गाभा: 

बर्‍याच संत आणि अध्यातिम्क साहित्यात जसे कि अभंग आरत्या इत्यादी मध्ये संत कवि आपल्या स्वतःच्या अथवा आपल्या गुरुच्या इत्यादी नावांचा उल्लेख विशीष्ट पद्धतीने करुन ठेवतात त्यास नाममुद्रा असे म्हणतात. जसे समर्थ रामदासांच्या काव्यात 'दास रामाचा', संत एकनाथांच्या काव्यात 'एका जनार्दनी' , 'नामा म्हणे', तुका म्हणे अशा नाममुद्रा दिसतात.

'रामीरामदास' हे वस्तुतः संत रामदासांचे थोरले बंधु असावेत तर नामदेवांच्या साहित्यात नामाम्हणे सोबत इतर संतांच्या तत्दृष्य मुद्रा दिसतात कि जी बहुधा इतर संतांच्या साहित्याची सरमिसळ असावी जसे की 'विषुदास नामा' हे १६ व्या शतकात होऊन गेलेले कवि असावेत. 'विषुदास नामा' यांच्या लेखनाची ओळख करुन देणारा स्वतंत्र धागा लेखही लिहिण्याची इच्छा आहे.

काही मुद्रा एकसारख्या वाटल्या तरी वेगळ्याच संतांच्या असू शकतात आणि हे बर्‍याचदा माहित नसल्यामुळे एका संतांचे साहित्य दुसर्‍या संताच्या नावावर नोंदवले जाण्याचे आणि प्रक्षिप्त साहित्य जोडले जाऊन गोंधळाची परिस्थिती बर्‍याचदा निर्माण होताना दिसते. यात कुठेतरी वाचल्याचे आठवते की नव्या आरत्या अभंग इत्यादी नवोन्मेषीत मुले अथवा तरुणांकडून रचल्या जात असताना पुरेशी सिद्धी(कि प्रसिद्धी ?) प्राप्त होई पर्यंत स्वरचीत आरत्या अभंगात स्वतःची नाममुद्रा गुंफण्याची परवानगी घरातील थोरामोठ्यांकडून मिळत नसे. त्यामुळेही विवीध कारणांनी इतर नाममुद्रा वापरुन रचना केल्या जात कि ज्यामुळे गोंधळात भर पडू शकते.

असा गोंधळ दुर करण्यासाठी संत साहित्याच्या अभ्यासकांकडून अलिकडे संशोधनही होत आले असावे तथापी अशा नाममुद्रांबद्दल स्वतंत्र ज्ञानकोशीय लेख अथवा कोशीय यादी अशी पहाण्यात आलेली नाही.

या धागाचर्चेच्या माध्यमातून संतांचे नाव आणि नाममुद्रांचे संकलन करणे आणि कोणती नाममुद्रा कोणत्या संताची याबद्दलचे समज-गैरसमज यांची चर्चा व्हावी असा उद्देश आहे. ह्या निमीत्ताने सहसा कमी परिचीत असलेल्या संतांची संक्षीप्त ओळख माहिती असलेल्यांनी करुन देण्यास हरकत नसावी.

* ह्या धागाचर्चेतील माहितीपूर्ण प्रतिसाद विकिप्रकल्पातून वापरला जाण्याची शक्यताही असू शकते म्हणून आपले ह्या धागाचर्चेतील प्रतिसाद प्रताधिकारमुक्त समजले जातील.
* अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे टाळण्यासाठी आणि चर्चा सहभागासाठी आभार.

प्रतिक्रिया

दीपक११७७'s picture

20 May 2017 - 6:26 pm | दीपक११७७

छान धागा

सतिश गावडे's picture

20 May 2017 - 8:02 pm | सतिश गावडे

हेच म्हणतो.

'रामीरामदास' हे वस्तुतः संत रामदासांचे थोरले बंधु असावेत

हे प्रथमच ऐकतो आहे. काय आधार आहे या थियरीला?

त्यांच्या भावाचे नाव गंगाधर स्वामी असल्याचे वाचलेय. तरी इथे म्हटल्याप्रमाणे मोठ्या भावाचे नाव असूही शकेल.

