जेनेरिक औषधे

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in काथ्याकूट
18 May 2017 - 1:17 pm
गाभा: 

जेनेरिक औषधे -- हा एक अत्यंत विशाल असा महासागर असून यात जितक्या डुबक्या माराल तितकी रत्ने निघतील.
पहिली गोष्ट म्हणजे जेनेरिक औषध म्हणजे काय. उदा पार्क डेव्हिस या कंपनीने क्लोरोमायसेटीन हे प्रतिजैविक शोधून काढले १९४७. टायफॉईड किंवा विषमज्वर यासाठी रामबाण असलेले हे पहिले औषध. शोध लावणाऱ्या कंपनिला तिच्या शोध लावण्याच्या प्रक्रियेसाठी आलेला खर्च भरून निघण्यासाठी पेटंट दिले जाते. या पेटंट द्वारे 20 वर्षेपर्यंत दुसरा कोणीही ते औषध बनवू/ विकू शकत नाही. ती कंपनी आपली मक्तेदारी वापरून औषध विक्री करू शकेल, ज्याद्वारे ती आपला नफा वसूल करू शकेल आणि पुढच्या अधिक संशीधनाला पैसा उपलब्ध होऊ शकेल हा पेटंट कायद्याचा मूळ हेतू.

हे औषध १९४९ साली भारतात उपलब्ध झाले तेंव्हा एका (२५० मिग्रॅम) कॅप्सूल ची किंमत होती अडीच रुपये. दिवसाला सहा कॅप्सूल द्यायला लागत. म्हणजे रोजचा खर्च १५ रुपये. तेंव्हा सोन्याचा भाव होता ८० रुपये १० ग्रॅमला.

आज क्लोरोमायसेटीनची किंमत आहे तीन रुपये कॅप्सूलला. विचार करा त्या कंपनीने किती नफा केला असेल ते.आमचे वडील सांगतात कि आमच्या आजोबाना आणि आमच्या काकांना टायफॉईड झाला आणि तो उलटला (relapse) त्यामुळे अगोदरच कुळकायद्यात जमीन गेलेली होती वर या उपचारांचा खर्च असल्यामुळे घरातील सर्वच्या सर्व सोने विकायला लागले. आमच्या कुटुंबाची परिस्थिती संपन्नावस्थेतून विपन्नावस्थेत गेली.

पंधरा वर्षांनी जेंव्हा औषध पेटंट मुक्त होते तेंव्हा ते कोणतीही कंपनी बनवू शकते. आणि मग स्पर्धा सुरु होते. मग जो स्वस्तात ते औषध बनवू/ विकू शकतो तो या स्पर्धेत टिकतो. मग चांगल्या कंपन्या ज्यांच्याकडे ते औषध बनवण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध असते त्या ते औषध बनवण्यास सुरुवात करतात.

अशी औषध बनवण्याची प्रक्रिया झाल्यावर औषधाचा दर्जा कसा असावा याची इत्यंभूत माहिती फार्माकोपिया नावाच्या पुस्तकात दिलेली असते. उदा IP किंवा INDIAN PHARMACOPOEA. हे पुस्तक भारत सरकार प्रसिद्ध करते. किंवा USP ( अमेरिकेचे) किंवा BP (ब्रिटनचे).

प्रत्येक औषधात एका ग्राम मध्ये प्रत्यक्ष औषध कमीतकमी किती टक्के(उदा. ९९. ८७%), क्लोराईड किती(०.००१५%) , सोडियम किती, (ASH )राख किती इ. स्पष्टपणे दिलेले असते. असे घाऊक औषध विकणाऱ्या कंपन्या आपले औषध कोणत्या मानक पुस्तकाप्रमाणे आहे ते त्यावर लिहितात उदा. PARACETAMOL IP. किंवा IBRUPROFEN USP. (हे थोडेसे EURO ५ किंवा BHARAT ४ सारखेच आहे).

एक लक्षात घ्या सर्वच औषध बनवणाऱ्या कंपन्या ती बाजारात विकतात असे नाही तर घाऊक प्रमाणावर वेगवेगळ्या कंपन्यांना विकतात.(आजकाल अशी घाऊक औषधे चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर स्वस्तात तयार होतात आणि ती जगभर निर्यात केली जातात.) घाऊक औषध विक्रेते मग ती औषधे मोठ्या कम्पन्याना प्रथम विकतात. कारण त्यांची ऑर्डर मोठी असते पण त्यांचे दर्जाचे निकष काटेकोर असतात. त्यांच्या दर्जात थोडी कमतरता आल्यामुळे नाकारलेली औषधाची बॅच मग ते छोट्या औषध उत्पादकांना विकतात. अर्थात हे फार गंभीर असेलच असे नाही.

असे घाऊक औषध( BULK DRUG) विकत घेऊन चांगल्या कंपन्या आपल्या स्वतःच्या प्रयोगशाळेत प्रत्यक्ष चाचणी करून खात्री करून घेतात आणि ते औषध वापरून तुम्हाला मिळणाऱ्या गोळ्या सिरप इ औषधीत रूपांतर करतात. चांगल्या कंपन्या मग अशा औषधांना स्वतःचे एक नाव (ब्रँड नेम) देऊन ते बाजारात उतरवतात. उदा. क्रोसिन. यात पॅरासिटामॉल हे मूळ औषध असते. क्रोसिनच्या गोळीची किंमत साधारण १ रुपयाला एक आहे. त्याच ऐवजी सिप्ला या कंपनीचे PARACIP हे ७० पैशाला मिळते. इतर कोणती कंपनी तेच औषध पॅरासिटॅमॉल म्हणून बाजारात जेनेरिक म्हणून २० पैशात विकते.

जोवर औषधाच्या दर्जाची खात्री देता येते तोवर जेनेरिक औषध देणे हे नक्की चांगले आहे.

काही कंपन्या स्वतः आपले ब्रँड आणि जेनेरिक अशी दोन्ही औषधे बाजारात आणतात. उदा रॉक्सीडं नावाचे प्रतिजैविक(ANTIBIOTIC) अलेम्बिक या कंपनीचे औषध ७२ रुपयाला १० गोळ्या मिळत असे आणि तेच औषध जेनेरीक म्हणून ४० रुपये MRP चे मिळत असे. हे औषध ४० रुपयाला रुग्णांना मूळ किमतीत उपलब्ध करून द्यावे म्हणून द्यावे आम्ही विकत आणून ठेवले होते. पण रुग्णांना वाटत असे कि यात डॉक्टरांचा फायदा आहे त्यामुळे ते ७२ रुपये देऊन केमिस्ट कडून औषध घेणे पसंत करीत. यामुळे आम्ही नंतर असा रुग्णांचे पैसे वाचवण्याचा प्रयत्न सोडून दिला. असो.

या रणधुमाळीत मग हवशे नवशे गवशे सगळेच सामील होतात. मग नकली औषधे निर्माण होतात आणि हातोहात खपवली जातात. सरकारी रुग्णालयात असणारे खरेदी विभागाचे साटेलोटे पासून खाजगी औषध विक्रेत्या बरोबर बनवलेले लागेबांधे. यात म्हणाल तेथे आणि म्हणाल त्या किमतीची औषधे उपलब्ध असतात. भारतात मिळणारी २५ % औषधे नकली आहेत. म्हणजे चारात एका रुग्णाला मिळणारी औषधे नकली आहेत. हा बाजार २५००० कोटी ( होय पंचवीस हजार कोटी) रुपयांचा आहे. http://www.downtoearth.org.in/news/fake-drugs-constitute-25-of-domestic-...

हि २५ % नकली औषधे सोडून देऊ. बाकी ७५% औषधे नकली नाहीत हे मान्य. परंतु त्या औषधांचा दर्जा जागतिक दर्जाइतका आहे का? हा एक मोठा गहन प्रश्न आहे. अमेरिकेतील FDA हे अत्यंत कडक असून तेथे नकली औषध बनवणार्यांना आणि विकणार्यांना जबर दंड आणि शिक्षा आहे. त्यामुळे तेथे जेनेरिक औषधे देण्यास डॉक्टरना किंतु येत नाही. आपले FDA काय आणि किती कार्यक्षम आणि प्रामाणिक आहे याबद्दल न बोलणे बरे.

