Tokyo – A visit to remember

हृषिकेश पांडकर's picture
हृषिकेश पांडकर in भटकंती
17 Mar 2017 - 11:14 am

शरीराचे एखादे अंग निकामी असेल किव्वा त्याला व्यंगत्व असेल तर त्या व्यक्तीची बाकीची इंद्रिय इतरांपेक्षा जास्त सक्षम असतात हा निरीक्षणातून आलेला निष्कर्ष आहे.आणि या निष्कर्षाला पूर्णत्वाची पावती मिळते ती जपानला भेट दिल्यावर.

काठोकाठ भरलेल्या बशीत बिस्कीट सोडावे तसे चारही बाजूंनी समुद्राने वेढलेला निमुळता भूप्रदेश,आपल्याकडे लाईट जावी त्या सहजतेने होणारे भूकंप.हिरोशिमा,नागासाकी येथील हल्ल्यानंतर उध्वस्त झालेले जपान. या तीनही व्यंगावर सहजतेने मात करून किंबहुना याच राखेतून भरारी घेऊन फिनिक्स पक्षाप्रमाणे वाटचाल करणाऱ्या उगवत्या सूर्याला खऱ्या अर्थाने दोन्ही हातांनी अर्घ्य देण्याची संधी मिळाली.

पुणे-मुंबई किव्वा मुंबई-टोकियो हा प्रवास लिहायला नक्कीच आवडेल पण तूर्तास थेट नारिता वरून सुरुवात करतो.विमानातली झोप पूर्ण व्हायच्या आधी पहिल्यांदा जपानी भाषेतून उतरण्याचे निवेदन झाले आणि इतके दिवस शिकत असलेल्या जपानी भाषेचा खऱ्या अर्थाने प्रत्यय आला.

प्रगत तंत्रज्ञान आणि सर्वार्थाने विकसित देश असे ज्याचे वर्णन चपखल बसते अशा देशाच्या सर्वात मोठ्या एअरपोर्टवर उतरताना कमालीचा उत्साह होता.बाहेर कितीही थंडी असली तरी दोन इंचाचे पसरलेले गालिचे आणि एअरपोर्टचा सर्व परिसर उबदार ठेवणारी यंत्रणा यामुळे बाहेर पडेपर्यंत तरी जपानने माझे 'Warm Welcome' केले.बाहेर पडताना लावलेला 'Welcome' चा बोर्ड लक्ष वेधून घेत होता.

1

एअरपोर्ट ते रहायची जागा यामध्ये सुमारे दोन तासाचे अंतर असल्याने बस मधून जाताना खिडकीतून बघणे किव्वा झोपणे या पलीकडे फार काही काम नव्हते.पण पूर्णतः नवीन देश आणि आपल्याबरोबर कोणीही नाही या गोष्टी एकमेकांना किती पूरक आहेत हे जाणवायला सुरुवात झाली.सोबत कोणी नसताना नकळतच निरीक्षण करण्याची इच्छा वाढीस लागते.

सामान उचलून बस मध्ये ठेवण्याचे अगत्य,फक्त परदेशी लोकांनाच नाही तर जपानी प्रवाशांचेसुद्धा हसून स्वागत करण्याची पद्धत या गोष्टी पाहून बरे वाटले.प्रवास सुरु झाला.साधारण दुपारचे चार साडेचार झाले होते.हवेत तसा गारठा होता.चार पदरी रस्ते.दुतर्फा हिरवळ,शिस्तीने चालणाऱ्या आजूबाजूच्या गाड्या आणि हॉर्न विरहित होणारा प्रवास विमान प्रवासाचा शीण झटकत होता.इतके दिवस पुस्तकात वाचलेल्या सूचना आज प्रत्यक्षात वाचायला मिळत होत्या.डोळ्याला दिसणारी प्रत्येक गोष्ट नवीन होती.

2

सुमारे सव्वासहाला मी बस मधून उतरलो.सूर्यास्तानंतर क्षणार्धात अंधार झाला होता.गारवा वाढला होता.खोलीचे दार उघडायचे कसे (*) इथपासून ते पोहोचल्यावरचा चहा इथपर्यंतच्या गोष्टी डोळ्यासमोर येत होत्या.टोकियोच्या अगदी मध्यभागात आणि रोडलगत असल्याने रस्ता अक्षरशः वहात होता.

