पेरणी...झाडांची!

Primary tabs

इरसाल कार्टं's picture
इरसाल कार्टं in काथ्याकूट
14 May 2017 - 4:29 pm
गाभा: 

होय, पेरणीबद्दलच बोलतोय मी. पण झाडांच्या.
कसंय ना, आता पावसाळा आला म्हणजे सगळेजण झाडे लावा झाडे लावा म्हणत बोंबलातील. मोठेमोठे बॅनरही लागतील ज्यात नेते मंडळी झाडांपेक्षा मोठी भासतील. पण दरवर्षी 'लावलेल्या' या झाडांचे पुढे काय होते? बऱ्याचदा वृक्षारोपण करायला म्हणून जी झाडे वाटली जातात त्यात आपल्या आसपास वाढणारी(म्हणजे ज्यांची आपण काळजी घेतो आणि वाढवतो) अशी झाडे वाटली किंवा लावली जातात. हि झाडे शाळा परिसर/ गावाच्या परिसरात लावली तरीही त्यांची काळजी घेतलीच जाईल याची शाश्वती नसते आणि ती सुकून/मरून जातात. आणि पुन्हा पुढल्या वर्षी येरे माझ्या मागल्या म्हणत जुन्याच झाडांच्या जागी नवी झाडे लावली जातात सुकून जाण्यासाठी.
या समस्येवर मी तीन चार वर्षे विचार करतोय पण काय करावे हे कळत नव्हते, अडचण एकच होती कि पावसाळा संपल्यानंतर झाडांची काळजी कशी घ्यावी? त्यातही इकडे ग्रामीण भागात आणखी समस्या असतात, शेळ्या, बकऱ्या आणि गुरं या रोपांना खाऊन टाकतात, कधी शेतांच्या बांधांवर लागलेल्या आगीत हि रोपं सुकून जातात तर कधी वणव्यांनी. आपण घराभोवती लावतो ती नेहमीची झाडे इथे कुचकामी ठरतात हे कळून चुकले होते. आणखी एक समस्या होती ती वहातुकीची. पिशवीत रुजवलेली रोपं जास्त दूरवर नेणे शक्य होत नाही पावसाळ्यात. जर तुम्हाला ती डोंगर पायथ्याशी किंवा माळरानावर लावायची असतील, किंवा आपल्या जिव्हाळ्याच्या गड किल्यांवर तर लावायची असतील ते खूपच कठीण होते. याला पर्यायी मार्ग शोधण्याची गरज होती आणि या वर्षी फक्त विचार न करता काहीतरी कृती करायचे ठरवलेच. अपयश आले तरी बेहत्तर पण प्रयत्न करायचेच असे ठरवले आणि सगळ्यात आधी खालील मुद्यांचा विचार केला:
१) झाडे लावायची कशी? खासकरून दुर्गम भागात.
२) कुठल्या प्रकारची झाडे निवडायची?
३) जास्तीत जास्त झाडे लावण्यासाठी काय करावे?

स्वात:च शोधून काढलेली उत्तरे:
१) झाडे लावायची नाहीतच, ती पेरायची.
झाडांची रोपे रुजवणे म्हणजे वीची मर्यादा आडवी येते, ती पावसाळ्याच्या सुरुवातीलाच लावायला हवीत. जेणेकरून किमान दिवाळीपर्यंत जमिनीतला ओलावा मिळून ती जास्तीत जास्त वाढतील आणि तग धरू शकतील. पण पावसाळ्यात रानवाटा तेवढ्या चांगल्या स्थितीत राहात नाहीत आणि प्रतिव्यक्ती जास्त झाडे नेणेही शक्य नाही. म्हणून झाडे लावायची नाहीत, पेरायची. जेणेकरून प्रतिमानशी जास्त झाडे नेता येतील. म्हणजे आपण झाडांच्या बियांना फक्त पसरण्यास मदत करायची, बाकी ती त्यांच्या नैसर्गिक इच्छाशक्तीवर वाढतील. याचा आणखी एक फायदा, वर्षभरात कधीही ट्रेकला गेलो तरी हि पेरणी करता येईल, बिया पावसाळ्यात रुजतील.

२) निवडायची झाडे अशी हवीत:
रानोमाळी जगू शकतील अशी रानटी.
कमी पाण्यावरही जगातील अशी.
शक्यतो मूळची भारतीय असलेली.
वेगाने वाढणारी.
बियांच्या स्वरूपात रुजवता येणारी.