साधे डोकेदुखीवर एस्प्रो (ASPRO) घ्या. हे ३५० मिलिग्रॅम ऍस्पीरिन असलेले औषध मायक्रोनाईजड कणाचे बनलेले असते. त्यामुळे तो गोळी आपल्या पोटात जाताच ताबडतोब म्हणजे १५ सेकंदात विरघळते. आणि याचा पूर्ण परिणाम १५ मिनिटात होतो. आपण डिस्प्रिनची गोळी पाण्यात विरघळवली आणि घेतली तरी असाच परिणाम दिसून येतो. याच ऐवजी हॅस्प्रो किंवा तत्सम जेनेरिक औषध असेल त्यात ३५० मिलिग्रॅम ऍस्पीरिनच असेल पण ते सूक्ष्म कणांचे ना बनवता साधे असेल तर ते पोटात विरघळायाला १५ मिनिटे लागतील. म्हणजे आपल्या डोकेदुखीपासून पूर्ण आराम व्हायला १५ च्या ऐवजी ३० मिनिटे लागतील. यात मूळ औषध चांगल्या दर्जाचे खरोखर आहे हे गृहीत धरले आहे.

आता आपण मेट्रोनिडॅझॉल हे औषध घेऊ. आमांश किंवा अमिबिक डिसेंट्रीसाठी लागणारे औषध. हे औषध जठराच्या हायड्रोक्लोरिक आम्लात विघटीत पावते आणि शिवाय त्याच्या पदार्थामुळे जठराचा दाह होऊन आम्लपित्त होते. म्हणून ते एका इन्टेरिक कोटेड गोळी मध्ये मिळते. हि गोळी त्याच्या खास आवरणामुळे आम्ल वातावरणात विरघळत नाही तर अल्कलाईन वातावरणातच विरघळते. त्यामुळे औषधाचा परिणाम जठरावर होत नाही किंवा ते विघटन पावत नाही. आता मेट्रोनिडॅझॉलच्या २५० मिग्रॅमच्या जेनेरिक गोळीत तेवढे द्रव्य असेल पण जर ते इन्टेरिक कोटेड नसेलच तर रुग्णाला त्याचा फायदा होणार नाही उलट एखादा अन्य पॅथीवाला तुम्हाला ऍलोपॅथीची औषधे "उष्ण" पडतात म्हणायला मोकळा असतोच.

याशिवाय औषध इंटेरिक कोटेड आहे पण त्याचे कोटिंग व्यवस्थित नसेल तर किंवा कारखान्यापासून रुग्णापर्यंत पोहोचण्यात होणाऱ्या हाताळण्यात जर त्याला भेगा पडल्या किंवा गोळीचा कोपरा तुटला तर या गोळ्यातील मेट्रोनिडॅझॉल बाहेर पडून रुग्णाला उपचार नाहोत अपायच होईल.

या दोन्ही प्रकारांबद्दल डॉक्टरच्या हातात काय आहे? हे जेनेरीक औषध ना त्याने बनवले आहे ना त्याच्याकडे या औषधाचा दर्जा तपासण्याची यंत्रणा. परत रुग्ण बरा नाही झाला तर जबाबदारी डॉक्टरचीच असते. सुरुवात आपले निदान चुकले आहे का या शंकेपासून होते. निदानाबद्दल खात्री झाल्यावर रुग्णाने औषध व्यवस्थित वेळेवर आणि दिलेल्या डोसइतके घेतले आहे का याची शहानिशा होते.( औषध उष्ण पडते म्हणून तीन पैकी दोनच डोस घेणारे रुग्ण भरपूर भेटतात). आता निदान नक्की आहे आणि रुग्ण सुद्धा विश्वासू आहे आणि त्याने औषध व्यवस्थित घेतले आहे तरी उपचाराचा गुण का येत नाही हे पाहायला गेले तर औषधाच्या दर्जाबाबत शंका येणार.मग अशी परिस्थिती येण्यापेक्षा डॉक्टर सरळ प्रथितयश कंपन्यांची औषधेच लिहून देतात. याउलट जर तुम्ही उद्या टाटाने औषध कंपनी काढली तर ती औषधे देण्यास कोणत्याही डॉक्टरला शंका येणार नाही. कारण टाटांचे "नाव" आहे आणि आपल्या नावाला काळिमा लागेल असे ते काहीही करत नाहीत. हीच खात्री अगरवाल किंवा गोयल फार्मा कंपनी गुडगाव बद्दल देता येईल का?

जर भारतात FDA ने सर्व औषध कंपन्यावर डोळ्यात तेल घालून पहारा ठेवला आणि जर औषध कंपन्याना उत्पादनाचा परवाना देताना अत्यन्त कडक अशी तपासणी केली त्याचबरोबर नकली औषधे बनवणाऱ्या कंपन्यांवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्यांना सज्जड शिक्षा झाली. असे झाले तर भारतात जेनेरीक औषधे देण्यास कोणत्याही डॉक्टरना शंका येणार नाही.

अमेरिकेचे अन्न आणि औषध प्रशासन अशा प्रत्येक कारखान्यावर कडक नजर ठेवून असते उदा.
http://www.livemint.com/Companies/Z2tnAgoQ6vfRmvimSOdK8L/Ciplas-Indore-f...

आजची परिस्थिती काय आहे. मी जर जेनेरिक औषध म्हणून गंभीर असलेल्या मेनिन्जायटिसच्या रुग्णाला "मेरोपेनेम" लिहून दिले तर बाजारात त्याचे १२८ ब्रँड उपलब्ध आहेत. आणि त्यांची किंमत ९८० रुपयापासून २५०० रुपयांपर्यंत आहे.
http://www.drugsupdate.com/brand/showavailablebrands/292/2

डॉक्टरने फक्त जेनेरिक औषधाचे नाव लिहून दिले तर आता सर्व निर्णय राह्तो केमिस्टच्या हातात मग जी कंपनी त्याला सर्वात जास्त कमिशन देईल त्याचेच औषध तो जेनेरिक म्हणून तुम्हाला विकणार. पण त्या कंपनीला हे औषध बनवण्याचा अनुभव त्याचे तंत्रज्ञान किती याचे केमिस्टला काहीच घेणे देणं नाही. यात रुग्ण दगावला तर केमिस्टची जबाबदारी शून्य. मार खाणार तो फक्त डॉक्टर.शिवाय त्याच्या बदनामीमुळे व्यवसायावर होणारा परिणाम वेगळाच. आज सर्व डॉक्टरना भीती आहे ती हीच कि केमिस्टने दिलेल्या जेनेरिक औषधाच्या दर्जाची खात्री कोण देणार. आजकाल लोकांचा धीर फार लवकर सुटतो आणि एकंदर सरकार आणि माध्यमे यांच्याकडून होणाऱ्या अपप्रचार यामुळे कोणताही डॉक्टर जरासुद्धा धोका पत्करायची तयारी दाखवत नाही.

नकली औषध बनवल्याबद्दल त्या कंपनीच्या संचालकांना आणि ते विकल्याबद्दल केमिस्टला अटक होऊन त्यावर खटला चालून निकाल लागेपर्यंत बहुतेक वेळेस डॉक्टर वानप्रस्थाश्रमात पोचलेला असतो.

आज डॉक्टर कमिशन मिळते म्हणून एखादे महाग औषध लिहून देतो त्यात त्याचा (गैर)फायदा आहे हे नक्की पण शेवटी स्वतःवर जबाबदारी असल्याने तो नकली औषध तरी नक्की देणार नाही. पैशासाठी फार तर नको असलेली व्हिटॅमिन्स, पूरक अन्न किंवा मिनरल्स सारखी भारंभार पण निरुपद्रवी औषधे लिहून देईल.

आम्ही दवाखान्यात रुग्णांना देण्यासाठी जेनेरिक औषधे ठेवली तेंव्हा त्याच्या घाऊक विक्रेत्याला विचारले कि याच्या दर्जाबद्दल तुमचे काय म्हणणे आहे? त्यावर तो प्रामाणिकपणे म्हणाला कि सर मी तुम्हाला आज फसवले तर उद्या तुम्ही मला दारात उभे करणार नाही.एवढेच नव्हे तर तुम्ही इतर डॉक्टरना सांगाल कि माझी औषधे नकली आहेत. मलाही धंदा करायचा आहे.त्यावर माझेही पोट अवलंबून आहे. तुम्ही निश्चित राहा कि मी तुम्हाला पुरवतो ती औषधे उत्तम दर्जाचीच असतील.

आतापर्यंत जेवढे स्मरणात आहे तेवढे लिहिले आहे. जसे अजून काही आठवेल तसे यात भर घालीन.

क्रमशः

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

18 May 2017 - 1:56 pm | प्रचेतस

माहितीपूर्ण लेख.

टवाळ कार्टा's picture

18 May 2017 - 2:33 pm | टवाळ कार्टा

+१

विशुमित's picture

19 May 2017 - 11:39 am | विशुमित

+११

विस्तृत आणि माहितीपूर्ण लेख.

अनुप ढेरे's picture

18 May 2017 - 2:49 pm | अनुप ढेरे

ब्रँडेड जनेरिक अशाही प्रकार असतो ना? नावाजलेल्या कंपन्यांची जनेरिक औषधे देखील भेसळ युक्त असू शकतात का?

