मराठी शाळा - आणखी एक प्रयत्न

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in काथ्याकूट
28 Mar 2017 - 3:10 pm
गाभा: 

नमस्कार,

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर एक प्रयत्न करावासा वाटतो. त्यासाठी मराठी शाळांना उद्देशून एक पत्राचा मजकूर लिहिला आहे. हे पत्र माझ्या जवळच्या शाळांना पाठवायचा मानस आहे. आपण सगळ्यांनी जर आपापल्या शहरातल्या, गावातल्या शाळांना हे पत्र पाठवलं, तर या प्रयत्नाला बळ येईल. पत्र खाली देत आहे. मतं, प्रतिक्रियांचं स्वागत आहे.

हा विषय जुना, नकोसा, कीस पडलेला असल्यास दुर्लक्ष करावे.

संचालक,

<शाळेचं नाव>,

<शाळेचा पत्ता>

माननीय महोदय,

सर्वप्रथम, तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण शाळेला नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा. नवीन वर्ष, म्हणजे नवीन सुरुवात, आणि नवीन उत्साह या गोष्टी ओघाने आल्याच. शिवाय गुढी हे विजयाचं प्रतीक आपण मानतोच. परंतु शिक्षण, शाळा यांच्याबद्दल बोलायचं झालं तर जुनं ते सोडून नव्याची कास धरणं हे वाक्य भीषण वाटायला लागतं. याला कारण गेली तीन दशकं होत आलेला एक बदल आणि त्याने आज धारण केलेलं रूप आहे. यात तुमचा आमचा, भावी पिढीचा नेमका विजय होतोय की पराभव हा कळीचा प्रश्न आहे.

इंग्रजी माध्यम व त्याच्याशी जोडली गेलेली प्रतिष्ठेची, प्रगतीची विशेषणं यांनी बहुतांश पालकांच्या मनांवर गारूड घातलेलं आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून आपल्या मुलाला शिकवणं हे जणू क्रमप्राप्त असल्यासारखं चित्र शहरात बघायला मिळतं. जसा आजार तसा उपचार या समीकरणाप्रमाणे शाळांनाही इंग्रजी माध्यमात त्यांचं बर्‍याच प्रकारचं हित दिसल्यामुळे परंपरांचा गाशा गुंडाळून शाळाही या प्रवाहात सामील होत आहेत. शासनाबद्दल बोलायचीच खोटी आहे कारण त्यांच्याकडून मराठीची कळकळ फक्त सणासुदीला आणि निवडणुकांच्या वेळी व्यक्त होते. बाकी उलटंच चित्र असतं.

गेली दोन वर्ष ठाणे, दादर येथील काही नामांकित मराठी शाळांनी इंग्रजी माध्यम सुरू करण्याचे निर्णय जाहीर केले आहेत. या बातम्या वाचून दु:ख होतं, व नेमकं काय नाही म्हणून एक एक करून एकेकाळच्या नावाजलेल्या मराठी शाळा अशी इंग्रजीची कास धरत आहेत हा प्रश्न पुन्हा पुन्हा पडतो.

मी आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी नाही, किंवा राजकीय पक्षाचा कार्यकर्ताही नाही. परंतु मराठी, किंबहुना मातृभाषेतून शिक्षण घेतलेली मी एक व्यक्ती आहे, आणि मातृभाषा शिक्षणावर माझा विश्वास आहे.

तसे पूर्वीपासूनच इंग्रजी-मराठी हे पर्याय महाराष्ट्रात शिक्षणासाठी उपलब्ध होते आणि पालक आपापल्या मतीनुसार ते निवडत असंत. पण अधिकाधिक शाळांनी मराठी सोडून इंग्रजी सुरू करण्याचे निर्णय घेतल्याने आताच्या पालकांसमोर पर्यायच उरत नाहीसे झाले आहेत.

मातृभाषा शिक्षणाबद्दल मी काही म्हणण्यापेक्षा आंतरजालावर उपलब्ध माहिती तपासली तर अधिक उत्तम होईल. वानगीदाखल युनेस्को सारख्या जागतिक संघटनेने जगभरात मातृभाषेतून शिक्षणाची शिफारस केली आहे हे सांगतो. त्यांच्या संकेतस्थळावर त्या विषयावरचं श्वेतपत्र तुम्हाला वाचता येईल. याशिवाय अनेक तज्ञांनी केलेले अभ्यास हेच सांगत आलेले आहेत. फ्रान्स, जर्मनी, जपान, चीन यासारख्या आपल्याहून पुढे असलेल्या देशांमधेही शिक्षणाचं 'माध्यम' इंग्रजी नसतं, कारण त्याचा मुलांच्या वैचारिक विकासाशी, मेंदूशी थेट संबंध असतो. पण दुर्दैवाने आपल्या देशात इंग्रजी म्हणजे भविष्य असं मानणारा, आणि ती भाषा यावी म्हणून सबंध शिक्षणच इंग्रजीतून देण्याचा जो एक विचारप्रवाह बळावलाय तो मुलांसाठी घातक आहे.

असं असतानाही अनेक जिल्हा परिषद शाळा, मुंबईबाहेरच्या शाळा मराठीचीच कास धरून आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करत आहेत, पालक इंग्रजीतून काढून मुलांना अशा शाळेत टाकत आहेत हे नमूद करतो. अशा काही शाळा मी प्रत्यक्ष बघून आलो आहे. परंतु ही जाणीव शहराबाहेर बघायला मिळते, शहरात मात्र प्रवाहामुळे अंध झालेले पालक आपल्या मुलासाठी योग्य काय हे बघू शकत नाहीयेत.

अशा परिस्थितीत शाळांनी पालकांचं मनपरिवर्तन करण्यात पुढाकार घ्यावा अशी मनापासून इच्छा आहे. आपली शाळा कदाचित असा विचार करत नसेलही; कदाचित करत असेल किंवा कदाचित आपण एव्हाना इंग्रजी माध्यम सुरू केलंही असाल. नसेल तर उत्तमच आहे. तो पर्याय विचाराधीन असेल तर या बदलात वेगळी वाट धरून मोठेपणा मिळवायची ही संधी आहे असं म्हणतो. आणि निर्णय घेऊन झालेला असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही असं सुचवतो.

पालकांना कुठेतरी मातृभाषा शिक्षणाचं महत्व पटतं परंतु शाळेतली इतर मुलं, सुविधा, किंवा इंग्रजीतली प्रगती अशी कारणं देत पालक समाजाबरोबर जातात. खरं तर त्यांच्या या प्रश्नांबाबत त्यांना आश्वस्त करणं गरजेचं असतं आणि शाळांइतकं प्रभावीपणे हे कुणीही करू शकत नाही असं मला वाटतं. पालक शुल्क द्यायला तयार असतात, ते इंग्रजीतही देतातच. इंग्रजीचे वर्ग पहिलीपासून सक्तीचे आहेतच. मग हे असताना शाळेचं संपूर्ण माध्यम इंग्रजी करून शेकडो मुलांच्या भविष्याशी खेळण्याचं कारण खरं तर काहीच नसतं.

याउलट शिक्षणाच्या नवनवीन पद्धती राबवण्याची आज खरी गरज आहे. हसत खेळत शिक्षण, ज्ञानरचनावाद यासारख्या शिक्षणपद्धती राबवून मुलांना चाकोरीबद्ध अभ्यासक्रमात न बांधता त्यांच्या कलागुणांना, विचारक्षमतेला पूर्ण वाव देण्याची गरज आहे. पण दुर्दैवाने माध्यमवेडापायी हा मुद्दा दुर्लक्षित राहतो, आणि मुलांना 'स्पर्धेचं युग' नावाच्या एका वेड्या गर्दीत लोटलं जातं. खरं तर बदल इथे व्हायला हवाय.