रामी रामदासा हे अनेक आरत्या-श्लोकांमधे ऐकल्याने त्यांच्या स्वतःबद्दलच म्हटले असे वाटत असे. विटेकर बुवा अजून बरोबर सांगू शकतील.

मला वाटते विकासपिडीयातील लेखन मराठी विश्वकोशातून घेतले गेले असण्याची शक्यता आहे. मराठी विश्वकोशातील 'रामदास' या विषयावरच्या लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी लिहिलेल्या नोंदीत "....रामदासांचे वडील बंधू गंगाधर ‘श्रेष्ठ’ आणि ‘रामी रामदास’ ह्या नावांनीही ओळखले जातात...." अशी नोंद आहे.

लक्ष्मणशास्त्री जोशींनी लेखाच्या शेवटी, वि.का. राजवाडे, न.र. फाटक, शं.दा. पेंडसे, शं.श्री देव, स ख. आळतेकर, के एस. ठाकरे, ड्ब्ल्यू एस डेनींग यांच्या संदर्भ ग्रंथांची नोंद केली आहे पण उपरोक्त संदर्भ नेमका कोणत्या ग्रंथातून घेतला गेला याचा बोध होत नाही. जाणकरांनी या विषयावर अधिक प्रकाश टाकल्यास उत्तमच.

प्रचेतस's picture

20 May 2017 - 10:03 pm | प्रचेतस

रामी रामदास म्हणजे स्वतः समर्थच.
त्यांच्या थोरल्या बंधूंचे नाव गंगाधरपंत होते.

माहितगार's picture

21 May 2017 - 10:58 am | माहितगार

कौस्तुभ कस्तुरे यांचा एक ब्लॉग वाचनात आला. समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज : भाग १ मध्ये "परंतू वडिल बंधू गंगाधरपंत हेदेखिल आध्यात्मिक विचारांचे असल्याने त्याचा प्रभाव साहजिकच नारायणपंतांच्या स्वभावावरही पडला. " असा एक उल्लेख आहे. भाग २ मध्ये त्यांनी "चाफळकर रामदासींची कैफियत" असा कोणतासा दस्तएवज उधृत केला आहे. त्यात खालील परिच्छेदाचा समावेश आहे.

.....पूर्वी कसबे जांब, परगणे आंबड, ईलाखा मोंगलाई, येथील कुळकर्णी सूर्याजी त्रिंबक आडनाव ठोसर म्हणून असून त्यांनी श्री सूर्यनारायणाची आराधना केली. त्याजवरून त्यांजला श्री सूर्यनारायण यांनी प्रत्यक्ष दर्शन देऊन, मनुष्यदेशाने मी एक, व दुसरे मारुती याप्रमाणे तुझे पोटी जन्मास येऊ म्हणून वरप्रदान दिल्हे. पुढे सूर्यनारायणाचे अंशे करून गंगाधर उर्फ रामी रामदास एक व दुसरे मारुतीचे अंशेकरून नारायण उर्फ रामदासस्वामी म्हणून दोन पुत्र झाले. त्यापैकी वडिल पुत्र गंगाधरबावा उर्फ रामीरामदास हे कसबे जांब येथील संस्थानी तसेच राहिले व दुसरे नारायणबावा उर्फ रामदासस्वामी हे महान पराक्रमी सत्पुरुष होते.....
संदर्भ

कौस्तुभ कस्तुरेंच्या ब्लॉगवरील हे मोडी दस्तएवज चित्र मला वाचता अथवा पडताळता आलेले नाही.

जाणकारांनी या विषयावर अधिक प्रकाश टाकल्यास छान होईल.

माहितगार's picture

21 May 2017 - 1:05 pm | माहितगार

ट्रांन्सलिटरल डॉट ऑर्ग (पुर्वाश्रमीचे खाप्रे डॉट ऑर्ग) वर दाते, कर्वे | महाराष्ट्र शब्दकोशाची 'श्रेष्ठ' शब्दाची नोंद आहे ती खालील प्रमाणे


पु. समर्थ रामदास यांचें वडील बंधु रामीरामदास गंगाधर स्वामी .....

उपरोक्त संदर्भ दाते, कर्वेंनी कुठून घेतला आहे त्याची कल्पना नाही.