साधा मुलगा's picture

18 May 2017 - 10:10 pm | साधा मुलगा

भारतात मिळणारी (पेटंट ब्रँड सोडून) सगळी औषधे ही branded generics ह्या प्रकारात मोडतात, नुसते जेनेरिक-जेनेरिक (म्हणजे ज्यावर ब्रँड नाही आणि फक्त मूलद्रव्याचे नाव आहे) अशी औषधे मी तरी भारतात पहिली नाही आहेत. Chemist लोक जी स्वस्तात मिळतात आणि मार्जिन जास्त असतात त्यांना जेनेरिक म्हणतात- जसे डॉ खरे यांनी अगरवाल,गोयल फार्मा अशी उदाहरणे दिली आहेत.
जेनेरिक म्हणू शकतो अशी एकही टॅबलेट भारतात मिळत नाही.

चौकटराजा's picture

18 May 2017 - 2:51 pm | चौकटराजा

हा लेख तळमळीने लिहिल्याबद्द्ल डॉ सुबोध खरे ( वेल मेन्टेन्ड) याणा धन्यवादच ! यात आमची पेशंट वा नागरिक म्हणून काय गोची होते की शिवजयंति नक्की कोण्त्या तिथीला ? आनंदीबाई चा कैकेयी खरेच वाईट होत्या का या विष्ययावर पी एच डी करण्याचीही भारतीयांची तयारी असते. पण लालूनी नक्की चारा घोटाळा केला का ? शरद पवार खरेच भ्रष्टाचाराचे " उदगम स्थान आहेत का ? इंग्रजी माध्यमाने नक्की फायदा होतो का ? अमर्त्य सेन यांचा नक्की फायदा भारताला काही झाला का ? या विषयाचा ठाव आपल्याला घेता येत नाही. कारण एखादाच सुबोध खरे नावाचा माणूस एखाद्या तलमळीच्या विषयावर काही बोलू इच्छितो . यावर सर्व क्षेत्रातील " माहीतगार " मंडळी गप्प बसून रहातात. हे राम !

दशानन's picture

18 May 2017 - 5:55 pm | दशानन

+1

सहमत!

कपिलमुनी's picture

18 May 2017 - 3:42 pm | कपिलमुनी

_/\_

मूकवाचक's picture

22 May 2017 - 8:28 pm | मूकवाचक

_/\_

खेडूत's picture

18 May 2017 - 3:47 pm | खेडूत

धन्यवाद!
या विषयावर जागृती व्हायला हवी. फॅमिली डॉ. वरचा विश्वास तरी कायम रहायला हवा.

चिनार's picture

18 May 2017 - 3:51 pm | चिनार

माहितीपूर्ण लेख सर !!
थोडक्यात 'जेनेरिक औषध लिहून द्या' असं आदेश देणं म्हणजे सरसकटीकरणचं म्हणावं का ?

अमर विश्वास's picture

18 May 2017 - 4:37 pm | अमर विश्वास

डॉक्टरसाहेब ..
मुद्देसुत विवेचन ... पूर्णपणे सहमत ...

जेनेरिक औषधांची सरसकट सक्ती / आग्रह चुकीचाच आहे,

निदान या विषयातले पेशंटपेक्षा डॉक्टरांना अधिक कळते .. त्यामुळे डॉक्टरांना ठरवुदे काय योग्य ते ...
आपण फक्त चांगला डॉक्टर गाठावा .. नंतर त्याच्यावर पूर्ण भरवसा टाकावा हेच उत्तम

खेडूत's picture

18 May 2017 - 4:52 pm | खेडूत

आजची एक बातमी:
आरोग्य विमा कंपन्यांनी आपल्या पॉलिसीमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. मॅक्स बुपा इन्श्यूरन्स कंपनीने नुकतेच इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) डॉक्टरांना एक पत्रक जारी केले आहे. यात केवळ जेनेरिक औषधांवरच मेडिक्लेम दिला जाणार आहे. पण डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार केवळ जेनेरिक औषधांच्या आधारावर रुग्णांचा आजार दूर करणं शक्य नाही.

साधा मुलगा's picture

18 May 2017 - 10:41 pm | साधा मुलगा

बातमी वाचली, पण या कंपनीने जेनेरिक म्हणजे काय याची व्याख्या दिली आहे का?
कशाला जेनेरिक म्हणणार?
जे स्वस्त दरात ब्रँड मिळतात ते? का आणखी काही?

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 May 2017 - 11:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

एखाद्या औषधाच्या पेटंटची मुदत संपल्यावर, पेटंटचे हक्क नसलेल्या इतर कंपन्या त्याचे निर्माण, वितरण व विक्री करू शकतात. अश्या बहुतांश कंपन्या ते औषध त्यांच्या मूळ 'ब्रँडनेम'ने (जे फक्त पेटंटचे हक्क असलेली वापरू शकते) न विकता त्याच्या केमिकल/फार्मॅकॉलॉजिकल नावाने विकतात. अश्या औषधाला जेनेरिक औषध म्हणतात.

सतिश गावडे's picture

18 May 2017 - 4:55 pm | सतिश गावडे

वृत्तपत्रांमध्ये न लिहील्या जाणार्‍या बर्‍याच गोष्टी लिहील्या आहेत तुम्ही.

निशाचर's picture

18 May 2017 - 5:05 pm | निशाचर

माहितीपूर्ण लेख

जेनेरिक लिहून देणे म्हणजे औषधाचा मूळ माॅलेक्युल लिहिणे. आम्ही असे प्रिस्क्रिप्शन सुरु केले आहे. माॅलेक्युल लिहून खाली ब्रँडनेम देतो. लोकांना सांगून की उदा Moxclav ६२५ mg आणि क्ष कंपनीच्या अमुक अॅमाॅक्ससिव्ही यात आहे amoxycilline ,clavulinic acid पण क्ष कंपनीचे कमी किंमतीचे औषध कितीतरी वेळा परिणाम दाखवत नाही. मग परत तुम्हाला लिहून द्यावे लागायची शक्यता आहे. किंमतीत बरीच तफावत आहे दोन्हीच्या. पण पहिले झटकन इंफेक्शन कमी करते. आणि रुग्णाला बरे व्हायचे असते. तेव्हा ते किंमतीचा तितका विचार करत नाहीत हा अनुभव आहे.
दुसरे सध्या सहज मिळणाऱ्या चायनीज औषधांमुळे असंख्य बोगस कंपन्या निघाल्या आहेत. त्या फक्त इंपोर्टेड औषधं डिस्ट्रिब्युट करतात. दिवसांत पाच ते सहा एम आर पोरं खपवत हिंडत असतात. ते डाॅक्टरांना तुम्हाला काय हवे अमूक स्ट्रिप खपवण्यासाठी असे सरळ विचारतात. त्याला बळी पडून महिन्याला तीनशे स्ट्रिप खपवुन सोन्याचे नाणे घेणारे डाॅ बघण्यात आहेत. अशाच एका एम आरने खूप पिडले, मॅडम तुमची फक्त रिक्वायरमेंट सांगा. ४८" टीव्ही,थायलंड ट्रिप, असे काय काय तो सांगत होता. खरेतर मी खडूस म्हणून एम आर लोकांत प्रसिद्ध आहे.ते माझ्याकडे स्वतःच्या ट्रीटमेंट ला येतात पण असे आॅफर वगैरे सांगून हात दाखवून अवलक्षण करुन घेत नाहीत!. हा नवा होता म्हणून अशा आॅफर सांगत बसला होता. त्याच्या समोरच एक प्रचंड सुजलेली बाई घेऊन तिचे नातेवाईक आले. त्याला म्हंटलं देऊ तिला तुझे औषध? हिला इंफेक्शन कमी न झाल्याने ही सेप्टिसेमियात गेली तर घेईल तुझी कंपनी जबाबदारी? तो चक्क मला हे जाणवलेच नाही कधी हे कबूल करुन निघून गेला!
औषधाचा मूळ स्त्रोत लिहून देण्यास हरकत काहीच नाही पण देणारा केमिस्ट नक्की काय देणार आहे पेशंटच्या हातात? त्याला आॅफर देणारी कंपनी जे बनवते ते. आणि परिणाम न झाल्यास सर्व गोष्टींना हल्ली डाॅ जबाबदार असतातच!

डॉक्टरांनी असे औषधांचे रेणू जर औषधांच्या चिठ्ठीवर लिहून दिले तर मग त्यानुसार कोणत्या कंपनीचे औषध द्यायचे हे औषधविक्रेत्यांवर सोपवल्यास अजून एक धोका संभवतो. बहुतांश औषधदुकानांमध्ये औषधविक्रेत्यांचे सहाय्यक हे दहावी-बारावी झालेली पोरे असतात. त्यांच्याकडून चुकीचे औषध दिले गेल्यास कोण जबाबदारी घेईल त्याची?

