ये कश्मीर है - दिवस दुसरा - १० मे

एक_वात्रट's picture
एक_वात्रट in भटकंती
1 May 2017 - 12:21 am

टीपः छायाचित्रांवर टिचकी दिल्यास ती मोठ्या स्वरूपात पाहता येतील.

आज आमच्या काश्मीर सहलीचा पहिला दिवस. आम्ही हाउसबोटीबाहेर पडलो आणि शेजारच्या बागेत गाडीची वाट पहात बसलो. ही बाग महानगरपालिकेने बनवलेली एक छोटीशी पण देखणी बाग होती. बागेत माझे लक्ष वेधून घेतले ते दोन गोष्टींनी. पहिली गोष्ट म्हणजे बागेत उभा असलेला चिनारचा प्रचंड वृक्ष आणि दुसरी गोष्ट म्हणजे जागोजागी फुललेले गुलाब. या गुलाबांमधे लाल, पांढरा, गुलाबी असे अनेक रंग होते. एकेका झाडाला अक्षरश: शेकड्यांनी फुले लगडलेली होती आणि सगळी एकजात टपोरी. कुंपणांवर सोडलेले ते गुलाब पाहून मला आपल्या इकडच्या गुलबकावलीची आठवण आली. पण गुलबकावली ती गुलबकावली आणि गुलाब तो गुलाब. त्याचा तोराच वेगळा आहे, फुलांचा राजा उगीच नाही म्हणत त्याला!

येतो येतो म्हणता म्हणता आमच्या चालकसाहेबांनी पाऊण तास घेतला. आणि आम्ही पाहतो तर आजची गाडी नि चालक दोघेही वेगळे. “नमस्ते, मी सज्जाद. आजपासून मीच तुमच्याबरोबर असणार आहे.” आमच्या चालकाने ओळख करून दिली. गाडीत बसून आम्ही निघालो. एका छोट्याशा हॉटेलात नाश्ता केला आणि आजच्या आमच्या पहिला थांब्याकडे अर्थात शंकराचार्य मंदीराकडे कूच केले.

शंकराचार्य मंदीर श्रीनगरमधे शंकराचार्य अर्थात् सुलेमान टेकडीवर बांधलेले आहे. वळणावळणाच्या रस्त्याने गाडीने वरपर्यंत आलो की आपण मंदिराच्या पायथ्याशी येऊन पोचतो. पण तरीही मंदिरात पोचण्यासाठी जवळजवळ २०० पाय-यांची चढण आहेच. वर काहीही नेण्यास परवानगी नसल्याने जवळच्या सगळ्या वस्तू (कॅमे-यासकट) गाडीत ठेवून आणि स्वत:ची तपासणी करून घेऊन आम्ही निघालो. मंदीर लहानसे आहे. मध्य किंवा दक्षिण भारतातल्या मंदिरांमधे दिसते तशी भव्यता किंवा कलाकुसर या मंदीराला नाही. पण त्याच्या साधेपणातही एक मन मोहून टाकणारे सौंदर्य आहे. (अर्थात भव्य मंदीर उभारण्याइतकी जागाही या टेकडीवर नाही.) आम्ही देवाचे दर्शन घेतले आणि मंदिराच्या आवारात थोडे विसावलो. वरून दिसणारे दृश्य सगळा थकवा विसरायला लावणारे आहे. दल सरोवर, नगीन सरोवर, या सरोवरांमधे पहुडलेल्या हाऊसबोटी, पाण्यातून इकडेतिकडे जाणारे शिकारे, आटोपशीर श्रीनगर शहर असे नयनमनोहर दृश्य वरून दिसते. मंदिराच्या आवारात चिनारचा एक भलामोठा वृक्ष आहे; त्याने मंदिराचे सौंदर्य द्विगुणित केले आहे. मंदिराचे वातावरण तिथून निघूच नये असे वाटावे असे आहे, पण आम्हाला अजून अख्खे श्रीनगर शहर पहायचे होते, तेव्हा नाईलाजाने तिथून निघालो.