माहितगार's picture

21 May 2017 - 2:39 pm | माहितगार

समर्थ रामदासांचे वडील बंधु रामीरामदास गंगाधर स्वामी म्हणजे 'रामीरामदास' असे काही संदर्भ उधृत केले आहेत, मला व्यक्तिशः रामीरामदासांची भाषेची शैली/ ढब समर्थ रामदासांपेक्षा प्रथमदर्शनी वेगळी वाटते.

तरीही एका (राजस्थानी शैली?) च्या हिंदी भारुडात भीमा नदीचा उल्लेख येतो आहे तसेच कासाई देवीचा संदर्भ येताना दिसतो आहे जी बहुधा सातार्‍या जवळच्या कास गावाची ग्रामदेवता असावी. जर समर्थ रामदासांचे ज्येष्ठ बंधु पश्चिम महाराष्ट्रात आले नसतील तर त्यांच्या काव्यात हे दोन संदर्भ येणे कठीण असावयास हवे होते असे वाटते. (चुभूदेघे)

पैसा's picture

21 May 2017 - 10:00 pm | पैसा

अजून माहिती वाचायला आवडेल. नामदेव आणि विष्णुदास नामा हे दोन वेगवेगळे. यांच्याशी नामसाधर्म्य असलेला कृष्णदास शामा हा गद्य लेखक सोळाव्या शतकात होउन गेला. त्याच्या नावावर भागवताच्या दशम स्कंधावरील टीका आणि अन्य काही कोंकणी व मराठी लिखाण आहे.

माहितगार's picture

22 May 2017 - 7:46 am | माहितगार

प्रतिसादासाठी धन्यवाद. विकिस्रोतावरील गोवा विद्यापीठाच्या कोकणी विश्वकोशात विष्णुदास नामा बद्दल नोंद आहे. त्यात कृष्णदास नामा असा उल्लेख येतो आहे आपण म्हणत असलेले कृष्णदास शामा हे कृष्णदास नामा पेक्षा वेगळे आहेत की तेच आहेत.

एक मराठी संतकवी.हाचेविशीं विद्वानांमदीं बरेच मतभेद आसात.तो महानुभाव आसुंये,अशें य.खु.देशपांडे सुचयतात तर ज.र. आजगांवकार तो नामा पाठक आसुंये आसो तर्क करतात.वि.ल.भावे तो एकनाथाच्या काळांतलो वा मात्सो पयलींचो दुसरो नामदेव आसुंये अशें म्हण्टात.तर गो.का.चांदोरकार विष्णुदास नामा आनी नामा कृष्णदास हे दोगय एकच अशें म्हण्टात.ल.रा.पांगारकर ताका एकनाथाचे मुस्तींतलो शिंपी विठ्ठलभक्त मानतात.डॉ.सरोजिनी शेंडेन विष्णुदास नामा आनी ताचें साहित्य हांचेर एक संशोधनात्मक प्रबंध बरयला.तातूंत तिणें विष्णुदास नामा खंयच्या एका खाशेल्या संप्रदायाचो वा परंपरेचो अनुयायी दिसना अशें म्हळां.तो ब्ह्मण आसुंयें आनी ताचो काळ शके १५०२(इ.स.१५८०) ते १५५१(इ.स. १६३३) मेरेन आसुंये.तो आनी संत नामदेव हे वेगवेगळे. ताच्या महाभारताचीं कांय पर्वां जरी महानुभावांच्या सांकेतिक लिपींत बरयल्ली आसलीं तरीय तो महानुभाव आशिल्लो धशें म्हणपाक कसलोच पुरावो ना.

श्री बा.द.सातोस्कर हाणें आपल्या गोमंतकीय मराठी साहित्याचे शिल्पकार-खंड १ ह्या ग्रंथांत मात्शी वेगळी माहिती दिल्या.प्रा.अ.भा.प्रियोळकार आनी डॉ.पांडुरंग पिसुलेंकर ह्या विद्वान संशोधकांचो संदर्भ दिवन श्री सातोस्कर सांगता, विष्णुदास नामा नांवाचो संत कवी सोळाव्या शेंकड्यांन गोयांत जावन गेलो.पुर्तुगिजांनी जप्त करून गोंयांतल्यान बागाक व्हेल्ल्या साहित्यांत, ह्या नामाच्या नांवार जायतें धर्मीक साहित्य मेळ्ळां.पूण महाराष्ट्रीय विष्णुदास नामा आनी गोंयकार विष्णुदास नामा ह्यो दोन वेगळ्यो व्यक्ती आसपाची शक्यताय चड दिसता.
.....
कोकणी विश्वकोशात विष्णुदास नामा बद्दल नोंद