म्हणजे जेनेरिक औषधे लिहून देण्यास व वापरण्यास हरकत नाही, उलट रुग्णांचा खर्च कमी झाला तर चांगलेच आहे. पण त्यासाठी भारताला अतिशय कडक असे औषधनियंत्रण राबवावे लागेल, क्रिएट-मेक-सेल या संपूर्ण सप्लाय चेनवर. त्याशिवाय जेनेरिकची सक्ती ही धोकादायकच ठरेल.

सुबोध खरे's picture

18 May 2017 - 6:55 pm | सुबोध खरे

पद्मश्री डॉ अशोक पांगारीया यांचे विचार
http://www.firstpost.com/india/generic-medicines-in-india-the-myth-and-t...
https://en.wikipedia.org/wiki/Ashok_Panagariya

दीपक११७७'s picture

18 May 2017 - 7:36 pm | दीपक११७७

धन्यवाद सर खुप छान लेख. _/\_

बाजीगर's picture

18 May 2017 - 9:18 pm | बाजीगर

खरे सर तळमळीने सविस्तर लिहील्याबद्दल खूप आभार. हा विषय एवढा गहन आहे है वाचून आम्हाला भोवळ आली.सुदैवाने आम्ही ज्याच्या कडून मेरोपेनम 1000 mg ikon company तो MR माहितीतला असून विश्वासू आहे. पावती देण्याचा आग्रह आम्ही धरला आहे.
औषधाच्या बाॅक्स वरील बॅच नं ची नोंद ठेवतो आहोत.

साधा मुलगा's picture

18 May 2017 - 10:27 pm | साधा मुलगा

Maytag 1000 mg inj आहे ना?
इथे दिलाय असा.
Just confirm करा. चुकीचे घेत नाही ना एवढाच विचारण्याचा हेतू आहे.

प्रमोद देर्देकर's picture

18 May 2017 - 9:47 pm | प्रमोद देर्देकर

अतिशय मोलाची माहीती.
पण कधी कधी नाही तर दर वेळेस घेतलेली औषधे डॉ. ना दाखवूनच रुग्णाला द्यावीत.

दुसरा एक प्रश्न डॉ. विचारावासा वाटतो की जेव्हा रुग्ण रुग्णालयात दाखल असतो तेव्हा कोणती औषधे रुग्णालयातर्फे दिली जातात. कारण तेव्हा रुग्णला औषधे तिथलीच दिली जातात.

सुबोध खरे's picture

19 May 2017 - 10:13 am | सुबोध खरे

जेव्हा रुग्ण रुग्णालयात दाखल असतो तेव्हा कोणती औषधे रुग्णालयातर्फे दिली जातात. कारण तेव्हा रुग्णला औषधे तिथलीच दिली जातात.
बहुसंख्य रुग्णालये हि प्रथितयश कंपन्यांचीच औषधे आपल्या फार्मसी मध्ये ठेवतात. कारण माहित नसलेल्या कंपनीवर आपल्या रुग्णाचे भवितव्य अवलंबित ठेवणे हे त्यांना परवडत नाही. कॉर्पोरेट रुग्णालयात बऱ्याच वेळेस प्रथितयश बहुराष्ट्रीय कंपन्यांची महागडी औषधे ठेवतात.
यात तीन भाग आहेत १) आंतरराष्ट्रीय( मेडिकल टुरिझम) रुग्णांना आम्ही सर्वात उत्तम सेवा देतो तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातनाम आणि सर्वोत्तम दर्जाची औषधे देतो हे दाखवता येते. कारण डॉलर मध्ये पैसे भरणाऱ्या किंवा विदेशी वास्तव्य असणारी रुग्णांना तसेही भारतात वैद्यकीय सेवा फारच स्वस्त पडत असते.
२) असेच उच्चभरू रुग्णांनाहि दाखवता येते. शिवाय बरेच लोक आरोग्य विमावाले असतात त्यांना किती पैसे लावले याच्याशी काही घेणे देणे नसते.
३) फार्मसीला कमीत कमी १५ % कमिशन असते तेंव्हा २० रुपयाचे औषध ठेवण्याऐवजी १०० रुपयाचे औषध ठेवले कि ३ रुपया ऐवजी १५ रुपये मिळतात.
एक गोष्ट लोक लक्षात घेत नाहीत ती म्हणजे कॉर्पोरेट रुग्णालयात (OVERHEADS) मूळ खर्च जागा, वीज, पाणी,वातानूकुलीन यंत्रणा, स्वच्छता, सुरक्षा रक्षक , याचाहि जास्त असतो शिवाय फार्मसी मध्ये २४ तास तिन्ही पाळ्यामध्ये सुशिक्षित आणि इंग्रजी बोलणारा फार्मसिस्ट नोकरीवर ठेवावा लागतो याचा खर्च वसूल करावाच लागतो. आपल्या शेजारच्या केमिस्टकडे एक D PHARM झालेला फार्मासिस्ट ८ ते १२ तास असतो बाकी वेळ केमिस्टच्या "घरचाच" माणूस काम करीत असतो. या खर्चाची(OVERHEADS) कॉर्पोरेट रुग्णालयाच्या खर्चाशी तुलना होऊ शकत नाही.
मग लोक इथली औषधे महाग आहेत आम्ही बाहेरून आणतो म्हणून वाद घालतात.
असा वाद कधी कोणी हॉटेलात घालताना पाहिला नाही इथली चपाती २५ रुपये आहे आणि भात १५० रुपये आहे. मी घरून चपाती किंवा भात घेऊन येतो.
लोकांना कॉर्पोरेट रुग्णालयाच्या "सुविधा" "सरकारी खर्चात" हव्या असतात हे शक्य नाही.
रेल्वे मध्ये अनारक्षित डब्याच्या तिकिटाच्या पैशात आपल्याला वातानुकूलित प्रथम वर्गाच्या सुविधा कशा मिळणार?

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 May 2017 - 10:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

थोडक्यात आणि सोप्या शब्दांत खूप खोलवरची माहिती सर्वसामान्य नागरिकाला उत्तम प्रकारे समजावून देणारा लेख.

भारतातले औषध निर्माण-वितरण-विक्री-सेवन आणि या साखळीचे नियमन करणारे प्रशासन यातील गुंता आणि हितसंबंध तितकेसे गुप्त नाहीत. या साखळीवर डॉक्टरचा ना ताबा नसतो, व तो त्यावर इतर काही उपायाने प्रभावही टाकू शकत नाही. पण, तरीही त्यांच्याकडे दुर्लक्ष करून डॉक्टरवर सहजपणे टीका केली जाते. त्याबाबत, डॉ खरेंनी या लेखात काही महत्वाचे प्रश्न परखडपणे उपस्थित केलेले आहेत. वैद्यकिय व्यवसायावर (निदान औषधांच्या बाबतीत) प्रश्न उभे करणार्‍यांनी या प्रश्नांचा अभ्यास करून मग योग्य ती प्रामाणिक टीका जरूर करावी.

आपल्या माहितीतल्या सर्व लोकांच्या नजरेस आणून द्यावा, असे समाजप्रबोधन करणारा हा लेख आहे, यात वाद नाही !

स्मिता.'s picture

19 May 2017 - 3:22 am | स्मिता.

सध्या जेनेरिक औषधे-जेनेरिक औषधे हा भडिमार होत असतांना आमच्यासारख्या सामन्य लोकांना नसलेली माहिती इथे दिल्याबद्दल डॉक काकांचे आभार!

त्यावरून एक प्रश्न पडला तो असा की बर्‍याच वेळा असं झालंय की डॉक्टरांनी 'क्ष' या ब्रँडचे औषध लिहून दिलेले असतांना फार्मसिस्ट मात्र 'य' ब्रँडचे औषध हातात देतो. अश्यावेळी काय करावे? 'क्ष' ब्रँडचाच आग्रह धरून वेगळ्या फार्मसिस्टकडे जावे का?
अनेकवेळा असंही दिसतं की काही डॉक्टरांचे फार्मसिस्टही ठरलेले (बर्‍याच वेळा एकाच इमारतीत) असतात. लिहून दिलेल्या ब्रँडचं औषध केवळ त्याच फार्मसिस्टकडे मिळते पण आपल्या घरावळच्या नेहमीच्या फार्मसिस्टकडे मिळत नाही.