आमचा आजचा दुसरा थांबा होता “परी महल”. परी महल ही एक सात मजली बाग आहे. इतर मुघल बागांहून ही बाग थोडीशी वेगळी आहे. खरंतर ही एक मुघल बाग नाहीच. (मुघल बागा तीनच - चष्मेशाही, निशात नि शालीमार.) पहिली गोष्ट म्हणजे ही बाग इतर बागांपेक्षा बरीच उंच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतर बागांमधे दिसणारे खेळते पाणी या बागेत नाही. इथे आम्ही थोडाच वेळ थांबलो. आपल्या मित्रांना विसरून मागे राहिलेल्या एका चुकार ट्युलीपची काही छायाचित्रे काढली आणि चष्मेशाही बागेकडे निघालो.

झबरवान डोंगररांग पार्श्वभूमीला ठेवून दल सरोवारासमोर तीनही मुघल बागा बनविण्यात आल्या आहेत. चष्मेशाही सगळ्यात लहान, नंतर निशात नि सगळ्यात मोठी शालीमार. आम्ही सुरुवात केली ती 'चष्मेशाही 'बागेपासून. 'चष्मेशाही ' म्हणजे 'राजेशाही झरा'. एका गोड पाण्याच्या झ-याला मध्यवर्ती ठेवून ही बाग वसवण्यात आलेली आहे. बागेच्या एका टोकाशी बांधलेल्या एका झोपडीतून हा झरा बागेत प्रवेश करतो. (इथेच तुम्ही त्याचे पाणी पिऊ शकता.) बाग देखणी आहे यात काही शंकाच नाही, पण तिचे सौंदर्य दहा पटीने वाढले आहे ते ह्या झ-याने. झुळझुळ वाहणारे हे पाणी पाहिले की चित्त निवते आणि जिवाला स्वस्थता मिळते.

परी महालापेक्षा इथे गर्दी भरपूर होती. ('परी महल' फारसा प्रसिद्ध नसावा.) आम्ही तिथे होतो तेव्हा बरोबर बारा वाजले होते तरी अस्वस्थ वाटत नव्हते. हा काश्मीरच्या वातावरणाचा परिणाम होता की ह्या सुंदर बागेचा? बागेत विविध प्रकारची फुले होती, त्याबरोबरच झाडांची कापणी विशिष्ट प्रकारे करून त्यांना आकर्षक आकार दिले होते. एकूणच बागेची निगा उत्तम राखलेली दिसत होती. आम्ही झ-याचे पाणी प्यायलो (प्रामाणिकपणे सांगायचे तर पाणी फारसे चवदार नव्हते), जरा इकडेतिकडे रेंगाळलो आणि मग निघालो. आम्हाला अजून बरेच काही पहायचे होते.

यानंतरची बाग होती 'निशात बाग'. 'निशात' म्हणजे 'आनंद'. निशात बागेचे मराठीत भाषांतर करायचेच झाले तर 'आमोदबाग' असे करता येईल. 'चष्मेशाही' बाग सुंदर आहे, पण निशात बागेत आल्यावर ख-या अर्थाने एका काश्मीरमधल्या बागेत आल्यासारखे वाटते. आकाराने ही दुस-या क्रमांकाची मुघल बाग आहे. बारा टप्प्यात विभागलेली ही बाग जवळजवळ ५५० मी लांब आणि ३५० मी रुंद आहे. तिकीट काढून आम्ही आत शिरलो, गर्दी होती, पण बागेचा विस्तार मोठा असल्याने तिचा त्रास होत नव्हता. आम्ही पटापटा चालत निघालो आणि बागेच्या दुस-या टोकाशी जाऊन पोचलो. इथे चिनारचे काही विशाल वृक्ष उभे होते. एकमेकांशेजारी दाटीवाटीने बसलेली रसरशीत हिरवी पाने हे चिनारच्या झाडाचे वैशिष्ट्य. आम्ही या झाडांखाली बसलो. पाणी वहात होते, कारंजी उडत होती. (विजेचा वापर होत नसतानाही ही कारंजी कशी उडत होती हे मला अजूनपर्यंत समजू शकलेले नाही.) वाहते पाणी बागेच्या दुस-या टप्प्यात असलेल्या एका टाकीत पडत होते. बरीच लहान मुले तिथे खेळत होती. समोर दल सरोवर पसरले होते. आणि फुले? इंद्रधनुष्यातला एकही रंग नव्हता ज्याला फुलांनी आपलेसे केले नव्हते. आम्ही थोडे विसावलो. तीन बागा पाहून थकलो होतो, तेव्हा जरा सैलावलो. निशात बागेतला आनंद आपल्या मनात साठवू लागलो.

