ये कश्मीर है - दिवस पहिला - ९ मे

एक_वात्रट's picture
एक_वात्रट in भटकंती
30 Apr 2017 - 9:56 am

काश्मीर हे भारतातले सगळ्यात प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे यात काही वाद नाही. फिरायला जायच्या ठिकाणांची भारतात कमतरता नाही, पण काश्मीर या नावाभोवती जे कोंदण आहे ते इतर कुठल्याच पर्यटनस्थळाला नाही. निसर्गसौंदर्य पहायला आवडणा-या प्रत्येक भटक्यासाठी भारतात काश्मीर आणि परदेशात स्वित्झर्लंड ही दोन्ही स्वप्न-गंतव्ये असतात हे नक्की. २०१५ वर्षीच्या मे महिन्यात आम्ही काश्मीरचा प्रवास केला. हे प्रवासवर्णन हे म्हणजे त्या प्रवासाच्या आठवणींना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. (तो गोड मानून घ्यावा असे लिहिणार होतो, पण वाटले 'छोटासा प्रयत्न' लिहिले की 'गोड मानून घ्यावा' हे त्याला जोडून नेहेमीच का यायला हवे? त्यांना आज वेगळे करुयातच.)

पुणे ते दिल्ली आणि दिल्ली ते चंदीगडमार्गे श्रीनगर असा आमचा आजचा विमान प्रवास होता. विमानप्रवासाची तिकिटे 'स्पाईसजेट' या कंपनीची असल्याने आणि गेले काही दिवस ही कंपनी आर्थिक स्थिती ढासळणे, विमाने रद्द होणे अशा नको त्या कारणांसाठी प्रसिद्धीच्या झोतात असल्याने आमचा विमानप्रवास नि पर्यायाने आमची सहलच रद्द होते की काय अशी भीती अगदी शेवटच्या दिवसापर्यंत आम्हाला वाटत होती, पण सुदैवाने तसे काही झाले नाही. थोडे उशिरा का होईना आमचे विमान उडाले नि दिल्लीला पोचले. दिल्लीच्या विमानतळावर उतरल्यावर वातावरणात जाणवणारा फरक लक्षणीय होता. पुण्यात उन्हाळा चालू असला तरी हवा तशी थंडच होती, मात्र घड्याळ्यात फक्त साडेनऊ झाले असतानाही दिल्लीची हवा एखाद्या भट्टीतून येणा-या हवेसारखी उष्ण आणि कोरडी होती. दिल्लीला सकाळी ९:२५ ला पोचल्यावर पुढचे विमान २:१५ ला होते, त्यामुळे विमानतळावर अळंटळं करणे नि इकडेतिकडे फिरणे एवढेच काम आमच्याजवळ होते. दिल्लीच्या टी ३ या टर्मिनल विषयी मी बरेच काही वाचले होते, पण दिल्लीचा देशांतर्गत वाहतुकीचा विमानतळ मात्र मला पुण्याच्या विमानतळाइतकाच रुक्ष नि रखरखीत वाटला. (विमानतळाच्या आत किंचीत 'हिरवळ' होती हा त्यातल्या त्यात दिलासा!)

असो, एकदाचे आमचे विमान उडाले आणि चंदीगडमधे प्यासिंजरांची अदलाबदल करून आम्ही शेवटी श्रीनगरला पोचलो. मधे अचानक पिंजून काढल्यासारखे दिसणारे ढग दिसल्यावर त्यांचा फोटो काढायचा मोह आवरला नाही.

आम्हाला फिरण्यासाठीच्या गाडीची व्यवस्था पुण्यातून आधीच केली असल्याने ती आम्हाला न्यायला विमानतळावर आलेली होती. [ही गाडी आम्हाला कशी मिळाली याचीही एक कथा आहे. GoIbibo या नविन सुरु झालेल्या संकेतस्थळावरून मी विमानाची तिकीटे नि तिथल्या सगळ्या हॉटेलांची आरक्षणे केली होती. या बक-याकडून आपला आणखी फायदा कसा होऊ शकतो याविषयी बरेच डोके खाजवल्यावर GoIbibo च्या डोक्यात एक कल्पना आली आणि मी अमुकअमुक तारखेला काश्मीरला येत आहे नि इतकेइतके दिवस तिथे आहे ही माहिती त्यांनी एका ट्रॅव्हल एजंटला विकली. सहलीला काही दिवस राहिलेले असताना त्या माणसाचे मला फोन येऊ लागले. अर्थात तो देत असलेली इनोव्हा गाडी मला इतकी स्वस्त मिळत होती की त्याला नाही म्हणणे मला अगदी अशक्य होते. तेव्हा मी तीच गाडी ठरवून टाकली.]

