वात्सल्यसिंधू माझी आजी

मोनु's picture
मोनु in लेखमाला
8 Mar 2017 - 6:55 am

.

माझी आजी...
अत्यंत कठीण परिस्थितीतील धैर्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझी आजी.
तिच्याबद्दल खूप काही लिहायचे बर्‍याच दिवसांपासून मनात आहे, पण काय काय लिहू आणि काय अलिखित ठेवू ते कळत नव्हते. महिला दिन विशेषांकाच्या निमित्ताने ही संधी मिळाली.

जगाच्या दृष्टीने तिचे कर्तृत्व काही असामान्य नाही, पण माझ्या नजरेने पाहिले तर नक्कीच आहे.
वयाच्या अवघ्या २०-२२व्या वर्षी नियतीने वैधव्याचे दान पदरात टाकले. पदरात दोन लहान लेकरे. सासर आणि माहेर दोन्हीकडून अव्हेरली गेलेली ती, ढमढेरे वाड्यात मुलांना घेऊन राहू लागली आणि वाड्यातील लोकांची धुणी-भांडी करू लागली. उरलेल्या वेळात कुंभारवाड्यात जाऊन कुंड्या, रांजण करीत असे. कष्टाने भरलेला प्रत्येक दिवस.

.

अनेक वर्षे अशी काढल्यावर हुजूरपागेत वसतिगृहातील मुलींच्या स्वयंपाकाच्या कामाची नोकरी मिळाली. पहाटे चार वाजता तिचा दिवस सुरू होत असे. पाच किलो कणीक भिजवून त्याच्या पोळ्या करण्याचे काम अकरा-साडेअकरापर्यंत सुरू असे. त्यानंतर इतर कामे. दीड वाजत असे तिला स्वतः जेवायला. पण या सगळ्या धावपळीतही ती माझ्यासाठी न चुकता गरम गरम जेवण घेऊन यायची शाळेच्या गेटजवळ आणि गेटखालच्या फटीतून ते ताट सरकवून मला जेवण द्यायची व गेटच्या जाळीतून मन भरून बघत बसायची मला जेवताना. मग घरी जाऊन स्वतः जेवत असे. दुपारी दोन-तीन तास मिळत असत तिला विश्रांतीसाठी. पण त्याही वेळात ती झोपत नसे. शाडू मातीची अतिशय सुरेख तुळशीवृंदावने तयार करत असे. त्यांना रंगवून सुंदर डिझाइन्स करत असे त्यावर. मग पुन्हा पाच वाजता शाळेत संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या कामाला जात असे. असा तिचा दिनक्रम सोळा वर्षे सलग होता. तिच्या कामाचा पगार तिला पैशांच्या स्वरूपात अगदीच नगण्य मिळत असे. आमच्या सहा जणांच्या कुटूंबाला पुरेल एवढे जेवण तिला रोज मिळत असे कामाचा मोबदला म्हणून. आमच्या पूर्ण कुटुंबाचे संध्याकाळचे जेवण होत असे त्यात. अतिशय चविष्ट स्वयंपाक असे तो.

माझ्या अगदी लहानपणापासूनची ती मला आठवते. ढमढेरे वाड्यातील छोट्याशा खोलीत संसार मांडलेली. अवघी पाच बाय पाचची खोली... पण निगुतीने स्वच्छ, टापटीप ठेवायची. रोजचे रोज तांब्याचा आणि पितळेचा हंडा चकचकीत घासून पिण्याचे पाणी बाहेरच्या नळावरून भरून आणून ठेवी घरात. कोणीही पाहुणे आले की त्या एवढ्याशा जागेत रॉकेलच्या स्टोव्हवर अगदी मनापासून स्वयंपाक करायची. तिने केलेला कोणताही पदार्थ अतिशय चविष्टच होतो. अन्नपूर्णा होती ती सर्वांसाठी.
गेल्या पासष्ट वर्षांहून जास्त जन्मभराचे एकटेपण सोसायची शक्ती कुठून मिळाली तिला... माहीत नाही. पण अविरत कष्ट करत तिने त्यावर मात केली.
मला आठवते, आमच्या शाळेचा वाढदिवस असायचा मार्चमध्ये. शाळेत सगळ्यांना मोठ्ठा केशरी पेढा दिला जायचा. मी मला मिळालेला पेढा खाऊन पळत तिच्याकडे जायची, कारण तिने तिला मिळालेला पेढा माझ्यासाठी ठेवलेला असे. त्यातला थोडा तुकडाही ती खायची नाही. आणि मलाही हे कधी कळायचे नाही की त्या काळातील परिस्थितीप्रमाणे तिलाही वर्षातून एकदाच तो मिळत असेल. हे आठवले की मला आजही खूप वाईट वाटते.