इंग्रजी ही एक भाषा म्हणून शिकायलाच हवी, पण ते माध्यम असण्याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही. त्याचे दुष्परिणाम मात्र प्रचंड आणि दूरगामी आहेत. पण शाळांनी पालकांना आणि पालकांनी शाळांना हा विश्वास द्यायला हवा. तेंव्हा तुमच्या शाळेला, तुमचा इंग्रजी माध्यम सुरू करण्याचा विचार नसल्यास किंवा असल्यास, असं मनापासून सुचवतो की एकदा तुमच्या पालकांना आवाहन करून बघा, विश्वासात घेऊन बघा. शाळा म्हणून अधिकारवाणीने पालकांशी बोला, की 'मराठीतूनच मुलांना शिकवा, ते इंग्रजीत मागे पडणार नाहीत ही जबाबदारी आमची'.

मला खात्री आहे पालक तुमच्या पाठीशी उभे असतील. पालकांना विश्वास हवाय तो शाळांकडून, अन्यथा प्रवाहासोबत वाहण्याची माणसांची वाईट सवय जिंकेल आणि मराठी, शाळा, मातृभाषेतून शिक्षणाचं महत्व पटणारे अनेक पालक, मुलं की नेमकं कोण हरेल, ठाऊक नाही; कदाचित सगळेच. शाळेचं किमान एखादं निवेदन जरी लोकांसमोर आलं, तरी खूप काही होऊ शकेल. हा मुद्दा मराठीचा नव्हे, हा मुलांच्या विकासाचा मुद्दा आहे. याबद्दल जगभर अभ्यास झाला आहे, त्यामुळे त्यात वाद नसावा. तसंही आपण जगाचंच अनुकरण करत आलोत. एका शाळेने हे केलं की इतरही शाळांना उपरती होऊ शकेल.

तेंव्हा विचार करा, या गुढीपाडव्याला मातृभाषा शिक्षणाची गुढी उभारा. इंग्रजी माध्यमाच्या शाळांना हेवा वाटेल अशी मराठी शाळा अस्तित्वात आणण्यासाठी पुढाकार घ्या. अर्थात निर्णय तुमचाच आहे, माझा आपला एक प्रयत्न.

पुन्हा एकदा, नूतन वर्षाभिनंदन

आपला नम्र,

प्रतिक्रिया

मिपापुरतं पाचशे वाचने व शून्य प्रतिसाद असं चित्र असलं तरीही प्रत्यक्षात बराच सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे यात आनंद आहे.

पिलीयन रायडर's picture

30 Mar 2017 - 8:44 pm | पिलीयन रायडर

मी तुझा धागा दोनदा वाचला. पण मला ह्याने नक्की किती फरक पडणारे असा प्रश्न मनापासुन पडला. पालकांचा रेटा असेल तर शाळा तसे निर्णय घेणार.

मी स्वतः सेमी इंग्लिशमध्ये शिकले ८ वी पासुन आणि मला तरी तो निर्णय योग्य वाटतो. अत्रे म्हणतात तसं ११ वी मध्ये का होईना, माध्यम बदलणारे तर मी तो त्रास ८वी मध्ये सहन करेन.

असो.. हे सगळे मुद्दे आपण आधीही बोललेलो आहोत.

मराठीबद्दल अतोनात प्रेम आहे पण मी मराठीच शाळा हवी असे काही मत नाही.

बाकी पटलं पण सेमी इंग्रजी पर्यायाबद्दल तुमचे काय म्हणणे आहे?

वेल्लाभट's picture

30 Mar 2017 - 2:43 pm | वेल्लाभट

सेमी इंगजीही व्यवहार्य नाही असं मत आहे. आमच्या शाळेत एका (गुणांच्या टक्केवारीनुसार सर्वात हुशार) तुकडीला आठवी ते दहावी सेमी इंग्रजी सक्तीचं होतं. त्या खालोखालच्या तुकडीत संपूर्ण मराठी. मी त्यात होतो. अर्थात आठवी पर्यंत इंग्रजी पुरेसं समजत असल्याने बहुदा ते फार जड जाणार नाही. पण सुरुवातीपासून दोन विषय इंग्रजीतून शिकावे व बाकी मराठी हे मुलांसाठी अयोग्यच.

अर्थात आठवी पर्यंत इंग्रजी पुरेसं समजत असल्याने बहुदा ते फार जड जाणार नाही.

मी स्वतः सेमी मधला. मला फार जड गेले होते आठवीचे इंग्रजी विज्ञान सुरुवातीला - पण नन्तर इंग्रजी भाषेची गोडी लागली. माझ्या भावाने थेट अकरावीला इंग्रजी सायन्स घेतले, तेव्हा त्याला जाड गेले होते. तेव्हा मला वाटले होते की बरे झाले आठवीमध्येच शिकलो!

अत्रे's picture

30 Mar 2017 - 2:52 pm | अत्रे

*जड गेले होते.

वेल्लाभट's picture

30 Mar 2017 - 4:16 pm | वेल्लाभट

तेच. पहिलंच वाक्य लिहिलंय. मला तेही पटत नाही.

पण शाळेच्या माध्यमाबाबत निर्णय घेणाऱ्या मंडळीपर्यंत असे पत्र प्रत्यक्षात पोचेल का? त्यांचे निर्णय कोणत्याही भाषेच्या प्रेमातून घेतले जात नाहीत, तर त्यामागे वेगळी गणिते असतात. अर्थात प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. ज्याला काहीतरी करायचं आहे त्यांनी सुरुवातीला साकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे.

वेल्लाभट's picture

30 Mar 2017 - 2:45 pm | वेल्लाभट

सुरुवात केलेली आहे, बघूच. सगळीकडे पत्र 'पाठवेन' असं नाही; प्रत्यक्ष जाऊन देण्याचाही पर्याय आहेच.

हेमंत८२'s picture

30 Mar 2017 - 2:58 pm | हेमंत८२

पटले पण मी हे करू शकत नाही. कारण माझी मुले इंगजी माध्यमातून शिकतात. आत्ता ती जिथे शिकतात तेथील मराठी शाळा म्हणजे एकदम खराब स्तिथीत आहे हा माझा ६ वर्षांपूर्वीचा अनुभव. अत्ता सध्या तिकडे गेलो नाही. मी स्वतः मराठी शाळेतून शिकलो आहे माझी आई मराठी शाळेत शिक्षिका होती, पण सध्या मला ते पटत नाही. आणि मुलांचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून एकदम उत्तम चालले आहे, आणि घरात शुद्ध मराठी भाषेतून बोलले जाते..

नितिन थत्ते's picture

30 Mar 2017 - 4:35 pm | नितिन थत्ते

आपली अर्थव्यवस्था शेतकी आणि उत्पादनाकडून सेवा क्षेत्राकडे वळत असताना इंग्रजी शिक्षण आवश्यकच होत आहे. दुसरे म्हणजे मराठी माध्यमाच्या शाळेत चांगले इंग्रजी शिकवण्याची व्यवस्था नसते. ती इंग्रजी माध्यमाच्या शाळेत असते असा दावा नाही पण मराठी शाळेपेक्षा बरी असू शकेल.

माझी मुलगी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकली. तिच्या शाळेत फंक्शनल इंग्लिश असा एक वर्ग चालत होता. त्या वर्गात जाऊन ती चांगले इंग्लिश शिकली. पण तो वर्ग आता बंद पडला आहे (तो पुढे चालवण्यासाठी शिक्षक मिळत नाहीत म्हणून). अशी काही सोय नसेल तर अवघड होईल.

वेल्लाभट's picture

30 Mar 2017 - 5:27 pm | वेल्लाभट

धाग्याचा उद्देश सांभाळायचा म्हणून खालील वाक्याला

मराठी माध्यमाच्या शाळेत चांगले इंग्रजी शिकवण्याची व्यवस्था नसते.

फक्त 'गैरसमज' इतकंच म्हणतो.

संदीप डांगे's picture

30 Mar 2017 - 7:45 pm | संदीप डांगे

सहमत.

जशी मराठी भाषा उत्तम बोलता, वाचता येणे वगैरे शाळेवर अवलंबून नाही, घरीच करता येते (असे काही पालक म्हणतात) तसेच मग इंग्रजी का नसावे हा प्रश्न मला पडतो.

