तरुणाईची स्पंदना - तेजस्विनी लेले

पूर्वाविवेक's picture
पूर्वाविवेक in लेखमाला
8 Mar 2017 - 6:04 am

.

आंतरजालावर लिहिण्यासाठी अनेक माध्यमं उपलब्ध झाली आणि अनेक जण लिहिते झाले. अनेक तरुण ब्लॉग लिहिता लिहिता व्यावसायिक लेखन करू लागले. आज आपण अशाच एका उदयोन्मुख, होतकरू लेखिकेला भेटणार आहोत. तिचे ब्लॉग जास्वंदाची फुलंTangents आजच्या तरुणाईचे प्रतिनिधित्व करतात. तिच्या शब्दांतलं ताजेपण, तिची खुमासदार लेखनशैली मनाला भावते. तरुणांच्या हृदयाची स्पंदनं टिपणाऱ्या, त्यांच्या आशा-आकांक्षा व सुख-दुःख या भावनांमधील तरलता शब्दबद्ध करणाऱ्या तेजस्विनीचा प्रवास आता शॉर्ट फिल्म, नाटक ते सिनेमापर्यंत येऊन पोहोचला आहे. तर मग चला! भेटू या गुणी, गोड स्वभावाच्या तेजस्विनीला.....
.

प्रश्नः कधीपासून लिहायला सुरुवात केलीस? खरं तर तुझा ब्लॉग २००८ साल दाखवत आहे. पण त्याआधीही इतरत्र लिहायचीस का?

तेजस्विनी: लिहायची सुरुवात शाळेत असतानाच झाली होती. माझ्या आईला आणि बाबांना वाचनाची आणि लिखाणाची आवड होती आणि त्यांच्याच प्रोत्साहनामुळे मीही लवकर लिहिती झाले. शाळेच्या वार्षिक अंकात एखादा तरी लेख द्यायचेच, त्याशिवाय निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा सगळ्यात भाग असायचाच. ‘जास्वंदाची फुलं’ ब्लॉग २००८मध्ये सुरू केला, पण त्याआधी याहू ३६० नावाची एक सुविधा होती, ज्यावर मी रोज ब्लॉग लिहीत असे. याहू ३६० वगैरे आठवल्यावर अगदीच वय झाल्यासारखं वाटायला लागलंय.

प्रश्नः नाटकाचं लेखन करायची संधी कशी मिळाली? त्या नाटकाविषयीचा अनुभव सांगशील का?

तेजस्विनी: गेल्या वर्षी मी लिहिलेल्या कथेवर आधारित ‘मी आणि ती’ नावाचं नाटक दिग्दर्शक शिवदर्शन साबळेंनी रंगमंचावर आणलं. खरं सांगू, तर नाटक म्हणून असं मी हे लिहिलं नव्हतं. ब्लॉगवर फक्त एक कथा-वजा पोस्ट लिहिली होती. शिवदर्शनने ती वाचली आणि त्याला फार आवडली. त्याने जेव्हा ह्यावर फिल्म किंवा नाटक करायची इच्छा दर्शवली, तेव्हा अर्थात मी होकारच दिला. लेखिका वगैरे म्हणून नाही, तर विद्यार्थिनी म्हणून त्याच्याबरोबर संहितालेखन करायला सुरुवात केली. शिवदर्शनकडून नाटक आणि चित्रपटसृष्टीतल्या अनेक गोष्टी शिकायची संधी मिळत होती. (आणि बहिणीसमोर कोण-कोणा अभिनेत्यांना भेटले ह्याची शाईन मारता येत होती, जे सर्वात महत्त्वाचं!) आमची ‘मी आणि ती’ची स्क्रिप्ट फार आधीच लिहून झाली होती, पण ह्या न त्या कारणाने ती प्रत्यक्षात यायचं राहून जात होतं.
लग्न करून मी अमेरिकेला आले आणि त्याच वेळी नाटकाचा मुहूर्त लागला. कोणाला सांगू नका, पण मी स्वतः हे नाटक अजून पाहिलंच नाहीये. पण माझ्या कुटुंबीयांनी, मित्र-मैत्रिणींनी नाटक पाहून कळवलं तेव्हा फार छान वाटलं होतं. पेपरमधल्या जाहिराती पाहूनही मस्त वाटायचं. लवकरच हे नाटक पाहण्याचा योग यावा ही इच्छा आहे.

