इमान... भाग १

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
11 May 2017 - 1:52 pm

"आपल्याले येकडावं तरी इमानात बसाचं हाय गड्या."
डोस्क्यावरून उडणाऱ्या इमानाकडं पाहत गब्ब्या म्हनाला.

"येडा झाला का बे तू..तुले कोन घीन का इमानात?"

"काऊन? तिकीट काडल्यावर तं घ्याच लागीन नं त्याईले."

"असं नाय घेत बे कोनाले. इंग्लिश लोकं असतेत तिथं."

"म्हंजे?? अन तुले काय म्हायती बे?? तिकिट काडून यष्टयीत बसतो तसं इमानात बसाचं."

"यष्टयीसारखं नसते बे..यष्टयीत नीरा कोंबतेत लोकाईले..हा त्याच्या उरावर..थो दुसऱ्याच्या मांडीत..तीन शिटावर सहा-सहा लोकं बसतेत. इमानात जेवढ्या शिटा तेव्हढेच माणसं असते. म्हणून तर आपल्यासारख्याले घेत नाही आतमध्ये. तुम्ही सायचेहो ड्रायव्हरच्या शीटवर बी रुमाल टाकानं."

"ते मले माहिती आहे ना बे. मी काय म्हंतो, बा तिकीट काडून जर शिस्तीत मी माया जागेवर बसाले तयार असंनं तं काऊन घेनार नाय मले आतमदे."

"आबे नुसतं तिकीटाची गोष्ट नसते ना. त्याईले स्टॅंडर्ड लोकं पाह्यजे. तू जाशींनं भयाडसारखा पैजाम्यात.

" अन का बे ते सिनेमात चड्डी घालून सारे इमानात बसताना दाखवते. ते कसं चालते?"

"चड्डी नाय बे. बर्मुडा म्हन्ते त्याले. बर्मुड्यात ष्टाईलीश वाटते म्हनून चालते."

"पँट-शर्ट घालून जातो नं बा! मंग तं झालं?"

"अन सामान कायच्यात नेशींनं? तुया फाटक्या गोधडीत?"

"बॅग हाय ना मायाकडे. बटन तुटलं हाय त्याचं. घेतो दुरुस्त करून. न्हायतर गुंडाळतो त्याले सुतळी."

"हे पाय आता कसं बोल्ला. हे अशे सुतळी गुंडाळायचे गावरान धंदे करता तुमी. चांगली महागाची बॅग घ्या लागते. त्याले चाकं असते खालून. अन वरतून ओढायले खटका देल्ला असते. तू नेशींनं बॅग डोक्यावर ठेऊन तिथं साऱ्यासमोर."

"अबे पन मायी बॅग,माये कपडे,मायं सामान मी नेतो नं माया हिशोबानं!! मी डोक्यावर नेईन न्ह्यतर बैलगाडीत टाकून नेईन. प्रत्येक गोष्टीत कायचं स्टॅंडर्ड आलं बे??"
"तुया हिशोबानं म्हंजे?? हे पाय प्रत्येक ठिकाणचा हिशोब वेगळा असते. तसंच करा लागते राजा.आता तुले माहिती हाय का? सामानाचं वजन बी ठरवलं असते इमानात. त्येच्यापेक्षा जास्त नेऊ देत नाही."

"असं बी असते का?"

"मंग! तू जाशींनं साऱ्या गावाचे बोचके-बाचके घेऊन. अन ते सामान तुले काउंटरवर जमा करा लागते. मंग मुक्कामावर पोचलं की भेटते तुले वापस."

"अन नाही भेटलं म्हंजे?"

"अबे चिट्ठीवर लिहिलं असते ना किती सामान हाय ते. सगळं येते बरोबर. अन ते एका पट्ट्यावर सोडते सारं सामान. आपल्याले उचला लागते त्याच्यावरून."

"अन माय सामान कोनी मायाआधीच उचलून नेलं म्हंजे?"

"असा कोनता खजिना घेऊन चाल्ला बावा तू? अन तुये पैजामे चोरन्यातं कोनाले इंट्रेष्ट असंनं?? अन समाज चोरले तं पोलीस असते तिथं. त्याईले सांगजो."

"ते पन बराबर हाय म्हना. पन भुरटे सगळीकडेच असते ना बे! बरं पैशेगिशे कुठे ठेव्हाचें? ते पन जमा करा लागते काय?"

"हाव..तिथं दानपेटी ठेवली असते त्याईनी! मंग ते येरहोष्टेश म्हन्ते द्या बा तुमच्या हिशोबानं! येडा झाला का बे तू? पैशे सोबतच ठेव्हाचें."

"अन पुडी? चालते का आतमध्ये?"

"कायची?"

"गायछापची पुडी बे."

"पुडी चालन पन खाऊ नको बावा आतमध्ये."

"काऊन?"

"काऊन म्हंजे? नाही चालत आतमध्ये. आदी गायछाप खाशीनं मंग बिडी बी लागनं तुले."

"बरं नाही खात बा. म्या सगळं व्यवस्थित शिकून घेतो ना आधी. पन आपल्याले येकडावं तरी इमानात बसाचं हाय गड्या."

"अन खर्च कुटून करशीन बे? तुय सामान-सुमान,नवीन बॅग,तिकीट, अन नागपूरले जा लागन इथून तो खर्च वेगळा,बरं वापस या लागनं मुमैवरून. सगळं मिळून धा हजार तं कुठंच नाय गेले गड्या. "

"ते जमवतो मी कुटून बी. तू फक्त तिकिटाचा जुगाड दे जमवून."