शाळेचे शिकवण्याचे माध्यम मातृभाषा-परिसरभाषा-इंग्रजी असावी-नसावी ह्यावर बराच काकू झालाय आजवर. परत परत करायची ताकद नाही राहिली. त्यामुळे आता फक्त अनुभव सांगतो. माझा मुलगा साडेसहा वर्षाचा आहे, स्वतःच्या भाषेत मराठीत स्वतःच्या मनाने लिहू शकतो. यात मराठीबाणा वगैरे काही नसून परिसरभाषा-मातृभाषा म्हणून मराठी असल्याने त्याचे मराठीतून चाललेले शिक्षण उत्तम होत आहे, एक व्यक्ती म्हणून त्याचा विकास योग्यतर्‍हेने होत आहे. इंग्रजी भाषेचे शिक्षण त्याला शाळेतही मिळते व आम्ही घरीही हळूहळू देऊ लागलो आहोत. पण विचार करता येणे, समजणे, व्यक्त होणे ह्या व्यक्तिमत्व विकासासाठीच्या गोष्टी आहेत त्या मातृभाषेमुळे शक्य झाल्या आहेत असे वाटते. घोकंपट्टी व गिरवण्या नसल्याने (तुटपुंजाचअस्लेला) अभ्यास झकास होतो. याउलट इंग्रजी माध्यमातल्या याच वयातल्या मुलांना भरमसाठ गिरवण्या असतात व शिकवण्याही लावलेल्या दिसतात.

बाकी, समस्त पालकांना आपल्या मुलांच्या भविष्याप्रती प्रामाणिक भावना असल्याने कोणी चूक वा बरोबर असे म्हणणे योग्य वाटत नाही. मराठी माध्यमाच्या शाळा चांगल्या नाहीत ह्या कारणाखाली इंग्रजी शाळा तरी चांगल्या आहेत का हा प्रश्न नेहमीच खुबीने दडवला जातो असा अनुभव आहे.

पिलीयन रायडर's picture

30 Mar 2017 - 8:38 pm | पिलीयन रायडर

पण विचार करता येणे, समजणे, व्यक्त होणे ह्या व्यक्तिमत्व विकासासाठीच्या गोष्टी आहेत त्या मातृभाषेमुळे शक्य झाल्या आहेत असे वाटते.

माझा मुलगा इथल्या पब्लिक स्कूल मध्ये जातो. एक अक्षरही दुसर्‍या भाषेत बोलल्या जात नाही, केवळ इंग्रजी. तरीही तुम्ही म्हणता त्या सर्व गोष्टी माझ्याही मुलात आहेत. (वय ४.५) उलट इथल्या पद्धतीच्या शिक्षणाने मुलात बरेच बदल घडलेत आणि एकूणच व्यक्त होणं खुप सुधारलं आहे. इतका दृश्य परिणाम मला भारतातल्या शाळेत दिसला नव्हता.

त्यामुळे भाषेपेक्षाही शिकवण्याची पद्धत जास्त महत्वाची आहे असे माझे मत बनले आहे. तुमचाही मुलगा नाशिकमधल्या एका उत्तम शाळेत जातो आणि त्याच्या विकासाला ते ही खुप महत्वाचे कारण आहे असे माझे मत आहे.

मी सुद्धा आधीच हे मत मांडलंय कैकदा की संकल्पना महत्वाची असते, भाषा नाही. संशोधनांमधुन काय सिद्ध झालंय हा मुद्दा माझ्यापुरता तरी लागु होत नाहीये. माझा मुलगा दोन्ही भाषांमध्ये उत्तम पद्धतीने व्यक्त होत आहे. ए, बी, सी, डी सोबत अ, आ, इ , ई सुद्धा नीट काढतोय.

मी पुण्याला परत आले की त्याला अक्षरनंदनसारख्या मराठी माध्यमाच्या शाळेत घालणार आहे हे ही नमुद करते. कारण पुन्हा एकदा, शिकवण्याची पद्धत महत्वाची आहे, भाषा नाही. त्यामुळे शिकवणारे त्या दर्जाचे असतील तर मराठी वा इंग्रजी, काही फरक पडत नाही. तुम्हाला अर्थ समजला पाहिजे. कुणी मराठीत शिकवुनही मुलांपर्यंत पोहचतच नाही. कारण त्यांची मराठीसुद्धा तेवढी समृद्ध नसते किंवा शिकवणारे तेवढ्या सहजतेने शिकवत नाहीत. जर ह्या दोन्ही गोष्टी असतील तर इंग्रजीतही माणुस नीट शिकेल.

घोकंपट्टी व गिरवण्या नसल्याने (तुटपुंजाचअस्लेला) अभ्यास झकास होतो. याउलट इंग्रजी माध्यमातल्या याच वयातल्या मुलांना भरमसाठ गिरवण्या असतात व शिकवण्याही लावलेल्या दिसतात.

तुमच्याकडुन इतकं घाऊक विधान?? हे पालकांवरच अवलंबुन आहे. शाळेत कोणत्याही घाला, शिकवण्या लावणं पालकांचाच निर्णय आहे. त्याचा माध्यमाशी काय संबंध? घोकंपट्टी कोणत्याही माध्यमात वाईटच. मी मराठी शाळेत शिकलेय पण आम्हालाही शेकडो वेळा घोका आणि ओकाच करावं लागलं.

संदीप डांगे's picture

30 Mar 2017 - 9:55 pm | संदीप डांगे

माझा मुलगा इथल्या पब्लिक स्कूल मध्ये जातो. एक अक्षरही दुसर्‍या भाषेत बोलल्या जात नाही, केवळ इंग्रजी. तरीही तुम्ही म्हणता त्या सर्व गोष्टी माझ्याही मुलात आहेत. (वय ४.५) उलट इथल्या पद्धतीच्या शिक्षणाने मुलात बरेच बदल घडलेत आणि एकूणच व्यक्त होणं खुप सुधारलं आहे. इतका दृश्य परिणाम मला भारतातल्या शाळेत दिसला नव्हता.

>> पिराताई, मराठीतूनच शिक्षण असा माझा पवित्रा नाही. मी 'परिसरभाषा आणि मातृभाषा यातून प्राथमिक शिक्षण द्यावे' या मताचा आहे. तुम्ही बहुतेक दिड-दोन वर्षापासून अमेरिकेत आहात, तिथे इंग्रजीच परिसरभाषा व संवादाची भाषा आहे ना? त्यातून शिक्षण होत असेल तर चांगलंच आहे की.. त्यात वाईट, चुकीचं काहीच नाही. शिक्षणातला बदल दिसणे अभिप्रेत आहेच. तेही दिसत आहे. माझाही मुद्दा तोच आहे. शिक्षणप्रणाली व माध्यम दोन्ही उत्तम हवे. पण आपल्या मराठी मुलांचे (किंवा त्या अमेरिकी मुलांचे) प्राथमिक शिक्षण मॅन्डरिन, हिब्रु, स्वाहिली, जापनीज, कोरियन, जर्मन वगैरे कधीही कानावर न पडलेल्या परिकिय (खरा शब्द 'एलियन') भाषेत होणार असेल तर?

त्याचा माध्यमाशी काय संबंध?
>> अम्म्म.. आहे. आता ह्या प्रश्नाचे उत्तर मेगाबायटी होइल म्हणून आवरतो. थोडक्यात असे आहे की तुमच्या व माझ्या मुलाला जे मिळत आहे तसे दर्जेदार शिक्षण ९० टक्के भारतीय शाळांत नाही, बालवाडीपासून शिकवण्या व वह्या भरायचे खूळ तुमच्या लहानपणी होते काय? माझ्यातरी नव्हते. साधारण आठवीपासून शिकवण्या असायच्या. पाचवीपासून शिकवणी म्हणजे ढ समजले जायचे. आता मात्र स्पर्धेचं युग आहे म्हणून 'खूप अभ्यास करणे' हेच चांगले असे समजले जात आहे. खूप अभ्यास करणे म्हणजे 'घोकंपट्टी व गिरवणे' समजले जात आहे. त्यातून प्रत्यक्ष कितपत शिक्षण होत आहे याचे बेन्चमार्क किंवा स्टॅन्डर्डायझेशन करायची पालकांकडे कोणतीच पद्धत नाही. सगळी रॅटरेस अगदी बालवाडीपासून सुरू झाली आहे व त्यात इंग्रजी माध्यमांच्या शाळांनीच भर घातली आहे (सोबत, कसली तरी प्रोजेक्ट्स असतात जी १००% वेळा पालकच रात्र जागून करुन देतात) असे माझे मत आहे. इतरांची वेगळी मते असू शकतात.

