देव्हारा...१

विनिता००२'s picture
विनिता००२ in जनातलं, मनातलं
7 Apr 2017 - 10:19 am

देव्हारा...१

तनूने प्रोफेसरांची नजर चुकवून हळूच हातातल्या घडयाळाकडे बघितले. लेक्चर संपायला अजून पंधरा मिनीट अवकाश होता. तिने दाराकडे पाहिले. अभिजीत बाहेर पण आलेला नव्हता. बळजबरी ती लेक्चरमधे मन गुंतवू लागली. मागच्या बेंचवर बसलेल्या आदेशला तिचा अस्वस्थपणा लगेच लक्षात आला. अभिजित आज पण उशीरा येणार हे त्याला माहित होते. तो मनापासून हसला.

अभिजीत, तनिष्का,आणि आदेश या तिघांची घट्ट मैत्री होती. तिघेही मॅनेजमेंटचे विद्यार्थी! आदेश आणि तनिष्का मध्यमवर्गीय परिवारातील तर अभिजीत गर्भश्रीमंत बापाचा मुलगा! त्याची सर्व तर्‍हाच न्यारी होती. रहायला स्वतंत्र फ्लॅट, रेसर बाईक, उंची कपडे...तो म्हणेल ती वस्तू त्याच्या समोर हजर असायची,तरी त्याच्या वा़गण्यात श्रीमंताची मिजास नव्हती. तो स्कॉलर होता, त्याच्या वयाच्या मुलांच्या मानाने बराच मॅच्युअर्ड होता. पण कधीकधी त्याचा हट्टी स्वभाव उफाळून येत असे. आदेशचा शांत, मनमिळाऊ स्वभाव त्याला समजवायला नेहमी सहाय्यक होत असे, कारण तनिष्काच भावनाशील मन अभिजीतचे वागणे कधी कधी सहन करु शकत नसे. मग आदेशलाच मध्यस्थाची भुमिका पार पाडावी लागत असे. पण तिघांना एकमेकांशिवाय अजिबात करमत नसे. तनूच्या बेचैनीचे कारण हेच होते. अभिजितने लेक्चर बुडवलेले तिला अजिबात आवडत नसे.

लेक्चर संपले तसे सर्वजण कलकलाट करत क्लासरुममधुन बाहेर पडले. तनू आणि आदेश पण त्यांच्या ठराविक कट्याकडे आले. अभि आरामात बसून काहीतरी वाचत होता. त्याला छेडायचे नाही असे तनूने मनोमन ठरवले.

"हाय अभि!" आदेश त्याच्या शेजारी बसत उद्गारला.

"ओऽ हाय, संपले का लेक्चर?" अभिने पुस्तक मिटत विचारले. तनूची नजर त्या नॉव्हेलच्या मुखपृष्ठावर खिळली होती. ते होते मर्लिन मॅन्रोचे आत्मचरित्र! तिला मनात राग आला. पण ती शांतपणेच उभी राहिली. अभिने सुचकपणे आदेशकडे पाहिले. 'मुलुखमैदान तोफ' आज धडाडली नव्हती. हे अभिने तनूला दिलेल टोपणनाव! आदेशने भुवया उंचावत स्मित केले. म्हणजे कारण त्याला माहित नव्हते. अभिने तनूकडे पाहिले.

"हाय तनू!"

"हाय!" ती चक्क स्मित करत उत्तरली.

अभिने आदेशकडे पाहिले. जोरदार खडाजंगी होण्याची सगळी पुर्वचिन्ह होती. अभिने मनोमन स्वतःला तयार केले.

"चला, कॅन्टीनला जाऊया." आदेश उठत म्हणाला. अभिपण उठला. तिघेही कॅन्टीनकडे चालू लागले. समोरुन येणार्‍या सुनिलने तनूला पाहिले आणि तो मित्रांना सोडून तिच्याकडे वळला.

"हाय तनू!"

"हाय सुनिल!"

"ह्या तुझ्या नोट्स! थॅंक्स. खूप उपयोग होईल मला परिक्षेत यांचा!" सुनिल म्हणाला.

"सर्व झाल्या आहेत ना लिहून? लागत असतील तर राहु दे." ती उत्तरली.

"या झाल्यात, मला दुसर्‍या हव्यात. मी तुला सांगीन कुठ्ल्या त्या!" सुनिल आभार मानून मार्गी लागला.

इतका वेळ तिरक्या नजरेने पाहणारा अभि पण पुढे चालु लागला. तिघेही कॅन्टीनला पोहोचले. गर्दी विशेष नव्हती. सॅन्ड्वीच आणि चहा मागवून ते त्याचा आस्वाद घेऊ लागले. अभिने बोलता बोलता तनूच्या नोट्स उचलून घेतल्या. तो त्या उघडून चाळणार एवढ्यात तनूने त्या परत काढून घेतल्या.

"दे ना, मला हव्या आहेत." तो ओरडला.

"का? तुला कशाला हव्यात?" तिने विचारले.

"कशाला म्हणजे? अभ्यासासाठी!"

" 'मर्लिन मॅन्रोचे' आत्मचरित्र लिही ना पेपरमधे ! प्रोफेसर पण त्या निमित्ताने तिचे चरित्र वाचतील, त्यांचे ही जनरल नॉलेज वाढेल आणि तुला ही भरपुर मार्क्स मिळतील." तनू खवचटपणे उत्तरली.