आणि मग भराभर मागच्या दोन तीन वर्षातील जाणीवपूर्वक केलेली निरीक्षणे नोंद केली, झटक्यात एक छोटीशी यादी तयारही झाली.
ती यादी पुढीलप्रमाणे:
१)कडुनिंब:
थंड सावलीची अनुभूती देणारे हे झाड मी सौराष्ट्राच्या रखरखीत उन्हात बाभळीच्या जोडीला पाहिलेय मागच्या दोन वर्षांत जामनगर-द्वारकेला दिलेल्या वारंवार भेटींमध्ये. जामनगर सोडले तर ओसाड जमिनींवर मला निवडुंग, बाभळी आणि नंतर कडुनिम्बच जास्त दिसले. माझ्या धावण्याच्या सरावादरम्यानही टेकडीवर कित्येक कडुनिंबाची खोडे दिसली, वारंवार तोडली जाऊनही हार ना मानणारी. त्यामुळे याला पहिले स्थान.
२) करंज:
दाट पानांनी जवळजवळ वर्षभर हा रुक्ष हिरवागार असतो. कुठल्याही देखभालीची गरज अर्थातच नाही, याच्या बियाही सहज मिळतात रानात. बऱ्याचदा रस्त्याच्या कडेलाही, त्यामुळे हाही आला यादीमध्ये.
३) बहावा:
दुर्दम्य इच्छाशक्ती दर्शवणारं हे अजून एक झाड. मला भावतं ते याच्या सोनेरी फुलांमुळे. एप्रिल मे महिन्याच्या गर्मीत पिवळ्या धमक फुलांची झुंबरं लेऊन हा वृक्ष असा डोलत असतो कि ऊन्हानेही गुडघे टेकवत. याच्या शेंगाही मोठ्याप्रमाणावर मिळतील म्हणून मी याच्या पेरणीचा विचार मागच्या वर्षीच पक्का केला. मी आणि बायकोने मागच्याच वर्षी वज्रेश्वरी मंदिराच्या वरच्या टेकडीवर याच्या भरपूर बिया पेरल्याही होत्या.
४)गुलमोहर
अवाढव्य आकार आणि कमीत कमी निगराणी ची गरज. याचेही स्थान आढळच. आणि याच्या बहराचा महिमा तो काय वर्णावा.
५)उंबर, वड, पिंपळ
डेरेदार आणि आपल्या खोडाच्या ढोलीमध्ये अनेक पक्षांना आसरा देणारे हे वृक्ष कुठेही उगवतात. मेख एवढीच कि बिया म्हणून यांची अख्खी फळेच गोळा करावी लागणार.
६) चिंच
नाव घेताच आठवतो तो डेरेदार वृक्ष आणि बालपण. याच्याबद्दल काही लिहायची गरज नाहीच म्हणा. महत्वाचं म्हणजे चिंचोके दुकानातही सहज मिळून जातील.
७) आपटा
दसऱ्याच्या दिवशी याच्या पानांचे महत्व आपल्याला माहित आहेच. हाही रानोमाळी सहज वाढतो. पण याच्या बिया नवरात्रीनंतर मिळतील.

आता मी ज्यांना स्थानिक नावांनी ओळखतो ते वृक्ष.
८) शिंद
मुळात हा खजूराचाच प्रकार, पण कमी गर असलेली आणि काहीशी तुरट लागणारी फळे येतात. पण कुठेही वाढतो म्हणून याला यादीत स्थान, पण काहीसं दुय्यम.
9)शेलटु
याला प्रमाण भाषेत काय म्हणतात माहित नाही पण पसरट गोलाकार पाने, खेळायच्या गोट्यांच्या आकाराची, आत अत्यंत चिकट द्रव्य असणारी काहीशी गोड फळे असतात याची. वाढेल कुठेही.
१०) हुंब
या फळाची फक्त दोन झाडे आतापर्यं मी पहिली आहेत, तीही मावशीच्या गावी. बऱ्याचदा सरळसोट वाढतो आणि बऱ्यापैकी गोड आणि फळाच्या आतमध्ये लाल द्रव असतो . याच्या दुर्मिळ बिया मिळवण्याचे काम खास मावसभावाला द्यावे लागेल.
११) बिबोटी
म्हणजेच बिबवे, हेही रानात जोमाने वाढतात, बिया(बिबवे) मिळणे तेवढं मुश्किल झालंय हल्ली.

या यादीमध्ये खास दोन फळझाडे आहेतच, आपल्या सगळ्यांच्या आवडीची: करवंदं आणि जांभळं, यांच्या बिया तर जमवल्याही मित्राने.
मीही आज सायकलिंग करताना आडवाटेला जात रस्त्यालगत असलेले उंबर, करंज, बहावा हेरून ठेवले आजच. एक दोन दिवसात पिशवी घेऊन भरून आणीन.

जास्तीत जास्त झाडे लावण्यासाठी काय करता येईल या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे, वर्षभर आपण प्रवास, ट्रेक करतोच. हल्ली मी सायकलनेही रानवाटांना फिरायला लागलोय. कुठेही जाताना प्रत्येक झाडाच्या थोड्या थोड्या इया घेऊन जायच्या, वाटलं तिथे पेरायचा. निवडलेली सगळीच झाडे रानात वाढतील अशीच आहेत. जेवढी जगली-वाढली तेवढी वाढली, आपले प्रयत्न का सोडा. आणि महत्वाचे म्हणजे जांभळं, करवंदे तर आपण घरी खातो तेव्हा त्यांच्या बिया जपणे सहज शक्य आहे. या झाडांपासून फक्त फळेच नाही तर सावली, फुलांतील मध, लाकडं आणि काहीच नाही तरी किमान शुद्ध हवा तरी मिळेलच. त्यात पुन्हा विशेष काळजीची हमी ना घेता केलेल्या वृक्षारोपणाच्या मानाने हि झाडे जगण्याची शक्यताही जवळ जवळ तेवढीच असेल असे मला तरी वाटते. याउलट बिया कमी जागेत आणि कमी वजनात जास्त प्रमाणात पसरवता येतील.
पारंपरिक पद्धतीने झाडांच्या बियांना पसरवणारे पक्षी प्राणी आपल्यामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आले त्यामुळे आपल्या स्वात:साठी तरी ही जबाबदारी आपल्याला उचलावी लागणारच ना?
बऱ्याचदा ट्रेकिंग करताना उघडे बोडके भकास डोंगर बघताना काळजात चर्रर्र होते, अपराधीपणा वाटतो तो थोडातरी कमी होईल.

आता तुम्हाला आधीच असलेल्या माहितीची उजळणी करण्याचे कारण हे की तुम्हाला माहित असलेल्या इतर झाडांचा या यादीत समावेश व्हावा तसेच कोणाच्या मनात इतर काही आयड्याच्या कल्पना असतील तर त्याही कळाव्यात. आपल्यापैकी कोणी असा प्रकल्प राबवला असेल तर अनुभवांचे स्वागतच आहे आणि सूचनांचेही.

