इमान...भाग ३

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
15 May 2017 - 3:19 pm

आधीच्या दोन भागांची लिंक
http://www.misalpav.com/node/39750
http://www.misalpav.com/node/39761

झालं ना !! गब्ब्या फ्यामिलीले घेऊन इमानात जाणार हे गोष्ट साऱ्या गावात पसरली. गब्ब्याले येताजाता लोकं प्रश्न इचारू लागले, सल्ले देऊ लागले.

ज्याइची आजलोकची जिंदगी फाट्यावर येष्टीची वाट पायन्यात गेली ते लोकं गब्ब्याले शानपनाच्या गोष्टी सांगू लागले.

"तुले सांगतो गब्ब्या..म्या वाचलं हायं पेपरात...इमानाची इस्पीड बघायची असंन तं त्याले जास्त उंच नेऊन उपेग न्हाय..त्वां पायलेटले सांगून इमान खालीच ठेवजो जरा...अन मंग पाय कसं पयते इमान बुंगाट!!!"

"काही सांगतं का बे..थो पायलेट का आपल्या गावचा हायं का गब्ब्या सांगन ते ऐकायले?? तू गप्प रायजो गब्ब्या."

"गब्ब्या लेका..त्या ऐरहोष्टेश लय कंचा रायते म्हन्तेत. अन आपुन जे सांगू ते त्याईले कराचं लागते म्हन्ते. मजा हायं लेका तुयी."

"अबे सायच्या तमाशा हायं का तो आपुन सांगू ते ऐकायला?? कोन सांगते बे तुमाले हे? आनसान का गब्ब्याच्या घरावर गोटे?"

"गब्ब्या त्वां खिडकीजवळची शिट आदीच शितून घेजो गपकन. तिथूनच लय मजा दिसते."

"अबे येष्टी व्हय का बे ते मजा दिसाले. तुमाले अक्कलच नाही लेका थोडीबी. गब्ब्या तू साईडलेच बसजो. म्हंजे ते ऐरहोष्टेश तुले खेटून जाइन एखांद्यावेळी. तेव्हढीच मजा तुले."

"गब्ब्या त्वां काहीपन कर लेका, पन आपल्याला थोडी दारू घेऊन ये एरपोर्टवरून. तिथं येक नंबर माल असते म्हने."

"अबे पैसे लागते ना बे दारूले."

"अबे माया मामा गेलंता इमानात. तो सांगे,एकदा का इमानात चढलं की सारं फुकट रायते म्हने. जवळ येऊ येऊ येऊ चॉकलेटं वाटते म्हने. आपन मांगतली तं दारू बी भेटते उलशीक."

"अबे दारूगिरु भेटनं ते बराबर हायं, पन हा गब्ब्या चाल्ला त्येच्या बायकोले घेऊन! त्याले दारूच्या गुत्त्यावर तं येऊ देत नाही गावात. इमानात कायची दारू पिते गब्ब्या??"

"हा लेका गब्ब्या..हे बराबर हायं..तुयी बायको करनं रंगाचा बेरंग!!"

"अबे काही होत नाही बेरंग..गब्ब्या त्वां शिटा घेताना बायकोले अन राम्याला पुढची शिट घेजो अन तू घेजो मागची. मंग मजा हायं तुयी. पन थोडं सेटिंग करा लागन तुले."

येक म्हातारा तिथं बसून या फकाल्या ऐकत व्हता. म्हाताऱ्यांनं दुसरं महायुद्ध अन पंच्यात्तरची आनिबानी सारं पाहयेल होतं. त्याचे फंडे अजून वेगळेच होते.
"पोट्टेहो..आता तुमाले सारी मजाक वाटू लागली. पन आम्ही भोगेल हायं या इमानाचे पर्रताप. हे अशे इमानं जायचे डोस्क्यावरून बॉम्ब फेकत वावरात. किती लोकं मेले असतीन त्याची गंती नाही लेकहो. आमी दिवेगीवे बंद करून राहायचो रात्रीचे. दिवा पाहून बॉम्ब फेकला तं कोनाले सांगतां?? अन आता तुमी मजा मारा सायचेहो इमानात बसून."

"आम्ही न्हाय ना बावाजी! हा गब्ब्या चालला इमानात. तुमीच समजवा बा त्याले आता."

गब्ब्या तीतून कवाचाच सटकला व्हता. गब्ब्या तीतून कवाचाच सटकला व्हता. गब्ब्या वान्याच्या दुकानावर किराना घ्यायले थांबला.
"या गब्ब्यासेठ. हे तुमची लिष्ट रेडीचं करून ठेवली. हे घ्या बा."