विमानातळाबाहेर माझ्या नावाची पाटी घेऊन आमचा सारथी उभा होता. चित्रपटात दाखवतात तसे एकदम झोकात आपण विमानतळामधून बाहेर यावे, कुणीतरी आपल्या नावाची पाटी घेऊन तिथे उभे असावे आणि मग त्या माणसाला पाहताच विमानतळाबाहेर पडणा-या इतर लोकांकडे आपण हुडूत नजरेने पहावे असे माझे लहानपणीचे स्वप्न होते, ते आज पूर्ण झाले.

बाहेर आल्यावर पहिले काही जाणवले असेल तर ते म्हणजे हवेतला बदल. श्रीनगर मधली हवा भलतीच आल्हाददायक आणि थंड होती. आणि थंड म्हणजे बोचेल इतकी नव्हे, तर हवीहवीशी वाटेल अशी थंड. दुसरी गोष्ट म्हणजे आमचे सगळ्यांचे मोबाईल फोन बंद पडलेले – त्यांना नेटवर्कच नव्हते. हा काय प्रकार होता?

आमचे ड्रायव्हरसाहेब एक पस्तिशीचे पोक्त गृहस्थ होते. त्यांनी त्यांचे नाव सांगितले (जे मी विसरलो), आमचे सामान गाडीत टाकले आणि आम्ही नगीन सरोवराकडे कूच केले. त्यांना मोबाईल फोन्सविषयी विचारल्यावर कळले की काश्मीरमधे बीएसएनएल वगळता कुठलीही प्रिपेड कनेक्शन्स चालत नाहीत. अर्थात पुढचे 8 दिवस आमच्या सगळ्यांचे मोबाईल फोन्स बंद राहणार होते!

पहिल्या दर्शनात तर श्रीनगर शहर अगदीच ठीकठाक वाटले. म्हणजे आपल्या इकडचे एखादे गाव आणि शहर यात अडकलेले नगर दिसते तसे. (उदाहरणच द्यायचे झाले तर राजगुरुनगर सारखे.)सहा वाजत होते, आमची चहाची वेळ झाली होती (चहाला वेळ नसतो, पण वेळेला चहाच पाहिजे!) एका छोट्याश्या हॉटेलात चहा मारून आम्ही पुढे निघालो. काही किलोमीटर पार केले आणि दल सरोवर पार करून नगीन सरोवराजवळ पोचलो. [श्रीनगरमधे दल नि नगिन अशी दोन सरोवरे आहेत. यापैकी दल अधिक प्रसिद्ध, प्रर्यटकांमधे अधिक लोकप्रिय, अनेक हाऊसबोटी असलेले, पर्यटक नि शिकारे यांचा सतत राबता असलेले असे आहे, तर नगिन (की निगीन?) थोडे दूर, पण शांत, फारशी गजबज नसलेले असे आहे. काश्मीरी लोकांचं तरंगतं जगणं आपल्याला जवळून अनुभवायचे आहे की थोडी शांतता, एकांत हवा आहे यानुसार आपण यापैकी एका सरोवराची राहण्यासाठी निवड करू शकतो.]काश्मीर सहलीतले आमचे पहिले दोन दिवस आम्ही काश्मीर ज्यांसाठी प्रसिद्ध आहे अशा एका हाऊसबोटीवर घालवणार होतो.

हाउसबोटीचे मालक (गुलाम नबी) स्वत: आम्हाला न्यायला रस्त्यापर्यंत आले. ७५ वर्षांचा हा माणूस भलताच चपळ होता. (तो रसिक, अगत्यशील आणि भलताच गप्पिष्टही होता हे आम्हाला नंतर कळले.) हाऊसबोटीकडे जात असताना आम्हाला असे दिसले की ही हाऊसबोट एका सुंदर बागेला लागून नांगरण्यात आलेली होती. आम्ही हाऊसबोटीत शिरलो, शयनकक्षांमधे आपले सामान टाकले आणि सज्जात येऊन बसलो. समोरच्या नगीन सरोवरावरून सूर्य आपली किरणे हळूहळू काढून घेत होता आणि त्यामुळे सरोवराला एक सुंदर सोनेरी झळाळी आलेली होती. पाण्यावरचे तरंग आपल्या लयीत चालले होते. मधेच एखादा काश्मीरी युवक आपला शिकारा घेऊन कुठेतरी लगबगीने जात होता. फारच देखणे, मन प्रफुल्लित करणारे दृश्य होते ते.