प्रतिक्रिया

झाडांच्या बिया अशाच न फेकता किंवा पेरता चिखलाच्या गोळे करून त्यात रोवून फेकल्यास पाऊस पडल्यावर त्या बिया रुजून उगवण्याची शक्यता जास्त वाढेल. हा प्रयोग करून पाहा.

विशुमित's picture

15 May 2017 - 11:31 am | विशुमित

हा प्रयोग केला आहे. फायदेशीर वाटला.

मला बहाव्याच्या बिया हव्या आहेत.

इरसाल कार्टं's picture

15 May 2017 - 7:18 am | इरसाल कार्टं

पाठवतो लगेच.

सागर's picture

15 May 2017 - 2:48 pm | सागर

अ‍ॅप वरुन पूर्ण प्रतिसाद देताना एरर आल्यामुळे फक्त हेडिंगच बहुतेक पोस्ट झाले असावे.
-- प्रतिसाद खाली देतोय
सुरेख लेख... माझ्या मते थोडे त्रासदायक असले तरी पिंपळाची निवड वृक्षारोपणासाठी करावी. अनेक कारणे आहेत पण ही प्रमुख
1. जीवनावश्यक प्राणवायू 24 तास प्रसवणारे झाड
2. कोणत्याही विषम परिस्थितीत वाढण्याची क्षमता
3. उंच व वेगांने वाढते. शिवाय तुलनेने थोडी जागाही कमी लागते
4. लाकूड मजबूत असल्यामुळे पिंपळ विषम हवामानातही टिकाव धरून ठेवते. शिवाय पिंपळाच्या लाकडाचा उपयोग आहेच.

अर्थातच बाकीचे सर्व पर्याय देखील छान व उपयोगी आहेत. पण ऑक्सिजन मुळे पिंपळ कायमच माझी पहिली पसंती आहे.

सुबोध खरे's picture

15 May 2017 - 6:44 pm | सुबोध खरे

कोणतेही झाड २४ तास ऑक्सिजन देऊ शकत नाही.
कारण पाण्याचे विघटन करून त्यातील हायड्रोजनचे कार्बनशी संयुग करणे आणि ऑक्सिजन बाहेर सोडणे हि प्रक्रिया ऊर्जा ग्रहण करणारी आहे आणि ती केवळ सूर्यप्रकाशातच होऊ शकते.
बाकी सर्व गोष्टींशी सहमत

इरसाल कार्टं's picture

15 May 2017 - 9:28 am | इरसाल कार्टं

पुढे काय ते बोला पटकन.... ;()

इरसाल कार्टं's picture

15 May 2017 - 9:29 am | इरसाल कार्टं

पुढे काय ते बोला पटकन.... :D

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 May 2017 - 8:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आमच्य अंगणातलं २५ एक वर्षाचं कडुनिंबाचं झाड अचानक वाळून गेलं माझा मुडच गेला.
सर्व प्रयोग करुन झाले. मुळाला खत दे, किटकनाशक टाक, शेणखत टाक. पण झाडाला
काही पालवी फुटली नाही. काही दिवसापूर्वी हे वाळलेले झाड मुळापासून कापून टाकले.

झाड नाही ही कल्पना जवळचा माणुस जावा इतकी हुरहुर लावणारी ही अवस्था.
आता पुन्हा दोन कडुनिंब आणले आणि एक वडाचं झाड. वडाचं झाड पंचायत
समितीच्या शासकीय आवारात मस्त कुंपन करुन लावले.

कडुनिंबाची दोन झाडे आणली आहेत. लवकरच लावून टाकणार.
आपण म्हणता तसं आता बीया टाकणे आणि झाड लावणे हा उपक्रम नक्की करीत राहीन.

प्रेरणा देणारं लेखन धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

इरसाल कार्टं's picture

15 May 2017 - 7:30 am | इरसाल कार्टं

कैऱ्या लागलेलं आंब्याचं झाड असाच गेलं माझं.

शैलेन्द्र's picture

14 May 2017 - 8:30 pm | शैलेन्द्र

वड पिंपळ या झाडांच्या बिया पसरवायचा एक जरासा खार्चीक पण निश्चित मार्ग आहे,

डोंगराच्या कपारीवर, कड्यावर असलेल्या दोन झाडांना, अशा पद्धतीने नायलॉनचा दोर बांधायचा की त्याच्या खालच्या भागात कुणी जनावर शक्यतो जाणार नाही, मग या दोरावर पक्षी बसतात आणि त्यांच्या उत्सर्जनातून ही झाडं नक्की येतात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 May 2017 - 8:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

उत्तम उपक्रम आहे हा ! थेंबे थेंबे तळे साचे, तसे कोणी एकांड्याने सुरु केलेला उपक्रमही काही वेळाने 'क्रिटिकल मास' जमा करून महाअभियोग होऊ शकतो. उपक्रमाला हार्दीक शुभेच्छा ! (माझ्यासकट) प्रत्येक मिपाकराने आणि त्यांच्या ओळखिच्या मंडळींनी, जमेल तसा, जमेल तितका हातभार लावावा असा उपक्रम.

मार्मिक गोडसे's picture

14 May 2017 - 8:52 pm | मार्मिक गोडसे

छान उपक्रम.
मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात एका टेकडीवर वडाचे व फणसाचे रोप लावले होते. वडाचे चांगले रुजले परंतू फणसाचे वाळून गेले.

