एक्सेल एक्सेल - भाग २५ - बहुगुणी जोडकाम (शेवटचा भाग)

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in तंत्रजगत
10 Mar 2017 - 5:38 pm

एक्सेल एक्सेल: भाग १ - भाग २ - भाग ३ - भाग ४ - भाग ५ - भाग ६ - भाग ७ - भाग ८ - भाग ९ - भाग १०

भाग ११ - भाग १२ - भाग १३ - भाग १४ - भाग १५ - भाग १६ - भाग १७ - भाग १८ - भाग १९ - भाग २०

भाग २१ - भाग २२ - भाग २३ - भाग २४ - भाग २५

सुरुवातीलाच 'एक भलामोठा कॅल्क्युलेटर' अशी ओळख करून घेतलेल्या मायक्रोसॉप्फ्ट एक्सेल या सॉफ्टवेअरचे अनेकविध पैलू आपण बघितले. एक्सेलबद्दल अनेकदा कुतुहलापेक्षा बाऊच जास्त असलेला बघायला मिळतो. त्याचं कारण सहाजिक आहे. आपल्याला ज्या गोष्टीचा वारंवार उपयोग करावा लागत नाही तिच्याबद्दल सहसा कुतुहल किंवा आवड निर्माण होत नाही. अनेक लोकांच्या बाबतीत एक्सेलचं नेमकं हेच चित्र असतं. परंतु केला तर या बहुगुणी सॉफ्टवेअरचा किती आणि कसा उपयोग होऊ शकतो त्याची थोडीफार कल्पना आपण घेतली.

नुसते अंक लिहिण्यापासून ते बेरीज वजाबाकी, माहिती, डेटा, त्याचं संकलन, व्यवस्थापन, सादरीकरण यासाठी लागणारे अनेक फॉर्म्युले किंवा फंक्शन्स, अंक-अक्षरं यांची रंगरंगोटी, टेबल्स, ग्राफ्स इत्यादी अनेक फीचर्स आपण बघितली. हे सगळं जरी महत्वाचं असलं तरी त्याहून अधिक महत्वाची एक गोष्ट आहे आणि जिच्यासाठी एक्सेलमधे कुठलंही रेडीमेड फंक्शन आपल्याला दिलेलं नाही, ती म्हणजे लॉजिक, किंवा तर्क. म्हणजे असं की अमूक एक गोष्ट एक्सेलमधे करायची वेळ आल्यास ती नेमकी कशी करावी, कुठलं फंक्शन वापरावं, एकापेक्षा अधिक फंक्शन्स एकावेळी कशी वापरावी हे सुचणं. हे लॉजिक तुमच्या डोक्यात विकसित होतं तेंव्हा तुमची एक्सेलशी खरी ओळख व्हायला लागते. तोवर शिकलेली ऐकलेली फंक्शन्स ही फक्त विखुरलेल्या मण्यांसारखी असतात. ती गुंफणारा धागा म्हणजे हे लॉजिक.

उदाहरणार्थ LEFT चा फॉर्म्युला माहीत असतानाही पूर्ण नावातून पहिलं नाव वेगळं कसं करावं हे कळणं, तीच गोष्ट TEXT-TO-COLUMNS ने करता येऊ शकते हे सुचणं, त्यात LEN आणि FIND वापरलं असता अशी अनेक नावांची यादी असेल तरीही एकाच फॉर्म्युलात हे काम कसं आपोआप होऊ शकतं हे सुचणं, दोन शीट मधे डेटा असल्यास फाइंड चा पर्याय न वाप्रता VLOOKUP वापरणं, IF च्या वापराने डेटाचं वर्गीकरण करणं, या आणि अशा अगणित गोष्टी. त्यामुळे एक्सेल माहिती असणं आणि त्याचा वापर येत असणं यात फरक आहे. एक्सेलचं मॅक्रोपे़क्षा अधिक प्रगत ज्ञान न घेताही त्याचा परिपूर्ण वापर करता येतो पण त्यासाठी विविध गोष्टी करून बघणं गरजेचं आहे, कारण खरी गंमत तिथेच आहे. त्यासाठी आपण आपलीच वैयक्तिक जमा-खर्चाची वही बनवावी, खर्चाची महिनावार नोंदणी करावी, त्याची वर्गवारी करावी, घरातली फोन नंबर्स ची वही एक्सेलमधे बनवावी, अभ्यासाचं वेळापत्रक, व्यायामाची नोंदवही, अशा अनेक गोष्टींची माहिती आपण एक्सेलमधे साठवावी. याने एक्सेलचा सराव, सवय, ओळख हे सगळंच होत जातं आणि आपसुकच आपण या सॉफ्टवेअरमधे 'एक्सेल' होत जातो.

a

- समाप्त -

प्रतिक्रिया

वाचनखूण साठवून ठेवली आहे. चांगली, उपयुक्त अशी मालिका. धन्यवाद!!