गब्ब्यानं सामान चेक केलं. सामानाच्या पिशवीत बिल पाहून तो सटकला.
"हे बिल कायले दिलं राजेहो. वहीत लिहून घ्या ना आपल्या नावानं."

"काय बोलता गब्ब्यासेठ!! मी मनलं बा आता तुमी इमानात फिरनारे मांनसं!! तुमी काय आता उधारीत सामान घ्यान का? मांगची उधारी बी लिहून देली हायं त्येच्यात."

"काही बोलता का राजेहो. इथं इमानाचं तिकिट काढून आधीच फाटेल हायं मायी. अन आता हे कुटून देऊ?"

"याले काय अर्थ हायं बे गब्ब्या. मले वाटलं येकतरी गिर्हाईक भेटलं बिनाउधारीचं. इमानात बसूनही सुधारणार नाही सायचेहो तुमी."

हे इमान प्रकरण लयच अंगाशी आलं व्हतं त्येच्या. गब्ब्या घरी पोहोचला तं चार-पाच बायका त्येच्या बायकोले घेरून बसल्या व्हत्या.
"हे पाय सरे..ते इमान सुरु होताना लय भेव लागते म्हने. तू उलसाक अंगारा लावून घेजो तुया अन राम्याच्या डोक्याले. अन येक माळ तेवजो हातात गजाननबाबाचा जप कराले."

"आव माय..ते तिथं साऱ्यासमोर जप करत बशींन तं लोकं म्याट समजतीन न तिले. कायबी सांगते का?"

"समजू दे ना म्याट. ते पोरगं घाबरलं म्हंजे?"

"मी म्हन्ते कायले इशाची परीक्षा पाह्यची? आधीच देवीचा गोंधळ घाल ना घरात!!"

"काय तुमी म्हाताऱ्या अंगारे न गोंधळाच्या गोष्टी करता निस्त्या. ते पाय ना आपली माय पहिल्यांडाव इमानात बसणार हायं ना. तुमच्या खानदानात बसलं होत काय कोनी? तिले मस्त नटून पाठवू आपण इथून. त्या ऐरहोष्टेश झ्यक मारतींन साऱ्या."

"आता हे काय काढलं त्वां नवीन?"

"मंग काय..सरे त्वां कोणती साडी नसणार हायं ते ठरवलं काय?"

"न्हाय ना अजून."

"म्या सान्गते तुले. तुया साऱ्या जुन्या साड्याईले दे टाकून. नवीन नव्वार घेऊन माग गब्ब्याभाऊले."

"म्याट झाली काय तू?"

"तू ऐक माय..तुले मस्त तयार करून पाठवते का नाही बघ नव्या नवरीसारखं!!"

गब्ब्या वसरीवर बसून सारं ऐकून रायला व्हता. त्यानं डोस्क्यावर हात मारला. आता त्यालेही डाउट आला व्हता.

"हे नव्या नवरीचं लचांड पाहून घेतीन का आपल्याले इमानात?"

क्रमश:

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

15 May 2017 - 3:26 pm | टवाळ कार्टा

ख्या ख्या ख्या

पद्मावति's picture

15 May 2017 - 3:34 pm | पद्मावति

=))

खेडूत's picture

15 May 2017 - 3:41 pm | खेडूत

मस्त हो चिनार भाऊ!!
m

rahul ghate's picture

15 May 2017 - 4:15 pm | rahul ghate

लय च भारी लिहून रायले ना चिनार भाऊ , १ शेगाव कचोरी द्याच लागण तुमाले बक्षीस म्हणून

विनिता००२'s picture

15 May 2017 - 4:58 pm | विनिता००२

सक्काळं पासून वाट पाहू पाहू डोले निरा शिनून गेलं !!

पैसा's picture

15 May 2017 - 6:34 pm | पैसा

क्रमशः बघून बर वाटलं!

चैला, चिनार्‍या कसलं भारी उडवून राहिला बे इमान.
=))

एस's picture

15 May 2017 - 7:53 pm | एस

:-)

चिनार's picture

15 May 2017 - 8:48 pm | चिनार

धन्यवाद !!

अमोल काम्बले's picture

16 May 2017 - 12:46 pm | अमोल काम्बले

लय च भारी लिहून रायले ना चिनार भाऊ. येक नम्बर......

चिगो's picture

16 May 2017 - 12:48 pm | चिगो

जबर्‍या, चिनारभौ.. ते 'वर्‍हाड निघालं लंडनला' आठवलं हे वाचून..

वरुण मोहिते's picture

16 May 2017 - 2:14 pm | वरुण मोहिते

ते वर्णन करायचे ना एयरपोर्ट वरचं तसेच .वऱ्हाड निघालं लंडनला मध्ये .असो छान लिहिताय चिनार भाऊ