अनवट किल्ले ६: तुंगारेश्वराच्या वनात ,कामणदुर्ग (Kamandurg )

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
5 May 2017 - 6:46 pm

वसई शहराच्या पुर्वेला सरासरी २१०० फुट उंचीची सदाहरीत जंगलाने वेढलेली एक डोंगररांग आहे. हि आहे तुंगारेश्वर रांग. याच डोंगररांगेत आहेत वनदुर्ग
म्हणावे असे दोन कस पाहणारे किल्ले, कामणदुर्ग व गुमतारा. यातल्या कामणदुर्गाला आज भेट द्यायची आहे.
kmn17
तुंगारेश्वराचा परिसर तसा मुंबईकरांचा आवडता पिकनीक स्पॉट, चिंचोटीचा धबधबा, पेल्हार तलाव, तुंगारेश्वराचे मंदिर हि भेट देण्याची ठिकाणे. याशिवाय ज्याना ट्रेकींगची हौस ते तुंगारेश्वराच्या सर्वोच्च पठारावर जातात. सदाहरीत जंगलातून केलेली हि दोन अडीच तासाची चढण पक्ष्यांच्या किलबीलिमुळे व झाडीच्या थंडाव्यामुळे आनंददायी आहे. सर्वोच्च पठारावर सदानंद महाराजांचा आश्रम आहे, या ठिकाणी भक्त गणांची ये जा चालुच असते.
पोर्तुगीजांनी जव्हारच्या आक्रमणापासून संरक्षण होण्यासाठी थोडे किल्ल्यासारखे बांधकाम केले होते, आता त्याचे थोडेफार अवशेष उरलेत. सर्वसामान्याना हे तुंगारेश्वर विवीध कारणनी माहिती आहे, पण याच पठाराच्या दक्षिणेला असणारा कामणदुर्ग फारसा कोणाला ज्ञात नाही, अगदी ट्रेकरही इकडे फारसे फिरकत नाहीत.
कामणदुर्गाला जायचे असेल तर दोन मार्ग आहेत.
१ ) लोकलने किंवा गाडीने वसईला जायचे. स्वताची गाडी असेल तर मुंबई - अहमदाबाद रस्त्यावरील चिंचोटिच्या अलीकडून भिंवडीकडे जाणारा फाटा लागतो, त्याने उजवीकडे वळून कामण गावात यायचे किंवा वसई- पनवेल या रूट्वर धावणार्‍या पँसेजरने कामण या स्टेशनवर उतरुन कामण गावात दाखल व्हायचे.
२) पुण्याहून यावयाचे झल्यास पनवेल- कल्याण- भिंवडी व वसई ( याला भिंवडीं बायपास म्हणतात ) रस्त्याने कामण गावी उतरावे.