सुबोध खरे's picture

19 May 2017 - 9:49 am | सुबोध खरे

डॉक्टरांनी 'क्ष' या ब्रँडचे औषध लिहून दिलेले असतांना फार्मसिस्ट मात्र 'य' ब्रँडचे औषध हातात देतो.
यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे डॉक्टरना फोन करून विचारायचे कि "क्ष" ऐवजी केमिस्ट "य" औषध देतो आहे ते चालेल का? डॉक्टर जर हो म्हणाले तर प्रश्न मिटला आणि ते नाही म्हणाले तर दुसरीकडून क्ष औषध घ्यावे.
यात दोन गोष्टी असतात.
१) केमिस्ट कडे खरोखर "क्ष" औषध संपलेले असते. म्हणून तो "य" हे तितकेच चांगले औषध देत असतो
२) "य" औषध कंपनी त्याला जास्त मार्जिन देत असते.
नक्की काय ते सांगणे डॉक्टरना पण शक्य नसते. परंतु आपल्या अशा माहितीमुळे केमिस्ट प्रामाणिक आहे कि पैशासाठी कमी दर्जाचे औषध विकतो आहे हे आपल्याला आणि डॉक्टरना सुद्धा समजेल.
काही डॉक्टरांचे फार्मसिस्टही ठरलेले (बर्‍याच वेळा एकाच इमारतीत) असतात. लिहून दिलेल्या ब्रँडचं औषध केवळ त्याच फार्मसिस्टकडे मिळते पण आपल्या घरावळच्या नेहमीच्या फार्मसिस्टकडे मिळत नाही.
काही वेळेस डॉक्टर केमिस्ट आणि फार्मा कंपनीचे साटेलोटे असू शकतात. पण बऱ्याच वेळेस जेंव्हा औषध कंपनीचा प्रतिनिधी डॉक्टरना भेटतो आणि आपले औषध लिहा अशी विनंती करतो तेंव्हा डॉक्टर त्याला हे सांगतात कि तुझे औषध जवळच्या केमिस्ट कडे उपलब्ध करून दे अन्यथा मी ते लिहून उपयोग नाही.
दुसरी गोष्ट अशीही आहे कि जेंव्हा डॉक्टर एखादे औषध लिहून देतात तेंव्हा ते आपल्या जवळच्या केमिस्ट कडे उपलब्ध आहे याची खात्री करून मगच लिहितात कारण वर म्हटल्याप्रमाणे मेरोपेनेमचे १२८ ब्रँड उपलब्ध आहेत. मग डॉक्टर तीन चार चांगल्या कंपन्यांचे ब्रँड लक्षात ठेवतात आणि त्यातील जो उपलब्ध आहे तो लिहून देतात.
काही वेळेस तुम्ही विशेषज्ञांकडे गेलात कि ते लिहून देतात ती खास औषधे आपले फॅमिली डॉक्टर लिहीत नाहीत म्हणून ते केमिस्ट अशी औषधे ठेवत नाहीत. कारण अशी औषधे न खपल्यामुळे मुदत बाह्य होण्याचा धोका असतो.

स्मिता.'s picture

23 May 2017 - 6:29 pm | स्मिता.

सविस्तर उत्तराकरता धन्यवाद!

रुपी's picture

19 May 2017 - 3:59 am | रुपी

छान माहितीपूर्ण लेख.

निनाद आचार्य's picture

19 May 2017 - 9:18 am | निनाद आचार्य

जेनेरीक औषधांविषयीच्या ज्ञानात भर पडली. धन्यवाद.

नि३सोलपुरकर's picture

19 May 2017 - 9:59 am | नि३सोलपुरकर

सोप्या शब्दांत खूप छान माहिती दिलीत ,डॉक .

अतिशय माहितीपूर्ण लेख. बरेच प्रश्न, शंका निवळल्या हे वाचून.

अरुण मनोहर's picture

19 May 2017 - 11:29 am | अरुण मनोहर

डॉक्टर साहेब धन्यवाद. अतिशय माहितीपूर्ण लेख.
बरेचदा सामान्य माणूस काहीही माहिती नसताना शेरे मारून मोकळा होतो. तुमचा लेख वाचून जाणवले की सगळ्या बाजूंचा विचार करून मत बनवावे.

विशुमित's picture

19 May 2017 - 11:50 am | विशुमित

<<<बरेचदा सामान्य माणूस काहीही माहिती नसताना शेरे मारून मोकळा होतो.>>>
== हे वाक्य सगळ्या क्षेत्रासाठी लागू होईल.

धन्यवाद...!!

सस्नेह's picture

19 May 2017 - 11:38 am | सस्नेह

फारच उत्तम माहिती !
जाता जाता....,
सगळेच डॉक्टर्स आपल्यासारखे नसतात. त्यांचे फार्मासिस्ट लोकांशी सेटिंग असते. 'बकरा' कितपत 'गब्बर' आहे त्यावरून कापण्याची किंमत ठरते. आणखी बरंच .
आणखी एक धागा काढाच डॉक तुम्ही..... 'जेनेरिक डॉक्टर कसा ओळखायचा ?'

सुबोध खरे's picture

19 May 2017 - 12:57 pm | सुबोध खरे

मी काही इतर डॉक्टरांकडे जात नाही तेंव्हा जेनेरिक डॉक्टर कसा ओळखायचा हे मला काही सांगता येणार नाही.
बाकी सेटिंग बद्दल म्हणाल तर कुणाचे कुणाशी सेटिंग नाहीये?
संध्याकाळी "बसल्यावर""जास्त" झाली म्हणून किंवा ऑफिसला दांडी मारून ट्रेकिंगला जाणार्यांचं पण डॉक्टरशी सेटिंग असतं कि दुसऱ्या दिवशी मेडिकल सर्टिफिकेट द्या म्हणून.
बाकी असं सर्टिफिकेट देत नाही म्हणून माझ्या पत्नीचे बरेच रुग्ण कमी झाले.यात माझे स्वतःचे वर्गमित्रही आहेत.
आता तिच्या रुग्णांचे पण सेटिंग आहे. आजारी पडले कि उपचारासाठी तिच्याकडे येतात आणि खोटं सर्टिफिकेट हवं असेल कि दुसरया डॉक्टर कडे जातात.
१५००० रुपयांच्या बिलाचा परतावा मिळतो म्हणून केमिस्ट कडे सेटिंग असणारा माझा मित्र माझ्या बायकोने व्यवसाय सुरु केला तेंव्हा आमच्या कडे आला होता. आम्ही अशी बिले द्यायला नकार दिल्यावर तो आमच्याकडे येत नाही.
हि तुरळक उदाहरणे आहेत. प्रत्येक माणूस आपल्या क्षेत्रातील सेटिंग बद्दल सांगू शकेलच.
"लोभीपणा" हि मानवी वृत्ती आहे. आपण सोडून "सर्वच जण चूक" असतात

इरसाल कार्टं's picture

19 May 2017 - 11:46 am | इरसाल कार्टं

छान माहिती दिलीत तीही मुद्देसूद आणि उदहरणांसहित.
मनातला गोंधळ बराचसा कमी केलात.

अत्रे's picture

19 May 2017 - 12:08 pm | अत्रे

लेख आवडला.

वरती कोणीतरी म्हटले आहे

Moxclav ६२५ mg आणि क्ष कंपनीच्या अमुक अॅमाॅक्ससिव्ही यात आहे amoxycilline ,clavulinic acid पण क्ष कंपनीचे कमी किंमतीचे औषध कितीतरी वेळा परिणाम दाखवत नाही. मग परत तुम्हाला लिहून द्यावे लागायची शक्यता आहे. किंमतीत बरीच तफावत आहे दोन्हीच्या. पण पहिले झटकन इंफेक्शन कमी करते.

हे वाचून प्रश्न पडला.

१. एखादे जेनेरिक औषध काम करत नाही हे डॉक्टर लोकांना माहित असल्यास ते त्याची तक्रार कुठे करू शकतात? सामान्य माणसाला अशी तक्रार करायची असल्यास त्याची प्रक्रिया काय असते?

२. डॉक्टरांकडे "अमुक एक औषध चांगले काम करते, अमुक एक औषध तेवढे परिणामकारक नाही" अशा माहितीचा खजिना असतो. ही माहिती त्यांनी त्यांच्या एखाद्या संघटनेतर्फे किंवा इंडिविज्युअली लोकांमध्ये शेअर केल्यास सामान्य लोकांचा फायदा होईल. असे प्रयत्न कोणी डॉक्टरांनी केले असल्यास त्याची माहिती द्यावी. धन्यवाद.

आवडला. अनेक नवीन मुद्दे कळले.

Nitin Palkar's picture

19 May 2017 - 3:27 pm | Nitin Palkar

जन औषधी या नावाने भारत सरकार पुरस्कृत औषधांची साखळी दुकाने उघडली आहेत. अनेक ब्रँडेड औषधांची पर्यायी औषधे तिथे उपलब्ध असतात. त्या विषयी काही माहिती द्याल का? या औषधांचा दर्जा नक्की कसा असतो?