.

प्रश्नः तू एक 'शॉर्ट फिल्म'सुद्धा केली आहेस आणि तुझ्या त्या पहिल्यावाहिल्या शॉर्ट फिल्मला बरीच पारितोषिकं मिळाली आहेत, त्याविषयी काय सांगशील?

तेजस्विनी: ह्याचं उत्तरही तेच आहे गं, जसं नाटक माझ्या एका ब्लॉग पोस्टवर आधारित होतं, तशीच शॉर्ट फिल्मदेखील. पण आता निश्चितच फक्त त्यासाठी वेगळं नवीन लिहीत आहे.
हो, वेगवेगळ्या फेस्टिवल्समध्ये आमच्या शॉर्ट फिल्मला आतापर्यंत एकूण ५ पारितोषिकं मिळाली. याचं श्रेय आमच्या संपूर्ण टीमला जातं.

.

Short film link-

प्रश्नः टीव्हीवरील मालिकेसाठी लेखन करण्याचा विचार आहे का?

तेजस्विनी: सध्यातरी नाही. हल्ली कुठल्याच मराठी मालिका पाहत नाहीये. काही नवीन प्रयोग होत आहेत हे ऐकून छान वाटतं आहे. काही वर्षांपूर्वी ‘मोगरा फुलला’ नावाच्या एका कार्यक्रमासाठी लेखन करायचे. तशा प्रकारची संधी परत आली तर नक्कीच आवडेल. मात्र सासू-सुना डेली सोपांना नो-नो!
टीव्ही नाही, मात्र यू ट्यूब/इंटरनेटवरील मालिकेसाठी लिहायची इच्छा आहे. त्या बाबतीत थोडं कामही सुरू झालं आहे. बघू कसं होतं ते!

प्रश्नः खरं तर नाटक, फिल्म, शॉर्ट फिल्म किंवा सीरियलच्या लेखनासाठी तुला भारतात संधी मिळू शकते. पण आता तू अमेरिकेत राहतेस, तर मग तिथून प्रयत्न करणं शक्य आहे का? की तिथेच राहून पुढे काही करण्याचा विचार आहे?

तेजस्विनी: गेल्या वर्षी आलेलं नाटक आणि शॉर्ट फिल्म दोन्हीही मी इथे अमेरिकेत असतानाच घडल्या. इंटरनेटमुळे गोष्टी खूपच सोप्प्या झाल्या आहेत. सध्या एका मराठी चित्रपटासाठी काम करते आहे. स्काइप, व्हॉट्स अ‍ॅपवरून सतत संपर्कात राहता येतं. मला विचारशील तर रोज करायचे तसा डोंबिवली-दादर प्रवास करण्यापेक्षा मला हे ऑनलाइन कामच जास्त आवडतं आहे.
मी राहते इथे बे-एरियात प्रचंड प्रमाणात भारतीय जनता आहे. इथे नाटकं, स्टेज शोज सतत होत असतातच. इथल्या एका लहान मुलांच्या अभिनय कार्यशाळेसाठी दर वर्षी २ नाटकं लिहीत असते. इंग्लिशमध्ये लिहिण्याचा अनुभव तसा नवीनच आहे आणि त्यातून इथल्या लहान मुलांसाठी... मी अजूनही ह्याकडे आव्हान म्हणूनच बघत असते. हे काम करताना मज्जा येते आणि पुन्हा बरंच नवीन शिकायलाही मिळतं आहे.
बाकी तसा पुढचा काहीच विचार केलेला नाही, कधीच केलाही नव्हता. जे काही नवीन हाती येतं आहे ते करत जायचं, असा सध्यातरी प्लान आहे.

प्रश्नः तुझं लेखन ब्लॉगपुरत का मर्यादित ठेवलं आहेस? पुढे कथासंग्रह किंवा कादंबरी लिहिण्याचा विचार आहे का?