"बायकोला बी घेऊन जातं काय सोबत?

"पागल झाला काय? तिले कायले सोबत नेऊ?"

"मले वाटलं जोडीबिडीनं जाचं असंनं तुले."

"नाय बे? तिले सोबत घेतलं तं पोट्ट्यालें पन न्या लागन. एवढा लचांड घेऊन कुठं जातं?"

"पन सांगशीन काय तिले?"

"तिले का सांगाच. तिले देतो बापाकडं पाठवून चार-आठ दिवस. अन मंग जातो मी इमानात. तू काय सांगू नको फक्त हे कोनाले."

"म्या कायले सांगतो बावा.पन मले येक डाउट हाय राजा."

"काय बे?"

"तुले घेतीन का इमानात?"

"आता काऊन बे? सोयरा बनून जाईन ना मी."

"अबे पन थोबाडावरूनच भैताड दिसतं ना तू? त्याचं काय करशीन?"

"तू जाय बे तिकिटाचा जमवं सायच्या. मी पायतो काय कराच ते."

क्रमश:

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

राजाभाउ's picture

11 May 2017 - 1:58 pm | राजाभाउ

मस्त सुरुवात. पुभाप्र

खेडूत's picture

11 May 2017 - 2:08 pm | खेडूत

मस्त चिनारभऊ!
वाचतोय!
जाऊद्या त्याले. अशेबी आता लई भैताड लोक बसते ना इमानात.

इरसाल कार्टं's picture

11 May 2017 - 3:01 pm | इरसाल कार्टं

पुढील भाग लवकर येउद्या

बापू नारू's picture

11 May 2017 - 3:10 pm | बापू नारू

मस्त लेख ,काहीतरी नवीन विषय...मज्जा येईल _/\_

मित्रहो's picture

11 May 2017 - 7:17 pm | मित्रहो

इमानात चालत नाही
आवडल

टवाळ कार्टा's picture

11 May 2017 - 7:31 pm | टवाळ कार्टा

लय भारी....बाकी इमानात सूट बुटातले सुद्धा नमुने असतात....इमान ल्यांड होउन थांबले पण नसेल तरी सिटबेल्ट सोडणे, मोबाईल सुरु करायची घोषणा होण्याआधीच मोबाईल सुरु करणे, उतरायचा जिना लावून विमानाचे दार उघडायची वाट न बघता विमान थांबल्या थांबल्या जागेवरुन उठून बॅगा काढून सिटच्या मधल्या मार्गीकेत उभे राहून इमानाची एश्टी करणे, इत्यादी इत्यादी

चांदणे संदीप's picture

11 May 2017 - 10:55 pm | चांदणे संदीप

बाकीच्या गोष्टींचा आपल्याला काय विशेष त्रास नाही पण च्यायला विमानाची यष्टी केल्यावर मी लै कष्टी होतो. :(

Sandy

स्रुजा's picture

11 May 2017 - 11:06 pm | स्रुजा

खि: खि: खि:

टकाने आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन परत येताना भारतीय प्रवाशांचं निरीक्षण केलेलं दिसतंय ;)

हायला, एवढे मिपाकर विमानाने फिरतेत,
कोंनतरी सांगा ना.
इमानात गाय छाप चालते का,,?

संजय पाटिल's picture

12 May 2017 - 12:12 pm | संजय पाटिल

गायछाप चालते भाउ, पण पिचकारी माराची पंचाइत हुन र्‍हाते...

चिगो's picture

15 May 2017 - 4:05 pm | चिगो

गायछाप चालते भाउ, पण पिचकारी माराची पंचाइत हुन र्‍हाते...

नाही होत का जी.. थे 'एयरशिक' झाल्यावर उलटी करासाठी पिशवी देल्ली रायते, त्याच्यात माराची पिचकारी..

आता म्या सोता काही गायछाप, मावा, गुटका खात नाही, पण येकडाव ईमानात बसलो होतो, तं मांगचा मारवाडी तोंड वर करुन 'हुं हुं हुं' करत माह्या खांद्यावर थोपटत होता. म्या म्हणलं असा काहून बह्याटल्यावानी करुन करुन रायला बापा ह्या? तं मले इशार्‍या-इशार्‍यानं थे पिशवी मांगत्ली त्यानं.. मंग पिंक मारुन झाल्यावर म्हणे, 'क्या भाईसाब? इतना भी नहीं समझते..' म्या म्हणलं अश्याच लोकायपाई म्हणतेत, 'पैसा आला, पण स्टॅन्डर नाही आलं'..

चिनार's picture

12 May 2017 - 9:19 am | चिनार

धन्यवाद !!

अत्रे's picture

12 May 2017 - 9:30 am | अत्रे

हा हा हा !

संजय पाटिल's picture

12 May 2017 - 12:14 pm | संजय पाटिल

*ROFL*

अद्द्या's picture

12 May 2017 - 1:13 pm | अद्द्या

अबे पन थोबाडावरूनच भैताड दिसतं ना तू? त्याचं काय करशीन?

हाहाहाहाहा

भारी सुरुवात.. लवकर टाका

विनिता००२'s picture

12 May 2017 - 2:39 pm | विनिता००२

तिथं दानपेटी ठेवली असते त्याईनी!>>> फूटलेच वाचता वाचता :हाहा:

पद्मावति's picture

12 May 2017 - 9:32 pm | पद्मावति

मस्तच :)

पैसा's picture

12 May 2017 - 10:02 pm | पैसा

मस्त सुरुवात!