पण थोड्याच वेळात भूक लागल्याची जाणीव झाली आणि आम्ही उठलो. आज दिवसभर इथेच रहावे असे वाटत असूनही निशात बागेला अलविदा केला आणि निघालो.

जेवण करून आम्ही शालीमार बागेत शिरलो तेव्हा दुपार टळू लागली होती. शालीमार म्हणजे सर्व मुघल बागांचा मुकुटमणी. सम्राट जहांगीरनं आपली पत्नी 'नूर जहाँ' हिला खूश करण्यासाठी ही बाग १६१९ साली उभारली; तेव्हापासून ती श्रीनगरच्या मुकुटातील हिरा म्हणून मिरवते आहे. इतर बागांपासून हिचं वेगळेपण म्हणजे हिच्यात असलेलं दगडी बांधकाम. उंचच उंच गेलेली चिनारची झाडं, नानाविध प्रकारची फुले, आकर्षक आकार दिलेले वृक्ष हे सगळं इथे अर्थातच आहे, पण ही बाग लक्षात राहते ती तिच्या मध्यभागी असलेल्या मोठ्या दगडी महालामुळं, त्याच्याभोवती असलेल्या मोठ्या तळ्यामुळं, आणि त्या तळ्यात असलेल्या अनेक कारंज्यांमुळं. महाल म्हटलो तरी हा बंदिस्त महाल नाही; हा चारही बाजुंनी मोकळा आहे. त्यामुळे कुठेही बसलो तरी ही कारंजी दिसतातच. महालात सुखद गारवा आहे. तिथे बसले की दर उन्हाळ्यात सम्राट जहांगीर आपला सगळा लवाजमा घेऊन काश्मिरात का येत असला पाहिजे या प्रश्नाचे उत्तर कळते!


done

आज ह्या बागांमधे काश्मीरी लोकांची एवढी गर्दी का हा प्रश्न मला सकाळी पडला होता, त्याचं उत्तर अचानक मिळालं. आज रविवार होता. आपण सारसबागेत जातो तशी ही सगळी मंडळी दुपारी मजा करायला शालीमार बागेत आली होती.

ह्या महालातून पाणी एका पाटाने पुढे जाते. ह्या पाटाच्या कडांवर बसता येते. मी तिथे पाण्यात पाय सोडून बसलो. तिथं तसं बसल्यावर मला अमीर खुस्रोच्या त्या प्रसिद्ध ओळी आठवल्या. काश्मीरबाबत तो म्हटला होता, "ह्या दुनियेत स्वर्ग असेल तर तो इथेच आहे, इथेच आहे, इथेच आहे!" आणि मला त्याचं ते म्हणणं पटलं. असं वाटलं की कायमचे नाही, तरी उन्हाळ्यातले दोन महिने श्रीनगरमध्ये स्थायिक व्हावं. रोज ह्या शालीमार बागेत यावं. पाण्याचं हे थुईथुई नाचणं पहावं, त्याचं संगीत ऐकावं. चिनारच्या पानांची सळसळ पहावी आणि पृथ्वीवर स्वर्गाचा आनंद घ्यावा. काश्मीरमधल्या लोकांचं जीणं सोपं नाही, पण मला त्या दिवशी मात्र त्यांचा हेवा वाटला हे खरं!

आम्ही दोन तास शालीमार बागेत होतो. आता पाच वाजत आले होते. आम्हाला श्रीनगरमधली अजून दोन ठिकाणं पहायची होती. आत्ता निघालो नसतो तर अंधार पडल्यामुळं ती ठिकाणं पाहता आली नसती. तेव्हा स्वत:ला अक्षरश: ढकलत आम्ही तिथून बाहेर पडलो. (निघताना मी दहादा तरी बागेकडं वळून पाहिलं असेल.) थोडी पेटपूजा केली आणि गाडी 'शाह - ए - हमदान खानकाह्' या पुढील आकर्षणाकडे वळवली.