kmn1

कामण गावातूनच समोर एखाद्या शंखासारख्या आकाराचा तब्बल २१६० फुट उंचीचा कामणदुर्ग दिसतो. ह्या किल्ल्याचे दर्शन ठाणे- बोरीवली रोड, घोडबंदर, वसई खाडीवरचा पुल अश्या विवीध ठिकाणाहुन होते. एखाद्या पुणेरी पगडीसारखा हा किल्ला दिसतो.
हा किल्ला खुप प्राचीन आहे. महिकावतीच्या बखरीमधे याचा उल्लेख "कामवनदुर्ग" असा केलेला आहे, पुढे पोर्तुगीजाच्या ताब्यातून इ.स. १६८३-८४ मधे संभाजी महाराजांनी हा किल्ला घेतला. पोर्तुगीजानी पुन्हा १२ सप्टेंबर १६८५ मधे परत मिळविला. पुढे नेमके साल सांगता येत नाही पण पाण्याच्या अभावी हा गड बेवसावू पडला होता. पुढे ई.स. १७३८ मधे चिमाजी अप्पांच्या उत्तर कोकण स्वारीच्या वेळी या किल्ल्यासंदर्भात एक घटना घडली, वसईच्या किल्ल्यावर हल्ला करायची तयारी सुरु असताना पेशव्यांचे एक सरदार शंकाराजी पंत यांचा तळ कामणदुर्ग जवळच्या जंगलात पडला होता, १७ मार्चला कामणदुर्गावर आगट्या दिसू लागल्या. तेव्हा फिरंग्यानी येउन तिथे ठाणे घातले अश्या समजुतीने शंकराजीपंतानी दिवस उजाडताच तेथे माणुस चौकशीला पाठविले. व शेजारच्या मांडवी ठाण्याची बलकटी करण्यासाठी चिमणाजी बापुजीस २०० लोक देउन तिकडे रवाना केले. शंकराजीपंताचा कयास असा कि शत्रु मांडवीच्या ठाण्यावर येण्याचा विचार करीत आहे, तो अप्पासाहेबास लिहीतो, "गनीम मांडवीवर आला तरी येथून भारीच फौज पाठवावी लागेल, जरी कामणावरी थारा धरला तरी २००० माणूस स्वामीनी पाठवावे. आम्ही एक हजार व बरवाजी तापकीर यैसे लगटाने फस्त करु". पण प्रत्यक्षात कोणी पोर्तुगीज कामणावर आलेच नव्हते."ते वर्तमान बास्कलच ठरले". अगोदरच त्याचा पक्का बंदोबस्त करावा म्हणजे पुढे पस्तावन्याची पाळी नको म्हणुन त्याने कामणवर ठाणे वसवीण्याकरीता शिवाजी अणजुरकर व बाळकोजी
पडवळ यांना १०० माणसे देउन १९ मार्च रोजी कामणचा बंदोबस्त केला.(वसईची मोहिम, पान क्रं. -१०३) हा किल्ला भिंवडीला जा ये करण्याच्या मार्गावर असल्याने चिमाजीअप्पा शंकराजीना लिहीतात, "किल्ला खुष्कीस डोंगराळ व अवघड. गनीम त्या कामास गांडु. वर टाकी तळी आहेत". एकंदरीत हा प्रंसंग म्हणजे लांडगा आला रे आला या गोष्टीसारखा झाला. पण पुढे हा गड पुन्हा ओस पडला. ई.स. १७४२-४३ च्या पत्रा प्रमाणे "किल्ले कोकणदुर्ग ( कामणदुर्ग ) कार्याचा नाही, तो पाडावयाची आज्ञा पेशव्यांकडे शंकराजी केशवांनी मागितली, तेव्हा पेशव्यानी किल्ला कार्याचा नसेल तर पाडण्याची आज्ञा दिली".
ईतिहासातून बाहेर पडून कामणकडे निघुया. कामणदुर्गावर जायचे म्हणजे २ कि.मी. ची तंगडतोड करुन पायथ्याच्या देवकुंडी किंवा बेलकुंडी गाठावी लागते. ह्या दोन्ही गावातून गडावर जाता येते. हा रस्ता मी गेलो तेव्हा कच्चा होता व डांबरीकरण चालू होते. वाटेत एक ओढा आहे, त्यावर पुल नव्हता. आता रस्ता पक्का झाला असावा आणी पुलही झाला असेल. यामुळे आपली गाडी असेल तर वाहन शेवटपर्यंत नेउन हा वेळ आणि तंगडतोड वाचविता येईल. देवकुंडीतुन आम्ही शंकर मंगल चौरा याला गाईड म्हणून बरोबर घेतले. किल्ल्याच्या वाटेवर असलेले बांबुचे वन बघता गाईड घेतलेला चांगला. देवकुंडीतुन एक प्रशस्त वाट बेलकुंडीकडे जाते, थोड्या वेळ या वाटेने चालले कि उजव्या हाताला गडावर चढणारी वाट फुटते. पायथ्याची आदिवासी मंडळी या किल्ल्याला कामणदुर्ग असे संस्कृतप्रचूर नावाने न ओळखता त्यांनी त्याचे नामकरण "कामण्या" असे घरगुती केले आहे.

kmn2

समोर गडाचे शिखर खुप जवळ दिसते, प्रत्यक्षात अजुन ३ ते ३.५ तासाची चढण आहे.

kmn3

ट्रेकक्षितीज संस्थेने वाटेवर असे बाण काढलेले असल्यामूळे वाट बरोबर आहे याची खात्री करायला मदत होते.

kmn4

साधारण अर्धे अंतर चढून आले कि असे बाबूचे घनदाट वन लागते. पावसाळ्यात या टप्यात वाट चुकण्याची शक्यता अधिक, यासाठीच स्थानिक वाटाड्या बरोबर असावा.

kmn5

बांबुचे वन संपले कि हा खुणेचा दगड दिसतो. आता एकच वाट आहे.

kmn6

समोर कातळमाथा दिसतो, मात्र तिथे पोहचण्यास अजून खुप चालायचे आहे.

