जीवात्मा

संदीप-लेले's picture
संदीप-लेले in जे न देखे रवी...
1 Apr 2017 - 9:18 am

कधी ह्या देहात, कधी त्या देहात
आणि फिरतसे, अनेक योनीत
असे कुठे वास, मधल्या वेळेत?
आणि करे काय, नसता कशात?
ओळख तयाची, कोणत्या खात्यात?
तोच हा अमुक, कोण ठरवत?
आहे तो खरेच, कसे हे ठरत?

नसती भावना, प्राण्याच्या योनीत
अचानक येती, मानवी देहात
आज जारे बाबा, अमुक देहात
आणि कर मजा, तमुक योनीत
सांगा असे सारे, कोण त्यां सांगत?
आणि गुपचूप, कोण शिकवत?
जातो का शाळेत, मधल्या सुट्टीत?

वेदना जखम, काया ही झेलत
स्वत्वाची जाणीव, कायम सोबत
सतत कर्मात, असे हीच रत
तरी म्हणे भोग, असे हा भोगत
फळाची आसक्ती, नसावी कायेत
ह्यास मात्र फळ, मुक्तीच्या रुपात
ऐकावे नवल, गंमत जंमत

नाही रंग रूप, आकार बंधात
तरी लागे गुण, किंवा वाण त्यात
देई हो सुबुद्धी, देवच तयात
मग येई कशी, दुर्बुद्धी साच्यात?
अनुभवातून, काही ना शिकत
पाढे पंचावन्न, पुढल्या खेपेत
कशी व्हावी मुक्ती, अशाने मुळात?

नको उपभोग, मर्त्य या लोकात
भोगे तो अप्सरा, मग त्या स्वर्गात
किंवा नरकात, उकळे तेलात !
जर हा शस्त्राने, कधी ना बाधत
कधी ना हा जळे, तापत्या वन्हीत
का हो असे सारे, स्वर्ग नरकात?
कोणी भरली ही, वांगी पुराणात?

एक परमात्मा, स्वत: का खंडत
बनवी जीवात्मे, लचके तोडत?
आणि का पाठवे, फक्त भारतात
पर ग्रह देश, असता विश्वात?
काय गुन्हा त्यांचा, जेव्हां सुरूवात?
राहे गुलदस्ती, सारे हे गुपीत
आसुरी खेळ का, सुर हे खेळत?

संस्कृतीधर्मकविताविनोदसमाजविज्ञान

प्रतिक्रिया

पैसा's picture

1 Apr 2017 - 11:59 am | पैसा

जरा कन्फ्युज्ड आहे.

संदीप-लेले's picture

1 Apr 2017 - 9:17 pm | संदीप-लेले

विचारा. यथामती उत्तर देण्याचा प्रयत्न करेन.

पद्मावति's picture

1 Apr 2017 - 10:20 pm | पद्मावति

कविता उत्तम आहे. आवडली. वेगळाच विषय आहे. विचार करायला लावणारी कविता आहे.
आणि का पाठवे, फक्त भारतात
पर ग्रह देश, असता विश्वात?
याबाबत मात्र किंचित असहमती. याचे कारण असे की आपण सर्व त्या एका परमात्म्याचेच अंश आहोत. अर्थात जीव आणि शिव, जिवात्मा आणि परमात्मा--डिवाइन स्पिरीट आणि आणि ह्यूमन स्पिरिट अशी मान्यता फक्त भारतात म्हणून नव्हे सगळीकडे आहे.

संदीप-लेले's picture

1 Apr 2017 - 10:51 pm | संदीप-लेले

एवढी बारकाईने कविता वाचल्याबद्दल आणि त्याहून महत्वचे म्हणजे प्रतिक्रिया दिलीत याबद्दल मन:पूर्वक आभार.
ही कविता इथे टाकावी की नाही या विषयी साशंक अवस्थेतच टाकली. तुमची विधायक प्रतिक्रिया पाहून बरे वाटले.
गीतेविषयी सर्वसाधारणपणे ज्या गोष्टी माहित असतात त्या मला पटत नाहीत. त्यावर मी अजून एक कविता लिहिली आहे. तीही यथावकाश टाकण्याचा मानस होता. तो आणखी थोडा मजबूत झाला आहे.

तुम्ही म्हणता "... अर्थात जीव आणि शिव, जिवात्मा आणि परमात्मा--डिवाइन स्पिरीट आणि आणि ह्यूमन स्पिरिट अशी मान्यता फक्त भारतात म्हणून नव्हे सगळीकडे आहे...." हे अर्थातच बरोबर आहे.
पण पुनर्जन्म आणि कर्मफल सिद्धांत (आणि इतर ब-याच गोष्टी) माझ्या अंदाजाप्रमाणे फक्त भारतात आहेत.. त्या अर्थी ते लिहिले आहे. माझा या विषयात अभ्यास नाही. त्यामुळे ही धारणा चुकीची असेल तर जरूर सांगावे.