आता आणखी एक उदाहरण, म्हणजे नाशिकमध्येच एका इन्टरनॅशनल बिरुद लावणार्‍या इंग्रजी शाळेत जाणे झाले होते, त्यांच्या प्रेझेन्टेशनचे काम होते त्यामुळे त्यांनी सर्व शाळा कशी आहे, कसे शिकवले जाते याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन केले. तेव्हा असे जाणवले की तेही आनंदनिकेतनच्या धर्तीवरच पद्धत राबवत आहेत. माध्यम इंग्रजी असले तरी सर्व भारतीय सण, संकल्पना, कथा, कृती वगैरे राबवतात. यावर्षीच त्यांचा सुधारित अभ्यासक्रम सुरु झाल्याने दोन वर्षाने प्रत्यक्ष प्रगती बघावी लागेल. तिथे मला एक प्रश्न पडला की चौथीतल्या मुलाला शिवाजींचा इतिहास इंग्रजीतून शिकवल्याने कितपत भिडेल, मी हा प्रश्न प्रामाणिक कुतूहलाने विचारत आहे. 'स्वराज्य' ही संकल्पना इंग्रजीतुन का शिकावी, रोजच्या संपर्कातल्या डोंगर दर्‍या, नद्या यांची नावे व भूगोल, पिकपाणी, वातावरण याबद्दल संपूर्ण एलियन भाषेतून शिकल्याने त्यांना ते कसे 'आपलेसे' वाटेल?

एक प्रश्न. माध्यमापेक्षा पद्धत महत्त्वाची याबद्दल आपले दोघांचे एकमत आहे. पण बहुसंख्य भारतीय पालक आपल्यासारखा विचार करत नाही हे सत्य आहे. त्यांना इंग्रजी माध्यम हेच महत्त्वाचे वाटते व त्यासाठी इंग्रजी शाळेत घालण्याकडे भर असतो (आता इण्टरनॅशनल असे बिरुद लावणारेंचे पेव फुटले आहे) हे कुठेतरी बदलून परिसरभाषा हे माध्यम व उत्तम शिक्षणपद्धत अशी एकंदर रचना असावी असे मला वाटते. जिल्हापरिषदेच्या शाळा त्याबाबतीत घोडदौड करत आहेत हे सांगतांना खूप बरे वाटते.

पिलीयन रायडर's picture

30 Mar 2017 - 10:13 pm | पिलीयन रायडर

आता तुम्हालाही माहिती आहे डांगेअण्णा की हा विषय कसा वाढत जातो. तेव्हा परत परत तेच मुद्दे नाही बोलणार पण इंग्रजी ही आपल्यासाठी एलियन भाषा आहे का हाच माझा प्रश्न आहे.

मराठी आपली मातृभाषा आहे आणि तिचे महत्व अनन्यसाधारण आहेच. पण आपण इंग्रजांनी १५० वर्ष राज्य केलेल्या भारतात रहातो जिथे इंग्रजी ही सर्रास वापरली जाते हे सत्य आहे. एक महाराष्ट्र सोडला तर त्यापुढे भारतात सुद्धा मराठी बोलली जात नाही. आपण मराठीत उत्तम संवाद साधु शकत असलो तरी शेकडोवेळा आपल्या तोंडुन इंग्रजीतुन वाक्य जातात. अनेकदा काही चपखल शब्दप्रयोग ह्याच भाषेतुन निघतात जे आपणही सर्रास वापरतो. आपल्या रोजच्या बोलण्यात अगदी शुद्ध मराठी बोलायची झाली तरीही कित्येक शब्द इंग्रजी आहेत. मातृभाषेनंतर बहुसंख्य लोक इंग्रजीमधुनच सहजपणे संवाद साधु शकतात. मला स्वतःला हिंदीपेक्षा इंग्रजी जास्त चांगली बोलता येते कारण आपण बोलतो ती हिंदी फिल्मी भाषा. त्यातले अनेक शब्द मला माहितीच नाहीत, किंवा लहेजाही कळत नाही. त्यामानाने मी इंग्रजी जास्तच वाचलेले आणि बोललेले आहे.

बरं इंग्रजीला संपुर्ण जगात असणारा वाव हा विषयच आणखीन वेगळा आहे. पोटापाण्यासाठी कायम महाराष्ट्रातच रहायचे हे नक्की असेल तर मराठी उत्तमच. पण साधं बँगलोरला गेलं तरी मराठीतल्या पदवीला अर्थ आहे का? संपुर्ण भारतात एकवेळ हिंदी चालणार नाही पण इंग्रजी चालेल अशी परिस्थिती आहे. जर्मनीसारखा देश सुद्धा हळुहळु इंग्रजी भाषेला सामावुन घेत आहे.

असं असताना इंग्रजीची हिब्रु सोबत तुलना योग्य आहे का? मराठीबद्दलचं प्रेम एक गोष्ट आहे पण इंग्रजी आवश्यक आहेच. ह्या सगळ्याचा सुवर्णमध्य असणारे नक्कीच कुठेतरी. कारण अखेरीस शिक्षणपद्धतीचा दर्जा हा कळीचा मुद्दा असणार. तो सुधारला तर आपण मुलांना दोन्ही भाषांमध्ये तरबेज नक्कीच करु शकतो. हे "किंवा" ते असं कशाला? हे "आणि" ते असंही होऊ शकतंच ना!

संदीप डांगे's picture

30 Mar 2017 - 11:45 pm | संदीप डांगे

आता मेगाबायटी झालाच बरं का. बॅच बॅच मध्ये वाचा. विस्कळीतपणाबद्दल माफी असावी :-)

--------------------------------------

विषय भलतीकडे जातो हे मान्यच. आताच बघा ना. माझा नेहमीचा मुद्दा हा परिसरभाषेतून प्राथमिक शिक्षण हा आहे. त्याला नेहमी कुठल्या कुठे नेऊन तिथल्या रिंगमध्ये आव्हान दिले जाते. रोजगारासाठीचे शिक्षण, इंग्रजीतून संवाद साधता येणे, महाराष्ट्र सोडून इतरत्र कमाईसाठी जाणे हे सर्वस्वी वेगळे विषय आहेत. त्याचा माझ्या मुद्द्याशी संबंध नाही हे वारंवार सांगत आलोय. रोजगाराचेच म्हणाल तर संपूर्ण इंग्रजीतून इंजिनियरींगचे शिक्षण घेतलेले केवळ ३०% तरुण नोकरी करण्यालायक असतात असे अहवाल आहेत. त्यांना बेसिक कन्सेप्ट्स क्लिअर नसतात. आता त्यांचे नुसते फर्राटेदार इंग्रजी कामास येते आहे काय? पदवी इंग्रजीत आहे तरी ७०% तरुण नोकरी करण्यास लायक नाहीत ह्याकडे कसे बघावे? आता भरमसाठी फिया भरुन इंजिनियरिंग कॉलेजात लेकरांना टाकणार्‍या पालकांना आपण काय सल्ला द्याल?