सुबोध खरे's picture

19 May 2017 - 8:29 pm | सुबोध खरे

जनौषधी चा मूळ हेतू 'ensuring availability of quality medicines at affordable prices to all',
असा म्हटला आहे पण त्यांच्या पूर्ण वेब साईट वर "उच्च दर्जा कसा टिकवून ठेवणार" याबद्दल एक अवाक्षर मला तरी सापडले नाही. सगळीकडे परवडणारी किंमत म्हटले आहे.
आणि याच्या दुसऱ्या टोकाला आयुष घेतलेल्या डॉक्टरना आधुनिक वैद्यकशास्त्राची औषधे वापरायला परवानगी दिली आहे http://medicaldialogues.in/6-months-of-training-and-ayush-doctor-can-pra...
आणि फार्मासिस्टना पण डॉक्टर म्हणून परवानगी देण्याचे घाटते आहे. http://www.business-standard.com/article/current-affairs/allow-pharmacis...
डायक्लोफेनॅकचे इंजेक्शन आपल्याला १० रुपयात(२२ रुपया ऐवजी) मिळेल किंवा अमीकॅसिन चे इंजेक्शन २५ रुपयात(४५ रुपयांऐवजी) मिळेल पण ते देणारा डॉक्टर जर प्रशिक्षित नसेल तर हाताला किंवा पायाला लकवा मारतो त्याला जबाबदार कोण?
सरकारी सर्वात कमी किमतीच्या निविदांत मिळणाऱ्या गोष्टी काय दर्जाच्या असतात ते मी सांगायला नको.
सरकारी नोकरी सोडली तर सरकारी एकही गोष्ट जनतेला नको असते.
मूळ सर्व सरकारी रुग्णालयांचा, प्राथमिक आरोग्य केंद्रांचा दर्जा सुधारणे आणि तेथे किमान किमतीत उत्तम वैद्यकीय सेवा उपलब्ध करणे ही प्राथमिक आवश्यकता आहे. पण गेल्या तीन दशकात आपल्या शिक्षण आणि आरोग्यमंत्र्यांनी सरकारी आरोग्यसेवा कशी खिळखिळी केली आहे या विषयावर डझनभर तरी पी एच डी करता येईल. तिथे डॉक्टर वेळेत उपलब्ध नसणे, इतर सेवक वर्ग पैसे दिल्याशिवाय काम करत नाही, औषधे नसल्यातच जमा आहे. जीवनावश्यक ऑषधे तर नसतातच.
हि परीस्थिती न सुधारता केवल स्वस्त औषधे उपलब्ध करून देणे हे म्हणजे पूर्ण शरीराला eczema झाला असताना फक्त चेहऱ्याला औषध आणण्यासारखे आहे.
हि योजना बिनकामाची आहे असे मला अजिबात म्हणायचे नाही. पण नोटबंदी मध्ये जितक्या सुरस आणि चमत्कारिक तर्हेने जनतेने आपले काळे पैसे पांढरे केले आणि त्याला बँक कर्मचारी आणि सी ए लोकांनी हातभार लावला ते पाहता हि योजना कितपत यशस्वी होईल याबद्दल मला शंकाच आहे.
यात नकली औषधे, संशयास्पद परिस्थितीत निर्मिती केलेली औषधे वेगळी कशी काढणार.

Nitin Palkar's picture

19 May 2017 - 9:55 pm | Nitin Palkar

अनेकानेक धन्स

ज्यांना नेटवर,पेप्रात,इतरांनी दिलेली माहिती यावर काही "ज्ञान" प्राप्त झालेले असते त्यांना बरेच प्रश्न आणि शंकाकुशंका असतात. अशी काही माहिती मिळवणं वावगं नाही परंतू ते ज्ञान कितीवेळ,केव्हा वापरायचं यावर विचार करणे गरजेचं आहे.
सर्व खेळ आपल्या /नातेवाइकाच्या जिवाशी असतो. फारतर डॅाक्टर, नर्सिंग होम महागडे वाटले तर आर्थिक अडचण म्हणून बदलण्याचा पर्याय असतोच.
लायन्स क्लब,मानव कल्याण केंद्र, केईएम,लोकमान्य टिळक, जेजे,सेंट जॅारजेस अशा काही नामवंत हॅास्पिटलात जाऊन कमी खर्चात पण योग्य उपचार करून घेण्याचा पर्यायही अवलंबता येतोच. उगाच औषधउपाययोजनेत डॅाक्टरांचे डोके खाऊ नये.

अभिजीत अवलिया's picture

19 May 2017 - 7:07 pm | अभिजीत अवलिया

माहितीपूर्ण लेख

उत्तम माहितीपूर्ण लेख डॉक्टर , उदाहरण देऊन मुद्दे मांडायची तुमची हातोटी विलक्षण आहे . डॉ अशोक पांगारीया यांचा हि लेख आवडला , भारतातील जनरिक औषध प्रसारातील आणि उपयोगितेबद्दल डॉ अशोक पांगारीया तीन महत्वाचे अडथळे अधोरेखित करतात
१. भ्रष्ट आणि कुचकामी प्रशासकीय व्यवस्था जी अनियंत्रित औषध निर्मिती परवाने आणि आयात परवाने याना प्रोसाहन देते. अत्यंत ढिसाळ गुणवत्ता नियंत्रण व्यवस्था उत्तम जनरिक औषधा वापरातील अडथळा ठरत आहे .
२. नफेखोर, अर्ध-शिक्षित आणि अनियंत्रित औषध वितरण व्यवस्था मग ते खासगी औषध विक्रेते असोत किंवा सरकारी दवाखान्यातील कंत्राटदार.
३. आणि काही प्रमाणात डॉक्टर आणि औषध निर्माण कंपन्या मधील लागेबंधे
याबरोबर अर्ध-शिक्षित रुग्ण आणि रुग्नांमध्ये (नातेवाइका मध्ये ) असणारे अनेक गैरसमज सुद्धा कारणीभूत आहेत.

काही वर्षपूर्वी महेश झगडे अन्न आणि औषध नियंत्रण विभागाचे आयुक्त होते त्यांनी केमिस्ट मध्ये फार्मासि चे शिक्षण झालेला कामगार हवा असा कल्याणकारी निर्णय घेतलेला परंतु औषध विक्रेत्यांच्या संघटनेने अनेक आंदोलन करून दबाव वाढवला होता, परत काही महिन्यात त्यांची बदली झाली आता परत त्या विभागात काही आशादायी होतंय असे दिसत नाही.

सुबोध खरे's picture

21 May 2017 - 2:30 pm | सुबोध खरे

अरे वा
तुम्ही दुवा वाचण्याची तसदी घेतलीत.
बहुसंख्य लोक इतके कष्ट घेत नाहीत. काही तर प्रतिसाद सुद्धा नीट वाचण्याचे कष्ट घेत नाहीत.
धन्यवाद.

पिवळा डांबिस's picture

22 May 2017 - 10:34 am | पिवळा डांबिस

धन्यवाद

तिमा's picture

22 May 2017 - 12:05 pm | तिमा

खरं तर, आता वाचनमात्र, म्हणूनच रहाणे, असे ठरवले होते. पण डॉक्टरसाहेबांनी ज्या पोटतिडीकेने हा लेख सर्वसामान्यांसाठी लिहिला, तो वाचल्यावर, माझी माहिती शेअर करणे, हे माझे कर्तव्य आहे, असे मी समजतो.
आपल्या या भ्रष्ट देशांत, बाकी सर्व वस्तु वा खाद्यपदार्थ याप्रमाणेच, बनावट औषधे करुन विकण्याचाही मोठा धंदा आहे. त्याचे मूळ केंद्र, दिल्ली वा आसपासच्या भागांत असावे, असा माहितगारांचा कयास आहे. काही औषधातले विशिष्ट आयसोमर्स फक्त गुणकारी असतात. त्यासाठी ते वेगळे करुन, मगच त्याचे औषध बनते. पण बनावट कंपन्या, असे आयसोमर्स वेगळे न करता, त्यातल्या निरुपयोगी ५० टक्के अशा आयसोमर सकट औषधे बनवतात. असे केल्याने, गुणकारी औषधाची उपयुक्तता, ५० टक्के न होता, शून्य टक्के होते. अशी औषधे, दिल्लीच्या बाजारात विकली जातात. त्यापासून केलेली जेनेरिक औषधे, निरुपयोगी असतात. पण सामान्य चांचण्यांत ती 'पास' होतात.
औषधे तयार करताना, चांगल्या कंपन्या, अत्युच्च दर्जाची काळजी घेतात. पण मी, अनेक देशी औषध कंपन्यांत काम केले आहे. तसल्या ठिकाणी, फंडस अभावी वा बेफिकीरीमुळे, बहुराष्ट्रीय कंपन्यांएवढी काळजी घेतली जात नाही. कित्येकदा, औषध जरी शुद्ध तयार केले असले तरी, पॅकिंगच्या वेळी त्यांत कचरा, ब्लॅक पार्टिकल्स वगैरे जाण्याची खूप शक्यता असते. ह्या देशी कंपन्या ही बल्क औषधे, बर्‍याच बहुराष्ट्रीय कंपन्यांना विकतात. तिथे या औषधांच्या गोळ्या वा सिरप्/इंजेक्शन्स बनवली जातात.
बहुराष्ट्रीय कंपन्या, या छोट्या कंपन्यांची वेळोवेळी तपासणी करतात. पण ती रोज करत नसल्यामुळे, फक्त तपासणीच्या दिवशी स्वच्छता ठेवली जाते. इतर वेळी, कुत्री सुद्धा उत्पादन क्षेत्रांत फिरत असतात.
अशा तर्‍हेने तयार झालेली औषधे, जरी बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या नांवाने असली तरी, त्याचा मूळ स्त्रोत, या असल्या देशी कंपन्यांत असतो. हे सर्व, औषधे लिहून देणार्‍या डॉक्टर्सना माहीत असणे, शक्य नसते.
फक्त युएस एफडीए चे अ‍ॅप्रुव्हल घेतलेल्या कंपन्या याला अपवाद आहेत. पण ते घेण्यासाठी जो खर्च येतो, तो केल्यावर जेनेरिक औषधांच्या किंमतीत औषधे विकणे, केवळ अशक्य आहे. त्यामुळे, रुग्णाने, स्वस्तातले औषध घ्यायचे, की जीव महत्वाचा मानायचा, हे स्वतःच ठरवावे.