वाड्यातल्या आमच्या खोलीच्या समोरच्या रिकाम्या जागेत छबू नावाचा एक मुलगा राहायचा. वाड्यातील कोणाचे सामान आणून दे, तर कोणाच्या घरातील काही किरकोळ कामे करून तो पोट भरायचा. या बदल्यात त्याला शिळे अन्न द्यायचे लोक. तो ते तिथेच बसून जेवायचा. आजी त्याला रागावून त्याचे शिळे अन्न काढून घेऊन त्याला ताजे अन्न देत असे. त्याचे सामान अस्ताव्यस्त पसरलेले असे. ते आवरून नीट लावून ठेवत असे.
त्या छोट्याशा खोलीत मला दुपारी कुशीत घेऊन कितीतरी गोष्टी सांगितल्या आहेत तिने. अक्षरओळख नस्तानाही इतक्या गोष्टी कशा येत होत्या तिला? पण तिच्यामुळेच मला गोष्टी ऐकायची आणि पुढे पुस्तके वाचायची आवड निर्माण झाली. माझ्या मुलालासुद्धा लहानपणी तिने अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

घरात कोणाला थोडे जरी बरे नसेल तर या वयातही ती अगदी उशा-पायथ्याशी बसून राहते. डोके दुखत असेल तर सहाणेवर सुंठ, मुका मार असेल तर रक्तचंदन उगाळून घालेल. ती व्यक्ती बरी होईपर्यंत चैन पडत नाही तिला. हे फक्त घरातील माणसांसाठीच नाही. समोरची व्यक्ती नात्याची असो वा नसो, ती तेवढाच जीव लावते. घरात कोणीही पाहुणे येवोत, ती सर्वात आधी पाणी घेऊन पुढे येते.

आजही घरातील देवपूजा करणे, कपड्यांच्या घड्या करून ठेवणे, भाज्या-पालेभाज्या निवडून ठेवणे, लसूण सोलून ठेवणे अशा प्रकारची सर्व कामे ती स्वतःहून करत असते. रोज न चुकता सकाळ-संध्याकाळ चालायला जाते. स्वतःच्या तब्येतीची स्वतः काळजी घेते. अगदी आत्ता आत्तापर्यंत बसने एकटी फिरत होती. आता नव्वदीच्या जवळ आलीये.

अशा परिस्थितीवर मात करण्याचे धैर्य तिने कसे मिळवले याचा विचार करताना मला नेहमी जाणवते की अविरत कष्ट, कोणाकडूनही मदतीची अपेक्षा न ठेवणे, कोणाहीबद्दल कधीच कटुता नाही, आपल्या लेकरांना आपल्याशिवाय कोणीही नाही याची सतत जाणीव ...हेच तिचे जगण्याचे सूत्र होते.
तिला कधी थोडासा रिकामा वेळ मिळालाच, तर देवपूजा, नातवंडांना गोष्टी सांगणे यातच तिने तिचा वेळ सत्कारणी लावला. बायकांमध्ये बसून गप्पा मारणे, कोणालातरी नावे ठेवणे असे कधीही तिने केल्याचे मला आठवत नाही.

अजून बरेच काही लिहायचे राहिलेय तिच्या आयुष्याबद्दल. सवडीने सगळेच लिहीन. तिचे जगणे जगासमोर आणायला हे व्यासपीठ लाभलेय हे खुप मोठे सुदैव आहे.
तिला असेच निरोगी दीर्घायुष्य लाभो. तिच्यासारखे खंबीर मनोधैर्य, नि:स्वार्थी वृत्ती, निगर्वीपणा प्रत्येकाला लाभो.

.

महिला दिन विशेषांक २०१७

प्रतिक्रिया

उल्का's picture

8 Mar 2017 - 4:27 pm | उल्का

मोनु, तुझ्या आजीला नमस्कार!
जरुर लिही तिच्यविषयी अजून...