"तुला काय माहीत, काय होती मर्लिन मॅन्रो! तिच्या नखाची ही सर नाही तुम्हा मुलींना! तिच्यापुढे तुम्ही किस झाड की पत्ती!" अभिजित उसासे सोडत म्हणाला, तशी ती खवळली. त्याच्याशी न भांडण्याचा प्रण पण विसरुन गेली.

"मग बस ना तिचीच पुजा करत! नोट्स कशाला मागतोस? लेक्चर्स बुडवायची, बाईक्सच्या रेस लावायच्या, पाहिजे तसे पैसे उडवायचे! घरच्यांना काय कळतंय, राजेसाहेब इकडे काय करतात ते! परिक्षा आली की नोट्स मागायच्या, मी आहेच नोट्स पुरवायला!" रागाने ती लालेलाल झाली होती.

"आता हे सर्व तुला माहीतच आहे तनू, मग चिडून कशाला रक्त आटवतेस?" अभि मानभावीपणे म्हणाला तशी ती रागारागाने तिथून निघूनच गेली. जाताजाता अभिच्या हसण्याचा आवाज तिच्या कानावर पडला.

कॅन्टीनमधून ती सरळ लायब्ररीत जावून बसली. 'अभिला कसा सुधारावा?' याचाच ती विचार करत होती. समोरच्या पुस्तकातले एकही अक्षर डोक्यात शिरत नव्हते. ती तिथे बसलेली पाहुन संदीपला बरे वाटले. गेले कित्येक दिवस तो तिला एकटीला गाठायचा प्रयत्न करत होता. पण ती नेहमी आदेश आणि अभिबरोबर असायची. आदेशचा काही प्रॉब्लेम नव्हता पण अभिबरोबर असताना तिच्याकडे बघायची ही कुणाची टाप नव्हती. त्याचा दराराच तसा होता. त्याच्या ओळखीच्या मुलींना छेडायची कुणाची हिंमत होत नव्हती, पण त्याच्यासमोर ही कुठल्या मुलीला छेडणे अवघड होते. मुली लगेच त्याच्या आसर्‍याला धावायच्या. बिचारे मजनू हात चोळत बसायचे, अभिच्या तडाख्यात सापडले नाहीत तर!

संदीप हळूच उठून तिच्या समोरच्या बेंचवर येवुन बसला.

"तनिष्का.." त्याने धीर एकवटून म्हटले. त्याची हाक तिच्या कानापर्यंत पोहोचली नाही.

"तनिष्का.." आता तो जरा धिटावला होता. तनूने मान वर करुन इकडे तिकडे पाहिले. संदीपने हळूच हात हलवला. हा लोचट मुलगा तिला अजिबात आवडत नसे पण इथे काही बोलणे अवघड होते.

"तुझ्याशी बोलायचे होते." तो कुजबुजला.

"मग काय मुहुर्त काढायचाय?" ती करवादली. संदीपला डायरेक्ट काही विचारायची हिंम्मत होईना, पण चालू संभाषण त्याला बंद पाडायचे नव्हते.

"तू आमच्या ग्रुपमधे येशील का? तशा आमच्या ग्रुपमधे मुली आहेत पण तुझ्यासारखी कोणीच नाही."

"माझ्या सारखी! म्हणजे?" तनूने भुवया उडवत विचारले.

"म्हणजे! हुशार, सुंदर, बोलकी. पण तू एकटीच! त्या आदेश आणि अभिजितला नको हं!" तो बजावत म्हणाला.

"का?" तिने आश्चर्याने विचारले.

"हे बघ, आमचा ग्रुप खुप शिस्तप्रिय आणि अभ्यासू आहे." तो फुशारकी मारत उत्तरला. त्याच्यापासून पिच्छा सोडवावा म्हणून तनूने वह्या आवरल्या आणि ती लायब्ररीबाहेर आली. संदिप पण तिच्या पाठोपाठ बाहेर आला. ती काही बोलली नाही याचा अर्थ त्याने होकारार्थी घेतला.

(क्रमशः शिवाय मजा नाही ;))

kathaaआस्वाद

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

7 Apr 2017 - 12:16 pm | जव्हेरगंज

शीर्षकाशी मॅच होणारी नाही वाटली!!

पण येउद्या.. वाचतोय..

विनिता००२'s picture

8 Apr 2017 - 9:32 am | विनिता००२

दीर्घकथा आहे हो :)

वाचताय त्याबद्दल धन्यवाद ___/\___

रातराणी's picture

7 Apr 2017 - 12:21 pm | रातराणी

पुभाप्र.

दीपक११७७'s picture

7 Apr 2017 - 4:40 pm | दीपक११७७

मस्त वाटली सुरुवात . पुभालटा.

कालेज लाईफ जास्त अनुभवलेलं नाही त्यामुळं मज्जा वाट्तीय, येउद्या अजुन.

प्राची अश्विनी's picture

7 Apr 2017 - 6:03 pm | प्राची अश्विनी

पुभाप्र.

अॅस्ट्रोनाट विनय's picture

7 Apr 2017 - 10:41 pm | अॅस्ट्रोनाट विनय

छान जमलंय. पुभाप्र

छान! पुढचा भाग लवकर टाका.

विनिता००२'s picture

8 Apr 2017 - 9:35 am | विनिता००२

सर्वांना धन्यवाद मित्रमैत्रिणींनो ___/\___

पैसा's picture

8 Apr 2017 - 9:49 am | पैसा

वाचत आहे.

किसन शिंदे's picture

8 Apr 2017 - 11:03 am | किसन शिंदे

वाचतोय. पुभाप्र.