इरसाल कार्टं's picture

15 May 2017 - 7:23 am | इरसाल कार्टं

काही झाडांना आपण पाळीव प्राण्यांप्रमाणे लाडावून ठेवलंय, ती जिद्दीने उभी नाही राहत उन्हातान्हात.

चांगला उपक्रम आहे..महत्व सगळ्यांना कळलेय, पण करायचं कुणी हा प्रश्न आहे.
मधे वत्सपावर एक निरोप यायचा..सीताफळाच्या बियांचा, तसे सगळ्याच फळांच्या बिया, आंब्याच्या कोयी वर्षभर साठवून निसर्गात परत केल्यास उपयोग होईलच.
कंपनीच्या वार्षिक पिकनिकच्या कार्यक्रमात वाटेत थांबून एक तास बिया लावायचा विचार करता येईल. पंढरपूर वारीच्यावेळी असे उपक्रम झाल्याचे वाचले होते.
जिथे शक्य तिथे असे झाडे पेरत गेले तर दहा वर्षांत बदल जाणवेल.

अरिंजय's picture

14 May 2017 - 9:50 pm | अरिंजय

"५)उंबर, वड, पिंपळ
डेरेदार आणि आपल्या खोडाच्या ढोलीमध्ये अनेक
पक्षांना आसरा देणारे हे वृक्ष कुठेही उगवतात. मेख एवढीच
कि बिया म्हणून यांची अख्खी फळेच गोळा करावी
लागणार."

थोडं पिंपळाच्या झाडाबद्द्ल. पिंपळाचे झाड अतिशय उपयुक्त तर आहेच आणि ते अतिशय प्रतिकुल परिस्थितीतही तग धरुन राहते. खुप कमी पाणी किंवा पाणी नसलेल्या ठिकाणी देखील रुजते आणि वाढते. उदा: जुन्या घरांच्या भिंती, काँक्रीट इमारतींच्या गच्चीवर देखील वाढते. त्यामुळे आपल्या परिसरात थोडे निरीक्षण केल्यास हजारो पिंपळाची झाडे आढळतील, जी आपण तिथुन काढून व्यवस्थित मोकळ्या जागी लावून वाढवू शकतो.

नेमकी हीच संकल्पना घेऊन मी गेल्यावर्षी काही वृक्षप्रेमी व्यक्ती आणि संघटनांकडे गेलो. गटारीच्या कडेला आणि भिंतीत वाढलेली पिंपळाची झाडे काढून मैदानात त्याचे पुनः रोपण करणे अशी ती कल्पना होती. दुर्दैवाने कोणीही त्याला प्रतिसाद दिला नाही. झाडे वाटण्यांमधेच सर्वांना रस होता. हे काम एकट्याने पण होणारे नाही. शेवटी शेकडो छोटी छोटी आयती रोपे रस्ता रुंदीकरणात बुलडोझरखाली गेली. तरी मी यावर्षी देखील प्रयत्न करणार आहे. बघू काय होतं ते.

इरसाल कार्टं's picture

15 May 2017 - 7:28 am | इरसाल कार्टं

दरवर्षी 'येरे माझ्या मागल्या' असं होतं, फक्त प्रसिद्धीसाठी करतात काही लोकं.

उदय के'सागर's picture

15 May 2017 - 11:18 am | उदय के'सागर

फार उत्तम माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी लेख.

mayu4u's picture

15 May 2017 - 11:21 am | mayu4u

फोटो सुद्धा टाका.

इरसाल कार्टं's picture

15 May 2017 - 11:27 am | इरसाल कार्टं

झाडांचे?

विशुमित's picture

15 May 2017 - 11:47 am | विशुमित

छान उपक्रम..
रोपे सहसा उन्हाळ्यात लावावीत आणि बिया डिसेंबर-जानेवारी मध्ये पेराव्या. प्रतिकूल परीस्थित तगलेली झाडे पावसाळ्यात जोमात वाढतात.
कडुलिंब माझं फेव्हरेट झाड आहे.
सीताफळ हे झाड पण सुचवू इच्छितो. त्याचे फायदे असे की-

१. कोणत्याही प्रकारच्या माती मध्ये येऊ शकते.
२. अत्यल्प पाणी लागते.
३. पक्षांना आणि वाटसरूंना आरोग्यदायी आणि उर्जावान फळ चाखायला मिळतील.
४. या झाडांना कोणेते ही जनावर खात नाही.
५. हे खूप चिवट झाड आहे. काही कारणास्तव त्याचे नुकसान झाले तरी फुटवा करतेच.

एक समस्या आहे. याचे बी लवकर उगवत नाही. एस यांनी वर दिलेला फंडा वापरला तर फायदा होऊ शकतो.

इरसाल कार्टं's picture

15 May 2017 - 12:40 pm | इरसाल कार्टं

नोंद करणेत आलेली आहे.

पैसा's picture

15 May 2017 - 3:12 pm | पैसा

इरसाल कार्टं कोकणात असल्याने अशाच प्रकारच्या गावठी काजूच्या झाडाची रोपे/बिया पेरून लावता येतील. काजूच्या झाडालाही पावसाचे पाणी पुरते. निकृष्ट जमिनीतही होते. कीड फारशी लागत नाही. गुरे खात नाहीत आणि वर्षभर हिरवेगार रहाणारे झाड आहे. आमच्या बागेत गेल्या वर्षी गड्याच्या निष्काळजीपणामुळे २५ एक झाडांची पाने संपूर्ण होरपळली होती. मात्र गेल्या वर्षीच्या पावसात सगळ्याना पुन्हा उत्तम पालवी आली.

रायवळ आंबे आणि फणसही असे कुठेही वाढतात खरे म्हणजे.