बहुराष्ट्रीय कंपन्या, या छोट्या कंपन्यांची वेळोवेळी तपासणी करतात. पण ती रोज करत नसल्यामुळे, फक्त तपासणीच्या दिवशी स्वच्छता ठेवली जाते. इतर वेळी, कुत्री सुद्धा उत्पादन क्षेत्रांत फिरत असतात.

अगदी! आणि हे केवळ छोट्या कंपन्यांमध्येच घडते असे नाही, बऱ्याच प्रथितयश कंपन्यांच्या प्लॅन्टसमध्ये खूप निष्काळजीपणा केला जातो. केवळ ऑडिटच्या दिवशी साफसफाई. नाहीतर एका औषधाची एक बॅच संपली की मशीन साफ न करता त्यावरच दुसऱ्या औषधाची बॅच लावणे वगैरे प्रकार सर्रास घडतात.

त्यामुळे, जेनेरिक औषधांच्या दर्जाबद्दल शंका असली तरी ब्रँडेड नामांकित औषधांच्या दर्जाबद्दल डोळे झाकून निश्चिंत राहावे अशी परिस्थिती भारतात नक्कीच नाहीये हे दुर्दैव!

प्राची अश्विनी's picture

23 May 2017 - 12:06 pm | प्राची अश्विनी

सहमत!
ही जवळच्या नातेवाईकाबाबत घडलेली घटना. ती व्यक्ती एका मोठ्ठया ब्रँडच्या औषध कंपनीत quality control मध्ये उच्च पदावर होती. 2005 सालच्या मुंबईतील पूरात औषधांची मोठ्ठी बेच भिजली. या व्यक्ती ने.ती नष्ट करायची order दिली. पण वरचं कोटींग भिजलं पण आतलं औषध चांगलं आहे म्हणून तिने दिलेली order मागे घ्यावी म्हणून तिच्यावर कंपनीतर्फे दबाव आणला गेला. तिला नोकरी सोडावी लागली.

सुबोध खरे's picture

23 May 2017 - 7:25 pm | सुबोध खरे

ब्रँडेड नामांकित औषधांच्या दर्जाबद्दल डोळे झाकून निश्चिंत राहावे अशी परिस्थिती भारतात नक्कीच नाहीये हे दुर्दैव!
इतकी वाईट परिस्थिती हि नाही.
बऱ्याचशा चांगल्या कंपन्या मध्ये स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाची चांगली काळजी घेतली जाते. आजकाल बरीचशी यंत्रे मानवी हस्तक्षेपाशिवायच काम करीत असल्याने दर्जा चांगला टिकवणे शक्य आहे.
मूळ आपला प्रश्न आहे तो मनोवृत्तीचा. "सब चलता है" हि भारतीय मनोवृत्ती भारतीय कर्मचाऱ्यांच्या अंगात भिनलेली आहे ती अशी सहजासहजी जात नाही म्हणून असे मुद्दे उपस्थित होतात.
पण केवळ नफ्यासाठी जिकडे तिकडे पैसे चारून उभ्या केलेल्या "जुगाड" कंपन्यांची परिस्थिती मात्र गंभीर आहे. एक चकाचक कार्यलय आणि एक चकाचक कारखाना नावापुरता उभा असतो. बरीचशी औषधे दुसर्याकडून बनवून घ्यायची.
हे दुसरे बनवणारे सुद्धा कसे असतात.
एकाकडून बल्क ड्रॅग घ्यायचे.चीन मधून स्वस्तात असे औषध जे मोठ्या कंपन्यांनी नाकारलेले आहे ते विकत घ्यायचे. गोळ्या तयार करायचे मशीन सेकंड हॅन्ड विकत घ्यायचे. (हे पन्नास हजारापासून मिळते.) त्यात गोळ्या तयार करण्यासाठी पूर्वी मोठ्या कंपनीत कामाला असणारा आठवी पास मजूर कमी पगारावर लावायचा आणि औषधे तयार करायची आणि ती अशा दिखाऊ कंपन्यांतर्फे विक्री करायची.
आज तरी बहुराष्ट्रीय सोडा पण डॉ रेड्डी, सन फार्मा, अलेम्बिक (ग्लायकोडीन वाले ), FDC (इलेक्टराल वाले), सिप्ला, कॅडीला, इ अनेक नावलौकिक मिळवून असलेल्या भारतीय कंपन्या आहेत ज्यांच्या दर्जाबाबत बऱयापैकी खात्री देता येईल.

बर्‍याच वर्षांपूर्वी कॅडिला कंपनीला भेट दिली होती आणि तिथे गोळ्या तयार करण्याची प्रक्रिया पाहायला मिळाली होती. खूपच शिस्तबद्ध पद्धतीने काम चालू होते तिथे.

वरील किस्सा दुर्दैवाने तुम्ही उल्लेख केलेल्या कंपन्यांपैकी एका कंपनीचा आहे. :-|

प्राची अश्विनी's picture

24 May 2017 - 12:26 pm | प्राची अश्विनी

मी सांगितलेली कंपनी सुद्धा या वरच्या नावांपैकीच एक आहे.;)

सुबोध खरे's picture

24 May 2017 - 12:33 pm | सुबोध खरे

स्वार्थ (आणि त्यासाठी भ्रष्टाचार) हा मूळ मानवी वृत्तीचा भाग.
फोकस वॅगन सारख्या नामवंत जर्मन कंपनीने आपल्या डिझेल गाड्या विकण्यासाठी त्यांच्या प्रदूषण नियंत्रकात फेरफार केलेले उघडकीस आले. तसेच या चांगल्या कंपन्यांचे आहे. डॉक्टर शेवटी चांगल्या कंपन्यांची औषधे दर्जाबाबत असलेल्या एका (भाबड्या असेल) विश्वासानेच लिहून देत असतात.
खरं तर जेनेरिक कंपन्यांकडून त्यांना "इतर सोयी सुविधा" जास्त मिळत असतात. पण दर्जाची खात्री नसल्यानेच बरेचसे डॉक्टर नामांकित कंपन्यांची औषधे लिहिताना दिसतात.

प्राची अश्विनी's picture

24 May 2017 - 12:36 pm | प्राची अश्विनी

खरंय. आजकालचा मुख्य प्रोब्लेम हा आहे की कुणाचाच कुणावर विश्वास उरला नाही.

उत्तम माहितीपूर्ण लेख आणि चर्चा.

मराठी_माणूस's picture

23 May 2017 - 10:24 am | मराठी_माणूस

ब्रँडेड कंपन्यांची औषधे घेउन सुध्दा गुण आला नाही तर काय ?

सुबोध खरे's picture

23 May 2017 - 11:03 am | सुबोध खरे

डॉक्टरला हाणायचं
हा का ना का

डॉक्टरला हाणायला का काही कारण लागतं डॉक्टरसाहेब? रूग्णाच्या नातेवाईकातल्या दारूड्या टग्यांची रग जिरवायला कामाला येतो दवाखान्यातला एखादा डॉक्टर.