पैसा's picture

10 Mar 2017 - 6:52 pm | पैसा

लिंक्ससाठी प्रतिसाद देऊन ठेवते आहे. मधले काही भाग वाचायचे आहेत.

पिलीयन रायडर's picture

10 Mar 2017 - 7:15 pm | पिलीयन रायडर

अत्यंत चांगली मालिका केलीस ही!! मराठीत असे काम होणे आवश्यक आहे. तुझी दिवसभर किती धावपळ असते हे माहिती आहे, त्यामुळे तुझं जास्तच कौतुक वाटतं!

संजय क्षीरसागर's picture

10 Mar 2017 - 9:06 pm | संजय क्षीरसागर

बरेच परिश्रम घेतले आहेस. एक्सेलमधे काम करतांना नवा प्रश्न आला तरच चवकशी करायची अन्यथा आहे ते ज्ञान पुरेसं आहे असा अप्रोच असल्यानं सगळी प्रकरणं वाचली नाहीत. तरीही वेळ मिळेल तसा एकेका फिचरचा अभ्यास करुन तुला प्रश्न विचारीन.

फोन नंबर्स ची वही एक्सेलमधे बनवावी....

नव्या फिचर्सच्या सरावासाठी ही कल्पना आवडली

साधा मुलगा's picture

10 Mar 2017 - 9:31 pm | साधा मुलगा

उपयुक्त अशी मालिका !
तरी काही प्रश्न राहिले तर विचारीन

अप्रतिम मालिका ! नेटाने पूर्ण केलीस याचे खास कौतुक. एसएपी युटिलिटी बद्दल पण लिही ना. की आधी लिहीले आहेस? मी मिसलं असल्यास माहिती नाही.

सुधांशुनूलकर's picture

12 Mar 2017 - 1:33 pm | सुधांशुनूलकर

खूप आवडली. एक्सेलचा अगदी पुरेपूर वापर केलेला असल्यामुळे भावली.

माझ्या सहकार्‍याला एक्सेलची ओळख करून देताना या मालिकेचा उपयोग झाला. आमच्या प्रकाशनाच्या कामात एपीएस फॉण्ट वापरत असल्यामुळे सॉर्ट, फिल्टर वगैरे कोणतीच सुविधा वापरता येत नव्हती; पण सहकार्‍याला युनिकोड वापरण्याविषयी सुचवलं आणि सगळी समस्या चुटकीसरशी सुटली. त्यालाही आता एक्सेलमध्ये वेगवेगळे प्रयोग करायला आणि एक्सेलचीच मदत घेऊन समस्य सोडवायला आवडायला लागलंय.

जियो वेल्ला, जियो!

राघवेंद्र's picture

13 Mar 2017 - 4:11 am | राघवेंद्र

वेल्ला भाऊ खूप धन्यवाद !!!
मराठी मध्ये असल्यामुळे बऱ्याच मिपाकर नसलेल्या लोकांना पाठवता आली.

सध्या पोचपावती, वेळकाढुन वाचल्यावर परत देईल.

संजय पाटिल's picture

13 Mar 2017 - 8:00 am | संजय पाटिल

अतिशय उपयुक्त लेख. वाचनखुण साठवली आहे

कंजूस's picture

8 Apr 2017 - 6:04 am | कंजूस

>>जिच्यासाठी एक्सेलमधे कुठलंही रेडीमेड फंक्शन आपल्याला दिलेलं नाही, ती म्हणजे लॉजिक, किंवा तर्क. म्हणजे असं की अमूक एक गोष्ट एक्सेलमधे करायची वेळ आल्यास ती नेमकी कशी करावी, कुठलं फंक्शन वापरावं, एकापेक्षा अधिक फंक्शन्स एकावेळी कशी वापरावी हे सुचणं. हे लॉजिक तुमच्या डोक्यात विकसित होतं तेंव्हा तुमची एक्सेलशी खरी ओळख व्हायला लागते. तोवर शिकलेली ऐकलेली फंक्शन्स ही फक्त विखुरलेल्या मण्यांसारखी असतात. ती गुंफणारा धागा म्हणजे हे लॉजिक.>>

व्वा! चांगली लेखमाला दिली आहे.