इरसाल कार्टं's picture

16 May 2017 - 10:40 am | इरसाल कार्टं

याचीही नोंद करतो

कंजूस's picture

16 May 2017 - 1:11 pm | कंजूस

काजूचे मुरटे (फळं) खायला आणलेली त्याच्या बिया उगवून आल्या.

पैसा's picture

16 May 2017 - 1:14 pm | पैसा

मोठं झाड होणार. बाहेर कुठेतरी लावा पाऊस सुरू झाल्यावर.

आवडीचा विषय म्हणून लगेच धागा उघडला.

अजून पांगारा, सावर, तामण, अंबाडा, अर्जून, काकड, कहांडोळ, भोकर, शिवण, शिरीष, रिठा ही झाडेही लिस्ट मधे टाका.

मातीच्या गोळ्यांची एक पोस्ट वॉट्स अ‍ॅप आणि फेसबूक वर फिरत आहे. चांगला पर्यात आहे तो.

इरसाल कार्टं's picture

15 May 2017 - 12:44 pm | इरसाल कार्टं

यातील काही झाडं ओळखणे मला कठीण जाईल तरीही प्रयत्न करतो. सावरीच्या बिया आता मिळणे कठीण आहे, शोधल्या मी पण नाही मिळाल्या.
यात मोहाचे झाड सुद्धा येईल. त्याच्या बिया(मोहट्या) मिळतील थोड्याफार.

आंब्याचे बाठे, सिताफळ, जांभुळ, कोकम अशा फळांच्या बियाही लवकर रुजतात आणि तग धरतात लगेच.

सुबोध खरे's picture

15 May 2017 - 12:16 pm | सुबोध खरे

आंबा फणस जांभूळ काजू इ एतद्देशीय झाडांची पाने मोठी असतात सावलीही दाट असते आणि ती गुरेहि खात नाहीत त्यामुळे हि झाडे कॉकनं आणि सह्याद्रीच्या पर्वत/ टेकड्यांवर लावणे फायद्याचे ठरू शकते. शिवाय मिळणारी फळे हि उपयुक्त असतात. अगदी रानात सुद्धा कातकरी आदिवासींना उन्हाळ्यात भूक भागवण्याचा कामास येतात.
माणसाने केलेल्या कामापेक्षा त्याने लावलेले वृक्ष जास्त वर्षे टिकतात असा अनुभव आहे
श्री व्यंकटेश माडगूळकर

इरसाल कार्टं's picture

15 May 2017 - 12:34 pm | इरसाल कार्टं

माणसाने केलेल्या कामापेक्षा त्याने लावलेले वृक्ष जास्त वर्षे टिकतात असा अनुभव आहे

पटलं.

सानझरी's picture

15 May 2017 - 12:34 pm | सानझरी

अतिशय स्तुत्य उपक्रम..
करंज, सिताअशोक, कडुलिंब, जांभुळ, फणस, आंबा अशा बियांची germination viability अल्पकाळ असते. ते ताजे असतानाच पेरावे लागतात.
कडुलिंब- कडुलिंबाच्या ताज्या बियाच रूजतात. निंबोणी झाडावरून खाली पडल्यावर 1 ते 2 आठवड्यातच पेराव्या लागतात. त्यानंतर त्याची viability संपते.
बहावा - बहाव्याचं बी रूजण्यास अवघड असतं. बहाव्याचं बी प्लॅस्टिकच्या पिशवीत शास्त्रीय पद्धतीने रूजवून, रोप 2 फुटांच झालं कि निसर्गात लावायचं असतं. तुम्ही मागच्या वर्षी टेकडीवर टाकलेल्या बीयांची रोपं उगवलीत का हे जाणून घ्यायला आवडेल, आमच्याही माहितीत भर पडेल.
बिबा - पुजेच्या दुकानात बिब्याच्या बिया मिळतात. बिब्याच्या ताज्या बियाच रूजतात, ज्या कि साधारणपणे february march मधे येतात. सुकलेले बिबवे रूजत नाहीत.

काही झाडांच्या बिया ज्यांचे कवच टणक असते, त्यांना थोडीशी external treatment ची गरज असते. जसे कि कोमट पाण्यात रात्रभर भिजवून ठेवणे, गोमुत्रात, ताकात 24 तास भिजवून ठेवणे, इ.

विशुमित's picture

15 May 2017 - 12:38 pm | विशुमित

उपयुक्त माहिती.

सानझरी's picture

15 May 2017 - 12:48 pm | सानझरी

थोडी दुरूस्ती-
काही झाडांच्या बिया प्राणी किंवा पक्ष्यांच्या विष्ठेतून बाहेर पडल्यावरच उगवतात अन्यथा त्यांना थोडीशी external treatment ची गरज असते. जसे कि कोमट पाण्यात रात्रभर भिजवून ठेवणे, गोमुत्रात, ताकात 24 तास भिजवून ठेवणे, इ.

इरसाल कार्टं's picture

15 May 2017 - 2:25 pm | इरसाल कार्टं

हे जरा कठीण दिसतेय

हे लिहीण्याचा उद्देश इतकाच कि कोणत्या बिया कशा रूजवाव्यात हे माहित असणं आवश्यक आहे. ज्या बियांना external treatmentची गरज आहे त्या नुसत्याच निसर्गात टाकल्या तर वाया जातील. निसर्ग संवर्धन हा मुळ उद्देश साध्य होणार नाही असं वाटतं म्हणून लिहीलं..

अत्रन्गि पाउस's picture

15 May 2017 - 4:53 pm | अत्रन्गि पाउस

प्लिज एक करा कि ...

कोणत्या बिया कशा रुजवाव्या आणि काय केले असता त्यांची वाढ निसर्गात फोफावेल ह्यावर एक थोडक्यात का होईना लिहा कि ....