kmn7

अचानक वाट बरीच खाली उतरून एका खिंडीत येते. इथे दाट झाडी असल्याने अंगत पंगत आणी अंमळ विश्रांती साठी एकदम झक्क जागा. कारण इथून आता सलग चढाई आहे आणि वाटेत थांबायचे ठरविले तरी झाडी नाही.

kmn8

साधारण अर्ध्या तासाच्या खड्या चढाईनंतर एक सपाटी येते. इथे एक प्रेक्षणीय गोष्ट आहे ती म्हणजे ही मुर्ती. कर्णकुंडल धारण केलेले हे बहुधा जोडपे असावे. ही मुर्ती इथे कशी काय याचे गूढ उलगडत नाही.

kmn9

kmn10

या सपाटीवर पाण्याची दोन टाकी आहेत, पण पाणी अर्थात खराबच. या पाण्याच्या एकंदर दुर्भिक्ष्यामुळेच हा बलदंड किल्ला बेवसाऊ ठरला.

kmn11

यात असलेच तर थोडेफार पाणी असते. यानंतर मात्र खरी परिक्षा आहे. बहुतेक ट्रेकर्स मुर्ती पाहिल्यानंतर परत जातात. याचे कारण इथे येपर्यंतच २.५ ते ३ तास मोडलेले असतात.

kmn12

याच्यापुढे एका पाठोपाठ एक असे तब्बल चार रॉक पॅच आहेत. फार अवघड आणि रोप वैगेरे आवश्यक नाही तरी फार सोपेही नाही. एक तर खडा चढ आणि सलग येणारे रॉक पॅच वैताग आणतात. पण माथा खूणावत असतो.

kmn13

kmn14

वाटेत हे सातवाहन कालीन टाके लागते.

kmn15

तसेच हे कातळ कोरीव खळगेही दिसतात. बहुतेक टाक्याकडे जाणार्या पावसाच्या पाण्याचा गाळ बाजूला करणे हा उद्देश असावा.

kmn16

थोड्या कोरीव पायर्‍याही लागतात

kmn16

पण बराचसा रस्ता कड्याशी असा झुंजत चढावा लागतो. पावसाळ्यात हे अधिक धोकादायक होत असेल, त्यामुळे पुरेशी काळजी घेउनच हा टप्पा पार पाडावा.

kmn17

शेवटी एकदाचे अंतिम टप्प्यापाशी येउन पोहचलो.
kmn18

मागे वळून पाहिल्यास आपण हा खडा कडा चढून आलो यावर आपलाही विश्वास बसत नाही. वर पोहचायला तब्बल ३.५ ते ४ तास लागतात. आम्ही तर इतके दमलो होतो कि कॅमेरा काढून फॉटो काढायची ईच्छा होईना. एकतर खडा चढ आणि हवेत असलेला दमटपणा याने हैराण केले होते.
पण वरुन अदभुत नजारा दिसतो. उत्ततेला तुंगारेश्वराच्या डोंगराकडे गेलेली धार दिसते. ईशान्य क्षितीजावर टकमक किल्ल्याचे सुळके खुणावतात, पुर्वेला गुमतारा दिसतो, दक्षिणेला उल्हास नदीचे पात्र दिसते, तीच समुद्राला मिळते आणि वसईच्या खाडीचे रौद्र रुप धारण करते तर पश्चिमेला अरबी समुद्र अर्थात सिंधूसागर आणि वसई परिसराचे विलोभनीय दॄष्य दिसते. भर्राट वार्‍याने सारा शीण घालविला.
माथ्यावर खराब पाण्याच्या टाक्याशिवाय विशेष काही नाही. या किल्ल्याचा माथा केकसारखा मधोमध कापला गेला आहे. साधारण पाच मीटर रुंदिच्या दरीने दोन्ही माथे विभागले गेले आहेत. मधे खोल दरी असल्याने पलीकडे जाता येत नाही, तरीही जायचे असल्यास परत मुर्ती असलेल्या सपाटी पर्यंत उतरुन झाडीच्या कडेने वाटेने दुसर्‍या टोकावरही जाता येईल. मात्र तिथे आवर्जुन पाहण्यासारखे काही नाही.
काही जण भिवंडी-पारोळ रस्त्यावरच्या चिंबिच्या पाड्याला उतरून कुहे या आदिवासी वस्तीकडुन या दुसर्‍या माथ्यावर येतात. या बाजूने वाट सोपी आहे शिवाय रॉक पॅचही अवघड नाहीत.
गडावर पाण्याची एकूणच बोंब असल्याने इथे यावयाचे झाल्यास ऑगस्ट ते फेब्रुवारी हा काळ चांगला. खालच्या बेलकुंडी, देवकुंडी किंवा कामण गावात खाण्याची काही सोय होणे शक्य नाही. पण वसई- भिवंडी रोडवर धाबे असल्याने तिथे खाण्याची सोय होउ शकेल.
चार तास चढाई तर अडीच तासाची उतराई करून कसेबसे पाय ओढ्त आम्ही कामण फाट्यावर आलो, माझ्या मामेभावाला कामानिमीत्त मुंबईला परत जायचे होते तर, माझे पुढचे लक्ष्य होते, गुमतारा. त्यासाठी मला मुक्कामाला भिवंडीला जायचे होते.
याच गुमतार्‍याची भंटकंती आपण पुढच्या आठवड्यात करणार आहोत.
kmn16
कामणदुर्ग परिसराचा नकाशा