तेजस्विनी: हल्ली इतर ठिकाणी व्यग्र असल्याने ब्लॉगवर कमी लेखन होतं आहे.
कादंबरी नाही, मात्र कथासंग्रह लिहायचा विचार आहे. कधी-कसा-कुठे - माहीत नाही. पण लिहायला नक्कीच आवडेल.

प्रश्नः तुझ्या कथेतील व्यक्तिरेखा खऱ्या असतात की काल्पनिक? मला ना, तो तुझ्या ब्लॉगवरील कथेतला 'आनंद' फार आवडला होता बघ.

तेजस्विनी: माझ्या लिखाणातल्या व्यक्तिरेखा ह्या खऱ्याखुऱ्या कल्पनेतल्या असतात. 'नथिंग इज ओरिजिनल’ हे पटतं मला... अगदी कॉपी नसली, तरी आपण जे लिहितो आहे हे आपण ऐकलेल्या, वाचलेल्या, पाहिलेल्या एखाद्या गोष्टीतून आलं आहे.. आपल्या लिखाणातल्या व्यक्तिरेखा आपण भेटलेल्या माणसांतून निर्माण झाल्या आहेत हे मान्य करायला मी तयार असते. 'आनंद' खरा असायला हरकत नाही.

प्रश्नः तुझं बालपण कुठे गेलं? शिक्षण कुठे आणि कोणत्या विषयात झालंय?

तेजस्विनी: माझं लहानपण अलिबागला गेलं. अलिबाग माझं अत्यंत आवडतं गाव आहे. तिथे अकरावीपर्यंत होते. त्यानंतर एक वर्ष पुण्यात, तीन वर्षं ठाणे आणि मुंबईत, परत दोन वर्षं पुण्यात शिकायला होते. 'बारावीपर्यंत तरी सायन्स हवंच बाई!’ ह्या विचारप्रवाहाला बळी पडून विज्ञानात दिवे लावले आणि मग मुंबईला विवेकानंद कॉलेजमध्ये बी.एम.एम.साठी (मास मीडियासाठी) प्रवेश घेतला. तेव्हा जाहिरातक्षेत्रात दिवे लावायची इच्छा होती, म्हणून तिसऱ्या वर्षी advertising विषय घेतले. त्या वर्षात पुन्हा आवडी-निवडी बदलत आहेत हे जाणवलं आणि मग पुढची दोन वर्षं पुण्याच्या एस.एन.डी.टी.मधून 'कम्युनिकेशन मीडिया फॉर चिल्ड्रन'मध्ये मास्टर्स केलं.
नंतर एकीकडे लिखाणकाम करताना “चला, काहीतरी नवीन शिकू या” असं वाटलं आणि एचआरमध्ये एमबीए केलं. का केलं हे अजिबात माहीत नाही. पण हे असे नवीन काहीतरी शिकायचे किडे सतत चावत असतातच. सध्या वेगवेगळ्या ऑनलाइन कोर्सेसवर समाधान मानत असते.

प्रश्नः आलिबागने तुला काय दिलं ? एक गंमत म्हणून विचारते, 'अलिबागसे आया है क्या?' हे कसं घेतेस? सकारात्मक की नकारात्मक ?

तेजस्विनी: अलिबागनेच मला घडवलं आहे. अलिबागने प्रचंड सुंदर लहानपण दिलं आहे. एकसेएक छान छान आठवणी दिल्या आहेत.
“अलिबागसे आया है क्या?”बद्दल मला तशा काहीच भावना नाहीत. हा प्रश्न विचारणारे वीकेंडला अलिबागला येऊनच सेल्फ्या काढतात ना..?
ह्या प्रश्नामागची एक ऐकीव गोष्ट आहे. पूर्वी अलिबागहून मुंबईला जायचं म्हणजे बोटीशिवाय पर्याय नव्हता. बोटसुद्धा आत्तासारखी एका तासात पोहोचवणारी नाही. हळूहळू डुचमळत नेणारी... इतका वेळ बोटीत बसून मुंबईच्या किनाऱ्याला लागल्यावर सरबरलेले लोक पाहून पाहून, सरबरलेल्या सगळ्याच लोकांना "अलिबागसे आया है क्या?" विचारायला सुरुवात झाली. खरं-खोटं माहीत नाही. अलिबागमध्ये वाढलेल्या मला ही गोष्ट आवडते. :)

प्रश्नः तुझ्यावर कुठल्या लेखकाचा प्रभाव आहे?