लै मदत होईल

इरसाल कार्टं's picture

16 May 2017 - 10:42 am | इरसाल कार्टं

लै मदत होईल आम्हा बापुड्यांना.

याबद्दल सविस्तर लिहेन मी.. तो पर्यंत तुमच्याकडे कोणत्या बिया आहेत ते सांगा. त्या कशा रूजवाव्यात हे सांगेन. (अर्थात मला माहित असेल तर ;-) ) उंबराच्या बिया जास्तीत जास्त लावाव्यात हेच सुचवेन..

इरसाल कार्टं's picture

17 May 2017 - 6:35 pm | इरसाल कार्टं

चिंच
बहावा
सावर(काटे नसलेली)
करंज
उंबर
मोह
जांभूळ
गुलमोहर

चिंच, सावर, गुलमोहर - या बिया सहज उगवतात. शक्यतो मातीचे लिंबाएवढे किंवा संत्र्याएवढे बाॅल्स करून टाकावेत. (गुलमोहर - पाऊस पडल्यावर साधारणपणे दीड 2 महिन्यांत गुलमोहराच्या झाडाखाली अनेक रोपं उगवलेली दिसतात)
बहावा - आमच्या माहिती नुसार external treatment ची गरज असते.. तुम्ही पेरलेल्या बियांचे please updates द्या.
उंबर - असं पाहण्यात येतं कि सामान्यपणे पक्ष्याच्या विष्ठेतून उंबराचं बी बाहेर पडलं कि ते लवकर रूजतं. म्हणून ते शहरात देखील जिकडेतिकडे उगवलेले दिसतात. पक्ष्यांच्या पोटातल्या enzymes मुळे बियांची उगवण लवकर होते. अशाप्रकारे निसर्गतः उगवलेली रोपं replant करावित. नर्सरी techniqueची माहिती नाही.
करंज, मोह, जांभुळ - यांच्या बिया ताज्याच लावाव्या लागतात. झाडापासून तोडल्यावर साधारण एका आठवड्याच्या आत लावल्यावर त्यांची उगवण चांगली होते (Germination rate). जर रोपे करणं शक्य नसेल तर निसर्गात जाऊन किमान 2-3 इंचाचा खड्डा करून, बिया टाकून त्या मातीने झाकणे. त्यानंतर एका आठवड्याच्या आत पाऊस पडेल याकडे डोळे लावून बसावे. पावसा-पाण्या अभावी बिया कोरड्या झाल्या तर त्या उगवणार नाहीत. या बियांना कुठल्याही treatmentची गरज नसते.

झाडं लावताना त्यांच्या फुला फळांचा जास्तीत जास्त उपयोग मधमाश्या, फुलपाखरं, पाखरं यांच्यासाठी होईल याचा विचार करावा.

इरसाल कार्टं's picture

19 May 2017 - 7:16 pm | इरसाल कार्टं

झाडं लावताना त्यांच्या फुला फळांचा जास्तीत जास्त उपयोग मधमाश्या, फुलपाखरं, पाखरं यांच्यासाठी होईल याचा विचार करावा.

हा विचार सर्वात आधी केला. म्हणूनच देशी झाडांना प्राधान्य देतोय.

बहावा - आमच्या माहिती नुसार external treatment ची गरज असते.. तुम्ही पेरलेल्या बियांचे please updates द्या.

याचे अपडेट्स ग्यायला थोडा उशीर लागेल. पण येतो जाऊन.

उंबर - असं पाहण्यात येतं कि सामान्यपणे पक्ष्याच्या विष्ठेतून उंबराचं बी बाहेर पडलं कि ते लवकर रूजतं. म्हणून ते शहरात देखील जिकडेतिकडे उगवलेले दिसतात.

मला शंका होतीच उंबर, बॅड आणि पिंपळाबद्दल. रात्रभर ताकात/गोमूत्रात भिजवून काढले तर चालेल का बरे?

एक नर्सरीवाल्याने सांगितले कि तुम्हाला वृक्षारोपणासाठी रोपे तयार करायची असतील तर एक वाफ तयार करून बी पेरा आणि उगवल्यावर पिशव्यांमध्ये भरून त्या वृक्षारोपणासाठी वापरा. हेही आम्ही करणार आहोत.

तुमचे अनुभव पहाता मला वाटते पेरणीसाठी करंज, चिंच, सुबाभूळ, बोर, मोह, खजूर, करवंद हि झाडे जास्त उपयोगी पडतील. बाकी वृक्षारोपण करावे लागेल.

बांबूबद्दल काही सांगू शकाल?

तुम्हाला व्यनि न करता इथेच विचारतो जेणेकरून सगळ्यांना माहिती मिळेल.

सानझरी's picture

20 May 2017 - 11:15 am | सानझरी

सुबाभूळ - सुबाभुळाच्या बियांचा प्रसार सामाजीक वनिकरण विभागाने केला. त्याचा प्रमुख उद्देश सरपण किंवा कुंपणा करता खांब उपलब्ध करून देणे हा होता. जेणे करुन जंगलतोड थोडी कमे होईल. परंतू आता सुबभूळाच्या बिया मोठ्या प्रमाणावर तयार होतात. एप्रिल मे महिन्याच्या वादळात त्यांचा दूरवर प्रसार होतो. या बिया सहज उगवतात, रुजतात त्यामुळे इतर झाडांची वाढ होत नाही. पक्षी, फुलपाखरांना यापासुन काहीही मिळत नाही म्हणून सुबाभूळ टाळलेले बरे.

उंबर, बॅड आणि पिंपळाबद्दल. रात्रभर ताकात/गोमूत्रात भिजवून काढले तर चालेल का बरे?