संदर्भग्रंथः-
१ ) ठाणे जिल्हा गॅझेटियर
२ ) शोध शिवछत्रपतींच्या दुर्गांचा:- सतिश अक्कलकोट
३ ) डोंगरयात्रा:- आंनद पांळदे
४ ) वसईची मोहिम :-यशवंत नरसिंह केळकर
५ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट

प्रतिक्रिया

तेजस आठवले's picture

5 May 2017 - 7:22 pm | तेजस आठवले

फक्त तुंगारेश्वर पठारावर आश्रमापर्यंत जायचे असल्यास कसे जावे ? ५५+ वयाच्या लोकांना जाता येऊ शकेल का ? रस्ता कसा आहे ?
तसेच, सध्या उन्हाळ्यात जाण्यात काही अर्थ आहे का ?

इरसाल कार्टं's picture

6 May 2017 - 7:50 pm | इरसाल कार्टं

१) मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सातिवली गावाहून.
२) ठाणे/कल्याण-भिवंडी-अंबाडी-शिरसाड फाटा या मार्गावर अंबाडी नंतर शिरसाडकडे जाणाऱ्या रस्त्यावर पारोळ गावाजवळून.
ड्रायव्हर चांगला असल्यास गाडी वर नेऊ शकता. अगदी ट्रक्सही जातात वर. रास्ता मात्र कच्चा आहे. पायीही जात येते.

तुमच्याच कामण ब्लॅागच्या लिंक्स वापरून-

१)



ट्रेकक्षितीज संस्थेने वाटेवर असे बाण काढलेले असल्यामूळे वाट बरोबर आहे याची खात्री करायला मदत होते.
३)


साधारण अर्धे अंतर चढून आले कि असे बाबूचे घनदाट वन लागते. पावसाळ्यात या टप्यात वाट चुकण्याची शक्यता अधिक, यासाठीच स्थानिक वाटाड्या बरोबर असावा.


बांबुचे वन संपले कि हा खुणेचा दगड दिसतो. आता एकच वाट आहे.

यशोधरा's picture

5 May 2017 - 7:25 pm | यशोधरा

मस्त लिहिलंयत हो, पण एकही फोटो दिसत नाहीये.

प्रीत-मोहर's picture

5 May 2017 - 7:31 pm | प्रीत-मोहर

मला केवळ पहिला आणि शेवटचा असे दोनच फोटो दिसताहेत.बाकीचे फोटो सासं ना सांगुन नीट करून घ्याल का?

वरुण मोहिते's picture

5 May 2017 - 7:31 pm | वरुण मोहिते

अश्या मालिका चालू ठेवा .

दुर्गविहारी's picture

5 May 2017 - 8:55 pm | दुर्गविहारी

सर्वप्रथम यशोधराताई, प्री-मो ताई , तेजस आठवले आणि अर्थातच वरुण भाउ (;) धन्यवाद.
तुंगारेश्वराच्या पठारावर जाण्यास कच्चा गाडी रस्ता आहे. तरी देखील तुम्ही कोणत्या प्रकारचे वाहन नेणार त्यावर अवलंबून आहे. शक्यतो पायथ्याला एखाद्या स्थानिकाला रस्त्याची अवस्था विचारूनच गाडी घेउन जावे. +५५ असेल तर चालत जा हे मी सुचविणार नाही.
बाकी फोटोमधे काय गडबड झाली आहे ते कळत नाही. आधीच्या धाग्याप्रमाणेच मी फोटो अपलोड केले आहेत, मला तरी डेस्कटॉपवर फायरफॉक्स मधे फोटो दिसत आहेत. सं. मं. कृपया मदत करा.