रात्र सरली आणि नवीन दिवस उजाडला.ऑफिसला निघायचे होते.प्रत्येक गोष्ट शोधत विचारात ऑफिसला जाण्यात कमालीची मजा येणार होती.घरापासून मेट्रो स्टेशन आणि पुन्हा उतरून ऑफिस पर्यंत चालत, या रोजच्या प्रवासाने खूप गोष्टी दाखवल्या.पुण्याच्या तुलनेत वाढीव पण अगदी असह्य होईल इतकीही नसलेली थंडी अंगावर घेत मी सकाळी घर सोडले.

संपूर्ण मेट्रो स्टेशनभर टक टक आवाज करत चालणाऱ्या त्या गोऱ्या बाहुल्या,गाडीत किव्वा अगदी रस्त्याने चालताना सुद्धा मोबाईल फोन मध्ये डोके खुपसले जपानी लोक,अनेक लोक असूनही कमालीची शांतता आणि नजरानजर झाल्यास उमटणारे स्मितहास्य या गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या.बहुढंगी आणि बहुरंगी असलेल्या या टोकियो शहरात अगदी अलिखित नियम असल्याप्रमाणे बरेचसे लोक काळ्या पांढऱ्या कपड्यातच पाहायला मिळत होते.कदाचित हा देखील एक शिस्तीचाच भाग असू शकेल.

4

स्टेशनवर असलेली तिकीट काढण्याची जागा हि पूर्णपणे स्वयंचलित असल्याने तिकीट द्यायला कोणी वेगळा माणूस नजरेत येत नव्हता.मात्र इतर गोष्टींची चौकशी अथवा काही मदत लागल्यास आवर्जून मदत करणारे स्टेशनमास्तर सदृश्य पोलीस लोक इथे कायम तत्पर होते.मदत करण्याची इच्छा,जाणीव आणि जबाबदारी या तीनही बाजूंची चोख अंमलबजावणी करणारा जपानी माणूस इथे खऱ्या अर्थी पाहायला मिळत होता.किंबहुना हाच अनुभव दुकान,ऑफिस,रस्ता,पोस्टऑफिस,बँक किव्वा हॉटेल अशा कुठल्याही ठिकाणी सारखाच होता.

मेट्रो स्टेशन मध्ये असलेल्या अनेक दुकानांचा,हॉटेल्सचा लखलखाट आपण नक्की कुठे आहोत याचा विसर पाडतात.सगळीकडे असलेले अचूक सूचनाफलक एखाद्या नवशिक्या व्यक्तीला देखील सराईत बनवतात.रेल्वेस्टेशन म्हणल्यावर आपल्या डोक्यात असलेली प्रतिमा आणि इथला अनुभव याची तुलना न करणे इष्ट.

3

स्टेशनवर फरशी पुसणारा कामगार वर्ग,घाईत ऑफिसला निघालेला माध्यम वर्ग,उंची लांब कोट घालून प्रवास करणारा उच्चमध्यमवर्ग किव्वा ऍस्टन मार्टिन,लॅम्बॉरघिनी किव्वा ऑडी बीएमडब्ल्यू सारख्या गाड्यातून फिरणारे गडगंज जपानी यांच्या वागण्या बोलण्यातील आणि आचरणातील समानता खऱ्या अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण आहे.किंबहुना पैसे,राहणीमान किव्वा कार्यपद्धती यामुळे मुळे जपानी स्वभावाला कुठेही तडा जात नाही याचे अप्रूप वाटल्याखेरीज किमान भारतीय माणूस तरी परतणार नाही इतके नक्की.हे मुद्दाम सांगायची गरज आहे कारण थोड्या अधिक प्रमाणात अमेरिकन आणि युरोपियन लोकांमध्ये शिष्टपणा आढळून येतो.जो इथे दुरापास्त आहे.

स्वभावातच विनम्र आणि मृदुपणा जन्मजात भिनलेला,किंचितही ओळख नसली तरी पाहिल्यावर स्मितहास्य देण्याची आपल्यासाठी नवखी असलेली सवय.समोरचा हळू चालत असेल तरी मागून त्याच गतीने चालण्याचा सय्यम किव्वा अगदीच घाई असेल तर उजव्या बाजूने पुढे जाण्याचा आपल्याकडे अभावानेच आढळणारा समजूतदारपणा या गोष्टी पाहिल्यावर आपल्यालाच गहिवरून येते.