गोमुत्र आणि शेण या वेगवेगळ्या संस्था आहेत. उंबर, वड, पिंपळ या झाडांच्या बिया पक्ष्यांच्या विष्ठेतून बाहेर पडतात. ते enzymes कदाचित गायीच्या शेणात असतील. त्यामुळे देशी गायीच्या ताज्या शेणाच्या सारवणात बीया २४ तास भिजवून नंतर पेरल्या तर उत्तम. देशी गायीचं ताजं शेण उपलब्ध नसल्यास gibberellic acidच्या प्रावरणात बिया २४ तास भिजवाव्यात. हे gibberellic acid कुठल्याही कृषी केंद्रात मिळेल.
वड - अंगठ्याएवढी जाडीची आणि सुमारे २ फुट लांबीची वडाची फांदी रुजते. फक्त मुळा फुटायला थोडा वेळ लागतो. मातीच्या कुंडीत किंवा प्लॅस्टीकच्या थोड्या मोठ्या पिशवीत (किमान २ ते ३ लिटर क्षमतेच्या) लावाव्यात. घरच्या घरी बाल्कनित सुद्धा या लावता येतात. वटसावित्रीच्या वेळेस आता वडाच्या फांद्या मोठ्या प्रमाणात विक्रीस येतील. या फांद्या देखील सहजपणे रुजतात.

बांबूबद्दल काही सांगू शकाल

बांबूची रोपे नर्सरीत मिळतात. बांबूचं एक रोप पेरलं कि आणखी बांबूंची कोंबं आपोआप उगवतात.

काही झाडे ज्यांच्या बिया मातीचे लिंबाएवढे किंवा संत्र्याएवढे बाॅल्स करून टाकता येतील त्यांची लिस्ट खालील्प्रमाणे-
चिंच, कांचन, भोकर, लाल सावर, करंज, गुलमोहर, पांगारा, शेवगा, रानभेंडी (परस पिंपळ), रिठा तसंच झुडुप वर्गिय मधे अंबाडीवर्गिय बिया टाकायला हरकत नाही. (जाणकारांनी या लिस्टीत भर घालावी.)

विविध झाडांच्या बिया मिळविण्याकरता पुण्यातील Empress Botanical Garden हे एक उत्तम ठिकाण आहे.
Empress Botanical Garden, Race course जवळ, सोलापूर रोड, पुणे.
पळसाच्या बिया आत्ता तळजाई पठारावर उपलब्ध असतील, त्या पावसा अगोदर वेचणे, रुजवणे आवश्यक आहेत.

इरसाल कार्टं's picture

15 May 2017 - 12:52 pm | इरसाल कार्टं

तुम्ही मागच्या वर्षी टेकडीवर टाकलेल्या बीयांची रोपं उगवलीत का हे जाणून घ्यायला आवडेल, आमच्याही माहितीत भर पडेल.

यासाठी वज्रेश्वरीला जावं लागेल, जमवतो.

पुजेच्या दुकानात बिब्याच्या बिया मिळतात. बिब्याच्या ताज्या बियाच रूजतात, ज्या कि साधारणपणे february march मधे येतात.

हीच अडचण आहे, हल्ली आमच्याकडे हि झाडे जास्त मिळतही नाहीत कुठे.

निंबोणी झाडावरून खाली पडल्यावर 1 ते 2 आठवड्यातच पेराव्या लागतात

हे करता येण्याजोगं आहे.

या बियांना हट्टी म्हणतात. लगेचच लावाल तरच उगवतात. टणक सालवल्यांमध्ये सागाचं बी,सागरगोटे.

रायवळ आंब्याच्या रोपाला फार जोर असतो. हे रोप असेच लावले तर तेरा वर्षांनी रायवळ आंबे लागतात, झाड बरेच वर्षे जगते. अथवा कलम करण्यासाठीही वापरता येते. हे कोंदिवडे/कोंडाणे ( राजमाची पायथा ) आमराइतले

हल्ली शहरातले लोक कोकणात पक्के घर बांधतात पण फक्त सुटीतच जातात. अशा घरांसाठी रायवळ आंबाच योग्य ठरतो कारण चोरण्यासारखं काही नसतं. रोज पिकलेले आंबे बदाबद पडतच असतात. जाऊ तेव्हा खाऊ.

पैसा's picture

15 May 2017 - 3:14 pm | पैसा

यावर्षी नाही पण पुढच्या वर्षी मी याबद्दल काही केले म्हणून नक्कीच येऊन सांगू शकेन.

आम्ही गेली काही वर्षे वृक्षारोपण करत आहोत, आणि आमचा भर वड, पिंपळ, उंबर, आणि अशाच देशी वा स्थानिक झाडांवर असतो. त्यातही उंबर जास्त करून लावतो कारण हे चिवट झाड आहे आणि त्याच्या फळांचा पशुपक्ष्यांना फार उपयोग होतो. पण गेल्या तीन-चार वर्षांतल्या कमी पर्जन्यमानामुळे आणि मानवनिर्मित वणव्यांनी बरीच झाडे शेवटी जळून गेली. तरीही या सर्वांत चिंचेची झाडे मात्र टिकली. तेव्हा तुमच्या यादीत चिंचदेखील नक्कीच जोडा. हे झाडसुद्धा चिवट असते आणि पाने झडली तरी थोड्याशा पाण्यावर पुन्हा लवकर उगवतात. मोहाचे झाडसुद्धा तगले.