इमेज राइट्स पब्लिक करा म्हणजे फोटो दिसतील.

निशाचर's picture

6 May 2017 - 3:57 am | निशाचर

छान लिहिलंय.
पण मलाही पहिला फोटो आणि शेवटचा नकाशा फक्त दिसत आहेत.

अल्बमची लिंक देतोय . सं.मं. कृपया मदत करा.
https://goo.gl/photos/gRQQkspA8eVqhmUy9

पैसा's picture

6 May 2017 - 1:07 pm | पैसा

या कामासाठी एक दोन नव्हे दहा साहित्य संपादक आहेत. http://www.misalpav.com/node/39310

दुर्गविहारी's picture

6 May 2017 - 8:54 pm | दुर्गविहारी

या पैकी कुणीही मदत केली तरी चालेल, अल्बमचे सेटींग बदलूनही प्रॉब्लेम सुटला नाही. या आधी वापरलेली पध्दत वापरूनही असे का झालय समजत नाही?
ब्लॉगची लिंक देतोय
Trek the Sahyadris
त्याच बरोबर गुगल फोटो अल्बमची लिंकही देतोय
photo of Kamandurg
उपलब्ध सां. स. पैकी कोणीहि बदल केला तरी चालेल. जर यामुळे हाच प्रॉब्लेम कायम राहिला तर धागा उडवावा, मी नवीन धागा परत पोस्ट करतो.

कंजूस's picture

7 May 2017 - 7:29 am | कंजूस

#Trek the Sahyadris-
- लिंक चालत नाही

#photo of Kamandurg
- अॅडल्ट कंटेंट वार्निंग येते.
# गुगल लॅागिन करूनही फोटो दिसत नाहीत.तुमचे पब्लिक अॅक्सेस बरोबर अॅक्टिवेट झाले का?
गुगल फोटो दळभद्री आहे. दुसरी साइट वापरा.
लेख उडवायची गरज नाही. फोटो दुसरीकडून टाका.

कंजूस's picture

7 May 2017 - 10:11 am | कंजूस

कामणची ब्लॅाग लिंक
Trek The Sahyadris: अनवट किल्ले ६: तुंगारेश्वराच्या वनात ,कामणदुर्ग (Kamandurg ) :http://bhatakantisahyadrichi.blogspot.in/2017/05/kamandurg.html?m=1

यामधल्या लिंका वापरून फोटो येत आहेत. थोडे width ,height trial करा.

लिंकमधले फोटो दिसत आहेत. साहित्य संपादक आयडीला फोटो पुन्हा प्रकाशित करण्यासाठी विनंती करा. त्यानी समजा नाहीच केले तरी लिंकवर फोटो दिसत आहेत.

सतिश गावडे's picture

6 May 2017 - 2:05 pm | सतिश गावडे

फक्त पहीला फोटो दिसत आहे. त्यातली गर्द झाडी पाहून छान वाटले.

लेख छानच लिहिलाय. लिंकामधून सर्व फोटो दिसले.

अप्रतिम मालिका आहे ही.

पाटीलभाऊ's picture

8 May 2017 - 11:32 am | पाटीलभाऊ

गुगल फोटो अल्बमवरून फोटो बघितले...मस्त आहेत.
अशीच भटकंती सुरु ठेवा.

दुर्गविहारी's picture

8 May 2017 - 11:39 am | दुर्गविहारी

धन्यवाद कंजुस काका, सतिश गावडे सर, पैसा ताई, वल्लीदा आणि पाटीलभाऊ. ईरसाल कार्ट यांनी फोटो अपलोड केले या बद्दल त्यांचा आभारी राहीन.

नीलमोहर's picture

8 May 2017 - 3:30 pm | नीलमोहर

लेखात फोटो अपलोड केले आहेत, ते बरोबर आलेत का बघून घ्याल.

दुर्गविहारी's picture

8 May 2017 - 9:00 pm | दुर्गविहारी

मला वाटते आता फोटो दिसण्यात कोणतीच अडचण नाही. पुढच्या धाग्यात हा प्रॉब्लेम येणार नाही याची काळजी घेइन.

सूड's picture

9 May 2017 - 6:35 pm | सूड

फोटो दिसले एकदाचे.