पैसे,वेळ,वचनबद्धता किव्वा जबाबदारी या कुठल्याच अंगावर न फसवण्याची आग्रही प्रवृत्ती आणि त्यामुळे आपल्यासारख्या परदेशी लोकांना भाषेचे अज्ञान किव्वा नवीन प्रदेश यामुळे कदाचित फसवले जाण्याची भीती वाटू शकते. मात्र याची शक्यताच संपून जाते.रात्रीचे अवाजवी भाडे,परदेशी नागरिकांची लूट या गोष्टी यांच्या गावी देखील नाहीत.यामुळे एकट्याने प्रवास,महिलांचा प्रवास किव्वा कुठल्याही नवीन ठिकाणाचा प्रवास कमालीचा सुसह्य वाटतो.

वक्तशीर,नियमित,न चुकणारा,पुरेसा आणि आरामशीर असलेल्या स्थानिक वाहतुकीच्या सोयींमुळे स्वतःची दुचाकी अथवा चारचाकी वापरण्याचे नगण्य प्रमाण येथे पहायला मिळते.पण तरी रस्त्यावर वाहनांची गर्दी असतेच, मात्र वाहनांची गर्दी आणि वाहनांची कोंडी यातील फरक यांनी कटाक्षाने जपलेला आहे.

ऑफिस मध्ये कुठेही क्युबिकल पद्धत फरशी पहायला मिळत नाही.सलग मांडलेली टेबल्स आणि त्यावर काम करणारे जपानी लोक.कायमच थंडी आणि पाऊस यांचा लपंडाव असल्यामुळे 'फर' चे कोट आणि छत्र्या ठेवण्यासाठी केलेली स्वतंत्र सोया लक्षात राहते.ऑफिस मध्ये आल्यावर किव्वा ऑफिस मधून निघताना त्या त्या वेळेनुसार येणारे शुभेच्छापर वाक्य आवर्जून म्हणणारे जपानी पहिले कि हा नम्रपणा आहे कि लागलेली सवय याचा पत्ताच लगत नाही.पण कितीही कामाच्या गडबडीत शुभप्रभात किव्वा शुभरात्र किव्वा इतर कोणतेही वाक्य कमरेत वाकून म्हणणारा जपानी व्यक्ती आदरयुक्त मजेशीर वाटतो.

इथला अजून एक वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणजे दुपारचे जेवण.मी या आठ दिवसात कोणी घरून डबा घेऊन आलेले पहिले नाही.पण तरीही सदैव काहीतरी तोंडात टाकणे आणि बरोबरीने बाटलीतून कसलेतरी घोट घशात रिचवणे अव्याहतपणे चालू असते.कितीही महत्वाची मीटिंग,चर्चा,प्रेझेंटेशन किव्वा काहीही असले तरी जपानी माणूस आपल्यासोबत पिण्यासाठी काहीतरी जवळ बाळगतोच.आणि कदाचित यामुळे कधीकधी ऑफिसभर पदार्थाचा घमघमाट सुटल्याचा प्रत्यय मला आला.

त्याबरोबरीने बघायला मिळते ते म्हणजे कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे मिळालेले बाळकडू.प्लास्टिकच्या बाटल्या,कॅन,ओला कचरा,सुका कचरा या आणि अशा सर्व मथळ्याखाली साचणारा कचरा त्या त्या बादलीत टाकतानाच वेगळा टाकून पुढील विल्हेवाटासाठी रीतसर हातभार लावणारा जपानी माणूस.युरोपातील देशात अशा पद्धतीचे वर्गीकरण दिसून येत नाही त्यांच्या वेगळ्या पद्धती आहेत.पण दोन्ही ठिकाणी कचऱ्याची व्यवस्था उत्तमरीत्या लावलेली पहायला मिळते.आणि यामुळेच साठलेला कचरा किव्वा त्यामुळे निर्माण होणारी दुर्गंधी या देशाच्या लेखी नाही.

5

एक दिवसाच्या सुट्टीचा फायदा घेऊन टोकियो जवळ असलेल्या 'आसाकुसा' या मंदिराला भेट दिली.बुद्ध धर्माचा प्रसार झाल्याने अशा प्रकारची मंदिरे येथे पहायला मिळतात.पॅगोड्यासारखी बांधणी,भव्य आवार आणि दुतर्फा साकुराची झाडी असे ते दृश्य सकाळच्या वेळेला विलोभनीय वाटते.सुट्टीचा दिवस असल्याने तोबा गर्दी होतीच.पण शिस्तीचा अभाव कुठेही दिसून आला नाही.तुळशीबाग मध्ये असल्यासारख्या दोन्ही बाजूस छोट्या दुकानांच्या रांगा पसरलेल्या पहायला मिळतात.इतकी दुकाने असूनही घासाघीस होण्याचा आवाज,दोन दुकानदारांची भांडणे किव्वा गिर्हाइकाशी होणारी खरखर या गोष्टी दुर्मिळच.