तुमचा दुसरा आक्षेप इंग्रजी भाषा बोलता येणे. हे काही फार कठिण काम नाहीच. दोन वर्षे तर जगातल्या कोणत्याही भाषेवर प्रभुत्व मिळवता येते. त्यासाठी इंग्रजी माध्यमाचा अट्टाहास कामाचा नाही. खरे तर इंग्रजी माध्यमाचा अट्टाहास हा मध्यमवर्गीय लोकांच्या डॉक्टर, इंजिनियर ह्या व्यवसायांकडे खात्रीशीर भविष्याची तरतूद म्हणून धरला जातो. ह्या दोन्ही प्रांतात इंग्रजी अनिवार्य आहे, त्यासाठी आपली पोरे कमी पडू नयेत म्हणून बालवाडीपासून इंग्रजी माध्यम असावे ह्यासाठी तळमळ दिसते. हा सगळा प्रकार केवळ मानसिक असुरक्षिततेचा आहे. ह्यात जागतिक संवाद भाषा, ज्ञानभाषा इत्यादी फक्त दर्शनी कारणे आहेत. (हे तुमच्याबद्दल नाही, जनरल आहे) ह्या मानसिक असुरक्षिततेला इंग्रजी शाळा हवा देतात. यशस्वी होण्यासाठी अनेक कारणे असतात त्यातले शाळा-माध्यम हे एक आहे त्यावर तुम्ही व मी एकाच पानावर आहोत हे मागेच झाले आहे. पण इथे तुमचा-माझा वैयक्तिक प्रश्न नसून विस्तृत लोकसंख्येचा प्रश्न मांडत आहे. ह्या लोकसंख्येत इंग्रजी बोलणार्‍यांना उगाच हुशार समजणारी लोक आहेत, इंग्रजी बोललो म्हणजे श्रीमंत, हुच्च आहेत असे समजणारी लोकं आहेत, त्यामुळेच त्याचा न्यूनगंड येऊन इंग्रजीवर प्रभुत्व मिळवणे अशक्य होत असलेली मोठी लोकसंख्या आहे, त्यांच्या ह्या न्यूनगंडाचा गैरफायदा घेऊन इंग्रजी शाळा आपले खिसे भरत आहेत व दर्जाच्या नावाने शंख आहे हे दिसत आहे. तुम्हाला माझे म्हणणे आज पटणार नाहीच, पण कदाचित २०२५ पर्यंत पटेल असे वाटते.

मराठीबद्दल प्रेम, बाणा ह्या गोष्टी माझ्या प्राथमिकतांमध्ये नाहीत. माझा मुद्दा परिसरभाषेतून समृद्ध प्राथमिक शिक्षण हाच आहे. मेट्रो शहरांमध्ये इंग्रजी बोलणे ऐकणे कानावर पडणे वापरली जाणे हे अनेक वेगवेगळ्या पार्श्वभूमींची लोकं एकत्र आल्याने होते. त्यांना सामायिक संवादाची भाषा म्हणून इंग्रजी मुख्य झाली आहे, यात इंग्रजी येणे हुशारीचे लक्षण व दक्षिण भारतीयांचा हिंदीचा राग हेही आहेच, तसेच व्यावसायिक गरजाही आहेत. इंग्रजांच्या १५० वर्षे राज्य करण्याचा इथे तसा संबंध नाही, अन्यथा आमच्या अकोल्यात (१८५३ पासून इंग्रजांनी प्रत्यक्ष राहून राज्य केले आहे इथे) सगळे इंग्रजीच बोलले असते तुमच्या-माझ्यासारखे. पण तिथल्या लोकांना तुमच्या माझ्यासारखा आत्मविश्वास नाही, हा आत्मविश्वास त्यांना देण्यास तिथली शिक्षणव्यवस्था कमी पडत आहे. ज्यांच्यात हा आत्मविश्वास उपजत आहे अशा विजय भाटकरांनी (जन्म १९४६. जन्मगावः मूर्तिजापूर, लोकसंख्या: पाच हजार, मुंबैपासून अंतर सहाशे किमी.) जे करायचे ते केलेच. असाच आत्मविश्वास प्रत्येक मराठी मुलात निर्माण करायला शिक्षणव्यवस्था कमी पडत आहे. भारतात ज्यांच्यात आत्मविश्वास उपजत असतो तेच मार्ग काढून यशस्वी होतात. त्यांना इंग्रजी हे साध्य नव्हे. साधन आहे हे समजलेले असते, ज्यांना इंग्रजी साध्य वाटते ते यशस्वी होऊ शकत नाहीत.

तर मेट्रो शहरात राहणार्‍यांना इंग्रजी एलियन नाही. मात्र हिवरखेड (माझे मूळ गाव), मूर्तिजापूर अशा गावात राहणार्‍या मुलांना, त्यांच्या पालकांना आहे. अचानक काही ओळखपाळख नसलेली भाषा थेट प्राथमिक शिक्षणाचे माध्यम म्हणुन आदळली तर उपयोग होत नाही. इंग्रजी भाषा म्हणून आवश्यक आहेच, ती अजिबात शिकवूच नका, कान बंद करुन घ्या असला काही माझा विचार नाही. पण इंग्रजीतून प्राथमिक शिक्षण म्हणजे व्यवसायिक यशाची हमखास खात्री हे जे काही चित्र आहे ते मात्र मुळापासून उखडावे असे माझे ठाम मत आहे. (हे होणार नाही हे माहित आहे, तरी कोशिश जारी है)

इंग्रजी ही इतर भाषांसारखीच एक भाषा आहे. पण ह्या भाषेच्या सक्तीने व त्यामुळे निर्माण झालेल्या भीतीने कितीतरी खर्‍या हुशार मुलांना मातीत गाडले आहे हे मी बघितले आहे, त्यामुळे कळकळ आहे. माझाच मावसभाऊ आहे, छोट्याशा खेड्यात राहतो, इतका हुशार आहे की इंजिनियरींगमध्ये गेला असता तर खूप यशस्वी झाला असता, पण इंग्रजीच्या भीतीने पुढे शिकू शकला नाही. त्याने आता स्वतःच प्रयोग करत शेतकर्‍यांसाठी सुधारित यंत्रे बनवली आहेत, स्वतः जिल्हाधिकार्‍यांनी दखल घेऊन त्याला त्यासाठी राज्यस्तरिय पुरस्कार मिळवून दिला, यंत्रांची विक्रीही सुरु झाली आहे. हाच मुलगा अमेरिकेत, चीनमध्ये, जर्मनीत, जापानमध्ये, कोरियात असता तर त्याला त्याच्या भाषेत इंजिनियरिंग शिकायला मिळाले असते, व त्याच्या बुद्धिमत्तेचा त्या देशाला फायदा झाला असता. जे माझ्या मावसभावाने वयाच्या ३६व्या वर्षी साध्य केले ते कदाचित दहा-पंधरा वर्षे आधीच झाले असते. तेवढा देश पुढे गेला असता.

हेच पुढे वाढवून सांगतो. अनेक शेतकरी स्वतः अशी यंत्रे बनवत आहेत, विकत आहेत हे मला माहित आहे, तुम्हीही जालावर शोधून बघू शकता, हे इंग्रजीशिवाय, इंजिनियरींग न शिकता यंत्रे शोधणारे लोक कसे तयार झाले? कारण ते आपल्या मातीशी, इथल्या समस्यांशी रोज भीडत होते, त्यांच्याशी एकरूप होते. म्हणून त्यावर विचार, संशोधन करुन उपाय शोधू शकलेत. इंग्रजीतून शिकून जे आज इंजिनियर होत आहेत त्यांची अशी उदाहरणे दिसलेली नाहीत, दिसत नाहीत. इथे नाशिकमध्ये द्राक्षशेतीसाठी वेगवेगळ्या प्रकारची यंत्रसामुग्री लागते, बहुतांश बाहेरुन आयात करतात. अशी आयात होते आहे बघून गेल्या दोन वर्षात इथल्या कॉपीबहाद्दरांनी यंत्रे बनवलीत, पण ती तेवढी दर्जेदार नाहीत. हीच यंत्रे इथल्या इंजिनियरांना आधीच बनवता आली नाहीत. कारण आपल्या परिसरातल्या समस्येकडे बघायचे, त्यावर उपाय शोधायचे शिक्षण दिले जात नाहीये असे मला वाटते. इथे भाषेचा संबंध येतो. बहुसंख्य लोक भारतात रोजच्या व्यवहारात इंग्रजी वापरत नाहीत, ते फक्त मेट्रोजमध्ये वापरतात. भारतीय जनता आपल्या समस्या आपल्याच भाषेत मांडते, पण तिच्याशी एकरुप होण्यास (त्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी जे गरजेचे आहे) इंग्रजीतून घेतलेले शिक्षण तयार होत नाही असे दिसते. एक मोठी दरी आहे. हे सर्व शिक्षण भारतीय भाषामध्ये असणे गरजेचे आहे ते याकरताच.