खरेतर या दोन्ही परिच्छेदाच्या मराठी अनुवादात आपली मदत हवी आहे. खास करुन "गोंयांतल्यान बागाक व्हेल्ल्या साहित्यांत" आणि "वेगळ्यो व्यक्ती आसपाची शक्यताय चड दिसता" याचा नेमका अर्थ काय होतो हे माहित करुन हवे आहे.

पैसा's picture

23 May 2017 - 5:19 pm | पैसा

बाकी रूपांतर नंतर देते.
"गोंयांतल्यान बागाक व्हेल्ल्या साहित्यांत" म्हणजे गोव्यातून बागाला (पोर्तुगालमधे) नेलेल्या साहित्यात.
"वेगळ्यो व्यक्ती आसपाची शक्यताय चड दिसता" म्हणजे वेगळ्या व्यक्ती असण्याची शक्यता जास्त वाटते.

विष्णुदास नामा आणि कृष्णदास शामा यांच्यात गोंधळ व्हायचे खरे तर कारण नाही. कृष्णदास शामाबद्दल माहिती लिखित सापडते. तो गोव्यात नक्कीच होउन गेला. पणजीच्या शासकीय ग्रंथालयाला त्याचे नाव दिले गेले आहे. विष्णुदास नामा गोव्यात असल्याचे म्हणणे मी पहिल्यांदाच इथे वाचत आहे. ज्ञानेश्वरी कोंकणीत आहे असा जो दावा केला जातो तशाच स्वरूपाचे हे विधान वाटते.

कृष्णदास शामा आणि विष्णुदास नामा यांच्या भाषेत प्रचंड फरक आहे. कृष्णदस शामाने गद्य लिहिले आहे. (त्याचा नमुना मी फेसबुकवर शेअर केला होता. सापडला तर इथेही देते.) तर विष्णुदास नाम्याने मराठी पद्य.

1

या लिखाणावर २५ एप्रिल १५२६ तारीख आहे.

तर विष्णुदास नाम्याचा काळ १५८० ते १६३३ असा दिला आहे. तेव्हा दोघात गोंधळ व्हायचे कारण नाही.

माहितगार's picture

24 May 2017 - 9:51 am | माहितगार

विष्णुदास नामा गोव्यात असल्याचे म्हणणे मी पहिल्यांदाच इथे वाचत आहे.

प्रा.अ.भा.प्रियोळकार आनी डॉ.पांडुरंग पिसुलेंकर तसे नेमके का म्हणतात हे तपासावयास हवे असे वाटते.

विष्णुदास नामा आणि कृष्णदास शामा यात माझाच गोंधळ झाला असे दिसते.

विष्णुदास नाम्याच्या अभंगांबद्दल मिपावर या पुर्वी अल्प लिखाण होऊन गेल्याचे दिसते आहे

अनुवाद उपलब्धतेसाठी आणि माहितीपूर्ण प्रतिसादासाठी धन्यवाद

अरूण गंगाधर कोर्डे's picture

23 May 2017 - 4:22 pm | अरूण गंगाधर कोर्डे

लेख चांगला आहे. नाममुद्रा हा प्रकार माहित नव्हता. तुमच्यामुळे कळले. आभारी आहे.

माहितगार's picture

24 May 2017 - 10:11 am | माहितगार

संस्कृतभाषेतील पौराणिक साहित्यात नाममुद्रां होत्या का ? संस्कृत आणि हिंदी साहित्यात नाममुद्रा शब्दास काही वेगळी संज्ञा आहेत का ? एका भाषेतून दुसर्‍या भाषेत म्हणजे संस्कृतातून अनुवाद होताना अनुवादकाने स्वतःची नाममुद्रा न जोडता मुळग्रंथातील नाममुद्रा तशीच ठेवली अशा काही शक्यता असू शकतात का