अजया's picture

8 Mar 2017 - 6:02 pm | अजया

मोनू, आजीला साष्टांग दंडवत सांग. काय ते अफाट कष्ट.

स्मिता श्रीपाद's picture

8 Mar 2017 - 6:46 pm | स्मिता श्रीपाद

मोनु तुझ्या आजीला नमस्कार सांग आमचा.
मस्त झालाय लेख .
अजुन वाचायला आवडलं असतं खरच.

आजींची खूप सुंदर ओळख. त्यांना सादर नमस्कार. केव्हढे कष्ट आणि जिद्द _/\_

महिलादिनाला साजेसा लेख मोनु! आजीच्या कष्टांना नमस्कार.

मोनु ताई , खुप भाग्यवान आहेस अशी लाख मोलाची आज्जि लाभली :)

पण या सगळ्या धावपळीतही ती माझ्यासाठी न चुकता गरम गरम जेवण घेऊन यायची शाळेच्या गेटजवळ आणि गेटखालच्या फटीतून ते ताट सरकवून मला जेवण द्यायची व गेटच्या जाळीतून मन भरून बघत बसायची मला जेवताना.

हे वाचून डोळ्यात पाणी आलं.
संवेदनाक्षम मन, निरपेक्ष प्रेम आणि अविरत काम याच्या बळावर तुमच्या आज्जींनी केवढा मोठा संदेश दिलाय आम्हाला! माझा नमस्कार सांगा त्यांना! __/\__

विभावरी's picture

9 Mar 2017 - 4:04 pm | विभावरी

खूप छान वाटलं वाचून मोनू .केवढी प्रेमळ आजी आहे ;अजून वाचायला आवडेल !

आजींना नमस्कार ... खूप छान वाटलं लेख वाचून.. साध्या साध्या गोष्टीमध्ये कुरकुरायची सवय लागलेली असताना हा लेख अंतर्मुख करणारा आहे .

प्रीत-मोहर's picture

9 Mar 2017 - 4:43 pm | प्रीत-मोहर

आज्जींची ओळख आवडलीच मोनु. अजूनही आठवणी वाचायला नक्कीच आवडतील.

नूतन सावंत's picture

9 Mar 2017 - 4:52 pm | नूतन सावंत

मोनू,आजीना साष्टांग दंडवत.दर्शनाची आस लागली ग हे सारे वाचून.इतकं कमी का लिहिलंस?

पूर्वाविवेक's picture

10 Mar 2017 - 11:58 am | पूर्वाविवेक

महिलादिनाला अगदी साजेसा लेख ! आजीच्या कष्टांना, तिच्या हिम्मतीला नमस्कार.
माझ्या आजीची आठवण आली. ती पण अशीच दिवसभर काहीनाकाही करत बसते. या आज्या ना अश्याच क्युट असतात.

मनिमौ's picture

10 Mar 2017 - 12:35 pm | मनिमौ

आजी लोकांना सगळ सोसून ईतकी ऊदंड माया कशी काय करता येते हे फार मोठे कोडय माझ्या साठी. आजीबद्दल अजून लिही ग

गिरिजा देशपांडे's picture

10 Mar 2017 - 3:44 pm | गिरिजा देशपांडे

मला माझ्या आजीचा चेहरा दिसला फोटो मध्ये. :) दुर्दैवाने मला तिचा फार सहवास लाभला नाही. तुम्ही खूप भाग्यवान आहात तुम्हाला आजीचा सहवास लाभतोय. लेख खूप छान.

पैसा's picture

10 Mar 2017 - 4:02 pm | पैसा

अगदी जिव्हाळ्याने लिहिलं आहेस!

मस्त! अगदी धैर्याची आहे तुझी आजी. फोटू एकदम गोड!

भाग्यश्री कुलकर्णी's picture

17 Mar 2017 - 2:53 pm | भाग्यश्री कुलकर्णी

खूप छान. आजी भावली खूप .

माझी आजी आठवली,अजुन वाचायला आवडलं असतं खरच.