असे होत नाही, कारण कुणाला इथे आपल्या परिसरातल्या समस्या सोडवायच्या नाहीत, तर स्वत:च्या पोटापाण्याच्या समस्या सोडवायच्या असतात. हे एक चक्र आहे. आपल्या परिसरातल्या समस्या सोडवल्या तर पोटापाण्याचा प्रश्न सुटतो. तसे केले नाही तर मात्र जगण्याची समस्या निर्माण होते व लोक बाहेर पडण्याचा मार्ग शोधतात. सद्यस्थितीत इंग्रजी व त्यातून पुढे डॉक्टर-इंजिनियर हाच तो मार्ग असे बहुसंख्य लोक समजून बसले आहेत. शिक्षणात भाषेच्या माध्यमाचा संबंध असा खूप मोठा आहे.

आपल्या देशाचा, पर्यायाने आपला सर्वांचा इतर विकसित देशांच्या तुलनेत विकास न होण्यामागे असा खूप मोठा विस्तृत पट आहे, माध्यमभाषा हा त्यातला एक भले छोटासा पण महत्त्वपूर्ण भाग आहे.

पिलीयन रायडर's picture

30 Mar 2017 - 11:57 pm | पिलीयन रायडर

अण्णा...

इंग्रजीमधुन शिक्षणं म्हणजे दर्जेदार शिक्षण नाही - मान्यच आहे..
इंग्रजी शाळांचा दर्जा हा काही महान नसतो - मान्यच आहे..
इंग्रजीत बोलणे म्हणजे उच्च असणे हा समज समाजात आहे - मान्यच आहे..
आणि हा समज चुक आहे - मान्यच आहे..
खेडेगावातल्या मुलांना थेट इंग्रजीत शिकवणं मुर्खपणा आहे - मान्यच आहे..
इंग्रजीच्या भीतीने हुशार लोक मागे पडत आहेत - मा.आ

पण ह्या सगळ्याचा अर्थ केवळ मराठीतुन शिकले म्हणुन सगळं आलबेल होणार हा नाहीचे. त्यामुळे मुद्दा एकच आहे की शिकवण्याची पद्धत विकसित करणं आवश्यक आहे. मराठी शाळांचा दर्जा खालावलेला असेल तर निव्वळ मातृभाषेतुन शिकुन काही होणार नाही. इंग्रजीलाही डावलुन चालणार नाही. अखेर जनता पोटापाण्याचाच विचार करतेच. आणि त्या संधी इंग्रजी भाषेत जास्त उपलब्ध आहेत हे सत्य आहे (मेडिकल इंजिनिअरिंग सोडुन सुद्धा). कारण सरळ आहे की ती जगात मोठ्या प्रमाणात बोलली जाणारी भाषा आहे.

तेव्हा इंग्रजी जसे साधन आहे, तसेच मराठी देखील साधनच आहे. साध्य नव्हे.

ह्याच करिता माझ्या आसपास जी दर्जेदार शाळा असेल त्यात मी मुलाला घालणार. केवळ मराठीचा आग्रह मी धरु शकत नाही. प्राथमिकता ही शिक्षण पद्धतीला आहे, भाषेला नाही.

संदीप डांगे's picture

31 Mar 2017 - 12:55 am | संदीप डांगे

पिराताई,

अखेर जनता पोटापाण्याचाच विचार करतेच. आणि त्या संधी इंग्रजी भाषेत जास्त उपलब्ध आहेत हे सत्य आहे (मेडिकल इंजिनिअरिंग सोडुन सुद्धा).
>> फार मोठ्ठा गैरसमज पसरवला गेला आहे. संधींची उपलब्धता इंग्रजीवर अवलंबून नाहीये. काही हमखास यशस्वी ठरलेल्या खात्रीच्या क्षेत्रांमध्ये इंग्रजी आवश्यक असल्यामुळे तसे वाटते. इंग्रजीद्वारे प्राप्त होणारा एकच मार्ग बघितल्यास असेच दिसेल. मला इंग्रजीशिवायचे हजार मार्ग दिसतात. (संदर्भः आरक्षणासंबंधी माझा एक धागा) ईंग्रजी म्हणजे संधीचा एकमात्र दरवाजा हा गैरसमज आहे. याउपर माध्यम महत्त्वाचे नाही ना? मग का इंग्रजीचा अट्टाहास?

कारण सरळ आहे की ती जगात मोठ्या प्रमाणात बोलली जाणारी भाषा आहे.
>> मी जगाबद्दल बोलतच नाहीये. भारतातले ३०-४० कोटी तरुण इथून उठून इतर देशात जाऊ शकणार नाहीत किंवा आउटसोर्सिंगमध्ये इतके लोक सामावून घेण्याची क्षमताही नाही. ती जनता इथेच काम करते, नोकर्‍या करते. त्यांची व्यवस्था इथेच करायची आहे. जगाशी संबंध येतील असे व्यवसाय नोकर्‍या अगदी चार-दोन टक्के असतील. त्या चार-दोन टक्क्यांसाठीच सगळ्यांची स्पर्धा सुरू असेल तर बेकारी व त्यातून असंतोष वाढण्याशिवाय आणखी काय होणार?

-----------------------------

तेव्हा इंग्रजी जसे साधन आहे, तसेच मराठी देखील साधनच आहे. साध्य नव्हे.
ह्याच करिता माझ्या आसपास जी दर्जेदार शाळा असेल त्यात मी मुलाला घालणार. केवळ मराठीचा आग्रह मी धरु शकत नाही. प्राथमिकता ही शिक्षण पद्धतीला आहे, भाषेला नाही.

>> हे तुम्हा आम्हाला कळते हो.. इथे तुमचा माझा विषय नै ना चालू..!. मी एक समाजिक निरिक्षण सांगत आहे, तुमच्या वैयक्तिक दृष्टिकोनातून नका बघू त्याला. तुमचा निर्णय योग्यच आहे. सदर चर्चा "माझाच निर्णय बघा कसा बरोबर, आणि तुमचा मात्र फडतूस" अशा अर्थाने नाही करत आहे मी. (इंग्रजीमाध्यमवाले मात्र असे करतातच हा वैयक्तिक अनुभव). एक विरंगुळा माझ्या मुलाला तर जगातल्या किमान प्रमुख सहा भाषा शिकाव्यात असे सांगणार आहे. तो वीस-बावीस वर्षाचा होइस्तोवर ह्या भाषांत (कदाचित जास्तच) तरबेज झालेला असेल.

एक व्यापक स्तरावर ही मांडणी किती प्रभावी ठरु शकते याबद्दल हा सगळा खटाटोप चालू आहे. "विद्यार्थीभिमुख शिक्षणव्यवस्था व परिसरभाषेचे माध्यम" यातून देशपातळीवर चमत्कार घडू शकतो अशी माझी धारणा आहे. देशातले ९९% पालक मात्र हे मान्य करणार नाही हे पक्के माहित आहे. एकूण जगात रोजगारासंबंधी चालू असलेल्या घडामोडी व पुढच्या वीस वर्षांतली आव्हाने ही गेल्या वीस-तीस वर्षांपेक्षा प्रचंड वेगळी, आश्चर्यकारक असतील. त्यासाठी पालकांनी तयार असावे अशी माझी एकूण मांडणी आहे, त्यासाठी मागच्या अनुभवांवर आधारित डावपेच उपयोगाचे नसणार. (उदा. भाषांतराच्या अद्ययावत होत जाणार्‍या सुविधा. येत्या काळात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एका देशाच्या व्यक्तिला दुसर्‍या देशाच्या व्यक्तीशी आपआपल्या भाषेतूनच अर्थपूर्ण संवाद साधता येईल, तिथे भाषेचा अडसर नसणार किंवा मानवी दुभाषाची गरज पडणार नाही.)