(इथे माझ्या कॅमे-याची बॅटरी ढपल्यामुळे पुढची सगळी छायाचित्रे मोबाईल फोनच्या कॅमे-याने काढावी लागली. :()

खानकाह् म्हणजे प्रार्थनास्थळ. मुस्लीम धर्मियांची एकत्र येण्याची, प्रार्थना करण्याची जागा. ही जागा श्रीनगरच्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांमधे गणली जात नसली तरी ती सुंदर आहे अशी माहिती मी काढली होती आणि त्यामुळेच आमच्या 'काहीही पहायचे सोडायचे नाही' या धोरणानुसार (याला मी खरडून खरडून पाहणे म्हणतो) आम्ही ती पाहायला निघालो होतो. हा खानकाह् 'शाह सिकंदर' यांनी 'मीर सईद अली हमदानी' यांच्या काश्मीर भेटीप्रित्यर्थ १३७२ साली बांधला. मूळ वास्तू अनेक वेळा आगीच्या भक्ष्यस्थानी पडली ; आज दिसत असलेली वास्तू साधारण अठराव्या शतकात बांधली गेली असावी असा अंदाज आहे. हा खानकाह् पूर्णपणे लाकडात बांधला गेला असून त्याचे मुख्य आकर्षण आहे या लाकडावरचे नक्षीकाम. हे नक्षीकाम स्थानिक कलाकारांकडून करून घेतले गेले असून ते काश्मीरच्या लाकुडकलेचे उत्तम प्रदर्शन मानले जाते आणि खरेच ते तसे आहे. सगळेच नक्षीकाम सुंदर असले तरी लाकडात केलेल्या जाळीचे काम आवर्जून पाहण्यासारखे आहे.

अमुस्लिम लोकांना मुख्य प्रार्थना गृहात जाण्याची परवानगी नसली तरी आत डोकावून पाहण्याची (नि चक्क फोटो काढण्याची ) परवानगी आहे. आम्ही अर्थातच या परवानगीचा गैरफायदा घेतला नि भरपूर फोटो काढले. आतले दृष्य आपल्या नेहमीच्या मशिदीसारखे होते. काचेची अनेक विशाल झुंबरे छताला लटकवलेली होती. छताला नि खांबांवर धातूचे नक्षीकाम होते. काही लोक नमाज पडत होते.

खानकाह् च्या बाहेर दगडी चौथरा आहे. यावर कबुतरांसाठी दाणे टाकले जातात. दगडी चौथरा, त्यावर दाणे टिपणारी कबुतरे आणि त्यांच्या समोर लाकडात बनवलेला देखणा खानकाह्. सगळे दृष्य कसे अगदी एखाद्या कसबी चित्रकाराने काढलेल्या चित्राप्रमाणे जमून आलेले होते!

नंतर आम्ही 'जामी मस्जिदी'त गेलो. या मशिदीने मात्र माझी निराशा केली. ही मशीद भव्य आहे खरी, पण ती विटांमधे बनवलेली आहे. अर्थात, तिच्यावर नक्षीकाम वगेरे काही नाही. मशिदीचे प्रांगण मात्र अगदी प्रशस्त आहे. सुंदर आकार दिलेली झाडे आणि अनेक कारंजीही तिथे आहेत.

मशिदीनंतर आमची गाडी वळली ती एका वस्तु भांडार 'कम' कार्पेट कारखान्याकडे. इथे शाल, स्कार्फ अशा काही फुटकळ वस्तुंची खरेदी झाली. काश्मीरमधला तो सुप्रसिद्ध “काहवा” चहाही आम्हाला इथे प्यायला मिळाला. नंतर कार्पेटस् कशी बनतात हे आम्हाला दाखविण्यात आले. हाताने विणले जाणारे एक कार्पेट बनवण्यास काही महिने लागतात आणि त्याची किंमत काही लाखांत असू शकते ही माहिती आम्हाला नवीन होती. 'काश्मीरमध्ये कार्पेटस् बनवण्याची कला आता नामशेष होते आहे. एवढा वेळ देण्याची नि हे कष्टाचे काम करण्याची मानसिकता आज काश्मीरी मुलांची नाही' हे ऐकल्यावर वाईट वाटले. नंतर आम्ही काही कार्पेटस् पाहिली. मात्र पुण्यातील सदनिकांप्रमाणे त्यांचा 'कार्पेट एरिया' आणि त्यांची किंमत यांचे गणित जुळत नसल्याने ती खरेदी करण्याचा विचार आम्हाला सोडून द्यावा लागला.