इरसाल कार्टं's picture

16 May 2017 - 10:52 am | इरसाल कार्टं

मोहाचीही पेरणी करता येईल, याची फुले औषधी साठी वापरतात, आदीवासी आणि शेतकरीही हि फुले जमा करून सुकवून विकतात. मामाकडे या फुलांच्या गोण्या भरलेल्या पाहिल्यात मी, स्वात:हि वेचलेत हि फुलं. दारूसाठीही काहीजण वापरतात. याच्या फळांची भाजी मला फार आवडते, पक्षांचंही आवडतं फळ आहे हे, विशेषतः: वटवाघुळे आणि पोपट. याच्या बियांचे(मोहट्या) तेल काढतात. काहीसं कडवट असलेलं हे तेल खासकरून 'काली रात' ला चामट्या बनवण्यासाठी वापरतात.
अर्थात या काली रात वर एक छोटासा धागा काढीन लवकरच. माझ्या स्थानिक बोलीत.

स्नेहांकिता's picture

16 May 2017 - 1:34 pm | स्नेहांकिता

हापिसच्या दारात ओळीने सात आठ बुचाची झाडं आहेत. त्याचं एक पिल्लू काल दत्तक घेतलय. आता जूनात त्याला घरासमोर रस्त्यावर जमिनीत पेरणार.

मार्कस ऑरेलियस's picture

16 May 2017 - 4:05 pm | मार्कस ऑरेलियस

भारी धागा आहे ....

ह्याच धर्तीवर बाल्कनीतल्या इवल्याश्या बागेत कोणती कोणती रोपे लावावीत ह्यावरही चर्चा व्हावी .

मी माझ्या बाल्कनीत सध्या तरी तुळस , मोगरा आणि कडुनिंबाची रोपे लावली आहेत . मधुमालतीचे वेल लावावेत काय असा सध्या विचार करत आहे.

मार्कस ऑरेलियस's picture

16 May 2017 - 4:14 pm | मार्कस ऑरेलियस

आणखी एक म्हणजे

ह्या धाग्यावरुन समर्थांन्नी लिहिलेले बागप्रकरण आठवले ...

प्रसंग निघाला स्वभावें । बागेमध्ये काय लावावे ।
म्हणूनि घेतली नावे । काही एक ॥

संपुर्ण प्रकरण येथे उपलब्ध आहे : http://www.maayboli.com/node/49586

अद्द्या's picture

16 May 2017 - 5:20 pm | अद्द्या

सुंदर उपक्रम ..
दार वर्षी तो फक्त फोटोसाठी रोपे " लावण्याचा " कार्यक्रम करण्यापेक्षा हे खूप चांगलं .. मी अधे मध्ये जांभूळ करवंद आवळे चिंच खाताना बिया थोड्या दार टाकण्याची सवय लावून घेतली होती मध्ये.. आता पुन्हा सुरु कारेन.. आणि या वेळी बिया मुद्दाम जमवून त्या वापरेन ..

उंबराची झाडे हि आहेत इथे जवळपास.. त्यांची फळे पण गोळा करायला सुरुवात करतो .. तेवढाच खारीचा वाटा :)

इरसाल कार्टं's picture

16 May 2017 - 7:53 pm | इरसाल कार्टं

आणि हो, हा धागा इतरांनाही पाठवायला विसरू नका.

नांदुरकीचे झाडसुद्धा वडासारखे पारंब्या असलेले असते. हेसुद्धा लावता येईल.

रुपी's picture

17 May 2017 - 12:11 am | रुपी

छान धागा..

उत्तम उपक्रम.

लोक सकाळी गावाबाहेर फिरायला जातात तेव्हा छोट्या पाण्याच्या बाटल्या भरुन सोबत नेतात आणि रस्त्याकडेच्या पालिकेने लावलेल्या झाडांना पाणी घालतात. झाडं चांगली तगली आहेत आणि हा उपक्रम गेली दोन तीन वर्ष सुरु आहे.

अरिंजय's picture

17 May 2017 - 8:08 pm | अरिंजय

खरोखर कौतुकास्पद काम आहे हे. खरी वृक्ष जोपासना.

इरसाल कार्टं's picture

19 May 2017 - 7:31 pm | इरसाल कार्टं

tree

आपल्या एका मिपाकराने हे व्हाट्सअपले होते, इथे देतो सगळ्यांसाठी.

रुपी's picture

20 May 2017 - 12:33 am | रुपी

वा.. फारच उपयुक्त.

सानझरीचे सर्व प्रतिसादही फार माहितीपूर्ण आहेत.

प्रमोद देर्देकर's picture

20 May 2017 - 11:33 am | प्रमोद देर्देकर

वा खूप उपयुक्त माहिती, अजुन येवू द्या.

पैसा's picture

20 May 2017 - 11:21 pm | पैसा

भटकी भिंगरी यांनी ही pdf पाठवली आहे.

धर्मराजमुटके's picture

27 Jun 2017 - 3:57 pm | धर्मराजमुटके

माहितीपूर्ण. वाचनखुण साठवतो.

डोन्गरी आवळ्याच झाड पण चान्गल असत लावायला ... हिरडा, बेहडा, चिन्च

इरसाल कार्टं's picture

12 Jul 2017 - 3:56 pm | इरसाल कार्टं

मागच्या वर्षी पेरलेल्या बहाव्याच्या बियांतून एकही रोप निघालेसे वाटत नाही. दोन वेलाजवून आलो पाहणी करून पण बहाव्याचे एकही रोप उगवलेले नाही.
यावेळी बहाव्याचीपेरणीनं करता नर्सरी बॅग्स मध्ये रुजवण्याचाही प्रयत्न केला पण एकही बी रुजलं नाही. याउलट जांभळं, आंब्याच्या बिया जोमाने उगवल्या.
बाहव्यासाठी काय करावं कळेना झालंय.