6

साकुराची सुरुवात जवळ आल्याने काही झाडांवर नुकताच फुलू लागलेला साकुरा दृष्टीस पडत होता.अजून तो गुलाबी जरी झाला नसला तरी नुकताच फुटलेला साकुरा मजेशीर दिसत होता.दोन्ही बाजूस असलेले कामिनारी-मोन लक्ष वेधून घेत होते.इथेही लोकांच्या श्रद्धा आपल्यासारख्याच पहायला मिळतात.पाय धुवून मंदिरात जाणे,चेहेऱ्यावर धूप घेणे,दानपेटीत पैसे टाकणे इत्यादी.येथे विविध प्रकारच्या घंटा लावलेल्या आहेत.परिसर स्वच्छ असल्याने नैसर्गिक पावित्र्य अनुभवायला मिळत होते.आदल्या दिवशीच 'हिनामात्सुरी' नावाचा सण झाल्याने काही ठिकाणी तो साजरा केल्याच्या खुणा दिसत होत्या.

7

8

9

याच मंदिराच्या आवारातून उजव्या हाताला टोकियो 'स्काय ट्री' डोकावताना दिसतो.त्यामुळे एकाच आवारातून साकुराची फुले,प्रार्थना स्थळ आणि प्रगत विज्ञानाचा नमुना असलेला हा स्काय ट्री पाहता येत होता

10

इथे असलेल्या छोट्या दुकानातून नुसता फेरफटका मारणे देखील एक वेगळाच अनुभव आहे.जपानच्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी,प्रसिद्ध वास्तूंच्या चुंबकीय प्रतिकृती,जपानी पंखे,बाहुल्या या व अश्या अनंत प्रकारच्या शोभेच्या वस्तू मांडून ठेवलेल्या आढळतात.दुकान संभाळणाऱ्या जक्खड म्हाताऱ्या स्वागत करण्यासाठी कमरेत वाकतात तेव्हा आपल्यालाच कसेतरी होते.या दुकानांबरोबर विविध प्रकारची मिठाई आणि खाण्याचे स्टॉल्स पहायला मिळाले.स्टॉल्सवर मिळणारे पदार्थ बाहेर जाऊन खाण्याची परवानगी नाहीये असं नाही पण दुकानात मुद्दाम तयार केलेल्या जागेत उभे राहून खाण्याचा दुकानदारांचा आग्रह असतो,जेणेकरून खाद्यपदार्थ रस्त्यावर सांडणार नाहीत.आणि हाच अलिखित नियम सर्वांनी स्वतःला लागू करून घेतला आहे.अशा छोट्या गोष्टींमधून नागरिकांची देशाविषयाची आस्था पावलोपावली दिसून येत होती.

11

देवदर्शन आणि खरेदी या दोन्ही आपल्याला नवीन नसलेल्या गोष्टी करून मंदिराच्या आवारातून बाहेर पडलो.एखाद्या नवीन ठिकाणी आपापले आणि चालत फिरण्यासारखे सुख नाही.एकतर सगळ्या गोष्टी नवीन असल्याने ती पाहून,समजून मग पुढे जाणे मजेशीर असते.शिवाय हवे तिथे हवं तितका वेळ रेंगाळायला मुभा असते.त्यामुळे विंडो शॉपिंग आणि प्रत्यक्ष खरेदी अश्या दोन्ही गोष्टी शिताफीने पूर्ण करत आम्ही त्या भागातून फिरत होतो. मंदिराच्या आवारात आणि त्या थंड वातावरणात गरम जपानी चहा घेत निवांत बसलेले लोक,शेजारीच असलेल्या बुद्धाच्या मूर्तीप्रमाणे समाधानी वाटत होते.कोवळे ऊन पडले होते मात्र त्याचा उबदारपणा अगदीच नगण्य होता.