मराठी_माणूस's picture

24 May 2017 - 10:12 am | मराठी_माणूस

आजच्या लोकसत्ता मधे याच विषयावर एका डॉं. चा लेख आलेला आहे.

http://www.loksatta.com/vishesh-news/quality-of-generic-drugs-1478428/

त्या लेखाचे समारोपाचे (सार ?) वाक्य असे आहे.

एकंदरीत पाहता लक्षात येईल की, जेनेरिक औषधांचा दर्जा सुमार असतो, ती ‘बायो- इक्विव्हॅलन्ट’ नसतात, हा दावा म्हणजे हा बिनबुडाचा प्रचार आहे.

अत्रे's picture

24 May 2017 - 10:19 am | अत्रे

तो लेख नेमका समजला नाही.

वर त्यांनी म्हटलंय -

एक गोष्ट खरी की, काही कंपन्या मात्र दर्जा पाळत नाहीत. राष्ट्रीय औषध पाहणी (२०१४-१६) मध्ये भारतातील सर्व जिल्ह्यांमधून २२४ औषधांचे सुमारे ४८,००० औषध-नमुने गोळा करून त्यांच्यावर ६९ चाचण्या केल्यावर ३.१६ टक्के नमुने कमी दर्जाचे आढळले. हे प्रमाण खूप जास्त नसले तरी ते शून्यावर आणायला हवे. पण औषध कंपन्यांच्या दर्जावर नियंत्रण ठेवणारी अन्न व औषध प्रशासनाची (एफडीए) यंत्रणा अजूनही खूप अपुरी व भ्रष्टाचाराने ग्रस्त आहे.

खाली म्हणतात

एकंदरीत पाहता लक्षात येईल की, जेनेरिक औषधांचा दर्जा सुमार असतो, ती ‘बायो- इक्विव्हॅलन्ट’ नसतात, हा दावा म्हणजे हा बिनबुडाचा प्रचार आहे.

आखिर केहना क्या चाहते है?

सुबोध खरे's picture

24 May 2017 - 10:41 am | सुबोध खरे

डॉ फडके यांनी लेखात जे लिहिले आहे तेच मी वरच्या लिहिलेले आहे.
माझ्या लेखात ठळक शब्दात मी हेच लिहिले आहे
जोवर औषधाच्या दर्जाची खात्री देता येते तोवर जेनेरिक औषध देणे हे नक्की चांगले आहे.
हि दर्जाची खात्री टिकवणे हे काम डॉक्टरांचे नसून अन्न आणि औषध प्रशासनाचे आहे.
एकंदर त्यांच्या कामाबद्दल न बोलणेच बरे.
अशामुळेच कोणताही डॉक्टर जेनेरिक औषध देण्यास कचरतो. कारण औषध खराब होते कि नाही हे सांगणे कठीण आहे पण रुग्ण बरा झाला नाही तर त्याची जबाबदारी मात्र डॉक्टरांना घ्यावी लागते.
आज डॉक्टरांनी जेनेरिक औषध लिहून दिले तर देणारा केमिस्ट मात्र त्याला सर्वात जास्त नफा देणाऱ्या कंपनीचेच औषध देणार( ज्याबद्दल डॉक्टरांना काहीच माहित नाही). याबाबतीत सरकार नक्की काय करणार आहे हे मात्र कुणालाच ( सरकारला सुद्धा) माहित नाही.
यात फायदा केमिस्टचा, नुकसान रुग्णाचे पण जबाबदारी मात्र डॉक्टरची.

जबाबदारी डॉक्टर लोक्सची असेल तर "ब्रान्ड त्यांच्याकडून अप्रूव्हड़" अशी काही सिस्टीम नाही का?
नसेल तर बनवता येऊ शकेल काय?

सुबोध खरे's picture

24 May 2017 - 12:27 pm | सुबोध खरे

या कामासाठी डॉक्टर असण्याची गरज नाही. फार्मसी ची पदवी घेतलेली व्यक्ती सक्षम असते. वरील लोकसत्तेच्या दुव्यात दिलेल्या सांख्यिकी प्रमाणे औषध निरीक्षक यांचे हे काम आहे. त्या दुव्याप्रमाणे ३२०० औषध निरीक्षक असणे आवश्यक आहे आणि प्रत्यक्षात फक्त ८४९ नेमलेले आहेत. त्यातून या खात्यात होणाऱ्या भ्रष्टाचाराबाबत काय बोलणार.
यामुळेच डॉक्टर लोक सहसा चांगल्या कंपन्यांच्या औषधाबाबत आग्रही असतात कारण यामागे निदान चांगल्या कंपन्या आपल्या "नावलौकिकासाठी तरी" औषधाचा दर्जा राखून असतील हा (भाबडा का होईना ) विश्वास असतो. अगदी नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीचे औषध खराब निघाले तर डॉक्टर एवढेच म्हणून शकतात कि आम्ही तर चांगल्या नामांकित कंपनीचे औषध लिहिले होते ते पण खराब निघाले तर आम्ही काय करणार?
कितीही लोभी आणि भ्रष्ट डॉक्टर असेल तरीही आपला रुग्ण "बरा व्हावा" अशीच त्याची इच्छा असते. कारण त्याला "स्वतःच्या नावलौकिका"चीही चिंता असते.
मी म्हटले तसे "टाटा" यांच्या नावासाठी लोक त्यांची उत्पादने खरेदी करतात. तसेच आहे हे. पण तिथेही आपलेच भारतीय लोक जर "सब चलता है" हीच वृत्ती बाळगुन असतील तर कोण काय करणार?

चौकटराजा's picture

24 May 2017 - 12:47 pm | चौकटराजा

एखाद्या इंजिनियर व डॉक ची प्रॅक्टीस ही वेगवेगळी असते. आज देखील व त्याअर्थाने कधीच वैद्यक हे परिपूर्ण शास्त्र होणार नाही. कारण अनेक गोष्टी इतक्या सूक्ष्म पातळीवर शरीरात होतात की कितीही शोध लागले तरी त्याचे १ अधिक १ बरोबर दोन असे उत्तर अभियांत्रिकी मधे देता येते तसे ते वैद्यकात देता येत नाही येणार नाही. सबब डॉ नी जेनेरिक औषध लिहून दिले तरी ते कोणत्या कंपनीचे घ्यायचे याची मुभा व साहजिकच जबाबदारी रूग्णावर आहे. तेंव्हा बरे होण्याची जबाबदारी वैद्यकीय व्यक्ती घेत नसतेच. तीवरची जबाबदारी फक्त निदानापर्यंतच सीमित आहे.

आज मी ज्या दवाखान्यात औषध घेतो त्यावर डॉ. नामांकित कंपनीचे औषधच ( अलोपथिक) लिहून देतात त्याखाली एक नोट आहे ती अशी की " व यासम कोणतेही जेनेरिक औषध रूग्णाच्या पसंतीनुसार" अर्थात हे ठिकाण खाजगी डॉक चे क्लिनिक नाही. पण हेच डॉ खाजगी प्रॅक्टीस ही करतात. वरील नियम हा डॉ नी केलेला नाही तो रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने केला आहे. आता फरक एवढाच की सर्व डॉ. च्या प्रिस्क्रिप्शन खाली फक्त " रूग्ण आपल्या जबाबदारीवर जेनेरिक औषध घेऊ शकतो " असे वाक्य आले तर " जबाबदारी" तून डॉ. मुक्त होतीलच. कारण तशी १०० टक्के की गारंटी अतिशय यशस्वी ,नामांकित कंपन्याची ही देता येत नाही. एक वाचलेले वाक्य आठवते ते असे.... Doctor is not a magician , he is just a friend of yours on the way to death ! " .

वरुण मोहिते's picture

24 May 2017 - 1:10 pm | वरुण मोहिते

तरी वेळ अली तर ब्रँडेड ला प्राधान्य असेल कोणी मत विचारलं तर . कालचीच गोष्ट आमच्या भागात पहिले जेनेरिक मेडिकल चालू झालंय. माझ्या सोसायटीतले एक काका मला तावातावाने सांगत होते बघ पहिले माझी हि गोळी २१० ची होती आता १२० ला मिळते . आपण फसवले जातो आणि बरंच काही . मला हा लेख वाचून खूप काही सांगण्याची उर्मी आलेली पण मी जाऊदे बोलो ते खुशीत तर काय होतंय . ते हार्ट पेशंट आहेत . मुख्य म्हणजे हा मेडिकल वाला नुसता डॉक कडून गोळ्या लिहून आणा असे सांगतो आणि जेनेरिक देतो . देतही असेल बरोबर पण आपला अजूनतरी विश्वास नाहीये . पण खरंच काही जेनेरिक चांगल्या असतील तर त्या गोळ्या सुचवायला डॉक्टरांनी हरकत नसावी .

प्रदीप's picture

24 May 2017 - 7:24 pm | प्रदीप

माहितीपूर्ण आहे. धन्यवाद.