-----------------------------

अभ्या..'s picture

1 Apr 2017 - 5:17 pm | अभ्या..

वॉव संदीप,
ही मांडणी प्रचंड आवडली.
अ‍ॅक्चुअली संवाद भाषा ही ज्ञानभाषेला कशी पर्यायी ठरु शकेल हाच विचार महत्त्वाचा आहे. संवाद हेही ज्ञानाचे माध्यमच आहे. एखादी एक भाषा ह्यावरच डिपेंड राहण्याचे सोडून बरेच ऑप्शन्स अ‍ॅव्हेलेबल होत आहेत. ज्यांना करायचेय त्याच भाषेचा वापर करुन करीअर त्यांंना तो मार्ग आहेच की पण इतर भाषा (ह्यापेक्षा संवाद म्हणेन) वापरुन अनेक रोजगार उपल्ब्ध होतील, अनेक नव्या वाटा प्रकाशमान होतील ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतेय. एखादा मातृभाषेत शिक्षण घेऊन चित्रभाषेत संवाद साधत असेल, ग्राफीक्सच्या नव्या कितीतरी कन्सेप्ट्स आहेत, मल्टीमिडीया आहे, इंटरॅक्टिव्ह मिडीया आहे, ट्रान्सलेशन्स फॅसिलिटीज आहेत त्याचा वापर करुन कित्येक करीअर्स करता येऊ शकतात. गरज आहे ती फक्त नवनवीन तंत्रे शिकण्याची आस अन सृजनशीलतेची.

अप्पा जोगळेकर's picture

31 Mar 2017 - 2:33 pm | अप्पा जोगळेकर

साहेब,
हे तुमचे या प्रतिसादातले लिखाण खाली तुमचे नाव लिहून दुसर्याला पाठवले तर चालेल का ?

संदीप डांगे's picture

31 Mar 2017 - 3:37 pm | संदीप डांगे

हो, चालेल की! धन्यवाद!

गॅरी ट्रुमन's picture

2 Apr 2017 - 10:20 am | गॅरी ट्रुमन

इंग्रजी ही आपल्यासाठी एलियन भाषा आहे का हाच माझा प्रश्न आहे.

माझ्यासाठी तरी नक्कीच नाही.

भाषा एलियन असण्यापेक्षा विचार एलियन असणे (म्हणजे कोणीतरी दुसरा काहीतरी बोलतो/करतो म्हणून झापडबंद करून आपणही तसेच बोलायचे/करायचे) ही माझ्यासाठी तरी अधिक भयावह स्थिती आहे.

उत्तम इनिशियेटिव. पत्राचा आशय पटला.

सुचिकांत's picture

30 Mar 2017 - 8:17 pm | सुचिकांत

कोल्हापूर विभागातील मराठी माध्यमाच्या शाळा हाऊसफुल्ल!

प्रसाद गोडबोले's picture

30 Mar 2017 - 8:45 pm | प्रसाद गोडबोले

खरं सांगु का , मराठीत बोलले की लोकं आपल्याला फार कॅज्युअली घेतात असे वारंवार जाणवायला लागलंय आणि त्यामुळे नेहमीच्या संवादात मराठी वापरायला नकोच वाटते. माझं मराठीविषयीची प्रेम आता फार्फार संकुचित होत चाललय ... आता मराठी फक्त अध्यात्मापुरतीच वापरायची संस्कृतसारखी असा निर्णय कोठेतरी मनात ठाम होत चालला आहे. हा कदाचित माझ्या मराठीचा , माझ्या शब्दांच्या निवडीचा , माझ्या वाक्यरचनेचा , अर्थात माझा कमीपणा असेल पण राहवले नाही म्हणुन अनुभव टाकत आहे:

काही दिवसांपुर्वी एका हॉटेलात रहाण्याचा योग आला , तिथे अगदी डोअर कीपर पासुन मॅनेजर पर्यंत सर्व जण मराठी असल्याने सर्वांशीच मराठीत आणि तेही आपुलकीने बोलत होतो.
पण एके दिवशी माझा एक गेस्ट भेटायला आला तर त्याला अत्यंत कॅज्युअली ट्रीट करण्यात आले. अगदी मी मॅनेजमेन्टला पुर्ण कल्पना दिली होती की माझा मित्र येणार आहे , तुम्ही त्यानुसार व्यवस्थित बिलिंग करा. मीच अ‍ॅप्रूव करणार आहे , मीच सायनिंग ऑथॉरिटी आहे इतके ! तरीही य्झ लोक माझ्या गेस्टला काहीच्या काही प्रश्न विचारत होते , तेही अगदी त्यांची लहानपणीची दोस्ती असल्या सारखे ! अगदी तुमचे पेमेंट कोण करणार इथपर्यंत !!
मला कळाल्यावर डोक्यातच तीडीक गेली , मग त्यांना ईंग्रजाच्या भाषेत झाड झाड झाडले . ३ वेळा सॉरी म्हणे पर्यंत . च्यायला मी तुमच्याशी मराठीत बोलतो म्हणुन मी तुमच्या लेव्हलचा होत नाही , मी कस्टमर आहे आणि तुम्ही सर्व्हिस प्रोवाईडर .

अगदी असेच सेम अनुभव बर्‍याचदा बस मध्ये , सरकारी ऑफीसात , रेस्टेरॉन्ट मध्ये गेल्यावर , जवळपास सर्वत्रच येत असतात. आपण मराठीत बोलायला लागले की लोकं त्यांना आपल्या लेव्हलचे समजायला लागतात. कस्टमर आणि सर्व्हिस प्रोवाईडर हा फरकच विसरुन जातात .

असो. तेव्हा पासुन कानाला खडा . फक्त आपल्या घरात आणि मित्रांमध्येच मराठीत बोलायचे . अन्यत्र फक्त इंग्रजी ! पोराला तर जमेल तितके इंग्रजी शिकवणार त्यातही एकदम ब्रिटिश अ‍ॅक्सेंट शिकवता आला तर तोही !

संदीप डांगे's picture

30 Mar 2017 - 10:08 pm | संदीप डांगे

चांगला अनुभव आहे. इथे भाषेचा नाही तर तुम्ही दाखवलेल्या आपुलकीचा प्रश्न आहे. माझ्याही अनुभवानुसार आपण कोणतीही भाषा वापरा, आपुलकी दाखवली तर लोक डोक्यावर बसतात. आपल्या लेवलचा समजतात.

मी नाशिकला आलो तेव्हा घरभाडं घ्यायला घरमालकाचा ऑफिसातला प्योन यायचा, आधी फार अदबीने वगैरे आब राखून बोलायचा. एकदाच त्याच्यासोबत त्याच्या टूविलरवर बसून चौकातल्या एटीएममध्ये गेलो भाड्यासाठीचे पैसे काढायला तर तेव्हापासून त्याचा नूरच बदलला, तोही मला कॅज्युअली (वर तुम्ही सांगितल्यासारखं) घ्यायला लागला. बोलता बोलता शाब्दिक टपल्या काय मारनार, एखादे काम सांगितले तर दुरुत्तरे करणार. एकदा शिस्तीत झाडल्यावर बंद झाला प्रकार.

स्रुजा's picture

31 Mar 2017 - 12:09 am | स्रुजा

+१. हा प्रश्न भाषेचा नसून त्यांना तुम्ही बरोबरीची वागणूक दिली आणि ती त्यांनी सन्मानाने स्विकारायचं सोडून उलट शेफारल्या सारखं वागले. हा आपल्या मानसिकतेचा प्रॉब्लेम आहे. वैयक्तिक बाँडिंग असणं हे जगात काही ठिकाणी उत्तम सर्व्हिस मिळण्याची, चार क्षण सुखाने जाण्याची किल्ली समजतात . तेच आपल्यासारख्या काही देशात लोकं अति वैयक्तिक होतात आणि पोलाईट टॉक वरुन तुमची किंमत करतात.