12

असंख्य खाण्याची दुकाने त्यातून येणारे अनंत प्रकारचे वास,शोभेच्या वस्तू,गृहपयोगी वस्तूंचे मोठे मॉल्स,इलेकट्रोनिक वस्तू विकणारी तीन तीन माजली दुकाने,भेटवस्तू किव्वा जपानची खासियत असणाऱ्या वस्तू मिळणारी अनेक छोटी छोटी दुकाने दार दोन मिनिटाला थांबायला भाग पाडत होती. हॉटेल्सच्या बाहेर रचलेल्या पदार्थांच्या प्रतिकृती लक्षवेधक होत्या.आपल्याला मिळणार पदार्थ कसा दिसेल हे दाखवण्याच्या हेतून मांडून ठेवलेले प्रतीकात्मक पदार्थ लोक थांबून पाहत होते.जपान मध्ये अशा प्रकारचे मेनूकार्ड सर्वसाधारण पाने सगळीकडे पाहावयास मिळते.

13

छोट्या दुकानातील खरेदीचा अनुभव वेगळाच होता.सुट्ट्यांसाठी कायम होणारी मारामारी इथे दिसली नाही.कितीही आणि कसेही पैसे दिले तरी त्याचे सुट्टे पैसे मिळत होते.वस्तू खरेदी करा अथवा नको पण कमरेत वाकून स्वागत आणि निरोप हे दोन्ही विधी यथासांग पार पडत होते.नम्रपणा आणि आदरातिथ्य याला ओळख अथवा नात्याची गरज नसते हे या देशाने शिकवले.

15

जपानमध्ये शाकाहारी मिळत नाही हि अखेर अफवाच ठरली.अर्थात पर्यायांची उपलब्धी जरी मर्यादित असली तरी उपासमार होण्याची शक्यता नक्कीच नसते.फक्त चव वरखाली होते एवढे निश्चित.पण चव चाखणे हा वेगळाच अनुभव होता.

हॉटेल मध्ये जाऊन बसणे ऑर्डर देणे.यामध्ये त्यांची ताट मांडण्याची पद्धत.चमच्यांऐवजी चॉपस्टिक ठेवणे,बिल आणून द्यायची पद्धत या गोष्टी नवीन होत्या.अजून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे सुमारे सत्तर टक्के दुकानात,हॉटेलात व्यवस्थापन बघण्यात स्त्रिया अग्रेसर होत्या.जे लोक व्यवस्थित नॉनव्हेज खातात त्यांना 'ट्राय' करण्यासारखे असंख्य पर्याय येथे आहेत पण भारतीय चव आणि इथली चव यात मुळातच प्रचंड तफावत असल्याने उपलब्ध असूनही ताव मारता येईलच असे नाही.अर्थात हा ज्याच्या त्याच्या जिभेचा प्रश्न आहे.

14

आसाकुसा स्टेशन मधून बाहेर पडल्यावर सुमीदा नदीवर बांधलेला पूल नजरेस येतो.या पुलावरून दिसणारा टोकियो स्काय ट्री,असाही बियर हॉल आणि अवाढव्य दिसणारी 'गोल्डन फ्लेम' पर्यटकांचे आकर्षण ठरते.

16

अगदी दहा-बारा दिवसात आलेला अनुभव कदाचित वरवरचा नक्कीच असू शकेल पण तुलना करण्याची आपली वृत्ती स्वस्थ बसून देत नाही.प्रत्येक देशाच्या जमेच्या आणि पडत्या बाजू या असतातच. या व्यतिरिक्तही बुलेट ट्रेन,फुजी पर्वत,टी-सेरेमनी,ज्वालामुखी पर्वत आणि क्योतो,निक्को सारखी अप्रतिम ठिकाणे अशा अनेक गोष्टी पाहायच्या बाकी आहेतच.पुढल्या भेटीत या गोष्टी पाहायची संधी मिळेल अशी अशा करतो.

एकूणच अनुभव वेगळा होता.कला,संस्कृती यांचे जतन करत असतानाच विज्ञान,उद्योग आणि तंत्रज्ञानातही हा देश दोन पावले पुढे आहे.मुख्यत्वाने भारत,युरोप आणि जपान या तीन प्रदेशांची तुलना केली तर संस्कृती,परंपरा आणि जागतिक पार्श्वभूमीवर देशाचा विकास या तीनही गोष्टींची सांगड घालत चालू असलेला प्रवास प्रकर्षाने पहायला मिळतो.कदाचित संस्कृती आणि परंपरेची जोपासना आणि संवर्धन या आघाडीवर अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया हे या तिघांच्या तुलनेत काहीसे मागे आहेत असे वाटते.

संधी मिळाल्यास या उगवत्या सूर्याच्या देशाला नक्की भेट देऊन या.नैसर्गिक श्रीमंती,आर्थिक सुबत्ता,औद्योगिक प्रगती आणि तंत्रज्ञानाची किमया या व्यतिरिक्तही अनेक गोष्टी लक्षात राहण्यासारख्या आहेत.अशा ठिकाणी फिरत असताना एक प्रवासी किव्वा पर्यटक म्हणूनही मोठी जबाबदारी आपल्यावर असते.आणि ती पार पाडण्यातच खरी मजा आहे.