थोडा वेळ हे रमणीय दृश्य पाहिल्यावर आम्ही उठलो आणि हाऊसबोटीत एक फेरी मारली. सुरवातीला सज्जा, नंतर बैठकीची खोली, नंतर जेवणकक्ष आणि त्यानंतर दोन शयनकक्ष असे ह्या हाऊसबोटीचे स्वरूप होते. हाऊसबोट भलतीच प्रशस्त आणि विश्वास बसणार नाही इतकी सुंदर होती. भिंतींवर आणि छतावर लाकडाचे कोरीव काम, देखणे पडदे, मोठमोठी झुंबरे अशी तिची अंतर्गत सजावट पाहून आपण एखाद्या राजवाड्यात तर रहायला आलेलो नाही ना असे एखाद्याला वाटले नाही तरच नवल!

खरेतर आज हाऊसबोटीवर जायचे आणि लगेच दल सरोवर पाहण्यासाठी बाहेर पडायचे असे आमचे नियोजन होते. पण ईंग्रजीत म्हटल्याप्रमाणे 'In theory, there is no difference between theory and practice. But, in practice, there is.' नियोजनाप्रमाणे सगळे थोडेच होत असते? सकाळी लवकर उठल्यामुळे आणि प्रवासातल्या रखडपट्टीमुळे आम्ही सगळे भलतेच थकलो होतो. तेव्हा आम्ही गुलाम नबी साहेबांनी वाढलेले साधे पण चविष्ट जेवण घेतले, बाहेर पडायचा बेत बासनात गुंडाळला, स्वत:ला रजयांमधे गुंडाळले आणि सरळ झोपेच्या अधीन झालो.

उद्या आम्ही श्रीनगर शहर पाहणार होतो, खासकरून त्या मुघल बागा पाहण्यासाठी तर मी फारच उत्सुक होतो.

प्रतिक्रिया

संजय पाटिल's picture

30 Apr 2017 - 12:51 pm | संजय पाटिल

सुंदर वर्णन आणि फोटो पण...
पुभाप्र....

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Apr 2017 - 2:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर वर्णन आणि फोटो. हाऊसबोट मस्तं आहे !

नि३सोलपुरकर's picture

30 Apr 2017 - 2:52 pm | नि३सोलपुरकर

सुंदर वर्णन आणि फोटो एकदम छान ,

पुलेशु .

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Apr 2017 - 4:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फोटो आवडले. पुभाप्र.

-दिलीप बिरुटे

इरसाल कार्टं's picture

30 Apr 2017 - 5:57 pm | इरसाल कार्टं

+111

संजय क्षीरसागर's picture

30 Apr 2017 - 5:17 pm | संजय क्षीरसागर

आणि ओघवतं वर्णन ! पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

पैसा's picture

30 Apr 2017 - 7:57 pm | पैसा

सुंदर लिहिताय!

काय छान लिहिलंय! फोटोही तितकेच देखणे!

पुभाप्र.

पद्मावति's picture

1 May 2017 - 3:58 am | पद्मावति

+१

विमान जसजसे श्रीनगरकडे येऊ लागते, तेव्हा विमानतळावर झेपावण्याच्या जरासे आधी दिसणारी शेती आणि पहाड आणि कडे किती सुरेख दिसतात! पाहिलेत का? निम्मा जीव त्या सौंदर्याने तुथेच गारद होतो आणि उरलेला काश्मीरात!

काश्मिर ट्रिप आठवली.सुंदर वर्णन आणि फोटो.

फोटोग्राफर243's picture

3 May 2017 - 12:12 pm | फोटोग्राफर243

फार भारी फोटोज, उत्तम वर्णन

किसन शिंदे's picture

3 May 2017 - 12:40 pm | किसन शिंदे

पहिला फोटो पाहूनच एकदम अहाहा झालं!

एक_वात्रट's picture

4 May 2017 - 10:02 pm | एक_वात्रट

प्रतिसाद देणा-या सगळ्यांना धन्यवाद ! यशोधरा, खरे आहे. विमान उतरतानाचे दृश्य खरेच खूप सुंदर असते.

वर्णन आवडलं. हाउसबोट तर मस्तच!