तेजस्विनी: एक असं नाही गं कोणी... युज्युअली मी जे पुस्तक वाचत असते, त्या लेखक/लेखिकेच्या प्रभावाखाली काही दिवस असते. आवडते लेखक विचारशील तर रस्किन बाँड... त्याच्यासारखं हिमालयात राहायचं आहे , त्यांच्यासारखं साधं-सोप्पं-छान लिहायची इच्छा आहे.

प्रश्नः तू आमचं 'मिसळपाव' वाचतेस का? तुला इथे सदस्य व्हायला आवडेल का? इथे खूप जण टोपण नाव घेतात. तुला कुठलं घ्यायला आवडेल?

तेजस्विनी: मिसळपावची सदस्य व्हायला नक्कीच आवडेल. कदाचित 'जास्वंदी' नावानेच येईन.

तू नक्कीच मिसळपाववर ये. आणि आम्हाला तुझ्या लेखनाची मेजवानी लाभू दे. तुला तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा! ब्लॉग ते नाटक-सिनेमा हा तुझा प्रवास इथल्या अनेक होतकरू लेखकांसाठी मार्गदर्शक ठरो.

सामान्यातील असामान्य ह्या उपक्रमासाठी माझी मुलाखत घेतल्याबद्दल तुझे खूप खूप आभार... फार काही असामान्य नसूनही मला तसं वाटून दिल्याबद्दल धन्यवाद.

.

महिला दिन विशेषांक २०१७

प्रतिक्रिया

हाहा's picture

9 Mar 2017 - 2:03 am | हाहा

मुलाखत आवडली

अजया's picture

9 Mar 2017 - 11:04 am | अजया

छान मुलाखत.

सविता००१'s picture

9 Mar 2017 - 12:01 pm | सविता००१

झक्कास आहे मुलाखत

प्रीत-मोहर's picture

9 Mar 2017 - 3:35 pm | प्रीत-मोहर

तेजस्विनी तुझा ब्लॉग वाचला अग मी. खूप छान लिहितेस तु.
जिम मला फार आवडला आणि मांजरीबद्दल जे लिहिलय्स ते डिट्टो माझ्या मनातलं. दे टाळी!!
आता नियमित वाचेन मी तुझा ब्लॉग :)
तुझ्या यापुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!!

कविता१९७८'s picture

9 Mar 2017 - 3:53 pm | कविता१९७८

छान मुलाखत पुर्वा

पद्मावति's picture

9 Mar 2017 - 3:54 pm | पद्मावति

पूर्वा, मुलाखत मस्तच. तेजस्विनीचे खुप कौतुक वाटले.

सस्नेह's picture

10 Mar 2017 - 12:01 pm | सस्नेह

चटपटीत मुलाखत ! आणि तेजस्विनीपण ..

रेवती's picture

11 Mar 2017 - 2:06 am | रेवती

मुलाखत आवडली.

आवडली मुलाखत ,आणी शुभेच्छा !!!

मंजूताई's picture

11 Mar 2017 - 12:38 pm | मंजूताई

मुलाखत खूप आवडली​!

पैसा's picture

11 Mar 2017 - 12:51 pm | पैसा

खूप छान मनमोकळी ओळख!

सुचेता's picture

20 Mar 2017 - 3:27 pm | सुचेता

मुलाखत, ब्लॉग वाचाय्ला पण आवडेलच

छान मुलाखत.. ती शॉर्ट फिल्म नक्कीच पाहीन शक्य होईल तेव्हा.

पिशी अबोली's picture

13 Apr 2017 - 11:01 am | पिशी अबोली

छान मुलाखत!