हां, आता तुम्ही परदेशात जा. भारतीय सेल्समनशी ईंग्रजीमध्ये बोला पण तुम्ही भारतीय आहात ना? मग तो तुमचा गैरफायदा घेणारच. तुम्हाला काय कळतंय? अति जवळीक असल्यासारखं दाखवुन अनप्रोफेशनल वागणारच. हा मानसिकतेचा दोष आहे.

स्रुजा's picture

31 Mar 2017 - 12:31 am | स्रुजा

वेल्ला, तुझा लेख वाचला. भाषेबद्दल आत्यंतिक आग्रह नसला माझा तरी आपल्या मुलांना साहित्य वाचता येण्याइतकं आणि मराठी अभिजात नाटकं- सिनेमे बघावेशे वाटतील इतकी गोडी आणि इतकी पकड आपल्या भाषेवर हवी हे मात्र मनापासून वाटतं.

तुझ्या प्रयत्नांना यश येओ. जी काही मदत लागेल ती मी करेनच. आपलं बाकी सविस्तर बोलणं चालूच आहे.

एक वेगळा मुद्दा मांडू इच्छितो. आमच्या एका नातेवाइकांच्या घरी गेलो असता मला असे दिसले की त्याचा (इंग्लिश माध्यम) चौथीत जाणारा मुलगा कसला तरी प्रकल्प करत आहे. या प्रकल्पासाठी त्याला इंटरनेटवरून माहिती गोळा करायची होती.

तोच मुलगा जर मराठी माध्यमातून शिकत असता तर त्याला नेटवर माहिती शोधायला किती अवघड गेले असते! एक तर सर्च इंजिनवर मराठी टाइप करण्याची बोंब. (बऱ्याच लोकांना अजूनही मराठीत टाइप करता येत नाही). आणि सर्च केले तरी नेट वर जो मराठीत ज्ञान साठा आहे त्याला इंग्रजीतल्या ज्ञानसाठ्याशी आपण कम्पेअरच करूच शकत नाही.

तो मुलगा इंग्रजीत शिकतो म्हणून त्याला ज्ञानसाधनेत फायदाच झाला ना.. असे मला वाटते.

अप्पा जोगळेकर's picture

31 Mar 2017 - 2:17 pm | अप्पा जोगळेकर

प्रकल्प करण्यासाठी गुगलवरुन माहिती शोधावी ही मानसिकताच आपल्याला बोलके पोपट तयार करायचे आहेत हे दर्शवते.
त्या मुलाला प्रकल्पाबद्दल शाळेत काही सांगितले असेलच ना. त्याबदल त्याने काही विचार करुन हालचाल करावी अशी अपेक्षा आहे. शाळेनेच गुगलवर शोधा असे सांगितले असेल तर धन्य आहे.
गुगलमुळे विचारशक्ती कमी होते असे मला वाटते. ज्ञानसाठा हा सॉफ्ट/ हार्ड स्वरुपातील ग्रंथांमधून उपलब्ध होतो. गुगलवरुन नव्हे.
गुगलवर शोधून लिंका डकवणारे भुरटे विद्वान इथेसुद्धा पैशाला पासरीभर मिळतील.

गुगलमुळे विचारशक्ती कमी होते असे मला वाटते. ज्ञानसाठा हा सॉफ्ट/ हार्ड स्वरुपातील ग्रंथांमधून उपलब्ध होतो. गुगलवरुन नव्हे

यातला फरक समजावून सांगता का? म्हणजे एखाद्या नेट वरील आर्टिकल मधले ज्ञान आणि पुस्तकातले ज्ञान कसे वेगळे असते?

आणि गुगल वर ही पुस्तके मिळतात (ईबुक्स).

प्रकल्प करण्यासाठी गुगलवरुन माहिती शोधावी ही मानसिकताच आपल्याला बोलके पोपट तयार करायचे आहेत हे दर्शवते.

त्या मुलाला "जगातल्या प्रसिद्ध स्त्री राजकारण्याविषयी" पोस्टर बनवायचे होते. त्या साठी तो गुगल करत होता.

अत्रे's picture

31 Mar 2017 - 2:30 pm | अत्रे

माझा सॉफ्ट शब्द वाचायचा राहिला - म्हणून ईबुक्स चे वाक्य कन्सिडर नका करू.

अप्पा जोगळेकर's picture

31 Mar 2017 - 2:41 pm | अप्पा जोगळेकर

त्या मुलाला "जगातल्या प्रसिद्ध स्त्री राजकारण्याविषयी" पोस्टर बनवायचे होते. त्या साठी तो गुगल करत होता.
हा विषय चौथीतल्या मुलाला प्रकल्पासाठी देणे चुकीचे आहे. शिक्षण व्यवस्थेचा दोष.

यातला फरक समजावून सांगता का? म्हणजे एखाद्या नेट वरील आर्टिकल मधले ज्ञान आणि पुस्तकातले ज्ञान कसे वेगळे असते?

ज्याने आधीच ज्ञान मिळवले आहे त्याला एखादे आर्टिकल उपयोगी पडेल

डिपेन्डस. कधीकधी एखादा बोजड विषय एखाद्या लेखातून चटकन समजतो, त्या विषयावरचे पुस्तक वाचण्यापेक्षा. किंवा एखाद्याला स्वतःहुन काही वैज्ञानिक खेळणी बनवायचीय असतील अशा वेळी या विषयावरचे यूट्यूब व्हिडीओ बघून लगेच कळते. (उदा. https://www.youtube.com/user/arvindguptatoys चॅनेल)

असो तुमच्या म्हणण्याचा आशय कळाला मला.

वेल्लाभट's picture

31 Mar 2017 - 12:05 pm | वेल्लाभट

अरे बापरे.
नाही म्हणता बरीच चर्चा झाली मातृभाषा विरुद्ध इंग्रजी बद्दल. असो. त्यात भर घालत नाही कारण धाग्याच्या सुरुवातीलाच म्हटलं होतं, उद्देश तो नाहीये. सगळे प्रतिसाद वाचले, बरंच काही लिहावंसं वाटलंय पण आत्ता नाही. कारण ठाम झालेली मतं, नुसती चार गोष्टी सांगून बदलण्याचा प्रयत्न व्यर्थ आहे असं वाटतं. मग ते शिक्षणाचं माध्यम असो की व्यायामाची गरज. अनेकांना अनेक प्रकारे सांगताना आलेल्या अनुभवावरून आता ते थांबवलंय. त्या प्रयत्नात वेळ जातो आणि वाद होतो. त्यामुळे दाखवायला काहीतरी चित्र असेल, सांगायला केलेलं काम असेल, तेंव्हाच आता.

राहता राहिला प्रश्न माझ्या पत्राचा किंवा पत्रमोहिमेचा, तर मला विश्वास आहे काहीतरी होईल याचा. पत्रामुळेच असं नाही पण बरंच काही चालू आहे; एकत्रित परिणाम नक्की होईल.. आमच्या फेसबुक समुहातील ३० हजार लोकांपैकी २५% लोकांनी जरी सक्रीय व्हायचं म्हटलं तरी पुरे आहे.

बाकी या सगळ्या गडबडीत जेंव्हा माझा इंग्रजी माध्यमातून शिकलेला सहकर्मचारी, वरिष्ठ त्याच्याच मुलीच्या आयबी शाळेच्या प्रोजेक्ट साठी स्पीच आणि स्लोगन लिहायला मला बोलावतो तेंव्हा चेहर्‍यावरचं स्मित लपवता येत नाही. #ताजीघटना

अप्पा जोगळेकर's picture

31 Mar 2017 - 2:08 pm | अप्पा जोगळेकर

खरेतर हे अवांतर आहे पण
ज्ञान प्रबोधिनी, निगडी, मराठी माध्यम येथे शिकणार्‍या मुलांचे पालक येथे असतील तर कॄपया मला व्यनि करावा. थोडी मदत हवी आहे.