पुलंच्या 'पूर्वरंग' ची प्रत्यक्ष उजळणी करून परतीच्या विमानाने नारिताचा रन'वे सोडला आणि भारताचा पश्चिम किनारा साद घालू लागला.

हृषिकेश पांडकर

१६-०३-२०१७

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

17 Mar 2017 - 12:40 pm | पद्मावति

खुप मस्त.

छानच प्रवासवर्णन पण क्रमशः नाही हे पाहून वाईट वाटले. लिखाणाची शैली छान आहे. पुढे नवीन अनुभवांवर वाचायला नक्कीच आवडेल

जगप्रवासी's picture

17 Mar 2017 - 1:50 pm | जगप्रवासी

खूप छान लिहिलं आहे, एखाद्या संध्याकाळी निवांत फिरावं अशा प्रकारचा फील वाचताना आला.

केदार-मिसळपाव's picture

17 Mar 2017 - 2:10 pm | केदार-मिसळपाव

जापान ची छान ओळख करुन दिलीत. लिहीत रहा..

ओघवते वर्णन.. लेख सुंदर जमला आहे

पुढील भागाच्या प्रतिक्षेत..! (नक्की लिहालच)

प्रीत-मोहर's picture

17 Mar 2017 - 2:32 pm | प्रीत-मोहर

सुरेख!! पमीचान मुळे जपान आवडायला लागला आहेच. तुम्हीही त्यात भर टाकली. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Mar 2017 - 2:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर, ओघवते आणि चपखल वर्णन. अजून काही विस्ताराने लिहा, वाचायला नक्की आवडेल.

जपानच्या आथित्यशील आणि प्रत्येकाशी आदराने वागणार्‍या संस्कृतीबद्दल कोणालाही आदरच वाटतो.

पैसा's picture

17 Mar 2017 - 3:59 pm | पैसा

खूप छान लिहिलय!

भिंतीवर मेनू लावायाची मेथड आवडली, इकडे एखाद्या क्लायंटाला हि आयडीया द्यावी असे वाटत आहे. मस्त मस्त.

अनिंद्य's picture

17 Mar 2017 - 6:03 pm | अनिंद्य

@ हृषिकेश पांडकर

स्मृती चाळवल्यात!

अविश्रांत गजबज असलेले आणि तरीही देवळं, छोटे तलाव, बगीचे आणि स्मारके अशी सुंदर निवांत बेटं मुबलक असलेले टोकियो शहर प्रेमात पाडतेच.

तुमची अनुभव टिपण्याची शैली खूप छान आहे. लिहिते रहा, शुभेच्छा.

मदनबाण's picture

19 Mar 2017 - 4:26 pm | मदनबाण

सुरेख लेखन !
फुकुशिमा दायची न्यूक्लिअर डिझास्टर झाल्या पासुन जपान आणि जपानी लोकांन विषयी चिंता माझ्या मनात निर्माण झालेली आहे आणि अधुन मधुन त्यासंबंधी बातम्या वाचण्याचा प्रयत्न करत असतो.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तू आता है सीने में जब जब सांसें भरती हूँ, तेरे दिल की गलियों से मैं हर रोज़ गुज़रती हूँ, हवा के जैसे चलता है तू मैं रेत जैसे उडती हूँ, कौन तुझे यूँ प्यार करेगा जैसे मैं करती हूँ... :- M.S. DHONI

स्वाती दिनेश's picture

19 Mar 2017 - 4:32 pm | स्वाती दिनेश

लेख वाचून नॉस्टेल्जिक झाले. जपानच्या त्या दिवसांच्या आठवणी ताज्या झाल्या.
स्वाती

निवांतपणी जपानमध्ये फेर फटका मस्तच !!!

अजया's picture

21 Mar 2017 - 10:46 am | अजया

अजून वाचायला आवडेल.

एस's picture

29 Mar 2017 - 4:42 pm | एस

छान वर्णन.

मंजूताई's picture

29 Mar 2017 - 6:28 pm | मंजूताई

मस्त! ओवघते वर्णन खूप आवडले.

जुइ's picture

30 Mar 2017 - 9:05 pm | जुइ

जपानच्या भटकंती बद्दल अजूनही वाचायला आवडेल.