सपे-पुणे-३०'s picture

19 Mar 2017 - 3:40 pm | सपे-पुणे-३०

आजींची ओळख खूप छान. अजून वाचायला नक्की आवडेल. तू खरंच भाग्यवान आहेस तुला अशी प्रेमळ आजी मिळाली. आजींच्या कष्टांना आणि कणखरपणाला सलाम!

स्वाती दिनेश's picture

19 Mar 2017 - 4:22 pm | स्वाती दिनेश

मोनु, तुझ्या आजीला नमस्कार.
छान लिहिले आहेस.
स्वाती

फारएन्ड's picture

20 Mar 2017 - 3:03 am | फारएन्ड

टोटल रिस्पेक्ट! छान लिहीले आहे.

मोदक's picture

20 Mar 2017 - 10:36 am | मोदक

__/\__

मोनू फार छान लिहीलय. मन भरून आल आणि माझ्या आजीचीही आठवण आली. तिही नातलगांकदून किंवा कुणाकडे पाहूणी म्हणुन गेल्यावर मिळालेला खाऊ जपून ठेवायची आणि मला आणुन द्यायची.

तुझ्या आजीचे पुढचे आयुष्य असेच आरोग्यदायी व आनंदी जावो ही सदिच्छा आणि त्यांना नमस्कार.

५ x ५ची खोली कधीच पाहिली नाही. जुने वाडे, चाळीतल्या खोल्या साधारण १० x १०च्या असतात. त्यांच्या भिंतीच एक-सव्वा फुट रुंद असतात.

आणखी एक शंका: तुमच्या आजी 'एकटीनेच' ५ किलोच्या पोळ्या दिवसातून दोनदा महिनाभर रोज करायच्या का?
आणि त्याचा मोबदला म्हणून रोज केवळ संध्याकाळचे ६ जणांचे जेवण मिळायचे?

एनीवे या आज्जींनी स्वतःच्याच कुटुंबाकरता का होइना पण खरोखरच कष्ट केलेत असे वाटते...

असे लेख वाचले की मला जरा वेगळाच प्रश्न पडतो: स्वातंत्र्याच्या आसपासच्या पिढीतील लोकांनी, खाउजाच्या बर्याच आधीच्या काळात घेतलेले कष्ट लोकांसमोर आणले जातात. पण खाउजानंतर २५+ वर्षांनीदेखील, त्याच सगळ्यातून जाणार्या आपापल्या मोलकरीणबद्दल लोकांची काय मतं असतात?

मितान's picture

22 Mar 2017 - 10:12 pm | मितान

सुंदर लेखन !
मला ही माझी आजी आठवली मोनू. सधन, मोठ्या कुटुंबातली जबाबदाऱ्या आणि पुरुषी वर्चस्वाखाली दबलेली पण तरीही आनंदी असणारी / भासणारी !

पिशी अबोली's picture

22 Mar 2017 - 10:45 pm | पिशी अबोली

किती सुंदर, साधं सरळ लिहिलंय. अशा कष्टाळू आणि नितळ आजींबद्दल वाचून अतिशय छान वाटलं..

पिशी अबोली's picture

22 Mar 2017 - 10:45 pm | पिशी अबोली

किती सुंदर, साधं सरळ लिहिलंय. अशा कष्टाळू आणि नितळ आजींबद्दल वाचून अतिशय छान वाटलं..

छान लिहीलं आहेस मोनु ! आजीला नमस्कार सांग !

भुमी's picture

23 Mar 2017 - 1:58 pm | भुमी

वैधव्याची कुर्हाड लहान वयात कोसळल्यावर पदरात सहा कच्चीबच्ची असताना असेच काहीसे आयुश्य माझी आजी पण जगली. या माउलींच्या धैर्याला ,कष्टाला साष्टांग नमस्कार....

रुपी's picture

15 Apr 2017 - 5:29 am | रुपी

फार छान लिहिलंय.
माझी आजीच आठवली हे वाचता वाचता. परिस्थितीमुळे असं नाही, पण आम्हा नातवंडांना आमच्या आवडीचे पदार्थ करुन खाऊ घालण्यासाठी पहाटे चारलाच उठून काम सुरु करायची.

चित्रगुप्त's picture

15 Apr 2017 - 12:24 pm | चित्रगुप्त

खूप छान अगदी मनापासून लिहीले आहे. आजीला साष्टांग नमस्कार.