ह्या सहलीला येताना २०१४ सालच्या पुरानंतर श्रीनगर कितपत सावरले आहे हा एक प्रश्न आमच्या सगळ्यांच्याच मनात होता. पुरानंतर परिस्थिती मूळपदावर आली असली तरी पुराच्या काही खुणा अजून शिल्लक असल्याचं आम्ही शहर फिरताना पाहिलं होतंच. एखादं पडकं घर दिसत होतं, एखाद्या घरावर पाणी जिथपर्यंत चढलं होतं ती रेषा दिसत होती. हाऊसबोटीकडे परत जाताना आम्ही सज्जादला पुराविषयी विचारलं. “वहॉं उस चौकमें बोटस् खडी हुऑं करती थी. पानी यहॉं तक चढा था.” सज्जाद माहिती देत होता. एवढी मोठी आपत्ती येऊनही सरकारनं काहीच केलं नाही ही तक्रारही त्याने बोलून दाखवली. “सरकारने पूर आला असताना काहीच केलं नाही. पुरात खूप घरं पडली आणि कित्येकांचं नुकसान झालं. पूर ओसरल्यावर सरकारनं प्रत्येकाला ५०००० रुपये दिले. एवढ्या पैशात घर कसं बांधणार?” त्याचा हा प्रश्न रास्त होता आणि आमच्याकडे त्याचं उत्तर नव्हतं.

हाऊसबोटीत पोचल्यावर आम्ही जरा ताजेतवाने झालो आणि पुन्हा बाहेर पडलो. बाहेर एका हॉटेलात जेवून आणि बागेत शतपावली करून आम्ही हाउसबोटीत पोचलो तेव्हा रात्र बरीच झाली होती. किंचीत थंडी, खोलीतल्या झुंबरांचा मंद पिवळा प्रकाश, आरामदायी पलंग आणि उबदार रजया -- मेहफिल कशी मस्त जमून आली होती. काही क्षणांतच निद्रादेवींचे आगमन झाले आणि त्यांनी आम्हाला त्यांच्या राज्यात ओढून नेले.

उद्या? सोनेरी सोनमर्ग!

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 May 2017 - 12:51 am | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं चालली आहे सफर ! फोटो सुंदर आहेत.

वा! हमिअस्त, हमिअस्त, हमिअस्तो!

पद्मावति's picture

1 May 2017 - 1:43 am | पद्मावति

आहाहा.....सुरेख! पुभाप्र.

अर्धवटराव's picture

1 May 2017 - 4:04 am | अर्धवटराव

एक नंबर.

यशोधरा's picture

1 May 2017 - 5:22 am | यशोधरा

वाचते आहे... काश्मीरच्या आठवणी जाग्या होताहेत. पुन्हा जायला हवे.

नि३सोलपुरकर's picture

1 May 2017 - 5:49 am | नि३सोलपुरकर

सुरेख झाला आहे हा भाग देखील .
छान सफर घडवीत आहात आम्हाला काश्मीरची.

पुढील भागाच्या प्रतिक्षेत ...

धन्यवाद ! पुढील भागांच्या प्रतिक्षेत.

कश्मीर भटकंती आवडली.

दशानन's picture

1 May 2017 - 8:11 am | दशानन

अप्रतिम लेखन व देखणी छायाचित्रे!

अजया's picture

1 May 2017 - 10:17 am | अजया

सुंदर फोटो आणि वर्णन.
काश्मीर अशी जागा आहे जिथे कितीही वेळा जा कंटाळा येत नाही :)

लोनली प्लॅनेट's picture

2 May 2017 - 10:30 am | लोनली प्लॅनेट

सुंदर वर्णन व अतिशय सुंदर फोटो

संजय पाटिल's picture

2 May 2017 - 11:28 am | संजय पाटिल

अतिशय सुंदर फोटो.. वर्णन पण सुंदर...
पुभाप्र...

पैसा's picture

2 May 2017 - 11:43 am | पैसा

सुंदर! छानच लिहिताय. फोटो तर फार देखणे आलेत.

एक_वात्रट's picture

4 May 2017 - 10:04 pm | एक_वात्रट

सगळ्यांचे आभार.